‘मेंदूतला माणूस’ हे डॉ. जोशी आणि श्री जावडेकर ह्यांचे पुस्तक वैद्यकीय, वैज्ञानिक तसेच मानवीय अभ्यासशाखांमध्ये क्रांती घडवून आणणारे आहे. अगदी सुरुवातीच्या काळात, मानसशास्त्र आत्मा, मन आणि त्यानंतर जाणीव (Consciousness) इ.चा अभ्यास करीत असे. नैसर्गिक विज्ञानांच्या प्रसारानंतर, शास्त्राचा अभ्यासविषय निरीक्षणक्षम असला पाहिजे, हे लक्षात घेऊन मानसशास्त्रात मानवी वर्तनाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तेव्हापासून आजवर मानसशास्त्राने बरीच प्रगती केली आहे. तथापि स्मृती, अवधान, कल्पन, भावना, विचार इ. मानवी प्रक्रिया निरीक्षणक्षम नसल्याने त्यांच्या वस्तुनिष्ठ अभ्यासात अडचणी जाणवू लागल्या. ते मनाचे व्यापार समजले जात. म्हणजे शरीर-मन हे द्वैत जनमानसांतच नव्हे तर अनेक मानसशास्त्रज्ञांमध्येही खोलवर रुजले होते. वर्तनाच्या शास्त्रशुद्ध, सर्वंकष अभ्यासाला त्यामुळे मर्यादा पडत. आता अत्याधुनिक तंत्रांनी समृद्ध अशा मेंदुविज्ञानावरील प्रस्तुत पुस्तकामुळे बराच भ्रमनिरास होणार आहे. तथाकथित मनोव्यापारांची मेंदुस्थित कारणे दृश्य स्वरूपांत पुढे आल्यामुळे मन, मानसिक, मनोविकृती ह्या संज्ञा कालबाह्य आणि निरर्थक ठरत आहेत. वर्षानुवर्षे मनात घर करून राहिलेल्या मन-शरीर ह्या द्वैताची जागा येत्या काळात मानवी वर्तने हे एकक घेईल असे वाटू लागले आहे. मानवी वर्तनाच्या अभ्यासाकरिता हा बदल उपकारकच ठरणार आहे.
पुस्तकात लेखकद्वयाने जवळजवळ सर्वच मनोव्यापारांचा परामर्श घेतला आहे. त्यांच्या स्पष्टीकरणार्थ रोजच्या जीवनातील सर्वसामान्यांना परिचित असे मानवी व्यवहाराचे दाखले दिले आहेत. विज्ञानावरील पुस्तक असूनसुद्धा सुबोध भाषेच्या वापरामुळे वाचकांना ते किचकट वाटणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसते. एवढेच कशाला, गदिमा, बाकीबाब, एलकुंचवार आदि साहित्यिकांच्या लिखाणांतील उतारे देऊन त्यांनी दाखवून दिले आहे की आज मेंदुविज्ञानाला जे कळले त्याची चुणूक त्यांच्या साहित्यामध्ये होती. स्मरण हे मेंदूचे कार्य. अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे त्याचे व्यापक प्रकार. मेंदूतील हिप्पोकॅम्पस हा भाग त्याकरिता जबाबदार असल्याचे सप्रमाण दाखविले आहे. अल्पकालीन स्मृतीचे दीर्घकालीन स्मृतीत रूपांतर हिप्पोकॅम्पसमध्ये होत असल्याचे स्कॅनमध्ये पाहता येते. मानवाच्या आयुष्यात स्मृतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जन्मापासून मरेपर्यंतच्या सतत बदलणाऱ्या आयुष्यातील एकत्वाचा तो धागा होय. काही कारणाने स्मृती गेल्यास अल्झायमर डीमेंशिया ह्या रोगात घडते तशी व्यक्तीची ओळखच (identity) नष्ट होते.
