भूत

आजचा सुधारकचा वाचक भुतां-खेतांवर विश्वास ठेवत असेल असे कुणी म्हणणार नाही. भूत का नाही? त्याच्या संदर्भातील गोष्टी किंवा घटना कश्या बनावट आहेत ? याची चर्चा करण्याचा प्रश्नही येथे उद्भवत नाही. परंतु ‘भूत’ हा विषय जितक्या गांभीर्याने घ्यायला पाहिजे तितका तो गांभीर्याने घेतला जात नाही हेही तितकेच खरे. त्यामुळे ‘भूत’ म्हणजे पडक्या वाड्यात राहते, स्मशानात राहते अशा प्रकारची अंधश्रद्धा इतपतच माहिती सुशिक्षित समाज बाळगतो. फार फार तर लहान मुलांना घाबरवण्यासाठी ‘भूत’ ही कल्पना वापरली जाते. त्यामुळे भुताबद्दल बोलले की बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की तुम्ही ‘आहट’ वगैरे मालिकांविरुद्ध मोहीम सुरू करा. त्यामुळेच अंधश्रद्धा वाढतात. जणू काही ‘आहट’सारख्या मालिकांमधून भुतांच्या कथा दाखवतात म्हणून लोकांचा भुतांवर विश्वास आहे अशी प्रश्नकर्त्यांची समजूत असते. परंतु जेव्हा एखादी कल्पना किंवा भीती सार्वत्रिक असते, तेव्हा त्याची कारणे अशी वरवरची नसावीत. भुताच्या कल्पनेत फरक पडत असला तरी मरणोत्तर जीवनाचे अस्तित्व आणि त्याचा जिवंत माणसाला असलेला धोका या दोन मूळ कल्पना धर्म, देश यांच्या सीमा ओळखत नाही. तसे पाहायला गेले तर धर्माच्या काटेकोर चौकटीत ‘भुतां’चा समावेश अशक्य म्हणायला हवा. कारण हिंदू धर्माच्या रिवाजानुसार किंवा मान्यतेनुसार प्रत्येक व्यक्तींचे पाप-पुण्य याचा फैसला पुनर्जन्म होऊन दुसऱ्या जन्मात होणे भाग आहे. त्यामुळे मरणानंतर आत्म्याने ताबडतोबीने किंवा बारा दिवसानंतर दुसरे शरीर धारण करायला हवे. ख्रिस्ती माणसाचे सर्व पापकर्म येशूने आधीच शिक्षा भोगल्यामुळे त्यानेही पृथ्वीतलावर रेंगाळणे चूक ठरते आणि मुस्लिम धर्मीयांचे आत्मे कयामत का दिन येईपर्यंत कबरीमध्ये विश्रांती घेणे अपेक्षित आहे. असे असतानाही सर्व धर्मांमध्ये मरणोत्तर भूत बनण्याची प्रक्रिया आहे. अगदी अब्राहम लिंकन सारख्या व्यक्तीलादेखील भूत बनून भटकावे लागते. धर्माचा पगडा जबरदस्त असतानाही भुताची कल्पना प्रचलित असण्यामागे काहीतरी थेट अनुभवाचा प्रत्यय आणि तोही बहुतेक सर्वांना असायला हवा. भुताचा भास फक्त त्याला घाबरणाऱ्या किंवा भुतावर विश्वास ठेवणाऱ्यालाच होतो असे माझे मत होते परंतु गेल्या वर्षी मी स्वतःच याचा अनुभव घेतला. (अर्थात त्यामुळे ‘भूत’ खरोखरच अस्तित्वात असते असे काही मी सांगणार नाही) परंतु त्यामुळे या कल्पनेकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला याची कबुली द्यायला हरकत नाही.
