[लिन् मालिस (Lynn Margulis) ही एक चाकोरीबाहेरच्या वाटा चालणारी जीवशास्त्रज्ञ आहे. कालेजच्या आयुष्याच्या सुरुवातीला तिचा कार्ल सगानशी प्रेमविवाह झाला. तो पुढे प्रख्यात विज्ञानप्रसारक झाला. पृथ्वी सोडून विश्वात कुठे बुद्धिमान जीव आहेत का, हे शोधण्याच्या SETI (Search for Extra-Terrestrial Intelligence) प्रकल्पाचा तो जनक. लिन् मात्र त्याच्याशी विभक्त होऊनही मैत्री टिकवून आपले संशोधन करत राहिली. तिच्या सिंबायॉटिक प्लॅनेट, (ड्रालळींळल झथरपशी) या पुस्तकातील काही भागाचे, Against Orthodoxy या प्रकरणाचे हे संक्षिप्त भाषांतर. – सं.]
मी उच्च शिक्षणासाठी अर्ज केला. माझी लिबरल आर्टस्मधील पदवी ग्राह्य धरून विद्यापीठात प्रवेश मिळाला हे एक आश्चर्यच होते. परिणामी मॅडिसन येथील विस्कॉन्सिन विद्यापीठाची मी विद्यार्थिनी झाले. ते साल होते १९५८. मी गरोदर होते. वर्गामध्ये खूप झोप येत असे. मी तेव्हा पेशीशास्त्र आणि जेनेटिक्स अशा दोन विषयांचा अभ्यास करीत होते. त्याचवेळी प्राणिशास्त्र शिकवण्यासाठी शिक्षकाची गरज असल्यामुळे लिबरल आर्टस् विभागात ते शिकवण्याचे काम मी करीत असे. तेव्हा सामान्य जेनेटिक्स आणि नंतर (पॉप्युलेशन) लोकसंख्या जेनेटिक्स ह्या विषयांचा अभ्यास मी जेम्स क्रो ह्या ज्येष्ठ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली करीत होते. मला क्रो यांचा जनरल जेनेटिक्सचा अभ्यासक्रम खूपच आवडला. त्याने माझे आयुष्यच बदलून गेले. शिकागो विद्यापीठातून बाहेर पडताना जेनेटिक्स शिकावे असे वाटत असे. परंतु क्रो यांच्या वर्गात दाखल झाल्यानंतर मात्र मला फक्त जेनेटिक्सचाच अभ्यास करायचा आहे, हे उमजले. जेनेटिक्सच्या मदतीने उत्क्रान्तीची काटेकोर मांडणी करता येईल असा अंदाज मला आला. या शास्त्राच्या मदतीने सुरुवातीच्या, मानवपूर्व सजीव पृथ्वीचा उलगडा होईल असे मला वाटले. जेव्हा माझा मोठा मुलगा डोरिअन आणि मी आमचे मायक्रोकॉझम हे पुस्तक एकत्रपणे लिहीत होतो, तेव्हा त्याच्या आग्रहाखातर बॉस्टनमधील मॅसेच्युसेटस अॅव्हेन्यूवरील एका मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर लावलेला भुयारी मार्गाचा नकाशा बघायला मी गेले होते. तेथे मोठ्या काळ्या अक्षरांमध्ये एक प्रश्न लिहिलेला होता. तो असा अमीबा कोलाहलात कधी सापडला? (Whence come Amoebae in Chaos?) मी खूप मोठ्याने हसले. कारण हा प्रश्न माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू झाला होता. माझ्या आयुष्यातला तो सर्वांत महत्त्वाचा प्रश्न बनला होता आणि भुयारी मार्गाच्या स्टेशनच्या भिंतीवर तो झळकताना बघून मला मोठ्याने हसू आले.
अजूनही मी भूतकाळाबद्दल विचार करीत असते. पृथ्वीवर सजीवांच्या सुरुवातीच्या काळात काय घडले असावे ? पॉप्युलेशन जेनेटिक्सच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात अमूर्त नव-डार्विन सिद्धान्त शिकवला जात असे. त्यातील म्युटेशन लोड-बदलांचा दबाव, शारीरिक क्षमता (फिटनेस) आणि निवडीचे एकक (कोईफिशंट ऑफ सिलेक्शन) ही वर्णने धार्मिक नियमांसारखी वाटत. एक प्राणी आपल्या जीन्स नवीन जीवाला देतो आणि उत्क्रांत होतो हा नियम तर मला धार्मिक नियमांसारखा वाटत असे.
वनस्पती आणि पाण्यांच्या न्युक्लिअसमध्ये जीन्स एकवटलेल्या असतात आणि त्यांच्यामार्फतच त्या बहुतांशपणे कोणताही बदल न होता नवीन पिढीला दिल्या जातात हे तोपर्यंत माहीत झाले होते. क्रो यांच्या सुंदर लेक्चरमधून आणि अभ्यासक्रमावर आधारित विविध प्रश्नांमधून जीन्सद्वारे पेशीगुण संयत आणि नियमबद्धपणे नियंत्रित होत जातात ह्याची खात्री पटली होती. परंतु, त्यावेळी इतर सर्व करताहेत म्हणून मीसुद्धा पेशीच्या न्युक्लिअसवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्याच्या आजूबाजूला पेशीत असलेल्या घटकांकडे बघण्याचे ठरविले. न्यूक्लिअर कुटुंबात मी उपप्रमुखाची भूमिका करीत होतेच. त्यावेळी इतर स्त्रियांप्रमाणेच मी द्विधा मनःस्थितीत असे. मानववंशशास्त्रामध्ये मोठे महत्त्वाचे काम केलेल्या मागरिट मीड यांची मुलगी मेरी कॅथरीन ही माझी घनिष्ठ मैत्रीण होती. तिचे वडील ग्रेगरी बेटसन हे तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते. आधुनिक बायका ग्रहांभोवती फिरणाऱ्या उपग्रहांसारख्या असतात असे ती गंमतीने म्हणत असे. बायकांना ऑक्टोपससारखे आठ हात असावे लागतात, त्याशिवाय त्यांना जगताच येत नाही. एका हातात लहान बाळ, दुसऱ्या हातात पातेल्यातील पदार्थ ढवळण्याचा चमचा, त्याचवेळी बाजूला बसलेल्या लहानग्यावर नजरेने लक्ष ठेवणे, अश्या गोष्टी त्याशिवाय शक्य झाल्या नसत्या असे कॅथरीन म्हणत असे. अष्टावधानी असण्याची जबाबदारी राजकारणाची, स्त्रीवादाची चर्चा करून टाळता येत नाही.
