नवस, चमत्कार, मांत्रिक-तांत्रिक, ज्योतिषविद्या, वेगवेगळ्या प्रकारचे स्वामी-महाराज, या अंधश्रद्धांच्या परिचित प्रकारांपलिकडे इतरही अनेक प्रकार आहेत. या प्रकारातल्या ‘अंधश्रद्धा’ समाजातील प्रचलित चालीरीती, रूढीपरंपरा, धार्मिक कर्मकांडे, यांच्याशी संबंधित नसतात. त्यांचा उगम तुलनेने अलिकडच्या काळात झालेला असतो. त्यातील अनेक समजुतींना ‘अंधश्रद्धा’ मानायला शिक्षित समाजही पटकन तयार होत नाही. या ‘आधुनिक’ अंधश्रद्धा कधी नवीन दंतकथांच्या स्वरूपात समोर येतात. तर कधी त्या मिथ्याविज्ञानाच्या बुरख्याआड दडलेल्या असतात. कधी त्या विशिष्ट उत्पादक-विक्रेत्यांनी पसरवलेल्या असतात, तर कधी, टीव्ही, इंटरनेट अशा आधुनिक प्रसारमाध्यमांद्वारे त्या पसरतात. विचारप्रणाली (ideology) म्हणजे एक ‘दृष्टिकोण’ असतो, ‘सत्य’ नव्हे, याचे भान सुटल्यामुळेही अनेक अंधश्रद्धा तयार होतात.
प्रसारमाध्यमांतील लेख, बातम्या, फीचर्स यातून पसरलेल्या अनेक समजुती समाज फारशी शहानिशा न करता ग्राह्य धरत असतो. मोबाइल फोनची संख्या वाढल्यामुळे मुंबई शहरातील चिमण्यांची संख्या कमी झाली आहे, इथपासून ते पेट्रोलपंपावर मोबाइल फोन वापरला तर स्फोट होऊ शकतो, इथपर्यंत अशा समजुतींची अनेक उदाहरणे देता येतील. यांपैकी अनेक समजुती भ्रामक असतात. तर अनेकांमागील कारणमीमांसा, तार्किकता निर्विवादपणे सिद्ध झालेली नसते. तरीही या समजुतींना सत्य मानून चालणाऱ्यांची संख्या फार मोठी असते. आणि त्यांच्यामध्ये सुविद्य, स्वतःला आधुनिक म्हणवणाऱ्यांची संख्याही बरीच असते.
उत्पादक-विक्रेत्यांच्या व्यापारी हितसंबंधांतून काही वर्षांपूर्वी ‘जपान लाईफ’ नावाचे एक मायाजाल पसरवले गेले होते. यात फसल्यामुळे जबर आर्थिक नुकसान सोसाव्या लागलेल्या व्यक्ती आपल्या आजूबाजूलाही सापडतील. या जपान लाईफचे प्रमुख उत्पादन म्हणजे चुंबकीय गादी. या गादीची किंमत रु.८५,००० ते रु.१,००,००० इतकी सांगितली जात असे. या गादीचे चुंबकीय गुण, अॅक्युप्रेशरची वैशिष्ट्ये, यामुळे तिला वैद्यकीय उत्पादन म्हणून बाजारात आणले गेले होते. पण खरी मेख त्या कंपनीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये होती. अत्याधुनिक कार्यालये, त्यात समूहाने आणि व्यक्तिगत प्रेझेंटेशन करणे, दृक्श्राव्य माध्यमातून गादीचे गुण सांगणे, या सगळ्यांतून मिळणाऱ्या गि-हाइकाला आणखी आमिष दाखवले जात असे. अशीच गादी आणखी काही जणांना विकली तर नफ्यातील टक्केवारी, त्याहून जास्त विक्री केली तर कंपनीत पार्टनरशिप अशी ती आमिषे. त्यांना भुलून कितीच व्यक्तींनी अगदी आपली बचत पणाला लावून ही गादी विकत घेतल्याची उदाहरणे आहेत. त्यानंतर स्वत: विक्रेते बनलेल्या या ‘गि-हाईकां’पैकी काही जणांना कोरियात नेऊन मार्केटिंगचे