आजपर्यंत अनेक उपेक्षितांनी आत्मचरित्र लिहून आपले अंतरंग उघड केले आहे. समाजाकडून, कुटुंबीयांकडून विशेषतः सासरच्या, झालेल्या अनन्वित शारीरिक, मानसिक अत्याचारांच्या अमानुष कहाण्या आपल्या वाचनात आल्या आहेत. मनात वाटलेली कटुता, क्षोभ, प्रचंड भावनिक खळबळ व मरणप्राय उद्विग्नता या सर्व भावभावनांना वाट करून देण्याचे उत्तम साधन म्हणजे आत्मचरित्र. समाजापर्यंत पोचण्याचा समाजमान्य मार्ग. ही प्रत्येक व्यक्तीची मानसिक गरज आहे. मैत्रिणींशी हितगुज, आप्तेष्टांशी संवाद व अतीच झाले, ताणतणाव असह्य झाला तर समुपदेशकाचे साहाय्य ह्यांपैकी कुठल्यातरी मार्गाने आजच्या समाजात आपण तणावमुक्तीसाठी प्रयत्न करत असतो. आत्मचरित्र लिहिणे प्रत्येकाला शक्य नसले तरी प्रत्येक जीवन ही कादंबरी नक्कीच असते.
आशा आपराद या लेखिकेचे ‘भोगले जे दुःख त्याला’ हे आत्मचरित्र वाचून मात्र मन सुन्न होते. सासूसासरे, नवरा, दीर, नणंदा, जावा यांच्या छळाच्या कथा आतापर्यंत हजारोंनी वाचल्या व ऐकल्या गेल्या असतील पण प्रत्यक्ष जन्मदात्या आईने पहिल्या ज्येष्ठ कन्येचा केलेला अमानुष शारीरिक व मानसिक छळ वाचून ‘माता न तूं वैरिणी’ असेच म्हणावेसे वाटते.
आशा, एका अतिसामान्य, मोलमजुरी करणाऱ्या दरिद्री मुस्लिम कुटुंबात जन्मलेली मुलगी. प्रेम करणाऱ्या वडिलांपासून, त्यांच्या निधनामुळे एकमेव प्रेमाचा धागा तुटलेला. आई तर साक्षात कर्दनकाळ, सर्व दुष्ट प्रवृत्तींचा अतिरेक असलेली एक व्यक्ती. आशाला मारणे, जाळणे, शिव्यांची लाखोली, सारखे घरकामाला जुंपणे व चुकूनही एखादा चांगला शब्द किंवा हळुवार भावना तिच्याविषयी उच्चारणे नाही किंवा दर्शवणारही नाही. अशा ‘आईवासात’ आयुष्य निभावणारी आशा म्हणूनच विस्मयचकित करून जाते. ‘आई’ या शब्दाभोवती असणाऱ्या सर्व मधुर, मृदु भावनांना छेद देणारे असे आशाच्या आईचे व्यक्तिमत्त्व आहे. ‘कुरूप, अपशकुनी, पांढऱ्या पायाची, पालीच्या तोंडाची, दळभद्री, रडकी, तुटक्या चपलेच्या तोंडाची’, अशी शेलकी विशेषणे घेऊन आशाला हुकूम सोडायचे एवढेच या मायमाऊलीचे काम. नाहीतर लाथाबुक्क्या, जळक्या लाकडाने मारणे असे हाल नित्यनियमाने करायचेच. “आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक नैसर्गिक, परिस्थितिजन्य गोष्टींना आईने मला जबाबदार धरले. केवळ धरलेच नाही तर या गोष्टींची जबर शिक्षा मला आयुष्यभर दिली. न केलेल्या गुन्ह्यांची सजा मला आयुष्यभर दिली.” वडील गेल्यानंतर आईने शाळा बंद करून घरकामाला व लग्न करून संसाराला जुंपून टाकले. तिच्यासाठी सासर माहेर एकच झाले, कारण नवऱ्याला आईने घरजावई करून घेतले. तोही पूर्णपणे सासूच्या कह्यात. त्यानेही सासूचा धडा गिरवून आशाच्या छळवादाला हातभारच लावला. ___”आईच्या दगडी काळजावर माझे प्रत्येक स्वप्न आपटून, फुटून चक्काचूर होऊन मला रक्तबंबाळ करून गेले. यामुळे माझे ‘दैहिक’ जगणे व ‘मानसिक’ मागणे यात हजारो योजनांचे अंतर राहिले ते राहिलेच. हे अंतर काही अंशी कापण्याचा प्रयत्न म्हणजे हे लेखन” या छळांच्या शहारा आणणाऱ्या कथा वाचताना वाचक आशाच्या भक्कम मनोबलाचे, शिक्षणाची कास न सोडण्याच्या दृढनिश्चयाचे कौतुक करीत