त्यामुळेच मी पेशींमधील केंद्रिकेच्या ऐवजी परिघावरच्या, अनुवंशशास्त्राच्या परिघावरच्या उपेक्षित घटकांचा अभ्यास करायचे ठरविले. सायटोप्लाझममधील जीन्सबद्दल समजल्यापासूनच मला त्यांनी भारून टाकले होते. सायटोप्लाझम म्हणजे पेशीच्या आवरणाखाली, केंद्रिकेच्या भोवती असलेला द्रव प्रदार्थ. ह्या द्रवपदार्थात मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट ऑर्गनेल (organnel) सापडतात. जीनचे सारतत्त्व केंद्रिकेतच असते असा समज तेव्हाही होता. आताही आहे. परंतु सायटोप्लाझममधील जीन्सबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे त्या गुंतागुंतीच्या भासत. त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयोगांचे वर्णन फार त्रोटक असे. असे असले तरी त्यांच्याकडे लक्ष देणारी मी काही पहिली संशोधक नव्हते. माझ्या अगोदर पेशीमधल्या सायटोप्लाझममधील आनुवंशिक संक्रमणाबाबत अनेकांना अंधुक कल्पना आलेली होती. टोरन्टो येथील यॉर्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकविणाऱ्या जॉन सॅप यांच्या इव्होल्युशन बाय असोसिएशन (सहवासातून उत्क्रांती) ह्या सुंदर पुस्तकात जेनेटिक्समधील ह्या उपविषयाचे अतिशय प्रभावी वर्णन केले आहे. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात सायटोप्लाझमच्या जेनेटिक्सचा अभ्यास सुरू झाला होता. जेनेटिक्समधील ह्या दोन प्रवाहांचा शोध घेण्याचे काम मेंडेल ह्यांच्या शोधापासून सुरू झाले होते. त्यांच्या संशोधनातून न्युक्लिअसमधील जीन्सचे अस्तित्व सिद्ध झाले होते. मेंडेल हा एक उत्तम माळी होता आणि त्याने जीन्सच्या अस्तित्वाचा अंदाज त्याच्या बद्धीने केला होता. तेव्हा तो जीन्सला घटक (फॅक्टर) म्हणत असे. मटारांच्या दाण्यातील आनुवंशिकतेचे नियम त्याने शोधून काढले. १८६० साली त्याने केलेल्या संशोधनाचा पुनःशोध त्याच्या मृत्यूनंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या संशोधकांनी घेतला तेव्हा त्यांना मेंडेल हा जेनेटिक्स शास्त्राचा पितामह आहे ह्याचा साक्षात्कार झाला. मेंडेलच्या केंद्रिकेतील घटकांचा शोध ह्या संशोधकांना समजला आणि अतिशय आनंद झाला. त्याचवेळी केंद्रिकेच्या भोवती असलेल्या द्रवातील आनुवंशिकतेच्या व्यवस्थेबद्दलही कुतूहल वाटू लागले. बोरीस एफुसी ह्या फ्रान्समध्ये स्थलांतर केलेल्या रशियन संशोधकाला यीस्टवर काम करीत असताना केंद्रिका आणि त्याभोवतीचे द्रव यातील दोन प्रकारच्या गूढ आनुवंशिक घटकांची कल्पना आली. हे गूढ म्हणजेच सायटोप्लाझमची व्यवस्था हेही त्याला समजले.
पेशीच्या परिघावर सुरू झालेल्या, सूक्ष्मदर्शिकेतून धूसर दिसणाऱ्या या दुय्यम द्रवाचे संशोधन आता मध्यवर्ती झाले आहे. उत्क्रांति-प्रक्रियेत सहनिवासाचे महत्त्व समजलेले असल्यामुळेच पेशीमधील केंद्रिकेच्या बरोबरीनेच संशोधन सभोवतालच्या द्रवाकडे सरकले आहे. सजीवांच्यातील स्पर्धेच्या किंवा लढाईच्या तत्त्वाबद्दलच नव्याने मांडणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. निसर्गाला टोकदार, रक्तबंबाळ करणारे दात आणि पंजे असले तरी सहवेदनेने तडफडणाऱ्या जीवांमध्ये सहकार्य दिसायला लागले आहे. ह्या शोधामुळे काही काळ संशोधकांमध्ये अस्वस्थता आली होती. पण विविधतेच्या निर्मितीमध्ये सजीवांच्या सहनिवासात असलेले सहकार्याचे तत्त्व महत्त्वाचे आहे हे दिसू लागले आहे. मानवामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये असणारी जाणीव आणि अनेक सुंदर सजीवांमधील व्यामिश्र रचनांमध्ये दिसणारी, सहविकासातून साकारलेली उत्क्रांती हा सूक्ष्म बॅक्टेरियांकडून मिळालेला वारसा आहे. पेशींमधील ऑर्गनेल्सचे सहजीवन, एकमेकांच्यामध्ये सामावण्याची आणि सामावून घेण्याची प्रवृत्ती ही अतिशय महत्त्वाची आहे. मानवातील लिंगभेदापेक्षा ही प्रवृत्ती जास्त महत्त्वाची आहे. सहनिवासी सहकार्यामुळेच वसंत ऋतूमधील रंगीबेरंगी फुलोरा फुलतो. पृथ्वीवरील अवाढव्य प्राण्यांच्या शरीरापासून ते विश्वातील सर्व ठिकाणी हेच सहकार्याचे तत्त्व कार्यरत असल्याचे दिसून येते. गेल्या तीस वर्षांच्या संशोधनाअंती सिंबायोजेनेसिस (symbiogenesis) समजल्यामुळेच परिघावरच्या घटकांचे संशोधन आता संशोधनाच्या केंद्रस्थानी पोचले आहे.
