इतिहास लिहिण्याच्या पद्धतींमागच्या भूमिकांचा आढावा घेणारा रा.ह.तुपकरींचा लेख या अंकात आहे. त्यांच्या आगामी ग्रंथातील इतिहास या प्रकरणाचा तो संक्षेप आहे. इतिहासकार व त्याचा वर्तमानकाळ यांचा त्याने लिहिलेल्या इतिहासावर परिणाम होणारच. पण व्यक्तिसापेक्षता मान्य करूनही ते कल्पकतेतून लावलेला अर्थ आणि बुद्धिपुरस्सर केलेली मोडतोड…… (यांतील) सीमारेषा फार पुसट असतात, असा महत्त्वाचा इशारा देतात.
कथाकथनात्मक, मार्क्सवादी, आधुनिकतावादी व आधुनिकोत्तरवादी अशा चार भूमिका तुपकरी नोंदतात. कथाकथनात्मक, मार्क्सवादी व आधुनिकतावादी भूमिकांमध्ये त्रुटी तर आहेतच. परंतु त्या कोणत्याही भूमिकेत व्यक्तिसापेक्षता हा गुण मानून त्याला मान्यता दिली जात नाही. उलट ती अपरिहार्य पण नकोशी बाब मानून तिचा प्रभाव कमीत कमी असावा, लेखकाचे पूर्वग्रह सौम्य व स्पष्टपणे नोंदलेले असावे, असेच मानले जाते. विशिष्ट इतिहासकृतींत व्यक्तिसापेक्षता व पूर्वग्रहांमुळे झालेले प्रदूषण कमीजास्त असणारच; पण ते आवश्यक किंवा इष्ट मानले जात नाही.
आधुनिकोत्तरवादाने मात्र हे बंधन अमान्य केले आहे. व्यक्तिसापेक्षता, कालसापेक्षता, संस्कृतिसापेक्षता, यांना केंद्रस्थान देणारी ही भूमिका आहे. जरा आडवाटेने ही बाब तपासून पाहतो.
वेगवेगळ्या अर्थशास्त्र्यांची व त्यांच्या कल्पनांची ओळख करून देणारे एक प्रसिद्ध पुस्तक आहे द वर्ल्डली फिलॉसॉफर्स (रॉबर्ट हाइलब्रोनर, सायमन अँड शुस्टर, १९५३ व नंतर अनेक आवृत्त्या – आजवर चाळीस लाख प्रती विकल्या गेल्या आहेत!). शास्त्र एकच असताना वेगवेगळ्या लोकांची मते वेगवेगळी का? ती कधीकधी तर एकमेकांना काट मारणारी का असतात? अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला लेखक एक रूपक वापरतो. गावातून एक मिरवणूक जात आहे. वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून ती मिरवणूक पाहत आहेत. आपले अनुभव, त्यांतून घडलेले अग्रक्रम, शेजारचे लोक, उभे राहण्याच्या जागा, या साऱ्यांमधून प्रत्येक जण मिरवणूक या प्रक्रियेला समजून घेत आहे. तिची वर्णने करताना या साऱ्यांचा प्रभाव जाणवणारच.
पण मिरवणुकीची अनेक आकलने जरी अशी व्यक्तिनिष्ठ असली, तरी मिरवणूक ज्या गावातून जाते त्या गावाचा भूगोल व्यक्तिनिष्ठ नसतो. तो मिरवणुकीला काही वस्तुनिष्ठ बंधने पाळायला लावत असतोच. उदा. चढावांवर मिरवणूक धीम्या गतीनेच चालणार, व उतारांवर वेगानेच चालणार. गतीतले हे चढउतार व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोणांमुळे नष्ट होत नाहीत. ते बिनमहत्त्वाचे आहेत, असे मत असू शकते; पण ते नाहीतच, असे म्हणता येत नाही. म्हणजे परिस्थितींची आकलने व्यक्तिसापेक्षच असतात; पण परिस्थितीमध्ये व्यक्तिनिरपेक्ष, फार कशाला, मानवनिरपेक्ष अंगेही असतातच.
