सुमारे पंचवीस वर्षांच्या सृष्टिनिरीक्षण व संशोधनानंतर सजीवांच्या उत्क्रांतीचा जो सिद्धान्त चार्ल्स रॉबर्ट डार्विन (१२ फेब्रुवारी १८०९ ते १९ एप्रिल १८८२) यांनी साकार केला, त्याची मांडणी त्यांनी अशी केली – सजीवांमध्ये प्रजोत्पादनाची प्रचंड क्षमता असते. त्यामुळे सजीवांची बेसुमार निर्मिती होते. सजीवांच्या प्रचंड संख्येच्या मानाने अन्न व निवाऱ्याच्या सुविधा कमी असल्याने त्यांच्यात जगण्यासाठी व तगण्यासाठी धडपड सुरू होते (struggle for existence). या धडपडीतूनच जीवघेणी स्पर्धा (competition) सुरू होते. स्पर्धेत तगून राहण्यासाठी परिस्थित्यनुरूप सजीवांच्या गुणांत बदल घडून येतात. बदललेल्या सुयोग्य गुणांची निसर्ग निवड करतो (natural selection). असे सुयोग्य गुण प्राप्त केलेले सजीवच तगून राहतात (survival of the fittest). गुणांत झालेल्या अयोग्य बदलांमुळे सजीव मरतात, नाहीसे होतात. सुयोग्य गुणांचा संच व अनुवंश तयार होतो व त्यातून नव्या सजीवांची निर्मिती होते. हे चक्र निसर्गात अव्याहतपणे सुरू असते व सजीव क्रमाक्रमाने – खालच्या पातळीवरून वरच्या पातळीवर उन्नत, उत्क्रांत होत राहतात. सुरुवातीच्या साध्या एकपेशीय सजीवांपासून (जे रासायनिक पदार्थांपासून योगायोगाने निर्माण झालेले असतात) बहुपेशीय जीव तयार होतात. त्यांचाही क्रमाने विकास होत राहून आताच्या माणसांपर्यंत गुंतागुंतीचे, सक्षम अवयव असलेले जीव निर्माण होत राहतात. क्रमाक्रमाने झालेल्या या उत्क्रांतीने कोट्यवधी वर्षांचा कालावधी घेतला व अजूनही ती सुरू आहे. शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार सुमारे साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी साध्या रासायनिक पदार्थांपासून एकपेशीय जीव निर्माण झाले, क्रमाक्रमाने ते विकसित, प्रगत होत गेले. त्यातून सजीवांचे कोट्यवधी प्रकार निर्माण होत गेले व विकासाचे अनेक टप्पे ओलांडत दोन लाख वर्षांपूर्वी आताचा मनुष्यप्राणी पृथ्वीतलावर अवतरला.
खरे तर डार्विन हा सर्वसाधारण विद्यार्थी. या विषयातले कोणतेही औपचारिक शिक्षण डार्विनने घेतले नव्हते. वडील रॉबर्ट डार्विनना असे वाटायचे की आजोबा इरॅस्मस डार्विनप्रमाणे त्यांच्या नातवाने डॉक्टर होऊन त्यांचा व्यवसाय पुढे चालवावा. एडिंबरा येथे वैद्यकीय शिक्षणासाठी चार्ल्सला त्यांनी पाठविलेसुद्धा, परंतु मृत माणसांची पोटे फाडताना त्याला जी शिसारी आली त्याने त्या शिक्षणाला रामराम ठोकावयास भाग पाडले. नाइलाजास्तव मग वडिलांनी त्याला धर्मशिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात दाखल केले. तेथून तो १८३१ साली कसाबसा पदवीधर झाला. गंमत म्हणजे मृत शरीरे पाहून शिसारी आलेला चार्ल्स वनस्पती, कीटक, प्राणी यांच्या निरीक्षणात, त्यांचे विच्छेदन करण्यात रमला. २७ डिसेंबर १८३१ ते ३ ऑक्टोबर १८३६ या कालावधीत एच्.एम्.एस्. बीगल या ब्रिटिश आरमाराच्या सर्वेक्षण जहाजातून ५७ महिन्यांचा जो प्रदीर्घ सागरी जगप्रवास केला, त्याने डार्विनला जीवसृष्टीबद्दल नवी दृष्टी दिली. या प्रवासाने माझे जीवनच पार बदलून टाकले असे डार्विनने स्वतः नमूद करून ठेवले आहे. या प्रवासात दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागरातील बेटे, पॅसिफिक महासागरातील गॅलापेगाँस बेटे, न्यूझीलंड, टास्मेनिया, सेंट हेलेना, हिन्दी महासागर, केप ऑफ गुड होप आदि प्रदेशांचे व तेथील जीवसृष्टीचे बारीक निरीक्षण डार्विनने केले. सोबत त्याने १५२९ प्रजातींच्या अल्कोहोलने भरलेल्या बाटल्या, ३९०७ वनस्पती व प्राणी यांचे