जोतीराव फुले यांचे अंधश्रद्धा-निर्मूलन कार्य

जोतीराव फुले यांनी विश्वमानवाच्या मुक्तीसाठी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या दोन निष्ठावंत अग्रणींच्या आयुष्यातील दोन प्रसंग प्रारंभीच नमूद केल्यास अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात त्या चळवळीने संपादन केलेल्या यशाचा प्रत्यय येऊ शकेल. पहिला प्रसंग ना. भास्करराव जाधवांच्या आयुष्यातला आहे. वेदोक्त प्रकरणी दुखावलेल्या शाहू महाराजांनी जेव्हा क्षात्र जगद्गुरूची प्रतिष्ठापना केली तेव्हा भास्कररावांनी त्या कल्पनेस विरोध केला होता. एवढेच नव्हे तर महाराजांसह सर्व श्रेष्ठींनी क्षात्रजगद्गुरूंना अभिवादन केले तेव्हा, आपण सत्यशोधक असल्यामुळे कोणत्याही धर्मपीठापुढे नतमस्तक होणे आपल्या विचारांत बसत नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. सत्यशोधकी विचार केवळ ब्राह्मणी जगद्गुरूंनाच नकार देत नसून संपूर्ण पुरोहितशाही आणि जन्मनिष्ठ विषमतेवर आधारित वर्णव्यवस्था यांनाच नाकारतो. कारण वर्णव्यवस्थेच्या मुळाशी उच्चवर्णीयांचे अहंगंड आणि निम्नवर्णीयांचे न्यूनगंड जोपासणारी अंधश्रद्धा आहे. ब्राह्मण वर्चस्वाची जागा क्षत्रिय वर्चस्वाने घेतली, किंवा ब्राह्मण-क्षत्रिय समतुल्य झाले तरी तेवढ्याने ही अंधश्रद्धा दूर होणार नाही, तर वर्णव्यवस्थेचे उच्चाटन झाले तरच तिचे निराकरण होऊन समताधिष्ठित समाज उभा राहू शकेल अशी सडेतोड भूमिका ना. जाधवांची होती.
दुसरा प्रसंग सत्यशोधकी विचाराचे खंदे व प्रभावी प्रसारक श्री. बाबूराव यादव यांच्याविषयीचा असून श्री. माधवराव बागलांनी तो आपल्या एका पुस्तकात नमूद केला आहे. शाहू महाराजांनी एकदा बाबूरावांना काही कामाने बोलाविले असता त्यांना येण्यास बराच उशीर झाला. महाराजांनी विलंबाचे कारण विचारले. बाबूराव महाराजांना घेऊन गॅलरीच्या टोकाशी आले आणि तिथून त्यांनी खाली सोडलेल्या आपल्या बैलगाडीकडे अंगुलिनिर्देश केला. महाराजांना काहीच कळेना. त्यांनी पाहिले बाबूरावांच्या गाडीत शेकडो लहानमोठ्या वेगवेगळ्या आकारांच्या लाल दगडांचा ढीग होता. उशिरा येण्याचा या दगडांशी काय संबंध? असा प्रश्न महाराजांच्या मुद्रेवर उमटला. बाबूरावांनी खुलासा केला. “महाराज, आमच्या शेतकऱ्यांच्या बांधांवर बसून शेतकऱ्यांच्या मेंदूंचे फत्तर करून टाकणारे हे शेंदूरमाखले दगड मी येताना गोळा करीत बसलो. त्यामुळे दरबारात हजर होण्यास विलंब झाला!”
सत्यशोधक समाजाने वरपासून खालपर्यंत अशी अंधश्रद्धाविरोधी मानसिकता निर्माण केली होती याची साक्ष ते दोन प्रसंग देतात. नवसमाजनिर्मितीसाठी अंधश्रद्धा-निर्मूलनः
स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, सामाजिक व आर्थिक न्याय, आणि शोषणरहितता या मूल्यांवर आधारित नवी समाजव्यवस्था जर निर्माण करायची तर जुन्या, विषम व शोषणप्रधान समाजव्यवस्थेला तिच्या पायाभूत मूल्यांसह उखडून टाकलेच पाहिजे अशी जोतीरावांची ठाम धारणा होती. पाया तसाच ठेवून वरच्या डोलायत थातुरमातुर दुरुस्त्या करून नवसमाजनिर्मिती होणे शक्य आहे या सुधारकांच्या मताशी ते मुळीच सहमत नव्हते.