बरे, इतिहासाची मांडणी करणाऱ्या व्यक्तींनाही काही तथ्ये तरी अव्हेरता येत नाहीतच. आजचा पुरामानवशास्त्राचा अभ्यास सांगतो की आजच्या रूपातला मानवप्राणी आफ्रिकेत उपजला. हे कधीतरी लाखभर वर्षांपूर्वी झाले. गेल्या लाखभर वर्षांत मात्र मूळ आफ्रिकन असलेला मानवप्राणी अंटार्क्टिका सोडून सर्व खंडांत पसरला. आफ्रिकेचा मानव उपजण्याचा प्रदेश सोडला, तर जगभरात कोठेही मूळनिवासी, आदिवासी, अॅबॉरिजिनी, हे सर्व शब्द केवळ आधी बाहेरून आलेला, येवढेच सांगतात. मूळ भारतीय, मूळ अमेरिकन, या संज्ञा केवळ सध्या येणाऱ्यांच्या आधी आलेले, येवढेच सांगतात. मानवप्राण्याचा उद्भव आफ्रिकेबाहेर झाला असे दाखवणारा विश्वासार्ह पुरावा आज तरी उपलब्ध नाही.
इतिहासाच्या पुनर्लेखनामागे केवळ नवे दृष्टिकोणच नसतात, तर नवे वस्तुनिष्ठ पुरावे असणेही शक्य आहे, आणि असे पुरावे सापडत असतात.
आधुनिकोत्तरी मतांमध्ये हेही नाकारण्याची पद्धत आहे; प्रत्येकच मांडणीवर “असे तुम्ही म्हणता’ असा शेरा मारणे आहे. हे मानव्यशास्त्रांमध्ये तर सोपे असतेच, पण ते नैसर्गिक विज्ञानांमध्येही आहे, असे सांगितले जाते. तुपकरींच्या लेखातही असे दोन ठिकाणी सूचित केले गेले आहे. एका जागी ते म्हणतात, “आता तर पदार्थविज्ञानातही या व्यक्तिसापेक्षतेला मान्यता देण्याचा काळ विकास पावला आहे.” वास्तव असे नाही. हायजेनबर्गचे अनिश्चिततेचे तत्त्व आणि प्रकाश कणरूप असतो की लहरींच्या रूपात असतो, या दोन बाबींचे अर्धवट माहितीतून झालेले आकलन भौतिकीत व्यक्तिसापेक्षता आणते! हे आकलन कसे चुकीचे आहे, हे भौतिकशास्त्रातील अनिश्चितता तत्त्व (सुधीर पानसे व हेमचंद्र प्रधान, आसु जाने-फेब्रु २००४, अंक १४.१०-११, आधुनिक विज्ञानाचे स्वरूप विशेषांक) या लेखात तपशिलात स्पष्ट केले आहे. हा लेख आसुच्या विशेषांकाच्या पुस्तकरूपातही प्रकाशित झाला आहे. त्यात लेखक म्हणतात, “प्रथमतः हे नमूद करायला हवे की अनिश्चितता तत्त्वामुळे भौतिकशास्त्रात अनिश्चितता, अंदाधुंदी माजली आहे असे बिलकुल नाही.”
तुपकरींच्या लेखात आणखी एक उल्लेख आहे, “पण आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादामुळे मुळात विज्ञानच निश्चिततेपासून फारकत घेऊन शक्यतांच्याच आधारावर बेतले जाऊ लागले.” हेही वास्तवाला धरून नाही. शक्यतांना (खरे तर संभाव्यतांना) महत्त्व पुंज यामिकीने दिले. आइन्स्टाइन त्यापासून नेहेमीच दूर राहिला. त्याचे “देव फासे टाकून खेळत नाही’ (God does not play dice.) हे वाक्य प्रसिद्ध आहे.
