राष्ट्रसेवादल, बाबा आढाव ह्यांची ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळ आणि अन्य परिवर्तनवादी चळवळीतील सहभागाची पार्श्वभूमी असलेल्या डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांना बी. प्रेमानंदांबरोबर ‘विज्ञान जथा’ मध्ये काम करताना आपल्या जीवनकार्याची दिशा सापडली. त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलना’च्या कामात एक पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून स्वतःला झोकून दिले. श्याम मानव ह्यांच्याबरोबर १९८६ मध्ये ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची एक ट्रस्ट म्हणून स्थापना झाली. दोन, तीन वर्षे एकत्र काम करताना आचार आणि विचारातील तीव्र मतभेद पुढे आल्याने दोघांनी स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला. श्याम मानव यांनी आपल्या मोजक्या साथीदारांबरोबर ‘शांतिवन’ नेरे येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा-निर्मूलन समिती पुनर्गठित केली. मुंबई शहर, धुळे, नागपूर व एकंदर विदर्भ हे समितीचे प्रमुख कार्यक्षेत्र होते. बाबा-बुवांना थेट भिडून, आह्वान देत त्यांची भांडाफोड करण्यात श्याम मानव अग्रेसर असत. पुस्तक-प्रकाशन, व्याख्याने, चमत्कार सादरीकरण इत्यादी उपक्रम जोरात चालत. त्यांच्या भाषणाच्या चित्रफिती चांगल्याच लोकप्रिय आहेत. वर्षातून दोनदा शांतिवन, नेरे येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे नियमित भरत. आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांचे काम चालू आहे. बेगळे झाल्यावर डॉ. दाभोळकरांनी आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर १९८९ मध्ये ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची स्थापना केली. तेव्हापासून सुरू झालेला हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा झंझावात आजही २० वर्षांनी सर्व पातळीवर जोमात चालू आहे. दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. परिवर्तनाच्या चळवळीत जनतेच्या सहभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थिदशेपासून सामाजिक चळवळीत असलेल्या डॉ. दाभोळकरांनी ह्याची योग्य दखल घेतली आहे. आज समितीच्या गोवा, बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात १५० च्या वर शाखा आहेत. समितीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण चळवळ कुठलीही विदेशी अथवा सरकारी आर्थिक मदत न घेता केवळ जनाधारावर चालते. ह्याबाबत लोकमान्य टिळकांच्या वेळच्या ‘पैसा फंड’ उपक्रमाची आठवण होते. औद्योगिक क्षेत्रात नगण्य असलेल्या आपल्या देशात जनतेकडून एक एक पैसा गोळा करून तळेगाव येथे काचेच्या कारखान्याचा औद्योगिक उपक्रम केला होता. जेवणाच्या पंगतीत मांडलेली १ पैसा दक्षिणा पण ‘पैसा फंड’, ‘पैसा फंड’ पुकार करीत गोळा केली जात असे. आज ‘अंनिसचे काम महाराष्ट्रात सर्वदूर पोचले आहे. कुठेही भूत, भानामती, बुवाबाजीच्या घटना झाल्या तर त्वरित ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला जातो. अंधश्रद्धांबाबत ‘अंनिस’ ही एक अघोषित Help line बनली आहे.
जनप्रबोधनाच्या मोहिमा
आपल्या प्रभावी भाषणातून आणि लिखाणातून चळवळीशी जोडून घेण्याचे आवाहन करून डॉ. दाभोलकरांनी महाराष्ट्र अंनिसकडे कार्यकर्त्यांचा ओघ कायम ठेवला आहे. प्रबोधनाच्या सातत्याने चालणाऱ्या मोहिमांमुळे आलेले कार्यकर्ते टिकून राहतात आणि त्यांची जडणघडण पण होते हे समितीने जाणले आहे. ह्या उपक्रमांतील वैविध्यही लक्षणीय आहे.
भूत ह्या गोष्टीबद्दल संपूर्ण कोकणात भरपूर गैरसमज आणि अज्ञान आहे. त्यासाठी ‘शोध भुताचा बोध मनाचा’ ही मोहीम रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून राबविली. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर ह्यांनी मोहिमेचे कल्पक नियोजन केले. त्या निमित्त डॉ. पाटकरांची मानसिक आजारासंबंधी एक पुस्तिका काढण्यात आली. पुस्तिकेची विक्रमी विक्री झाली. डॉ. पाटकरांनी अंधश्रद्धा-निर्मूलन वार्तापत्राच्या विशेष अंकाचे संपादन केले. मोहिमेचे उद्घाटन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे व प्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडूलकर ह्यांनी केले. ‘भूत नाही’ हे दाखविण्यासाठी गावागावातून आह्वाने स्वीकारण्यात आली. १ डिसें. ते १२ डिसें. दरम्यान आयोजित ही मोहीम नियोजित १५० गावांऐवजी एकूण १६३ गावात जाऊन धडकली. बाबरी मशीद विध्वंसापश्चात् देशभर उसळलेल्या आगडोंबाला न जुमानता ही मोहीम कमालीची यशस्वी झाली.
