एक शिक्षक होता. त्याचा मुलगा दुसऱ्याच गावातील एका दुसऱ्या शाळेत शिकत होता. त्या मुलाचा दहावीच्या परीक्षेत बोर्डात नंबर आला. शिक्षकाचा ऊर अभिमानाने भरून आला. त्याच्या मनात आले, “शेवटी माझाच मुलगा आहे हा. बुद्धीचा आनुवंशिक वारसा मिळाल्यामुळेच हे यश मिळवणे त्याला शक्य झाले.’ संध्याकाळी त्याचा एक विद्यार्थी पेढे द्यायला आला. त्याचाही बोर्डात नंबर आला होता. शिक्षकाचा ऊर पुन्हा अभिमानाने भरून आला. त्याच्या मनात आले, “शेवटी मीच शिकविले त्याला. ही मुले म्हणजे मातीचे गोळे असतात. आकार द्यावा तशी घडवता येतात.
‘ या शिक्षकाच्या जागी तुम्ही-आम्ही कोणीही असतो, तरी असेच विचार मनात आल्यावाचून राहिले नसते. मग यातले खरे काय ? आपल्या व्यक्तिमत्त्वातील आनुवंशिक भाग किती? आणि संस्कारामुळे, आसपासच्या वातावरणामुळे, शिक्षणामुळे घडलेले व्यक्तिमत्त्व किती ? नेचर किती? आणि नर्चर किती ? सारे काही ठरलेले आहे ? का सारे काही घडवता येते?
दीडशे वर्षांपूर्वी डार्विन/वॉलेस या शास्त्रज्ञांनी उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त मांडला. आणि माणसाला सतत सतावत असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर सापडले. हजारो सजीवांच्या वेगवेगळ्या आणि गुंतागुंतीच्या शरीरचनेचे मूलभूत तत्त्व एकच आहे, शिवाय ते तत्त्व फार साधे आणि सोपे आहे, हे समजल्यावर सगळेच अचंबित झाले. इतके, की फार साधा-सोपा असल्यामुळेच उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त अजूनही कित्येकांनी मान्य केलेला नाही. शास्त्रज्ञांच्या जगात मात्र उत्क्रांतिवादाने चांगलीच उलथापालथ घडवून आणली.
उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त सर्वस्पर्शी आहे. इतिहास, समाजशास्त्र, अर्थकारण, राजकारण, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, मानसशास्त्र, कला या साऱ्या क्षेत्रांत उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्ताने खळबळ माजविली. अनेक वाद उफाळले. त्यातील एक वाद म्हणजे नेचर की नर्चर ?
नेचर म्हणजे प्रकृती, माणसाला त्याच्या आनुवंशिक वारश्याने मिळालेला त्याचा जनुकसंच, नर्चर म्हणजे संस्कृती. माणसाला मिळालेले वातावरण, त्याच्यावर कळत-नकळत होणारे संस्कार, कुटुंबातून, समाजातून होणारे त्याचे संगोपन..
नेचर/नर्चरवाद म्हणजे माणसाच्या जडणघडणीत, त्याच्या स्वभावात, त्याच्या वर्तनात, त्याच्या जनुकसंचाचा भाग किती आणि त्याच्यावरच्या संस्काराचा भाग किती, याविषयीचा वाद.
जनुके म्हणजे रेणूंच्या भाषेत लिहलेल्या आज्ञावल्या. या आज्ञावल्यांबरहुकूम विविध प्रथिने, संप्रेरके, वितंचके तयार होतात. या साऱ्यांनी मिळून आपले शरीर बनते, वाढते, चालते. शरीराबरोबरच मन, भावना, बुद्धी, अहंकार अस्तित्वात येतात. एक-व्यक्तिमत्त्व आकार घेते.
मग आपले व्यक्तिमत्त्व जनुकांत जे लिहिले असेल त्यावरच ठरते का ? आपण म्हणजे ऑटोमॅटिक मशीन फक्त ? जनुकांच्या दोऱ्या धरून नाचणारी कठपुतळी?