वाळविलेले नमुने, गॅलापेगॉसमधील जिवंत कासवे आणि याव्यतिरिक्त प्राणिशास्त्रावरील ३६८ पाने टिपणे, भूशास्त्रावरील १३८३ पाने टिपणे व ७७० पानांची रोजनिशी, एवढा खजिना आणला. या प्रवासात त्याने केलेले प्राणी व वनस्पती यांचे बारीक निरीक्षण, नैसर्गिक परिस्थितीशी त्यांचे अनुयोजन (रवीरींळेप), सजीवांत झालेले शारीरिक व क्रियावैज्ञानिक (हिीळेश्रेसळलरश्र) बदल, आदी निरीक्षणांमुळे जीवजातींच्या शिलळशी) उगमासंबंधी त्याच्या मनात ठोस संकल्पना साकार झाल्या व त्यातून उत्क्रांतिवाद विकसित झाला. एका निसर्गशास्त्र्याचा बीगलवरून प्रवास हा त्याचा ग्रंथ खूप गाजला.
थोडक्यात उत्क्रांतिवाद ही काही सहज सुचलेली कल्पना नाही. बारीक निरीक्षण, विश्लेषण, पुराव्यांची सांगड, चिंतन व मनन या प्रदीर्घ प्रक्रियेतून साकार झालेला तो एक जगाला हादरवून टाकणारा सिद्धान्त ठरला.
परंपरावाद्यांचा परमेश्वरनिर्मित सृष्टिवाद (Creationism) २४ नोव्हेंबर १८५९ रोजी डार्विनचा उत्क्रांतिवाद त्याच्या Origin of Species by Means of Natural Selection or the Preservation of Favoured Races in the Struggle for Life (जगण्याच्या धडपडीतील निसर्गनिवडीमुळे अथवा जातींच्या रक्षणामुळे (नव्या) प्रजातींची उत्पत्ती) या पुस्तकाने जगासमोर आला व जगभर एकच खळबळ उडाली. पहिल्याच दिवशी पुस्तकाच्या सर्व प्रती संपल्या. पूर्वापार समजुती उद्ध्वस्त करणारा हा सिद्धान्त असल्याने चर्चने त्याला कडाडून विरोध केला. एवढेच नव्हे तर त्या काळातील साचेबद्ध विचार करणारे वैज्ञानिक व विचारवंत यांनी डार्विनवर टीका करून त्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला.
परमेश्वरनिर्मित सृष्टिवादानुसार परमेश्वराने या विश्वाची व सृष्टीची निर्मिती सात दिवसांत केली होती. पहिल्या दिवशी प्रकाश ; दुसऱ्या दिवशी आकाश; तिसऱ्या दिवशी जमीन, समुद्र, वनस्पती; चौथ्या दिवशी सूर्य, चंद्र व तारे ; पाचव्या दिवशी जलचर प्राणी आणि पक्षी ; सहाव्या दिवशी भूचर प्राणी, पुरुष आणि स्त्री निर्माण करून सातव्या दिवशी त्याने विश्रांती घेतली; अशी बायबलमधील कथा होती. किंबहुना सर्व धर्मशास्त्रे थोड्याफार फरकाने असेच सांगत होती. ब्रहादेवाने सृष्टीची निर्मिती केली होती, असे हिंदु पुराणे सांगत होती. एकदा निर्माण झालेली ही सृष्टी व तीमधील जीवजाती अपरिवर्तनीय आहेत, निर्माण झाल्यावर त्या जशा होत्या तशाच आज आहेत व पुढेही त्या तशाच राहणार आहेत, असेच हे निर्मितिवादी सांगत होते. डार्विनचा उत्क्रांतिवाद नेमकी याच्या उलट मांडणी करीत होता. सृष्टी एका दमात निर्माण झाली नसून ती क्रमाक्रमाने विकसित झाली. जीव अपरिवर्तनीय नसून ते परिवर्तनीय आहेत. हे परिवर्तन मंदगतीने होत आलेले असून कोट्यवधी वर्षांच्या कालावधीतून घडून आलेले आहे. आता ज्या जीवजाती अस्तित्वात आहेत त्या पूर्वीच्या नाहीशा झालेल्या जीवजातींच्या वंशज आहेत. त्या टिकल्या याचे कारण त्यांच्यातील चांगले, म्हणजे तत्कालीन परिस्थितीशी जुळवून घेणारे गुण परिवर्तनाने निर्माण झाले व निसर्गाने त्यांची निवड करून ते टिकवून धरले. डार्विन म्हणतात, “”| am fully convinced that species are not immutable ; but those belonging to what are called the same genera are lineal descendents of some other and generally extinct species, in the same manner as the acknowledged varieties of any one species are the descendents of that species. Further more, I am convinced that natural selection has been the most important, but