व्यक्ती मनाने किती खंबीर आणि तिच्यावर झालेले सहनशीलतेचे संस्कार किती पक्के, ह्यावरून तिला होणाऱ्या शारीरिक वेदनांची तीव्रता ठरते, असा आपला समज असतो. तो बरोबर नसल्याचे मेंदुविज्ञानाने सिद्ध केले आहे. एक्सायटेटर्स (उत्तेजक) आणि इन्हिबिटर्स (निरोधक) अशी परस्परविरोधी कार्य करणारी केंद्रे/मार्ग मेंदूत असतात. शरीरात किंवा शरीराबाहेर वेदनाकारक असे काही घडते तेव्हा वरीलपैकी कोणत्या केंद्राचे/मार्गाचे प्राबल्य असेल त्यावरून वेदनेची तीव्रता ठरते. कार किंवा स्कूटरमधील ब्रेक आणि अॅक्सिलरेटर ह्यांच्याप्रमाणे मेंदूतील वरील दोन मार्गांचे कार्य परस्परविरोधात पण समन्वयाने चालू असते. आपण जिवंत, जागृत असल्याची आणि स्व-त्वाची मेंदूमधील जाणीव म्हणजे आपला कॉन्शसनेस. मेंदू हा त्याचा गाभारा किंवा चैतन्याचे केंद्र. त्याचे निर्धारण मेंदूतील पिरॅमिडल न्यूरॉन्स कडून होतं. ब्रेनस्टेम आणि लॅमस ह्या मेंदूच्या भागांतील जागृती करणारी, भानावर ठेवणारी पेशीमंडळे (arousal circuits) कॉन्शसमध्ये कार्यरत असल्याचे स्क्रीनवर आपल्याला दिसते. कॉन्शसनेस हा उत्तेजित झालेल्या पेशींच्या संख्येवर अवलंबून नसून, कोणते पेशीसमूह क्रियाशील झाले आहेत, ह्यांनी तो ठरतो. खरे पाहता, जाणिवेकरिता लागणारी केंद्रीय यंत्रणा कार्टेक्स आणि थेलॅमस भर पसरली असल्याचे दिसते. शरीराच्या इतर भागांतील पेशी आणि मेंदूतील पेशी ह्या त्याच मूलद्रव्यांनी बनल्या असतात. फरक असतो तो म्हणजे मेंदूतील पेशींच्या जुळण्या खास प्रकारच्या आणि अत्यंत गुंतागुंतीच्या असतात. उघड आहे की कॉन्शसनेस किंवा जाणीव हे मनुष्यजीवनाचे आता गूढ राहिले नसून त्याच्याशी संबंधित मेंदूमधील जबाबदार घटक मेंदुविज्ञानाने स्पष्ट केले आहेत. मेंदुपेशींची अतिशय क्लिष्ट रचना, बरोबरच घडणाऱ्या अंतर्बाह्य घटना ह्यामुळे जाणिवेचा अविरत चालणारा प्रवाह कधीकधी खंडित होण्याची किंवा त्यात त्रुटी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यांत वर्तनातील विकृतींची कारणे सापडतात. जाणिवेबाबत एक मजेशीर गोष्ट म्हणजे आपले शरीर आपले स्वतःचे आहे ह्या अस्तित्वाकरिता महत्त्वपूर्ण असलेल्या संवेदनेची जाणीव नसते. त्याला प्रोप्रायोसेप्शन किंवा निजदेहभान म्हणतात. त्याच्याद्वारे आपण आपल्या शरीराकडे पाहू शकतो.