प्रशिक्षणही दिले गेले होते. पुढे मात्र ही मंडळी नफ्यातील टक्केवारी मिळत नाही, गाद्या मिळाल्या नाही म्हणून नवी गि-हाइके तगादा लावतात, अशा दुष्टचक्रात अडकली. त्यांच्यापैकी अनेक जण अक्षरशः बुडाले. कंपनीने मात्र भरपूर कमाई केली. २००२ च्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जयपाल रेड्डी यांनी त्यांच्या स्वतःच्या नलगोंडा मतदारसंघात जपान लाईफ कंपनीने एक कोटी रुपयांचा गल्ला जमा केल्याची, तर संपूर्ण आंध्रप्रदेश राज्यातून १०० कोटींवर कमावल्याची माहिती दिली होती. हे उत्पादन विकणाऱ्या फ्रंटियर ट्रेडिंग या कंपनीने ही गादी ‘औषधे’ या सदराखाली आयात करून कोट्यवधी रुपयांची कस्टम ड्यूटी चुकविल्याची माहितीही पुढे सीएनबीसी टीव्ही १८ ने केलेल्या एका फीचरमध्ये बाहेर आली. सहज, सुलभ उपायाने एरव्ही दुर्धर मानलेले रोगही बरे होऊ शकतात असे सांगितले, तर रोगाने त्रस्त व्यक्ती किंवा त्याचे जवळचे इष्टमित्र असे ‘प्रयोग’ करून पाहायला सहज तयार होतात. या मनोवृत्तीचा जपान लाईफसारख्या वस्तूंचे उत्पादक-विक्रेते पुरेपूर फायदा करून घेतात. पौर्णिमेच्या रात्री एका माशातून दिलेले औषध घेऊन दमा बरा होतो अशा जाहिराती करून दर पौर्णिमेला शेकडो लोकांना मासे गिळायला लावणारे वैदू म्हणजे जपान लाईफच्या लहान आवृत्त्या.
दंतकथा या पिढ्यान्पिढ्या चालत असतात. त्यांचे मनोरंजनमूल्य हे त्यांचे वैशिष्ट्यच. गेल्या साठ-सत्तर वर्षांत पसरलेल्या काही दंतकथांमध्येही असे मनोरंजनमूल्य आहे. त्याशिवाय कित्येक जण या कथांना सत्य मानत असतात. असा सर्वपरिचित दंतकथांपैकी एक म्हणजे बर्म्युडा त्रिकोण. ही दंतकथा साधारण विसाव्या शतकाच्या मध्यापासून चालत आलेली आहे. १९४५ मध्ये अमेरिकन नौदलाचा एक प्रशिक्षक आणि पाच शिकाऊ पायलट या भागात विमानांसकट गायब झाले. तेव्हापासून ही दंतकथा हळूहळू पसरत गेली. त्या सहापैकी फक्त प्रशिक्षकाच्याच विमानात दिशादर्शक यंत्रणा होती, इतर पाच विमानांमध्ये नव्हती. तर्कसंगत स्पष्टीकरण द्यायचे, तर प्रशिक्षकाच्या विमानातील दिशादर्शक यंत्रणा नादुरुस्त झाली असावी, त्यामुळे सर्वच विमाने भरकटली असावीत आणि एकाक्षणी इंधन संपल्यामुळे कुठेतरी कोसळून बुडून गेली असावीत, असे म्हणता येते. पण या घटनेभोवती गूढतेचे वलय निर्माण झाले. त्यानंतरच्या कालात अटलांटिक महासागरातील मायामी, बर्म्युडा आणि प्योर्टो रिको दरम्यानच्या या तथाकथित त्रिकोणाच्या भोवती गूढरम्य कथा पसरत गेल्या. या भागातून जहाजे आणि विमाने अचानक गायब होतात, अशा स्वरूपाच्या त्या कथा आहेत. या भागात घडलेल्या घटनांची मोजदाद करण्याचा उद्योगही काही जणांनी केला आहे. कोणता काळ आणि प्रदेशाची किती व्याप्ती यावरून वेगवेगळे आकडे दिले गेले आहेत. पाचशे