non-exclusive, means of modification”. डार्विन बजावतात की नैसर्गिक निवड हे बदलाचे महत्त्वाचे कारण असले तरी ते काही एकमेव कारण नव्हे. त्यांच्या म्हणण्याचा मथितार्थ असा की प्रजाती (जीव) स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या नाहीत. आणि त्या अपरिवर्तनीयही नाहीत. विशिष्ट जातिसमूहांशी (ऋशपी) संबंधित असलेल्या प्रजाती (जीवजाती) त्यांच्या अगोदरच्या नाहीशा झालेल्या प्रजातींच्या वंशज आहेत. “”New species have come on the stage slowly and at successive intervals and the amount of change after equal intervals of time is widely different in different groups”. नव्या प्रजाती हळूहळू, क्रमाक्रमाने झालेल्या स्थित्यंतरातून अस्तित्वात आल्या, आणि सारख्या कालखंडातून झालेल्या बदलांचे प्रमाण प्रत्येक (जीवजातींच्या) गटात वेगवेगळे आहे. डार्विन यांचे समकालीन निसर्गशास्त्रज्ञ आल्फ्रेड वॉलेस यांची निरीक्षणे व मांडणी जवळ जवळ अशीच होती; परंतु उत्क्रांतीच्या सिद्धान्ताचे सर्व श्रेय त्यांनी डार्विन यांनाच दिले. परंपरावादी का खवळले हे डार्विनच्या वरील मतांवरून समजून येते. १८६९ साली ब्रिटिश सायन्स अॅकॅडमीच्या बैठकीत सर ब्रॉडी यांनी डार्विनच्या सिद्धान्तावर कडाडून हल्ला चढविला होता. परंतु जोसेफ हूकर यांनी उत्क्रांतीचे जोरदार समर्थन केले व ब्रॉडी यांना बजावले की त्यांनी हा सिद्धान्त समजून घेतलाच नाही. थॉमस हक्सले, असा ग्रे, अर्स्ट हेकेल यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे विचारवंत उत्क्रांतिवादाचा स्वीकार करू लागले. नामवंत जीवशास्त्रज्ञ सर ज्यूलियन हक्सले यांनी नमूद केले आहे की डार्विनच्या उत्क्रांतिवादाने विज्ञानाच्या ज्ञानभंडारात जी भर टाकली आहे, जे योगदान दिले आहे, त्याचे मोजमाप करणे जवळजवळ अशक्य आहे. जीवसृष्टीच्या निर्मितिसंबंधात शतकानुशतके ज्या कथा व भाकडकथा प्रचलित होऊन समाजमन अंधश्रद्धांच्या गर्तेत रुतून बसले होते त्यातून त्याला बाहेर काढण्याचे काम डार्विन यांनी केले, असे गौरवोद्गार थॉमस हक्सले काढतात. तरीही वैचारिक विश्वात डार्विनवादाइतका दुसरा कोणताही विषय वादग्रस्त झाला नाही. याचे कारण परमेश्वराच्या इतिकर्तव्यतेलाच जे आह्वान डार्विन यांनी दिले, ते स्वीकारणे परंपरावाद्यांना व निर्मितिवाद्यांना जड गेले. मग उत्क्रांतिवाद हा सिद्धान्त नसून ती एक विचारसरणी आहे व निर्मितिवादाच्या बरोबरीनेच उत्क्रांती शाळातून शिकविली जावी, असा आग्रह ते धरू लागले. अमेरिकेतील अनेक राज्यांत यासंबंधी न्यायालयांची दारे ठोठावण्यात आली. मग त्यांनी निर्मितिवादाला (creationism) निर्मितिविज्ञान (Creation Science) अथवा बुद्धिमान संकल्पचित्र (Intelligent Design) अश्या संज्ञा प्रदान करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अलिकडे म्हणजे डिसेंबर २००८ मध्ये अमेरिकेतील लूसिआना राज्याचे राज्यपाल बॉबी जिंदाल यांनी उत्क्रांतिवादाच्या विरोधातील ‘लूसिआना सायन्स एज्युकेशन अॅक्ट’ पारित केला आहे. अमेरिकेतील आलाबामा, फ्लॉरिडा, मिशिगन, मिसूरी आणि साऊथ कॅरोलिना या राज्यांनी हे बुद्धिमान संकल्पचित्र शिक्षणक्रमात घुसवायचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांची मने कलुषित होऊन विज्ञानविषयक संशोधनालाच फटका बसून भावी पिढीवर व मानवी प्रगतीवरच प्रतिकूल परिणाम होण्याची भीती विचारवंतांना वाटते. म्हणून अशाप्रकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तेथील वैज्ञानिक व विचारवंत सज्ज होत आहेत.