इथे आपण वनस्पतींचे उदाहरण घेऊ व जनुके आणि भोवतालचे वातावरण यांचा परस्परसंबंध समजावून घेऊ. आंब्याच्या कोयीपासून आंब्याचे झाड येणार. त्याला आंबेच लागणार ; चिकूच्या बीपासून चिकूचे झाड येणार, त्याला चिकूच लागणार ; मग माती, पाणी आणि हवामान कोणतेही असो. वातावरणातील विविध घटकांनुसार झाडाचा आकार लहानमोठा, फळे कमीजास्त, स्वाद आणि रंग थोडा कमीअधिक होऊ शकेल, पण त्याचे स्वरूप मुळातून बदलत नाही. म्हणजे जनुकांमुळे निश्चित झालेल्या आज्ञांवरचा वातावरणाचा परिणाम उणे-अधिक असा होत राहतो. दुसरे असे की वातावरणाचा परिणाम सर्वसाधारण परिस्थितीत जाणवून येत नाही. अगदी टोकाच्या स्थितीत तो दिसून येतो. वातावरण फारच प्रतिकूल असेल, तरच झाड खुरटते. बोन्साय करायचे झाले तर नुसते छोट्या कुंडीत लावणे, पाणी कमी घालणे, हे पुरत नाही तर त्याची मुळे कापणे इत्यादीही करावे लागते; तेव्हाच ते तितके लहान होऊ शकते. तिसरे म्हणजे वातावरणातील विविध घटकांमध्ये नेमकेपणा नसला तरी चालतो. थोडे कमीअधिक खपून जाते. याउलट जनुकांच्या आज्ञावल्यांत अगदी नेमकेपणा असतो. एका अक्षराच्या फरकानेदेखील ध चा मा होऊ शकतो.
प्राथमिक प्राण्यांच्या बाबतीतही त्यांची ‘वागणूक’ जनुकांनी नियंत्रित केलेली दिसते. इथे एक उदाहरण पाहू. सी. इलीगन्स (C. Elegans) नावाचा लहानसा जंतू आहे. त्यांच्या वागण्याचा अभ्यास केल्यावर एक गमतीशीर निरीक्षण नोंदवले गेले. हे जंतू दोन प्रकारच्या स्वभावाचे आहेत. काही जंतू एकेकट्याने खाणे पसंत करतात. चरता चरता दुसऱ्याला धक्का लागला तर ते लगेच त्याच्यापासून लांब जातात. दुसऱ्या स्वभावांच्या जंतूंना समूह करून खायला जास्त आवडते. हे सोशल जंतू खाताना एकमेकांच्या अंगाला अंग घासतात. एकमेकांना वेटोळी घालतात. एकमेकांच्या अंगावर चढतात. आणि हे फक्त खात असताना. इतर वेळी ते एकेकटे असणेच पसंत करतात. अधिक अभ्यासानंतर असे आढळून आले की हा फरक पी-१ या जनुकांमधील फक्त एका अमिनोअॅसिडच्या फरकामुळे घडतो. स्वातंत्र्यप्रिय जंतूंमध्ये हा जीन npr-1-215V असतो तर सोशल जंतूंमध्ये हा जीन npr-1-215F असतो. सोशल जंतूंमधील npr-1 जीन काढून स्वातंत्र्यप्रिय जंतूंमधील npr-1 जीन तिथे घातला तर तेही एकेकटे खाऊ लागतात.
वनस्पती आणि प्रयोगशाळेतील प्राणी यांच्या बाबतीत एकेका जनुकामध्ये हवे तसे बदल करून त्याचे परिणाम पडताळून पाहता येतात. परंतु माणसांच्या बाबतीत मात्र असा अभ्यास करता येत नाही आणि आपल्याला तर उत्सुकता आहे माणसाचे व्यक्तिमत्त्व जनुके कशी काय ठरवतात, या बाबत.
मानवाचे जनुकीय अंतरंग हळूहळू उलगडते आहे. तसा जनुकांचा प्रभाव स्पष्टपणे प्रत्ययाला येतो आहे; तसेच नर्चरचा भाग किती व तो कशामुळे हेही स्पष्ट होत आहे. उत्क्रांतीमध्ये टिकून राहण्यासाठी बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता महत्त्वाची ठरते. अशी क्षमता अंगी येण्यासाठी मेंदू हा सर्वांत कार्यक्षम ठरला आहे. उत्तरोत्तर मेंदूचा विकास हा निसर्गाचा सर्वांत यशस्वी प्रयोग ठरला आहे.
मानवी अस्तित्वाची शरीर, बुद्धी, मन, ही अनिवार्य अंगे जनुकांतील आज्ञावल्यांनुसारच अस्तित्वात येतात. माणसाचे वजन, उंची, त्वचेचा रंग, डोळ्यांचा रंग, केसांचा रंग, त्यांचा कुरळेपणा, स्नायूंचे आकारमान, त्यांची लवचीकता, चपळपणा इ. अनेक शारीरिक गुणधर्म आणि त्यांच्यातील वैविध्य जनुकांतील वैविध्यामुळेच असते. मेंदूचे आकारमान त्यातील मज्जापेशींची संख्या, त्यांच्या जोडण्या (synapses), संदेशवहन करणारी प्रथिने (neurotransmitters) इ. सारे जनुकांतील आज्ञावल्यांनुसारच बनते. राग, लोभ, मद, मत्सर आदि भावना, मनाचा खुलेपणा, मनमिळाऊपणा, सहकार्यभावना, चिडखोरपणा या साऱ्यांनी बनलेले आपले मन हेही जनुकांमुळेच आकारास येते. अर्थात एका स्वभाववैशिष्ट्यासाठी एक जनुक असे नसते. शरीररचनेतील, तसेच स्वभावातील बहुधा सर्व गुणवैशिष्ट्ये अनेक जनुकांच्या एकत्रित परिणामांचे फलित असतात. जनुकांच्या आज्ञावलीतील एका अक्षराने माणसाचे व्यक्तिमत्त्व बदलू शकते, अशीही क्वचित उदाहरणे आहेत. इथे एक उदाहरण घेऊ.