धर्मगुरु असलेल्या मेंडेल ह्यांनी ज्या घटकांची संकल्पना मांडली होती त्यांनाच नंतर न्युक्लिअसमधील जीन्स म्हटले जाऊ लागले. मेंडेल ह्यांच्या संशोधनानुसार मटाराच्या दाण्यांचे विविध रंग (पिवळा-हिरवा) आणि पोत (खडबडीत-मुलायम) हे गुण विशिष्ट जीन्समुळे ठरविले जातात. मेंडेल ह्यांनी स्वतःच्या बागेत मटारांची लागवड करून अभ्यास केला होता. कोणतेही बदल न होता आनुवंशिक गुण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात असा त्यांचा अंदाज होता. कदाचित चार्ल्स डार्विन ह्यांनी मांडलेल्या प्रजातीमधील बदलांचा सिद्धान्त खोडून काढणे हा मेंडेल ह्यांच्या प्रयोगाचा हेतू असावा. मेंडेल ह्यांच्या संशोधनाबद्दल नास्सू बेटावरच्या एका विज्ञान-इतिहासकाराने अतिशय सुंदर माहिती दिली आहे. ती अजून अप्रकाशित आहे. त्यानुसार मेंडेल ह्यांना प्रजातीच्या पिढ्यानपिढ्यांमध्ये कोणतेही बदल किंवा उत्क्रांती झालेली आढळली नाही. लाल पुल्लिंगी आणि पांढरी स्त्रीलिंगी फुले यांच्या संकरातून तयार होणारे बी गुलाबी फुलांचे असले तरी ह्या गुलाबी फुलांच्या पुढच्या पिढीतील रोपांची फुले लाल आणि पांढरी असतात असे त्याला आढळले. हे प्रयोग करताना मेंडेल ह्यांचा काय हेतू असेल तो असो पण त्याने कल्पनेने जाणलेल्या घटकांचे आणि अपरिवर्तनीय आनुवंशिक गुणांचे नाते आहे हे लक्षात आले. शिवाय ह्या तथाकथित घटकांचा संबंध लाल रंग बहाल करणाऱ्या न्युक्लिअसमधील घटकांशी आहे हे समजून आले. (माझे मित्र जॉन सॅप यांनी मेंडेल ह्यांच्या कामाचे विश्लेषण करताना म्हटले आहे की) प्राणी/वनस्पतींच्या पेशीतील न्युक्लिअसमध्ये असणाऱ्या अतिसूक्ष्म अशा घटकांची कल्पना गुणसूत्रांचा, (DNA चा) शोध लागण्यापूर्वी, १९५३ सालीच कळली होती. जेव्हा मी वैज्ञानिक म्हणून वयात येत होते तेव्हा गुणसूत्रांच्या द्वारे होणाऱ्या आनुवंशिकतेचा सिद्धान्त हा संपूर्ण सत्य म्हणून मान्यता पावला होता. किंबहुना त्याचे काल्पनिक सिद्धान्तरूप नाहीसे होऊन ते वास्तव, सत्य म्हणून मान्य झाले होते.
मण्यांच्या मालेप्रमाणे असणाऱ्या रंगसूत्रांवर (क्रोमोजोम्स) जीन्स स्वार झालेल्या असतात असे शिकविले जाऊ लागले होते. संकल्पनेतील जीन्स ह्या गुणसूत्रांवर असतात आणि न्युक्लिअस तसेच पेशींच्या आवरणाखाली त्या सुरक्षित राहतात ह्याबद्दलचे पुरावे निर्विवादपणे मिळाले होते. जीन्स आणि मेंडेलचे सैद्धान्तिक घटक हे एकमेकांना जुळणारे आहेत. त्यांच्या खेळातील नियमानुसार लाल, पांढरी किंवा गुलाबी फुले निर्माण होतात. प्राण्यांमधील गुणही त्याच नियमांनुसार संक्रमित होतात. न्युक्लिअसमधील आनुवंशिक गुण ठरविणाऱ्या ह्या घटकांच्या ज्ञानाला गुणसूत्राधारित आनुवंशिक संक्रमण असे म्हणता येईल.
पन्नास सालाच्या उत्तरार्धात जीवशास्त्रज्ञांना जीवरसायन किंवा जीवभौतिकी सायटोलाजिस्ट असे संबोधिले जात असे. मेंडेल ह्यांच्या कल्पनेतून माहीत झालेले घटक प्रत्यक्षात सापडल्यामुळे संशोधक आनंदून गेले होते. तेव्हा लाल रंगात रंगणारे क्रोमोझोम कशाचे बनले असावेत ? आनुवंशिक गुणांच्या संक्रमणाचे रसायनशास्त्र काय असावे? एखाद्या गॉथिक किंवा वैज्ञानिक कादंबरीप्रमाणे सजीवांची गुपिते विज्ञान उलगडून दाखवीत होते. ह्या सगळ्यांमुळे जो उत्साह वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संचारला होता तो अजिबात अनाठायी नव्हता.
चुकतमाकत झालेल्या सुरुवातीनंतर मिळालेल्या ह्या यशामुळे पेशीच्या आणि तिच्या न्युक्लिअसच्या अंतर्गत रचनेबद्दलचे आकर्षण वाढतच गेले. पेशींतील सततच्या रासायनिक प्रक्रिया आता स्पष्ट होत होत्या. अन्नाच्या कणांपासून प्रोटीनची, प्रथिनांची निर्मिती होते आणि डीएनए स्वतःची कार्बन कॉपी, नक्कल बनविते. सजीवांच्या सचेतनतेमध्ये ह्या रासायनिक प्रक्रिया मूलभूत आहेत.