अनुवंशशास्त्राचे खंबीर पुरावे अस्तित्वाच्या धडपडीत टिकून राहण्यासाठी अनुकूल गुणांचा संच व अनुवंश तयार होतो व मागील पिढीतून पुढील पिढीत हे गुण अनुहरित (ळपहशीळी) होतात. निसर्ग या अनुकूल गुणांची निवड करतो व त्यामुळे सजीवांच्या नव्या प्रजाती जन्माला येतात, असे जरी डार्विनने म्हटले असले तरी गुण एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कशामुळे व कसे अनुहरित होतात, हे डार्विनना स्पष्ट करता आले नव्हते. आणि त्यामुळेच विरोधक डार्विनवर टीकेची झोड उठवीत होते. हे काम १८६५ साली ग्रेगर जॉन मेंडेल या ऑस्ट्रियन पाव्याने केले. सजीवांच्या प्रत्येक पेशीत गुणांना कारणीभूत असणारे घटक असतात. हे घटक म्हणजेच जनुके (genes). पुनरुत्पादनावेळी लिंगपेशींद्वारे (gametes) ही जनुके एका पिढीतून दुसऱ्या पिढीत अनुहरित होतात. व मागील पिढीतील गुण पुढील पिढीला प्राप्त होतात असे स्वतः केलेल्या प्रयोगातील पुराव्यांनिशी मेंडेलने सिद्ध केले. जनुके ही दुसरीतिसरी, काहीही नसून डीऑक्सीरायबो नुक्लेइक अॅसिड (डीएनए) या जीवरसायनांची बनलेली असतात, असे पुढे सिद्ध झाले. हा डी.एन.ए. म्हणजेच जीवरेणू. डीऑक्सीरायबो नावाचा साखरेचा एक रेणू फॉस्फेटचा एक रेणू व अँडेनोसाइन, ग्वानीन, सायटोसीन व थायमीन या चारपैकी कोणताही एक असे हे तीन घटक मिळून एक बेस (nucleotide) तयार होते. अशा अनेक बेसेसची एक माळ म्हणजे जीवरेणूचा एक धागा. असे दोन धागे एकमेकांना रासायनिक बंधनांनी (bonds) जोडलेले असतात व ते एकमेकांभोवती पिळलेले असतात. अशा पिळलेल्या दोन धाग्यांचा मिळून डीएनएचा एक रेणू तयार होतो. पुढे असेही समजून आले की बेसेसच्या विशिष्ट व वेगवेगळ्या सलग रचनांमुळे विशिष्ट गुणांची विशिष्ट जनुके बनतात. कालांतराने या जनुकांत बदल (mutations) घडून येतात व त्यामुळे गुणांतही बदल घडून येतात. मेंडेलच्या अनुवंशास्त्राच्या मांडणीमुळे व त्यात पुढे झालेल्या संशोधनामुळे उत्क्रांतिवादाला भक्कम पुरावे मिळाले. हे पुरावे निर्मितिवाद्यांना (creationists) नाकारताच येणार नाहीत. डार्विन यांनी भूगर्भशास्त्र (geology), पुराजीवशास्त्र (paleontology), शरीररचनाशास्त्र (anatomy), क्रियाविज्ञान (physiology), भ्रूणविकासशास्त्र (embryology) यांतील पुरावे सादर केलेलेच होते. परंतु ज्याचे त्याला अजिबात ज्ञान नव्हते अशा अनुवंशशास्त्राने भक्कम पुराव्यांची मालिकाच सादर केली आहे. किंबहुना सर्व उत्क्रांतिवादच अनुवंशशास्त्रात विलीन झाला आहे. अनुवंशशास्त्रांतर्गत जनुकांचे नकाशे तयार करणे (gene mapping) जनुक आलेखन (genography) या विद्याशाखांनी उत्क्रांतिवादावर शिक्कामोर्तबच केले आहे. अलिकडे