शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीचे प्रश्न हे शब्दप्रयोग भेटले रे भेटले, की तपशिलांचा भडिमार व्हायला लागतो. शेतांचे इकॉनॉमिक आकार. सघन शेती. सिंचन आणि त्याचा अभाव. अतिसिंचन. माती अडवा-पाणी जिरवा. सेंद्रिय खते विरुद्ध रासायनिक खते. देशी वाणे-बियाणे. बीटी व तत्सम जीनपरिवर्तित वाणे-बियाणे. कीटकनाशके व त्यांचा अतिवापर. मित्रकिडी व मित्रपिके. सहकारी चळवळ. दलालांच्या चळती. सार्वजनिक वितरण. शेतमालाचे भाव आणि त्यातला शेतकऱ्यांचा वाटा. अनुदाने. अमेरिकन व युरोपीय अनुदाने. भारतीय शहरी प्रजेला मिळणारी अघोषित अनुदाने. अनुदान म्हणजे पांगुळगाडा. अनुदान म्हणजे बुडत्याला हात. दहा गुंठे. अडीच एकर. वनशेती. प्रत्येक बाबीवर टोकाची मते. दोषारोप. कृषिमंत्री आणि आयपीएल. आणि मग शेतकऱ्यांची मानसिकता विरुद्ध शहरी मध्यमवर्गाची असंवेदनशीलता. कोणीही शेतकरी नसणारा गोंधळून जावा अशा उच्चरवाने, असांसदीय भाषेत झडणारे वाद. यावर इलाज काय ? एक मार्ग सुचवून पाहतो. शेती करण्यातून शेतकऱ्याला काय हवे असते? शेती न करणाऱ्याला काय हवे असते? दोघांनाही मुळात काही समान परिणाम साधून हवे असतात. स्वच्छ, चांगल्या चवीचे, गरजेपुरते अन्न; आणि सोबत स्वच्छ, चांगल्या दर्जाचे , गरजेपुरते तंतू, कापड विणायला आवश्यक असे. हे शेती, जिच्यात पशुपालनही आले, तिच्याकडून सर्वांनाच हवे असते. शेतकऱ्याला यापलिकडेही एक गोष्ट घडून हवी असते. त्याला शेतीतून न मिळणाऱ्या ऐहिक बाबी वस्तू, सेवा, वगैरे विकत घेता येण्याइतके वरकड उत्पन्न हवे असते. स्वतःची, स्वतःच्या कुटुंबीयांची शेतमालाची गरज भागवून जो शेतमाल उरेल, तो विकून ह्या वस्तू, सेवा, वगैरे घेता आल्या पाहिजेत, अशी त्याची इच्छा असते. शेती न करणाऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांमधून स्वतःच्या, स्वतःच्या कुटुंबीयांच्या सर्व गरजा भागून हव्या असतात. यात शेतमालही आला, बिगर शेती उत्पादनेही आली. शेतकरी आणि शेती न करणारे या दोघांनाही आपल्या गरजा पूर्ण होत राहतील याची खात्री हवी असते. गरजपूर्तीची शाश्वत व्यवस्था दोघांनाही हवी असते. आणि दोन्ही प्रकारच्या माणसांना आपण एकूण समाजाला उपयुक्त असे काम करतो, याची इतरांनी दखल घेऊन हवी असते. थोडक्यात म्हणजे आपापला स्वाभिमान, आत्मसन्मान टिकून राहण्याला आधार हवा असतो.
