या लेखात आपण आतापर्यंत जे प्रतिपादन केले त्याचा सर्वसाधारण आशय असा की जे मतदार सरकार निवडून देतात त्यांचे त्या विशिष्ट मतदाराला निवडून देण्याचे निकष सर्वस्वी निराळे असतात. पक्ष व त्यांचे नेते यांची स्टेजवर बोलण्याची व प्रत्यक्षातली उद्दिष्टे यांच्यात फार अंतर असते. जेव्हा एखादा उमेदवार निवडून येतो तेव्हा अनेकांची अनेक उद्दिष्टे साध्य झालेली असतात. प्रसंगी ती एकमेकांच्या अगदी विरोधी असतात.
पण या लोकशाही पद्धतीची सुप्त ताकद हे मतदार कधी कधी आश्चर्यकारकरीत्या दाखवून देतात. ताकदवान पक्ष व अगदी त्याच्या नेत्यालासुद्धा ते पूर्णपणे पराभूत करतात. अशा वेळेस लोकशाहीच्या टीकाकारांची तोंडे बंद होतात. त्यामुळेही लोकशाही हा एक अनाकलनीय नैसर्गिक चमत्कारच मानावा की काय, असा प्रश्न पडतो. अगदी ‘सुनामी’ किंवा ‘तापमानवाढीच्या तोडीचा!’ म्हणजे ती निसर्गातील घटना होण्यापूर्वी ती घडणार आहे याचा अंदाज सध्याच्या अत्यंत प्रगत अशा शास्त्राला किंवा तंत्रज्ञानालासुद्धा देता येत नाही. फार तर चमत्कार किंवा दुर्घटना घडल्यानंतर ती का घडली असावी याचा अंदाज करता येतो. त्यामुळे भारतीय लोकशाही पुन्हा एकदा चमत्कारच!
एकदा एका परदेशात ५०-६० वर्षे राहिलेल्या व्यक्तीशी आम्ही गप्पा मारीत होतो. अनेक जण गप्पांच्या ओघात या देशातला भ्रष्टाचार, या विषयावर बोलत होते. ते ऐकून ते गृहस्थ थक्क झाले, व त्यांनी एकच प्रश्न विचारला की “मग हे सरकार व देश चालतो कसा?’ खरोखरच हाही एक चमत्कारच आहे. या लोकशाहीच्या ताकदीच्या संदर्भात आमच्याजवळच्या मतदारसंघात घडलेल्या एका चमत्काराबद्दल सांगायला पाहिजे. एका जिल्ह्यातील एक मान्यवर नेते या जागेवर स्वतःचा मतदारसंघ सोडून उभे होते. त्यांचा नेहमीचा पिढीजात मतदारसंघ राखीव झाल्यामुळे त्यांनी कोठून उभे राहावे याच्या चर्चा जिल्हाभर, इलेक्शन जाहीर होण्यापूर्वी वर्षभर चालल्या होत्या. शेवटी त्यांचे खूप वर्षे घनिष्ठ मित्र असलेले ज्येष्ठ सहकारी यांनी त्यांच्यासाठी हा मतदारसंघ देऊ केला; ज्या मतदारसंघातून ते ज्येष्ठ सहकारी या आधी सलग ५ वेळा निवडून आले होते, व याही वेळी ते नक्की निवडून येऊ शकले असते. पण मतदारसंघातून ज्येष्ठ नेत्याच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे, ज्येष्ठ सहकाऱ्याचे कार्यकर्ते व मतदार फारच नाराज झाले. एरवी सामान्य माणसाला त्याची नाराजी दाखविण्याची या लोकशाही पद्धतीत तरी सोय नाही. पण निवडणुकीच्या वेळी आहे. साधारणतः सामान्य मतदाराला ‘गेटकेन’ (सरींश-लरपश) उमेदवार फारसा पसंत पडत नाही. ‘गेटकेन’ हा खास साखर कारखाना परिसरातील शब्द आहे. या शब्दाने जे तेथल्या मतदारांना समजते, त्याचे वर्णन करण्यासाठी त्याचे दुसऱ्या शब्दात वर्णन करण्यासाठी एखादे पूर्ण पान खर्ची घालावे लागेल.