एक चकित करणारे सत्य मेंदूवरील संशोधनाने पुढे आणले आहे. जाणीवपूर्वक निर्णय आणि त्याला अनुसरून घडणाऱ्या कृतीपूर्वी ७ ते १० सेकंद आधीच तो निर्णय नेणिवेच्या पातळीवर झालेला असतो. हे काहीसे विपरीत वाटते ना? परंतु फंक्शनल एम.आर.आय. ह्या अत्याधुनिक तंत्राने त्याची पुष्टी केल्याने सर्वसाधारण समज मोडीत निघाला आहे. निर्णयप्रक्रियेदरम्यान मेंदूमध्ये होणारी उलाढाल चक्क स्क्रीनवर दिसते. त्याला रेडिनेस पोटेंशियल म्हणतात. गंमत ही की निर्णय झाल्याचेच तेवढे दिसत नाही तर कोणता निर्णय झाला हेदेखील पोटेंशियलचे गाढे अभ्यासक ७०% अचूकपणे सांगू शकतात. अशीच एक मजेशीर बाब लक्षात आली ती माणसाच्या फ्री विल , ईहा किंवा मुक्त इच्छेच्या संबंधात. एखादी गोष्ट करण्याची मुक्त इच्छा जाणिवेमध्ये नसली तरी ती गोष्ट करायची नाही हे नेणिवेच्या प्रॉम्प्टिंगमुळे घडते. ह्याचा अर्थ कृती करण्याचा मनात सुरू असलेला विचार ती घडण्यापूर्वी नेणिवेकडून थोपवला जाऊ शकतो. आहे की नाही मज्जा ? नेणिवेत घडते ते व्यक्ती मान्य करीत नसली तरी स्कॅनमध्ये मात्र विशिष्ट जागा उजळल्याचे दिसते. जाणिवेत अॅमिग्डला चा वरचा भाग उजळतो तर नेणिवेचे प्रतिसाद त्याच्या खालच्या भागात उमटतात. सामान्याला कुतूहल वाटावे असे, आणि वैद्यकीय शाखेला पुरते न उमगलेले कोडे म्हणजे फॅन्टम लिंब किंवा आभासी अंग. हात वा पाय धडावेगळा केला असेल किंवा झाला असेल तरी व्यक्तीचे मन ते सत्य स्वीकारायला तयार नसते. अवयव त्यांच्या त्यांच्या जागीच आहेत असे वाटत राहते. भास म्हणावा तर त्यापासून खऱ्याखुऱ्या संवेदना जाणवतात. फार पूर्वी आत्म्यामुळे, आणि नंतरच्या काळात स्वेच्छा-चिंतनामुळे (ळीहर्षीश्र हळपज्ञळपस) ते घडते असे मानत. पेनफील्डने मेंदूच्या विविध भागांचे नकाशे तयार करून वरील कोडे सोडविण्यास मदत केली. मानसिक समजल्या जाणाऱ्या क्रिया मेंदूतील पेशीरचना आणि त्यातील बदलांशी निगडित असल्याचे मेंदुतज्ज्ञांनी सप्रमाण दाखवून दिले. मेंदू स्थितिशील (शीरींळल) नसून गतिशील (वूपराळल) असल्याचे मेंदूवरील संशोधनामुळे प्रस्थापित झाले आहे. मेंदू हा कायम शिकत असतो. हरेक अनुभवागणिक त्याच्यामधील पेशींच्या नव्या जुळण्या होत असतात. त्या जुळण्यांमध्ये आपसात साहचर्य (सीलळरींळेप) निर्माण करण्याची मेंदूची क्षमता विलक्षणच आहे. मेंदूमध्ये एकदा उद्दीपित झालेल्या पेशी परस्परांशी कायमच्या जोडल्या जातात. शरीराच्या निरनिराळ्या भागांकडून आलेली माहिती, तसेच मेंदूने त्यांना क्रियेकरिता दिलेल्या आज्ञांची माहिती, ह्यांचा उपयोग करून मेंदू एकसंध आणि एकजीव अशी संपूर्ण शरीराची प्रतिमा, नकाशा तयार करतो. ते काम मेंदूच्या परायटल लोबमध्ये होते आणि तिथेच त्याचे जतनही केले जाते.