मला वरील सर्व मुद्दे निर्विवाद वाटतात. कोणाला तसे वाटत नसल्यास त्या न वाटण्याची साधार मांडणी प्रकाशित करायला आसु तयार, नव्हे, तत्पर राहील. सध्याच्या भारतीय परिस्थितीत शेतकऱ्यांपैकी काही एकदोन पिढ्यांपूर्वीपर्यंत आदिम अन्नसंकलक होते. काही भरपूर ऊर्जा व रसायने वापरणाऱ्या सघन शेतीत आहेत. बहुतेक सारे जेमतेम निविष्टा (ळी ) उभारू शकणाऱ्या कोरडवाह शेतीत आहेत. शेती न करणायांपैकी एक भाग अतिश्रीमंत, प्रामुख्याने निर्यातीशी संबंधित सेवाक्षेत्रात आहे. एक भाग थेटपणे किंवा अप्रत्यक्षपणे शासकीय सेवेत आहे. आणखी एक भाग संघटित औद्योगिक क्षेत्रांत आहे. संख्येने सर्वांत मोठा भाग मात्र आधीच्या तीन वर्गांच्या सेवेत आणि असंघटित औद्योगिक क्षेत्रांत आहे. हा वर्ग एखाद्या पिढीआधी शेती-पशुपालनात होता, आणि शेतीतील समस्यांमुळे त्या उपजीविकेच्या पद्धतीबाहेर लोटला गेलेला आहे. या सर्व वर्गांच्या उपजीविका चालवण्याच्या पद्धतींमध्ये, कौशल्यांमध्ये, एकूण उत्पन्नात वाटा मागण्याच्या क्षमतांमध्ये अर्थातच मोठाले फरक आहेत. जर हे एकूण उत्पन्नात वाटा मागणे अनिर्बंध ठेवले, तर काय होईल? जेम्स् मिल् आपल्या राज्यशासनाबद्दल (जपॉशीपाशपीं) या प्रबंधात लिहितो —
“माणसांचा आपल्या आकांक्षापूर्तीसाठी दुसऱ्याचे हिरावून घेण्याकडे कल असतो. यामुळे काही थोडे लोक व त्यांचे प्रतिनिधी वगळता सर्वांची लूट अपरिहार्य क्रमाने होते. ज्यांचे हिरावून घेतले जाते त्यांना जेमतेम जगणे शक्य होईल अशा स्थितीत लोटले जाते. येवढेच नव्हे, तर क्रौर्याने त्यांना तीव्रतम भीती दाखवली जाते.”
आता भारतीय परिस्थितीतले जे वर्ग, उपवर्ग आपण पाहिले, त्यांच्यापैकी कोणाला थोडे लोक व त्यांचे प्रतिनिधी यांत धरायचे, कोणाला ज्यांचे हिरावून घेतले जाते त्यांत मोजायचे, यावर मतभेद आणि वाद आहेत. संख्येने मोठ्या, इतिहासाने क्लिष्ट बनवलेल्या समाजांत तसे वादविवाद असणारच. पण असे वादविवाद ओलांडून भीतिदायक क्रौर्यावर अंकुश ठेवायला, दुसऱ्याचे हिरावून घेणे नियंत्रित करायला एक संस्था माणसांनी पूर्वीच घडवली आहे. जेम्स मिल् सांगतो —
“हा माणसांच्या स्वभावातला गुण [ किंवा अवगुण. मिल् तत्त्व म्हणतो, principle, जो शब्द इथे चपखल वाटत नाही. – सं.] हा राज्यशासनाचा पाय आहे.” म्हणजे मिल्च्या मते हिरावणे – नागवले जाणे यांना मदित ठेवणे, हे राज्यसंस्थेचे मूळ कर्तव्य आहे. ही उघड वाटणारी, सर्वथा बाळबोध मांडणी आहे. अधूनमधून अशा बालबुद्धीलाही समजतील अशा भोज्ज्यांना हात लावणे मला उपयुक्त वाटते. तसे करण्यातून मला प्रश्न व उत्तरे यांच्यात अग्रक्रम ठरवायला मदत होते.
भीती आणि हिंसा
आज भारतातली राज्यसंस्था हिरावणे-नागवले जाणे हा प्रकार फारशा सक्षमपणे हाताळताना दिसत नाही. हो, विषमतेच्या काही कसोट्यांवर भारतापेक्षा चीनमध्ये जास्त विषमता आहे, याची आकडेवारी दिली जाते. पण भोज्जा सांगतो, की इतर समाजांकडे जास्त पाहण्यापेक्षा स्वतःच्या समाजाची स्थिती पाहणेच शहाणपणाचे आहे!
