पत्रसंवाद

ऑक्टोबर ०९ च्या अंकातील, देवेन्द्र इंगळे यांच्या लेखावर प्रतिक्रिया – भावनांना हात घालणारे आणि प्रचारकी थाटाचे लिखाण आ.सु.ने प्रसिद्ध करणे चूक आहे. आपल्या मूळ हेतूपासून सुधारक दूर जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. इंगळे यांच्या लेखातील आक्षेपार्ह वाक्ये (गडद ठशामधील) आणि त्यांवरील आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत.

जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा डार्विनप्रणीत सिद्धान्त त्यावेळच्या सर्वच ईश्वरवादी धर्मपंथासाठी आह्वानास्पद ठरला. डार्विनच्या उत्क्रांतिसिद्धान्त त्यावेळच्या ख्रिस्ती-इस्लामिक जगताला आह्वानास्पद वाटला तसाच तो ब्राह्मणीधर्मासही आह्वान देणारा ठरला.

इंगळे यांची “आपली (मानवाची) उत्पत्ती आणि विकास कसा आणि कोणत्या क्रमाने होत आला हा प्रश्न भेडसावत होता. त्या प्रश्नाचे वैज्ञानिक स्पष्टीकरणासह उत्तर दिले ते डार्विनच्या उत्क्रांतिसिद्धान्ताने.’ ही विधाने योग्य आहेत. परंतु ईश्वरवादी, निरीश्वरवादी किंवा इतर तिसरीच भूमिका घेणारा यांपैकी कोणताही धर्म विवेकवादाला त्याज्यच आहे. व्यक्ति आणि धर्म यांना (उदा. बुद्ध/धम्म इ.) शरण जाण्याची अपेक्षा प्रत्येकच धर्म करतो. त्यामुळे परिवर्तन, चर्चा, “वैज्ञानिक स्पष्टीकरण” यांना पूर्णविराम मिळतो. “बौद्ध धर्माला उत्क्रांती मान्य आहे” असा दावा करून बौद्ध धर्माला वरचढ स्थान देण्याचा इंगळे यांचा अजेंडा आहे. वास्तविक पाहता, बौद्ध धर्मातील चौदा अनुत्तरित प्रश्नांमध्ये ‘निर्मितीचा प्रश्न’ सुद्धा आहे. बौद्ध धर्माचा त्या प्रश्नाबाबत दृष्टिकोण “त्या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे नाही, आम्हाला ते उत्तर शोधण्याची गरज नाही’ असा आहे. तो सद्यः ज्ञानाशी विपरीत आहे. इतकेच नसून तो विज्ञानविरोधीसुद्धा आहे. ईश्वरवादी निरीश्वरवादी असा भोंगळ फरक करून इंगळे यांनी बुद्धधर्माचे दुकान मांडले आहे.

प्रत्येक प्रश्नाचे सुचेल ते/भावलेले उत्तर देण्याचा प्रयत्न बहुतेक सगळे लोक करतात. परंतु योग्य माहिती नसताना, wishful thinking ने “सिद्धान्त’ मांडले, ते बहुदा फोलच असतात. गरुडपुराणात मत्स्य, कूर्म, वराह, या अवतारांचा उल्लेख आहे आणि ती क्रमवारी उत्क्रांतिवादाच्या जलचर-सरिसृप-सस्तन याच क्रमवारीने आहे. तरीही, पुराणकाळीसुद्धा उत्क्रांतीच्या टप्प्यांची ‘माहिती’ होती असे म्हणणे हास्यास्पद आहे. बुद्धधर्मातील महाकल्पाच्या संकल्पनेनुसार विवर्त, विवर्तस्थायी, संवर्त, संवर्तस्थायी अशी चार कल्पे मानली गेली, बौद्ध इतिहासानुसार, चक्रवर्ती राजांनी हजारो/लाखो वर्षे राज्य केली. उदा विवर्तस्थायी कल्पात तीन लाख वर्षे वयाच्या राजाचा उल्लेख आहे. परंतु मानवी इतिहास निश्चितच एवढा मोठा नाही. धर्माच्या शिकवणीत विवेकवाद, “वैज्ञानिक स्पष्टीकरण’ यांना स्थान नसते. एका धर्मावर टीका करणे आणि दुसऱ्या धर्माचा उदो उदो करणे हे आ.सु.च्या भूमिकेच्या विरोधात आहे.