जनुक आलेखनशास्त्राने आधुनिक मानवाच्या (homo sapiens) उदयाची नेमकी जागा, त्याच्या उदयाचा नेमका काळ, त्याने केलेले जगभरचे स्थलांतर, यांचा अचूक वेध घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेतील खोइसान जमातीत आधुनिक मानवाचे मूळ सापडते. तो दोन लाख वर्षांपूर्वी उदयास आला, जवळ जवळ दीड लाख वर्षे तो आफ्रिकेतच राहिला. पृथ्वीवरील शेवटचे हिमयुग सुरू व्हायच्या सुमारास, म्हणजे ६०,००० वर्षांपूर्वी तो तांबडा समुद्र ओलांडून अरबस्तानात आला. त्यांच्यापैकी काहीजण तेथे स्थायिक झाले. काहीजण युरोपात गेले. तेथे पूर्वीच आलेल्या पूर्वमानवांशी म्हणजे निअँडरथाल मानवांशी त्यांचा संघर्ष झाला. निअँडरथालांचा त्यांनी नायनाट केला. दुसरा समूह उत्तर आशिया, सैबेरिया येथे आला, तेथून तो समुद्र ओलांडून उत्तर अमेरिकेत व तेथून दक्षिण अमेरिकेत आला. तिसरा समूह हिंदकुश पर्वतरांगा ओलांडून व खाली अरबी समुद्र पार करून भारत, पूर्व आशिया, दक्षिण आशिया, श्रीलंका व ऑस्ट्रेलियात आला. ही सर्व माहिती व मानवाच्या महाप्रवासाचा मार्ग निश्चित करणे जनुक आलेखनाने शक्य झाले आहे. जनुक आलेखनामुळे पहिल्या जीवाचा उदय कसा झाला, त्याचा विकास कसा झाला व जीवसृष्टीतले हे वैविध्य कसे निर्माण झाले याचे आकलन करणे शक्य झाले आहे, होत आहे.
असे असूनही उत्क्रांतिवादाला आजही विरोध का ? परंपरावादी तो का स्वीकारत नाहीत ? या प्रश्नांची उत्तरे सरळ आहेत. उत्क्रांतिवादावर विश्वास ठेवला तर सर्वशक्तिमान परमेश्वर दुबळा होईल अशी सार्थ भीती त्यांना वाटते. परमेश्वर दुबळा झाला तर नीतिमत्ता ढासळेल, आणि नीतिमत्ता ढासळली तर सर्व समाजव्यवस्थाच रसातळाला जाईल, असे त्यांना वाटते. नीतिमत्तेसाठी परमेश्वराचे अस्तित्व त्यांना आवश्यक वाटते. परंतु हा सारा भ्रम आहे याची जाणीव त्याना करून देणे गरजेचे आहे. नीतिमत्ता आणि परमेश्वराचे अस्तित्व यांचा परस्परसंबंध नाही, हे त्यांना समजावून द्यावे लागेल. उत्क्रांतिवाद रुजवणे व पचविणे भल्याभल्या विचारवंतांना जड गेले आहे व जड जात आहे. कारण उत्क्रांतिवादात परमेश्वराची हद्दपारी (की हकालपट्टी?) अनुस्यूत आहे.
उत्क्रांतिवादाचा विपर्यास उत्क्रांतिवादातील अस्तित्वासाठी धडपड (struggle for existence), ‘स्पर्धा’ (competition), नैसर्गिक निवड (natural selection) व सबळांचा टिकाव (survival of the fittest), या संज्ञामुळे विरोधकांना व वंशश्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या राजकारण्यांना उत्क्रांतिवादाचा विपर्यास व विकृतीकरण करणे सोपे गेले. परंतु या संज्ञांचा अर्थ नीट समजून घेतल्यास (व दिल्यास) त्यांचे पितळ सहज उघड करता येते.