परंतु बीजांड म्हणजे जीन्सनी भरलेल्या केंद्रिकांची, न्युक्लिअसची पिशवी नाही. भ्रूणशास्त्रज्ञ (एंब्रिऑलॉजिस्ट) आणि जीवशास्त्रज्ञ सतत सांगत असतात की प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या पेशींमधील सायटोप्लाझ्मक जीन्स तसेच केंद्रिकेबाहेर असणाऱ्या घटकांमुळे आनुवंशिक गुणधर्मांचे नियंत्रण होत असते. पेशीच्या केंद्रिकेच्या बाहेर पण आवरणाच्या आत असलेले प्राणवायू शोषून घेणारे मायटोकॉन्ड्रिया आणि पानांना रंग देणारे क्लोरोप्लास्ट हेच ते घटक आहेत. वेगळ्या भाषेत सांगायचे तर जीन्स काही केवळ पेशी केंद्रातच असतात असे नाही. वनस्पती आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये जीन्स विखुरलेले असतात. १९३० साली इंग्लंड आणि जर्मनीमध्ये यीस्ट आणि बुरशी यांचे संशोधन झाले होते. तेव्हा त्यातील मायटोकॉन्ड्रियामध्येही जीन्स असतात हे सिद्ध झाले होते. ह्या ऑर्गनेल्समध्ये हवेमधील प्राणवायू आणि अन्नकणांची प्रक्रिया घडून येते आणि त्यातून रासायनिक ऊर्जा निर्माण होते. वनस्पतींच्या पेशीमध्ये क्लोरोप्लास्ट, हरितकण असतात. त्यांच्याद्वारे सूर्यप्रकाशाचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये आणि अन्नामध्ये होते. शेवाळे आणि वनस्पतीच्या क्लोरोप्लास्टमध्ये त्यांच्या स्वतःच्या जीन्स उपस्थित असतात ह्याचा शोध विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच एच.डी. व्हाईस आणि सी. कोरेन्स या शास्त्रज्ञांनी लावला होता. या दोनही शास्त्रज्ञांना जीन्सचा शोध स्वतंत्रपणे लागलेला होता. मूळ वनस्पतीकडून मिळालेले हरितद्रव्य सहसा एकाच पालकाकडून, स्त्रीलिंगी पालकाकाडूनच दिले जाते. तिच्या हरितद्रव्याच्या गुणानुसार वनस्पतीचे हिरवेपण ठरते. आनुवंशिक गुणांचे संक्रमण येथे पेशीकेंद्रिकेवर अवलंबून नसते, हे दिसून येते. आनुवंशिकतेच्या दृष्टीने पेशीमधील सायटोप्लाझमकडे दुर्लक्ष करणेच योग्य असते, हे वाक्य मी जेव्हा प्रथम वाचले होते आणि टी.एच. मॉर्गन ह्या कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापकांच्या भाषणात ऐकले होते ते मला अतिसुलभ आणि उद्धटपणाचे वाटले होते. तेव्हा न्युक्लिअस आणि तिच्याभोवतालच्या सायटोप्लाझम द्रव्यातून होणारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण हे सबंध पेशीद्वारे होते असे मानले जात असे.
कार्ल सगान ह्यांनी माझ्या तारुण्यात मला वैज्ञानिक बनवण्यात असलेल्या भूमिकेपेक्षाही महत्त्वाची भूमिका शिकागो युनिव्हर्सिटीमधील कॉलेजने बजावलेली आहे असे मी मानते. माझ्या विज्ञान-शिक्षणात एक वर्ष निसर्गविज्ञान-२ हा अभ्यासक्रम फार कळीचा होता. पाठ्यपुस्तकांपेक्षाही आम्ही वैज्ञानिकांनी लिहिलेले साहित्य जास्तच वाचत असू. चार्ल्स डार्विन, ग्रेगोर मेंडेल, जर्मन जीवशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन ह्यांच्या आणि बीजांड-फलनाचे, व बॅक्टेरियामधील द्रव्यातील सातत्य शोधणारे ऑगस्ट वाइझमन ह्यांच्या लिखाणाचा त्यात समावेश होता. त्याचबरोबर नवडार्विनवादी गणितज्ज्ञ आणि जेनेटिक्सचे अभ्यासक जे.बी.एस. हाल्डेन, आर.ए.फिशर ह्यांच्या लिखाणाचाही समावेश होता. ह्या सर्वांनी तसेच इतर अनेकांनी पॉप्युलेशन जेनेटिक्समधील गणिती तत्त्वे विकसित केली होती आणि त्यांच्या आधारे त्यांनी नवडार्विनवादाची पताका फडकवली होती. निसर्गविज्ञान-२ च्या अभ्यासाने पॉप्युलेशन जेनेटिक्स, गर्भविज्ञान, आणि इतर अनेक संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केले. आनुवंशिकता म्हणजे काय? दोन पिढ्यांना जोडणाऱ्या साखळ्या कोणत्या? बीजांडे आणि शुक्राणू यांच्या संयोगातून फलित होणाऱ्या अंड्यामधून संपूर्ण प्राण्याचा विकास कसा होतो? विज्ञान म्हणजे ज्ञानप्राप्तीचा मार्ग, असे आम्हाला आमच्या ह्या अभ्यासक्रमाने शिकवले. अशा प्रकारच्या तात्त्विक प्रश्नांना विज्ञानाच्या मदतीने उत्तरे कशी शोधता येतात ह्याचे शिक्षण आम्हाला दिले. सखोल, गूढ अशा या आनुवंशिकतेने मला पूर्ण भारून टाकले होते.
त्याकाळी शिकागो विद्यापीठातील उच्च प्रतीचे विज्ञान, तेथील संशोधनाच्या सच्च्या, पारदर्शक, सहज उपलब्ध आणि प्रोत्साहित करणाऱ्या पद्धती, ह्या आजच्या तांत्रिकतेवर अवास्तव भर देणाऱ्या वृत्तीपेक्षा खूपच वेगळ्या होत्या. विज्ञान हे गंभीर तात्त्विक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे साधन आहे असे तेव्हा मानले जात असे. विज्ञान आणि तत्त्वज्ञान एकच आहेत असे मानले जात असे. आपण कोण आहोत? आपण कसे काय काम करू शकतो? अशा मूलभूत पण वेडपट प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नामधून माझे वैज्ञानिक कार्यक्षेत्र घडले ह्याबद्दल मला अजिबात शंका नाही. अभ्यासक्रम पुरा करताना महान जीवशास्त्रज्ञ जणू माझ्याशी हितगुज करीत आहेत असा मला भास होत असे. व्हान्स टार्टर हा माझ्यासमोर प्रचंड अशा स्टेनटॉर प्राण्याचे शवविच्छेदन करीत आहे; थॉमस हंट मॉर्गन न्युक्लिअसचे महत्त्व माझासमोर विशद करीत आहे; हेरमन हा जीवनाची “बदल, पुनरुत्पादन आणि पुन्हा बदलांचे पुनरुत्पादन’ अशी व्याख्या करतो आहे; थिओडेसिअस डोबझान्स्की हा फळांच्या माशीमागे धावत आहे; जीन्स, क्रोमोझोम्स, पर्यावरणाचा आणि उत्क्रांतीच्या इतिहासाचा शोध घेता घेता माझ्या कानात गुणगुणतो आहे; असे मला वाटे. पाईप ओढणारा ए.एच. स्टुटेव्हॉट कोलंबिया विद्यापीठातील फळमाशी (चिलटे) प्रयोगशाळेत बसून फळमाश्यांच्या गुणधर्माचे संक्रमण हे रंगसूत्रांच्या आधारे समजून घेता येईल का हे बघत आहे, असे दिसत असे. अनुवंशशास्त्राचे, आणि काही उत्क्रांतिवादी संशोधकांच्या कामाचे गारुड तेव्हा माझ्यावर झाले होते. विज्ञानातील ह्या सुसंगतीचा शोध विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षांत अमेरिकेतील वैज्ञानिकांनी घेतला. जीवशास्त्राचा, विशेषतः अनुवंशशास्त्राचा इतिहासपट मला उलगडताना दिसला. सुरुवातीपासूनच त्यामागील रासायनिक कारणपरंपरा शोधण्याची गरज मला वाटू लागली.