पण आधुनिकोत्तरवाद्यांनी “निसर्गविज्ञानही व्यक्तिसापेक्ष होत आहे’ अशी हाकाटी करून एक प्रकारची अविवेकी बेबंदशाही प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. पॉल फेअराब (Feyerabend) देवनागरी लेखन एखादेवेळी चुकीचेही असेल) या तत्त्वज्ञाच्या पुस्तकांची काही नावे हे ठसवतात – विवेकाला रामराम (Farewell to Reason), पद्धतीच्या पलिकडे (Beyond Method) इ. त्याच्या तत्त्वज्ञानाचा गाभा सबकुछ चलता है (Anything Goes) असा असल्याचे सांगतात. आणि जर निसर्गविज्ञानाबद्दल असे बोलतालिहिता येत असेल, तर मानव्यशास्त्रांमध्ये अनागोंदी योग्यच ठरणार !
मग आधुनिकोत्तरवादाला समर्थक कसे भेटतात? याबाबत एक व्यक्तिगत अनुभव असा – एका स्नेह्याशी आसुचा वर्गणीदार होण्याबद्दल बोलत होतो. त्याने विचारले, “आज आधुनिकोत्तरवाद, आकृतिबंधोत्तरवाद यांच्यापर्यंत विचार प्रगत झाला असताना जुन्यापुराण्या विवेकवादाला का चिकटून राहता आहात?’- प्रश्न योग्य आहे! आइनस्टाइनचा स्थलकालसापेक्षतावाद केवळ वस्तूंची स्थाने व गती ठरवण्याची निरीक्षकनिरपेक्ष चौकट नाही, असे सांगतो. स्थाने व गती व्यक्तिसापेक्षच ठरवता येतात. पण मनोव्यापार आणि समाजव्यवहारही व्यक्तिसापेक्ष, संस्कृतिसापेक्षच असतात, याला पुरावा कोणता?
काही बाबी नोंदतो, विज्ञानातील तत्त्वांचे पुरावे म्हणून. आजही अवकाशयानांच्या मार्ग-आखणीपर्यंतच्या तंत्रज्ञानाला न्यूटनची मांडणी पुरते. आइन्स्टाइनच्या मांडणीने नगण्यशा दुरुस्त्या करता येतात, अनावश्यक! परंतु खग्रास सूर्यग्रहणांमधून आइनस्टाइन खरा ठरतो, कारण न्यूटनीय हिशोबात जे तारे सूर्याने झाकले जायला हवे होते, ते आइन्स्टाइनच्या मांडणीतल्या भाकितांप्रमाणे दिसून शकतात. पुंज यामिकीच्या आधाराने घडलेली तंत्रज्ञाने आज मोबाइल फोनपर्यंतच्या उपकरणांत वापरली जातात. त्यांच्यात्यांच्या क्षेत्रांत न्यूटन, आइन्स्टाइन, हायजेनबर्ग, सगळेच लोक उपयुक्त तंत्रज्ञाने पुरवतात. इथे सबकुछ चलता नहीं है! विशिष्ट स्थितीमध्ये विशिष्ट तत्त्वे उपयुक्त ठरतात, एकूण विश्वरूपचित्र मात्र जास्त जास्त प्रगत करता येते; येवढेच या साऱ्यातून दिसते. हे विवेकी आणि व्यवहारी आहे.
आधुनिकोत्तरवाद्यांनी मात्र व्यक्तिसापेक्षता आणि संस्कृतिसापेक्षता यांना केंद्रस्थान दिले. धर्म, धम्म, शिश्रळसळेप आणि ईमान या शब्दांभोवतीचे वाद आठवा. अनुक्रमे हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती व मुस्लिम लोकांचे हे शब्द साधारणपणे मानवी जीवनाच्या एकाच क्षेत्राबद्दलचे विचार, धारणा, नियम, इत्यादींसाठी वापरले जातात. पण “धर्म ही संकल्पना religion पेक्षा व्यापक आहे”, “धम्म म्हणजे धर्म नव्हे”, “ईमान इतर साया त्यासारख्या कल्पनाव्यूहांपेक्षा काटेकोर आहे’, असे हिरिरीने मांडले जात असते. आता शर्ट आणि कुर्ता हुबेहूब एकसारखे नाहीत, पण दोन्ही वस्त्रे शरीरांचा कमरेवरचा भाग झाकतात. परंपरेने किंवा सवयीने कोणाला शर्ट आवडेल, तर कोणाला कुर्ता. पण “छे! तुम्हाला कुर्ता म्हणजे काय ते समजूच शकणार नाही – त्यासाठी भारतवर्षातच जन्माला यावे लागते”, असे म्हणणे कितपत योग्य ?