वरील सर्व संज्ञा विशिष्ट प्रक्रियांचे संबोधन करतात. या सर्व प्रक्रिया निसर्गातील अन्न व निवारा यांच्या कमतरतेवर मात करून सजीवांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तगून रहावे, यासाठी आहेत, हे अधोरेखित करतात. निसर्गतःच आणि सहजगत्या निर्माण झालेल्या त्या उपाययोजना आहेत. त्यांमागे अन्य दुसरे कोणतेही हेतू नाहीत ; श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व प्रस्थापित करण्याचे तर मुळीच नाहीत. उत्क्रांती होत गेलेली, होत असलेली व पुढेही होत राहणारी प्रक्रिया आहे.
म्हणूनच उत्क्रांतीतील निसर्गनिवडीला कॅलिफोर्निया विद्यापीठाचे फ्रान्सिस्को जे आयेला संकल्पचित्रकाराविना संकल्प चित्र (ऊशीळसप ळीही ऊशीळसपशी) असे म्हणतात. उत्क्रांतीला नैतिक-अनैतिक, योग्य-अयोग्य, प्रामाणिक-अप्रामाणिक, खरे-खोटे, असे कोणतेही आयाम नाहीत. निसर्गाच्या परिस्थित्यनुरूप घडत जाणारे ते वास्तव आहे. ते सर्व वैज्ञानिक घटितांना लागू आहे. त्यामागे निसर्गाचा बरा-वाईट कोणताही हेतू नाही. त्याअर्थी उत्क्रांती ही इतर वैज्ञानिक घटितांप्रमाणे हेतुनिरपेक्ष, इहवादी प्रक्रिया आहे. वंशश्रेष्ठत्वाच्या भुताने पछाडलेल्या नाझींनी सबळांचा टिकाव (survival of the fittest) याचा अर्थ “बळी तो कान पिळी’ असा लावून ज्यूंचा नृसंश संहार घडवून आणला; आर्यकुल सर्वश्रेष्ठ असून जर्मन मुलींनी आर्यकुलाच्या मुलांशी विवाह करावेत अशी मोहीम काढली. त्यांचे अनुयायी देशोदेशी आहेत. धर्मवादाने पछाडल्या जाणाऱ्यांच्या फौजा देशोदेशी कार्यरत आहेत व श्रेष्ठत्वाच्या खोट्या अहंकारापायी सर्वसामान्यांची हत्या करीत आहेत. परंतु उत्क्रांतिवाद सर्वांना तगून कसे राहावे याचे भान देतो. प्रतिकूल परिस्थितीत चांगल्या गुणांचे संवर्धन करून जगावे कसे याची जाणीव करून देतो, याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे.
डार्विनची महत्ता दुरून पाहता उत्क्रांतीत एक आराखडा (design) जरूर दिसतो. उत्क्रांतीची वाटचाल साध्या रचनेपासून गुंतागुंतीच्या रचनेपर्यंत, अक्षम गुणांपासून सक्षम गुणांपर्यंत, अप्रगत जीवांपासून प्रगत जीवांपर्यंत, जरूर दिसते. परंतु हा आराखडा कुणीही, आणि तोही ठरवून केलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही हितसंबंधांचा अथवा दृष्टिकोनांचा चष्मा न वापरता उत्क्रांतीकडे स्वच्छ कोरा दृष्टिक्षेप टाकला तर सजीवांची उत्क्रांती ही निसर्गाशी केवळ जुळवून घेणारीच नव्हे तर निसर्गाशी तादात्म्य पावणारी प्रक्रिया आहे याची जाणीव होते.
मानवी सभ्यतेच्या (Civilization) सुरुवातीपासून सृष्टिज्ञानाला साचलेपण येऊन संकुचित विचारधारांचा जो कुजका दुर्गंध येऊ लागला होता ते ज्ञान डार्विनने प्रवाही केले. वैज्ञानिक विश्वाच्या महासागरापर्यंत तो प्रवाह पोहचविला. जीवसृष्टीच काय तर सर्व विचारसृष्टीही उत्क्रांतीच्या पायऱ्यांवरून उन्नत होत राहते, असा दृष्टिकोण डार्विनच्या सिद्धान्ताने दिला. कोपर्निकसने पृथ्वीला खगोलविश्वाच्या केंद्रस्थानापासून दूर ढकलले तसेच डार्विनच्या उत्क्रांतिवादाने माणसाला नैसर्गिक विश्वाच्या केंद्रस्थानापासून दूर ढकलले. डार्विनने कोपर्निकसची क्रांतीच पूर्णत्वास नेली. निसर्ग म्हणजे पदार्थांची नियमबद्ध गती असून कोणत्याही दैवी शक्तीचे सहाय्य न घेता मानवी बुद्धीला तिचे आकलन होऊ शकते, हे डार्विनने सप्रमाण सिद्ध केले. त्याने केलेले कार्य अलौकिक असेच आहे. डार्विन यांच्या प्रतिभेला त्रिवार अभिवादन !