उत्क्रांतीबद्दल माझ्या मनात एक प्रचंड आकर्षण निर्माण झाले होते. डोबझान्स्कीचे शब्द मला आजही आठवतात, “जीवशास्त्रामध्ये उत्क्रांतिवादाच्या उजेडातच सर्व गोष्टींचा अर्थ लागू शकतो. कालप्रवाहात झालेले बदल म्हणजे उत्क्रांती आणि ह्या भव्य इतिहासपटाच्या पार्श्वभूमीवरच आपण सजीव सृष्टीचा इतिहास बघू शकतो. उत्क्रांतीचा अभ्यास हा सर्व विश्वाला, त्याच्या ग्रहताऱ्यांसकट सामावून घेण्याइतका विशाल आहे. मानवासहित सर्व सजीवसृष्टीला, आपल्या तंत्रविज्ञानालाही सामावून घेणारा आहे. उत्क्रांती म्हणजेच संपूर्ण इतिहास आहे.”
पदवी घेण्यापूर्वी न्युक्लिअसमधील जीन्सच्याद्वारे सजीवांचे सर्व गुणधर्म ठरतात, ह्याबद्दल मी साशंक झाले होते. ही कल्पना मला अतिशय अवगामी पद्धतीची (रिडक्शनिस्ट) आणि मर्यादित आहे असे वाटत असे. कोणत्या तरी जीन्सच्या अनियंत्रित बदलामधून फुले आणि डोळे विकसित झाले असतील हे कसे शक्य आहे ? माझी ही शंका मनात घेऊनच मी कार्लबरोबर विस्कॉन्सिन येथे पुढच्या अभ्यासाची सुरुवात केली. पेशींच्या अंतर्गत रसायनांचा अभ्यास करण्यासाठी त्या पेशींचे वाटून चूर्ण करण्यापेक्षा पेशीच्या संपूर्ण अंतर्गत रचनेचे निरीक्षण करावयाचे मी ठरविले. तेव्हाच मला क्रोमोझोम्स आणि पेशीमध्ये प्रत्यक्षपणे दिसणाऱ्या ऑर्गनेल्सनी कोड्यात टाकायला सुरुवात केली. मी त्यांच्या आनुवंशिक संक्रमणाचे नियम शोधण्याच्या मागे लागले. १९६३ सालापर्यंत अंड्यातील सायटोप्लाझममध्ये गूढ जीन्सचे अस्तित्व असते, ह्याची नोंद अनेक शोधनिबंधांतून झालेली होती. स्त्रीलिंगी हिरव्या वनस्पतीचा पांढऱ्या पुल्लिंगी वनस्पतीबरोबर संकर केला असता केवळ हिरव्या रंगाचाच गुण वनस्पतीच्या प्रजेमध्ये संक्रमित होतो; त्याचबरोबर त्याच वनस्पतीच्या पांढऱ्या स्त्रीलिंगी वनस्पतीचा हिरव्या वनस्पतीबरोबर संकर केला असता प्रजा केवळ पांढया रंगाचीच निर्माण होते असे आढळले होते. असे का? स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी वनस्पतींच्या केंद्रिकेमध्ये असलेल्या जीन्स जर समप्रमाणात पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असतील तर त्या कोणत्या पालकाकडून मिळाल्या आहेत, हा प्रश्न निरर्थक ठरला असता. म्हणूनच आनुवंशिक गुणांच्या संक्रमणामध्ये अंडे किंवा वनस्पतींच्या पेशी म्हणजे केवळ केंद्रिका असलेली पिशवी आहे, हे कारण मला तरी पुरेसे वाटले नाही. ह्या माझ्या विचारांना अगोदरच्या संशोधकांनी केलेल्या लिखाणातून दुजोरा मिळत होता. म्हणूनच टी.एच.मॉर्गन ह्यांचा सायटोप्लाझमकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला मला पटला नाही.
अनुवंशशास्त्राचा रसायनशास्त्राशी असलेला संबंध प्रस्थापित करताना संशोधकांची दृष्टी मर्यादित होती अशी शंका मला वाटायला लागली. त्यांचा न्युक्लिअसवर असलेला संपूर्ण भरही मला अवास्तव वाटायला लागला. अनेकांनी केलेल्या प्रयोगांतून लक्षात आले की पेशीच्या आत दोन प्रकारचे ऑर्गनेल आपआपल्या आवरणात असून ते न्युक्लिअसच्या बाहेर असतात. प्लास्टिड आणि मायटोकॉन्ड्रीया ह्या दोघांमुळे आनुवंशिकतेवर मोठा परिणाम होतो, ह्या संदर्भाने मला पेशींचा विकास आणि आनुवंशिकता ह्या इ.बी.विल्सनच्या (१९२८) पुस्तकापर्यंत नेले. विल्सन ह्यांनी त्यांच्या पुस्तकात पेशींच्या ऑर्गनेल्स आणि बॅक्टेरियांमध्ये असलेले साम्य नोंदले होते. प्लास्टिड आणि मायटोकॉन्ड्रीया यांना त्यांनी स्वतंत्र जीवांचे स्थान दिले होते. ह्या संदर्भातून मला त्यांच्या सहवासाविषयक साहित्याकडे जाण्याची दिशा दाखवली. निसर्गामध्ये विस्तृत प्रमाणात विविध सजीवांच्या सहवासाचा, विशेषतः अतिसूक्ष्म जीवांच्या सहनिवासी नात्याचा अभ्यास करायला प्रोत्साहन दिले. खाखिनांनी केंद्रिकेच्या बाहेरील घटक हे पूर्वीच्या बॅक्टेरियाचे अवशेष असल्याची शक्यता वर्तवली होती. मला त्यांचे म्हणणे पटायला लागले. आनुवंशिकता दोन प्रकारची असावी आणि पेशीच्या आत दुसऱ्या पेशी असाव्यात असे वाटू लागले. मेरेझेकोहस्की यांनाही माझ्याप्रमाणेच ही कल्पना सुचली होती.