उत्क्रांतिवादानुसार fittest या शब्दाचा अर्थ आहे प्रजोत्पत्तीस पुरेसे सक्षम आणि सभोवतालच्या परिस्थितीशी जैविक अनुरूपता/अनुकूलन साध्य करू शकणारे! पण त्याऐवजी अर्थ प्रचलित झाला तो शारीरिकदृष्ट्या बलदंड, सामर्थ्यवान, सशक्त वा वांशिकदृष्ट्या योग्यतम, श्रेष्ठतम किंवा प्रबळ!

‘वांशिकदृष्ट्या’ हा शब्द वगळता, मानवसमाजाच्या संदर्भात वापरल्यास, वरनमूद केलेल्या प्रचलित अर्थ अयोग्य नाही. “शारीरिकदृष्ट्या बलदंड, सामर्थ्यवान, सशक्त, योग्यतम, श्रेष्ठतम किंवा प्रबळ असणे” एखाद्या ज्वालामुखीच्या बाजूच्या झऱ्यामध्ये जगणाऱ्या बॅक्टेरियांसाठी फायदेशीर नसते हे विधान स्वीकारार्ह आहे. कारण ‘७० अंश सेल्सिअस तापमानासाठी आवश्यक रसायनांसाठीचे जनुक असणे’.यालाच तेथे फिटनेस म्हणावे लागते. ‘रस्त्यावर भीक मागण्यातील यश’ हा निकष लावला तरी फिटनेसची प्रचलित व्याख्या फसते कारण तेथे, कुरूप, अपंग, इ.असणे हाच फिटनेस ठरतो. वाईट, किडकिडीत पाय हरणाला पळण्यास मदत करतात, सुंदर शिंगे त्याला अडकवितात. मानवी फिटनेसची काही अपवादात्मक उदाहरणेसुद्धा या पत्रात पुढे दिलेली आहेत. मात्र अशा अपवादात्मक परिस्थितीची उदाहरणे वापरणे ही शुद्ध लबाडी आहे. सामान्य जगामध्ये, “शारीरिक (किंवा बौद्धिक/भावनिक) दृष्ट्या बलदंड, सामर्थ्यवान, सशक्त, योग्यतम, श्रेष्ठतम किंवा प्रबळ” अशा मानवांनाच ‘फिट’ म्हणावे लागते.

आनुवंशिक क्षमता आणि गुणवत्ता विकसित करणारे विज्ञान, म्हणून सुप्रजननशास्त्राचा गवगवा करण्यात आला. यात ‘श्रेष्ठ प्रतीचे गुण कोणते? ते कसे आणि कुणी निश्चित करायचे? उच्च दर्जाची क्षमता कशास म्हणायचे? उत्तुंग बुद्धिमत्ता म्हणजे काय?’ असे अनेक मुद्दे संदिग्धच होते.

“डॉ. आंबेडकरांकडे उत्तुंग बुद्धिमत्ता होती.” असे विधान केल्यास इंगळे त्यास आक्षेप घेणार आहेत काय ? सामान्य अर्थाने, श्रेष्ठ प्रतीचे गुण कोणते, हे सर्वांनाच माहिती आहे. पार्क यांच्या प्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यकाच्या पाठ्यपुस्तकानुसार, जनुकीय रोग टाळण्यासाठी सुप्रजननशास्त्र उपयुक्त आणि आवश्यक आहे. सुप्रजननशास्त्राचे दोन प्रकार आहेत.
१) ऋण : हिटलरने वापरलेला मार्ग कोणताही सुसंस्कृत समाज वापरणार नाही. तरीही, गंभीर आनुवंशिक रोग असलेल्यांना मुले होऊ न देण्यास फारसा विरोध होणार नाही.
२) धन : वांछित जनुके असलेल्यांना अधिक मुले जन्मास घालण्यास प्रवृत्त करणे. अर्थात सध्या याचा फारसा फायदा नाही. त्यातील अडचण असी की, बुद्धिमत्ता आणि इतर चांगली स्वभाववैशिष्ट्ये जरी काही अंशी जैविक असली तरी ती रक्तगटांसारख्या सरधोपटपद्धतीने, अपत्यांमध्ये संक्रमित होत नाहीत. या गुणधर्मावर जनुके आणि बाह्य परिस्थितीचा व्यामिश्र परिणाम होतो.

