बरेचदा विवेकवादी माणसाला जागोजाग पसलेल्या अंधश्रद्धेचा प्रश्न बिनमहत्त्वाचा वाटतो. याचे कारण अंधश्रद्धेचे मूळ भोळसरवृत्ती हे आहे. जगातल्या अंधश्रद्धा एके दिवशी संपल्या तरी भोळेपणा चालूच असल्याकारणाने नव्या अंधश्रद्धा निर्माण होतील. शिवाय जुन्या व नव्या अंधश्रद्धांमध्ये समाजहितास घातक असण्याच्या बाबतीत डावे उजवे करता येणार नाही. मग अंधश्रद्धांचा प्रश्न गैरमहत्त्वाचा ठरतो. अंधश्रद्धांचे मूळ बरेचदा भोळेपणात असले तरी त्यांचा प्रचार हा त्यातला नाही. अंधश्रद्धेचे प्रचारक, मग ते पारंपरिक अंधश्रद्धेचे असोत वा आधुनिक अंधश्रद्धेचे असोत, काही हेतू ठेवून हे काम करतात. खूपदा हा हेतू आपली पोळी भाजण्याचा असतो.
मासिक संग्रह: एप्रिल, २०१०
अंधश्रद्धा विशेषांक – श्रद्धेची तपासणी
परंपरा आणि परिवर्तन यांची सहृदय चिकित्सा मी आयुष्यभर करत आलो आहे. मी सश्रद्ध माणूस आहे. पण रूढ कर्मकांडांपलिकडे जाण्याचा आणि ‘कर्माचे डोळे चोख हो आवे’ या ज्ञानदेवांच्या इशाऱ्याला सजगपणे स्वीकारत पुढे जाण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करत आलो आहे. श्रद्धेची तपासणी करण्याची वेळ आली तेव्हा ती करायला मी कधी कचरलो नाही आणि सांप्रदायिक श्रद्धांनी घातलेल्या मर्यादा ओलांडून, संशोधनाने समोर ठेवलेल्या सत्याकडे जाताना मी कधी पाऊल मागे घेतले नाही.
[ रा.चिं. ढेरे यांनी पुण्यभूषण पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणातून]
भाग चारः सर्वेक्षण श्रद्धांचे सर्वेक्षण
सध्या खूप मोठ्या प्रमाणात लोक श्रद्धाळू झाले आहेत असे म्हणणारे विवेकी, तर लोकांना कसची चाड राहिली नाही असे म्हणणारे धार्मिक आपल्याला भेटत असतात. ही त्यांची मते दिखाऊ श्रद्धा वा अश्रद्धा जाणवल्यावर प्रगट होत असतात. म्हणजे अमक्या मेळ्याला काही लाख माणसे जमली, मोठा अपघात झाला त्यात सर्व यात्रेकरू होते, असे काहीसे ऐकू आले की विवेकी माणसांना समाजातील वाढत्या श्रद्धेची ओळख पटते. तर सणासुदीला सुट्टी घेऊन भ्रमण करणारे पाहिले; लग्न-श्राद्ध-मुंजीतील धार्मिक व्यवहारातील ढिलेपणा पाहिला की धार्मिकांना नेमकी त्याविरुद्ध जाण येते. नेमके काय घडते हे पाहण्यासाठी आजकाल सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो.