माणसांमध्ये ११ नंबरच्या गुणसूत्रावर BDNF (Brain Derived Neurotrophic Factor) हे प्रथिन तयार करण्यासाठीचे जनुक आहे. ते १३३५ अक्षरांचे आहे. BDNF हे प्रथिन मेंदूतील मज्जापेशींच्या वाढीसाठी मदत करते आणि इतरही बरेच काही करते. प्रथिन म्हणजे अमिनोअॅसिडचे डबे एकापाठोपाठ एक जोडून बनवलेली लांबच्यालांब आगगाडी, मिशिगन येथील २७५ कुटुंबांतील माणसांचा आणि त्यांच्या जनुकांचा अभ्यास केल्यावर काही निरीक्षणे पुढे आली.
साधारणतः ७५% जनुकांमध्ये १९२ नंबरचे अक्षर जी (G) होते. त्यामुळे BDNF प्रथिनाच्या आगगडीचा ६६ नंबरचा डबा व्हॅलिन (valine) या अमिनोअॅसिडचा बनतो. तर २५% जनुकांमध्ये हे अक्षर ए (अ) होते. अर्थातच ६६ नंबरचा डबा होता मेथिओनिन (methionine). प्रत्येक माणसामध्ये जनुकांचे दोन संच असतात; एक आईकडून आलेला तर एक वडिलांकडून आलेला. या सगळ्या माणसांच्या व्यक्तिमत्त्वाची छाननी केली तेव्हा असे आढळले की ज्यांच्या जनुकांची जोडी व्हॅलिन/व्हॅलिन होती ते अधिक न्यूरॉटिक होते. ज्यांची जोडी व्हॅलिन/मेथिओनिन होती ते त्याहून कमी न्यूरॉटिक होते.
आणि ज्यांची जोडी मेथिओनिन/मेथिओनिन होती ते त्याहून कमी न्यूरॉटिक होते. अर्थात अशाप्रकारच्या संशोधनांमुळे वाहवत जाण्याचे कारण नाही. एका स्वभाववैशिष्ट्यासाठी एक जनुक, असाही याचा अर्थ नाही. पण जनुकांचा व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो एवढा संदेश मात्र यातून घ्यायला हरकत नाही.
चिम्पांझी माणसाचा सर्वांत जवळचा प्राणि-नातेवाईक. त्याच्या आणि आपल्या जनुकसंचात फक्त दोन ते अडीच टक्क्यांचा फरक आहे. पण एवढासा फरक केवढातरी गुणात्मक बदल घडवून आणतो. पूर्ण वाढ झालेल्या चिम्पांझीला कितीही शिकवले तरी स्मरणशक्ती, भाषा शिकण्यातील कौशल्य, समोरील व्यक्तीच्या मनातील हेतू ओळखणे अशा बाबतीत माणसाच्या दोन वर्षांच्या मुलाचीही तो बरोबरी करू शकत नाही.
माणसाचे रंगरूप, शरीरवैशिष्ट्ये आणि बुद्धी हे त्याच्यातील जनुकसंचाने ठरते, इथपर्यंत आता पटू लागले आहे. परंतु स्वभाव, वर्तन, आवडीनिवडी याही जनुकेच ठरवितात, हे अजूनही पटायला खूप अवघड जाते. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला खूप पैलू आहेत. त्यातील प्रत्येक पैलूवर जनुकांचा परिणाम किती आणि वातावरणाचा परिणाम किती हे तपासायचे असेल तर कोणतातरी एक घटक स्थिर ठेवणे गरजेचे आहे. पण माणसाच्या बाबतीत इतके सारे घटक आणि तेही सर्व चल. शिवाय माणसांमध्ये वनस्पती, प्राणी यांच्यावर करतो तसे, “एखादे जनुक काढा, एखादे जनुक घाला, काय होते बघा’, असले प्रयोगही करता येत नाहीत.
