पुस्तक-परिचयामागील भूमिका
पैसा हा आपल्या आधुनिक जीवनाचा अतिशय महत्त्वाचा हिस्सा झाला आहे. आपले कोणतेही वैयक्तिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक व्यवहार हे आता पैशांच्या मदतीशिवाय करता येत नाहीत. अठरा-एकोणिसाव्या शतकात नाणी वा कागदी नोटांच्या स्वरूपातला पैसा आजच्याप्रमाणे सरसकट वापरात नव्हता. अनेक आर्थिक व्यवहार हे वस्तूंच्या प्रत्यक्ष देवाणघेवाणीतून केले जात. सोन्याचांदीची नाणी चलन म्हणून वापरली जात असली तरी मुख्यत: व्यापारी लोक आणि राजेरजवाडे ह्यांच्यासाठीच त्यांचा वापर होत असे. साहजिकच आजच्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे, सेवेचे मोल पैशांत करण्याची पद्धत नव्हती. आजही अनेक गोष्टींचे मोल पैशाच्या स्वरूपात मांडलेले अनेकांना आवडत नाही आणि पैसा सामाजिक नात्यांमध्ये बाधा आणतो असे मानले जाते. पैसा सर्वस्पर्शी झालेला असूनही आपल्याला पैशांच्या व्यवहारांची माहिती गरजेपुरतीच असते. पैशाच्या उगमाबद्दल, प्रसाराबद्दल फारसे काही माहीत नसते. पैसा आणि अर्थव्यवस्था यांचे नाते आपल्याला कळते आणि पैसा नसणारे गरीब असतात हेही कळते. परंतु पैशाला कशामुळे महत्त्व आले? यामुळे समाजाचा काय फायदा-तोटा झाला? अॅसेंट ऑफ मनी हे पुस्तक वाचनात आले आणि पैशाचा ऐतिहासिक प्रवास उलगडत गेला. ह्या पुस्तकाचे लेखक, निआल फर्गसन ब्रिटनमधील एक प्रसिद्ध इतिहासकार आहेत. ते इंग्लंडमधील ऑक्सफर्ड आणि अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठांमध्ये अध्यापन आणि संशोधन करतात. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके गाजलेली आहेत. अनेक नियतकालिकांमध्ये त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत असते. विविध विषयांवर त्यांनी तयार केलेल्या चार टी.व्ही. मालिका गाजलेल्या आहेत. प्रास्ताविक
पैसा म्हणजे काय? पैसा म्हणजे दुःखाचे मूळ? पैसा म्हणजे चांदीसोने? पैसा म्हणजे कामगारांच्या श्रमांची लूट? पैसा म्हणजे छापलेल्या नोटा? की संगणकावरचे आकडे? हा पैसा येतो कोठून, जातो कोठे, कसा वाढतो? असे अनेक भेदक प्रश्न विचारत अॅसेंट ऑफ मनी चे लेखक निआल फर्ग्युसन आपल्या पुस्तकातून पैशांच्या दुनियेची सैर घडवतात. पैशांचा चार हजार वर्षांचा इतिहास आपल्यापुढे ठेवतानाच आज जगासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटाचीही ओळख करून देतात. आधुनिक मानवाने स्वतःच्या आशाआकांक्षा, बुद्धी आणि भावनांच्या जोरावर स्वतःची एक वेगळी अर्थसृष्टी निर्माण केली आहे. ह्या अर्थसृष्टीची ऊर्जा म्हणजे पैसा. ही सैर घडविताना लेखकाने पैशांच्या दुनियेबरोबरच माणसांच्या गरजा, अभिलाषा, भीती आणि इतर भावनांचा पैशाशी असलेला संबंधही उलगडवून दाखविला आहे. आपण सर्वजण व्यवहारात पैसा वापरत असतो, मिळवत असतो, साठवत असतो. गुंतवत असतो आणि घालवतही असतो. आपण साक्षर असलो तरी अर्थसाक्षरता फारशी नसते. अर्थशास्त्र हा विषय गणितासारखा अवघड वाटतो. ही निरक्षरता घालविणे आवश्यक आहे ह्याची जाण हे पुस्तक वाचल्यावर येते.
पैशांचे झाड की वंशवृक्ष?
पैसा काय झाडाला लागतो, असा प्रश्न जेव्हा उपहासाने विचारला जातो तेव्हा त्याचे अपेक्षित उत्तर नकारात्मक असते. हे पुस्तक वाचताना पैशाचा एक वंशवृक्षच आपल्या समोर उभा राहतो. पैशाच्या झाडाचे बी पेरून माणसाने त्याची मशागत कशी केली आणि आज त्या वृक्षाची अनेक फळे आपल्यापैकी काहींनाच का चाखायला मिळत आहेत ह्याचा उलगडा ह्या पुस्तकातून होतो. आपल्या कल्पनाशक्तीने, संघर्षमय निसर्गसृष्टीत मानवानेच पैसा जन्माला घातला आणि त्यातूनच स्वतःची एक अर्थसृष्टी घडविली. पैसा ही ह्या अर्थसृष्टीची ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा संबंध केवळ दुःख आणि दैन्याशीच नाही तर संस्कृतीच्या विकासाशी आणि मानवी समाजाच्या उत्क्रांतीशी निगडित आहे, हा ह्या पुस्तकाचा मुख्य सिद्धान्त आहे.
प्रस्तावनेत लेखक म्हणतो : पैसा हे मानवी सर्जनशीलतेचे एक दृश्य स्वरूप आहे. पैशाची उत्क्रांतिप्रक्रिया किमान चार हजार वर्षे संथपणे चालू आहे. गेल्या पाचशे वर्षांमध्ये ह्या प्रक्रियेला प्रचंड वेग आला आणि प्रक्रिया सर्वस्पर्शी आणि आवश्यक बनली. आधुनिक समाजात पैशाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले. पैशाचे पारंपरिक दृश्य स्वरूप म्हणजे झळाळणारी सोन्याचांदीची नाणी. पण असे झळाळते धातू, किंवा कागदी नोटांचे गढे म्हणजे पैसे नव्हेत. पैसा म्हणजे संपत्ती नव्हे. तर पैसा म्हणजे सामाजिक विश्वासाचे प्रतीक. लेखकाने पैशाची केलेली व्याख्या या दृष्टीने अतिशय वेगळी आणि मूलभूत आहे. पैसा ही व्यवहारात लोकांची श्रद्धा असणारी एक अमूर्त संकल्पना आहे. जी संस्था आपल्याला चलनाच्या स्वरूपात पैसा देते त्या संस्थेवरच्या विश्वासाचे प्रतीक म्हणजे पैसा. भारतामधील रिझर्व बँक आपल्याला चलनावरच्या रुपयांच्या आकड्याइतका पैसा देते. हे चलन नाण्याच्या किंवा कागदी नोटेच्या स्वरूपात आपण वापरतो. पूर्वीच्या काळी कवड्यांचा, मातीच्या भाजलेल्या खापरांचा, दगडी पाटीचा वा धातूच्या पत्र्याचा वापर चलनासारखा केला जाई. त्यावर पैशांची नोंद आकड्यांच्या स्वरूपात केलेली असे. वस्तूंच्या बदल्यात मिळालेले असे पैसे दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर त्या बदल्यात इतर वस्तू मिळवता येत. यामुळे दूर देशांशी, प्रदेशांशी व्यापार करणे सुलभ होत असे. आधुनिक काळात देशोदेशीच्या चलनी नोटा, नाणी वापरली जातातच; त्याशिवाय संगणकाच्या पडद्यावरील व्यवहार हे वास्तवातल्या देवाणघेवाण प्रक्रियेचे एक विश्वासार्ह माध्यम बनले आहे. पैशाचा जागतिक पातळीवर होणारा वेगवान प्रवास आणि प्रचंड उलाढाल, हे आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये जन्माला आले. पैशांची ही ऊर्जा अर्थव्यवस्थांना गतिमान करते. जेव्हा ह्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात, तेव्हा अर्थव्यवस्थेला खीळ बसते. राज्यशासन स्थिर असेल आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर अंकुश असेल तेव्हा पैशाचा भाव स्थिर राहतो. राज्य शासनावरचा लोकांचा विश्वास कमी झाला की चलनामध्ये अस्थिरता येते.
