“कोणत्याही संकल्पनेचे महत्त्व जर तिच्याद्वारे प्रेरित वैचारिक परिवर्तनाने मोजण्याचे ठरविले, तर नैसर्गिक निवडीद्वारा उत्क्रांती ही निर्विवादपणे मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वपूर्ण संकल्पना ठरेल.”
चार्ल्स डार्विनच्या जन्माला यंदा दोनशे वर्षे पूर्ण झाली. त्याच्या ऑरिजिन ऑफ स्पीशीज ह्या ग्रंथाच्या प्रकाशनालाही दीडशे वर्षे लोटली. पण ह्या ग्रंथामुळे उडालेली खळबळ अजूनही विरली नाही. मानवी बुद्धिमत्तेच्या विविध अंगांना कवेत घेणारा, दैवकशास्त्रापासून वैद्यकशास्त्रापर्यंत अनेक क्षेत्रांत मूलभूत वैचारिक परिवर्तन घडविणारा व एकाच वेळी अनेक नव्या विद्याशाखांना जन्म देणारा असा ग्रंथ मानवी इतिहासात अभूतपूर्वच म्हणायला हवा. त्याहून महत्त्वाची बाब ही की ह्या ग्रंथाने मानवी स्वभाव, प्रेरणा, विचारपद्धती व वर्तन यांच्याविषयी फेरमांडणी करतानाच काही असे प्रश्न उपस्थित केले, ज्यांची चर्चा गेली दीडशे वर्षे सुरू आहे व यापुढेही राहील.