या साऱ्या अडचणींवर एक मार्ग सापडला. मोनोझायगोटिक जुळ्यांचा अभ्यास करणे. मोनोझायगोटिक जुळ्यांमध्ये पूर्ण जनुकसंच शंभर टक्के सारखाच असतो. ती एकाच लिंगाची असतात. अगदी एकसारखी दिसतात. स्त्रीबीज फलित होऊन एकपेशीय नवीन जीव तयार होतो. त्याच्याच दोन पेशी होतात. या दोन पेशींपासून दोन वेगवेगळी बाळे तयार होतात. त्यामुळे त्यांचे जनुकसंच हे एकमेकांच्या झेरॉक्स कॉपीच असतात. त्यांमध्ये एका अक्षराचादेखील फरक नसतो. अशी एकसारखी जुळी भावंडे कधी एकाच घरात वाढतात. तर कधी वेगवेगळ्या. कधी त्यांच्या जन्मदात्या आईवडिलांबरोबर वाढतात तर कधी दत्तक आईवडिलांबोरबर. अशा जुळ्यांचा अभ्यास केला तर संस्कारांचा, वातावरणाचा काय परिणाम होतो या बाबत काही निश्चित निष्कर्ष काढू शकू असे वाटल्याने अशा जुळ्यांचा पद्धतशीर अभ्यास डॉ. थॉमस बाऊचर्ड (Dr. Thomas Bouchard) यांनी अमेरिकेत १९७९ पासून सुरू केला.
हा अभ्यास Minnesota Study of Twins Reared Apart या नावाने सुरू झाला. परंतु त्याचा विस्तार जसजसा वाढत गेला तसतसा त्यात डायझायगोटिक जुळ्यांचा आणि मोनोझायगोटिक तिळ्यांचाही समावेश केला गेला. डायझायगोटिक जुळ्यांमध्ये दोन सख्ख्या भावंडांप्रमाणे ५०% टक्के जनुकसंच सामायिक असतो. हा मिनेसोटा दिन स्टडी जगप्रसिद्ध आहे. नेचर नर्चरवाद हा स्टडी समजून घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
यामध्ये आठ हजारपेक्षा अधिक जुळ्यांचा अभ्यास केला आहे. त्यात पूर्णपणे वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या मोनोझायगोटीक जुळ्यांचा समावेश आहे. हा अभ्यास संख्याशास्त्राचे नियम काटेकोररीत्या पाळून केलेला आहे.
प्रत्येक जुळ्याचा एकाच वेळी पण वेगवेगळ्या ठिकाणी साधारण पन्नास तास अभ्यास केला. त्यात त्यांचे जनुकीय नाते, त्यांचे आजार, मेंदूचा आलेख (EEG), इत्यादी तपासले. त्यांच्या संपूर्ण आयुष्याची माहिती घेतली. त्यांच्या बौद्धिक क्षमता, व्यवसायाबाबतची मते, आवडीनिवडी, मानसिक क्षमता, सामाजिक-धार्मिक मते, त्यांची मूल्ये, त्यांचे तत्त्वज्ञान, यांबाबतची माहिती घेतली. त्यांच्याकडून सविस्तर प्रश्नावली लिहून घेतली. सविस्तर मुलाखत घेतली. आणि नंतर या साऱ्यांचे तज्ज्ञ सायकॉलॉजिस्टकडून विश्लेषण करून घेतले. मानवी व्यक्तिमत्त्वाचे पाच अक्ष मानले गेले आहेत. Openness, Conscientiousness, Extroversion, Agreeableness आणि Neuroticism (OCEAN). या अक्षावर या जुळ्यांतील प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व निश्चित केले. काय होता या सगळ्याचा निष्कर्ष ?
मोनोझायगोटिक जुळी एकाच वातावरणात वाढली काय किंवा वेगवेगळ्या वातावरणात वाढली काय, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात खूपच साधर्म्य होते. जवळजवळ ७०%. वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या डायझायगोटिक जुळ्यांमध्ये कमी साधर्म्य होते. सख्ख्या भावंडात असते तेव्हढेच. ज्यांचे एकमेकांशी रक्ताचे नाते नाही अशा लोकांच्या व्यक्तिमत्त्वात मात्र अजिबात साधर्म्य नव्हते. मिनेसोटा दिन स्टडी सारखेच जगभरात इतर अनेक ठिकाणी अभ्यास झाले आहेत. सर्वांची निरीक्षणे सारखीच आहेत.