पैशांच्या दुनियेत कर्ज ह्या गोष्टीला अतिशय महत्त्व असते. पैशाच्या आधारे कर्ज देणारा आणि घेणारा यांचे नातेसंबंध तयार होतात. या दोघांमधील संबंधांमध्ये जितका विश्वास असेल त्याच्या व्यस्त प्रमाणात कर्जाचे व्याज ठरते आणि व्यवहार होतात. इतिहासकाळापासून युरोपमध्ये पैशासंबंधीच्या सेवा (उदाहरणार्थ कर्ज) देणारे लोक अल्पसंख्य जमातीचे असत. जात, धर्म, जमिनीची मालकी किंवा सत्ता, हे सारे नाकारले गेलेले लोकच सावकारीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत दिसत. सहसा हे काम ज्यू धर्माचे लोक करीत. ज्यू लोकांचे सावकारीचे व्यवहार हे त्यांच्याबद्दलच्या आकसाचे एक प्रमुख कारण आहे. यासंबंधी इतिहासातील अनेक उदाहरणे लेखकाने दिली आहेत. (आपल्याकडेही पठाण, मारवाडी, ब्राह्मण असे अल्पसंख्य लोक सावकारीच्या धंद्यामध्ये असलेले दिसतात!) ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांनी सावकारी निषिद्ध मानलेली होती, परंतु सामाजिक-आर्थिक व्यवहार हे कर्जाच्या व्यवस्थेशिवाय होऊ शकत नाहीत. अशा काळात कर्जपुरवठ्याची सेवा स्वतःच्या देशातून परागंदा झालेल्या ज्यू लोकांनी देऊ केली. त्याबदल्यात युरोपमधील राज्यकर्ते त्यांना नागरिकत्व न देताच देशात वास्तव्याचे आणि पैशांचे व्यवहार, व्यापार करण्याचे अधिकार देत. त्यासाठी सवलती देत. त्यातूनच ज्यू लोकांनी पैशांच्या हिशोबाच्या, गणित करण्याच्या, पद्धती तयार केल्या आणि वित्तव्यवहारात त्यांचे खास असे कौशल्य तयार झाले. युरोपमधील अर्थव्यवहारांवर ज्यू वंशाच्या लोकांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
सामान्य माणसांना तेव्हाही पैशाबद्दल, विशेषतः कर्ज आणि सावकारी ह्यांबद्दल एक आकस असे. याचे विशेष कारण सावकारीसंबंधीचा त्यांचा अनुभव. कोणतेही श्रम न करता, कर्ज म्हणून दिलेल्या पैशांच्या व्याजावर श्रीमंत बनणाऱ्या सावकारांबद्दल सर्व समाजांमध्ये एक स्वाभाविक राग असतो.सावकार संख्येने नेहमीच कमी असतात तर ऋणकोंची संख्या नेहमीच जास्त असते. त्यामुळे पैसेवाल्यांबद्दल समाजात अविश्वास असतो. याशिवाय पैशांच्या व्यवहारात फसवणूक, लूट, असंख्य प्रकारचे घोटाळे आणि गैरव्यवहार हे सतत घडत असतात. त्यामुळे आर्थिक घोटाळे करणारे मूठभर श्रीमंत लोक बहुसंख्यांच्या गरिबीला कारणीभूत असतात, असा समज प्रचलित झालेला आहे. एकीकडे पैशांमुळे स्थैर्य मिळण्याची अपेक्षा माणसांना असते, परंतु प्रत्यक्षात पैसा स्थैर्य न देता सतत धक्केच देत असतो. पैशामुळे मानसिक स्वस्थता न येता उलट एक भीती निर्माण होते. पैसा संपेल, या भीतीने काही जण सुरक्षित साठवणाची धडपड करतात, तर काही जण मिळालेला पैसा हरवून, संपून जाण्याआधी तो उपभोगून, उधळून टाकतात! पैसा हे दुःखाचे कारण आहे हा समज त्यातून निर्माण झालेला आहे. पैसाविरहित जगाचे स्वप्न आजपर्यंत अनेकांनी पाहिले. साम्यवादी, अराजकवादी, धार्मिक मूलतत्त्ववादी, प्रतिक्रांतिवादी तसे हिपी यांचा समावेश लेखकाने यांत केला आहे. पण आजतागायत पैशाला पर्याय सापडलेला नाही. गेली चारशे वर्ष पैशांचे व्यवहार आणि त्याचे महत्त्व सातत्याने वाढतच गेले आहे.
आर्थिक उत्क्रांतिक्रमात संपत्तीची अनेक रूपे घडली. आजही घडत आहेत. सोने, रुपे ह्या धातूंना अर्थव्यवस्थांमध्ये आजही महत्त्व आहे. वास्तवातल्या व्यवहारांसाठी मात्र आज देशोदेशीच्या चलनांना महत्त्व आले आहे. सोने, चांदी ह्या गोष्टी संपत्तीचा साठा करण्याच्या दृष्टीने मौल्यवान आहेत, परंतु त्यांचे स्वरूप पैशांप्रमाणे प्रवाही नसल्याने विनिमयासाठी असलेले त्यांचे महत्त्व मर्यादित झाले आहे. १५ व्या – १६ व्या शतकांत स्पेन ह्या देशाने दक्षिण अमेरिकेतून अतिशय मोठ्या प्रमाणात सोनेचांदी लुटून आणले. ही संपत्ती कधीही नष्ट होणार नाही आणि या संपत्तीच्या जोरावर स्पेनला जागतिक महासत्ता बनता येईल, असे स्वप्न त्या देशाने पाहिले होते. त्यामुळे युरोपमधील इतर देशांमध्ये पैशांच्या व्यवहारात उत्क्रांती होत असताना स्पेन गाफील राहिले आणि कालांतराने त्या देशाची संपत्ती गेली आणि जागतिक नेतृत्वाचे मनसुबेही धुळीला मिळाले. जमीन खोदून प्रचंड प्रमाणात त्यांनी चांदी मिळवली पण चांदीचे भाव त्यामुळे पडले. शिवाय चांदीचा अन्न म्हणून उपयोग नव्हता. उलट संपत्ती हा शापच ठरला कारण त्यामुळे उत्पादक काम न करता फुकट बसून ऐष करण्याची सरंजामी वृत्ती वाढली. स्पेनच्या लोकांना चांदीचे वास्तवातले विनिमयमूल्य कमी होत आहे हे लक्षातच आले नाही. पैशाच्या खरेदीक्षमतेवर त्याची किंमत अवलंबून असते. केवळ नोटा छापून पैशांचा पुरवठा वाढला तरी त्यामुळे वस्तूंचे उत्पादन वाढतेच असे नाही. उलट जर त्यामधून काही उत्पादन वाढले नाही तर फक्त भाववाढ होते. पैशाचे हे नियम अनुभवातून समजत गेले, आणि उत्पादनाच्या प्रमाणात ज्यांनी पैसे चलनात आणले ते देश यशस्वी झाले. अशा आकलनांच्या संदर्भात बदल करणाऱ्यांचा अर्थसृष्टीमध्ये टिकाव लागतो, हा नियम या इतिहासातूनच शिकता येतो. सतत बदलत्या पर्यावरणात स्वत:मध्ये बदल करणारे सजीव टिकाव धरू शकतात हा जीवसृष्टीचा नियम अर्थसृष्टीचाही असतो.
पैसा मिळवणे, साठवणे, त्याच्या साहाय्याने वस्तू आणि सेवांचा विनिमय करणे,हे व्यक्तिगत पातळीवर तर केले जातेच; पण ते देशांच्या पातळीवरही केले जाते. वस्तूंच्या अदलाबदलीपेक्षा, प्रत्यक्ष विनिमयाच्या पद्धतीपेक्षा, पैशांच्या माध्यमातून होणारी देवाणघेवाण अनेक प्रकारे कार्यक्षम होते. पैशांमार्फत व्यवहार करणाच्या क्रमात सावकारी, बँकिंग, कर्जरोखे, शेअरमधील भागभांडवल, विमा, म्युच्युअल फंड, हेज्फंड वगैरे असंख्यप्रकारच्या वित्तीय सेवा विकसित झाल्या आहेत आणि सर्व जगभर त्यांचा प्रसारही झाला आहे. काही वर्षांपूर्वी बँकांची पोच शहरांपुरतीच मर्यादित होती. आता भारतासारख्या विकसनशील देशातसुद्धा खेडोपाडी बँका पोहोचल्या आहेत. अशिक्षित समाजातील गरीब महिलाही ग्रामीण बँकेच्या उपक्रमातून बँकांचे व्यवहार करीत आहेत. ह्या बँकांची संकल्पना कोणी, कोठे, कोणत्या काळात आणि कशासाठी निर्माण केली? बँकांप्रमाणेच वित्तक्षेत्रातील विमा कंपन्यांच्या सेवासंस्थांचे जाळे जगभर वाढले आहे. त्याद्वारे आर्थिक व्यवहार करणे एकीकडे अतिशय सोपे झाले असले तरी अनेक लोकांना ते अनाकलनीय वाटते. आणि त्यात जोखीम जास्त असेही वाटते. पैशांचा समाजात होणारा वापर विकासासाठी करता येतो हे दिसत असले तरी अनेकदा तो संकटांना, लढायांना, फसवणुकीला आमंत्रण देणाराही ठरतो. अशा आर्थिक दरोड्यांच्या, घोटाळ्यांच्या आणि फसवणुकीच्या अनेक कथा लेखकाने ह्या पुस्तकात सादर केल्या आहेत. ह्या घोटाळ्यांमधून धडे घेत घेतच ह्या संस्था अधिक विश्वासार्ह बनत गेल्या आहेत.