१९९५ मध्ये ‘चमत्कार सत्यशोधन यात्रा’ काढण्यात आली. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी चमत्काराचे आह्वान स्वीकारण्यात आले. त्यायोगे गावागावातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम पोचले. कार्यकर्ते उत्साहित झाले. ‘अंधरूढीच्या बेड्या तोडा’ हा नारा देऊन सभांमधून अंधश्रद्धा नाकारण्याचा संकल्प करण्यात आला.
मराठवाड्यातील परभणी, बीड, लातूर आणि नांदेड ह्या जिल्ह्यांत भानामतीचा मोठा उपद्रव आहे. १९९६ मध्ये प्रसिद्ध अभिनेते निळू फुले व कुलगुरु जनार्दन वाघमारे ह्यांनी ‘भानामती निर्मूलन धडक मोहिमेचे’ उद्घाटन केले. मोहीम २७५ गावांमध्ये नेण्यात आली. भानामतीच्या अनेक प्रकरणांचा यशस्वी उलगडा करण्यात आला. ‘मी अनुभवलेली भानामती’ ह्या विषयावर निबंधस्पर्धा घेण्यात आली. ५० हजार पत्रके वाटण्यात आली.
तरुणवर्गात वैज्ञानिक दृष्टिकोण रुजावा ह्या हेतूने ‘युवा एल्गार’, ‘सत्यशोध प्रजा संकल्प’, ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ असे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले. ह्या विषयीची एक शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत ह्यांची ‘विवेकजागर’ परिषद लातूर येथे घेण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘विवेक वाहिनी’ गट स्थापण्यात येतात. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येते. त्यानंतर प्रशिक्षित शिक्षकवर्ग अंनिस कार्यकर्त्यांसमवेत ‘सत्यशोध प्रज्ञाप्रकल्प’ राबवितात. प्रकल्पांतर्गत वैज्ञानिक दृष्टिकोण, मनाचे आजार, व्यसनमुक्ती व एड्स, लैंगिक शिक्षण इत्यादी विषयांवर आधारित शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतल्या जातात. त्यांना सुरुवातीला पं. लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांच्या सहीचे व अलिकडे प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. वसंत गोवारीकरांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जात असे. ‘स्वयं-अध्ययन’ उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थी वरील विषयांवर आधारित प्रश्नपत्रिका आपले पालक, शिक्षक वा स्नेही ह्याच्या मदतीने सोडवून आणतात. ह्यामुळे व्यापक जनसंपर्क साधता येतो. ह्या विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या सहीचे प्रमाणपत्र दिले जाते.
आतापर्यंत समितीने अनेक बुवाबाबांचा पर्दाफाश केला आहे. महिलांशी गैरवर्तन करणारा कोल्हापूरचा तोडकर महाराज, येशू अंगात संचारला असे नाटक करून औषध म्हणून तेल-पाणी देणारा उमरगा येथील तेलपाणी बाबा, नाशिक येथील फरशीवाले बाबा, साक्षात्कार झाल्याचा दावा करणारा साताऱ्याचा गणू महाराज हे त्यातील काही. २००३ मध्ये ‘बुवाबाजी संघर्ष यात्रे’ची सुरुवात मुंबईहून झाली. चमत्कार करणारे बुवा तसेच अध्यात्मिक बुवा करीत असलेल्या फसवणुकीबद्दल, लैंगिक आणि आर्थिक शोषणाबद्दल जागोजागी आवाज उठवीत ही यात्रा महाराष्ट्रभर फिरली. इचलकरंजी येथे प्रा. पुष्पाताई भावे, मृणाल गोरे व सामाजिक चळवळीतील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ‘बुवाबाजी संघर्ष परिषद’ झाली. उत्कृष्ट स्थानिक नियोजनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम, वैचारिक परिसंवाद, प्रभातफेरी ह्यांनी परिपूर्ण अशी ही परिषद गाजली.