भरल्या मनाने वाचन करीत राहतो. आणि त्यातच या आत्मचरित्राच्या यशाची मेख आहे. ही एक केवळ छळकथा नसून एका दुर्दम्य आकांक्षेचा व दृढतम जिद्दीचा कष्टदायक पण विजयी असा प्रवास आहे. आशाच्या शब्दांचे, भावनांचे सामर्थ्य इतके आहे की नजरेसमोर सर्व व्यक्तींच्या प्रतिमा ते उभ्या करते. आशाची प्रतिमा ही एका भयकारी वादळात सापडलेल्या पण न खचता भक्कम पाय रोवून, कष्ट, छळ, हाल, बाळंतपणे, शिव्याशाप व मार यांच्या माऱ्यातूनही वेळात वेळ काढून लपून छपून केलेल्या आत्मशिक्षणाचा व आत्मशोधाचा प्रवास आहे. आशा म्हणते “माझ्या लढाईचे शस्त्र होते माझे ‘कलम’ – लेखणी. ती हाती घेऊन मी आठवीतून सरळ एस.एस.सी, बी.ए., एम.ए., एम.फिल. आणि प्राध्यापक अशी एक एक क्षेत्रे काबीज करत गेले. ही लढाई मला एकटीलाच लढावी लागली. ना कुणाची साथ, ना कुणाची सोबत. थकले तर न कुणी उठवणारे, घायाळ झाले तर न कुणी मलमपट्टी करणारे. तरीही लढत राहिले. अनेक अडथळ्यांना ‘कलम’ करीत एका ‘कलाम’ पर्यंत पोचले.”
या एकट्या लढवय्याला घराने नसेल पण समाजाने मात्र साथ दिली. प्रेम दिले. “स्वकीयांनी पायांत निखारे पसरले असताना माझ्या पदरात फुलांच्या ओंजळी टाकणाऱ्या प्रेमळ हातांनी मला सावरले’ हे प्रेमळ हात म्हणजे प्रामुख्याने दलितमित्र बापूसाहेब पाटील, प्राचार्या लीला पाटील व श्री. रवीन्द्र सबनीस. दिशा सापडली व या ध्येयवेड्या मुलीने शिक्षण हेच अढळ ध्येय ठेवून घरातील परिस्थिती सहन करत आपली वाटचाल पुढे चालूच ठेवली. आपल्या चार मुलींचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत सुरू ठेवले. शिक्षणाचा दीप मनात, हृदयात प्रज्वलित केल्यावर आशाने कुठल्याच वादळवाऱ्यात तो विझू दिला नाही. तिचे मनोबल दिवसेंदिवस वाढतच गेले आणि अनेक नोकऱ्या करत शिकत ती प्राध्यापक झाली. आपले स्वतःचे सुंदर घरकुल तिने बांधले, मुलींना सुशिक्षित करून पुरोगामी, शिकलेल्या मुलांशी त्यांची लग्ने लावून दिली. आपला उघड्यावरचा संसार सुफल संपन्न केला. या सर्व प्रवासात खलनायिका ‘मा’ला तिने वाऱ्यावर सोडले नाही. पण शेवटी स्वतःच्या हक्काच्या घरकुलात गेल्यावर तिथे घुसू पाहणाऱ्या ‘मा’ला तिने स्पष्ट शब्दांत सांगितले, “आता तुला इथे जागा नाही”, “आर्थिक बाबतीत मी ‘मा’ला कधीच विसरणार नाही. पण माझ्या आयुष्यात तिने पुन्हा यावे इतकी क्षमाशीलही होणार नाही.’
आशाच्या शब्दांत “ही कथा मी भोगलेल्या अनेक दुःखांची, व्यथावेदनांची आहे. बालपणापासून प्रौढावस्थेपर्यंत अविरतपणे आयुष्याचं ‘उलटं’ फिरवलेलं चाक ‘सुलटं’ फिरवण्यात काळ गेला. परिस्थितीनं भोग वाट्याला आले. पण ‘आपल्यांनीही’ दुःखाचे डोंगर उभे केले. त्यांतून वाट काढण्यात बरीच थकूनही गेले. ‘दुःखाचं रडगाणं’ ‘आनंदाचं गाणं’ व्हावं यासाठी केलेल्या प्रयत्नांची ही कथा आहे.”
‘आईने असं का वागावं’ या प्रश्नाला एकच उत्तर सुचलं ते म्हणजे की ही एक मानसिक विकृती होती. ज्याला मानसशास्त्रात Personality Disorder म्हणतात. आक्रमक, हुकुमशाही, हट्टी, आत्ममग्न, हेकट व उद्धट अशी एक ‘मा’ व तिच्या गुलामगिरीतून शर्थीने बाहेर पडलेल्या ‘मुलीची’ ही कथा आहे. जी मुळातूनच वाचायला हवी.