वर्षांचा काळ धरला तर २०० ते १००० घटना घडल्याचे दावे करण्यात आले आहेत. या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, तिथल्या हवामानाची परिस्थिती हे लक्षात घेतले तर पाचशे वर्षांत हजार घटना हे काही अनैसर्गिकरीत्या मोठे प्रमाण नाही, हे सहज लक्षात येईल. या परिसरात वारंवार येणारी विविध प्रकारची वादळे, सुनामी, भूकंप, उंच उसळणाऱ्या लाटा, यांपैकी कोणत्याही कारणामुळे जहाजे आणि विमाने अपघातग्रस्त होऊ शकतात. या दंतकथांमधील काही जहाजे चाचेगिरीचीही बळी ठरलेली असू शकतात. तर कधी दिशादर्शक यंत्रणा अथवा ती वापरणाऱ्यांच्या मानवी चुकांमुळेही अपघात घडलेले असू शकतात. मात्र ही सगळी तर्कसंगत कारणे दूर राहून बर्म्युडा त्रिकोणाच्या दंतकथांमध्ये परग्रहावरील सजीवांच्या कारवाया, गुरुत्वाकर्षणविरोधी यंत्रे, तत्सम ‘विक्षिप्त’ तंत्रज्ञान आणि ते वापरणारे ‘गूढ कुणीतरी’, अशा कथा प्रसृत झाल्या. बर्म्युडा त्रिकोणावर पुस्तके लिहून जगातील विविध भाषांतील अनेक लेखकांनी एकेकाळी बक्कळ पैसा कमावला. लॅरी कुशे यांनी या साहित्याचा अभ्यास केला तेव्हा त्यांना असे आढळले, की बहुतेक लेखकांनी या विषयावर स्वतंत्रपणे संशोधन, अभ्यास केला नव्हताच. आधीच्या लेखकांच्या अशाच, बह्वशी निराधार, लेखनाचा आधार घेऊन पुढचे लिखाण केले गेले होते.
नवीन दंतकथांचे आणखी एक उदाहरण म्हणजे ‘परग्रहावरून’ आलेल्या उडत्या तबकड्या किंवा याने किंवा सजीव यांच्याविषयीच्या विविध कहाण्या. अशा तबकड्या किंवा सजीव बघितल्याचे दावे अजूनही अधूनमधून केले जात असतात. वारंवारतेच्या सिद्धान्तानुसार अवकाशात सूर्यासारख्या हजारो ग्रहमाला आणि त्यात पृथ्वीसारखे ग्रह असण्याची शक्यता निश्चितपणे आहे. अशा ग्रहांवर सजीवांची निर्मिती झाली असण्याची सांख्यिकी शक्यताही भरपूर आहे. मात्र हे सजीव किंवा त्यांच्या कोणत्या वस्तू आपल्यापर्यंत पोचण्याची शक्यता मात्र अगदीच नगण्य आहे. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर ५०० प्रकाशसेकंद इतके आहे. सूर्यानंतरचा सर्वांत जवळचा तारा प्रॉम्झिमा सेंटॉरी पृथ्वीपासून ४ प्रकाशवर्षे दूर आहे. म्हणजे २७ ट्रिलियन (२७,०००,०००,०००,०००) मैल. ताशी १ मिलियन (१,०००,०००) मैल वेगाने गेले तरी हे अंतर कापायला २७०० वर्षे लागतील. सध्याचे सर्वांत वेगवान अवकाशयान व्हॉयेजर हे ताशी ४०,००० मैल वेगाने जाऊ शकते. त्यातून अल्फा सेंटॉरीवर जायला ७०,००० वर्षे लागतील. या आकडेवारीवरून अवकाशाच्या एका भागातील सजीव दुसऱ्या भागातील सजीवांपर्यंत पोचण्याची गणिती शक्यता जवळपास नाहीच,