आभासी अंगासंदर्भात मेंदूच्या संशोधनांत बऱ्याच गमतीदार गोष्टी पुढे आल्या. शरीरापासून विलग झालेला त्याचा खराखुरा भाग तर सोडाच, पण शरीराशी संलग्न असलेल्या टेबल, खुर्ची ह्यासारख्या निर्जीव वस्तूंकडूनही संवेदना येत आहेत असे भास निर्माण करता येतात. एकप्रकारे ही मेंदूची फसगतच झाली ना? आऊट ऑफ बॉडी एक्स्पीरिअन्स असे त्याला नाव देण्यात आले. पॅरासायकॉलॉजीमध्ये उल्लेखिलेले अतींद्रिय संवेदन (पीर-शपी शशिीळशपलश) हाही मेंदूच्या फसवणुकीचाच प्रकार असल्याचे मेंदुतज्ज्ञांना वाटायला लागले आहे. भारतीय वंशाचे मेंदुसंशोधनातील अग्रणी डॉ. रामचंद्रन ह्यांना दिसले की आभासी अंगालाही पक्षाघात (झरीरश्रीळी) होऊ शकतो. हात कल्पनेतला, पक्षाघातही काल्पनिक, परंतु त्याला होणाऱ्या दुःखवेदना मात्र खऱ्याखुया. घटना अचंबित करणारी. अशा वेदनांपासून पेशंटला मुक्ती देता येईल का? विचार करता करता डॉक्टरांना एक अचाट कल्पना सुचली आणि त्यांनी लगेच ती अमलात आणली. आणि काय आश्चर्य! पेशंटला वेदना खूप कमी झाल्याचे जाणवले. उपचारपद्धतीला त्यांनी मिरर थेरपी नाव दिले. खराखुरा हात टेबलावर उभ्या आरशासमोर एका बाजूला ठेवायला सांगायचे. आरशात दिसणाऱ्या त्याच्या प्रतिबिंबावर पेशंट लक्ष केंद्रित करतो आणि तो जणू आभासी हात आहे अशी कल्पना पेशंट करतो, आभासी हाताला होणाऱ्या वेदनांचा उगम मेंदूत असतो. तो हात प्रत्यक्षात नसला तरी तो होता तेव्हाची प्रतिमा मेंदूच्या ठराविक भागात तयार झालेली असते. म्हणजे मेंदूच्या लेखी हात असतोच. पण त्या भागातून संदेश येणे बंद झाले असते. खऱ्याखुऱ्या हाताच्या हालचालींच्या आरशातील प्रतिबिंबाद्वारे मेंदूला फीड बॅक दिला जातो. त्याने मेंदूची संभ्रमावस्था दूर होऊन आभासी अंगाच्या वेदना नाहीशा होतील. मेंदूच्या ह्या किमयांनी आपण आश्चर्यचकित होतो आणि मेंदुविज्ञानाने आपल्याला कुठल्या कुठे पोहचवले आहे ह्याचा अचंबा वाटतो. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ह्याची जाणीव शास्त्रज्ञांना आहे. क्षितिजाला हात लावता येत नाही. तिथे पोहोचलो न पोहोचलो असे वाटते, तोच नवीन प्रदेश आणि नवे क्षितिज समोर येते. क्षितिज गाठायची धडपड मात्र अविरत चालू राहते. तेच विज्ञानप्रसाराचे गम्य.