सहकारी साखर कारखाना आपल्या सभासदांचा ऊस तोड, वाहतूक करून कारखान्यावर आणतो. पण काही वेळा काही कारणाने सभासद नसलेल्या शेतकऱ्याचाही ऊस त्यांना गाळपासाठी आणावा लागतो. त्या वेळेस तो शेतकरी स्वतःच तोड व वाहतूक करतो, व कारखान्याच्या गेटवर वजन काट्यावर ऊस आणतो. त्या उसाचे कारखान्यातील वर्णन ‘गेटकेन ऊस’ ! त्यामुळे मतदार अशा बाहेरच्या उमेदवाराला ‘गेटकेन’ उमेदवार असे म्हणतात.
अशा या गेटकेन उमेदवाराची निवणुकीच्या दृष्टीने फार मोठी पत होती. राज्य सरकारात अनेक मोठी पदे भूषवलेली; संभाव्य मुख्यमंत्री म्हणून ज्याचे नाव काही काळ घेतले जायचे; त्यांनी ग्रामपंचायतीपासून सर्व निवडणुका मोठ्या फरकाने जिंकलेल्या. अनेक साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या, जिल्हा मध्यवर्ती बँका अनेक वर्षे ताब्यात असलेल्या; स्वतःची, कुटुंबाची व ताब्यातल्या सर्व सहकारी संस्थांची आर्थिक परिस्थिती गेली अनेक वर्षे उत्तम; एका मोठ्या राजकीय कुटुंबाचे प्रमुख ; महाराष्ट्रातील मोठमोठी राजकीय घराणी यांच्या नातेसंबंधात; सरकारात चांगले वजन; जिल्ह्यातील ११ पैकी ८-९ आमदार आपल्या गटाचे म्हणून निवडून आणण्याची क्षमता; भक्कम राजकीय वारसा असलेले असे हे उमेदवार त्यांचा गेटकेन हा एकच प्रतिकूल मुद्दा. अशा उमेदवाराला एका त्यामानाने नवख्या, फक्त एकाच साखर कारखान्याचा कारभार ताब्यात असलेल्या उमेदवाराने फार मोठ्या फरकाने पराभूत केले. हाही एक राजकीय चमत्कारच ! जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात चांगला ८-१० रिश्टर स्केलचा धक्काच. सामान्य मतदार, कार्यकर्ते यांना सोडा, पण नेहमी राजकीय विश्लेषण करणारांनीसुद्धा ही अपेक्षा केली नव्हती. पण तसे घडले. अनेक निवडणुकपंडित घटना घडल्यावर आम्हाला याची अपेक्षा होतीच असे म्हणत असतात; तसेही कोणी म्हणू शकले नाही. अर्थात कोणी म्हटले तरी त्यास फारसा अर्थ नसतो. मतदानाच्या आधी २-५% लोकांनीसुद्धा असा अंदाज व्यक्त केला नसेल!
अशा निवडणुकांत आणि एक बोलण्याची मजा असते. पडलेला उमेदवार व त्याचे कार्यकर्ते हे प्रतिस्पर्धी उमेदवाराने फार पैसे वाटले, फारच खर्च केला असा आरोप करीत असतात. जणू काही यांनी तसे काही केलेच नाही! आणि एक शेरा म्हणजे जेव्हा शक्तिप्रदर्शनासाठी मिरवणुका निघतात किंवा सभा असतात तेव्हा आपल्या प्रतिस्पर्ध्याने गोळा केलेले लोक हे ‘रोजाने’ आणले आहेत. असा दोघांचाही एकमेकांवर आरोप असतो.