पैसा हे विनिमयाचे साधन आहे. पैशांचे मोजमाप करता येते. त्याच्या आधारे विविध वस्तूंचे मूल्य ठरवता येते. देवाण-घेवाणीची किंमत ठरविता येते. ताबडतोबीचे सौदे करता येतात आणि भविष्यातील व्यवहारही आज करता येतात. उदाहरण म्हणून धान्याच्या किंवा शेतमालाच्या बाजारभावांचे देता येईल. शेतमाल तयार झाल्यावर किंमती पडून नुकसान होईल, ह्याची शेतकऱ्यांना नेहमी भीती वाटत असते. शेतीउत्पादनातील जोखीम कमी करण्यासाठी काही संस्था शेतकऱ्यांचे पीक तयार होण्याअगोदरच भावाची हमी देऊन तोटा होण्याची जोखीम स्वतःच्या डोक्यावर घेतात. अशा त-हेने भविष्यातील व्यवहारही आज करता येतात. एका जागी बसून असे व्यवहार जगभरात कोठेही करता येतात. वित्तसंस्थांच्या जाळ्यातून तारांमधून वाहणाऱ्या वीजप्रवाहाप्रमाणे पैसा आज जगभर फिरवताही येतो. परंतु हे सर्व करण्यासाठी मुळात तो असावा लागतो. नसला तरी परवडणाऱ्या दरामध्ये तो दुसरीकडून उपलब्ध व्हावा लागतो. हा पैसा टिकाऊ स्वरूपात असावा लागतो. अशा व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वास असावा लागतो. आधुनिक अर्थव्यवस्थांचा विस्तार होण्यामागे पैशावरचा लोकांचा वाढलेला विश्वास महत्त्वाचा आहे. काही शतकांपूर्वी ही स्थिती नव्हती. ते पैशांशिवायचे जग किती घातक होते याची कल्पना आज आपल्याला करताही येणार नाही. सावकारशाही, बँका, कर्जरोखे, कंपन्यांचे भागभांडवल (शेअर बाजार), विमा, विविध प्रकारचे फंड आणि त्यांचे व्यवहार करणाऱ्या असंख्य संस्था जगात कशा निर्माण झाल्या, कोणी आणि का निर्माण केल्या आणि त्यांच्या विस्तारामुळे आजची अर्थसृष्टी कशी-कशी घडत गेली, याची गोष्ट लेखकाने एकूण पाच प्रकरणांमध्ये सादर केली आहे. शेवटच्या प्रकरणात पैशाच्या उत्क्रांतीचा आढावा घेत सजीव सृष्टी आणि मानवाची अर्थसृष्टी याच्या विकासनियमांमधील साम्य आणि भेद ह्यांची चर्चा केली आहे.
बेलगाम सावकारशाही ते नियंत्रित बँक व्यवस्था
बेलगाम सावकारशाही ते बँकिंग क्षेत्राच्या जगभर झालेल्या विस्ताराचे वर्णन पुस्तकातील लोभाची स्वप्ने (ड्रीम्स ऑफ अॅरिस) ह्या पहिल्या प्रकरणात लेखकाने केले आहे. मध्ययुगात युरोपमध्ये लढाया करण्यासाठी राजेरजवाड्यांना कर्ज काढावे लागे. श्रीमंत व्यापारी मिळवलेल्या नफ्यामधून राजांना अशी कर्जे देत आणि त्यावर व्याजरूपाने नफा कमावीत. पण युद्धामध्ये जिंकण्याची खात्री नसे, त्यामुळे व्याजदर खूप जास्त असत. शिवाय युरोपमध्ये लढाया करण्यासाठी नागरिकांच्याऐवजी पगारी, व्यवसायिक सैनिक वापरले जात. त्यामुळे स्वतःच्या देशासाठी नाही, तर जास्त पगार देणाऱ्या राजांसाठी ते लढत. कधीकधी राजे लढाया करून प्रदेश जिंकत आणि नंतर कर्जफेड करण्यासाठी त्यांना ते विकून टाकावे लागत. हरलेले देश आणि त्यांचे राजे कर्जाच्या डोंगराखाली दबून जात. असे कर्जबाजारी झालेले राजेही देशाची जमीन विकायला काढत. [ पेशवाईतही हाच प्रकार होता. – सं.]
आधुनिक जगातही राज्यकर्त्यांची कर्ज काढण्याची गरज संपलेली नाही. देशांच्या सरकारांना लोकांच्या गरजा भागविण्यासाठी (उदा. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये धान्य विकत घेण्यासाठी) किंवा मोठे खर्च असणाऱ्या पायाभूत सेवांच्या विकासकामांसाठी कर्जाची आवश्यकता असते (उदा. महानगरांमधील मेट्रो प्रकल्प). त्यामुळे आजही कर्जाला अतिशय महत्त्व आहे आणि जागतिक बँका, आशिया विकास बँका, स्टेट बँका अशा संस्थांमार्फत कर्जे घेतली जातात.
संपत्तीचा लोभ ही काही माणसांची वृत्ती असते, पण अशा वृत्तीला मयदिबाहेर जाऊ न देणे हे सामाजिक हिताचे असते. लोभी वृत्तीला मर्यादेबाहेर जाऊ न देता तिचा सर्जनशीलपणे वापर करण्याच्या खटपटीमधून सतराव्या शतकात इटलीमध्ये, राजेशाहीच्या काळात बँक व्यवस्था निर्माण झाली.पण तिचा खरा विकास झाला तो इंग्लंडमध्ये. इंग्लंडमधील लोकशाही पद्धतीच्या पार्लमेंटने बँकिंगचे क्षेत्र कायद्याच्या नियंत्रणाखाली आणले. कायद्याच्या नियंत्रणामुळे समाजातील कर्जव्यवहार अधिक व्यवस्थित होऊ लागले. व्यापारी आणि उद्योजक सावकारी पाशातून मुक्त झाले. सरकारी नियंत्रण असणाऱ्या बँकेच्या व्यवहारामुळे त्यांना कर्ज मिळणे सुलभ झाले. ते तुलनेने स्वस्तही झाले. आर्थिक व्यवहारात फसवणूक करणाऱ्यांना कायद्याने शिक्षा होऊ लागली. त्यामुळे काही प्रमाणात गैरव्यवहारांना, फसवणुकीला आळा बसला. कर्जाचे लिखित करार करण्याची, काटेकोरपणे हिशोब ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि त्यातूनच आधुनिक अर्थशास्त्राचाही विकास सुरू झाला. दूर देशांशी व्यापार करण्यासाठी कर्ज मिळू लागले आणि मिळालेल्या फायद्यातून व्याजासह कर्जफेड करण्याची, व कर्जफेड न करणाऱ्यांची मालमत्ता बँकांनी ताब्यात घेण्याची पद्धत हळूहळू रूढ झाली. वसाहतींच्या देशांमध्येही ही व्यवस्था इंग्लंडच्या सरकारने रुजवली. इतर देशांनी या व्यवस्थेचे अनुकरण सुरू केले. कालांतराने सर्व जगभरच बँकिंगचे क्षेत्र पसरले आणि त्याचा विस्तार देशोदेशींच्या व्यापाराला, उत्पादनाला आणि विकासाला कारणीभूत ठरला.
युरोपमध्ये झालेली औद्योगिक क्रांती ही बँकांच्या आणि इतर वित्तीय क्रांतीशिवाय झाली नसती. खुद्द इंग्लंडमध्ये सुरवातीला या वित्तसंस्थांचा सहभाग नसला तरी युरोपभर ही क्रांती नेण्यासाठी बँकिंग क्षेत्रातील कर्जव्यवहारांचा उपयोग झाला. बँकांनी कारखानदारीला भांडवल म्हणून कर्ज द्यायला सुरवात केली. त्यामुळे स्वतःजवळ काहीही भांडवल नसणारे पण संकल्पना आणि उद्योजकता असणारे लोकही ह्या क्षेत्रामध्ये आले. भविष्यात ह्या कारखान्यांना नफा होईल आणि त्यातून कर्जफेड होईल ह्या विश्वासाने बँका कर्जे देऊ लागल्या. सुरुवातीच्या काळात बँक ऑफ इंग्लंडने आणि लंडनने मोठी महत्त्वाची भूमिका बजावली. वित्तव्यवहारातील व्यवस्था आणि कौशल्यांमुळे इंग्लंडला व्यापारात आघाडी मिळाली. त्याआधारेच इंग्लंडला जागतिक वित्तव्यवहारात महत्त्वाचे स्थान मिळू लागले.
बँकेमार्फत होणाऱ्या व्यवहारांचे फायदे व्यापारी आणि उद्योजकांना समजायला लागल्यावर अनेक प्रकारच्या बँका निघाल्या. सर्वांत महत्त्वाची नवनिर्मिती होती ती सेव्हिंग्ज बँकेची. आज सामान्य माणसेही सेव्हिंग्ज खात्यांमध्ये आपले पैसे जमा करतात, व आपल्या गरजांनुसार बँकांकडून कर्ज घेतात, त्याचे व्याज फेडतात. ठेवी ठेवून त्यावर व्याजही मिळवतात. अशा बँकांमध्ये सामान्य लोकांच्या लहान ठेवीही जमा केल्या जातात. लाखो लोकांच्या लहान ठेवींची एकूण रक्कम खूप मोठी असते. अशा जमा झालेल्या पैशांच्या जोरावर बँका कर्ज देण्याचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात करू शकतात.
