जागतिक इतिहासात – विशेषतः युरोपच्या संदर्भात – एकोणिसावे शतक हे एका मोठ्या मन्वंतराचे आणि सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रांत दूरगामी परिणाम घडवून आणणारे राहिले आहे. वैज्ञानिक प्रगती, औद्योगिक क्रांतीचा प्रसार, भांडवलशाहीचा पगडा व लोकशाहीचा उद्गम ही या कालखंडाची वैशिष्ट्ये होत.
एकोणविसाव्या शतकातील विज्ञानाचा जेवढा व्यापक परिणाम समाजजीवनावर झाला, तेवढा याआधीच्या काळात झाला नव्हता. या काळात विज्ञान सर्वव्यापी झाले. सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये असा कोणताही प्रश्न नाही की जो विज्ञानाने सोडविता येणार नाही, असा समज पसरला. विज्ञानावरील या आगळ्यावेगळ्या भक्तिभावामुळे त्या काळातील विज्ञानाला एक विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.