लोकमान्य टिळकांनी त्यांच्या काळात या लबाड व संधिसाधू नेत्यांची मोठी सोय करून ठेवली आहे. लोकमान्यांनी त्यांच्यावरील ब्रिटिशांनी चालवलेल्या प्रसिद्ध राजद्रोह्याच्या खटल्यात ते प्रसिद्ध उद्गार काढले होते, की या ब्रिटिश कोर्टाने मला जरी दोषी ठरविले असले तरी मी या कोर्टाच्या निकालाला मानीत नाही. या न्यायालयाच्या वर दुसरे परमेश्वराचे न्यायालय आहे व त्या न्यायालयात मी नक्कीच निर्दोष आहे! त्या सुरात हे लबाड नेते प्रचलित कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कोर्टात एखादी भ्रष्टाचाराची; फसवणुकीची वगैरे केस चालू असेल, तर त्या वेळेस पत्रकारांच्या समोर असे म्हणताना अजिबात बिचकत नाहीत, की “या न्यायालयाने जरी मला दोषी ठरविले असले तरी जनतेच्या न्यायालयात मी निर्दोष आहे.”
लोकशाही ज्यांच्यावर उभी असते असे जे भक्कम खांब समजले जातात त्यांपैकी एक म्हणजे प्रसारमाध्यमे! सध्याचा मराठी शब्द म्हणजे ‘मीडिया’! ही लोकशाहीची सर्कस चालविण्यासाठी त्याचे काम महत्त्वाचे असते. साधारणतः सामान्य माणसाचा छापून आलेल्या किंवा टी.व्ही.वर चित्र दाखवलेल्या बातमीवर विश्वास बसतो. खरे असल्याशिवाय कसे छापतील अशी भावना असते. पण प्रसारमाध्यमेसुद्धा अलिकडे ‘बांधील’ असतात व ‘खरी’ बातमी म्हणता म्हणता पैसे घेऊन बातम्या रचू शकतात. या गोष्टीची ज्याला अजून सवय व्हायची आहे, त्याच्या डोक्याला आणखी त्रास. आपण वाचतो ती बातमी खरी आहे की तयार केलेली? इत्यादि. मग सामान्य माणूस गोंधळतो, यात काही नवल नाही.
आता जागतिक तापमानवाढीवर आपण इतकी वर्षे वाचतो. त्याच्यावर होणाऱ्या जागतिक परिषदांचे वृत्तांत, त्यात झालेले ठराव वाचतो. हताश होतो. आता समुद्रकाठी असलेल्या शहरांचे काही खरे नाही. समुद्रकाठी असलेल्या महत्त्वाच्या शहरांची संख्या जास्त आहे. आता मुंबईच्या समुद्राची पातळी ३.० मी. वाढणार. सर्व इमारतींचा तळमजला तर गेला. रस्त्यावरून बोटीतून फिरावे लागणार. व्हेनिस ! नशीब अजून कोणत्या वर्तमानपत्राने ‘मुंबईचे व्हेनिस होणार?’ असा लेख मध्यवर्ती पानावर छापला नाही! या उलट-सुलट बातम्यांमुळे सामान्य माणूस गोंधळतो. अशा मध्यमवर्गीय गोंधळाला काहीशी जबाबदार असणारी गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते. परवा मी एक अनुवादित कादंबरी वाचली (मूळ कादंबरी अर्थात इंग्लिश). त्यात असे दाखविले होते की नायक जो संशोधक आहे तो एका शोध मोहिमेसाठी अंटार्क्टिकाला जातो. तेथे त्याला असे आढळून येते की, तेथील बर्फाचे ढिगारे किंवा टेकड्या, हिमनग वगैरे वितळत नसून त्यांचे आकारमान वाढत आहे. त्यामुळे तो अचंबित होऊन चर्चा करायला लागतो. पण ज्या कार्पोरेशनने ही शोधमोहीम प्रायोजित केलेली असते, त्यांचे व्यापारी हितसंबंध तापमानवाढीचे तत्त्व प्रस्थापित होण्यात असतात. याकारणाने तेच लोक त्याच्या जिवावर उठतात. अर्थातच तो नायक असल्याने कसाबसा सुटका करून घेतो. मला काही काळ ही कादंबरी आहे याचा विसर पडून हे खरेच आहे असे वाटत राहिले. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकन कॉर्पोरेट विश्व हे किती बलवान आहे व ते यापूर्वी काय काय करू धजले आहे त्याच्या सत्य कहाण्या आपण पूर्वी वाचल्या आहेत. हे लोक देश मोडतात, फाळण्या करतात, राजवटी बदलतात, युद्धे घडवितात, थांबवितात इत्यादि.