१९६० साली मी कॅलिफोर्निया येथील बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये पदवीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. बर्कलेमध्ये पॅलिऑन्टोलॉजी (पुराजीवशास्त्र), उत्क्रांतिशास्त्र आणि जेनेटिक्स विभागाचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. पण मला मात्र तीनही विषयांचा अभ्यास करून उत्क्रांतीच्या आणि पेशींच्या इतिहासाचा शोध घ्यायचा होता. तेथील साचेबंद विषयांचे कप्पे बघून मला धक्काच बसला. स्वतःच्या विषयापलिकडे असलेल्या ज्ञानाबद्दल तेथे संपूर्ण अनभिज्ञता होती. सूक्ष्मजीवांच्या आनुवंशिकतेचा अभ्यास स्वतंत्र प्रयोगशाळेत, विद्यापीठाच्या पूर्व भागात होत असे. परंतु तेथे काम करणारे लोक मात्र रसायनशास्त्रज्ञ असत. त्यांना वनस्पती आणि प्राण्याच्या पेशींच्या आनुवंशिकतेबद्दल अत्यंत तुटपुंजी माहिती असे. त्यातील अनेकांनी तर केंद्रिकेबाहेर असलेल्या सूक्ष्मजीवांबद्दल कधी ऐकलेलेही नसे. त्या विभागातील अनुवंशशास्त्रज्ञांना, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांना (मायक्रोबायोलॉजिस्टना) किंवा विषाणुशास्त्रज्ञांना (व्हायरोलॉजिस्टना) शेवाळ्यामधील सायटोप्लाझमबद्दल काहीही माहिती नसे. काही शास्त्रज्ञ तर इतके सूक्ष्मजीवकेंद्री होते की त्यांना पेशीविभाजनातील मायटोसिसची (केंद्रिका असलेल्या एका प्रकारच्या पेशीविभाजनाची) माहिती नसे. एका विशिष्ट प्रकाराबद्दल, मियोसिसबद्दल त्यांना काही शिकविले जात नसे आणि ते स्वतः विचारही करीत नसत. त्याचे सर्व नियम मेंडेल ह्यांच्या आनुवंशिकतेच्या सिद्धान्तामध्ये मूलभूत असले तरी त्याची दखल अभ्यासक घेत नव्हते. अनेकांना तर केंद्रिका असलेल्या पेशींच्या आनुवंशिकतेबद्दलही काही माहिती नसे. भौतिकी आणि रसायनशास्त्र शिकलेले हे शास्त्रज्ञ इतके उद्दाम असत की त्यांना आपल्या अज्ञानाचेही ज्ञान नव्हते. अनेकजण रसायनशास्त्र उत्तम प्रकारे शिकवीत पण त्याचबरोबर ते आपला उद्दामपणा आणि अज्ञानही विद्यार्थ्यांना बहाल करीत. याउलट पश्चिमेकडील जेनेटिक्सच्या विभागात मला आकर्षित करणाऱ्या (तंतू असलेले जीव) आनुवंशिकतेबद्दल काही माहिती नव्हती. तेव्हा परामेशियम ह्या एकपेशीय सीलिएटबद्दल मला अतिशय आकर्षण निर्माण झाले होते.
बाह्य परिस्थितीनुसार निर्माण झालेले बदल आनुवंशिक पद्धतीने संक्रमित होत नाहीत, ही समजूत तेव्हा प्रचलित होती. मात्र सोनबॉर्न आणि त्यांचे फ्रेंच सहकारी जेनी बेसन ह्यांनी केलेले संशोधन ह्या सर्वसाधारण प्रचलित सिद्धान्ताला आणि समजुतींना छेद देणारे होते. पेशीच्या आत असलेला, पॅरामेशिअमचे तंतू (सिलिआ) शस्त्रक्रिया करून त्यांच्या मुळापासून कापले आणि ते १८० अंशानी फिरवून पेशीच्या आतल्या आवरणाला पुन्हा जोडले असता, हे केलेले कृत्रिम बदल पेशीच्या पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये संक्रमित झालेले दिसले. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे तर प्रयोगाद्वारे तंतूंच्या रचनेमध्ये शास्त्रज्ञांनी केलेले बदल आनुवंशिकतेद्वारे किमान दोनशे पिढ्या संक्रमित झाल्याचे आढळले. बाह्य कारणाने झालेले बदल आनुवंशिक पद्धतीने संक्रमित करण्याचे हे प्रयोगशाळेतील उदाहरण पारंपरिक समजुतीला छेद देणारे होते. त्याकाळी अशा गुणसंक्रमणाला लामार्कियनिझम म्हणून हेटाळले जात असे.
माझ्या आवडीच्या विषयातले बारकावे तपासणे हा माझा बौद्धिक छंद होता. १९६० सालातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही संशोधन माणसाच्या उन्नतीसाठी, सुखासमाधानासाठी किती उपयोगी आहे ह्याचाच विचार होत असे. अशा वातावरणात माझे पेशी आनुवंशिकतेमधील पॅटर्न शोधण्याचे संशोधन समाजविरोधी मानले जात असे. मला जो विषय महत्त्वाचा वाटत असे तो माझ्या सहकारी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना क्षुल्लक वाटत होता.