त्या मागची हकीकत अशी की आमच्या सोबत काम करत असणारा कर्मचारी अचानक मृत्यू पावला. एका विशिष्ट ठिकाणी बसून येणाऱ्या-जाणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांवर गंमतीशीर शेरे करण्याची त्याची सवय आमच्या अंगवळणी पडली होती. याच कारणामुळे का होईना पण दोन-तीन वेळा तेथून जाताना तो तिथेच आहे आणि आपल्याला हाक मारतो असा भास मलादेखील झाला. असा भास भीतीपेक्षा सवयीचा परिणाम आहे हेही त्यातून लक्षात आले. ज्यांच्या मनात आधीच भुताची कल्पना ठाम मांडून आहे त्यांच्यासाठी हा भास म्हणजे त्याचा न मागता मिळालेला पुरावाच आहे. असे पुरावे आपण ठरवून केलेल्या प्रयोगापेक्षा जास्त ठसतात हेही तितकेच खरे. परंतु भुताची सांगड भीतीशीच का घातली जाते? आपला मित्र भूत झाल्यावर त्रास देण्याची शक्यता जास्त आहे असे का वाटावे याचे उत्तर काही उत्क्रांतिवाद्यांकडे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भीतीची भावना जीवन टिकून राहण्यामागे जास्त फायदेशीर ठरते. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रत्यक्षात साप असताना तो नाही असे वाटणे या भ्रमात असलेली व्यक्ती सर्पदंशाला आमंत्रण देऊ शकेल परंतु याच्या उलट म्हणजे साप नसताना साप असल्याची भीती त्या मानाने तोट्याची ठरत नाही. त्यामुळे विषाची परीक्षा घेण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. परंतु एवढेच कारण भुताच्या सार्वत्रिक भीतीमागे आहे असे मानणे म्हणजे सोप्या-सोप्या उत्तरांची अपेक्षा करण्यासारखे आहे. इंग्रजी चित्रपटांतून (आणि त्यांची नक्कल करणाऱ्या आपल्या हिंदी चित्रपटांमधूनदेखील) नेहमीचे दिसणारे ट्रॅक्यूला किंवा व्हॅम्पायर नावाचे भूत ! भुताच्या कल्पनेमागील कहाणी एका स्पेनच्या डॉक्टरने उलगडून दाखवली. ट्रॅक्यूलावर आधारित चित्रपट पाहताना स्पेनचे मेंदूविकारतज्ज्ञ जुआन गोमेझ अलोन्सो यांच्या रेबीजच्या रुग्णामध्ये आणि इँक्यूलाच्या चित्रणांमध्ये असणारे साम्य लक्षात आले.
कुत्रा किंवा कोल्ह्यासारख्या प्राण्याच्या चाव्यानंतर रेबीज रोगाची शक्यता असते. या रुग्णामध्ये निद्रानाश, स्नायूंचे अचानक आकुंचन (मस्कूलर स्पाझ्म) त्यामुळे रक्तमिश्रित थुकी येणे यांच्याबरोबरच उजेड, पाणी आणि आरशासारख्या वस्तूंना असणारी अतिसंवेदनशीलता यांचा ताळमेळ ट्रॅक्यूला किंवा व्हॅम्पायरच्या चित्रणांशी जवळजवळ तंतोतंत बसतो. त्यात लसणाच्या वासाला भिणारे ड्रॅक्यूला आणि दुसऱ्या सामान्य व्यक्तीचा चावा घेतल्यानंतर त्या व्यक्तीचे ट्रॅक्यूलामध्ये रूपांतर होणे या साम्यामुळे ट्रॅक्यूला दुसरेतिसरे कोणी नसून रेबीजचे रुग्ण असावेत असे मानायला वाव आहे. व्हॅम्पायर आणि ट्रॅक्यूलाच्या कहाण्या प्रसिद्ध होण्याचा काळ आणि रेबीजच्या युरोपमधील संसर्गाच्या उपद्रवाचा काळ हाही जुळतो. विशेषतः हंगेरीमधील १७२१ ते २८ या काळात हा उपद्रव मोठ्या प्रमाणात होता. डॉ.जुआन यानी या संदर्भातील एक लेख मेडिकल जर्नल ऑफ न्युरॉलॉजी मध्ये १९९८ मध्ये प्रसिद्ध केला आहे. त्याअगोदर १९८५ मध्ये डेव्हिड डॉल्फिन नावाच्या जीवरसायनतज्ज्ञाने रक्ताच्या आजाराशी व्हॅम्पायरशी तुलना करण्याचा प्रयत्न केला होता.
