इंग्रजी वाययाचा अभ्यास करताना त्या वाययाची आवश्यक पार्श्वभूमी म्हणून इंग्लंडच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाचे काही कालखंड वाचले होते. ते वाचत असताना सगळ्यांत ज्या गोष्टींनी प्रभावित केले ती होती नोंदींची उपलब्धता. तथ्ये, घटना, घटनांवरच्या अनेक टीकाटिप्पणी काळाच्या ओघात नाहीशा होऊनही एवढ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या ह्याचे आश्चर्य वाटल्याचे आजही आठवते. चर्चच्या रजिस्टरमधील जन्म, मृत्यू, विवाह ह्या अटळपणे होणाऱ्या नोंदी वगळल्या तरी पत्रव्यवहार, डायऱ्या, संस्थांच्या व्यवहारांची रेकॉर्डबुक्स, कवी, नाटककार, कादंबरीकार वगैरेंच्या कलाकृती, वृत्तपत्रांतील बातम्या ह्या सगळ्यांमधून उमटलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा पाहताना फार मजा आली.
१९९६ च्या आसपास पॅन्डिमोनियम नावाचे हम्फ्री जेनिंग्ज ह्या सिनेमा आणि नाटकाशी प्रामुख्याने संबंधित असलेल्या लेखकाचे पुस्तक वाचनात आले. १६६० ते १८८६ ह्या काळात विखुरलेल्या अनेक नोंदींचा मागोवा घेत जेनिंग्जने औद्योगिक क्रांतीचा इतिहास ह्या पुस्तकात जिवंत केला आहे. ‘समकालीन निरीक्षकाच्या नजरेतून यंत्राचे आगमन’ असेच पुस्तकाचे उपशीर्षक आहे. वरवर पाहता असंबद्ध वाटणाऱ्या अनेक अवतरणांचा शब्दचित्रांसारखा वापर करून त्याने यंत्राच्या आगमनाने माणसाच्या जीवनपद्धतीत झालेले आमूलाग्र बदल अत्यंत संवेदनशीलपणे टिपले आहेत. ह्या नोंदीमधून जेनिंग्ज त्या काळातील माणसांचे अनुभव, त्यांचे जगणे आपल्यापुढे उभे करतो.
पॅन्डिमोनियम वाचत असताना लक्षात आले की १८५९ मध्ये डार्बिनने ऑरिजिन ऑफ स्पीशिज मध्ये आपला उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडण्याच्या कितीतरी वर्षे आधी त्याबद्दलचे कुतूहल इंग्लंडमधील साधारण जनतेमध्येसुद्धा जागे होत होते. साधारण १६६० च्या आसपास सर विल्यम पेटी ह्यांच्या कागदपत्रात सापडलेली एक लक्षवेधक नोंद आहे. “पुढील गोष्टींचा शोध घेतला तर ईश्वराचा विशेष सन्मान होईल’ ह्या शीर्षकाखाली पेटीने ज्या गोष्टींची यादी दिली आहे त्यात प्रामुख्याने पृथ्वीवरील प्राणी, वनस्पती व खनिजे ह्यांच्याबद्दलची माहिती वाढावी अशी इच्छा दिसते.
उदा. १) पृथ्वीचा गोल कोणत्या गोष्टींनी भरला आहे ह्याची माहिती २) प्राणी-वनस्पती-खनिजे ह्यांचा उपयोग ३) माणूस आणि प्राण्यांची उत्पत्ती ४) स्त्री आणि पुरुष ह्यांच्या पिढ्या ५) प्राण्यांची वेगवेगळी वये व गर्भधारणेचा काळ ६) प्राणी आणि वनस्पतींमधील गर्भारोपण (पॅन्डिमोनियम मधून)
१६६० साली रॉयल सोसायटीची स्थापना झाली. त्यानंतरच्या कितीतरी नोंदींमध्ये विज्ञानातील नवीन कल्पना बीजरूपाने अस्तित्वात असल्याचे जाणवते. रॉबर्ट हूकच्या एका नोंदीमध्ये आकाशाच्या वेगवेगळ्या ‘चेहेयांची’ निरीक्षणे आहेत. वातावरण-विज्ञानाची (meteorology) ही सुरुवात होती. स्वच्छ निळ्या आकाशापासून काळ्याभोर ढगांनी गच्च भरलेल्या आकाशाच्या वेगवेगळ्या अवस्थांची वर्णने करण्यासाठी जे शब्द हूक सुचवतो ते अजून ‘काव्यात्म’ आहेत. त्यांना वैज्ञानिक वस्तुनिष्ठता अजून आलेली नाही. मात्र ‘देवाचे निवासस्थान’ असलेले आकाश हूकच्या निरीक्षणामुळे निधर्मी, सेक्युलर बनल्याचे जाणवते. सूक्ष्मदर्शकातून दिसणाऱ्या कीटकांची वर्णने आहेत. ह्या नवीन ज्ञानाची माहिती देण्यासाठी ज्या प्रतिमा आणि शब्द वापरले आहेत ते रोजच्या वापरातल्या ओळखीच्या वस्तूंच्या वर्णनातलेच आहेत. देवाने निर्माण केलेल्या सजीव प्राण्यांमधली ‘यांत्रिकतेची’ जाणीव अजून सूक्ष्म कीटकांपुरतीच मर्यादित आहे. ‘आत्मा’ असलेल्या जटिल रचनेच्या माणसापर्यंत ती अजून पोचायची आहे.