बाबासाहेब आंबेडकर व अंधश्रद्धा निर्मूलन
डॉ. आंबेडकरांच्या अंधश्रद्धानिर्मूलन कार्याचा वेध घेताना त्यांच्या धर्मचिकित्सेचा आणि धर्मांतर चळवळीचा मागोवा घेणे अपरिहार्य ठरते. महाराष्ट्रात अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीची व्याप्ती प्रामुख्याने बुवाबाजी, चमत्काराचा दावा करणारे स्वामी, साक्षात्कारी असल्याचा प्रचार करणारे महाराज, झपाटणे, भानामती, वशीकरण विद्या, पुनर्जन्म, भावातीत ध्यान इ.च्या संदर्भातील प्रबोधनाची आहे. या सर्व अंधश्रद्धांची मुळे धर्माच्या तात्त्विक वा व्यावहारिक स्वरूपात आहेत. अंधश्रद्धानिर्मूलनाचा कार्यकर्ता मर्यादित उद्दिष्टाने व्यवहारातील उघड व बोचक अंधश्रद्धेच्या विरोधात कृती करीत असतो तर धर्मसुधारक आणि धर्मपरिवर्तक अंधश्रद्धांचे शक्तिसामर्थ्य असलेल्या ईश्वरवाद, आत्मवाद, अवतारवाद, पुनर्जन्मवाद, कर्मवाद या अध्यात्मवादी प्रवृत्तींची मूलगामी चिकित्सा करीत असतो.
गाडगे महाराजांचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य
गाडगे महाराजांना संत का म्हटले गेले हेच कोडे आहे. रूढार्थाने आपण ज्यांना संत म्हणतो, त्या संतांसारखी एखादीही कृती गाडगेबाबांनी केली नाही. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसाला आपण ‘बाबा’ म्हणतो या अर्थाने खेडुतांनी, गोरगरिबांनी त्यांना बाबा म्हटले आणि ते त्यांनी सहर्ष स्वीकारले असावे. पण महाराज ? हे काय प्रकरण आहे? कुणी आपल्या सोयीसाठी त्यांना महाराज बनविले ? कारण त्यांनी स्वतःच अनेक वेळा सांगितले आहे ‘मी कोनाचा गुरु नाही अन् माझे कोनी शिष्यई नाहीत-‘ आपल्या भोवतीच्या सामाजिक दुःस्थितीचे अवलोकन करीत, त्यातून मार्ग शोधीत गाडगेबाबांचे लोकोत्तर आणि इहवादी तत्त्वज्ञान आकारले आहे, हे कुणी लक्षातच घेत नाही.
जोतीराव फुले यांचे अंधश्रद्धा-निर्मूलन कार्य
जोतीराव फुले यांनी विश्वमानवाच्या मुक्तीसाठी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या दोन निष्ठावंत अग्रणींच्या आयुष्यातील दोन प्रसंग प्रारंभीच नमूद केल्यास अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात त्या चळवळीने संपादन केलेल्या यशाचा प्रत्यय येऊ शकेल. पहिला प्रसंग ना. भास्करराव जाधवांच्या आयुष्यातला आहे. वेदोक्त प्रकरणी दुखावलेल्या शाहू महाराजांनी जेव्हा क्षात्र जगद्गुरूची प्रतिष्ठापना केली तेव्हा भास्कररावांनी त्या कल्पनेस विरोध केला होता. एवढेच नव्हे तर महाराजांसह सर्व श्रेष्ठींनी क्षात्रजगद्गुरूंना अभिवादन केले तेव्हा, आपण सत्यशोधक असल्यामुळे कोणत्याही धर्मपीठापुढे नतमस्तक होणे आपल्या विचारांत बसत नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. सत्यशोधकी विचार केवळ ब्राह्मणी जगद्गुरूंनाच नकार देत नसून संपूर्ण पुरोहितशाही आणि जन्मनिष्ठ विषमतेवर आधारित वर्णव्यवस्था यांनाच नाकारतो.
आगरकर
१९ व्या शतकातील बुद्धिवादी विचार आणि लेखन सतत व प्रभावीपणे करणारे गोपाळ गणेश आगरकर हे एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. केसरीतून ७ वर्षे व ‘सुधारक’मधून ७ वर्षे असा एकूण १४ वर्षे त्यांनी रूढी, आचार, विचार, पोषाख, वैवाहिक जीवन, शिक्षण, व्यापार इत्यादि ऐहिक जीवनाच्या प्रत्येक अंगोपांगावर परखड, सुधारकी लिखाणाचा भडिमार केला. त्याला कुत्सितपणाचा स्पर्श नव्हता. अधिक धारदार लिखाणाला ते मधूनच विनोदाची झालर लावीत. बुद्धिवादाचा पुरस्कार करताना बुद्धीच्या मर्यादेचे त्यांना भान असे. ‘आम्ही ज्या विश्वात आहो याच्या पूर्वी दुसरी विश्वे होऊन गेली असतील किंवा नसतील त्यांविषयी वाद करीत बसण्यात अर्थ नाही, कारण त्या विश्वांचा इतिहास समजण्याची साधने आम्हास अनुकूल नाहीत.
