मेकॉलेचे चारित्र्यहननः एक लाजिरवाणा अध्याय

ऐतिहासिक घटना किंवा व्यक्ती यांचे विश्लेषण करताना आपण बरीच माहिती गोळा करतो. ते करताना एक महत्त्वाचा दंडक पाळावा लागतो, तो म्हणजे माहिती तत्कालीन संबद्ध व्यक्तींनी लिहिलेली असावी व ती व्यक्तीही विश्वासार्ह असावी. माहितीवर आधारलेल्या व्यक्तिगत मतापेक्षा त्या व्यक्तीने घटनेचे केलेले चक्षुर्वैसत्यं वर्णन महत्त्वाचे असते. घटना घडून काही वर्षे गेल्यावर आठवणीप्रमाणे लिहिलेले वर्णन कमी विश्वासार्ह असते. आज प्रत्यक्षात अनेक लेखक ही पथ्ये पाळत नाहीत त्यामुळे हास्यास्पद निष्कर्ष काढतात. काही वेळा असा प्रकार अज्ञानातून होतो व ते क्षम्यही आहे. पण बऱ्याच वेळा तद्दन खोटा प्रचार जाणूनबुजून केला जातो व ते अश्लाघ्य आहे. मेकॉलेचे चारित्र्यहनन दुसऱ्या प्रकारात बसते. थॉमस बॅविंग्टन मेकॉले हे एका राजकीय गटाचे क्रमांक एकचे शत्रू. त्यांच्याविषयी बदनामीकारक व उघडउघड खोट्या माहितीचा प्रचार करणे हा या गटाचा अनेक वर्षे सतत चालू असलेला उद्योग. या त्यांच्या प्रचाराला केवळ सामान्य जनताच नव्हे तर सुविद्य नेतेही बळी पडतात. एक उदाहरण –
गुरुवार, ११ ऑक्टोबर २००७ च्या लोकसत्ता, पुणे वृत्तान्ताच्या पुरवणीत प्रसिद्ध इतिहास-संशोधक निनाद बेडेकर यांचा ‘१८५७-समरभूमीच्या भेटीची संधी’ या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात मेकॉलेच्या भाषणातून घेतलेला एक उतारा इंग्रजीतून मुद्रित केला आहे. त्याचे मराठी भाषांतर पुढीलप्रमाणे – _ ‘मी भारतात खूप फिरलो. उभा-आडवा भारत पालथा घातला. मला तेथे एकही भिकारी, एकही चोर पाहायला मिळाला नाही. हा देश इतका समृद्ध आहे, तिथली नैतिकमूल्ये इतकी उच्च आहेत आणि लोक इतके सक्षम योग्यतेचे आहेत की, आपण हा देश कधी जिंकू शकू, असे मला वाटत नाही. या देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा हा या देशाचा कणा आहे आणि आपल्याला हा देश जिंकायचा असेल तर तोच मोडायला हवा. त्यासाठी त्यांची प्राचीन शिक्षणपद्धती आणि त्यांची संस्कृती बदलावी लागेल. भारतीय लोक जर असे मानू लागले की, परदेशी आणि विशेषतः इंग्रजी ते सारे चांगले, त्यांच्या संस्कृतीपेक्षा उच्च, थोर आहे, तर ते त्यांचा आत्मसन्मान गमावून बसतील आणि मग ते आपल्याला हवे आहेत तसे बनतील – एक गुलाम राष्ट्र!’ (लॉर्ड मेकॉलेने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ३ फेब्रुवारी १८३५ रोजी केलेल्या भाषणाचा अंश)
उपर्युक्त उतारा वाचल्यावर आम्ही दोघेही आश्चर्यचकित झालो. आमच्या शालेय शिक्षणात आम्ही मेकॉले, गव्हर्नर जनरल बेंटिक यांच्याविषयी वाचले होते. भारतातील रेनेसाँचे किंवा प्रबोधनकाळाचे नेते असा त्यांचा राजा राममोहन रॉय यांच्यासमवेत उल्लेख असे. भारतीयांच्या भौगोलिक, विज्ञानविषयक आणि साहित्याविषयी मेकॉलेचे मत चांगले नव्हते व तो ते परखडपणे लिहीत असे. पण वर उद्धृत केलेल्या उताऱ्यात ध्वनित होते तसा मेकॉले कुटिल वृत्तीचा, बदमाष गृहस्थ होता अशी आमची धारणा नव्हती. आमच्या मनातील मेकॉलेच्या प्रतिमेला वरील उताऱ्याने छेद दिला. आमच्या मनातील मेकॉलेची प्रतिमा ही त्याच्या अनेक भाषणांच्या परिशीलनानंतर व त्याने ग.ज.बेंटिंक यासाठी लिहिलेल्या शिक्षणपद्धतीविषयीच्या टिपणांच्या वाचनानंतर झाली होती. हे टिपण भारताच्या राष्ट्रीय अर्काईव्हजमध्ये उपलब्ध आहे. तसेच खालील संकेतस्थळावरही उपलब्ध आहे – http://www.languageinindia.com/April 2003/mecaulay.html
मेकॉलेच्या अनेक भाषणांपैकी आम्हाला जे विशेष भावले होते त्यातील काही भाग खाली उद्धृत केला आहे. हे भाषण मेकॉलेने १० जुलै १८३३ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या चार्टरच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावाच्या संदर्भात केले होते.