पण आपल्या समाजाच्या धारणाच खऱ्या, योग्य, इष्ट, असे मानणे कोणालाही सहज पटते. सोबतच इतर समाजांच्या धारणा खोट्या, मूर्खपणाच्या, अनिष्ट, हेही सहज पटते. या अशा गंडग्रस्त विचारांना आधुनिकोत्तरवादी भूमिका मान्यता देते. यात एक वेगळेही अंग आहे. जुने ते सोने ही म्हण मराठीत रूढ आहे. तिच्यावर टोकाची प्रतिक्रिया म्हणजे नवे तेच सोने – किंवा खरीच नवी मांडणी करायची तर नवे तेच डिजिटल ! माझ्या स्नेह्याला जे वाटले, की आधुनिकोत्तरादि वाद म्हणजे प्रगत, आणि विवेकवाद जुनापुराणा, ते यातून येते. कालक्रमात नंतरचे ते जास्त विकसित, जास्त प्रगत, ही भूमिकाही जुने ते सोने मानण्याइतकीच अविवेकी आहे.
भारत गेले शतकभर एका मोठ्या संक्रमणातून जात आहे. स्पष्टपणे शेतीवर बेतलेली जीवनशैली आज सार्वत्रिक नाही. समाजातील जास्त जास्त लोक औद्योगिक जीवनशैलीत शिरत आहेत – कुठेकुठे तर औद्योगिकोत्तर शैलीतही. भारतीय समाज आज प्रामुख्याने ग्रामीणही राहिलेला नाही. अर्धा महाराष्ट्र नागर झाला आहे, आणि दशकाभरात इतर सगळा देशही प्रामुख्याने शहरी होईल. हे संक्रमण सर्व समाजघटकांना एकत्र ठेवणारे असणे शक्य नाही. उलट काही जण नव्याने आकृष्ट होणार, तर काही जण नव्याला नाकारून जुन्याचा पुरस्कार करणार. अशा वेळी इतिहासकार दीर्घदृष्टीने सकारात्मक अशी कोणती क्रिया करू शकतात ? माझे मत असे, की असे संक्रमण इतरत्र कसे झाले याचा इतिहास भारतीय दृष्टिकोनातून, भारतीय भाषा वापरत तपासावा. भारतीय दृष्टिकोण एकछत्री नाही. इतर देशांचा इतिहास मूळ पुराव्यांवरून निष्पादित करणेही शक्य होणार नाही; त्यामुळे इतर देशांचा इतिहासही त्या देशांच्या इतिहासकारांच्या मदतीनेच तपासावा लागणार. असे इतिहासकारही एकाच सुरात बोलणार नाहीत. हे सारे मान्य करूनही आपली स्थिती समजून घेण्यासाठी व तीतून मार्ग काढण्यासाठी, दृष्टी आपल्या इतिहासावरच न रोखता आजूबाजूला पाहणे उपयुक्त ठरेल.
तुपकरींचे मतही यासारखे असेल, असे वाटते, कारण ते इतिहासात (विशेषतः आपल्याच इतिहासात) फार न गुंतण्याचा सल्ला देतात. पण ताजी भूमिका आहे, या कारणामुळे आधुनिकोत्तरवाद किंवा तांत्रिकता – तात्त्विकता यांचा अतिरेक करणारे आकृतिबंधीय व त्यानंतरचे वाद, यांपासून दूरच राहिलेले बरे!