कर्ज देणघेणे याचे अर्थसृष्टीत असलेले महत्त्व इमारतींच्या बांधकामातील विटेसारखे असते. विटांच्या नावीन्यपूर्ण रचना करून आज जागतिक पातळीवर बँकांच्या आर्थिक इमारती उभ्या झालेल्या आहेत. सावकारीची जागा मोठ्या प्रमाणात बँकांनी घेतली आहे. बँका, वित्तसंस्था ह्या लोकांच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असतात. गरीब आणि अशिक्षित लोकांनाही कर्जाची आवश्यकता असते. जेथे बँका गरिबांना आवश्यक कर्ज देत नाहीत तेथे लोक गरीब राहतात. असे गरीब लोक अनेकदा लहान रकमा सावकारांकडून घेतात आणि त्यांच्या गरिबीचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन सावकार भरमसाठ व्याज उकळतात. अनेक देशांत गरिबीचे कारण बँका आणि वित्तीय सेवांचा अभाव, हे असते. म्हणूनच बँकांच्या सेवांचा विस्तार तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आर्थिक धोरण राबवावे लागते. बँका आणि वित्तसंस्थांचा विकास न झालेले देश-प्रदेश गरीब राहतात याउलट बँकांची मोठी संख्या असणारे देश आणि राज्ये सर्वांत श्रीमंत दिसतात. (भारतातही हे दिसते.)
बाँड ऊर्फ कर्जरोखे
बँक व्यवस्थेपाठोपाठ झालेली कर्जरोख्यांच्या निर्मितीची कथा ऑफ ह्यूमन बाँडेज या दुसऱ्या प्रकरणात सांगितली आहे. देशाच्या सरकारांना, मोठमोठ्या खाजगी प्रकल्पांना किंवा उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. बँकांकडून मिळणारे कर्ज जोखमींच्या प्रमाणात महाग असते. पूर्वी बँकांकडे कर्ज देण्याइतके पैसेही नसत. अशा वेळी संख्येने मोठ्या अशा सामान्य नागरिकांकडून कर्ज उभारण्यासाठी रोखे विकायला काढले जातात. यावरील व्याजदर कमी असला तरी कर्जफेडीबाबत सरकारी हमी असते. शिवाय गुंतवलेले पैसे गरजेनुसार बॉन्ड विकून सहजपणे परत मिळवता येतात. बॉन्ड कल्पनेची सुरुवात आठशे वर्षांपूर्वी इटलीमध्ये झाली. ठराविक दराने मुद्दलावर व्याज मिळण्याची हमी सरकार किंवा कंपन्यांना द्यावी लागते. त्यानंतर सामान्य लोकांना पैशांच्या मोबदल्यात कर्जरोखे दिले जातात, जे ठराविक मुदतीचे किंवा बेमुदतही असतात. सामान्य लोकांना कर्जरोखे विकून देशांच्या सरकारला पैसे मिळवून देण्याची पद्धत एकोणिसाव्या शतकात विकसित झाली.
नेथन रॉथस्चाईल्ड ह्या वित्तबाजारातील सुप्रसिद्ध सम्राटाचा बोलबाला बॉन्डसच्या व्यवहारांमुळेच झाला. सुरुवातीला सोन्याचा बेकायदेशीर व्यापार करून तो श्रीमंत झाला. नंतर त्याने इंग्लंडमधील औद्योगिक मालाचा व्यापार सुरू केला. पुढे त्याने लंडनमधील सर्वांत मोठ्या बँकेची स्थापन केली. या ज्यू माणसानेच आधुनिक बॉन्डची कल्पना व्यवहारात आणून ती यशस्वी केली. कर्जरोखे विकून कर्ज उभारून देण्याच्या ह्या व्यवहारात त्याने सामान्य गुंतवणूकदारांचा आणि युरोपमधील विविध सरकारांचाही विश्वास संपादन केला. रोखेविक्री करून कर्ज उभारून देण्याच्या या व्यवहारात प्रवर्तक कंपनीला कमिशन मिळते. प्रथम कर्जरोखे विकण्याच्या बाजाराला ‘प्रायमरी मार्केट’ म्हटले जाते. त्यानंतर अशा कर्जरोख्यांची खरेदी-विक्री होते, त्याला ‘सेकंडरी मार्केट’ म्हटले जाते. रोख्यांचे दर्शनी मूल्य कमी आणि संख्या प्रचंड असते. प्रत्येक रोख्याच्या विक्रीपोटी विक्रेत्याला अल्प प्रमाणात कमिशन मिळाले तरी विक्री करणाऱ्या संस्थेला पैसे खूप मिळतात. सुरुवातीला अशा कर्जरोख्यांची विक्री युरोप आणि अमेरिकेत सुरू झाली. बँकव्यवहाराचे रॉथस्चाईल्ड बंधूंचे जाळे युरोपभर होते ते या रोखेव्यवहारातही उपयोगी ठरले. नेथन आणि त्याचे भाऊ युरोपमधील विविध देशांतील प्रायमरी आणि सेकंडरी रोखेबाजारात दादा मानले जात. ते खाजगी व सरकारच्याही गुंतवणुकांचे व्यवस्थापन करीत. बॉन्ड मार्केटच्या व्यवहारात हे कुटुंब प्रचंड श्रीमंत झाले. युरोपमधील देशांच्या युद्धांमध्ये नेथन इंग्लंडला आर्थिक मदत करीत असे. अमेरिकेच्या यादवी युद्धात गुलामगिरीच्या विरोधात त्याने उत्तर अमेरिकेच्या सरकारला मदत केली. हे युद्ध जिंकण्यामध्ये सैनिकांइतकेच क्रेडिट वित्तबाजारातून लढाईसाठी कर्ज उभारून देणाऱ्या रॉथस्चाईल्ड याला द्यायला हवे, असे लेखकाचे प्रतिपादन आहे. पैशांच्या पाठबळाशिवाय अशी मोठी युद्धे जिंकता येत नसतात.
बॉन्ड मार्केटचे आजचे स्वरूप अधिकच विस्तारले आहे आणि त्यात होणारी उलाढाल प्रचंड आहे. अमेरिकेत वा युरोपमध्ये लोकांच्या निवृत्तिवेतनासाठी बाजूला ठेवलेले पैसेही कर्जरोख्यांमध्ये गुंतवले जातात. बँकेच्या खात्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त उत्पन्न बॉन्डमधून मिळते याची खात्री पटली तर लोक त्यात गुंतवणूक करतात. परंतु अशा कर्जरोख्यांच्या बाजाराला पूर्वी आणि अलिकडच्या काळात मोठा धक्का बसला आहे. लाखो लोकांचे निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. आजकाल अशा रोख्यांची खरेदीविक्री जागतिक पातळीवर केली जाते. एका देशामध्ये साठलेला पैसा दुसऱ्या देशात भांडवल म्हणून गुंतवता येतो. या कर्जरोख्यांचे परिणाम जगातील सर्व नागरिकांवर होतात. खाजगी कंपन्या कर्जरोखे विकतात ते बँकेपेक्षा कमी दरात कर्ज मिळावे म्हणून. खाजगी कंपन्या बुडाल्या तरी रोखेधारकांना त्यांचे पैसे सर्वांत आधी मिळतात. नामांकित कंपन्यांना, सातत्याने नफा करणाऱ्या कंपन्यांना ह्या मार्गाने भांडवल उभारणी करणे सोपे असते.
सरकारी कर्जरोखे हे जास्त सुरक्षित मानले जातात. त्यावर मिळणारे व्याज दीर्घमुदतीचे असते आणि दरही कमी मिळतो. देशांतील सरकारांवर असलेल्या लोकांच्या विश्वासाशी कर्जरोख्यांचे बाजारमूल्य जोडले जाते. सरकारच्या खर्चात वाढ झाली आणि तूट वाढली की अर्थव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी होतो आणि सरकारला रोखे विकून पैसे जमविणे अवघड जाते. पाश्चात्त्य देशांमध्ये केंद्र व राज्य सरकारे आणि नगरपालिका असे कर्जरोखे विक्रीला काढतात. ज्या संस्थांमध्ये वित्तीय शिस्त असते त्यांचे रोखेबाजारात विश्वासार्ह मानले जातात. या प्रकारे सामान्य नागरिकांच्या गुंतवणुकीमधून शासनाच्या विविध संस्थांच्या वित्तव्यवहाराचे मूल्यमापन होते.
(भारतामध्ये कोकण रेल्वेसारख्या प्रकल्पांपासून रोखेविक्रीचे पर्व सुरू झाले असले तरी ते फारसे विकसित झालेले नाही. रिझर्व बँक कर्जरोखे विकून केंद्र सरकारला पैसे मिळवून देते. मुंबई पुणे महामार्ग तसेच मुंबईमधील उड्डाणपूल बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कर्जरोखे विकून भांडवल जमा केले होते.)
शेअर बाजार आणि घोटाळे
कर्जरोख्यांच्या पाठोपाठ खाजगी कंपन्यांच्या समभाग विक्रीचा शेअर बाजार युरोपमध्ये विकसित झाला. त्याची कथा ब्लोईंग बबल्स ह्या तिसऱ्या प्रकरणात वाचायला मिळते. ह्यात खाजगी कंपन्या सामान्य लोकांकडून रोख्यांप्रमाणे कर्ज न घेता त्यांना भांडवलदार/मालक म्हणून सहभागी करून घेतात; मिळणारा नफा भागधारकांमध्ये वाटला जातो. कर्जरोख्यांवरील व्याजापेक्षा ह्यात जास्त नफा मिळण्याची शक्यता असते. नफ्याप्रमाणेच तोटाही वाटला जातो आणि भागधारकाचे नुकसानही होऊ शकते. गुंतवणुकीत जास्त धोका असतो. अशा भागभांडवलाचे खरेदीविक्री करण्याचे बाजार म्हणजे शेअरबाजार.