या सगळ्यांतून एक निष्कर्ष असा निघतो की ज्यांचा जनुकसंच १००% सारखा आहे, अशा एकसारख्या जुळ्यांचे व्यक्तिमत्त्व ७०% सारखे असते. पण या सगळ्यांतून एक निष्कर्ष असाही निघतो की ज्यांचा जनुकसंच १००% सारखा आहे अशा एकसारख्या जुळ्यांचे व्यक्तिमत्त्व ३०% वेगळे असते. हा तीस टक्के फरक कशामुळे पडला असावा ? अर्थातच त्यांना मिळालेल्या भिन्न वातावरणामुळे, संस्कारांमुळे, संगोपनामुळे. म्हणजेच नर्चरमुळे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. वातावरण दोन प्रकारचे असते. सामायिक वातावरण (shared environment) आणि व्यक्तिविशिष्ट वातावरण (non-shared environment). सामायिक वातावरण म्हणजे कौटुंबिक वातावरण. आईवडिलांचे स्वभाव, त्यांची मूल्ये, त्यांचे मुलांशी असलेले नाते, त्यांनी दिलेली शिक्षा किंवा भावंडातील प्रेम, स्पर्धा इ. सगळे. व्यक्तिविशिष्ट वातावरण म्हणजे शाळा, मित्र, सहकारी, हितसंबंधी, व्यावसायिक, नातेसंबंध, समाजातील प्रचलित चालीरीती, समजुती, गैरसमजुती, श्रद्धा, फॅशन इ.इ.
या दोन वातावरणांतील कोणते वातावरण व्यक्तिमत्त्व घडवायला कारणीभूत ठरते, हे ठरविण्यासाठीसुद्धा अनेक ठिकाणी एकसारखी जुळी, वेगवेगळी जुळी, सख्खी भावंडे, दत्तक भावंडे यांचा अभ्यास केला गेला. निष्कर्ष एकच निघाला, सामाईक वातावरणाचा (कौटुंबिक वातावरणाचा) फारच थोडा परिणाम व्यक्तिमत्त्व घडविण्यावर होतो. आणि हा परिणामसुद्धा फक्त लहान वयातच दिसून येतो. जसजशी मुले मोठी होतात, त्यांचे क्षितिज विस्तारते, त्यांना घराबाहेरच्या जगाची ओळख होते, तसतसा हा सामाईक वातावरणाचा परिणाम खूपच कमी, जवळजवळ नगण्य होत जातो. याउलट व्यक्तिविशिष्ट वातावरण व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावते.
जनुकसंच १०० टक्के सारखे असलेल्या, एकाच कुटुंबात वाढलेल्या, म्हणजेच सामाईक वातावरण सारखेच असलेल्या मोनोझायगोटिक जुळ्यांचे व्यक्तिमत्त्व ३०% वेगळे होते. हे वेगळेपण मुख्यतः त्यांचे व्यक्तिविशिष्ट वातावरण वेगवेगळे असल्यामुळे निर्माण झाले होते. दत्तक मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या दत्तक आईवडलांचा, दत्तक घरातील वातावरणाचा परिणाम दिसतो. पण तो फार थोडाकाळ दिसतो. तारुण्यात पदार्पण करताच, त्यांचे व्यक्तिमत्त्व बरेचसे त्यांच्या नैसर्गिक आई-वडिलांप्रमाणेच बनते.
एकंदरीतच वातावरणाचा सहभाग हा व्हिटॅमिनसारखा असतो. कमतरता झाली तर आजार होतो. “जास्त व्हिटॅमिन घेतले तर जास्त फायदा” असे नसते. आपले व्यक्तिमत्त्व बह्वशी आपला जनुकसंच आणि थोडाफार सामाजिक-सांस्कृतिक वातावरणाचा आपल्यावरील परिणाम, याने घडवले जाते. कौटुंबिक संगोपनाचा फक्त एक आधार म्हणून उपयोग होतो. त्याचा फारसा दृश्य परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर दिसत नाही.
हे सगळे निष्कर्ष धक्कादायक आहेत खरे, पण पाश्चात्त्य संस्कृतीत दिसणारा कौटुंबिक संगोपनाचा नगण्य प्रभाव आपल्या पौर्वात्य संस्कृतीत दिसून येईल का, हे पडताळून पाहायला हवे. पौर्वात्य संस्कृतीत कौटुंबिक नातेसंबंध घट्ट विणीचे असतात. मुलांच्या कौटुंबिक संगोपनाचा काळ हा आपल्याकडे अधिक दीर्घ असतो, हे लक्षात घेता आपल्याकडेही असा अभ्यास होणे आवश्यक वाटू लागते.
“लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते” हे ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो. पाश्चात्त्य संस्कृतीतसुद्धा माणूस ब्लँक स्लेट (लॅटिन शब्द ढरीश्रर ठरीर) म्हणून जन्माला येतो. येणाऱ्या अनुभवांतून, संस्कारांतून हळूहळू त्याचे व्यक्तिमत्त्व घडते, असा ठाम समज होता. त्यामुळे सारेच आपल्या प्रयत्नावर अवलंबून आहे ; योग्य दिशेने सांस्कृतिक रेटा ठेवल्यास आपण हवे ते साध्य करू शक असे वाट लागले होते. ‘अश्रश्र शिप रीश लीप शारिश्र” यावर अढळ श्रद्धा ठेवल्याने मार्क्सवाद सत्यतेत आणण्याचा जोरदार प्रयत्न झाला. अिश्रश्र शिप रीश लीप शीरश्र, हे अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात आहे ; मार्क्समध्ये नाही. स. या सगळ्या विचारधारेलाच या संशोधनाने छेद दिला. अर्थातच या सगळ्याचा अर्थ “जनुके म्हणजेच सर्व काही” असा आहे का? मुळीच नाही. वनस्पती आणि प्राचीन, प्राथमिक स्वरूपाचे प्राणी यांच्या बाबतीत जनुके म्हणजे सर्व काही असे असले तरी जसजसा मेंदू उत्क्रांत होत गेला तसतशी परिस्थिती बदलत गेली. आज माणसाचा मेंदू खूपच प्रगत आहे. त्याच्याकडे तल्लख स्मरणशक्ती आहे. भाषा शिकण्याची, संदेश देवाण-घेवाणीची क्षमता आहे. ज्ञान साठवून पुढील पिढीपर्यंत पोचविण्याची कुवत आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांची स्पष्ट जाणीव आहे. कशामुळे काय झाले, हा इतिहास समजून घेऊन, “असे केल्यास असे होईल” ही भविष्यकाळाची अटकळ आहे. हे सगळे फक्त माणसाकडे आहे. म्हणून फक्त माणूसच जनुकांनी नियत केलेल्या आपल्या ऊर्मी, आपला स्वभाव यांविरुद्ध बंड करू शकतो. स्वतः जनुकांच्या अरेरावीविरुद्ध बंड करू शकतो. आपले व्यक्तिमत्त्व अधिक उन्नत घडवू शकतो.
कोणी म्हणेल मेंदू हे जनुकांचेच अपत्य नव्हे काय ? अर्थातच आहे. पण आपला मेंदू त्याच्यातील क्षमतेमुळे भाषा, ज्ञान, कला आणि संस्कृती याची निर्मिती करतो. रेडियो, टेलिव्हीजन, कॉम्प्युटर, इंटरनेट ही सारी मेंदूचीच अपत्ये. या अर्थाने ही सारी अपत्ये आपल्या जनुकांचीच अपत्ये होत. पण आज माझ्यासमोरील कॉम्प्युटर, इंटरनेट, हे माझा जनुकसंच नाही तर त्यांचे वातावरण आहे.
म्हणजेच मेंदू हा आता फक्त जनुकांचा संच राहात नाही तर अशा वातावरणाचाही होतो की ज्याच्यावर त्याचे स्वतःचे नियंत्रण आहे. स्वनियंत्रित राहून स्वतःला बदलवीत, घडवीत नेण्याच्या अगणित शक्यता यामुळे मेंदू निर्माण करतो.
माणसाच्या बाबतीत नर्चरचा भाग लक्षणीयरीत्या वाढलेला आहे तो त्याच्या अतिविकसित मेंदूमुळेच. या विकसित मेंदूत सर्वांत निर्णायक शक्ती ठरली ती भाषेची देणगी. या भाषेच्या देणगीमुळेच मानव हा ज्ञानाची परंपरा निर्माण करू शकला, आणि संस्कृतीचा केवढा तरी डोलारा उभा करू शकला. ज्ञान आणि संस्कृतीच्या आदानप्रदानामुळे व्यक्तिविशिष्ट संगोपनाच्या अपरिमित संधी निर्माण झाल्या.
माणसाचे भाषा शिकण्याचे कौशल्य चांगलेच प्रगत आहे. पण त्यासाठी त्याच्या मेंदूवर बालपणातील ठराविक काळातच भाषेचे संस्कार व्हावे लागतात. याला window period किंवा critical period of learning असे म्हणतात. एकदा का हा काळ उलटून गेला की भाषा शिकण्याची क्षमता खूपच कमी होत जाते. भाषेतील बारकावे समजत नाहीत. वाक्यरचना सदोष राहतात.
प्रत्येक भाषेचे स्वतःचे व्याकरण म्हणजे नियम असतात. सर्व भाषांच्या व्याकरणाचेही एक सामाईक व्याकरण असते. भाषा कुठलीही असो, त्यात कर्ता, कर्म, क्रियापद असते, विशेषणे असतात, विभक्तिप्रत्यय असतात, एकवचन, बहुवचन असते, वर्तमान, भूत, भविष्यकाळ असतो. भाषेची रचना, त्यातील नियम बोलायला, लिहायला, वाचायला शिकताशिकता आपण आपसूक शिकतो. जाणतो. हे जाणणे मेंदूतील ‘ब्रोकाज एरिया’ या भाषाकेंद्राच्या विशिष्ट रचनेमुळे शक्य होते.