मानवी भावनाविष्कारात मेंदूच्या सहभागाविषयी प्रयोग झाले आहेत, विशेषेकरून भीती आणि चिंता ह्यावर. विनाकारण चिंतेच्या अनुभवांत अॅमिग्डलाचा विशिष्ट भाग उजळल्याचे दिसले. चिंताविषयाला टाळण्याऐवजी त्याला सामोरे जाऊन अनाठायी चिंतेवर ताबा मिळवता येतो असेही लक्षात आले. जीवाला होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून भीती माणसाला वाचवते. तिला सहायव्हल मूल्य आहे. लिंबिक सिस्टीम चा भाग असलेल्या अॅमिग्डला चे विद्युत-उद्दीपन करून भीतीची भावना निर्माण करता येते. भावनाभरांत मनात येणारे विचार बोलून दाखविण्याकरिता तोंडाच्या स्नायूंना मेंदूच्या आदेशांची गरज असते. तसेच, लिहिण्याकरिता हाताला, लिहिलेले वाचून त्याचा अर्थ लावण्याकरिता मेंदूतील वाचेची उपकेंद्रे क्रियाशील होतात. मानसशास्त्रकरिता मेंदुविज्ञान अनेकप्रकारे उपकारक ठरले आहे. सिगमण्ड फ्राईडच्या मनोविश्लेषण पद्धतीने मानसशास्त्राला नवी दिशा दिली. व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि त्यामधील त्रुटींमुळे उद्भवणाऱ्या मनोविकृती फ्राईडने विशद केल्या. त्या संदर्भात त्याने सेक्स, लिबिडो, इड, इगो, सुपरइगो, इडीपस आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स, फिक्सेशन वगैरे संकल्पना मांडल्या. तार्किक युक्तिवादांनी त्या संकल्पनांचा प्रतिवाद करणे टीकाकारांना जमले नाही. फ्राईडची अडचण अशी की आपल्या संकल्पना वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारे तो पटवू शकत नव्हता. तरीही त्याचा विश्वास होता की एक ना एक दिवस त्याच्या संकल्पनांना पुरावा मिळेलच. आणि खरोखरीच आज मेंदुविज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीत फ्राईडच्या बऱ्याच संकल्पनांना पुष्टी मिळत आहे. तद्वतच ट्रान्झंक्शनल अॅनलिसिस ह्या एरिक बर्नच्या प्रचलित मानसोपचार पद्धतीचा उगम मेंदुसंशोधनात सापडतो. पेनफील्ड ह्या संशोधकाने प्रतिपादन केले की अगदी जन्मापासून व्यक्तीला आलेल्या प्रत्येक अनुभवाचे तिच्या मेंदूत रेकॉर्डिंग होत असते, टेपरेकॉर्डरप्रमाणे. त्यातूनच तिच्या जगाविषयीच्या संकल्पना आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचे घटक तयार होत असतात. प्रत्येक व्यक्तिमध्ये दडलेले पालक (झ), प्रौढ (अ) आणि बालक (उ) हे ते तीन घटक होत. त्यांच्यात सतत होणाऱ्या आदानप्रदानातून (गरपीरलींळेप) व्यक्तीच्या सामान्य वा विकृत वर्तनाची निर्मिती होते.
निवडक मनोव्यापारांतील मेंदूचा कार्यभाग लेखकांनी वरीलप्रमाणे चर्चिला. त्याशिवाय, बऱ्याच छोट्यामोठ्या मानसिक घटकांची स्पष्टीकरणेही पुस्तकात दिली आहेत. उदाहरणार्थ, स्व-मग्नता (रीींळी) ही बऱ्याच लहान शाळकरी मुलांमध्ये आजकाल दिसणारी आणि पालकांच्या चिंतेचा विषय बनलेली वर्तनविकृती. मेंदूतील मिरर न्यूरॉन्स त्याकरता जबाबदार असल्याचे तज्ज्ञांना आढळले. मिरर न्यूरॉन्सच्या कमतरतेमुळे किंवा ते क्षीण झाल्याने स्व-मग्नता ही व्याधी होते. त्यावरील उपाय शोधण्यास वरील ज्ञानाचा उपयोग नक्कीच होईल.
पक्षाघात ह्या जीवनावर दूरगामी परिणाम करणाऱ्या व्याधीबरोबर कधीकधी भ्रमिष्टपणा आढळतो. लुळा पडलेला हात दुसऱ्याच कुणाचा तरी आहे किंवा तो दुसरी कुणीतरी व्यक्ती आहे असे पेशंटला वाटण्याने त्याच्या मेंदूचा पुरता गोंधळ उडतो. त्याला कळत नाही की प्रत्यक्षाचा आणि वाटण्याचा मेळ कसा घालायचा. मेंदूला तर गोंधळ नको असतो. त्याला हवी तार्किक सुसंगती व सुसूत्रता. व्यक्तीला होत असणारे भ्रम हे तिच्या मेंदूने स्वतःचा गोंधळ दूर करायला आणि सुसंगती आणण्यास्तव, स्वतःच गरजेपोटी तयार केलेली रूपके असतात. सामान्य माणसालाही जेव्हा एकाच विषयाबद्दल मेळ न जमणारी विसंगत माहिती मिळते आणि आता कसे करावे हे त्याला सुचत नाही, तेव्हा तो अस्वस्थ होतो. ह्या स्थितीला बोधात्मक विसंगती (cognitive dissonance) म्हणतात. काहीही करू तो गोंधळ, ती अस्वस्थता दूर करण्यास तो प्रेरित होतो. वर उल्लेखिलेला मेंदूचा गोंधळ ह्या बोधात्मक विसंगतीसारखा होय.