असे म्हणता येते. तरीही उडत्या तबकड्यांच्या किंवा परग्रहावरील सजीवांच्या बातम्या अजूनही येतच असतात. उडत्या तबकड्या, परग्रहावरचे सजीव, बर्म्युडा त्रिकोण, अशा दंतकथांच्या बाबतीत तार्किक स्पष्टीकरण देऊन विचारी व्यक्तींना त्याविषयी किमान दुसऱ्या बाजूने विचार करण्यास उद्युक्त करता येते. परंतु ज्यांच्या ‘वैज्ञानिकतेबद्दल’ आणि म्हणून ‘सत्यतेबद्दल’ शंका घेणे भल्याभल्यांनाही जड जाते असा आधुनिक अंधश्रद्धेचा आणखी एक प्रकार म्हणजे मिथ्याविज्ञान (शिर्शीवीलळशपलश). वैज्ञानिकतेच्या आभासात्मक वेष्टनात गुंडाळून मांडलेले तथाकथित ज्ञान म्हणजे मिथ्याविज्ञान असे म्हणता येईल. ज्योतिषविद्या, परामानसशास्त्र, ही मिथ्याविज्ञानाची सर्वपरिचित उदाहरणे. विज्ञान आणि मिथ्याविज्ञान यांमधील सीमारेषा तशी धूसर आहे. मिथ्याविज्ञानात वैज्ञानिक भाषेचा, संख्याशास्त्राचा वापर केलेला असतो. त्यामुळे ते विज्ञान आहे असा समज होतो. परंतु काही लक्षणांवरून विज्ञान आणि मिथ्याविज्ञान यांतील फरक स्पष्ट करता येऊ शकतो. वैज्ञानिक पद्धतीमध्ये जी व्यक्ती एखादा सिद्धान्त मांडते, तिच्यावरच तो सिद्ध करायची, त्यासाठी पुरावे देण्याची जबाबदारी असते. मिथ्याविज्ञानात मात्र सिद्धान्ताला आह्वान देणाऱ्या व्यक्तीवर आपले आह्वान सिद्ध करण्याची जबाबदारी टाकली जाते. वैज्ञानिक परिभाषेत याला ठशीशीीरश्रष लीीवशप ष ष असे म्हणतात. विज्ञानामध्ये जे सिद्धान्त मांडले जातात, त्याची कोणाही इतर व्यक्तीला पडताळणी करता येते. मिथ्याविज्ञानात मात्र अनुभूती, प्रत्यय, अशा गोष्टींवर भर असतो, आणि तिसऱ्या व्यक्तीला त्याची पडताळणी करून पाहणे शक्य नसते. याशिवाय पडताळणीसाठी प्लॅसेबो, डबल ब्लाइंड अशा तंत्रांचा वापरही मिथ्याविज्ञानात करता येत नाही. मिथ्याविज्ञानामध्ये नेमके आणि स्पष्ट सिद्धान्त किंवा तत्त्वे मांडली जात नाहीत. तर अतिशय ढोबळ अशी विधाने केली जातात. गृहीतके कमीत कमी ठेवून सिद्धान्त सिद्ध करता आला पाहिजे, याचेही पालन मिथ्याविज्ञानात होत नाही. इतके सारे असूनही मिथ्याविज्ञानावरील विश्वास मोठ्या प्रमाणात समाजात अस्तित्वात आहे. मारिओ बुंगे (पसश) या लीळल वैज्ञानिकाने एका सर्वेचा हवाला देऊन सांगितले आहे की १९८८ मध्ये उत्क्रान्तिवादावर विश्वास नसणाऱ्या अमेरिकनांची संख्या ५०% होती, तर ८८% अमेरिकनांना ज्योतिष हे विज्ञान आहे असे वाटत होते. (अमेरिकेतील नॅशनल सायन्स फौंडेशनच्या एका सर्वेनुसार १९९० मध्ये मिथ्याविज्ञानांवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या बरीच मोठी होती. २००१ मध्ये ती सर्वोच्च होती.) अलिकडे वास्तुशास्त्र या नावाचे असेच एक मिथ्याविज्ञान बोकाळलेले आहे. ‘आग्नेय दिशा अग्नीची, म्हणून स्वयंपाकघर आग्नेयेकडे असले पाहिजे’ अशांसारख्या वैज्ञानिकतेचा आव आणणाऱ्या अवैज्ञानिक दाव्यांवर ते आधारलेले आहे. आकडेशास्त्र (पीशीश्रेसू), फंगशुई, ही आणखी काही उदाहरणे.