डार्विनचे ऑरिजिन १८५९ साली प्रसिद्ध झाले. त्याच्या आधी कितीतरी वर्षे उत्क्रांतीच्या तत्त्वाची सूत्ररचना लोकांना अपूर्ण रूपात, छटांमध्ये जाणवत होती. बूफाँ, लॅमार्क, इरॅस्मस डार्विन, लायेल, माल्थस ह्यांनी केलेल्या अभ्यासाच्या बैठकीवर डार्विनचे तत्त्व उभारले गेले हे विज्ञानाच्या इतिहासकारांमुळे सर्वांना परिचित झाले आहे. क्लॉद बर्नार्डने म्हटल्याप्रमाणे विज्ञान क्रांतीच्या मार्गाने पुढे जाते, केवळ एकात एक मिळवून केलेल्या बेरजेच्या मार्गाने नाही. जिलियन बीअर म्हणते “ही क्रांती फक्त वैज्ञानिकांच्या मनात घडून चालत नाही. तिला संपूर्ण प्रामाण्य तेव्हाच लाभते जेव्हा त्याच संस्कृतीतील इतर माणसांच्या विश्वासातही क्रांतिकारक बदल घडतात.’ – (डार्विन्स प्लॉट्स – जिलियन बीअर)
अगदी १९व्या शतकापर्यंत विज्ञानातील प्रमेये, वैज्ञानिकांचे लिखाण सामान्य सुशिक्षित वाचकांना समजणे कठीण नव्हते. आधुनिक विज्ञानाच्या सुरुवातीच्या काळात वैज्ञानिकांची आणि सुशिक्षित वाचकांची भाषा एकाच प्रकारची होती. जिलियन बीअर म्हणते :
“डार्विन अथवा लायेल (Lyell) ह्यांचे लिखाण कोणत्याही प्रकारे गूढ अथवा विशिष्ट वर्गासाठी लिहिलेले असे नव्हते. मानसशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र (physiology), भौतिकशास्त्र (physics), आणि गणित ह्या विषयांवर लिहिणारे जी.एच्.ल्यूज (G. H. Lewes), क्लॉद बर्नार्ड, जॉन टिन्डॉल, डब्ल्यू. के. क्लिफर्ड वगैरेंसारखे वैज्ञानिक आणि अगदी क्लार्क मॅक्सवेलचे सुरवातीचे लिखाणसुद्धा डार्विन आणि लायेल ह्यांच्या लिखाणासारखेच वाययीन वळणाचे आणि ‘अगणिती’ होते. वैज्ञानिक पठडीत न वाढलेल्या सुशिक्षित वाचकांना हे लिखाण वाययीन पुस्तकांसारखे वाचता येत होते. आपल्या काळात मात्र वैज्ञानिक कल्पना सामान्य वाचकांपर्यंत भाषांतर आणि प्रक्षेपाच्या (extrapolation) प्रक्रियेतून पोचतात. प्रमुख वैज्ञानिक सिद्धान्त हे पूर्वीसारखे लेखांच्या स्वरूपात प्रसिद्ध न होता क्लिष्ट आणि सघन (condensed) अशा गणिती प्रमेयांच्या माध्यमातून वैज्ञानिक नियतकालिकांत प्रसिद्ध होतात. सामान्य वाचकांना ते समजावेत अशी अपेक्षा नसते. एकोणिसाव्या शतकातील वाचक मात्र थेटपणे वैज्ञानिकांच्या मूळ लिखाणापर्यंत पोचू शकत असे एवढेच नव्हे तर वैज्ञानिकही त्यांच्या सिद्धान्तांच्या स्पष्टीकरणासाठी इतिहास, वायय आणि तत्त्वज्ञानाचा आधार घेत असत.’ – (डार्विन्स प्लॉट्स – जिलियन बीअर)