मेंदूमध्ये तर्कबुद्धी (reason) आणि भावना (emotion) ह्यांच्यात कायम रस्सीखेच चालते. व्यक्तीच्या विशिष्ट कृतीचे निर्धारण तर्क-भावना ह्यांच्या सापेक्ष प्राबल्याने होते. प्लेटो हे दोन हजार वर्षांपूर्वीच सांगून गेला. पण त्याचा ठोस वस्तुनिष्ठ पुरावा त्याकाळी त्याला सादर करता आला नाही. परंतु आज मेंदुविज्ञानाने प्लेटोचे मत खरे ठरवले आहे. तर्कबुद्धी काहीशी कोरडी, रूक्ष; तर भावनांना ओलावा असतो. तारतम्याने निर्णय घेण्याकरिता दोघांचीही गरज असते. दोघांमधील संतुलनानेच योग्य निर्णयाची शक्यता वाढते. आर्थिक व्यवहारांत काही लोक भावनेच्या आहारी जाऊन आणि अल्पकालीन लाभाला महत्त्व देऊन निर्णय घेतात. बरेचदा तोंडघशी पडतात. ह्याउलट, काही लोक तर्कबुद्धीचा वापर करून थंड डोक्याने दीर्घकालीन लाभ समोर ठेवून निर्णय घेतात. दोन प्रकारच्या निर्णयप्रक्रियेत मेंदूचे दोन भिन्न भाग उत्तेजित होत असल्याचे स्कॅनमध्ये दिसते. तद्वतच, आक्रमकता आणि समजूतदारपणा ह्या परस्परविरोधी पण जगण्याकरिता आवश्यक अशा वृत्ती. त्यांची मेंदूमधली स्वतंत्र केंद्रे संशोधकांना सापडली आहेत. ज्या केंद्राचे प्राबल्य, त्यानुसार वर्तन घडून येते.
उत्क्रांतीच्या इतिहासांत मेंदूच्या स्वयंचलित प्रक्रिया सुरुवातीपासून होत्या. नियंत्रित प्रक्रियांची यंत्रणा नंतर विकसित झाली. विशिष्ट वेळचे मनुष्यवर्तन, हा त्या दोहोंचा संयुक्त परिपाक असतो. आवश्यक त्या प्रक्रिया, रसायने, पेशींच्या जुळण्या आणि त्यांच्यातील दळणवळण मेंदूत उपलब्ध असतात. प्री-फ्राँटल कॉर्टेक्स आणि अॅमिग्डला ह्यांच्या पेशी-पेशींमध्ये संदेशवहन कशाप्रकारे चालते ह्याचेही ज्ञान मेंदूतज्ज्ञांना झाले आहे. प्री-फ्राँटल कॉर्टेक्समधील पेशी व्हालीबॉलप्रमाणे एकीकडून दुसरीकडे आणि परत दुसरीकडून पहिलीकडे असा संवाद साधतात. लिंबिक सिस्टिममधली पेशी मात्र रीले रेसप्रमाणे एक दुसऱ्याशी, दुसरा तिसयाशी, तिसरा चौथ्याशी अशाप्रकारे संदेश-वहन करीत असतात.