बर्कलेमधील अनुवंशशास्त्रज्ञांच्या अशा वृत्तीचा अनुभव घेत असूनही अनुवंशशास्त्र हे उत्क्रांतीचा इतिहास जाणण्यासाठी अतिशय महत्त्वाचे होतेच. मेंडेल ह्यांच्या आनुवंशिक सिद्धान्ताला छेद देणारी अनेक उदाहरणे मी जमा करीत गेले. झिआ (एक प्रकारचा मका), मिराबिलीज जलापा (Mirabilis jalapa), ओनेथोरा (Oenothera) आणि क्लॅमिडोमोनस (Chlamydomonas) नावाचे एक शेवाळे यासारखी उदाहरणे मी जमा केली. केंद्रिका नसलेल्या, प्राणवायूची श्वसनक्रिया नसणाऱ्या, मंदगतीने वाढणाऱ्या आणि वसाहत बनणाऱ्या एका प्रकारच्या यीस्टचा मी अभ्यास केला. काही पॅरामेशिया हे त्यांच्यापेक्षा वेगळे आनुवंशिक गुण असणाऱ्या जीवांना मारण्यासाठीच जन्म घेतात हे ट्रेसी सोनबॉर्नने नोंदले होते. ह्या सर्वांचा अभ्यास केल्यामुळे केंद्रिकाबाह्य आनुवंशिकता असूच शकत नाही, हे मला मुळीच मान्य करता येत नव्हते. एच.जे.मुलर (१८९०-१९६७) ह्या अनुवंशशास्त्रज्ञाने एक्स-रेमुळे आनुवंशिक बदल होतात हे दाखवून दिले होते. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सैद्धान्तिकदृष्ट्या जीन्सचे स्वतंत्र अस्तित्व सजीवांसाठी मूलभूत असले पाहिजे असे त्यांनी दाखवून दिले होते. त्यांच्या अतिशय तरल संशोधनाचा आधार असूनही माझ्या मते तोपर्यंत वनस्पती किंवा प्राण्यांच्या केंद्रिकेच्या बाहेर जीन्स अस्तित्वात असल्याचे कोणालाही प्रत्यक्षात सिद्ध करता आलेले नव्हते. एडुआर्ड चॅटन (१८८३-१९४७) ह्या फ्रेंच मरीन जीवशास्त्रज्ञांच्या आणि लेमुएल रॉस्को क्लीव्हलॅन्ड (१८९२-१९६९) ह्या हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांनी केलेल्या अतिशय प्रगल्भ अशा संशोधनाच्या वाचनात मी स्वतःला गाडून घेतले. ट्रेसी सोनबॉर्न ह्यांचे असंख्य शोधनिबंध मी वाचले. अतिशय सुंदर लिखाण करणारा हा संशोधक प्रयोग करताना स्वतःचे विचार मोठ्याने बोलत असे. मॅडिसन, विस्कॉनसिन विद्यापीठातले माझे ऋषितुल्य गुरु व्हॅन्स रीस ह्यांनी ऑर्गनेल्सच्या अतिशय शक्तिशाली इलेक्टॉन मायक्रोस्कोप वापरून काढलेल्या, अनेकपटीने मोठ्या केलेल्या फोटोंचा, इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ्सचा, मी खूप पाठपुरावा केला.
यीस्ट, प्रोटिस्ट, वनस्पती आणि प्राण्यांच्या पेशींच्या आत पण केंद्रिकेबाहेर ‘जीन्स’ नसून ते सूक्ष्मजंतू (बॅक्टेरिया) असल्याचा माझा अंदाज होता. मी जमा करीत गेलेल्या अनेकविध, असंगत माहितीच्या आधारे माझ्या अस्पष्ट कल्पनांना आधार मिळत गेला. सायटोप्लाझमच्या आनुवंशिकतेसंबंधात जसे जसे मी वाचन करीत गेले तसे तसे मला पेशीच्या आवरणाखाली असणाऱ्या लहान ऑर्गनेल्सचे प्लास्टिड, मायटोकॉन्ड्रीया आणि सिलिआ असे तीन प्रकार आहेत असे आढळले. त्यांच्या वर्तनामधून आणि त्यांच्यातील रासायनिक प्रक्रियांतून त्यांचे सूक्ष्मजंतूंशी, बॅक्टेरियांशी असलेले साधर्म्य माझ्या लक्षात आले. काही उदाहरणांत तर पेशीच्या आत अडकलेला सूक्ष्मजंतू आणि पेशीच्या विभाजनात आनुवंशिकपणे मिळणारे आर्गनेल्स यांच्यामध्ये वेगळेपण शोधणेही अवघड आहे असे आढळले. निळ्या हिरव्या रंगाचा जंतू स्वतःच्या बाह्य आवरणाचा त्याग करून पेशीच्या आत सायटोप्लाझममध्ये शिरून आरामात वाढू शकतो. ज्याला सर्वजण हरितद्रव्य (क्लोरोप्लास्ट) म्हणतात तो एक सूक्ष्मजंतूच असावा अशी मला खात्री वाटू लागली.
सायटोप्लाझममध्ये असलेल्या ऑर्गनेल्सच्या आनुवंशिकतेबद्दलचे वैज्ञानिक साहित्य वाचून मला जो आत्मविश्वास मिळाला त्याच्याच आधारे मी प्लास्टिड म्हणजे पेशीच्या आत अडकलेला सूक्ष्मजंतू आहे आणि त्यात त्याचा मूळचा डीएनए सूक्ष्मजंतूंचा असावा असा अंदाज मी व्यक्त केला. बर्कले विद्यापीठातील अनुवंशशास्त्र-विभागाच्या वाचनालयापासून सुरू झालेला माझा शोधप्रवास आजही सुरूच आहे. पेशी आवरणाच्या आत असलेल्या सूक्ष्मजीवांचे सहकार्य आणि नातेसंबंधांबद्दलचे शोधनिबंध आजही मी हावरटासारखे वाचत असते. मी आणि माझे विद्यार्थी आजही आमच्या ज्या मध्यवर्ती कल्पनेच्या अनुषंगाने अभ्यास करीत आहोत ती अशी की केंद्रिका असलेल्या पेशींचा जन्म हा विविध जातींच्या सूक्ष्मजंतूंच्या संयोग (संकर) प्रक्रियेतून, उत्क्रांत होत होत झाला आहे.
एकमेकांना स्वतःमध्ये सामावून घेण्याच्या, सातत्याने घडत गेलेल्या प्रक्रियेद्वारे (सीरियल सिंबायोसिसच्याद्वारे) सूक्ष्मजंतूंचे एकापाठोपाठ एक संकर घडले असावेत, ह्याबाबतचे माझे संपूर्ण विचार प्रकाशित होण्यापूर्वी पंधरावेळा नाकारले गेले होते. तेव्हा ते व्यवस्थितपणे लिहिलेले नव्हते हे एक कारण होते. माझ्या ह्या वैज्ञानिक शोधनिबंधाला तेव्हा मी विभाजन होणाऱ्या पेशींची निर्मिती असे शीर्षक दिले होते. शेवटी ते लिखाण १९६६ साली जेन्स डॅनिएली ह्यांनी वैयक्तिक पाठपुरावा केला म्हणून स्वीकारले गेले. डॅनिएली हे सैद्धान्तिक जीवशास्त्र (थिओरेटिकल बायोलॉजी) ह्या जर्नलचे संपादक होते. १९६७ साली माझा निबंध लिन सगान ह्या माझ्या पहिल्या लग्नाच्या आडनावाने प्रकाशित झाला. माझ्या ह्या सिद्धान्ताचे व्हॅन्कूव्हर येथील कोलंबिया विद्यापीठातील प्रो. मॅक्स टेलर ह्यांनी एसईटी (Serial Endosymbiosis Theory) असे नामकरण केले.
