उत्क्रांतिसिद्धान्त, जात आणि जनुके

जाति-विभङ्ग पाणानं, अनामना हि जातियो ।।
एवं नत्थि मनुस्सेसु, लिङ्गं जातिमयं पुथु ।।* –
तथागत गौतम बुद्ध
(मनुष्येतर) प्राणिमात्रांमध्ये भिन्नभाव दाखविणाऱ्या जाती असतात; पण मनुष्यांमध्ये पृथक्ता दाखवणारे जातिमय लिंग नसते. (मज्झिमनिकाय, वासेट्ठसुत्त (२.४८.२.३), उद्धृत – शरद पाटील, दासशूद्रांची गुलामगिरी, खंड १ : भाग २, प्राज्ञ प्रकाशन, वाई, १९८७, पृ. ४५८)
उत्क्रांतिसिद्धान्ताने चार्ल्स डार्विनला (१८०९-१८८२) इतिहासात अढळ असे स्थान प्राप्त करून दिले आहे. जैवविज्ञानाच्या ज्ञानशाखेस त्याने जे योगदान दिले ते आजही त्याच्या काळाइतकेच महत्त्वाचे आणि पायाभूत मानले जाते. मानवाला, तो अगदी आदिमावस्थेत असतानापासून आपली उत्पत्ती आणि विकास कसा आणि कोणत्या क्रमाने होत आला हा प्रश्न भेडसावत होता. त्या प्रश्नाचे वैज्ञानिक स्पष्टीकरणासह उत्तर दिले ते डार्विनच्या उत्क्रांतिसिद्धान्ताने. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा डार्विनप्रणीत सिद्धान्त त्यावेळच्या सर्वच ईश्वरवादी धर्मपंथांसाठी आह्वानास्पद ठरला. कारण सर्वच ईश्वरवादी धर्मांनी सृष्टिनिर्मितीचे श्रेय ईश्वराकडे सोपविले होते. डार्विनने सृष्टिनिर्मितीच्या केंद्रस्थानातून ईश्वराची हकालपट्टी केली व कालौघात ते स्थान त्याच्या उत्क्रांतिसिद्धान्तास प्राप्त होत गेले. डार्विनचे योगदान क्रांतिकारी स्वरूपाचे मानले जाते ते यासाठी, की त्याने जीवसृष्टीची निर्मिती व विकास कसा होत गेला याची उकल करतानाच ईश्वरकेंद्री सिद्धान्ताचा फोलपणाही सिद्ध केला.
डार्विनचा उत्क्रांतिसिद्धान्त त्यावेळच्या ख्रिस्ती-इस्लामिक जगताला आह्वानास्पद वाटला तसाच तो ब्राह्मणीधर्मासही (जो आज हिन्दुधर्म म्हणून ओळखला जातो) आह्वान देणारा ठरला. ख्रिस्ती आणि इस्लामी धर्ममताने ज्याप्रमाणे मानवोत्पत्तीत ईश्वराचे स्थान केंद्रवर्ती मानले होते तसेच ते ब्राह्मणी धर्मानेही मानले होते. सर्वच ईश्वरवादी धर्मसंप्रदाय एकमुखाने संपूर्ण चराचरसृष्टी व मानवजात ही ईश्वराची निर्मिती असल्याचे मानतात. ब्राह्मणी धर्मशास्त्रांनी तर वेगवेगळ्या मिथ्यकथा प्रसृत करून मानवोत्पत्तीचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यात काही ठिकाणी मनू, काही ठिकाणी ब्रह्मा तर अन्य ठिकाणी विराटपुरुषापासून मानवी समाज उत्पन्न झाला व विकास पावला असे म्हटले गेले. एवढेच नव्हे तर वर्णजातिबद्ध सामाजिक स्तरीकरणसुद्धा ईश्वरनिर्मितच आहे असेही त्यांचे म्हणणे होते. त्यांची ही भूमिका उघडपणे उच्चजातवर्णीयांचे सामाजिक-भौतिक हितसंबंध जोपासू पाहणारी होती. स्वजातवर्गाचे उच्चस्थान आणि विशेषाधिकार अबाधित राहावेत म्हणून वर्णजातव्यवस्थासुद्धा ईश्वरनिर्मितच आहे, असे ब्राह्मणी धर्मशास्त्रे सांगत होती. त्यास इथल्या समतावादी चळवळींनी आणि आधुनिक ज्ञानविज्ञानाने जेव्हा आह्वाने दिली तेव्हा शास्त्रीय कसोटीवर वर्णजातव्यवस्थेचे औचित्य सिद्ध करून ती कशी विज्ञानाधिष्ठित आहे, हे भासविण्याचा प्रयत्न ब्राह्मणी छावणीने केला. त्यासाठी छद्मविज्ञानाचा आधार घेतला गेला. आधुनिक ज्ञानविज्ञानाविरुद्धच्या संघर्षात जेव्हा जेव्हा पारंपरिक वैचारिक हत्यारे कुचकामी ठरली, तेव्हा तेव्हा इथल्या परंपरावाद्यांनी आपल्या बचावाखातर आधुनिक ज्ञानाचा उपयोग आपल्या बाजूने करून घेण्याचा खटाटोप केला.यातून डार्विन आणि त्याचा उत्क्रांतिसिद्धान्तही सुटला नाही. प्रस्तुत निबंधात, वर्णजातव्यवस्थेच्या आकलनात डार्विनप्रणीत उत्क्रांतिसिद्धान्त कोणते योगदान देऊ शकतो यावर प्रकाश टाकतानाच महाराष्ट्रातील ब्राह्मणी छावणीकडून डार्विनच्या सिद्धान्तांचा जो विपर्यास करण्यात आला त्याची चिकित्साही केली आहे. तसेच ह्यूमन जिनोम रिसर्च प्रकल्पांतर्गत भारतीय उपखंडातील वर्णजातिसमाजासंबंधी जे संशोधन करण्यात आले त्यातून प्राप्त झालेल्या निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर उत्क्रांतिसिद्धान्त पडताळून पाहण्याचाही प्रयत्न केला आहे.
डार्विनने जैवसृष्टीच्या संदर्भात मांडलेला सिद्धान्त स्पेन्सरने मानवी समाजशास्त्राशी जोडला आणि त्यातून सामाजिक डार्विनवाद साकारला. डार्विनच्या मांडणीतील स्ट्रगल फॉर सर्हायव्हल ही संकल्पना तर स्पेन्सरची सर्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ही संकल्पना रूढ झाली होती. स्पेन्सरने डार्विनच्या लेखनातील नॅचरल सिलेक्शन चे तत्त्व स्वीकारून ते भांडवली अर्थशास्त्राला जोडले आणि डार्विननेही ऑरिजिन ऑफ दी स्पेशीस च्या पाचव्या आवृत्तीत (१८६१) नॅचरल सिलेक्शन साठी पर्यायी शब्द म्हणून सर्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ही संकल्पना योजिली. खरा घोळ तेथेच झाला. ह्या संकल्पना एकमेकांना पर्यायी मानल्या गेल्याने पुढेही अर्थाचा अनर्थ होत गेला. उत्क्रांतिवादानुसार षळीींशी या शब्दाचा अर्थ होता प्रजोत्पत्तीस पुरेसे सक्षम आणि सभोवतालच्या परिस्थितीशी जैविक अनुरूपता/अनुकूलन साध्य करू शकणारे! पण त्याऐवजी अर्थ प्रचलित झाला तो शारीरिकदृष्ट्या बलदंड, सामर्थ्यवान, सशक्त, वा वांशिकदृष्ट्या योग्यतम, श्रेष्ठतम किंवा प्रबळ ! हर्बट स्पेन्सर यांनी अनुकूलन ह्या संकल्पनेच्या आधारे श्रीमंत व सत्ताधारी लोक हे त्या त्या काळातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीशी अधिक जुळवून घेतात, अनुकूलता साधतात असे म्हटले. नैसर्गिक निवडी च्या तत्त्वानुसार प्रबळांनी दुर्बलांवर मात करणे हेदेखील स्वाभाविक, सामान्य आणि योग्यच होय असा दावा ठोकताना सरतेशेवटी निसर्गचक्रात तर रोजच असे घडत असते, अशीही मल्लीनाथी केली. यामुळे सामाजिक-राजकीय-आर्थिकदृष्ट्या उच्चस्थानी असणाऱ्यांना आहे ते वास्तव (जे विषमताग्रस्त आहे) जैसे थे ठेवण्यास आणि अनिबंध स्पर्धेस (मुक्तभांडवलशाहीस) बढावा देण्यास आधार प्राप्त झाला. काही टोकाच्या सामाजिक डार्विनवाद्यांनी तर असेही म्हटले की, दुर्बलांना साहाय्य करणे म्हणजे मूलतः जे अशक्त/अक्षम असतात त्यांच्या प्रजोत्पत्तीस चालना देण्यासारखे आणि पर्यायाने नैतिकदृष्ट्या अयोग्य आणि निसर्गनियमांच्याही विरुद्ध होय. डार्विनने स्वतः सामाजिक डार्विनवादास समर्थन दिले नव्हते. त्याने सामाजिक डार्विनवाद्यांच्या अनेक दाव्यांना विरोधच केला असता हे शक्य आहे. खरे पाहू जाता असे दिसते की, सामाजिक डार्विनवाद हा १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील आर्थिक-राजकीय विस्तारवादाचे फलित होता. युरोप आणि अमेरिकेतील उच्चवर्गीयांकडे आर्थिक आणि राजकीय सत्ता एकवटू लागल्यानंतर श्रीमंत-गरीब ही दरी उत्तरोत्तर वाढत गेली. वाढत जाणाऱ्या वर्गीय विषमतेचे शास्त्रीय स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी भांडवलशाहीचे समर्थन करणाऱ्या विचारवंतांवर येऊन पडली, आणि त्याच गरजेतून सामाजिक डार्विनवादाचा सिद्धान्त उभा राहिला. सामाजिक डार्विनवाद्यांचे निसर्गाच्या कायद्यावरील अतिरिक्त अवलंबन हे सामाजिक, राजकीय, आणि शास्त्रीयदृष्ट्या पुढारलेल्यांना त्यांच्याकडील संपत्तीचे आणि सत्तेचे पुनर्वाटप करण्याची मागणी करणाऱ्या शोषितांना धुडकावून लावण्यास मोकळीक देते. अशा प्रकारच्या सुधारणांमुळे निसर्गनिर्मित उच्चनीचतेस बाधा पोचते, असा त्यांचा दावा असतो. ह्याच दाव्याचा विस्तार करून काही सामाजिक डार्विनवाद्यांनी साम्राज्यवादासही शास्त्रीयदृष्ट्या वैध ठरविण्याचा प्रयत्न केला. साम्राज्यवादी शक्ती ह्या निसर्गतःच श्रेष्ठतम आहेत व त्यांचे इतर राष्ट्रांवरील नियंत्रण हे मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीने यथायोग्यच होय, असेही त्यांचे म्हणणे असते.
सामाजिक डार्विनवादा प्रमाणेच सुप्रजननशास्त्रा नेही डार्विनवादा चा विपर्यास करण्यात मोठा हातभार लावला. फ्रान्सिस गाल्टन याने १८६५ साली कशीशवळीं। ढरश्रशपी रपव उहरीरलींशी
ह्या लेखाद्वारे आणि कशीशवळींतू ऋशपळीी (१८६९) आणि कीरप ऋर्लीश्रीं रपव खी शीशश्रेशिपी (१८८३) ह्या ग्रंथांमधून आधुनिक काळात पहिल्यांदाच सुप्रजननशास्त्र ीसशपळली ही संकल्पना प्रचारात आणली. ऑरिजिन ऑफ स्पीशीज चे वाचन केल्यानंतर त्यातील नैसर्गिक निवडी च्या तत्त्वाचा आधार घेत गाल्टनने सुप्रजनना चा सिद्धान्त उभा केला. त्यात त्याने मानवाची बुद्धिमत्ता (सशपळीी रपव रिश्रशपी) आणि व्यक्तिमत्त्वातील गुणसंपन्नता ही आनुवंशिक असते, असा दावा केला. संपूर्ण जैविकसृष्टीत जशी शारीरिक वैशिष्ट्यांच्या बाबतीत मर्यादा आणि विविधता आढळते तशीच मर्यादा आनुवंशिकरीत्या मानवास प्राप्त होणाऱ्या नैसर्गिक क्षमतेतदेखील असते, असे त्याचे म्हणणे होते. त्याचे पुढचे प्रतिपादन असे होते की, काळजीपूर्वक योग्यतम जोडीदारांची निवड करून त्यांच्यात विवाह घडवून आणल्यास काही पिढ्यानंतर उच्चगुणसंपन्न मानववंश तयार करता येणे शक्य आहे. हाच सुप्रजननशास्त्राचा तात्त्विक पाया होता. आनुवंशिक क्षमता आणि गुणवत्ता विकसित करणारे विज्ञान, म्हणून सुप्रजननशास्त्राचा गवगवा करण्यात आला. यात “श्रेष्ठ प्रतीचे गुण कोणते? ते कसे आणि कुणी निश्चित करायचे ? उच्च दर्जाची क्षमता कशास म्हणायचे ? उत्तुंग बुद्धिमत्ता म्हणजे काय ?” असे अनेक मुद्दे संदिग्धच होते. तथापि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही दशकांत सुप्रजनन चळवळीने चांगलाच जोर पकडला होता. दुसरे महायुद्ध समाप्त होईपर्यंत हा जोर टिकून होता कारण ह्या चळवळीने वंशश्रेष्ठत्वासारख्या छद्मवैज्ञानिक सिद्धान्तांचा आधार घेतला होता. श्रेष्ठ(?) प्रतीच्या मानववंशांची जोपासना करणे व निम्न (?) प्रतीचे मानववंश नष्ट करणे, हा या चळवळीचा प्रमुख उद्देश होता जो पूर्णतः नृशंस व मानवद्रोही होता. अतिशय नृशंस रूप धारण करणारी ही चळवळ लाखो लोकांचे मानवीहक्क पायदळी तुडविण्यास कारणीभूत ठरली. ॲडाल्फ हिटलरच्या नाझी जर्मनीत ही चळवळ लाखो ज्यूंच्या अनन्वित छळास आणि त्यांच्या नरसंहारास कारणीभूत ठरली. सुप्रजननशास्त्राचा संबंध थेटपणे जुळतो तो सामाजिक डार्विनवादाशी, कारण हे दोन्ही सिद्धान्त असे मानतात की, मानवी बुद्धिमत्ता व श्रेष्ठत्व हे आनुवंशिक असते, ज्याच्याकडे ते असते तेच जीवनकलहात योग्यतम म्हणून निवडले जातात व जे अपात्र ठरतात ते नष्ट होतात.
नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाने आणखी एका विकृतीस जन्म दिला; ती म्हणजे वंशवाद! फ्रान्समधील गोबीन् याने १८५३ साली विविध मानववंशातील विषमतेवर निबंध लिहिला. आर्य वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धान्तावर त्याचा भर होता. जे वंश श्रेष्ठ आहेत त्यांनी आपले शुद्धत्व जोपासले पाहिजे, असा त्याचा आग्रह होता आणि आर्यवंशाने असे श्रेष्ठत्व जोपासले असल्याचे मतही त्याने व्यक्त केले होते. पुढे जर्मनीत हूस्टन स्टुअर्ट चेंबरलेन, हाइकेल यांनी गोबिनोच्या वंशवादाची जोड सामाजिक डार्विनवादाला दिली. हिटलरच्या नाझी राजवटीस वैचारिक आधार देण्याचे काम अशा प्रकारे सामाजिक डार्विनवादाची जोड मिळालेल्या वंशवादाने केले. असे दिसून येते की, सोशल डार्विनिझमचा उपयोग विविध प्रकारच्या शोषणसंस्थांना वैधता मिळवून देण्यासाठी वारंवार करण्यात आला आहे. सोशल डार्विनिझमच्या तत्त्वानुसार वसाहतवाद, साम्राज्यवाद, लष्करी आक्रमण, विस्तारवाद, मालकशाही, वंशवाद, भांडवली मुक्त अर्थव्यवस्था यांसारख्या शोषणसंस्थांचे बळी ठरणारे जे शोषितजनसमूह असतात त्यांच्या त्या अवस्थेस त्यांची स्वतःचीच दुर्बलता कारणीभूत असून ते स्वाभाविकच होय, असे मानले गेले. दुसऱ्या बाजूने शोषकवर्गाची क्रूरता, शोषितांविरुद्ध त्यांनी केलेल्या दुष्ट कारवाया, यांना नैतिक समर्थन देण्याचे काम सोशल डार्विनिझमने केले. त्यांच्या लेखी जे जे दुर्बल मानववंश आहेत ते ते जगण्याच्या लायकीचे नसून त्यांचे नष्ट होणे मानवजातीच्या निकोप प्रगतीसाठी आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी अशा दुर्बल मानववंशांच्या खच्चीकरणाची (शीळश्रळीरींळेप) मोहीम उघडली होती. अमेरिकेसारख्या देशातसुद्धा १९१० ते १९३० च्या दरम्यान सुप्रजननाच्या मोहिमेस लोकप्रियता मिळून २४ राज्यांमध्ये खच्चीकरणाचे कायदे आणि काही विशिष्ट प्रदेशातून येणाऱ्या स्थलांतरितांना प्रतिबंध करणारे कायदे पास करण्यात आले होते. डार्विनवाद आणि सामाजिक डार्विनवाद यांत नेहमीच गल्लत केली जाते. काही मूलभूत संकल्पनांमधील साम्य सोडले तर त्यात कसलीही समानता नाही. सामाजिक डार्विनवाद हा अतिशय तर्कदुष्ट, अनैतिक आणि अशास्त्रीय पायावर उभा असून त्यासाठी चार्ल्स डार्विनला दोषी ठरवणे गैर आहे. सामाजिक डार्विनवादाने, सुप्रजननशास्त्राने आणि वंशश्रेष्ठत्वाच्या राजकारणाने उत्क्रांतिसिद्धान्तास भयंकर विपर्यस्त अशा स्वरूपात जगासमोर प्रस्तुत केले. हा त्या सिद्धान्तावर आणि खुद्द डार्विनवरदेखील अन्याय होता. वस्तुस्थिती अशी आहे की सिसश्रश षीffiळीरश्र, परींगीरथ शिश्रशलींळेप तसेचfinळीरश्रष हिश षळीींशीीं ह्यांसारख्या संकल्पना जैवसृष्टीतील स्वाभाविक, निर्हेतुक व निरपेक्षपणे घडत राहणाऱ्या वैज्ञानिक प्रक्रिया दर्शवितात. ह्या संकल्पनांचे प्रयोजन कुठल्याही प्रकारच्या विषमतेचे वा शोषणसंस्थेचे समर्थन करणे हे असूच शकत नाही. ह्या वैज्ञानिक संकल्पनांना कधी मुक्त भांडवलशाहीने, कधी साम्राज्यवादाने, कधी लष्करी विस्तारवादाने तर कधी वंशवादाने वेठीस धरले एवढाच त्याचा अर्थ! अशा प्रकारे उत्क्रांतिसिद्धान्तास विपर्यस्त स्वरूपात का होईना पण आपल्या बाजूने उभे करण्यात विषमतापोषकांनी व शोषणसमर्थकांनी यश मिळविले हे नाकारता येत नाही.
डार्विनवादः जातिसमर्थक की जात्यंतक ?
ज्याप्रमाणे जगभरात विविध प्रकारच्या शोषणसंस्थांना शास्त्रीय वैधता प्राप्त व्हावी म्हणून वारंवार डार्विनवादास वेठीस धरण्यात आले, तसाच प्रयत्न भारतातल्या वर्णजातव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या ब्राह्मणी छावणीनेदेखील केला. डार्विनप्रणीत जीवनकलहाचा सिद्धान्त आणि सुप्रजननशास्त्रा चा दाखला देत वर्णजातव्यवस्थेचे औचित्य सिद्ध करू पाहणारांमध्ये प्रामुख्याने अहिताग्नी राजवाडे, गो.म.जोशी, वि.दा.सावरकर यांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. अगदी अलिकडचे उदाहरण म्हणून पांडुरंगशास्त्री आठवले यांचा निर्देश करता येईल. अहिताग्नी राजवाडे यांनी सुप्रजननशास्त्राचा हवाला देत वर्णाश्रमधर्माचे व अस्पृश्यतेचे समर्थन केले होते. वि.दा.सावरकरांनी अनुवंशशास्त्राच्या प्रभावाखाली वर्णजातव्यवस्थेचे समर्थन केले होते. सामाजिक डार्विनवाद आणि सुप्रजननशास्त्राच्या आधारे वर्णजातव्यवस्था आणि तज्जन्य स्त्रीदास्य यांचे समर्थन करण्याच्या बाबतीत गो.म.जोशी (१८९५-१९६७) यांच्या हिंदूंचे समाजरचनाशास्त्र (१९३४) या ग्रंथाचा उल्लेख टाळताच येणार नाही. त्यांनी ह्या ग्रंथातून वर्णजातव्यवस्था ही सामाजिकदृष्ट्या व वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशी समर्थनीय आहे ते सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. जातिसंस्था ही हिंदूंमधील जातिसंकर टाळून श्रेष्ठ अशा ब्राह्मण जातीची जोपासना करण्याची यंत्रणा होय, अशी त्यांची धारणा होती. जातीय संकराने समाजाचा नाश होतो व हा सृष्टीचाच नियम होय, असे ते मानतात. फ्रान्सिस गाल्टनचा हवाला देऊन ते युरोपातील संकरज राजघराण्याचा कसा निर्वंश झाला याची माहिती देतात. एवढेच नव्हे तर वर्णांतराच्या परिणामी छ. शिवाजी महाराजांचाही पुढे कसा निर्वंश झाला त्याचाही निर्देश करतात. जातिसंस्था असणे हे हितकारक, तर वर्णांतराची प्रवृत्ती अहितकारक आणि समाजासाठी मारक होय, हे त्यांचे ठाम म्हणणे होते. जातिसंकर टाळता यावा यासाठी, तसेच सुप्रजननशास्त्राच्या दृष्टिकोणातून जातिबाह्य विवाहावर निर्बंध घालून स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा संकोच करणे त्यांना समर्थनीय वाटते. जातिसंकरास विरोध करून बीजशुद्धीचे महत्त्व पटवून देण्यासाठी गो. म. जोशींनी डार्विनला चक्क मनूच्या सेवेत दाखल केले आहे. जातिसंकरास मनूप्रमाणेच डार्विनदेखील विरोध करतो, असे भासविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मनुस्मृतीमधील,
क्षत्रियाच्छूद्रकन्यायां क्रूराचारविहारवान् ।
क्षत्रशूद्रवपुर्जन्तुरुग्रो नाम प्रजायते ।। ( – मनु. १०-९) ।
(आयुधजीवी क्षत्रियापासून शूद्रकन्येच्या ठायी म्हिणजे वांशिकदृष्ट्या हीन स्त्रियेच्या ठारीं उग्र नावाचा पुत्र उत्पन्न होतो आणि त्याचे आचार-विचार हे क्रौर्यप्रधान असतात.) हा श्लोक, आणि एके ठिकाणी डार्विनने, “संकरजजाती अत्यंत क्रूर असतात.’ असे जे विधान केले त्याचा हवाला देत जातिसंकर हा धर्मशास्त्रदृष्ट्या व शास्त्रीयदृष्ट्यादेखील त्याज्य असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न गो.म.जोशी करतात. वस्तुस्थिती अशी आहे की, डार्विनने आपल्या लेखनात भारतीय उपखंडामधील जातिसमाजातील संकरजजातींच्या संदर्भात हे भाष्य केले नव्हते. डार्विन विविध (प्रजाती) संकराविषयी मत नोंदवतो आहे, तर मनुस्मृती व गो.म.जोशी हे भारतीय उपखंडातल्या जातिसमाजातील संकराविषयी भाष्य करताहेत. शिवाय उत्क्रांतिसिद्धान्तानुसार आधुनिक मनुष्यजात (होमो सेपीयन्स सेपीयन्स) हीच एक स्वतंत्र स्पीशीज असल्याकारणाने मनुष्यजातीच्या अंतर्गत कुठल्याही संकराचा मुद्दाच अप्रस्तुत आणि अशास्त्रीय ठरतो. गो.म. जोशींना वर्णजातश्रेष्ठत्वाच्या विकृतीने इतके पछाडले आहे की, जातीय संकराने समाजाचा नाश होतो हा सृष्टीचा नियम असल्याने जातिभेद हा ‘नैसर्गिक’ आहे व म्हणून तो ‘रक्षणीय’देखील आहे असे त्यांचे म्हणणे होते. अस्पृश्यता निवारणाचे प्रयत्न हे निसर्गनियमांविरुद्ध असल्याचे त्यांचे मत होते. कृष्णवर्णीय आणि विशेषतः अस्पृश्यांसंदर्भात त्यांच्या मनातला कमालीचा वंशद्वेष उफाळून बाहेर येताना दिसतो. “उत्तम संस्कृति उत्पन्न करण्याची आणि ती दीर्घकाल टिकविण्याची लायकीच या वंशामध्ये नाही !” असे भयंकर विखारी मत व्यक्त करतानाच गो.म.जोशींनी त्यांचा निर्देश, “सामाजिक आणि बौद्धिकदृष्ट्या वाढ न झालेले वर्ग” आणि “निव्वळ मानव पशु म्हणून वावरणारे वर्ग’ असा केला आहे. जीवनकलहात गुणवान गटच टिकून राहतात आणि सबलांची प्रजावृद्धी व दुर्बलांची पीछेहाट हे सृष्टीच्या उत्क्रांतीचे तत्त्व बेमालूमपणे जातिसमाजावर लागू करण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला आहे. वर्णजातव्यवस्थेस अनुलक्षून सोशल डार्विनिझमचा हवाला देताना, “नैसर्गिक निवडीमध्ये जे श्रेष्ठ असतील ते टिकतील आणि जे कनिष्ठ असतील त्यांचा नाश होईल.” असा त्यांचा होरा होता. जातिव्यवस्था ही सुप्रजननाची हमी देणारी संस्था आहे, असे ते मानतात त्यामुळे जातिसमाजात ब्राह्मणांना जे श्रेष्ठत्व बहाल करण्यात आले आहे त्यासंबंधीचे स्पष्टीकरण देतानाही गो. म. जोशी सुप्रजननशास्त्राचाच हवाला देतात व ब्राह्मणांचे बौद्धिक श्रेष्ठत्व हे त्यांना आनुवंशिकतेतून प्राप्त झाले असल्याचे सांगतात. एखाद्या लोकसमूहात मोठ्या प्रमाणावर हुशार, बुद्धिमान लोक आढळतात याची कारणे त्या समाजसमूहाच्या आनुवंशिक रक्तशुद्धीत/अशुद्धीत किंवा जैविक जनुकांमध्ये मुळीच नसतात. ही सगळी वैशिष्ट्ये सभोवतालची परिस्थिती आणि सामाजिक-भौतिक वारशातून प्राप्त झालेले बौद्धिक-सांस्कृतिक भांडवल यांवर अवलंबून असतात. शास्त्रीयदृष्ट्या सांस्कृतिक वारशाचा जैविक वारशाशी संबंध असायचे कारण नाही. मानवाचा जैविक वारसा हा मुख्यतः त्याच्या शारीरिक बाबींशी संबंधित असतो तर संस्कृती ही शरीरबाह्य अशा अन्य घटकांशी निगडित असते, या प्रतिपादनातील तर्कदुष्टता आणि फोलपणा याची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सडेतोड चिकित्सा केली आहे. डॉ.आंबेडकर म्हणतात, “जातिव्यवस्थेद्वारा वांशिक विभाजन दर्शविले जात नाही. जातिव्यवस्था ही समान वंशाच्या लोकांचे सामाजिक विभाजन दर्शविते. … विभिन्न वंश म्हणजे मानवजातीच्या स्वतंत्र स्पीशीज नसून ते एकाच आणि एकसमान अशा प्रजातीचे विभिन्न प्रकार मात्र होत. आणि म्हणूनच ते आपापसात संकर करून प्रजोत्पत्तीस सक्षम असणाऱ्या आणि जिला वंध्यत्व नाही अशाप्रकारची प्रजोत्पत्ती करू शकतात.’ आनुवंशिक बौद्धिक श्रेष्ठत्वाचे जोरदार खंडन करताना डॉ.आंबेडकरांनी चशपवशश्री झीळपलळश्रिशीष कशीशवळीं या ग्रंथाचे लेखक बेटसन यांना उद्धृत केले आहे. बेटसन यांच्या मते, “उच्चदर्जाची बौद्धिक क्षमता ही आनुवंशिक असते असे सुचवून तिचे कुठल्यातरी एकाच एक पद्धतीने वहन होते असे म्हणण्याला काहीच अर्थ नाही. बौद्धिक आणि शारीरिक शक्ती ह्या दोन्हींचा विकास हा कुठल्याही एका आनुवंशिक घटकाच्या प्रभावापेक्षाही अनेकविध घटकांच्या संयोगातून शक्य होत असतो. डॉ.आंबेडकरांनी जात म्हणजे सुप्रजननाची हमी अशी मांडणी करणाऱ्यांच्या भूमिकेच्या त्यांच्याच भाषेत ठिकऱ्या ठिकऱ्या उडविल्या आहेत. डॉ. आंबेडकर म्हणतात, “फळे कशी उगवतात यांवरून झाडाची परीक्षा करायला हवी. जर जात ही सुप्रजननाचे माध्यम असेल तर तिने कशा प्रकारच्या मानववंशाची निर्मिती करायला हवी? शरीरशास्त्राच्या दृष्टिकोणातून बोलायचे तर हिंदू हे उ३ दर्जाचे लोक आहेत. ते पिग्मीवंशाचे, उंचीने बुटके व खुरटलेले आणि बलहीन लोक आहेत. तसेच त्यांच्यापैकी /१. लोक सैन्यभरतीकरिता अयोग्य आहेत असे घोषित करण्यात आले आहे.”
वर्णजातव्यवस्थेचे औचित्य सिद्ध करू पाहणाऱ्या ब्राह्मणी छावणीने अप्रत्यक्षरीत्या डार्विन आणि त्याच्या उत्क्रांतिसिद्धान्ताला आपल्या सेवेत राबविले आहे. ह्या पार्श्वभूमीवर, वर्णजातव्यवस्थेच्या आकलनासंदर्भात डार्विनवादाचे योगदान काय असू शकते याची शहानिशा करणे महत्त्वाचे ठरू शकते. खऱ्या अर्थाने आधुनिक मानवाची (को रिळिशपी रळिशपी, अपरीiळलरश्रश्रू चेवशीप चरप) उत्पत्ती सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत झाली असे मानले जाते. भारतीय उपखंडात तो सुमारे आठ हजार वर्षांपेक्षाही बरेच आधी प्रवेश करता झाला. त्या तुलनेत विचार करता वर्णजातसंस्था अगदीच नवजात आहे. वर्णव्यवस्थेचा इतिहास अधिकाधिक साडेतीन हजार व जातिव्यवस्थेचा इतिहास अडीच हजार वर्षांपेक्षा मागे लोटता येत नाही. याचाच अर्थ असा की, इतिहासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर वर्णजातसंस्था अस्वाभाविकरीत्या उदयास आली. दुसरी बाब अशी की, वर्णजातव्यवस्थेचे अस्तित्व केवळ भारतीय उपखंडापुरतेच मर्यादित असून तिचे अस्तित्व जगात इतरत्र कुठल्याच मानवी समाजसमूहात आढळत नाही. ती फक्त ब्राह्मणी धर्मापुरतीच मर्यादित आहे. (भारतातील ख्रिश्चन, मुसलमान, जैन व बौद्धांमध्येही जाती आढळतात, पण त्यांस त्यांच्या धर्मशास्त्रात संमती नाही, हा फरक लक्षात घ्यावा.) अर्थात विशिष्ट अशा सामाजिक संघर्षातून उद्गम पावलेल्या संरचनेस व ब्राह्मणी धर्मशास्त्रांनी पुरस्कारिलेल्या वर्णजातव्यवस्थेस मानवजातीच्या जैविक उत्क्रांतीचा भाग मानणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे व अविवेकीपणाचे लक्षण आहे. उत्क्रांतिवाद सांगतो की, संपूर्ण मानवजात ही एकेकाळच्या माकडांपासून उत्क्रांत होत आलेली आहे. मानवजातीचा उद्गमस्रोत जर एकसमान असेल तर आपोआपच असा निष्कर्ष समोर येतो की अन्य सगळे भेद (वर्ण, जात, धर्म, वंश, भाषा, राष्ट्र इत्यादी) जैवविज्ञानाच्या दृष्टिकोणातून निरर्थक आहेत. हे सगळे भेद कृत्रिम व वरवरचे असून तज्जन्य उच्चनीचता, विषमता आणि शोषणशासनातून मूठभर अशा शोषकवर्गांच्या हितसंबंधांचेच तेवढे रक्षण होते. डार्विनवादाच्या कसोटीवर वर्णजातव्यवस्थेची औचित्यहीनता आणि तिच्या समर्थकांची भंपकबाजी व मानवद्रोही नीती स्पष्ट होते. उत्क्रांतिसिद्धान्तानुसार जातिसंस्था ही अस्वाभाविक आणि अशास्त्रीय असल्याचे सिद्ध होते. हा सिद्धान्त जातिसमर्थक नसून जात्यंतक आहे हेदेखील स्पष्ट होते.
जनुकांच्या प्रकाशात उत्क्रांतिसिद्धान्त व जात
ह्यूमन जिनोम रिसर्च प्रोजेक्ट अंतर्गत जनुकीय संशोधनाच्या आधारे जगभरातल्या मानवसमूहांत घडून आलेले संमिश्रण तसेच वेळोवेळी झालेल्या त्यांच्या स्थलांतरणांचा अभ्यास सुरू आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून भारतातील मानवसमूह आणि जातिव्यवस्था स्तरीकरण यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यासदेखील करण्यात आला. त्यातून जे निष्कर्ष समोर आले त्यापैकी प्रस्तुत चर्चेच्या दृष्टीने महत्त्वाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.. “भारतातला जातिसमाज हा पश्चिमी युरेशिअन लोकांशी कमीअधिक प्रमाणात सरमिसळ झालेल्या प्रोटो-एशियन समूहाचा आहे. तसेच भारतीय उपखंड हा आफ्रिका, पश्चिम आशिया आणि आग्नेय आशियातून येणाऱ्या स्थलांतरितांसाठी एक फार मोठा कॉरिडॉर होता, आणि भारतातील जनुकीय वितरण हे खूपच व्यामिश्र स्वरूपाचे असून एकंदरीत भारतीय हे युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील लोकांच्या कमीअधिक संमिश्रणाने युक्त आहेत. प्राचीन काळापासून जगभरातून विविध भू-प्रदेशांतून आलेल्या स्थलांतरितांमुळे भारत हा एक मिश्रवंशीय देश बनला. अर्थात, येथे कोणताही वंश शुद्ध स्वरूपात अस्तित्वात नसून, संपूर्ण प्रजा ही मिश्रवंशीय आहे.” ह्यूमन जिनोम रिसर्च प्रॉजेक्टमधून प्राप्त झालेल्या ह्या निष्कर्षांसमोर वंशशुद्धीचे आणि वर्णजातव्यवस्था श्रेष्ठत्वाचे दावे पूर्णपणे कोसळून पडतात. वर्णजातव्यवस्था ही अनैसर्गिक आणि अशास्त्रीय असल्याचेही सिद्ध होते. प्राचीन काळापासून होत आलेल्या सामूहिक स्थलांतरणांमुळे बदलत्या भौगोलिक परिवेशात मानवी समाजसमूहांच्या बाह्यरंगरूपात बदल होत गेल्याचे दिसत असले तरी स्पीशीज ह्या अर्थाने मानवजात एकच असून तीत भिन्नत्व नसल्याचेच सिद्ध झाले आहे. बाह्यरंगरूपातील वैशिष्ट्यांच्या आधारे जे वांशिक भिन्नत्व दर्शविले जाते, ती वैशिष्ट्ये एखाद्या मानवसमूहाची गुणसंपन्नता वा योग्यता-अयोग्यता निश्चिती करणारा निकष ठरू शकत नाहीत. बाह्य रंगरूपातील वैशिष्ट्ये इतकी स्थूल, वरवरची आणि दुय्यम असतात की त्या तुलनेत मानवाची जी जैवशास्त्रीय वैशिष्ट्ये आहेत ती अधिक नेमकी, मूलभूत आणि महत्त्वाची ठरतात. कारण ती सर्वच मानवसमूहांमध्ये एकसारखीच दिसून येतात. जनुकीय संशोधनाचा निष्कर्षसुद्धा तोच आहे. मानवजातीची उत्क्रांती आफ्रिका खंडातील एकेकाळच्या माकडापासून झाली आहे. त्यानंतरच्या काळात विविध खंडांच्या दिशेने मानवजातीचे स्थलांतरण घडून आले. जिनोम रिसर्चने मानवोत्पत्तीच्या आफ्रिकन उद्गमनास,तसेच विविध दिशांना झालेल्या स्थलांतरणास व वांशिक संमिश्रणाच्या सिद्धान्तांस दुजोराच दिला आहे.
आभारनिर्देश
प्रस्तुत निबंधलेखनात ज्यांच्याशी झालेली चर्चा उपयुक्त ठरली असे प्रा.एस.ओ.इंगळे, प्रा.डॉ. किसन पाटील, व प्रा.सी.पी. लभाणे यांचा मी आभारी आहे.
संदर्भ
क) डार्विनप्रणीत उत्क्रांतिसिद्धान्ताचे विवेचन करताना खालील संदर्भसाहित्याचा आणि काही वेबलिंकचा उपयोग झाला, ज्यांवर डार्विनचे लेखन ऑनलाईन उपलब्ध आहे —
I. Darwin Charles, The Origin of Species,
http://www.infidels.org/library/historical/charles_darwin/origin_of_species
II. Darwin Charles, Descent of Man,
http://www.infidels.org/library/historical/charles_darwin/descent_of_man/ I
II. http://zinjanthropus.wordpress.com/2009/02/10/darwin-the-descent-of-man-and-human-evolution/
IV. http://www.allaboutscience.org/darwins-theory-of-evolution.htm
V. संझगिरी प्रभाकर, मानवाची कहाणी, प्रकाशक-सुमन संझगिरी, चौथी आवृत्ती, जाने.१९९९.
ख) सामाजिक डार्विनवादा संबंधीचे विवेचन खालील वेबलिंक्सच्या आधारे करण्यात आले –
1.http://library.thinkquest.org/c004367/eh4.shtml
2.http://www.allaboutscience.org/what-is-social-darwinism-faq.htm
3. http://serendip.brynmawr.edu/sci_cult/evolit/s05/web1/mheeney.html
सुप्रजननशास्त्रासंबंधीचे विवेचन करण्यासाठी खालील वेबलिंक्सचा आधार घेण्यात आला
1. http://www.britannica.com/EBchecked/topic/195069/eugenics
2. http://personal.uncc.edu/jmarks/eugenics/eugenics.html
3. http://en.wikipedia.org/wiki/Eugenics
4. http://www.emmerich 1.com/EUGENICS.html
“आधुनिक यूजेनिक्स शास्त्राप्रमाणे त्यातील सिद्धान्तांवर जगात जर कोठे कोणती समाजरचना झाली असेल तर ती ख्रिस्ती किंवा मुसलमानी समाजाची नव्हे, तर एक वर्णाश्रमधर्माच्या समाजाचीच होय; ह्या सिद्धान्ताप्रमाणे उच्चाचे उच्चत्व रक्षण करण्यासाठी नीचाचे ‘सेग्रेगेशन’ म्हणजे दूरीकरण हाच मार्ग, दुसरा नाही; आणि तोच वर्णाश्रमधर्माच्या समाजात काटेकोर रीतीने प्रतिपाळण्यात आला आहे. अर्थात अशा समाजव्यवस्थेत स्पृश्यास्पृश्यभेद उत्पन्न होणे स्वाभाविक आहे.”