समितीतर्फे वेळोवेळी फलज्योतिषांना आह्वान दिले जाते. अशा आह्वानांना क्वचितच प्रतिसाद मिळतो. ‘दैववादाची होळी’ हा कार्यक्रम सातारा येथे झाला. कार्यकर्त्यांनी आपल्या जन्मकुंडल्या व पंचागातील शुभ-अशुभ मुहूर्ताच्या पानांची जाहीर होळी केली. उत्तर महाराष्ट्रात ‘फलज्योतिष सत्यशोधन परिषद’ भरविण्यात आली. पुणे येथील IUCCA ह्या आंतर्विद्यापीठ खगोलशास्त्र संस्थेच्या सहकार्याने मतिमंद मुले व बुद्धिमान मुले ह्यांच्या जन्मकुंडल्या ओळखण्याची संख्याशास्त्रीय चाचणी घेण्यात आली. ह्यात प्रख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकर ह्यांचा सहभाग होता.
नंदूरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात एखाद्या असहाय्य स्त्रीला डाकीण ठरवून तिचे जिणे मुश्कील करायचे अशी प्रथा आजही आहे. अशा ठिकाणी ‘डाकीण प्रथाविरोधी प्रबोधन मोहीम’ घेण्यात आली. आदिवासी भागात सहा संकल्पमेळावे घेतले. तीन हजार महिला सहभागी झाल्या. पाड्या-पाड्यांवरील संदेशवाहक, अंगणवाडीसेविका, पोलीसपाटील व प्राथमिक शिक्षक ह्यांची प्रबोधन शिबिरे घेऊन तालुका पातळीवर डाकीण प्रथाविरोधी एकत्रित कृतिदलाची स्थापना केली. प्रसारमाध्यमांकडून तसेच प्रशासकीय पातळीवर अनुकूल प्रतिसाद मिळाला. डाकीणबाधित महिलांना आपली व्यथा समाजासमोर मांडण्याची संधी प्रथमच प्राप्त झाली.
डॉ. दाभोळकरांनी अंधश्रद्धा-निर्मूलनाच्या लढ्याची व्याप्ती वाढविली. वर्ण-जात-धर्म-लिंग समानता, व्यसनमुक्ती, अहिंसेचे पालन, अल्पसंख्य स्त्रियांचे शिक्षण, संविधान बांधिलकी, पर्यावरण रक्षण अशी बहुआयामी परिमाणे देऊन त्यांनी विवेकवादी चळवळीला व्यापक समाजपरिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेतले. मुस्लिम समाजातील शिकलेल्या स्त्रियांना व्यासपीठावर बोलते करून त्यांचा सत्कार करणे, सत्यशोधकी विवाह (सुटसुटीत अल्पखर्चिक) साजरे करणे, आंतरजातीय विवाह परिषद आयोजित करणे, ३१ डिसेंबरला ‘हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, नाही खाणार गुटखा नाही पिणार बिअर’ अशी चपखल घोषणा देत मशालयात्रा काढून नववर्षाचे स्वागत करणे, प्रजासत्ताक दिनाला ज्येष्ठ दलित स्त्रीच्या हस्ते ध्वजारोहण करून घटनेतील मार्गदर्शक तत्त्वे विशद करण्यासाठी सभा घेणे, संविधानाची मान-सन्मानाने मिरवणूक काढणे. २१ सप्टेंबर १९९५ ला सर्वत्र ‘गणपती दूध प्यायला’ म्हणून तो दिवस ‘चमत्कार सत्यशोधन दिन’ म्हणून साजरा करणे, पर्यावरणाशी सुसंगत म्हणून ‘विसर्जित गणपती दान करा’, ‘एक गाव एक गणपती’, ‘निर्माल्यापासून खत’, ‘फटाके-मुक्त दिवाळी’, ‘होळी लहान करणे’ आणि अशा रीतीने वाचवलेल्या गोवऱ्या स्मशानात देणे, ‘पुरणपोळ्या होळीत जाळण्याऐवजी गरीब वस्तीत वाटणे’, ‘एकही साप मारणार नाही, एकासही सर्पदंशाने मरू देणार नाही’ असे घोषवाक्य घेऊन गावागावातून सर्पयात्रा काढणे अशा अनेक अभिनव उपक्रमांतून, जनचळवळीतून महाराष्ट्र अंधश्रद्धा-निर्मूलन समितीने सामाजिक चळवळीचा एक उच्चांक गाठला आहे.
अंनिसच्या कार्यप्रणालीची काही वैशिष्ट्ये नोंद घेण्यासारखी आहेत. त्यांच्या प्रत्येक उपक्रमात साहित्य, समाजसेवा, विज्ञान व शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींना कुठल्या न कुठल्या त-हेने सामाईक केले जाते. डॉ. दाभोलकरांचा हा लोकसंग्रह व्यापक आहे. त्यातील काही व्यक्ती, ज्यांची आपल्या वैयक्तिक जीवनातही विवेकवादावर दृढनिष्ठा आहे, तर जणू चळवळीचे कार्यकर्तेच बनले आहेत. चळवळ पुढे नेण्यासाठी अंनिसला वेगळ्या इीरपव आलसीरवी ची गरज नाही. मेधा पाटकर, मृणाल गोरे, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, न्या.जहागिरदार, निळू फुले, डॉ.श्रीराम लागू, विजय तेंडूलकर, मंगेश पाडगावकर, सुभाष भेण्डे, जयंत नारळीकर, अच्युत गोडबोले ही त्यातील काही नावे.
समितीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे संघटनेमध्ये काटेकोर संरचना करणे अथवा स्थावर मालमत्ता (जसे की कार्यालयाला जागा वगैरे) ह्यावर भर दिला जात नाही. त्याचे तोटे तसेच फायदे संभवतात. अनेक संस्थांमध्ये संघटनेची संरचना आणि मालमत्तेची वृद्धी तसेच रक्षण हेच मुख्य कार्य बनून मूळ उद्दिष्ट मागे पडल्याचे आपल्याला दिसून येते. काही वेळा संघटनेच्या सैल, विस्कळीत पकडीमुळे कार्यकर्त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो.
समितीचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे समितीची देवधर्मासंबंधीची भूमिका. सर्व बुद्धिवादी चळवळी निरीश्वरवादी असतात. समितीचे आगळेपण म्हणजे समितीची देवधर्माबाबतची तटस्थ भूमिका. ही भूमिका भारताच्या घटनेत दिलेल्या धर्मविषयक बाबींशी सुसंगत आहे. घटनेप्रमाणे प्रत्येक नागरिकाला उपासनेचे आणि आपले पारलौकिक कल्याण साधण्याचे स्वातंत्र्य आहे.
व्यक्तीचे हे धर्मोपासनेचे स्वातंत्र्य तोवर अबाधित राहते, जोवर ते इतर नागरी नियमांचे उल्लंघन करीत नाही. ही भूमिका मान्य करून व्यक्तिविकास व समाजविकास साधण्यासाठी धार्मिक रूढी, प्रथा परंपरा ह्यांची बदलत्या कालानुसार विधायक चिकित्सा करून त्यानुसार कृती करणे ही अंनिसची ह्याबाबतची धारणा आहे. त्याप्रमाणे शनी शिंगणापूर येथील शनिमंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळविण्यासाठी समितीने आंदोलन केले. यात्रांमध्ये होणारी पशुहत्या टाळण्यासाठी शेकडो ठिकाणी सत्याग्रही संघर्ष केले. आपली देवधर्मासंबंधीची भूमिका लोकांपर्यंत पोचविण्यासाठी डॉ. दाभोलकर आणि डॉ. श्रीराम लागू ह्यांनी ‘विवेक जागर’ नावाचे वादसंवादाचे शंभरावर कार्यक्रम केले. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातून हे वादसंवाद खूपच गाजले. ईश्वर आणि ईश्वरप्रणीत धर्म हेच सर्व अंधश्रद्धांचे मूळ आहे असे प्रतिपादन करून अशा ‘ईश्वराला रिटायर करा’ असे सनसनाटी आवाहन डॉ. लागू करीत. तर डॉ. दाभोलकर वर उल्लेखिलेली समितीची भूमिका विस्ताराने मांडत. विश्व नियंत्रित करणारा, चमत्कार करणारा, नवसाला पावणारा परमेश्वर समितीला मान्य नाही. परंतु स्वतःचे आनंदनिधान म्हणून परमेश्वराकडे बघणाऱ्या अथवा मानसिक आधारासाठी परमेश्वराला जवळ करणाऱ्या माणसाला सहानुभूतीने समजून घेणे समितीला आवश्यक वाटते. आणि नीतिमान वर्तनातच परमेश्वराला पाहणाऱ्यांचा समिती आदर करते. ही भूमिका मान्य होण्यास अडचण येत नाही. परंतु समितीतील अनेक कार्यकर्त्यांना जनचळवळीच्या कलाने जाण्यासाठी घेतलेली ही सौम्य भूमिका म्हणजे एक अनावश्यक तडजोड वाटते.