पुढे मी दुसरे लग्न केले आणि माझ्या मुलीच्या, जेनिफरच्या वेळी गरोदर असताना मला घरी राहण्यासाठी पुष्कळ वेळ मिळाला. घरातील ह्या सुट्टीच्या काळात कोणताही व्यत्यय न येता मला भरपूर विचार करायला अवसर मिळाला. त्यामुळे मला माझा सिद्धान्त विस्तृत स्वरूपात लिहायला स्फूर्ति मिळाली. १९६७ साली माझ्या पेशीनिर्मितीचा विचार मी बीजरूपाने संक्षिप्त स्वरूपात लिहिला होता. पुढे तो अंकुरला. वाढला आणि त्याला अनेक धुमारे फुटून त्याचे एक लहान पुस्तकाच्या हस्तलिखितामध्ये रूपांतर झाले. पुस्तकाच्या प्रकाशकाने दिलेल्या मुदतीमध्ये लिखाण पूर्ण करण्यासाठी मी रात्र रात्र जागून टाईप करीत असे. तेव्हा मला कोणीही ओळखत नसल्यामुळे पुस्तकासाठी काही आगाऊ मोबदला मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय पुस्तकात आवश्यक चित्रे काढण्यासाठी मला स्वतःलाच खर्च करावा लागला. परंतु घरामधून मला संपूर्ण सहकार्य मिळाले. शेवटी माझ्या दृष्टीने पुस्तकाचे लिखाण पूर्ण झाले. सकाळी मुले उठण्यापूर्वीच सर्व कागद एकत्र करून मी ते एका खोक्यामध्ये घातले आणि पोस्टाने प्रकाशकाकडे रवाना केले. न्यूयॉर्क येथील अकॅडेमिक प्रेसकडे प्रकाशनाचे सर्व हक्क दिलेले होते. पण त्या खोक्याची साधी पोचपावतीही मिळाली नाही. पाच महिने उलटले आणि एके दिवशी ते खोके पुन्हा माझ्या दारात येऊन पडले. त्यानंतर कितीतरी दिवसांनी पुस्तक प्रकाशित करण्याबाबत असमर्थता व्यक्त करणारे संपादकाचे पत्र आले. अकॅडेमिक प्रेसच्या विशेषज्ञांनी माझ्या पुस्तकावर नकारात्मक शेरे मारल्यामुळे पुस्तक छापता येत नाही, असा खुलासा त्यांनी केला. पण त्या पत्रावर ना प्रकाशकांची सही होती ना काही कारणे दिली होती. पुढे एक वर्षाने येल विद्यापीठाने माझ्या पुस्तकावर संपादकीय संस्कार करून ते छापून प्रसिद्ध केले. माझ्या संशोधनाची टेलर ह्यांनी समीक्षा केली. त्यामुळे एसईटी सिद्धान्ताला मान्यता मिळाली. कालांतराने अकॅडेमिक प्रेसने दिलेले दुःखही कमी झाले.
१९७०-८० च्या दशकामध्ये एसईटी सिद्धान्ताने अनेक विद्यार्थी आणि संशोधकांना आकर्षित केले. मला माहीत असलेल्या आणि नसलेल्या अनेकांच्या प्रयोगांनी त्यात भर घातली. मोलेक्युलर बायोलॉजी, अनुवंशशास्त्र आणि अतिशय शक्तिशाली इलेक्ट्रॉनिक्स सूक्ष्मदर्शक ह्यांच्या मदतीने झालेल्या अभ्यासातून एकोणिसाव्या शतकामध्ये व्यक्त झालेल्या काही वैज्ञानिक संकल्पनांना प्रत्यक्ष पुरावे मिळाले. एकोणिसाव्या शतकात वनस्पती आणि प्राणी (तसेच बुरशी आणि केंद्रिका असलेल्या अनेकविध सजीव) यांच्या शरीरात असलेल्या पेशींची निर्मिती सहवासात आलेल्या, विशिष्ट क्रमाने संकर झालेल्या विविध प्रकारच्या जंतूंमुळे झाली असावी, असे मांडले गेले होते ते विसाव्या शतकात सिद्ध करता आले. आजही संकरप्रक्रिया कार्यरत असलेली दिसते. आज माझा एसईटी सिद्धान्त सोप्या स्वरूपात शाळा कॉलेजच्या पुस्तकांमधून वैज्ञानिक सत्य म्हणून शिकविला जातो. मला त्याचे आश्चर्य वाटले नाही, तरी त्यामुळे मी व्यथित होते. अतिशय ठाशीवपणे, ठाम, पण चुकीच्या पद्धतीने तो सिद्धान्त सांगितला जातो. तो सांगताना तर्कशुद्धपणे शिकवले जात नाही. विज्ञानाप्रमाणेच आता एसईटी कोणत्याही संशयाशिवाय मान्य केला जातो आहे. असो. हे असेच चालत असावे.
एसईटी हा संकरप्रक्रियेसंबंधीचा सिद्धान्त आहे. दोन वेगळ्या परंपरा, वेगळे गुणधर्म असलेल्या पेशींच्या संकराचा हा सिद्धान्त आहे. प्राणवायू शोषून घेणाऱ्या पेशींच्या निर्मितीअगोदर लिंगभेद असलेल्या पेशी एकत्र येण्याची शक्यता नव्हती. मियोटिक पद्धतीने अंडे आणि शुक्राणू एकत्र येऊन अंडे फलित होण्याची प्रक्रिया ही त्यानंतरच घडून येऊ शकली. एकानंतर एक अशा संकरप्रक्रियेमुळे आपल्या लिंगपद्धतीचा लिंगसंकर शक्य झाला. अंडे आणि शुक्राणू यांचा संयोग (सेक्स) ही एक प्रकारची संकरप्रक्रिया आहे. यात दोन वेगळे गुणधर्म, वेगळ्या परंपरा असलेल्या दोन पेशींचा संकर होतो. अशा संकरातून निर्माण झालेली पेशी मूळ पेशींशी नात्याने जोडलेली असते. अश्या संकरप्रक्रियेचा क्रम उलटवता येत नाही. सीरियल एंडोसिंबायोसिस (एकापाठोपाठ एक) असा संकर झालेल्या पेशींमधील नाते हे खूप दूरचे असले तरी ते अपरिवर्तनीय होते.
८ संकेत अपार्टमेंटस्, उदयनगर, पाचपाखाडी, ठाणे ४०० ६०२