इथे सुशिक्षित नागरिकाचा अभिप्रेत असलेला अर्थ म्हणजे प्रातिनिधिक मध्यमवर्गीय, ज्याला अनेक विवंचना असतात. जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईच्या, भरमसाठ महागाईच्या, मुलांच्या शिक्षणांच्या, प्रवेशाच्या, डोनेशनच्या, वगैरे, याच बरोबर राष्ट्राच्याही अनेक काळ ज्या त्यालाच भेडसावत असतात. दहशतवादी पुढचा हल्ला कोठे करणार ? पाकिस्तान व अमेरिका यांचे काय चालले आहे, आपल्या देशाच्या बाबतीत ? तिकडे चीन अरुणाचल प्रदेशावर हक्क सांगतोय. सर्वच शेजारी बिघडलेले दिसतात. नेपाळ एवढा हिंदू देश, पण आता चीनच्या घशात जातो की काय ? बांगला देशासाठी इंदिरेने एवढे करूनसुद्धा शेवटी तो धर्मांधच! श्रीलंकेची काही निराळी परिस्थिती नाही. आणि मुख्य म्हणजे आपल्या सत्ताधाऱ्यांना याची जाणीव आहे की नाही ? कसे होणार ? अर्थात हा सर्व त्यांच्या सामान्यज्ञानाच्या संवर्धनासाठी केलेल्या अवांतर व अर्धवट-वाचनाचा परिणाम !
आपल्या मते देण्याच्या सध्याच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये चमत्कार वगैरे घडविणारा हा वर्ग असतो, असे मला वाटते. स्वतःच्या सर्व दैनंदिन गरजा सर्वसाधारण पूर्ण होत असणारा, व सत्ताधाऱ्यांकडून फारश्या वैयक्तिक अपेक्षा नसणारा असा हा वर्ग; जो सध्या वेगाने वाढतो आहे असे म्हणतात! तोच हा वर्ग ज्याला आपण जनता म्हणू शकतो. जो वर्ग वर्तमानपत्रे वाचून, टी.व्ही.पाहून, जाहीर सभांना उपस्थित राहून कदाचित आपले राजकीय मत बनवत असतो. या वर्गाला रिझवण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, आपआपल्या कुवतीप्रमाणे प्रयत्न करत असतात. हा वर्ग त्याच्या निर्णयप्रक्रियेत फार सावधपणा बाळगतो. नंतरच ही मंडळी अंतिम निर्णय घेतात. या वर्गाने मीडियाच्या सहाय्याने जे सामान्य ज्ञान मिळविलेले असते त्याच्या आधारे तो आपले राजकीय मत बनवत असतो. या वर्गाची मोठी वैचारिक फरफट होत असते. एका बाजूला आर्थिक सुबत्तेची आकांक्षा, मित्रांच्या, नातेवाईकांच्या घरे, बंगले, गाड्या, लाईफ स्टाईल्स; परदेशी जाणे, परदेशी वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर ; मोठ्या तारांकित हॉटेलात जाणे वगैरेचे आकर्षण व त्यातून तीच ‘महत्त्वाकांक्षा’ झालेली असते. तर त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला, जी अजून बऱ्यापैकी जागृत असते, तिला समाजातले अनेक दोष खटकत असतात. उदा. – अस्पृश्यता, शेतीची अवस्था, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार, आपल्याला ज्यांना मत द्यावे लागते त्यांची गैरकृत्ये, इत्यादी. अश्या ओढाताणीत हा समाज गोंधळून जातो; त्याला कोणी मार्गदर्शक सापडत नाही