ब्रिटनमधील एका मोठ्या घराण्यातील व्यक्तींचा आणि त्यांच्या जनुकांचा अभ्यास करून असे सिद्ध झाले आहे की केवळ एका जनुकांतील बदलामुळे घडून येणारा प्रथिनातील बदल अशा व्यक्तींमध्ये specific language impairment हा दोष उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतो. त्या व्यक्ती अन्यथा हुशार आहेत. त्यांचा बुद्ध्यंक चांगला आहे. पण त्यांना बहुवचने करण्याचे नियम कळत नाहीत. त्यांना वाक्यांचा काळ बदलता येत नाही. तसेच शब्दांच्या पुढे लागणारे प्रत्ययही कळत नाहीत.
यामुळे असे म्हणता येते की सगळ्या भाषांच्या व्याकरणांचे मिळून जे नियम असतात त्यांचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर नैसर्गिकरीत्या मेंदूमध्ये उपलब्ध असतेच. फक्त डाटा भरला जाण्यासाठी माणसाचे मूल ज्या भाषिक संस्कारात वाढले ते संस्कार आवश्यक ठरतात. जे मूल चिनी समाजात वाढते ते चायनीज भाषा बोलते, जे मूल मराठी समाजात वाढते, ते मराठी भाषा बोलते.
जी मुले बहिरी असतात. त्यांचा बुद्ध्यंक, भाषेचे केंद्र, बोलण्याची क्षमता सगळे योग्य असूनही ती बोलू शकत नाहीत. ऐकताच येत नसल्याने भाषेचे संस्कार होऊ शकत नाहीत. डाटा भरलाच जात नाही. लहान वयातच योग्य उपचाराने त्यांचे ऐकणे सुधारले तर ती आपल्यासारखीच बोलू वाचू शकतात. पण window period उलटून गेल्यावर उपचार झाले तर मग त्यांची भाषा पूर्ण विकसित होऊ शकत नाही.
हा विंडो पिरियड फक्त भाषेपुरता मर्यादित नाही, तर इतर अनेक बाबतीतही महत्त्वाचा ठरतो. विशिष्ट चवीच्या खाण्याचा संस्कार, समूहविशिष्ट परंपरा आणि रूढी, धार्मिक संस्कार हेही ठराविक वयात झाले तरच खोलवर रुजतात. हा window period प्राण्यांच्या बाबतीत तर जास्तच महत्त्वाचा ठरतो. बदकाचे पिल्ल जन्माला आले की आईच्या मागे-मागे जाते. अगदी ती जाईल तिथे. जणू अदृश्य धाग्याने बांधले असल्यासारखे. पिल्लू आईला कसे ओळखते? ते आईला मुळीच ओळखत नाही. मग ते आईच्याच मागे का जाते? त्याच्या मेंदूमध्ये असे हार्ड वायरिंग असते की जन्माला आल्यावर साधारण तासाभरात (window period) जे काही पांढरे, गोल हलणारे असेल त्याच्या मागे जायचे. आणि मग काहीही झाले तरी त्याच्याच मागे जायचे. पिलाचे डोळे उघडताच त्याच्या समोरून पांढरा फुगा नेला तर ते फुग्यामागोमाग जाऊ लागते. इतकेच नाही तर नंतर ते खऱ्या आईकडे ढुंकूनही पाहात नाही. आणि ते सुद्धा आयुष्यभर. या सगळ्याचा अर्थ काय ?
कोणत्याही क्षमतेसाठीचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणे हे जनुकांचे (नेचरचे) काम असते. पण योग्यवेळी त्यात विशिष्ट डाटा भरणे हे संस्कारांचे (नर्चरचे) काम असते. वेळीच असे संस्कार झाले नाहीत तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधील क्षमता वाया जाऊ शकतात.
थोडक्यात आपण म्हणजे ऑटोमॅटिक मशीन नाही. कठपुतळीही नाही. तसेच आपण म्हणजे मातीचा गोळा नाही, कोरी पाटीही नाही. माणसाच्या रोजच्या आयुष्यात नेचर आणि नर्चर यांची कशी गुंफण झालेली असते त्याची उदाहरणे पाहू.
अमेरिकन जलतरणपटू फेल्प्स याने ऑलिंपिकमधील आजपर्यंतचे अनेक विक्रम मोडले आणि अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले. त्याचे यश हे त्याचे नेचर आणि त्याला मिळालेले पोषक नर्चर याचे उत्तम उदाहरण आहे. तो आजानुबाहू आहे. त्याच्या हातापायाचे पंजे मोठे आहेत. त्याची फुफ्फुसे जास्त हवा सामावून घेऊ शकतात. त्याच्या स्नायूंतून आकुंचन-प्रसरणाने निर्माण होणारे लॅक्टीक अॅसिड लवकर रक्तात शोषले जाते. त्याच्या शरीरचनेची ही सारी वैशिष्ट्ये त्याच्या स्वतःच्या विशिष्ट जनुकसंचामुळेच त्याला मिळाली आहेत. या साऱ्या गुणवैशिष्ट्यांचा त्याला जलतरणात फायदा होईल हे हेरले गेले. आणि मग त्या दिशेने प्रयत्न करून त्याला परिश्रमाची, प्रशिक्षणाची जोड देऊनच त्याला हे यश संपादता आले.