आधुनिक अंधश्रद्धांचा आणखी एक प्रकार म्हणजे विचारप्रणाली (ideology) वरील ‘श्रद्धा’. एखाद्या ‘इझम’ (ism) वरील श्रद्धा आणि एखाद्या धर्मावरील श्रद्धा यात फारसा फरक नसतो. अशी श्रद्धा बाळगल्यामुळे विज्ञानातील तथ्ये नाकारण्याची चूक अनेकांच्या हातून होते. “सायन्स : गुड, बॅड, अॅण्ड अग्ली” या पुस्तकात संकलित केलेल्या लेखांमध्ये मार्टिन गार्डनर या प्रख्यात लेखकाने याविषयी काही मनोरंजक माहिती दिली आहे. त्यातली एक कहाणी स्टालिनच्या सोविएत युनियनमधली आहे. मार्क्सवादाला ‘शास्त्रीय समाजवाद’ (scientific socialism) असे म्हणतात. या शास्त्रीय समाजवादाचा वशींशीळपळी वर विश्वास आहे. भौतिकशास्त्रामध्ये अणुविषयी नवनवे संशोधन होत गेले, तशी इलेक्ट्रॉनविषयी अधिकाधिक माहिती मिळत गेली. ही माहिती विज्ञानाच्या तत्कालीन प्रचलित तत्त्वांमध्ये बसणारी नव्हती. इलेक्ट्रॉन व संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांपैकी हाइझेनबर्ग या वैज्ञानिकाने इलेक्ट्रॉनच्या रिपवोपीी चे स्पष्टीकरण देणारा principle of uncertainty हा सिद्धान्त मांडला. तर इलेक्ट्रॉन हा particle आहे की रींश आहे हे कोडे, ‘तो दोन्ही आहे’ असे सांगून सोडवणारा Principle of complementarity हा सिद्धान्त नील्स बोर या वैज्ञानिकाने मांडला. रशियातील जुन्या पिढीतील वैज्ञानिकांना हाइझेनबर्ग आणि बोरचे सिद्धान्त मान्य करण्यात काहीच अडचण नव्हती. पण क्रान्तीच्या, मार्क्सवादाच्या आणि वशींशीळपळीच्या श्रद्धेवर पोसल्या गेलेल्या नव्या पिढीतील सोविएत वैज्ञानिकांना मात्र ते सिद्धान्त मान्य झाले नाहीत. इलेक्ट्रॉनचे ‘गूढ’ रूप वस्तुस्थिती म्हणून मान्य होण्यात त्यांची विचारप्रणालीवरची श्रद्धा आड आली. सोविएत वैज्ञानिक संस्थांमध्ये अशाच वैज्ञानिकांचे महत्त्व वाढत गेले. भौतिकीप्रमाणेच जनुकशास्त्रातील नवे संशोधनही या ‘मार्क्सवादी वैज्ञानिकांनी’ नाकारले. लायसेन्को या सोविएत वैज्ञानिकाने उत्क्रान्तिवादातील प^ीरथ श्रुरचे तत्त्व अमान्य केले. सोविएत जनुकशास्त्रीय संशोधनावर लायसेन्कोचा प्रभाव पुष्कळ काळ राहिला. गमतीचा भाग म्हणजे, स्टालिनच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी सोविएत वैज्ञानिकांनी आपली चूक सुधारली. आणि त्यानंतर हाइझेनबर्ग आणि बोरच्या सिद्धान्तांना सोविएत भौतिकीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. कॅथलिक ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांनी डार्विनचा उत्क्रान्तिवाद नाकारणे, अशा मंडळींनी लीशरींळेपळी चा पुरस्कार करणे; यापेक्षा स्टालिनच्या सोविएत युनियनमधील श्रद्धाळू मार्क्सवादी वैज्ञानिकांच्या वरील गोष्टी फारशा वेगळ्या नाहीत.