सामाजिक उच्चनीचता ईश्वरी संकेतानुसार किंवा पूर्वजन्मीच्या संचिताबरहुकूम असते, त्यामुळे तिचे निराकरण करण्याचा कोणताही प्रयत्न महत्पाप ठरतो हा विचार जोपर्यंत शोषित वंचितांच्या मनीमानसी घट्ट रुतून बसलेला राहील, तोपर्यंत त्यांना समाजजीवनाचे नवे संकेत समजावून सांगणे केवळ अशक्य आहे, हे ओळखून जोतीरावांनी त्या अंधश्रद्धांवर कठोर प्रहार केले. ग्रंथप्रामाण्य व शब्दप्रामाण्य यांची मगरमिठी सोडवून बुद्धिप्रामाण्याची व विवेकनिष्ठेची महती त्यांनी गायिली. स्त्री शूद्रातिशूद्राच्या मानगुटीवर स्वार झालेल्या भ्रममूलक मिथकांचे वाभाडे काढले. धर्मग्रंथ रचणाऱ्यांची कुटील कारस्थाने वेशीवर टांगली. कर्मकांडांच्या जळमटांतून मुक्त अशी ईश्वरकल्पना ‘निर्मिका’च्या रूपाने उभी केली. परलोकप्रधान जीवनदृष्टीच्या जागी इहलोकप्रधान दृष्टिकोन रुजवण्याचा खटाटोप केला. दैव-देवशरणता, फलज्योतिष, जारण-मारण, भूतबाधा, कर्मकांड, सोवळेपणा, विधी-संस्कार, बुवाबाजी वगैरे अंधश्रद्धांचे विविध आविष्कार कसे तर्कदुष्ट व खुळचटपणाचे आहेत हे त्यांनी परोपरीची उदाहरणे देऊन जनसामान्यांना पटवून दिले. त्याचबरोबर ज्या आर्थिक-सामाजिक दुरवस्थेमुळे स्त्री-शूद्रातिशूद्र अंधश्रद्धांना बळी पडतात ती दूर करण्यासाठी शोषित-वंचितांचे संघटित लढे उभारण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
शूद्रांची ज्ञानबंदीः
हिंदू धर्मग्रंथांबद्दलचे त्यांचे प्रतिपादन असे आहे की, “धूर्त आर्यब्राह्मण ग्रंथकारांनी आपले मतलबी धर्माचे लिगाड शेतकऱ्यांच्या मागे… सफाईने लावले आहे”. “त्यांच्या पूर्वजांनी रचिले भारूड । वेदांचे गारूड । वैरभावे ।।” एकदा पराभूत केलेल्या शूद्रातिशूद्रांनी पुन्हा प्रतिकारार्थ उभे राहू नये म्हणून आर्यभटांनी कृत्रिम धर्माची उभारणी केली आहे. शूद्रांच्या द्वेषातूनच त्यांनी जन्माधारित उच्चनीचत्वाचे चातुर्वर्ण्य, शिवाशीव, सोवळेपणा वगैरेंची रचना केली. “पुढे कित्येक शूद्रद्रोही भटग्रंथकारांनी जनाची तर नाही, पण मनाचीसुद्धा लाज न धरिता संधी पाहून त्या सोवळ्याचे इतके महत्त्व वाढविले की सोवळ्या भटास एखादे शूद्राचा स्पर्श झाला असतासुद्धा तो वास्तविक अपवित्र होतो, म्हणून त्यांनी धर्मशास्त्रासारखी अपवित्र पुस्तके करून ठेविली आहेत, व काही कालानंतर शूद्रास आपल्या पूर्वीच्या श्रेष्ठत्वाची आठवण झाल्यास ते कधीतरी आपल्या उरावर नाचण्यास कमी करणार नाहीत या भयास्तव शूद्रास मुळीच कोणी ज्ञान शिकवू नये म्हणून भटांनी बंदी केली.” शूद्रांनी वेदाध्ययन करू नये, वेद त्यांच्या कानांवरही पडू नये अशा धर्माज्ञांचा हेतू स्पष्टतः सफाईने जुलूम करता यावा याखेरीज दुसरा असू शकत नाही.
ईश्वर आणि कर्मकांडः
अंधश्रद्धा-निर्मूलन कार्यकर्त्यांची ईश्वरविषयक भूमिका काय असावी? असा एक प्रश्न चळवळीत अनेकदा उपस्थित केला जातो. आणि निरीश्वरवाद, अज्ञेयवाद, आस्तिक्यवाद वगैरे अनेक विचारसरणींचा पुरस्कार केला जातो. या प्रश्नावरची साधकबाधक चर्चा बरीच विकोपाला जाऊन अखेरीस अनिर्णीत राहाते असा बहुधा अनुभव येतो. या संदर्भात जोतीरावांचे विचार अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कार्यकर्त्यांना आजही मार्गदर्शक ठरू शकतील असे वाटते.
स्थूल अर्थाने फुले ईश्वरवादी होते कारण ते निर्मिक-कल्पनेचा पुरस्कार करतात. प्रार्थना व अन्य विधी करण्याचीही शिफारस करतात. पण त्यांच्या या प्रतिपादनाचा सूक्ष्म विचार केल्यास असे दिसते की समाजवादी-मार्क्सवादी विचारांच्या मंडळींनाही मान्य होऊ शकेल अशी त्यांची ईश्वरकल्पना आहे. जोतीरावांच्या मते चराचरसृष्टीचा निर्माता व नियंता असा एकच एक ईश्वर आहे. सर्व स्त्रीपुरुष मानवमात्र त्याचीच लेकरे, तो सर्वांचा पोशिंदा, न्यायकर्ता व उद्धारक आहे. मात्र त्याचे दर्शन वा साक्षात्कार मानवाला अशक्य आहे. देवदर्शनाची हाव हा जोतीरावांना शुद्ध वेडेपणा आणि ते झाल्याच्या कथा निरर्थक थापाडेपणा वाटतो. अनंत सूर्यांचे तेज एकत्र करूनही “आपल्या महापवित्र, देदीप्यमान व तेजोमय निर्मिकाच्या तेजापुढे आपल्याच्याने उभे राहून त्याचे दर्शन घेववेल काय ?’ असा स्पष्ट नकारार्थी उत्तर ध्वनित करणारा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
पूर्वीच्या माणसाला अज्ञानापोटी जेव्हा निसर्गप्रक्रियांचे स्पष्टीकरण ठाऊक नव्हते त्या कालात अस्तित्वात आलेले पूजाविधी ज्ञानप्राप्तीनंतरही टिकून राहिले याचे ऐतखाऊ पुरोहित पुजारी वर्गांचा स्वार्थ हे एकमेव कारण जोतीरावांना दिसते. “कल्पनेचे देव कोरीले उदंड। रचीले पाखांड। हितासाठी ।। किन्नर गंधर्व ग्रंथी नाचवीले । अज्ञ फसवीले । कृत्रिमानें ।। निर्लज्ज सोवळे त्याचे अधिष्ठान । भोंदीती निदान । शूद्रादीक ।।” अशी मूर्तिपूजेची संभावना त्यांनी केली आहे. कारण त्यांच्या मते मूर्तिपूजा ही भिक्षुकशाहीची आधारशिळा आहे.
ईश्वरासाठी प्रचलित असलेल्या सर्व संज्ञा आराधना, भक्ती, पूजा वगैरे कर्मकांडांची सूचना करीत असल्यामुळे त्यांना त्याज्य ठरवून जोतीरावांनी जाणीवपूर्वक “निर्मिक’ ही उपाधिविरहित संज्ञा स्वीकारली आहे. त्यांच्या मते कर्मकांडे फक्त निरर्थक आहेत म्हणूनच नव्हेत तर ती मानवमात्रात फूट पाडतात म्हणूनही वर्ण्य ठरतात. जोतीरावांनी प्रतिपादलेल्या सत्यधर्मात मूर्तिपूजा नाही, पोकळ नामस्मरण नाही, की क्रूर जीवहत्या नाही. त्याच्या आचरणामुळे कुणाचेही व्यक्तिस्वातंत्र्य गहाण पडणार नाही, स्त्री-पुरुष समतेला बाधा येणार नाही, की अन्यधर्मीयांना तुच्छ लेखले जाणार नाही. चोरी, व्यभिचार, व्यसनाधीनता, पिढीजात श्रेष्ठत्व, कपट, अन्याय, देवभोळेपणा इत्यादी दुर्गुणांना फाटा देणे आणि स्वच्छता, सचोटी, गृहकृत्यदक्षता, सद्विवेक, सततोद्योग, सदाचार, श्रमप्रतिष्ठा, भूतदया वगैरे जीवनोपयोगी सद्गुणांची जोपासना करणे हे सत्यधर्माचे मुख्य उद्दिष्ट जोतीरावांनी सांगितले आहे.
फलजोतिषः
फलजोतिष हे शास्त्र आहे किंवा आकाशस्थ ग्रहगोलांच्या परिभ्रमणामुळे मानवमात्रास पीडा संभवते आणि ग्रहशांती केल्यास ती टाळता येते वगैरे कल्पनांवर जोतीरावांचा काडीमात्र विश्वास नव्हता. शेतकऱ्यांच्या घरी पुत्रजन्म होताच ‘सोहोम कोहोम’ नाद करीत कुडमुडे जोशीबुवा पोचतात. कुंडल्या पाहून विद्याहीन मातापित्यांना भयकंपित करतात. ग्रहमीषे मूढांना नागविले जाते. ग्रहपीडानाशासाठी जप-अनुष्ठानादी विधी केलेच पाहिजेत हे मनावर बिंबले म्हणजे हे दरिद्री पालक कर्ज काढून, भांडी कुंडी विकून यथाविधि सारे कर्मकांड करतात. मोठे संकट टळले अशा समाधानात ते असतात, पण त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे बालकाला वेळीच वैद्यकीय उपचार मात्र लाभत नाहीत. ताप येऊन मूल मरते कर्मकांड त्याला वाचवू शकत नाही.
बुवाबाजीः
स्वतःला रामाचे (किंवा बहुतेक वेळा) कृष्णाचे अवतार म्हणून घोषित करून लोकांसमोर येणारे व अंधश्रद्ध भक्तगणांना केवळ पैशाने लुबाडणारेच नव्हेत, तर त्यांच्या बायकांना पळवून संसारांची धूळधाण करणारे तथाकथित साक्षात्कारी बुवा, बाबा, स्वामी, महाराज, संतमहंत किंवा सद्गुरु ही मंडळी अंधश्रद्धा-निर्मूलनवाल्यांच्या रोषपूर्ण निषेधाला नेहमीच बळी पडत आली आहेत. निर्मिकाची भक्ती मानवाने विशुद्ध स्वरूपातच करावी, कोणताही मानवी वा भौतिक रूपाकार कल्पून करता कामा नये, असा आग्रह धरणारे जोतीराव हिंदूंची अवतारकल्पना संपूर्ण त्याज्य ठरवतात. ‘ईश्वराला आपल्या कार्यासाठी मानवरूप धारण करावे लागते’ असे समजणे, त्यांच्या मते, त्याच्या सर्वशक्तिमानपणाला बट्टा लावण्यासारखे होते. त्यामुळे देवादिकांचे अवतार म्हणून मिरवणारे सगळे दांभिक व ढोंगी असतात असा त्यांचा निष्कर्ष आहे.
मिथकांचा विध्वंसः
ज्या मिथकांचा जनमानसावर शेकडो वर्षांपासून पगडा बसलेला असतो आणि ज्यांनी त्यांची अंधश्रद्धा जोपासलेली असते अशी मिथके उद्ध्वस्त करण्याचे कार्य अंधश्रद्धा निर्मूलनकारांना प्रत्येक काळात करावे लागते. परिपाठाने चालत आलेली सत्ता, संपत्ती व विशेषाधिकार यांची समाजातील विषम वाटणी कशी अस्तित्वात आली यांचे ‘ऐतिहासिक’ स्पष्टीकरण आणि ती कशी रास्त व आवश्यक आहे असे तिचे ‘नैतिक’ समर्थन मिथके सदा व सर्वत्र करीत असतात. ज्यांचे हितसंबंध समाजव्यवस्था आहे तशीच टिकून राहण्यात गुंतलेले असतात ते त्या मिथकांना जिवापाड जपत जोपासत असतात. पण ज्यांच्यासाठी समाजपरिवर्तन होणे निकडीचे असते अशांसाठी त्या मिथकांना उलथून फेकणे अगत्याचे ठरते. म्हणून समाजपरिवर्तनाची कास धरणाऱ्या धुरीणांना मिथके जनमनात कायम ठेवून पुढे जाताच येत नाही. त्यांना मिथकविध्वंसन करावेच लागते.
जोतीरावांच्या अंधश्रद्धा-निर्मूलन कार्याचे वेगळेपणः
जोतीरावांनी केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची व्याप्ती व खोली पाहिल्यानंतर त्यांच्या या कार्याची काही ठळक वैशिष्ट्ये अभ्यासकांसमोर येतात. पहिली गोष्ट ही की अंधश्रद्धेला केवळ मनोविकृती समजून केवळ जनसामान्यांचे मनोमालिन्य साफ करण्यातून वा मनोदौर्बल्य दूर करण्यातून अंधश्रद्धांचे निराकरण करता येईल असे जोतीरावांनी कधीच मानले नव्हते. अंधश्रद्धांचे मूळ मनात रुजलेल्या भ्रमांत व गैरसमजुतींमध्ये आहे हे खरे, पण याचा दोष त्या श्रद्धांना बळी पडगाराच्या माथी मारून चालणार नाही, आणि त्यांना मूर्ख, मागास वा वेडगळ ठरवून त्यांच्यावर तोंडसुख घेणे उचित होणार नाही तर त्यांना ज्या व्यवस्थेने अगतिक, अज्ञानी, निरक्षर व दरिद्री ठेवले त्या व्यवस्थेवर प्रहार केला पाहिजे याची त्यांनी सतत जाणीव ठेवली होती.
दुसरे वैशिष्ट्य असे दिसते की अंधश्रद्धा-निर्मूलनाची चळवळ जोतीरावांनी व्यापक सामाजिक-आर्थिक परिवर्तनाच्या चळवळींचा एक भाग म्हणून चालवली होती. समाजपरिवर्तनाच्या गतिशास्त्राचे अचूक भान जोतीरावांच्या अंधश्रद्धा निर्मूलनविषयक प्रयत्नांमधून जाणवते. अंधश्रद्धेपोटी स्त्री-शूद्रातिशूद्र क्रियाशून्य होतात. सामाजिक विषमतांना व विकृतींना नैसर्गिक समजून त्यांच्या निराकरणाचे प्रयत्न न करता जगतात, सर्वांगीण शोषण बिनतक्रार सहन करतात, शास्त्रीय मार्गाचा अवलंब टाळून प्रसंगी आत्मघातही ओढवून घेतात – अशी जी सगळी अरिष्टमालिका निर्माण होते ती लक्षात घेऊन जोतीराव अंधश्रद्धानिर्मूलनाच्या कार्यास हात घालतात.
उपदेश, शिक्षण व पर्यायी आचारविचार एवढ्या गोष्टी देऊनही जर भोवतालची विषम आर्थिक चौकट जशीच्या तशीच राहिली तर अंधश्रद्धांचा कायमचा नायनाट कधीच होणार नाही याचे सतत भान ठेवून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या जोडीलाच दारिद्र्यनिराकरण व शोषणमुक्ती यांच्याही चळवळी सत्यशोधक समाजाच्या वतीने केल्या जात असत हे तिसरे वैशिष्ट्य लक्षात घ्यावे लागेल. त्या चळवळींचा तपशील प्रस्तुत लेखाच्या कक्षेत येत नसल्यामुळे फक्त एवढाच उल्लेख येथे पुरेसा आहे.
वरील विवेचनावरून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कार्यकर्त्यांना आपल्या चळवळीची परंपरा किमान शे-सव्वाशे वर्षे जुनी आहे आणि त्या परंपरेपासून आपणास बरेच काही शिकता येण्यासारखे आहे असे वाटल्यास या लेखनाचे सार्थक होईल.
[तिमिरभेद, संपादक अंजली सोमण, या पुस्तकातून. ]