रेबीज या आजाराशी रात्री प्राण्यामध्ये रूपांतर होणाऱ्या मनुष्याच्या किंवा भुताच्या कथांशीदेखील सांगड घालता येईल. त्याशिवाय प्रेतात्मे फिरण्याच्या घटनेचा छडादेखील अशाच पद्धतीने लावला गेला. विल्फ्रेड नावाच्या एका कुमारवयीन मुलाला त्याच्या मृत्यूनंतर पुरण्यात आले. तो एका वर्षानंतर पुन्हा गावात आला परंतु कोस्टास या भौतिकीतज्ज्ञाच्या मते हे भूत नव्हते. ज्या हैती भागात विल्फ्रेड राहत होता त्याच परिसरात मिळणाऱ्या माशांचे यकृत विषारी असते. हे विष मनुष्याला पूर्णपणे मारू शकत नसले तरी मनुष्य मेल्यासारखा निपचित पडतो. विल्फ्रेडच्या कथेमध्ये विषप्रयोगानंतर विल्फेडला पुरण्यात आले. त्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेचा परिणाम त्याच्या मेंदूवर झाला असण्याची शक्यता होती. हैती परिसरात कबरी फार खोल खणल्या जात नाहीत. त्यामुळे विल्फ्रेड त्यातून बाहेर येऊ शकला. अर्थात काही किंमत चुकवूनच. त्यानंतर डॉ. रॉजर मॅलोरी यांनी विल्फ्रेडच्या मेंदूचे एम.आर.आय. स्कॅन केल्यानंतर त्यात मेंदूला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे इजा झाल्याचे निष्पन्न झाले. यातून विल्फ्रेड हा प्रेतात्मा नसून विषप्रयोगाचा बळी होता हेच सिद्ध झाले. अर्थात भुताखेताच्या नावाखाली कुणी कुणाचे खून केले असतील हे सांगणे कठीणच.
हिंदी चित्रपटावरून कुणी इथल्या भुतांबद्दल अनुमान काढण्याचा प्रयत्न करेल तर निष्कर्ष हमखास चुकतील. अर्थात त्याचे कारण हिंदी चित्रपटातील भुते ही इंग्रजी चित्रपटावर बेतलेली असतात. युरोपीय किंवा ख्रिस्ती/मुस्लिम संस्कृतीमधील भुते कबरीमधून उठून बाहेर येतात. त्यांच्याशी सर्वसामान्य व्यक्ती अयशस्वी का होईना मारामारी करू शकते. त्याचे कारण अर्थातच त्यांच्यातील दफनपद्धती आहे. हिंदू परंपरेतील भूत अशरीरी असते. त्यामुळे ते मनोकामना पूर्ण करण्यास शरीराचा ताबा घेते. नाहीतर भासमान असते. कोकणातल्या माझ्या गावी असताना असाच एक अनुभव ऐकायला मिळाला. विंचवाचा डंख झाल्याने मृत्युमुखी पडलेल्या मुलीला भुतानेच नेले असा समज त्यांच्या पालकांचा होता. त्याचे कारण मुलीचा मृत्यू विंचवाच्या डंखाने लगेच झाला नव्हता. दोन दिवस त्या मुलीला बेशुद्धावस्थेत काही माणसे दिसत होती. ती माणसेच आपल्या मुलीला बोलवायला आली हा पालकांचा समज दूर करणे कठीणच होते. विंचू चावल्यानंतर रक्तदाबात कमालीची घट येते. या परिस्थितीत मेंदूला कमी रक्तपुरवठा झाल्याने असे भास होणे शक्य होते. घराबाहेर झोपल्यावर कुणीतरी छातीवर दाब देतो आहे. असे अनुभवही बऱ्याच जणांना येतात. या सर्वांचा संबंध अर्थातच भुताशी जोडला जातो.
भुताबद्दलच्या या कल्पना आणि अनुभव हा आणखी एका मोठ्या अंधश्रद्धेचा पाया आहे. या अनुभवातून भूत असतेच ही एक भूमिका तयार झाली की मग त्यावर आधारित पिशाच्चबाधा आणि झाड लागणे वगैरे अंधश्रद्धा आपोआपच खऱ्या ठरतात. याला आणखी एक जोड आहे स्त्री-पुरुष विषमतेची! देवी अंगात येणे हादेखील एकप्रकारे पिशाच्चबाधेचाच परंतु मान मिळवून देणारा प्रकार म्हणायला हरकत नाही. स्त्रियांच्याच अंगात का येते? याचे कारण उघड आहे, ते म्हणजे स्त्रियांच्या आविष्कार-स्वातंत्र्याला घातलेला लगाम! सौम्य स्वरूपाचा मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये स्त्रियांचे प्रमाण मोठे असते कारण ते परिस्थितीवर अवलंबून आहे. पुरुषामध्ये ताण-तणाव असले तरी त्यांना दारू पिणे, रात्र-रात्र मित्रांबरोबर बाहेर राहणे, लैंगिक ताण हलका करण्यासाठी वेश्येकडे जाणे इत्यादी मार्ग उपलब्ध असतात. याउलट प्रत्येक बाबीसाठी अगदी नोकरी करत असतानादेखील नवऱ्यावर अवलंबून असणाऱ्या स्त्रीवर कुटुंबाची जबाबदारी आपसूक येते. त्यात पुन्हा मनात जे येते ते बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. घरातल्या बाईला कसले आलेय टेन्शन! अशीही समजूत बऱ्याच जणांची असते. या ताणाचे रूपांतर सौम्य मानसिक आजारात होणे ही नैसर्गिक बाब आहे. स्वभावाने चिडचिडी असणारी व्यक्ती तेथल्या तेथे हा राग व्यक्त तरी करते परंतु जिच्यावर सोशिकतेचे संस्कार झाले असतील किंवा मुळातच असुरक्षिततेमुळे गप्प राहणे भाग असते अशा व्यक्तीच्या मनाचा कोंडमारा असह्य होऊन त्याची परिणती अर्थातच पिशाच्चबाधा किंवा अंगात येण्यामध्ये होते. देवी अंगात येण्यामध्ये आणि भूत लागण्यामध्ये जरी वरवर फरक दिसत असला तरी ते एकाच मानसिक रोगाचे लक्षण आहे हे समजून घेतले तरी पुरे.
