अणुकचरा

[ अणुऊर्जा नेहेमीच वादग्रस्त राहिली आहे. ती तयार करायला लागणारे पदार्थ आणि तंत्रज्ञानच अणुबॉम्ब तयार करायलाही लागतात. त्यामुळे जबाबदार देशांना आपले अणुऊर्जा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय तपासण्यांसाठी खुले करावे लागतात. यामुळे होणारा सार्वभौमत्वाचा संकोच, यावर मोठाले वाद झडतात. अणुऊर्जा बनवण्याशी संबंधित तंत्रज्ञान नवे व्यामिश्र आणि उच्च प्रतीचे विज्ञान वापरणारे असते. त्यामुळे ती बनवायला तज्ज्ञ तंत्रज्ञ घडवण्यापासून सुरुवात करावी लागते. त्या ऊर्जाउत्पादनात काटकसर, तंत्रज्ञानाबाहेरचे घटक, घाईगर्दी, यांना थारा नसतो. जर अशा गोष्टींना वजन देत स्थळकाळ वा खर्चाचा अयोग्य संकोच केला गेला, तर अपघात होऊ शकतात, व ते भीषण असू शकतात. किरणोत्सारगळती माणसांना घाबरवते, कारण तीमुळे होणाऱ्या परिणामांत कॅन्सर, जनुकीय बदल, अशा भीती जागवणाऱ्या बाबी आहेत. बरे, सरकारी वा अणुउद्योग क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात तितकी गळती दुर्मिळही नाही.
चेर्नोबिलला २६ एप्रिल ७६ मध्ये एक अणुभट्टी वितळली. ५६ मृत्यू, ४००० आहत, दोन लाख स्थलांतरित, येवढे मोल देऊनही आजही चेर्नोबिल परिसर जीवसृष्टीला घातक आहे. तो अपघात रशियन (तेव्हा सोविएत) अडाणीपणामुळे झाला, असे सांगायचे प्रयत्न झाले. पण यूकेत विंडस्केल (१० ऑक्टो.५७), यूएसएत थ्री-माईल आयलंड, (२८ मार्च ७९) येथेही अणुभट्टया वितळून अपघात झाले होते. अणुबाँब वाहून नेणारी विमाने दुर्घटनाग्रस्त होऊन किरणोत्सार-प्रदूषणही यूएसएच्या बाबतीत अनेकदा झाले आहे.
सध्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, त्यातून उपजणारे धोके, यांवर चर्चा सुरू आहे. त्यातील अणुकचऱ्याच्या प्रश्नाबद्दल कल्पकम अणुभट्टीत काम केलेल्या रवींद्र काळ्यांनी लोकसत्तात हा लेख लिहिला. त्यावर विवेक माँटेरो यांनी (लोकसत्ता, ५ ऑगस्ट १०) पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केले.
या चर्चेच्या आयामांची, परिघाची कल्पना यावी, म्हणून हे दोन्ही लेख जुजबी संपादनानंतर पुनःप्रकाशित करत आहोत. – कार्यकारी संपादक]