पॅन्डिमोनियम वाचताना लक्षात येते की आधुनिक विज्ञानाच्या सुरवातीला सामान्य लोकांनाही निरीक्षणाची सवय लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न अनेकांनी केला. एका अर्थाने आपल्या प्रयोगातच त्याना सामील करून घेतले. १७१५ चे खग्रास सूर्यग्रहण इंग्लंडमध्ये कसे कसे दिसणार आहे ह्याचा नकाशा प्रसिद्ध करून डॉ. एडमंड हॅली (‘हॅली’चा धुमकेतू फेम) ह्यांनी तो इंग्लंडभर वाटला आणि लोकांना निरीक्षण करण्याचे आवाहन केले. हवामानातील बदल, वादळे, कडकडाट होऊन विजा पडणे ह्याकडे देवाची कृपा अथवा अवकृपा म्हणून न बघता वस्तुनिष्ठ पद्धतीने त्याचे निरीक्षण करायची सवय लावायचा प्रयत्न केला.
___ अशी पार्श्वभूमी असल्याने १८५९ साली डार्विनचे ऑरिजिन प्रसिद्ध झाले तेव्हा उत्क्रांतीचे तत्त्व सुशिक्षित जगात तरी अगदी अनोळखी नव्हते. पण तरीही ते मांडले गेल्यानंतर पहिली प्रतिक्रिया ते नाकारण्याचीच होती. ह्या नकारामागे असलेल्या अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी एक औद्योगिक क्रांती हे होते. शुद्ध विज्ञानाला प्रयोग आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यावर लागलेल्या शोधांमुळे माणसांची आयुष्ये आमूलाग्र बदलून गेली. हजारो वर्षे परिचित असलेली कृषिसंस्कृती जाऊन औद्योगिक जीवनशैली स्वीकारावी लागली. भूगर्भशास्त्रातील नवीन शोधांमुळे जीवनाधार असलेल्या धर्मावरची श्रद्धा डळमळीत झाली. हा सगळा नंतरचा इतिहास आता सुपरिचित आहे, पण त्या काळातील माणसांना वाटणारी अनिश्चितता, भीती ही फार खरी होती. माणूस निर्मितीतला मुकुटमणी नाही, त्याच्या असण्याला हेतू नाही, तो विश्वाच्या केंद्रस्थानी नाही ह्या सगळ्या ज्ञानामुळे आलेली निराधारत्वाची भावना मॅथ्यू आर्नल्डच्या पुढील ओळींमध्ये प्रभावीपणे व्यक्त होते – Wandering between two worlds, one dead, The other powerless to be born.
हे नवे ज्ञान ज्यांनी कमावले त्या वैज्ञानिकांची अस्वस्थता तर विलक्षण होती. विश्वाच्या निर्मितीची बायबलमधली कहाणी ते पिढ्यान् पिढ्या ऐकत आले होते. त्याला आह्वान देणे त्यातल्या अनेकांना शक्य नव्हते. पण जीवाश्मांमध्ये लिहिलेली कहाणीही ते नाकारू शकत नव्हते. ह्या द्वंद्वातून बाहेर पडण्याची धडपड करताना काहींनी हास्यास्पद मार्ग स्वीकारले. फिलिप गाँस ह्या भूगर्भशास्त्रज्ञाने लायेलचे तत्त्व खोडून काढायला स्वतःचे एक वेगळे तत्त्व मांडले. त्याच्या मते पृथ्वीचा पृष्ठभाग क्रमाक्रमाने (सीरीरश्रश्रू) घडला नाही. ऐंद्रिय जीवही हळूहळू विकसित झाले नाहीत, तर उत्पाती पद्धतीने ह्या जगाची निर्मिती (catastrophic act of creation) जेव्हा झाली तेव्हा ह्या जगाचे जे रूप सादर केले गेले त्यात जीवांचे दीर्घकाळ अस्तित्व ह्या ग्रहावर होते असे सिद्ध करणाऱ्या खुणा त्याच्यावर ठसवलेल्याच होत्या. गॉसचे हे कल्पक पण खुळचट तत्त्व कुणीच स्वीकारले नाही.