१६, गीता संदेश, गीतानगर, आकाश पेट्रोलियमजवळ दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक ४२२ ००४. [ म्हात्रे यांच्या लेखाला पूरक असे काही मुद्दे स्टीफन जे गूल्डच्या आधाराने पुढील टिपणात नोंदले आहेत. सं]
वीस वर्षांचा उशीर! १८३२ साली इंग्लंड सोडलेले बीगल, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, ऑस्ट्रेलिया, मादागास्कर, आफ्रिका, अशी पृथ्वीप्रदक्षिणा करून १८३७ साली परतले. ही पाच वर्षे डार्विन अधाश्यासारखी निरीक्षणे करत होता. नोंदत होता.
१८३८ साली डार्विनने माल्थस या अर्थशास्त्रज्ञाचा लोकसंख्येवरील प्रबंध वाचायला घेतला. या प्रसिद्ध पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना अशी -माणूस निसर्गातून खनिजे मिळवतो, अन्नधान्य, दूध, मांस, सारे मिळवतो. या साऱ्या नैसर्गिक घटकांवर माणसांची गुजराण होते. पण माणसांची संख्या ज्या वेगाने वाढते, त्या वेगाने निसर्गातून मिळणारे घटक वाढत नाहीत. मग माणसांना निसर्गातल्या वस्तू कमी पडू लागतात आणि या अपुऱ्या घटकांसाठी माणसामाणसांत स्पर्धा सुरू होते. माल्थस माणसांबद्दल बोलत होता, पण डार्विनला सारी सजीव सृष्टीच या स्पर्धेत गुंतलेली दिसत होती.
वेगवेगळ्या जीवजाती कशा उद्भवतात, हे डार्विनला सुचले. हे उत्तर १८४० साली लिहूनही काढले गेले. पण हे वैज्ञानिक तत्त्व तब्बल वीस वर्षे अप्रकाशित राहिले. आजकाल असा उशीर अक्षम्य मानला जाईल. सध्या संपूर्ण उत्तर सुचायच्या आतच छापायची घाई होते. पण व्हिक्टोरिया राणीच्या व्हिक्टोरियाच्या गतीने हालणाऱ्या काळातही वीस वर्षे म्हणजे फारच उशीर होता.
आपल्या उत्तराचे महत्त्व डार्विनला जाणवले नव्हते, असे नाही. उत्तराचा आराखडा लिहून काढल्यानंतर डार्विनने काही रक्कम वेगळी काढून ठेवली. आपल्या पत्नीला डार्विनने बजावले, की काही कारणाने हे पुस्तक त्याच्या हयातीत छापणे झाले नाही तर पत्नीने ते छापावे. पैशाची सोय करून ठेवलेले डार्विनचे हे एकुलते एक लिखाण.
डार्विन स्वतः सांगायचा की प्रकृती नीट नसल्याने लिहिणे पुढे ढकलले गेले. बीगलच्या सफरीत काही रोग जडला होता. मधूनमधून हवापालट करून तो काबूत ठेवला जात असे. पण यातून डार्विन व्याहत्तर वर्षे जगला. त्या काळच्या मानाने हे भरपूर आयुष्य होते. बरे, याच वीस वर्षात डार्विनने सफरीतील कमाईच्या याद्या, सफरीची हकीकत, प्रवाळ व ज्वालामुखींची बेटे कशी बनतात यावर प्रबंध, दक्षिण अमेरिकेचा भूगर्भशास्त्रीय अभ्यास, बार्ने कल या शिंपल्यावर अनेक खंडांचा ग्रंथ; असे भरपेट लिखाण केले. त्यात आजार आडवा आला नाही!