आज (मध्य जुलै २०१०) महाराष्ट्रभर पाऊस चांगला झाला आहे. हा चांगुलपणा शेवटपर्यंत टिकेल, असे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत. प्रसारमाध्यमे पुरांच्या बातम्या देत आहेत, आणि शेतीबाबतच्या इतर प्रश्नांचे अस्तित्व विसरले आहेत. जर काही शेतीप्रश्नांची चर्चा झालीच, तर “काय नं! चांगला पाऊस होऊनही भाज्या महागच आणि यांची रडगाणी काही संपत नाहीत!” अशा प्रतिक्रियेने ती चर्चा हद्दपार केली जात आहे. फळे, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ (मॅगी-कोला), हॉटेलांमधले पदार्थ, हेही महागात आहेत. पण आज चर्चा भाज्यांची आहे. पावसाळा संपताना ती धान्यावर येईल. पित्झा-बर्गर-कोलावर ती कधीच येणार नाही. पेट्रोल-डीझेल भाववाढही अन्न महागेल म्हणून हानिकारक मानली जाते. पेट्रोल हे प्रामुख्याने माणसे वाहणारे इंधन आहे, केवळ मध्यमवर्ग व उच्चवर्गाचे, हे विसरले जाते. प्रसारमाध्यमांची गिहाईके स्वतःला नेहेमीच मध्यमवर्गी मानतात. हा मध्य कितीतरी जास्त प्रमाणात वर सरकलेला आहे, याकडे दुर्लक्ष होते. तेही बरेच म्हणा, वर चढताना खाली पाहायचे नसते!
स्वस्त अन्न शेतकऱ्यांना दरिद्री करेल व त्याच स्थितीत ठेवेल, हे उघड आहे. शेतमाल योजनापूर्वक स्वस्तच ठेवला जात आहे, आणि हे स्वातंत्र्यापासून अखंड चालत आले आहे, हे शेतकरी संघटने चे म्हणणे आहेच.
नक्षलवादी चळवळी प्रामुख्याने भात पिकवणाऱ्या, म्हणजे श्रमांच्या तुलनेत कमी उत्पन्न देणाऱ्या क्षेत्रांत रुजतात आणि फोफावतात. त्या खनिज-सधन क्षेत्रांत सहज उपजतात व टिकून राहतात. खनिजांची गरज उद्योगांना असते. शेतीला मात्र नगण्य.
वेगवेगळ्या प्रस्थापितविरोधी चळवळी एकमेकांना साथ देतात. त्यांच्या विचारप्रणाली वेगवेगळ्या असल्याने यात बाधा येत नाही. नेपाळी माओवादी कम्युनिस्ट, भारतीय नक्षलवादी, वीरप्पन चंदनचोर, तामिळी वाघ, साऱ्यांची एकमेकांना मदत असते, हे इंटरपोल पर्यंत सारे कबूल करतात.