तेव्हा ही मंडळी आपली स्वतःचीच जगण्याची एक नीती बनवतात व त्याप्रमाणे वागून आपले समाधान करून घेतात. सर्वसाधारणपणे बऱ्यापैकी बुद्धी असल्याने व ती अवांतर वाचनाने प्रगल्भ(!) झालेली असल्याने तो आपल्या कोणत्याही वागण्याचे स्वतःशीच समर्थन करू शकण्यास समर्थ असतो. त्याची जगण्याची मूल्ये निरनिराळ्या विषयांवर निरनिराळी तयार होतात., मग ती एकमेकांशी विसंगतही असू शकतील. यातूनच नवी तत्त्वे, जी बहुतेकांना आचरण्यास सोईची असतात अशी तयार होतात. उदा. – “दुसरा करतो तो भ्रष्टाचार व आपल्याला करावा लागतो तो व्यवहार’! वगैरे. हा विषय फार गहन आहे व अनेक मोठमोठ्या लोकांनी त्यावर अनेक वर्षे विचार, अभ्यास करून भाष्य केलेले आहे. तेव्हा आपण त्यावर अधिक भाष्य करण्याचा प्रयत्न न करणेच इष्ट. शिवाय काही विषय असे असतात की त्यात अधिक खोलात न जाता त्यांना लांबूनच स्पर्श करणेच सोईचे असते. हाही एक मध्यमवर्गाचाच गुण! म्हणजे कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत ताणायची नाही. ती अगदी तुटण्याच्या बेतात आली की सोडून द्यायचे ! म्हणजे कोणतीही गोष्ट मराठीत म्हणतात त्याप्रमाणे देठाला लागू द्यायची नाही. कारण तसे केले व तुटले तर काही पक्के निर्णय घ्यावे लागतात, जे त्यांना कायमसाठी आवडणारे नसतात. असो.
आता आपल्या लोकशाहीबद्दल विचार करताना आपण मध्यमवर्गाबद्दल बरेच बोललो किंवा विचार केला. तसा तो होणारच. कारण या निवडणुकांत मतदान करणाऱ्या मतदारांत हा वर्ग काही वेळेला प्रामुख्याने नसेल (संख्येने), पण आकर्षित करण्याच्या व पटवून देण्याच्या प्रचलित पद्धतींचा टार्गेट प्रामुख्याने असतो. त्यामुळे ज्यांच्यावर प्रयत्न करून जे आपले मत बनवतील, अथवा मत बदलतील त्यांच्या बाबतीतच हा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. ज्यांनी आपली मते इतर निकषांवर आधीच बनविलेली असतात (उदा. जात, धर्म अथवा आर्थिक फायदा) त्यांच्या बाबतीत (प्रचाराला) फारसा वाव नसतो.
आपण वर वर्णन केलेला व सध्या वेगाने वाढणारा मध्यमवर्ग काही कारणाने अजून संख्येने वाढेल तेव्हा प्रचाराची दिशा एका दृष्टीने पक्की होईल व राष्ट्राचे काही निर्णय खरोखरीने योग्य होतील. या वर्गाच्या मतावरच सरकार बनेल, त्यामुळे यांच्या विचार करण्याला राजकीय पक्षांना महत्त्व द्यावे लागेल. असो.
आपण निवडणुकांची प्रत्यक्ष निरीक्षणे व त्याला अनुसरून काही स्वभावाची निरीक्षणे करत करत मानवी स्वभाव, समूहाचे वर्तन वगैरे गहन गोष्टीबद्दलही भाष्य करण्याचे धाडस केले आहे. तेव्हा आता हा विषय इथेच थांबवू.
द्वारा प्रा.बी.टी.जाधव, प्लॉट नं.३८, कर्मवीर हा.सोसा., अलीपूर रोड, बार्शी (महाराष्ट्र)