‘आपण आपल्या समाजाबद्दल सुसंस्कृत व स्वतंत्र अशी प्रौढी मिरवतो, पण हे स्वातंत्र्य व ही संस्कृती इतर समाजाला देण्यावेळी खळखळ करू लागलो तर आपला सुसंस्कृतपणाचा दावा एक ढोंग ठरेल. भारतातील लोक आपल्या अमलाखाली नोकर म्हणून राहावेत म्हणून त्यांना आपण शिक्षणापासून वंचित ठेवले तर असले वर्तन खोटारडेपणाचे ठरेल.’
मेकॉले पुढे म्हणतो, ‘आपल्या अमलाखाली भारतीयांचे सामाजिक मानस प्रबुद्ध होईल. आपल्या चांगल्या, स्वच्छ शासनपद्धतीमुळे भारतीय लोक स्वयंशासनास सक्षम होतील, शिक्षणामुळे तज्ज्ञ होतील व मग ते स्वातंत्र्याची मागणी करतील. असा दिवस केव्हा येईल ते मी सांगू शकत नाही, पण तो दिवस येत असताना दिसला तर मी त्यास कोणताही अडथळा निर्माण करणार नाही. तो दिवस ब्रिटिश राजवटीला असीम अभिमानाचा ठरेल.’
अशा त-हेची अनेक भाषणे मेकॉलेने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केली होती, तसेच एडमंड बर्क आदी व्हिग पक्षीय नेत्यांनीही केली होती. आमचे शालेय शिक्षण स्वातंत्र्यपूर्व काळात झाले असल्यामुळे ब्रिटनचा इतिहास आम्ही तीन वर्षे शिकत होतो. त्यामुळे १७८४ सालच्या प्राईम मिनिस्टरच्या भारतविषयक कायद्यातील पुढे उद्धृत केलेली वाक्ये आम्हाला आठवत होती.
‘भारतात आणखी काही प्रदेश जिंकणे ब्रिटिश जनतेच्या न्यायबुद्धीस व संस्कृतीस कलंक लावणारे आहे, अशी ब्रिटिश जनतेची भावना आहे. म्हणून कायदा केला जातो की…’
त्यामुळे आम्हा लेखकद्वयास बेडेकरांनी उद्धृत केलेल्या उताऱ्याच्या खरेपणाविषयी शंका आली व आम्ही वैद्यक व्यवसाय सांभाळून अधिक वाचनास सुरुवात केली. त्यातून आश्चर्यचकित करणारी माहिती मिळाली. तशीच मनात उद्विग्नता किंवा विषाद आणणारी माहितीही मिळाली. त्याचे थोडे स्पष्टीकरण पुढे केले आहे.
अ) १. मेकॉलेच्या नावावर खपविला जाणारा उतारा हा मेकॉलेच्या भाषणातील नाही. १८३४ ते १८३८ या काळात मेकॉले भारतात होता व त्याने २ फेब्रुवारी १८३५ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भाषण करणे अशक्य. २. पार्लमेंटमध्ये असे उघडउघड कुटिल हेतू स्पष्ट करणारे भाषण कुठलाही शहाणा माणूस करणार नाही; ही, चर्चा आमच्या आगामी पुस्तकात केली आहे.
ब) सदर उतारा अनेक लेखकांनी आपल्या लेखात उद्धृत केलेला आहे. या उताऱ्याविषयी प्रसिद्ध हिंदुत्ववादी बेल्जियमस्थित लेखक काईनराईड एल्स्ट यांनी विशेष अभ्यास केला आहे. या प्रखर हिंदुत्ववादी लेखकाची सॅफ्रन स्वस्तिक आणि राजन्मभूमी विरुद्ध बाबरी मशीद ही दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. यातील क्रमांक दोनच्या पुस्तकाचे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. हे येथे नमूद करण्याचे कारण एकच, ते म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणीविरोधी त्यांच्या मनात काही आकस नाही. उलट हिंदुत्ववादी विचारसरणीविषयी त्यांच्या मनात प्रेमच
आहे.
काईनराईड एल्स्ट यांचे विचार-विवेचनविषय असणारा उतारा वाचल्यावर एल्स्ट हेही आश्चर्यचकित झाले. त्यांनी भारतातल्या आपल्या मित्रांकडे चौकशी केली असता सदर उतारा खालील संकेतस्थळावरून पाठविला जातो हे कळले. ती संकेतस्थळे खालीलप्रमाणे www.aryasamaj.org
www.veda.harekrishna.cz
एल्स्ट यांच्या संकेतस्थळावरील माहितीप्रमाणे पूर्व राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशन समारंभासाठी मुख्य अतिथी होते. (३०.२.२००४). तेथे भाषणात त्यांनी मेकॉलेच्या पार्लमेंटमधील भाषणाचा उल्लेख केला. आम्ही पूर्व राष्ट्रपतींकडे चौकशी केली. ती ई-मेल व त्यांचे आलेले उत्तर खाली दिले आहे.
एल्स्ट यांच्या माहितीप्रमाणे भारत सरकारच्या नियोजन मंडळाच्या कागदपत्रांतही मेकॉलेच्या सदर उताऱ्याचा अंतर्भाव आहे. एल्स्ट आपल्या भाजपतील हिंदुत्ववादी मित्राला कळकळीचा सल्ला देतात की, उघडउघड बनावट भाषणाचा आधार घेऊ नका. अशाने हिंदुत्ववादी चळवळीचे नुकसान होणार आहे.
तरीही या वर्षी जी लोकसभा निवडणूक झाली त्यासाठी भाजपने ३२ पानी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यात सुरुवातीसच मेकॉलेच्या १८३५ सालच्या भाषणातील अंश म्हणून सदर उतारा मुद्रित केला होता. थोडक्यात पालथ्या घड्यावर पाणी!
मेकॉलेवरील इतर आरोपांची चर्चा आमच्या आगामी पुस्तकात आहे.