हिंसेचे वावडे नसलेल्या चळवळींना संपूर्ण जनाधार कधीच नसतो. काही माणसे प्रस्थापित व्यवस्थेच्या पक्षाची असतातच. जर अशा माणसांचे प्रमाण दखल घेण्याइतके जास्त असेल, तर त्या चळवळी स्वतःच्याच सदस्यांवर उलटल्यासारख्या दिसतात. उदाहरणार्थ, गडचिरोली जिल्ह्यातले लोक पोलिसांकडूनही झोडपले जातात आणि नक्षलवाद्यांकडूनही. पण जनाधाराची काहीतरी किमान व्याप्ती असल्याशिवाय हिंसक चळवळी टिकत नाहीत. तशा चळवळींचे हेतू बहुतांश लोकांना मान्य नसतात, बंदुकींच्या जोरावर लादलेले असतात, अशा भ्रमांत कोणी राहू नये. त्या चळवळींना जनाधार असतोच. राज्यसंस्थेचे अपयशच हिंसक चळवळींना तगू देते, आणि हे अपयश पोलिसांचे, निमलष्करी दलांचे किंवा सैन्याचे नसते. ते केवळ गृहखात्याचेही नसते. एकूण शासकीय धोरणांत कोणीतरी नाडले जाते आहे, नागवले जाते आहे, मिल्च्या तीव्रतम भीती चा अनुभव घेते आहे, असेच सूचन टिकाऊ हिंसक चळवळी करत असतात. अशीच भीती शेती वगळताच्या क्षेत्रांतही असते. महानगरांच्या रामरगाड्यात सांदीकोपरे व्यापत उपजीविका चालवत असलेलेही नागवले जात असतात. तेही भीतीने ग्रस्त असतात. पण त्यांनी माघार घेण्याचे दोर कापलेले असतात. मुले तरी शिकून नागवणाऱ्या वर्गात जातील, या आशेने शहरी नागवलेले जगत असतात. त्यांना शहरी-औद्योगिक जीवनपद्धती माहीत असते. शेतकऱ्यांची भीती जास्त असते, कारण जर तिच्यापासून सुटका हवी असेल, तर त्यांना ओळखीची, पिढ्यानपिढ्यांची जगायची पद्धत सोडून नव्याच पद्धती शिकाव्या लागणार असतात. ओळखीचा राक्षस अनोळखी देवदूतापेक्षा बरा, स्वधर्मे निधनं श्रेयः वगैरे सूत्रे जपत ते जगत असतात. भारताचे कृषिमंत्री जेव्हा शेतीपासून दूर जायचा सल्ला देतात, एकविसाव्या शतकाचे पाईक जेव्हा लहान शेते एकत्र करून मोठी शेते घडवण्याचे सांगतात, तेव्हा ते सगळे जण ह्या भीतीला फुकणीने फुलवत असतात. पर्याय म्हणून शेतीच फक्त जाणणाऱ्याचे नेमके काय करावे, या प्रश्नाचे उत्तर ते देत नाहीत. कारण त्यांच्यापाशी उत्तरे नसतात! शहरांमध्ये बरी नोकरी मिळवायला, टिकवायला लागणारी कौशल्ये शिकवणाऱ्या संस्था नाहीत. अॅनिमेशन , फॅशन डिझायनिंग, एअर-होस्टेस/पर्सर अभ्यासक्रम यांच्यात नुकतीच झालेली स्फोटक वाढ दाखवते, की समाजोपयोगी कामांमध्ये आजच बेकारी आहे. एकेका नोकरीमागे शेकड्याने तरुणतरुणी धावत आहेत. यात लहान शेतकरी शेतीपासून अलग होऊन सामील झाले, तर दरेक नोकरभरतीवर लाठीमार होतील. आज ते केवळ सरकारी-निमसरकारी नोकरभरत्यांमध्ये होतात. शिवसेना, मनसे, डी-कंपनी, सिमी या संस्था, संघटना ज्या सहजतेने हिंसेकडे वळतात, त्यातून शहरी बेकारांची भीतीच दिसत असते. शेतीक्षेत्रांत नेतृत्वाची ठिणगी पडली, की नक्षलवादासारख्या चळवळी उपजतात. शहरांमध्ये राडा संस्कृती रुजते. ती पसरत नाही, कारण शहरी बेकारांना नागवले जाणाऱ्यांमधून नागवणाऱ्यांत जाऊन पोचण्याच्या वाटा दिसत असतात. गुरु चित्रपट लोकप्रिय झाला, तो उगीच नव्हे.
एखादे क्षेत्र भयग्रस्त आहे, जरा वारा-ठिणगी मिळाली तर ते हिंसक होईल, हे ओळखून उपाययोजना करणे शक्य आहे का? एखादेवेळी प्रस्थापित नेतृत्वाला आणि ते नेतृत्व ज्यांचे प्रतिनिधित्व करते त्या उच्च आणि मध्यम वर्गांना आपल्या नागवणाऱ्या कृतींवर, त्यामागच्या वृत्तींवर विचार करून त्यांना मुरड घालावी लागेल. आणि हे मला तरी दिवास्वप्न वाटते.