नेचर आणि नर्चर परस्परावलंबी असल्याचे आणखी एक उदाहरण. गुन्हेगारी प्रवृत्ती ही आनुवंशिक आहे, की विशिष्ट वातावरणामुळे, संस्कारामुळे निर्माण होते? याविषयी डेन्मार्कमध्ये एक अभ्यास केला गेला. हा शोधनिबंध १९८४ साली सायन्स या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झाला. त्यातील निष्कर्ष असे, गुन्हेगार आईबापांच्या पोटी जन्माला आलेली मुले, गुन्हेगार आईबापांनी वाढवली तर ती गुन्हेगार बनण्याचे प्रमाण सर्वांत जास्त होते. गुन्हेगार आईबापांच्या पोटी जन्माला आलेली मुले, सद्वर्तनी आईबापांनी वाढवली तर ती गुन्हेगार बनण्याचे प्रमाण त्याहून थोडे कमी होते. सद्वर्तनी आईबापांच्या पोटी जन्माला आलेली मुले, गुन्हेगार आईबापांनी वाढवली तर ती गुन्हेगार बनण्याचे प्रमाण बरेच कमी होते. सद्वर्तनी आईबापांच्या पोटी जन्माला आलेली मुले, सद्वर्तनी आईबापांनी वाढवली तर ती गुन्हेगार बनण्याचे प्रमाण सर्वांत कमी होते. आता निष्कर्ष काढण्याची वेळ आली आहे.
“माणसाचे व्यक्तिमत्त्व जनुकेच ठरवतात” किंवा “माणसाचे व्यक्तिमत्त्व हवे तसे घडवता येते’ अशी टोकाची विधाने करणे आततायीपणाचे ठरेल. माणसाच्या आयष्यात नेचर महत्त्वाचे आहेच पण नर्चरसुद्धा महत्त्वाचे आहे. माणसाचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात किती टक्के नेचरचा वाटा आहे आणि किती टक्के नर्चरचा वाटा आहे याबाबत मात्र स्पष्ट आणि निर्णायक उत्तर अजून तरी हाती आलेले नाही, नजिकच्या भविष्यकाळात ते मिळेल अशी चिन्हे नाहीत. मात्र या साऱ्या चर्चेतून एक स्पष्ट होते. या हरहुन्नरी, नाना कळा अंगी असलेल्या आणि निर्मितिक्षमतेची असामान्य देणगी मिळालेल्या माणसाला तहेत-हेचे अनुभव घेण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, शिकण्यासाठी आसपासचे वातावरण संधी देते. आणि त्यामुळेच माणसाचे आनुवंशिक अस्तित्व अनेक अंगाने बहरून येते.
“संस्कृती का प्रकृती?’ हा वाद फिजूल आहे. संस्कृतीतून फुलणारी प्रकृती असेच या जोडीचे नाते आहे. शेवटी इतके फिरून आपण कुठे पोहचलो? जिथून सुरुवात केली तिथेच आहोत का? असूही कदाचित. पण आता आपण अधिक डोळस झालो आहोत. अधिक प्रगल्भ झाला आहोत. चेकॉव्हने म्हटल्याप्रमाणे “चरप ळश्रश्र लशलोश लीींशी हशपीहे हळा हरी हश ळी श्रळज्ञश”
आपल्या लेखात सुरुवातीला आलेल्या शिक्षकाने हा नेचर-नर्चर वाद खोलात जाऊन समजावून घेतला तर त्याच्या मनात येईल, “माझ्या मुलाच्या यशात आनुवंशिक बुद्धीचा भाग नक्कीच आहे. पण त्याला मिळालेले इतर शिक्षकांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे आहे. आणि माझ्या वर्गातील मुलांच्या यशात माझ्या मार्गदर्शनाचा सिंहाचा वाटा आहेच पण त्याला मिळालेल्या आनुवंशिक बुद्धिमत्तेला दादही द्यायलाच हवी.”
त्या शिक्षकाच्या जागी तुम्ही आम्ही कोणीही असू तरी नेचर-नर्चर वाद समजून घेतल्यास असेच, थोडे अधिक समंजस होऊ. संदर्भ सूची – १) नेचर व्हाया नर्चर – मॅट रिडली. २) जीनोम – मॅट रिडली, ३) ब्लँक स्लेट – स्टीव्हन पिंकर, ४) आर वुई हार्डवायर्ड ? विल्यम क्लार्क, मिशेल ग्रुन स्टीव २५५, मंगळवार पेठ, कराड ४१५ ११०. (फोन : २३३७४)