थोडक्यात म्हणजे, विल्यम बेटसन यांच्या ज्या वाक्याचा इंगळे यांनी उल्लेख केला आहे. त्याच्याशी पार्कचे पुस्तक सहमत आहे. नोबेल पारितोषिक विजेते विल्यम शॉकली यांनी नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या शुक्राणूंची बँक स्थापली तेव्हा जॉर्ज वॉल्ड त्यांना म्हणाले. “तुम्हाला नोबेल पारितोषिक विजेते बनवायचे असतील तर माझ्या वडिलांकडे जा. ते एक गरीब, स्थलांतरित शिंपी आहेत. माझ्या शुक्राणूंनी दोन गिटारवादक बनविले.” विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सुप्रजननशास्त्राची गृहीतके चूक होती. त्यांची कार्यपद्धतसुद्धा चूक होती. तरीही, मतिमंदांच्या पुनरुत्पादनक्षमतेच्या खच्चीकरणात काहीही गैर नाही.

एखाद्या लोकसमूहात मोठ्या प्रमाणावर हुशार, बुद्धिमान लोक आढळतात याची कारणे त्या समूहाच्या आनुवंशिक रक्तशुद्धीत/अशुद्धीत किंवा जैविक जनुकांमध्ये मुळीच नसतात. ही सगळी वैशिष्ट्ये सभोवतालची परिस्थिती आणि सामाजिक-भौतिक वारशातून प्राप्त झालेले बौद्धिक-सांस्कृतिक भांडवल यांवर अवलंबून असतात. शास्त्रीयदृष्ट्या सांस्कृतिक वारशाचा जैविक वारशाशी संबंध असायचे कारण नाही.

वरील विधाने खोटी आहेत. अल्बिनिझम या रोगाने ग्रस्त लोकांचे एकच जनुक बिघडलेले असते. त्या रोग्यांच्या त्वचेत मेलॅनिन बनत नाही. असे रोगी पांढरेफटक दिसतात. त्यांच्या डोळ्यांची बुबुळे पारदर्शक असल्यामुळे लाल दिसतात. त्यांना उजेडात काम करता येत नाही. सूर्यप्रकाशामुळे त्यांना त्वचेचा कर्करोग पटकन होतो. घराबाहेर, उदा. शेतात काम करणाऱ्या काही पिढ्यांसोबत हे जनुक असणाऱ्यांची संख्या कमी होणे नैसर्गिक निवड तत्त्वाने अपेक्षित आहे. सावलीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांमध्ये हे जनुक टिकणे अधिक शक्य आहे. या जनुकाव्यतिरिक्त, मॅलॅनिनवर अनेक जनुके प्रभाव करतात. हा प्रभाव अल्बिनिझमच्या जनुकासारखा सरधोपट नसतो, व्यामिश्र असतो. तरीही, मेलॅनिनमुळे कर्करोगाची शक्यता कमी होते, या कारणास्तव, घराबाहेर काम करणाऱ्या घराण्यांमध्ये ही व्यामिश्र प्रभाव करणारी जनुकेसुद्धा वाढणे स्वाभाविक आहे. याउलट, गडद त्वचेमध्ये ड जीवनसत्त्व कमी बनते. शाकाहारींना त्याची कमतरता भासण्याची भीती अधिक असते! पौरोहित्य करणाऱ्या अनेक पिढ्यांसोबत, गडद त्वचेची जनुके असणाऱ्यांची संख्या घटणे स्वाभाविक आहे.

सिकल सेल प्रकारचा पंडुरोग होण्याचे जनुक आदिवासींमध्ये टिकून आहे कारण त्या रोगाची जनुके आई-वडील अशा दोघांकडून मिळणे रोगदायक असले तरी एकच ‘रोगी’ जनुक (आणि एक निरोगी जनुक) असणाऱ्यांना मलेरियापासून संरक्षण मिळते. तुलनेत, दोन ‘निरोगी’ जनुके असलेले लोक मलेरियाने मरण्याची शक्यता अधिक असते.