शेअरबाजाराला अनेकदा सट्टाबाजार असेही म्हटले जाते. सट्टा म्हणजे जुगार आणि सामान्य माणसांनी त्यापासून चार हात दूर राहावे, हेच संस्कार सहसा मध्यमवर्गात केले जातात. याला काही कारणे आहेत. शेअरबाजार निर्माण होण्याआधी युरोपमध्ये सतराव्या शतकात समभाग कंपन्यांची निर्मिती झाली. हॉलंडमध्ये ही कल्पना निर्माण झाली आणि यशस्वी ठरली. त्याकाळी युरोपमधील देशांत मसाल्याच्या व्यापारातून होणाऱ्या नफ्याच्या अभिलाषेपोटी मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. व्यापार करण्यासाठी मोठी जहाजे आवश्यक असत आणि मोहिमा काढण्यासाठी लागणारा पैसा, वेळ आणि जोखीम जास्त असे. जहाजांवर शत्रुराष्ट्रांचे व्यापारी, सैनिक यांचे हल्ले होण्याचे भय असे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी सैनिक लागत. त्यामुळे अशा मोहिमांसाठी मोठे भांडवल आवश्यक असे, आणि कोणा एका व्यापाऱ्याकडे ते जमा करण्याची क्षमताही नसे. या अडचणींवर मात करण्याच्या प्रयत्नांतून अनेक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन भागभांडवल घालून पहिली मर्यादित समभाग कंपनी स्थापन केली. यात प्रत्येक व्यापाऱ्याची जोखीम केवळ त्याच्या भागभांडवलापुरती मर्यादित होती. भागभांडवलावर ताबडतोब नफा मिळण्याची अपेक्षाही करणे त्यावेळी शक्य नव्हते. भागभांडवलाचा हिस्सा हप्ते पद्धतीने एकदोन वर्षांत जमा करण्याची सोय होती अॅमस्टरडॅममधील व्यापाऱ्यांचा त्यात पुढाकार होता. इतर शहरातील व्यापारीही त्या उपक्रमात सामील झाले. अशा त-हेने या मर्यादित कंपनीत त्याकाळी मोठ्या प्रमाणात भांडवल गोळा झाले. त्या भांडवलातून अनेक जहाजे बांधली गेली आणि त्यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे पूर्वेकडे मोक्याच्या ठिकाणी वखारी स्थापण्यासाठी प्रयत्न झाले. कालांतराने या मोहिमेला यश मिळाले आणि मर्यादित भागभांडवल कंपन्यांची वाढ झाली. यामागोमाग अशा भागभांडवलाची खरेदी-विक्री करणारी दुय्यम बाजारपेठ निर्माण झाली. व्यापारी आपल्या क्षमतेनुसार पैसे गुंतवून भागभांडवल खरेदी करीत. जेव्हा त्यांना रोख पैशांची गरज लागे तेव्हा असे भागभांडवल विकणेही शक्य असे. भविष्यात किती नफा मिळेल याच्या अपेक्षेनुसार समभागांच्या खरेदीविक्रीची किंमत ठरत असे. खूप नफा मिळू लागला की समभागांचे भाव वधारत किंवा तोट्याच्या शंकेने कोसळत. आजही शेअरबाजारातील चढउतार अशाच अपेक्षा आणि भावनांच्या आधारे होत असतात. कंपन्या स्थापन झाल्या तेव्हा सामान्य गुंतवणूकदार त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत कंपन्यांच्या कामकाजाचे नियंत्रण करतील अशी व्यवस्था होती. पण लाखो भागधारकांच्या अशा प्रतिनिधींपेक्षा भांडवलबाजारातील किंमती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करतात हे लक्षात आले. यथावकाश अशा मर्यादित भागभांडवलाच्या कंपन्या स्थापन करण्याची लाट युरोपमधील अनेक देशांमध्ये आली. त्यात इंग्लंडमधील बँका चांगल्याच मोठ्या आणि प्रभावी असल्याने व्यवहार करण्यात त्यांनी आघाडी घेतली. गुंतवणूक करून बँकेतील ठेवींपेक्षा जास्त नफा कमावता येतो असे दिसताच सामान्य लोकही अशा कंपन्यांच्या शेअरखरेदीकडे वळले.
शेअरचे भाव जेव्हा वधारतात तेव्हा मूळ भांडवलाच्या कितीतरी पट परतावा मिळतो हे ध्यानात येऊ लागले. साहजिकच शेअरबाजारातील समभागांचे भाव आपल्या सोयीप्रमाणे कमी जास्त करणारे अवलिये, सटोडिये बाजारात तयार झाले. शेअरबाजारात सट्टा सुरू झाला. इंग्लंडमध्ये जन्मलेला, दरोडे, चोरी यांचे आरोप असलेला, खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतरही तुरुंगातून अॅमस्टरडॅमला पळून जाण्यात यशस्वी झालेल्या जॉन लॉ, ह्याला शेअर घोटाळ्यांचा पितामह म्हटले जाते. त्याच्या काही कारनाम्यांचे तपशीलवार वर्णन पुस्तकात आहे. जॉन लॉ ह्याला काही जण अर्थतज्ज्ञही मानतात. कागदी नोटा चलनात वापरण्यात येतात या नावीन्याचे श्रेय काही जण अतिहुशार आणि गणितामध्ये गती असणाऱ्या जॉनला देतात. लॉ वित्तव्यवहारात अनेक उचापती करीत प्रचंड श्रीमंत झाला. इतका, की फ्रान्समधील ड्यूक ऑफ ऑर्लीन्स हा संपूर्णपणे जॉनच्या आर्थिक व्यवहारांत ओढला गेला. फ्रान्सची अर्थव्यवस्था १७१८ मध्ये अतिशय डबघाईला आली होती. लढायांपायी झालेले कर्ज फेडण्याचे मार्ग दाखविता दाखविताच लॉने संपूर्ण राज्याचे करसंकलन, रॉयल बँकेसारख्या संस्था आणि संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था या ना त्या प्रकारे स्वतःच्या नियंत्रणाखाली आणली. त्याच्या मिसिसिपी कंपनीत भागभांडवल घेण्यासाठी असंख्य फ्रेंच सरदार रांगा लावून गुंतवणूक करीत. अमेरिकेतील लुइझियाना राज्यातील न्यू ऑर्लीन्स येथे भव्य वसाहत आणि शहर वसविण्यासाठी स्थापन केलेल्या या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी अनेकांनी तर जॉनच्याच बँकेतून कर्जेही घेतली. दर्शनी मूल्याच्या कितीतरी पट किंमतीने लोक हे समभाग खरेदी करायला गर्दी करीत. रॉयल बँकेच्या नोटा छापण्याचे अधिकारही ह्या जॉनने मिळवले होते. व्यापार, सोने, चांदी यांच्या आधारावर नोटा न छापता गरजेनुसार नोटा छापून तो त्या चलनात आणत असे. यामुळे फ्रान्समध्ये १७१९ साली प्रचंड चलनफुगवटा आणि भाववाढ झाली. सामान्य नागरिकांचे हाल सुरू झाले. अनेक लोकांनी जॉन लॉच्या कारवायांविरुद्ध तक्रारी करूनही काही उपयोग झाला नाही. त्या काळात फ्रेंच पार्लमेंटने वा राजाने या संबंधात काहीच पावले उचलली नाहीत. १७२० साली हा अतिप्रचंड फुगा फुटला. राज्याच्या अर्थव्यवस्थेला हादरे बसले. त्यानंतरच्या काळातही फ्रान्सची आर्थिक स्थिती कठीण राहिली आणि त्याचे पर्यवसान १७९० च्या दशकात फ्रान्समध्ये राज्यक्रांती होण्यात झाले. याच काळात इंग्लंडमध्येही एक लहान आर्थिक घोटाळा निर्माण झाला होता. पण बँक ऑफ इंग्लंड आणि पार्लमेंटने वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे त्याचे फारसे परिणाम इंग्लंडला भोगावे लागले नाहीत.
आर्थिक घोटाळ्यांचे काही ना काही प्रकार वित्त क्षेत्रांमध्ये कायमच होत आलेले आहेत. शेअर बाजार बंद करणे, खाजगी कंपन्यावर अवास्तव बंधने आणण्याचे धोरण युरोप व अमेरिकेतील सरकारांनी घेतले नाही; किंवा वित्तबाजारावर कायदे करून नियंत्रण आणण्याचे अधिकारही कधी सोडलेले नाहीत. घोटाळे करणाऱ्यांना न्यायालयांमध्ये खटले भरून झटपट शिक्षा देण्याचे धोरण ह्या देशांनी विकसित केले आहे. एन्रॉनच्या अलिकडच्या काळातील गाजलेल्या घोटाळ्यात त्या कंपनीच्या मालकांना आणि अधिकाऱ्यांना शिक्षा देण्याचे काम न्यायालयांनी अतिशय तत्परतेने केले. कालप्रवाहात असे शेअरबाजार जगातील अनेक देशांमध्ये निर्माण झाले. बँका, रोखेबाजार ह्यांचे अनुकरण होत राहिले. अठराव्या शतकापासून शेअरबाजारात घोटाळे करण्याची वृत्ती जगातल्या सर्व देशांच्या शेअरबाजारात दिसून येते. अशा घोटाळ्यामुळे स्थानिक देशांच्या अर्थव्यवस्थांवर काही विपरीत परिणाम होतात व त्यातून मार्ग काढणेही अनिवार्य बनते. अशावेळी देशाच्या सरकारांना हस्तक्षेप करावा लागतो.
भारतामध्ये अर्थव्यवस्था मुक्त झाल्यापासून शेअरबाजारात अनेक सामान्य लोकांनी पैसे गुंतवायला सुरुवात केली. रिलायन्सच्या धीरूभाई अंबानी यांनी सामान्य गुंतवणूकदारांना शेअरबाजाराकडे खेचून आणले, असे म्हटले जाते. त्याचबरोबर हर्षद मेहतासारखे दलाल शेअरबाजारात कसा धुमाकूळ घालतात ह्याचा अनुभव मुंबईच्या शेअरबाजारात आला. कंपन्यांचे प्रवर्तकही भागधारकांना फसवून घोटाळे करतात याचे उदाहरण सत्यम कंपनी पुरवते.
आर्थिक घोटाळे होतात तेव्हा अनेक वित्तकंपन्या, बँका दिवाळखोर ठरतात आणि गुंतवणूकदारांचे पैसे बुडतात. त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून बँकिंगक्षेत्रावर सरकारच्या मध्यवर्ती बँकेचे नियमन आणि नियंत्रण असावे ही पद्धत रूढ झाली आहे. या सर्व घोटाळ्यांच्या इतिहासात काही समान धागे आढळून येतात. नामवंत यशस्वी कंपन्यांच्या बाबतीत असे घोटाळे नेहमी होताना दिसतात. सातत्याने भागधारकांना जास्त नफा देणाऱ्या यशस्वी कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढत राहतात. त्यांच्या भविष्यातील नफ्यामध्ये भागीदारी मिळवायला उत्सुक असणारे लोक दर्शनीमूल्यापेक्षाही जास्त दराने समभाग खरेदी करतात. अशा भागांना शेअरबाजारात मागणी वाढते आणि मागणीच्या प्रमाणात समभागांचे भाव वाढतात. वाढत्या बाजारात झटपट नफा कमावण्याच्या हेतूने फारशी माहिती नसलेले सामान्य लोकही गुंतवणूक करायला लागतात तेव्हा कंपनीच्या आतील बित्तंबातमी असणारे काही लोक कृत्रिमपणे बाजारभाव वाढविण्यासाठी अफवा, बाजारगप्पा यांचा आश्रय घेतात. अवास्तव पातळीवर गेलेले भाव कधीतरी खाली येणार हे त्यांना माहीत असते. त्यामुळे घसरणीची चाहूल लागताच आपले समभाग विकून ते पुष्कळ नफा कमावतात आणि असे करू न शकणारे सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजाराचे भाव घसरायला लागले की हात पोळून घेतात. दलालांच्या या खेळांत अधूनमधून कंपन्यांचे प्रवर्तक, मालकही हात धुऊन घेत असतात. मग सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारला कायदे करून हस्तक्षेप करावा लागतो. अशा घोटाळे करणाऱ्यांना शिक्षा करावी लागते. शेअरबाजारावर नियंत्रण ठेवण्याचे कामही कायदेशीर यंत्रणा स्थापन करून केले जाते. प्रत्येक घोटाळा हा वेगळ्या प्रकारे होत असतो. त्यासाठी शेअरबाजारच नष्ट करण्याची गरज भांडवलशाही देशांना वाटत नाही. मात्र घोटाळे रोखण्याचे कायदेशीर उपाय सातत्याने घडविण्याचे काम भांडवली देशांतील सरकारे करीत असतात. शेअरबाजार नियंत्रितही करायचा आणि पुरेसा मुक्तही ठेवायचा ही तारेवरची कसरत गेली दोन तीन शतके चालूच आहे. सातत्याने त्यात सुधारणा करण्याचे काम आजही संपलेले नाही आणि संपणारही नाही. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतील मालमत्ताबाजारातील झालेल्या सबप्राईम घोटाळ्याचे चटके आज जगातील जवळजवळ सर्व देशांना बसत आहेत. त्यावर उपाय करण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर चालू आहेत. त्यात कितपत यश येईल हे काळच ठरवेल. पण ह्या घोटाळ्याचे भाकित करणे अवघड नव्हते असेच लेखकाने सुचविले आहे. पैशाचा इतिहास माहीत असणाऱ्याला घोटाळे होण्याचे भविष्य अचूक नाही तरी ढोबळमानाने वर्तवता येते असे लेखकाचे प्रतिपादन आहे. लेखकाने ते वर्तविलेही होते. पण विनाशकाले विपरीत बुद्धी या नियमानुसार त्या धोक्याकडे कानाडोळा केला गेला हेही सत्य आता उघड होते आहे. बॉन्ड किंवा रोखेबाजार आणि शेअरबाजार हे लहरी असतात. त्यात मानवी अपेक्षा, भावना, भीती आणि निराशेचे सावट कधी, कोठे आणि कशामुळे पडेल हे सांगता येत नाही. शेअरबाजारातील किंवा बॉन्डमधील जोखीम कमी करण्याचे प्रयत्न होतात त्याचप्रमाणे एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या कारणांनी निर्माण होणारी संकटे टाळण्यासाठी उपाय शोधणेही आवश्यक ठरते. अनिश्चितता हा अर्थव्यवस्थांचा स्थायीभाव असतो हे काही शतकांपूर्वी लक्षात आले. अशा अनिश्चिततेवर उपाय करण्याची गरजही जुनीच आहे. त्यातूनच विमाव्यवस्था निर्माण करून सामाजिक सुरक्षा मिळवण्याची धडपड सुरू झाली. संकट मोचनार्थ शेअरबाजारांपाठोपाठ पैशांच्या दुनियेत विमा व्यवस्थेला अतिशय महत्त्व आले. विमा व्यवसायाचा आढावा लेखकाने पुस्तकाच्या रिटर्न ऑफ द रिस्क ह्या प्रकरणात घेतला आहे. पूर, भूकंप, दुष्काळ अशी नैसर्गिक संकटे जगात कोठे ना कोठे कोसळत असतात. आग, अपघात, आजारपण, चोरी, युद्धे, दंगली, अकस्मात मृत्यू अशी संकटेही माणसांवर कोसळत असतात. त्यात जीवित आणि वित्त यांची हानी होत असते. अशा संकटांतून वाचलेल्यांना मदत करण्याच्या गरजेतून सतराव्या शतकात विमा संरक्षणाची पद्धत सुरू झाली. व्यापारात संकटांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी हमी म्हणून काही रक्कम एकत्र करण्याची प्रथा व्यापारी लोकांनी तेराव्या शतकातच सुरू केली होती. व्यापारी ठरावीक रक्कम मालाच्या किंमतीनुसार संरक्षणासाठी जमा करीत. वर्षाच्या शेवटी ज्यांचे नुकसान झाले असेल त्यांना भरपाई वाटून उरलेली रक्कम नफा म्हणून संस्थेमध्ये जमा केली जाई. मालाच्या खरेदीपासून ते प्रवासातील जोखमीचा विमा उतरविला जाई. किंमतीच्या १५ ते २० टक्के इतका हप्ता त्यासाठी असे. यामुळे नुकसान होणाऱ्या व्यापाऱ्याला धंद्यात परत उभे राहण्यासाठी ही सामूहिक जोखीमव्यवस्था उपयोगी ठरत असे. कालांतराने जास्त संख्येने व्यापारी त्यात सहभागी होऊ लागल्यावर विमा हप्त्यांचे प्रमाण कमी होऊ लागले. इंग्लंड आणि युरोपमध्ये विमा कंपन्यांची संख्या अठरा आणि एकोणिसाव्या शतकात खूप वाढली.
जीवनविमा व्यवस्था मात्र अठराव्या शतकानंतरच खऱ्या अर्थाने सुरू झाली. त्यापूर्वी चर्चच्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा आणि मुलांची काळजी घेण्यासाठी सामाजिक सुरक्षा म्हणून काही रक्कम चर्च जमा करीत असे. त्याचाच विस्तार सर्व नागरिकांसाठी करण्याची कल्पना स्कॉटलंडमधील दोन गणितज्ज्ञांनी मांडली. सर्व नागरिकांना सामाजिक सुरक्षा पुरविता येण्यासाठी या व्यवस्थेमध्ये खूप काही घडावे लागले. त्यात संख्याशास्त्राचे योगदान फार महत्त्वाचे ठरले. याच काळात शहरांमध्ये जन्म-मृत्यूची नोंद करण्याची सुरुवात युरोपमध्ये झाली होती. ही माहिती विमाव्यवस्थेचा विस्तार होण्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. संकटांचे वारंवार येण्याचे प्रमाण, संभाव्यतेचे (प्रॉबेबिलिटीचे) तत्त्व, लोकांचे सरासरी आयुष्यमान, मृत्यूची कारणे यांचे गणित मांडण्याच्या पद्धती विकसित होऊ लागल्या. माहिती आणि गणिताच्या आधारे निश्चिततेचा अंदाज, सामान्य घटनाक्रम, आणि अनुमान काढण्याच्या पद्धती विकसित होत गेल्या.
विम्यापोटी जमा होणारी रक्कम अर्थव्यवहारात गुंतवून त्यावर अधिक दराने परतावा मिळविण्याची शक्कलही वापरली जाऊ लागली. कालांतराने बँकांच्या कर्जव्यवहारांसाठी विमाव्यवस्थेचा वापर होऊ लागला. अठराव्या शतकात सुरू झालेल्या विम्याच्या विस्तारातून असंख्य लोक त्यात जोडले जाऊ लागले. असंख्य लोकांकडून जमा होणाऱ्या लहानलहान विम्याच्या हप्त्यांमधून जगातील किती मोठ्या फंडांची निर्मिती होऊ शकेल याची कल्पनाही अठराव्या शतकात कोणाला आली नव्हती. दुसऱ्या महायुद्धानंतर अशा फंडांना भांडवलबाजारांत गुंतवणूक करण्याची मुभा इंग्लंडमध्ये मिळाली तेव्हा त्यांनी त्या बाजाराचा महत्त्वाचा हिस्सा काबीज केला. (भारतामध्ये अशी गुंतवणूक करण्यावर आजही बंधने आहेत.) पाश्चात्त्य देशांतील विमा कंपन्या जागतिक भांडवलबाजारातील महत्त्वाच्या गुंतवणूकदार झालेल्या आहेत. विमाक्षेत्र आज आर्थिक क्षेत्रात अतिशय महत्त्वाची मानले जाते.
मालमत्ता, व्यापारातील नुकसान, जीवन विमा अशा अनेक प्रकारांच्या विम्यांची पद्धत गेल्या दोन दशकांत विस्तारलेली असली तरी सामान्य गरीब लोक, कायमची नोकरी वा उत्पन्नाचे साधन नसणारे अनेक लोक कोणत्याही सुरक्षेविनाच असत. विकसनशील देशांमध्ये आजही ते असुरक्षित आहेत. विम्याचा हप्ता भरण्याची त्यांची क्षमता नसे. तरीही विसाव्या शतकापर्यंत, महायुद्धांच्या अगोदरपर्यंत सामान्य आणि गरीब लोकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी अनेक प्रयोग भांडवलशाही देशांमध्ये झाले. चर्च आणि राज्यशासनांनी त्यात पुढाकार घेतला. एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये कामघरांच्या (वर्क हाऊसेस) माध्यमांतून अपंग, अनाथ, विधवा आणि वृद्ध यांच्या राहण्या जेवण्याची सोय सरकारतर्फे केली जात असे. लोकशाही असलेल्या इंग्लंडमध्ये सामाजिक सुरक्षा सुरू करण्याअगोदर आरोग्यविमा आणि वृद्धांसाठी निवृत्तिवेतन योजना लागू केली ती १८८० साली जर्मनीच्या बिस्मार्कने. त्यानंतर १९०८ साली इंग्लंडमध्ये ७० वर्षे वयाच्या वृद्धांसाठी निवृत्ती वेतनाची सोय झाली. सर्वांसाठी आरोग्यविमा सुरू झाला १९११ साली. या योजनेसाठी पैसे जमा करण्यासाठी इंग्लंडमध्ये प्रथमच श्रीमंतांवर वेगळा कर लावला गेला.
दोन महायुद्धांनंतर सामाजिक सुरक्षेची संकल्पना अधिक विस्तृत झाली. सामान्यांच्या गरजा, आजार, अज्ञान, दारिद्रय, आळशीपणा नष्ट करण्यासाठी अनेक योजना युरोपमधील शासनांनी सुरू केल्या. बेकारभत्ता देण्याची पद्धतही सुरू झाली. या काळातच शासकीय मालकीच्या उद्योगांतही खूप भर पडली. घरबांधणी, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये कल्याणकारी योजना राबविण्याचे अनेक प्रयोग झाले. खाजगी विमा कंपन्या जेथे पोहोचू शकत नाहीत तेथपर्यंत पोचण्याचे प्रयत्न झाले. नंतर विमायोजना सर्वांसाठी अनिवार्य ठरल्या. सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रात सर्वाधिक आघाडी घेतली ती जपानने. सरंजामी अर्थव्यवस्थेतून कल्याणकारी अर्थव्यवस्थेकडे जपानने वाटचाल केली असेही काहींनी त्याचे वर्णन केले. ब्रिटिश आणि जपानी कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये खूपसे साम्य असले तरी त्याचे परिणाम वेगवेगळे झाले. १९७० पर्यंत या व्यवस्थेने जपानला महाशक्ती केले तर ब्रिटनच्या मात्र त्यामुळे असंख्य समस्या निर्माण झाल्या. त्यावर उपाय म्हणून कल्याणकारी कार्यक्रमांना सुरुंग लावण्याचे धोरण इंग्लंडमध्ये थेंचर यांच्या काळात सुरू झाले. तरीही आर्थिक धोक्याचा आणि अनिश्चिततेचा राक्षस पुन्हा पुन्हा डोके वर काढायला लागला. एकीकडे अर्थव्यवस्था वाढ न होता कुंठित होऊ लागली तर दुसरीकडे प्रचंड भाववाढ होऊ लागली. या आर्थिक कोंडीकरता कल्याणकारी योजनांना जबाबदार धरून त्यांविरोधात अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये प्रचार सुरू झाला.
अंदाजपत्रकी तूट हे भाववाढीचे मूलभूत कारण असते असा मिल्टन फ्रीडमन ह्या अर्थतज्ज्ञाचा सिद्धान्त होता. तूट आटोक्यात ठेवून चलनवाढ रोखणे हा त्यावर उपाय असावा असे त्याचे मत होते. कल्याणकारी योजनांमुळे शासनाची तूट वाढते असाही समज होता. फ्रीडमन यांना कल्याणकारी कार्यक्रम का फसतात हे जाणून घेण्यात विशेष रस होता. १९७५ साली चिली ह्या देशात या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी फ्रीडमनने भेट दिली. त्यावेळी लष्कराचा उठाव होऊन तेथील आयेंदे ह्या कम्युनिस्ट राष्ट्राध्यक्षाने आत्महत्या केली होती. नवीन लष्करशहांना शासकीय तूट कमी करण्याचा सल्ला फ्रीडमन यांनी दिला तेव्हा अमेरिकेत आणि जगभरच लष्करशहाला मदत केली म्हणून त्यांच्याविरोधात खूप मोठे वादळ उठले. फ्रीडमन यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी चिलीमधील आर्थिक धोरणावर त्यांच्या हाताखाली, शिकागो विद्यापीठामध्ये शिकून गेलेल्या अनेक तरुण अर्थतज्ज्ञांचा प्रभाव पडत होता. पिनोशे ह्या लष्करशहाच्या मंत्रिमंडळात अशा लोकांना मंत्रिपद दिले गेले. जॉन पिनेरा ह्या अमेरिकेत शिकणाऱ्या अर्थशास्त्राच्या तरुण विद्यार्थ्यालाही सहभागासाठी आमंत्रण मिळाले तेव्हा कल्याणकारी योजनांबाबत त्याने खूप भरीव काम करून दाखवले. शासकीय सुरक्षेच्या जागी त्याने कर्मचाऱ्यांच्या सहभागातून सुरक्षा योजना राबविण्याचे धोरण आखले आणि यशस्वी करून दाखविले. कालांतराने ह्या सुरक्षा योजनेचे अनुकरण दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांनी तर केलेच पण अमेरिका आणि इंग्लंडनेही त्याच्याकडून ह्या विषयात मार्गदर्शन घेतले. कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने राबविलेली ही सार्वजनिक सुरक्षा योजना अमेरिकेतील योजनांपेक्षा अधिक प्रभावी आणि क्रांतिकारक ठरली असली तरी ती राबविण्याची तयारी अमेरिकेत अजून झालेली नाही. गरीब अमेरिकन नागरिकाला आरोग्य आणि जीवन विमा हप्ते परवडत नाहीत. संकटांशी मुकाबला करण्याची त्याची क्षमता कमी पडते. तेथील शासन अशांसाठी फारसे काही करीत नाही. कॅटरीना ह्या वादळाने अमेरिकेतील न्यू ऑर्लीन्सला दिलेल्या प्रलयंकारी तडाख्यामुळे तेथील सामान्य आणि आफ्रिकी वंशाच्या गरीब लोकांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांजवळ जीवन आणि मालमत्तांचे विमे असूनही विमाकंपन्यांनी नुकसान भरपाई देण्याची टाळाटाळ सुरू केली. अशा विमाकंपन्यांना शासनाने काही प्रमाणात मदत दिली पण झालेले नुकसान खूप मोठे होते त्यामुळे अशा प्रकारच्या महासंकटांच्या धोक्यांमुळे निर्माण होणाऱ्या सार्वजनिक मालमत्तेच्या आणि लोकांच्या सुरक्षेबद्दल अधिक जास्त विचार अमेरिकेत सुरू झाला.