पुस्तकात आणखीही काही बाबींचा समावेश आहे. जसे, आनंदानुभवात हिप्पोकॅम्पस्चा कार्यभाग, उत्स्फूर्त विरुद्ध कृत्रिम हसूमध्ये मेंदुनियंत्रित भिन्न स्नायूसमूहांचा कार्यभाग जाणिवेचे विवेकी आणि संपादित तर नेणिवेचे प्रतिक्षिप्त आणि अंगभूत स्वरूप, इतरांच्या देहबोलींचे आकलन होण्यात तसेच लढा वा पळा (fight or flight) च्या निर्णयांत अॅमिग्डलाची भूमिका, सह अनुभूतीला कारणीभूत पेशी, पूर्वी ऐकलेल्या सुरांची टेंपोरल लोब मध्ये नोंदणी आणि जतन, रसायनात बदल करून माणसा-माणसांमधील वर्तन सुधारण्याची, इतरांचे वागणे समजून घेऊन अधिक सहिष्णु बनवण्याची शक्यता, मेंदूतील केंद्रांचे परस्परविरोधी तरीही समन्वयाने चालणारे कार्य, अॅमिग्डलातील रेकॉर्डिंग धूसर आणि ओबडधोबड तर व्हिजुअल कॉर्टेक्स मधले सुस्पष्ट, धनात्मक व ऋणात्मक शक्ती एकाच वेळी कार्यरत असल्याने कुठलेही वर्तन परिपूर्ण, निर्दोष, परफेक्ट नसणे, अशा कितीतरी मेंदूच्या संशोधनातून पुढे आलेल्या गोष्टी लेखकांनी वाचकांपुढे प्रस्तुत केल्या आहेत. लेखकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. माहितीचे संकलन करण्यात त्यांनी घेतलेल्या परिश्रमांना दाद द्यायलाच हवी.
पुस्तक वैज्ञानिक माहितीने ओतप्रोत भरले असले तरी ते कुठे कुठे गोंधळात टाकणारे आणि अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे हे नमूद करायला हवे. संक्षेपाने का होईना, त्यांचा उल्लेख करणे मला आवश्यक वाटते.
मुखपृष्ठ – मेंदूत बसलेला माणूस – बरेच काही सांगून जाते. माणूस मोठा की त्याचा मेंदू मोठा असा प्रश्न पडतो? मेंदूला केंद्र मानून बऱ्याच दृश्य आणि अदृश्य वर्तनाची भरपूर चर्चा पानापानांतून वाचायला मिळते. मेंदूचे सार्वभौमत्व सिद्ध करण्याचाच तो प्रयत्न म्हणा ना. पण हे जरा जास्तच वाटते. मेंदूला कॉम्प्यूटरची उपमा दिली जाते. ही परिस्थिती कधी कधी माणसाला संभ्रमात टाकते. कॉम्प्यूटर मानवाची जागा तर घेणार नाही ना, ह्याची त्याला चिंता वाटते. एका मानसशास्त्रज्ञाने विधान केले की “एकविसाव्या शतकातील सर्वांत मोठी चिंता ‘आता तर संगणक माणसासारखा विचार करू लागलाय’ ही नसून ‘माणूस विचार करणे थांबवेल की काय’ ही खरी चिंता आहे.”
अत्याधुनिक तंत्रांच्या मदतीने आजवर अनाकलनीय वाटणाऱ्या बऱ्याच मनोव्यापारांची स्पष्टीकरणे मिळाली हे मान्य. परंतु मानवी वर्तन इतके बहुरंगी, बहुढंगी आणि गुंतागुतीचे असते की त्याचे सुलभीकरण खरेच शक्य आहे काय ? वर्तनाच्या उत्तरदायित्वाचाच प्रश्न घ्या ना. मेंदूतील विद्युत् आणि रासायनिक बदलांमुळे गुन्हा करण्यास व्यक्ती बाध्य होत असेल, तर गुन्हेगारी वर्तनाकरिता तिला जबाबदार का समजायचे ? मेंदूतील विकृतीच्या उपचाराकरिता तिला तुरुंगात न डांबता हॉस्पिटलमध्ये भरती करायला हवे. आजार खाण्यापिण्यातील अतिरेकामुळे, व्यसनांमुळे, व्यायामाच्या अभावामुळे आणि जीवनशैलीतील अशाच उणिवांमुळे होत असतील, तर आजाराकरिता त्या व्यक्तीलाच दोषी मानून हॉस्पिटलऐवजी तुरुंगात तिची रवानगी करायला हवी, कारण वरील गोष्टी ती नियंत्रित करू शकत होती. लेखकांचे या अर्थाचे युक्तिवाद मान्य करून ते अमलात आणायचे म्हटले, तर ते पाऊल समाजाची घडी विस्कळीत करणारे, अस्थिरता निर्माण करणारे ठरेल. दोन पर्यायांमध्ये निवड करण्याची मुक्त इच्छा माणसात आहे की नाही? की अराजकाचाच पर्याय निवडणे त्याला भाग आहे.