काही शतकांसाठी ज्यू लोकांवर जी परिस्थिती ओढवली. त्यातून त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता वाढली. त्यांच्यात तशी जनुके आहेत. (अर्थात, त्यांच्यात मतिमंदत्वाचीसुद्धा जनुके अधिक आहेत.)

जनुकीय बदल सुरू होण्यास “सभोवतालची परिस्थिती आणि सामाजिक-भौतिक वारशातून प्राप्त झालेले भांडवल” हे निश्चितच कारणीभूत असते. परंतु पिढ्यांसोबत, कालपरत्वे, जनुके अशा परिस्थितीशी ‘जुळवून’ घेतात. उदा. माकडाच्या नवजात पिलालासुद्धा सापाची भीती वाटते.

अर्थात विशिष्ट असा सामाजिक संघर्षातून उद्गम पावलेल्या संरचनेस व ब्राह्मणी धर्मशास्त्रांनी पुरस्कारिलेल्या वर्णजातव्यवस्थेस मानवजातीच्या उत्क्रांतीचा भाग मानणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे व अविवेकीपणाचे लक्षण आहे. उत्क्रांतिवाद सांगतो की, संपूर्ण मानवजात ही एकेकाळच्या माकडांपासून उत्क्रांत होत आलेली आहे. मानवजातीचा उद्गमस्रोत जर एकसमान असेल तर आपोआपच असा निष्कर्ष समोर येतो की अन्य सगळे भेद (वर्ण, जात, धर्म, वंश, भाषा, राष्ट्र इत्यादी) जैवविज्ञानाच्या दृष्टिकोनातून निरर्थक आहेत. हे सगळे भेद कृत्रिम व वरवरचे असून…

“सर्व सस्तन प्राणी एकेकाळच्या सरिसृपांपासून उत्क्रांत होत आलेले आहेत.” हे वाक्यसुद्धा खरे आहे. तरीही “घोडा आणि गाढव हे समान आहेत” असा त्याचा अर्थ काढणे अप्रामाणिक आहे.

प्राचीन काळापासून होत असलेल्या सामूहिक स्थलांतरणांमुळे बदलत्या भौगोलिक परिवेशात मानवी समाजसमूहांच्या बाह्य रंगरूपात बदल होत गेले असले तरी स्पीशीज ह्या अर्थाने मानवजात एकच असून तीत भिन्नत्व नसल्याचेच सिद्ध झाले आहे. बाह्य रंगरूपातील वैशिष्ट्यांच्या आधारे जे वांशिक भिन्नत्व दर्शविले जाते. ती वैशिष्ट्ये एखाद्या मानवसमूहाची गुणसंपन्नता वा योग्यता-अयोग्यता निश्चित करणारा निकष ठरू शकत नाहीत. बाह्य रंगरूपातील वैशिष्टये इतकी स्थूल, वरवरची आणि दुय्यम असतात की त्या तुलनेत मानवाची जी जैवशास्त्रीय वैशिष्ट्ये आहेत ती अधिक नेमकी, मूलभूत आणि महत्त्वाची ठरतात. कारण ती सर्वच मानवसमूहांमध्ये एकसारखीच दिसून येतात. जनुकीय संशोधनाचा निष्कर्षसुद्धा तोच आहे.

आंतर्जातीय फरक हे ‘स्पीशीज’ पातळीवर नाहीत हे कोणीही मान्य करेल. असे असले तरीही, कबूतर या एकाच स्पीशीजच्या आत, किती विविधता येऊ शकते ते डार्विनने बघितले होते. कबुतरांमधील फरक “वरवरचे’ नसून हाडेसुद्धा बदलली आहेत.