मिथ्याविज्ञान आणि विचारप्रणाली या दोन्ही वर्गात बसू शकेल अशी एक जबरदस्त आधुनिक अंधश्रद्धा म्हणजे ‘पर्यावरणवाद’. पृथ्वी हा ग्रह अस्तित्वात आल्यापासून इथल्या पर्यावरणात, हवामानात सातत्याने बदल होतच आहेत. हवामानविषयक नोंदी ठेवण्याची पद्धत गेल्या दीडशे वर्षातली आहे. पर्यावरणाविषयीचा प्रमुख प्रश्न असा आहे, की गेल्या दीडशे वर्षांत हवामानात जे झाले, ते पूर्वीपेक्षा अधिक वेगाने, अधिक तीव्रतेने झाले का; आणि या बदलात नैसर्गिक प्रक्रियेचा भाग किती आणि मानवी हस्तक्षेपाचा भाग किती. उपलब्ध आकडेवारीवरून आणि इतरही अनेक प्रकारच्या पुराव्यांवरून गेल्या काही वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे हवामानबदलाचा वेग आणि तीव्रता वाढली आहे, असे ठामपणे मुळीच म्हणता येत नाही. तरीही तसे दावे केले जातात, त्यासाठी भरमसाठ आकडेवारी दिली जाते. हा मिथ्याविज्ञानाचाच एक प्रकार आहे. या दाव्यांनाच तथ्य मानून त्या अनुषंगाने देशोदेशींच्या सरकारांची धोरणे ठरावीत, अगदी मानवी जीवनशैलीतही बदल करावेत, ही पर्यावरणवादाची विचारसरणी आहे. पर्यावरणवादाचे जागतिक पातळीवरील राजकारणही आहे. क्योटो प्रोटोकॉल, २००७ मध्ये बालीमध्ये झालेली तसेच २००९ मध्ये कोपनहेगमध्ये भरलेली आंतरराष्ट्रीय परिषद, हे सर्व पर्यावरणवादाचे राजकारण आहे. सुनामीपासून वादळांपर्यंत, भूकंपापासून अतिवृष्टीपर्यंत, अतिउन्हाळ्यापासून अतिहिवाळा, दुष्काळापर्यंत सर्व घटनांचे खापर हवामानबदलावर फोडणे ही पर्यावरणीय अंधश्रद्धा आहे. (सामान्यांच्या पर्यावरणीय अंधक्षद्धांचा गैरफायदा घेत पर्यावरणाचे जागतिक राजकारण चालू आहे.) अपुया, पडताळणी न केलेल्या, ठोस पुराव्यांचा भक्कम आधार नसलेल्या माहितीच्या आधारे जागतिक धोरणे ठरवण्याचे दुष्परिणाम नुकतेच आयपीसीसीच्या (Intergovernmental Panel on Climate Change) अहवालातील गंभीर त्रुटी आणि चुका जगासमोर आल्याने स्वच्छ दिसू लागले आहेतच.
वर उल्लेखिलेल्या आणि त्याप्रकारच्या इतरही दंतकथा, मिथ्याविज्ञान, विचारप्रणाली, वगैरेंना रूढ अर्थाने ‘अंधश्रद्धा’ म्हणायचे की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकेल. या सर्व गोष्टी तर्कविसंगत आणि अवैज्ञानिक आहेत, हे मात्र खरे. विवेकवादाचे काम हेच आहे, की वरवर तार्किक वाटणाऱ्या दाव्यांमधील अतार्किकता आणि विसंगती शोधून काढणे. आसुच्या प्रस्तुत विशेषांकामध्ये अशा ‘अंधश्रद्धांचा’ समावेश करण्याचा हेतू हाच आहे.