बंधुभाव
शहरी मध्यमवर्गाची असंवेदनशीलता, हा ओबडधोबड शब्दप्रयोग जन्मला तोच या प्रकारातून. आपल्या वृत्ती, त्यांच्यातून उपजणाऱ्या कृती, हे इतरांना असह्य क्लेश देत आहे, हे न जाणवणे; म्हणजे असंवेदनशीलता. अनेक विचारवंतांनी लेखांमधून, भाषणांमधून या अवगुणाबद्दल शहरी मध्यमवर्गाला झोडपण्याचा पेशाच केला. त्यांच्या माऱ्याच्या सातत्यानेच तो मारा सवयीचा होऊन त्याकडे दुर्लक्ष होऊ लागले.
मागील अंकात (२१.५, ऑगस्ट २०१०) तुमच्याशिवाय नाही या संजय गणोरकरांच्या मांडणी-शिल्प प्रदर्शनाबाबत लिहिले होते. आत्महत्यांच्या पातळीला भयग्रस्तता असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांबाबत जाणिवा ताज्या करण्याचा अत्यंत संवेदनशील कलात्मक प्रयत्न होता तो. त्या प्रदर्शनाच्या जरा आधी संदेश भंडारे यांच्या असाही एक महाराष्ट्र या पुस्तकातील (ग्रंथाली, २०१०) निवडक चित्रांचे प्रदर्शन महाराष्ट्रभर फिरत नागपुरात आले होते. आधीही तमाशा : एक रांगडी गंमत, वारी एक आनंदयात्रा अशा छायाचित्र निबंधांमधून भंडारे यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा अभ्यास आपल्यापुढे मांडला आहे.
ग्रामीण मराठी माणसाची स्वतःबाबतची, आपल्या उपयुक्त कामाबाबतची आश्वस्त कृती भंडारे छायाचित्रांतून टिपतात. आपण अन्नदाते, वस्त्रदाते, आहोत, ही जाणीव चित्राचित्रातून दिसते. मराठी माणसाची डिग्निटी, (आदब ?) भंडारे संयतपणे मांडतात. ते तसे करू शकतात, राडे-आगाजा न करता; कारण त्यांची संवेदनशीलता निःस्वार्थी आहे. त्यांना लोकांच्या भीतीचे संचलन करून त्यातून राजकीय लाभ कमावायचा नाही आहे. पण भंडारे मुळात पुण्याचे आहेत. त्यांना भीती जागण्याची जेमतेम चाहूल लागते, तर गणोरकरांपुढे ती भीती मूर्तिमंत, व्यक्तिरूप होऊन उभी ठाकते. म्हणून भंडारे असंवेदनशीलतेमुळे काय हरपते आहे हे दाखवतात, तर गणोरकर ते नुकसान किती प्रचंड आहे याकडे लक्ष वेधतात.
असंवेदनशीलतेवर उतारा आहे प्रयत्नाने बंधुभाव जागता ठेवण्याचा. माझे एक स्नेही अध्यात्माची व्याख्या मी सर्व विश्वाशी जोडलेला आहे, हा भाव, अशी करतात. ही व्याख्या इतरांच्या अध्यात्मात मला दिसत नाही. सर्वच जण एका परमात्म्याचे अंश असतात, वगैरे शब्दांच्या गदारोळात बंधुभाव मला तरी जाणवत नाही. उलट आत्मकेंद्री, आत्माकेंद्री स्वार्थच केवळ आध्यात्मिक आहे का, अशी शंका येते!
गणोरकर मात्र स्पष्टपणे तुमच्याशिवाय नाही म्हणत , मांडणी-शिल्पे रचत बंधुभावाला अधोरेखित करतात. त्यांच्या संवेदना जागवण्याच्या नव्या कला-माध्यमातल्या प्रयत्नाचे कौतुकच करावेसे वाटते, ते यामुळेच. (अपूर्ण)