असेही सांगतात की डार्विनच्या तरुणपणी त्याचा एक तांत्रिक प्रबंध चुकीचा ठरला होता. त्यामुळे प्रकाशन म्हटले की तो घाबरत असे. डार्विनच्या लिखाणात बुजरेपणा आहे. पुन्हा पुन्हा माफी मागणे, “चुकलो तर सांभाळून घ्या”, असे म्हणणे आहे. पण वीस वर्षांत इतर लिखाण केलेच. त्यात हा घाबरटपणा आडवा आला नाही.
याच काळात अनेक लोकांशी तांत्रिक पत्रव्यवहार सुरू होता. प्रत्यक्ष संशोधनही सुरू होते. प्रयोग सुरू होते. प्रश्न विचारणे, उत्तर देणे, सुरू होते.
पैशाची अडचण नाही. विषयाचे महत्त्व पटलेले आहे. प्रकृतीचे कारण तोकडेच. चुकण्याची भीती जेमतेमच. मग डार्विन कशाला घाबरत होता? सुचलेल्या तत्त्वाच्या वेगळेपणाला! आपले मत बायबलच्या उत्पत्तिवादाच्या विरुद्ध आहे, हे त्याला माहीत होते.
डार्विनला सुचलेले उत्तर कठोरपणे जडवादी होते. त्याची लाडकी पत्नीदेखील या पाखंडाला बुजत असे. तिला आपले विचार म्हणजे पाप वाटते आणि म्हणून ती मनात झुरते, हेही डार्विनला माहीत होते. आपण एक अतिशय विवाद्य मत मांडणार आहोत, ही जाणीव डार्विनच्या तत्कालीन टिपणात जागोजाग दिसते. “रचनेमुळे देवाचे प्रेम उत्पन्न होते, अरे लेका, जडवाद्या? विचार म्हणजे मेंदूतून होणारा स्राव ही कल्पना, गुरुत्वाकर्षण म्हणजे पदार्थाचा गुणधर्म, या कल्पनेपेक्षा आश्चर्यकारक का ? हा आपला गर्व, हे स्वतःबद्दलचे कौतुक आहे.” (Love of deity effect of organization, oh you materialist! Why is thought being a secretion of the brain, more wonderful than gravity a property of matter? It is our arrogance, our admiration of ourselves.)
सजीव आणि निर्जीव यात मूलभूत फरक मानायला डार्विन तयार नव्हता. चैतन्य मानायला तो तयार नव्हता. विश्वातील स्वतःच्या स्थानाबद्दल माणसाने करून घेतलेल्या कल्पना त्याला अवास्तव वाटत होत्या.
” ‘फेडो’ मध्ये प्लेटो म्हणतो की आपल्या ‘काल्पनिक कल्पना’ आत्म्याच्या पूर्व अस्तित्वातून येतात, अनुभवांपासून त्या उद्भवताना दिसत नाहीत -पूर्वअस्तित्वाऐवजी ‘माकडे’ वाचा.” (Plato says in ‘Phaedo’ that our imaginary ideas arise from the pre-existence of the soul, are not derivable from experience-read monkeys for pre-existence).
हा माकडाचा शॉर्टकट पुढे जड जाणार होता. पण जडवादी विचाराची धग इथे होतीच. पत्नीची खंत, टळणारा काळ, सारे पचवणारी स्वतःच्या मतावरची निष्ठा इथे होतीच. आज डार्विन मरून शंभरावर वर्षे झाली, पण त्याच्या मतावरील आगडोंब अजून शमलेला नाही. डार्विनचा द्रष्टेपणा हा, की दीडशे वर्षांपूर्वी हे सारे वादळ त्याला ‘दिसले’.
“जडवादावर माझा किती विश्वास आहे, हे सांगण्याऐवजी फक्त असे म्हणा; भावना, मूलप्रवृत्ती, कलागुण, हे जे आनुवंशिक गुण आहेत, त्यांचे कारण हे, की अपत्याचा मेंदू आईवडिलांच्या मेंदूसारखा असतो.” (To avoid stating how far I believe in materialism, say only that-emotions, instincts, degree of talent, which are heriditary, are so because the brain of the child resembles parent stock.)
सहकारी मित्रांबरोबर त्याची चर्चाही सतत होई. हेन्स्लो सोडून साऱ्यांना डार्विनचे मत पटे. सारे जण डार्विनमागे लवकर प्रकाशनाची घाई करत. आणि डार्विन अंतिम आराखडा लिहीतही होता. पण होऊ घातलेल्या गदारोळाचा धाक मनात कायम होता.]