विष्णुशास्त्री चिपळूणकर
इ.स.१८७५-७६ दरम्यान निबंधमालेतून विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी आपला दृष्टिकोण मांडला आहे. त्यांनी वापरलेला अंधश्रद्धेसाठीचा पर्यायी शब्द ‘लोकभ्रम’ हा अधिक वादातीत वाटतो. त्यांची ह्याबाबतची भूमिकासुद्धा आक्रमक, ब्राह्मणद्वेषी अथवा धर्मावर आगपाखड करणारी नाही. भूत नाहीच असे ठामपणे म्हणण्याऐवजी ते म्हणतात, ‘सृष्टीतील अद्भुत चमत्कार पहायची ओढ सर्वसामान्य माणसाप्रमाणे आम्हाला पण आहे. ह्या विषयी आमची कुणी पक्की खात्री करून दिली तर ती आम्ही फार खुशीने घेऊ.’ ‘वाजे पाऊल आपुलें, म्हणे मागे कोण आले’ ह्यांसारखी बुद्धिवादी संत रामदासांची वचने ते सविस्तरपणे उद्धृत करतात. ‘स्वयंपाकघरात चूल बांधण्यापासून मोठ्या मोहिमेवर जाण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत शकुन-अपशकुन, ग्रहानुकूलता ह्याचा विचार होतो’ ह्यावर तुटून पडताना ते पुढे म्हणतात, ‘अशा त-हेचा अनुभव हा केवळ काकतालीय न्यायाचा भाग आहे.’
महाराष्ट्र अंधश्रद्धा-निर्मूलन समिती
राष्ट्रसेवादल, बाबा आढाव ह्यांची ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळ आणि अन्य परिवर्तनवादी चळवळीतील सहभागाची पार्श्वभूमी असलेल्या डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांना बी. प्रेमानंदांबरोबर ‘विज्ञान जथा’ मध्ये काम करताना आपल्या जीवनकार्याची दिशा सापडली. त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलना’च्या कामात एक पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून स्वतःला झोकून दिले. श्याम मानव ह्यांच्याबरोबर १९८६ मध्ये ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची एक ट्रस्ट म्हणून स्थापना झाली. दोन, तीन वर्षे एकत्र काम करताना आचार आणि विचारातील तीव्र मतभेद पुढे आल्याने दोघांनी स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला. श्याम मानव यांनी आपल्या मोजक्या साथीदारांबरोबर ‘शांतिवन’ नेरे येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा-निर्मूलन समिती पुनर्गठित केली.
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची चळवळ
विवेकवादाच्या चळवळीत शासन आणि न्यायव्यवस्था ह्यांचा काय सहभाग असतो, समाजसुधारक आणि सामाजिक संस्था ह्यांना काय तडजोडी करायला लागतात आणि विरोधकांची त्यामध्ये काय भूमिका असते असा सर्व अंगाने अंनिसच्या कायदाविषयक चळवळीचा अभ्यास केला तर ते उद्बोधक ठरेल.
अंनिस १९९० पासून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. ह्यात शासनाची चालढकल अशी राहिली. एका राजवटीत १९९५ मध्ये कायद्याचे अशासकीय विधेयक विधानपरिषदेत प्रचंड बहुमताने मंजूर झाले परंतु कायद्याची प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. नंतर दुसरी राजवट आली. त्यांनी १५ ऑगस्ट २००३ ला ‘जादूटोणाविरोधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य’ अशी जाहिरात करून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली.