सोबत दोन नकाशे आहेत, भारतातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या पावसाच्या प्रमाणांचे. कच्छ-सौराष्ट्र भागातच पाऊस सरासरीच्या जास्त झाला आहे. उत्तरप्रदेशाचा पश्चिम भाग, हरियाणा, दिल्ली या क्षेत्रांत पाऊस सरासरीच्या चाळीस टक्क्यांनाही पोचलेला नाही. ओरिसा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गोवा, केरळ व दक्षिण कर्नाटक या क्षेत्रांत पाऊस सामान्य आहे (म्हणजे सरासरीच्या १९% वरखाली). उत्तर कर्नाटक व तामिळनाडू मात्र सहाच दिवसांच्या पावसातल्या तुटवड्याने सामान्य स्थितीतून कमतरतेच्या स्थितीत गेले. इतर सर्व देश आधी व नंतर कमतरतेच्या स्थितीत अडकलेला आहे.
याचा अर्थातच शेतीवर परिणाम होणार. नागरी पाणीपुरवठाही पुढे त्रासदायक तुटवड्यात अडकणार. मुळात भारतातली अन्नधान्याची उपलब्धता घटतेच आहे, हे आसु च्या ऑगस्ट २००८ (अंक १९.५) अंकात नोंदले होते. ती आकडेवारी दाखवत होती, की १९९१-२००५ या चौदा वर्षांमध्ये दर भारतीयाला दररोज मिळणारी तृणधान्ये ४६९.५ ग्रॅमवरून ३९०.९ ग्रॅम इतकी कमी झाली – १६.६% घट. डाळींची स्थिती आणिकच वाईट होती. त्यांची उपलब्धता दररोज-दरडोई ४१.६ ग्रॅमवरून ३१.५ ग्रॅमइतकी कमी झाली – २४.३% घट. उगीच नाही तूरडाळीची किंमत दर किलोला शंभर रुपयांजवळ गेली!
पाणी (जलसंसाधने), शेती आणि अन्न व नागरी पुरवठा, अशी तीन मंत्रालये कार्यरत असूनही एखादा क्षीण पावसाळा आपले प्राण कंठाशी आणतो, याचा अर्थ अन्नसाखळीचे व्यवस्थापन चुकते आहे. शेतीसाठी सिंचन वापरण्याची परंपरा भारतात तरी सिंधु-संस्कृतीपासून आहे. गावतळी, शेततळी, जोहड आदींचे गुणगानही होत असते. पंजाबातील आधुनिक सिंचनव्यवस्था (आणि त्यासाठीची रूडकी अभियांत्रिकी शिक्षणसंस्था – आज आयआयटीचा दर्जा असलेली) या लॉर्ड डलहौसीच्या (१८५७ आधीच्या) काळातील आहेत. सिंचित क्षेत्रफळात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे, चीनच्याही पुढे !
भारतातील प्रमाणित शास्त्रज्ञांमध्ये सर्वाधिक संख्या शेतीतज्ज्ञांची आहे. आपली सार्वजनिक अन्नवितरण व्यवस्था (रेशनिंग) ही जुनी आणि रुळलेली आहे. पण हे सर्व अपेक्षित परिणाम घडवताना दिसत नाही. याची कारणे तपासणे व उपायांवर विचार करून परिणामकारक पद्धती घडवणे, हे सर्व सुशिक्षितांचे कर्तव्य आहे.
आसु ने मागे शेतीवर एक विशेषांक काढला (मे-जून २००६, अंक १७.२-३). शेतीबद्दलचे, पाणीवापराबद्दलचे, अन्नाबद्दलचे लेखही आसु सातत्याने छापत असतो. लवकरच अन्नवितरण व्यवस्था, पाण्याबाबतचे अधिकार यांवर विशेषांक येणार आहेत. जगातला सर्वांत मोठा अन्ननिर्यातदार देश म्हणजे अमेरिका (यूएसए). त्या देशाच्या शेतीक्षेत्राचा इतिहास व त्यातून भारताने घेण्याचे धडे, यांवरही एक विशेषांक येणार आहे. पण ही सर्व कृतीसाठी पूर्वतयारी म्हणून आवश्यक अशी माहिती आहे. आज काय करायचे?
महाराष्ट्रातील काही पाणी-शेती-अन्न ह्यांचे अभ्यासक एक काळजी व्यक्त करणारे व उपायांच्या काही दिशा सुचवणारे पत्र राज्यकर्त्यांना देऊ इच्छितात. त्या उपक्रमातही आजचा सुधारक भाग घेणार आहे. सर्व वर्गणीदारांना ते पत्र जाईल, व ते शक्य तितक्या सह्या गोळा करून पुढे राज्यकर्त्यांना पाठवले जाईल. आपण हे काम जबाबदार नागरिकाच्या भूमिकेतून करालच. सोबतच लोकसंख्येचाही विचार व्हावा. कृषिमंत्री शरद पवार आजचा दुष्काळ १९७२-७३ च्या दुष्काळापेक्षा सौम्य आहे, असे सांगतात. पण मधल्या काळात लोकसंख्या सुमारे ५६ कोटींवरून सुमारे ११५ कोटींवर गेली आहे!