तोडफोड, दमबाजी, घोषणाबाजी याच्यापलीकडे जाऊन स्थानिकांच्या हिताचे विवेकी राजकारण करणाऱ्यांची या राज्यात गरज आहे. परंतु भावनिक हिंदोळ्यावर बसून स्वतःचे झोके आभाळात घेऊन जायचे आणि तेथून हात उंचावून भक्तांना दर्शन द्यायचे, याच पद्धतीने अस्मितेचे राजकारण सुरू आहे. राज्याच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिण्ट’ राज्यावर आल्यानंतर बनविता येत नाही, ती ‘ब्ल्यू प्रिण्ट’ दाखवून राज्यावर यावे लागते. परंतु सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही राजकारण केवळ ‘प्रिण्ट’च्या दिशेने जाणारे आहे. “प्रिण्ट’चा शुद्ध मराठी अर्थ ‘छापणे’ असा होतो आणि ‘छापणे’चा अर्थ काय होतो हे मराठी माणसाला वेगळे सांगण्याची गरज नाही.
[दि.६ फेब्रुवारी २०१० च्या लोकसत्तामधील ‘राहुलने केली सुटका’ या कुमार केतकर यांच्या संपादकीया मधून साभार]