सबकुछ मेंदूच्या संदर्भात एक विनोदी किस्सा सांगावासा वाटतो. विमान खूप उंचीवर उडत होते. विमानात पायलट कॉकपिटमध्ये आणि एकच प्रवासी नवयौवना असे दोघेच. पायलटची मती फिरली. विमान स्वयंचलित ठेवून तो बाहेर आला आणि तरुणीजवळ लैंगिक चाळे करायला लागला. ती किंचाळून विरोध करायला लागली. पायलट तिला म्हणाला की एवढ्या उंचीवर तुझी आरडाओरड ऐकून मदतीला धावून यायला विमानात कुणीच नाही. “मी केवळ माझी सदसद्विवेकबुद्धी (conscience) क्लिअर करीत होते” हे तिचे मार्मिक उत्तर. ती पायलटच्या वागण्याने दुःखी आणि भयग्रस्त झाली होती का? तिचा विरोध लटका होता की मनापासून ? पायलटच्या वागण्याने ती आतून सुखावत तर नव्हती? की बलात्कार अटळ असेल तर सहकार्य करून त्याची मजा लुटण्याचा पर्याय शहाणपणाचा ही तिची धारणा होती. मेंदूतील उलाढालींच्या मदतीने तिच्या वर्तनाचे स्पष्टीकरण देता येईल काय ? उत्तर वाटते तितके सोपे नाही असे माझे प्रामाणिक मत.
शरीर-मन द्वैताला आह्वान देऊन मना ची सुट्टी करायला निघालेले लेखकद्वय. पुस्तकभर मन, मानसिक विकृती, मानसिक कारणे, मनोव्यापार ह्या शब्दांचा मनसोक्त वापर करतात. मला त्यात अंतर्गत विरोधाभास जाणवतो. मेंदूवरील संशोधनामुळे लोकांना, इतरांना समजून घेणे, त्यांच्याशी संबंध सुधारणे आणि सहिष्णुता वाढून त्यांच्याशी जुळवून घेणे सोपे जाईल असा दावा त्यांनी केला आहे. त्याकरिता, मेंदुसंशोधनाची फलिते सर्वसामान्यांच्या मनांत पोहोचून त्यांना पचायला तर हवीत ना? ते घडून यायला, विशेषतः भारतीय जनमानसाची अवस्था पाहता, बराच अवधी लागेल.
वर उत्पन्न केलेल्या शंका आणि समस्यांमुळे पुस्तकाचे मूल्य कमी होत नाही. तूर्तास, एवढेच म्हणावेसे वाटते की पुस्तकातील माहिती जनतेच्या गळी उतरेपर्यंत बराच काळ जावा लागणार आहे. संशोधकांनी नाउमेद न होता मेंदूवरील संशोधन ह्यापुढेही जारी ठेवावे. काहीही असले तरी जोशी-जावडेकर ह्यांच्या मेंदूतला माणूस ह्या पुस्तकाने मराठीमध्ये फारच कमी लिहिल्या जाणाऱ्या विज्ञान-साहित्यात मोलाची भर घातली आहे. ह्याबद्दल दुमत असू नये. मनोदय, २२-सी, हिंदुस्थान कॉलनी, अमरावती रोड, नागपूर ४४००३३.