इतर रोगांची आणि मानसिक रोगांची सांगड भुताशी किंवा पिशाच्चबाधेशी घालण्यात मुख्य फरक आहे तो उपचाराचा! देवीच्या रोगाचा संबंध मरीमाईच्या कोपाशी लावला जायचा परंतु व्यक्तीच्या समजुतीचा आणि उपचाराच्या परिणामांचा थेट संबंध या ठिकाणी नाही. व्यक्ती कितीही अंधश्रद्ध असो देवीची लस टोचली की देवीचा रोग होण्याची शक्यता नष्ट होते. परंतु मानसिक आजारांवरच्या उपचारामध्ये मात्र रुग्णांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. आणि बहुधा हे सहकार्य पारंपरिक मताच्या प्रभावामुळे मांत्रिकालाच मिळत असते. मांत्रिकाकडे मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्याने त्याला अपयश आले तरी सूट मिळते. मनोरुग्णाची सांगड भूतबाधेशी घातल्याने आधुनिक उपचारांचा मार्ग जवळजवळ बंद होतो. एखाद्याला भूतबाधा झाली तर “तुम्ही त्याला मनोविकार-तज्ज्ञाकडे घेऊन जा’, असे सांगणे सोपे असते. परंतु त्याचा प्रत्यक्ष फायदा फार कमी होतो. त्यात पुन्हा मनाचा आजार झाला म्हणजे ‘स्क्रू ढिला झाला’. अशा प्रकारचे टोमणे ऐकायचे. पैसा खर्च करायचा, आजूबाजूच्या लोकांचे सल्ले नाकारायचे. इतके सगळे सोसत असताना अर्थातच त्याचा परिणाम आधुनिक उपचारपद्धतींकडून वाढलेल्या अपेक्षांवर होतो. त्यामुळे डॉक्टरांनी काहीतरी जादूची कांडी फिरवून जर रुग्णाला बरे केले नाही तर मग “आपल्याला खरोखरच भुताने पकडले आहे” याची खात्री पटते. अशा सगळ्या दुष्टचक्राचे आह्वान अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांसमोर आहे.
त्यात पुन्हा जादुई उपचाराची आवश्यकता लोकांना का वाटते हा प्रश्न महत्त्वाचा आहे. असुरक्षित वातावरणात कोणतीही हिताची घटना सरळ मार्गाने होताना दिसतच नाही. या अपेक्षाभंगातून फक्त कोणीतरी महात्मा किंवा जादुई ताकत आपल्याला बाहेर काढू शकेल अशी समजूत इथे रुजलेली आहे. आपण नेहमी म्हणतो की विज्ञानाची सृष्टी पोचली परंतु दृष्टी पोचली नाही परंतु खरेच तसे आहे का ? विज्ञानाचे फायदे कुणाला मिळाले का? या प्रश्नांचे उत्तर बहुतांशी लोकांच्या बाबतीत नाही असेच द्यावे लागेल. भुताबद्दलच्या कल्पना त्याची भीती हे या इथल्या अजूनही मागास राहिलेल्या समाजाचे लक्षण आहे. साध्या विंचूच्या डंखाने व्यक्ती मरते याचे कारण विंचवाचे विष जहाल असते एवढे एकच कारण नाही तर दळणवळणाची अपुरी साधने, प्राथमिक आरोग्यसुविधेचा बोजवारा यामुळे गावठी उपचार, मंत्र-तंत्र यावर अवलंबून राहणे भाग पडते. यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला भूतबाधेचे कारण तार्किक वाटते. या सर्व परिस्थितीचा विचार केला तर भूत म्हणजे केवळ ‘भित्यापाठी ब्रहाराक्षस’ एवढे म्हणून खिल्ली उडवण्याची बाब नाही तर त्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे