आगरकर

१९ व्या शतकातील बुद्धिवादी विचार आणि लेखन सतत व प्रभावीपणे करणारे गोपाळ गणेश आगरकर हे एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. केसरीतून ७ वर्षे व ‘सुधारक’मधून ७ वर्षे असा एकूण १४ वर्षे त्यांनी रूढी, आचार, विचार, पोषाख, वैवाहिक जीवन, शिक्षण, व्यापार इत्यादि ऐहिक जीवनाच्या प्रत्येक अंगोपांगावर परखड, सुधारकी लिखाणाचा भडिमार केला. त्याला कुत्सितपणाचा स्पर्श नव्हता. अधिक धारदार लिखाणाला ते मधूनच विनोदाची झालर लावीत. बुद्धिवादाचा पुरस्कार करताना बुद्धीच्या मर्यादेचे त्यांना भान असे. ‘आम्ही ज्या विश्वात आहो याच्या पूर्वी दुसरी विश्वे होऊन गेली असतील किंवा नसतील त्यांविषयी वाद करीत बसण्यात अर्थ नाही, कारण त्या विश्वांचा इतिहास समजण्याची साधने आम्हास अनुकूल नाहीत. तेव्हा आमचा जो वादविवाद व्हावयाचा तो सांप्रत विश्वाविषयी, व विशेषतः तदंतर्गत आपल्या भूगोलाविषयी आणि त्यावरील प्राण्यांत अतिश्रेष्ठ प्राणी जे आपण त्याविषयी व्हावयाचा व व्हावा हे योग्य आहे’. असा इहवादी विचार त्यांनी मांडला. ऐहिक जीवनाची माणसाला लाज वाटणे ही एक विकृत मनोवृत्ती आहे, निवृत्तीवादामुळे आपण जीवनातील आनंद कमी करीत आहोत असे त्यांचे स्पष्ट मत होते. प्रियाराधनापासून पोषाखाच्या बारीक तपशिलापर्यंत आगरकरांनी निबंध लिहिले. सण व खेळ यांचे महत्त्व सांगितले. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात स्वातंत्र्य निर्माण होऊन व्यक्तिजीवन संपन्न होते असे ते आग्रहाने सांगत. जन्माधिष्ठित जातिव्यवस्था व धर्मसंस्था ह्यामुळे व्यक्तिविकास खुंटला आहे अशी सडेतोड मांडणी त्यांनी केली. हिंदूधर्मातील खुळचट आचार व रूढी तसेच स्त्रियांवरील अन्याय ह्यावर त्यांनी केलेल्या तिखट टीकेने पुण्यातील सनातनी खवळले आणि त्यांनी आगरकरांच्या प्रतिमेची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली. प्रवाहपतित, पुरुषार्थ विरहित जीवनाबद्दल लिहिताना त्यांच्या लेखणीला धार चढे. ‘विद्यार्जनाने विकसित झालेली मने स्वतंत्र धंदे स्थापण्याकडे लावाल, तर तुम्हांस अन्नाची अथवा मानाची काय वाण पडणार आहे ?’ ‘मुंबई, मद्रास किंवा कलकत्ता यांच्यासारख्या दहापाच टवटवीत शहरांवरून, किंवा लाख, दोन लाखांत जो एखाद दुसरा सुखवस्तु इसम दृष्टीस पडतो त्यावरून चहुकडे तशीच अबादानी असेल असे अनुमान करणे हा शुद्ध भ्रम होय’ हे त्यांचे विचार आजही डोळ्यांत अंजन घालणारे आहेत.