मानव आणि चिंपांझींमध्ये ९५% पेक्षा अधिक डीएनए समान आहे हे आपण विसरू नये. सर्व मानवांमध्ये ९९.५% डीएनए समान आहे. म्हणूनच, मानवांमध्ये सापडणारे आनुवंशिक फरक उर्वरित ०.५% डीएनएमध्ये असतात. जर ५ टक्क्यांमध्ये स्पीशीज बदलते तर जातींमध्ये ०.१ टक्के फरक सापडल्यास आश्चर्य नाही. मानवी वंशांमध्ये ०.२ टक्के फरक आहे. जनुकामधले चार-दोन माहितीकण (कोडॉन) बदलले किंवा अतिरिक्त झाले तरी जीनच्या गुणधर्मात (एक्सप्रेशनमध्ये) आमूलाग्र बदल होऊ शकतो. फार मोठी शारीरिक/बौद्धिक तफावत करण्यासाठी फक्त काही रेणूंचा फरकसुद्धा पुरेसा असू शकतो. सर्वसाधारण जनुके असणारा प्राणी आणि फक्त चार-दोन कोडॉन भिन्न/अतिरिक्त असलेली जनुके असणारा प्राणी यांची जनुके अगदी १०-२० दशांशांपर्यंत तंतोतंत सारखी असली तरी शारीरिक/बौद्धिक पातळीत जमीन अस्मानाचा फरक पडू शकतो.

शोषणाचे समर्थन करण्यासाठी बौद्धिक/शारीरिक फरकांचा वापर चूक आहे. पण शोषणाचा विरोध करण्यासाठी बौद्धिक/शारीरिक फरकांचे अस्तित्व नाकारण्याची गरज नाही. डार्विनचा पाठिंबा माणुसकीला असला तरी माणुसकीची वागणूक उत्क्रांतीच्या विरुद्ध असल्याचे त्याचे मत होते.

बौद्धिक/शारीरिक फरकांच्या आधारे भेदभाव (वळीलीळाळपरींळेप) योग्य ठरविले तरीही त्यासाठी जात हा निकष उपयोगी नाही. आंतर्जातीय विवाह, जनुकीय म्यूटेशन, बहुतेक गुणधर्माची व्यामिश्रता इ. कारणांमुळे बौद्धिक/शारीरिक गुणधर्मात जातीय, वांशिक फरक केवळ शक्यतांच्या पातळीवर आहेत. एका पेटीमध्ये असलेल्या आंब्यांपैकी ४०% आंबे हापूस आणि ६०% आंबे रायवळ आणि दुसऱ्या पेटीमध्ये असलेल्या आंब्यांपैकी ६०% आंबे हापूस आणि ४०% आंबे रायवळ, अशी परिस्थिती असताना पहिली पेटी संपूर्ण नाकारून दुसरी पेटी संपूर्ण स्वीकारणे चूक आहे. प्रत्येक पेटीतील प्रत्येक आंबा हापूस आहे की रायवळ हे पारखावे लागेल.

[ १) Fittest या शब्दाच्या व्याख्येबद्दल निखिल जोशींची भूमिका मला अतिसुलभीकरणाची वाटते. अपवादात्मक परिस्थितीची उदाहरणे वापरणे ही शुद्ध लबाडी आहे, असे जोशी म्हणतात. परंतु फिटनेसच्या व्याख्येला बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात बदलू शकण्याइतकी विविधता असते, अशीही करता येईल. ते न केल्यास कार्ल पॉपरला आधी वाटला होता तसा उत्क्रान्ती हा आधिभौतिक संशोधनप्रकल्प ठरतो.
२) जोशींनीच नोंदलेली जॉर्ज वॉल्डची कथा धन-सुप्रजननाला चुकीची ठरवते. परंतु ऋण सुप्रजनाबद्दलही मतिमंदांच्या, आनुवंशिक रोग असलेल्यांच्या प्रजोत्पादनावर बंधने कोणी व कशी आणायची हे सामाजिक शास्त्रेच ठरवतील, नैसर्गिक शास्त्रे नाहीत. त्यादृष्टीने सुप्रजननाची संकल्पना संशयास्पदच मानायला हवी.
३) सध्या epigenetic evolution ही संकल्पना चर्चेत आहे. ती शुद्ध जेनेटिक विचारांच्या मर्यादा तपासत आहे. याच अंकातील परंपरांच्या विरोधात हा लेख पाहावा.
एकूण पाहता जोशींनी दाखवलेल्या इंगळ्यांच्या चुका काही अंशी योग्य असूनही जोशींच्या लेखाच्या उत्तरार्धाबाबत सावधगिरीचीच भूमिका ठेवणे मला तरी इष्ट वाटते. – कार्यकारी संपादक]