चर्चला आह्वान देण्याची, श्रद्धांना मोडीत काढण्याची कुठलीही इच्छा नसलेल्या सौम्य आणि भिडस्त स्वभावाच्या डार्विनच्या मनातली अस्वस्थता त्याने अॅसा ग्रे ह्यांना २२ मे १८६० रोजी लिहिलेल्या पुढील पत्रात स्पष्टपणे दिसून येते :
“देवशास्त्राच्या दृष्टिकोणातून ह्या प्रश्नाकडे पाहू. हे मला नेहेमीच दुःखदायक वाटत आले आहे. मी गोंधळलो आहे. निरीश्वरवादी भूमिकेतून लिहिण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता, पण इतरांना जितक्या स्पष्टपणे जाणवतो – आणि जो आपल्यालाही तसा जाणवावा असे मला वाटते – तसा हेतू आणि सद्भावनेचा कुठलाही पुरावा आपल्या आजूबाजूला मला दिसत नाही. जगात खूप जास्त दुःख आहे. एखाद्या सर्वव्यापी आणि परोपकारी ईश्वराने सुरवंटाच्या जिवंत शरीराचा भक्ष्य म्हणून वापर करण्याच्या उघड हेतूने इक्न्यूमोनिडे (खलहपशीीपळवरश) प्रकारच्या गांधीलमाश्यांची जाणूनबुजून निर्मिती केली असावी हे मला पटू शकत नाही, जसे मांजरांना खेळण्यासाठी त्याने उंदरांची निर्मिती केली हेही मला पटू शकत नाही. ह्याच्यावर विश्वास नाही, म्हणूनच डोळा हेतुपुरस्सर रचला गेला ह्यावरही विश्वास ठेवण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण त्याचबरोबर ह्या अद्भुत विश्वाचा आणि विशेषतः मानवाच्या स्वरूपाचा विचार करताना ह्या सगळ्या निर्मितीमागे एखादी बुद्धिहीन पाशवी शक्ती असेल असे मी कधीही म्हणणार नाही. सुरचित नियमांमधून ह्या सगळ्याची निर्मिती झाली असावी आणि बारीकसारीक तपशील-चांगला अथवा वाईट-भरण्याचे काम आपण ज्याला योगायोग (लहरपलश) म्हणतो त्याच्यावर सोडण्यात आले असावे, असे मानण्याकडे माझा कल आहे. ह्या कल्पनेमुळे मला जराही समाधान मिळत नाही. मला अगदी गंभीरपणे वाटते की हा सर्व विषय मानवी बुद्धीच्या आवाक्यात येणार नाही इतका सखोल आहे. एखाद्या कुत्र्याने न्यूटनच्या बुद्धिसामर्थ्याबद्दल तर्क करण्यासारखेच आहे ते. प्रत्येक माणसाला त्याचा त्याचा विश्वास आणि आशा बाळगू द्यावी. माझे विचार अजिबात निरीश्वरवादी नाहीत, ह्या तुमच्या मताशी मी अर्थातच सहमत आहे. विजेच्या लोळामुळे एखादा माणूस मरतो, मग तो चांगला असो अथवा वाईट असो. निसर्गनियमाच्या अतिशय जटिल अशा कृतीचा तो परिणाम असतो. ह्याच्यापेक्षा कितीतरी अधिक जटिल अशा नियमांच्या कृतींमधून एखादे मूल जन्माला येते (जे पुढे निर्बुद्धही निपजण्याची शक्यता आहे). अतिप्राचीनकाळी एखादा माणूस अथवा इतर जनावर वेगळ्या नियमांच्या कृतीतून जन्माला आले असण्याची शक्यताही मी नाकारत नाही, आणि हे सर्व नियम एखाद्या सर्वज्ञ निर्मात्याने – ज्याला भविष्यातील सर्व घटना आणि त्यांच्या परिणामांचे ज्ञान आहे – जाणीवपूर्वक रचले असण्याचीही शक्यता आहे. पण जितका जास्त विचार ह्या सगळ्याचा मी करतो तितका मी जास्त गोंधळतो. माझ्या ह्या पत्रावरून ते लक्षात आलेच असेल.’ – (पॅन्डिमोनियम मधून)
विज्ञानाच्या विवेकवादी वृत्तीमुळे जे बुद्धीला पटत नाही ते न स्वीकारण्याकडे कल वाढत गेला. विज्ञानाच्या पलिकडचे रागलोभ, इच्छाआकांक्षा, दुःख, प्रेम ह्यांचे जग जणू बधिर होऊन गेले. काव्य, चित्र, संगीत ह्यांचा आस्वाद घेण्याची क्षमता नष्ट झाल्याचे डार्विनला वाटणारे दुःख त्याने नोंदवून ठेवले आहे :
“माझे मन म्हणजे तथ्यांच्या प्रचंड साठ्यातून सामान्य नियम घडवणारे एक यंत्र झाले आहे. पण ह्याच्यामुळे मेंदूच्या ज्या भागात उच्च अभिरुचींचे केंद्र आहे त्याचा क्षय का व्हावा हे मला कळत नाही.. ह्या अभिरुचि नष्ट होणे म्हणजे आनंदाचा नाश होणे. ह्यामुळे बुद्धीला हानी पोचण्याची शक्यता आहेच, पण आपल्या स्वभावातील भावनिक वृत्ती दुर्बल बनून नैतिक व्यक्तिमत्त्वाचा हास होण्याचा धोकाही मोठा आहे.” – (पॅन्डिमोनियम मधून)
मानसिक, सामाजिक, बौद्धिक पातळीवर प्रचंड उलथापालथीचा तो काळ होता. व्हिक्टोरियन काळातल्या पोकळ आशावादावर अनेकदा टीका होते, पण ह्या बदलांमुळे भांबावलेल्या लेखकांनी त्यातून सावरायला जर पोकळ आशावादाचा आधार घेतला तर ते क्षम्यच होते. विज्ञान आणि कलेच्या क्षेत्रांतील अंतर वाढत गेले. सी.पी.स्नोसारख्या लेखक-वैज्ञानिकाला विसाव्या शतकामध्ये ह्या वाढत्या अंतराची भीषणता जाणवून त्याबद्दल धोक्याची सूचना द्यावीशी वाटली. त्याच्या दोन संस्कृती (Two Cultures) ह्या पुस्तकात तो अतिविशिष्टीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा उल्लेख करतो. होमर, हेसिअड, व्यास, वाल्मिकी वगैरे ऋषितुल्य कवी जीवनाच्या समग्रतेला सामोरे गेले. त्यांच्या कवितेला विषयाचे बंधन नव्हते. धार्मिक, सामाजिक, वैज्ञानिक-जीवनाच्या सर्व अंगांचा त्यांनी विचार केला आणि आपल्या काव्यातून त्यांची अभिव्यक्ती केली. पण हळूहळू ह्या समग्रतेवरची कवींची, तत्त्वज्ञांची पकड ढिली पडत गेली. विशिष्टीकरणाच्या प्रक्रियेत सगळेच एकटे पडत गेले. पण जे समकालीन प्रश्नांना सामोरे गेले त्यांचे वायय टिकले. हम्फ्री जेनिंग्ज म्हणतो, “काळाच्या ओघात निर्माण झालेल्या समस्यांना उत्तरे मिळाली नाहीत पण ह्या समस्याही नोंदल्या गेल्या आणि त्यासाठी काव्याचे माध्यम असलेली भाषा, शब्द हेच वापरले गेले. कविता टिकली ती ह्या स्वरूपात. मिल्टन, ब्लेक ह्यांच्या काव्यातून, डिकन्सच्या कादंबऱ्यातून ती टिकून राहिली; न्यूटन, डार्विन ह्यांच्यासारख्या तत्त्वज्ञ-वैज्ञानिकांच्या निर्मितीमधून ती व्यक्त होत राहिली, कारण तत्कालीन आणि निकटच्या वैज्ञानिक सिद्धान्तांच्या पलिकडे पाहण्याची त्यांच्यात क्षमता होती. स्वतःच्या नवीन वैज्ञानिक विचारांचा इतर संस्थांशी (उदा. धर्म) होत असलेला संघर्ष जाणण्याची त्यांच्याजवळ दृष्टी होती.”
(पॅन्डिमोनियम च्या प्रास्ताविकातील काही भागाचा संक्षेप) माणसाच्या स्वभावातील जी भावनिक वृत्ती दुर्बल होण्याची डार्विनला भीती वाटत होती ती टिकवून ठेवण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असणारी दृष्टी, प्रतिभा त्याने कमावली होती आणि संवेदनशीलतेने जोपासली होती. १९३, मश्रुवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर-१०.