हेज फंड
खाजगी, मोठ्या मालमत्ताधारकांना असलेले हे धोके काही हुशार लोकांनी अगोदरच ओळखून त्यांच्या संपत्तीचे संरक्षण करण्याचे मार्ग शोधले आणि गेल्या काही दशकांत विकसित केले. त्यातील हेज् फंडांचा मार्ग विशेष उल्लेखनीय म्हणावा लागेल. मोठ्या भांडवल गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचे भविष्यातील नुकसान स्वतःच्या शिरावर घेण्याची आणि मूळ मालकाला याची हमी देण्याचे करार करण्याची शक्कल म्हणजे हेज् फंड. विशेषतः भागभांडवलाचे भविष्यातील घसरणीपासून संरक्षण करण्यासाठी हेज् फंड विशेष फी आकारून त्यांचे व्यवस्थापन करतात. अश्या व्यवहारांतून अमेरिकेतील काही हेज् फंडांनी दहावीस वर्षांमध्ये प्रचंड नफा कमावला. ही पद्धत पहिल्यांदा अमेरिकेतील शेतकऱ्यांचे बाजारभावांच्या लहरीपणापासून संरक्षण करण्यासाठी एकोणिसाव्या शतकातच विकसित झाली होती. शेतमालाच्या किंमती पडण्याचा धोका ओळखून धाडसी व्यापारी पीक तयार होण्याच्या अगोदरच शेतमाल ठराविक भावाला विकत घेण्याचे करार करीत. पीक आल्यावर त्यापेक्षा जास्त भावाला विकून नफा मिळण्याच्या अंदाजानेच असे करार केले जात. यामुळे शेतकऱ्यांना थोडे कमी पैसे मिळाले तरी नुकसान न होण्याची हमी मिळत असे. जमिनीला कुंपण घालून जशी सुरक्षितता मिळवली जाते, त्याचप्रमाणे शेतमालाला आर्थिक नफ्याचे हे एक प्रकारचे कुंपणच घातले जाते म्हणून त्याचे नाव हेज् फंड पडले. त्याला मराठीमध्ये कुंपण-ठेव म्हणता येईल.
संकटांपासून होणारे आर्थिक नुकसान कमी करण्याचे असे अनेक प्रयत्न गेल्या तीन दशकांत विकसित झाले. त्यामुळे काही प्रमाणात सुरक्षेची भावनाही निर्माण झाली. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्याला तडे जाऊ लागले आहेत. त्यातच नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढण्याचा धोका पर्यावरणशास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. बहुतेक देशांनी सुरुवातीला ह्या धोक्याकडे दुर्लक्ष केले होते परंतु अशा धोक्यांचा प्रत्यय आता जगभर येऊ लागला आहे. विशेषतः जास्त लोकवस्ती असणाऱ्या किनारपट्ट्यांमधील महानगरांना वादळे, पूर, सुनामी यांचा धोका सर्वाधिक आहे. इतर काही प्रदेशांत भूकंपांचे धोके आहेतच. अशा प्रदेशांतील मालमत्तांसाठी तुलनेने सुरक्षित प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर कर लादून शासनाने खर्च करण्याला काही आक्षेप घेण्यात येत आहेत. त्यातच विकसित देशांमध्ये दहशतवादी कारवाया, घातपात, युद्ध याबरोबरच अण्वस्त्रांचे आणि जैविक अस्त्रांच्या हल्ल्यांचे संकट वाढले आहे. असे हल्ले कधी, कोठे आणि कोणाकडून होतील याचे अंदाज करणेही कठीण आहे. एकूण आर्थिक सुबत्ता वाढली असली तरी संपत्ती नष्ट होण्याची सामाजिक भीतीची भावना वाढीला लागली आहे. अनिश्चितता कमी न होता उलट वाढीला लागली असल्याची जाणीव जगभरात बळावली आहे. त्यामुळे सुरक्षित संपत्तीची मागणी वाढली आहे. जगभरातच जमीनजुमला आणि घरे ह्या सर्वाधिक सुरक्षित ठेवी मानल्या जातात. या मानसिकतेमुळे अमेरिकेतील मालमत्ताबाजारात प्रचंड तेजी आली. गेल्या काही महिन्यांत ह्या तेजीचा बुडबुडा फुटला, त्यामुळे स्थावर मालमत्तेच्या गुंतवणुकीची किंमत कमी होऊन संपूर्ण अर्थव्यवस्थेवरच संकट आले. घर ही सर्वोत्तम सुरक्षा? २००८ साली अमेरिकेतील निर्माण झालेल्या मालमत्ता, घरे यांच्याशी संबंधित आर्थिक घोटाळ्याची चर्चा लेखकाने सेफ अॅज हाऊस ह्या पाचव्या प्रकरणात केली आहे. अमेरिकेमध्ये १९३४ साली मोनॉपोली, म्हणजे मक्तेदारी नावाचा, छापील कागदी पट असणारा खेळ अतिशय लोकप्रिय झाला होता. सुरुवातीला सर्व खेळाडूंना समान पैसे वाटले जातात आणि सोंगट्यांचे दान पडत जाते तसा व्यापार केला जातो. खेळामध्ये कर्ज काढता येते तसेच ते बुडतेही. स्थावर मालमत्ता विकत घेता येते, विकताही येते. घरे बांधता येतात. व्यापारात फसवणूक केली तर तुरुंगात जाण्याची शिक्षाही होते. काही खेळाडू ह्या खेळात लक्षाधीश होतात. मालमत्ताधारक होतात. खेळाच्या शेवटी जास्त मालमत्ताधारक विजेता ठरतो हे ओघानेच आले. पाश्चात्त्य देशांमध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वास्तवात फार थोड्या नागरिकांना मालमत्ताधारक होण्याची संधी असे. परंतु हा खेळ खेळताना मात्र केवळ इमारतीच नाही तर अख्ख्या रस्त्यांचे मालक होता येत असे. मालमत्ताधारक बनण्याचे स्वप्न पुरे करण्याची रम्य कल्पना या खेळातून मिळत असे. हा खेळ जगातील अनेक देशांमध्ये आजही खेळला जातो. ह्या खेळाला आपण व्यापार म्हणतो आणि मुंबईमधील अनेक मालमत्ता करोडो रुपयांना विकत घेण्याचा आनंद लहानपणी अनेकजण घेत असतात. वास्तवात मात्र विसाव्या शतकापर्यंत जमिनी, घरे, इमारती अशा स्थावर मालमत्ता असणारा मालकवर्ग संख्येत आणि प्रमाणात अल्प होता. युरोपमध्ये भांडवलशाही व्यवस्थेची सुरुवात होण्यापूर्वी मजुरांची, गुलामांची संख्या सरंजामदार, मालकांपेक्षा कित्येक पटीने जास्त असे. तेथील अनेक देशांमध्ये आज स्वतःच्या मालकीचे घर असणाऱ्या कुटुंबांची संख्या साठ टक्क्यांपेक्षाही जास्त झाली आहे. गरीब विभाग वगळता अमेरिकेतील कुटुंबांमध्ये स्वतःच्या मालकीचे घर असणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे. एकेकाळी गुलामांना मालमत्ता समजले जात असे. आज बहुसंख्य माजी गुलामांना मालमत्तांचे मालक बनता येऊ शकते. ही क्रांती होण्यात, बहुसंख्य लोकांना मालमत्तांचे मालक बनविण्यात वित्तव्यवस्थेमधील उत्क्रांतीचा वाटा मोठा आहे. मालमत्ता आर्थिक सुरक्षा देते ही भावना केवळ पाश्चात्त्य जगातच नाही, तर जगभरच दिसते. पण मालमत्ता खरोखरच सुरक्षा आणि स्वस्थता देते याबद्दल लेखकाने व्यक्त केलेली शंका अमेरिकेतील अलिकडच्या घटना बघता रास्त वाटू लागते.
मालमत्तेमुळे सुरक्षित वाटते याची काही कारणे आहेत. त्यामध्ये मालमत्ता तारण ठेवून अडीअडचणीला कर्ज काढता येते, घर चोरीला जाऊ शकत नाही ही कारणे महत्त्वाची आहेत. शिवाय विकसित होणाऱ्या देशांमध्ये, भाववाढ, चलनवाढ होणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये मालमत्तांचे भाव त्यापेक्षा जास्त दराने वाढतात. महागाईच्या दरापेक्षा कमी दराच्या व्याजाने कर्ज मिळते आणि ज्यांच्याजवळ कायम उत्पन्नाची साधने असतात अशा नोकरदारांना, व्यावसायिकांना बँका आणि वित्तसंस्थांच्या निर्मितीमुळे कर्ज घेणे शक्य आणि सुलभही होते. कर्जावरील व्याजासकट सर्व रक्कम फेडणे लोकांना परवडते. मालमत्तांचे दर जेव्हा वाढत असतात तेव्हा घराचे तारण पुरेसे ठरते. कारण जर कर्जफेड झाली नाही तरी मालमत्ता विकून कर्ज वसूल करण्याची खात्री वित्तसंस्थांना असते. पण जर मालमत्तांचे दर कमी झाले तर? शिवाय नोकरी गेली आणि कर्जफेड करता आली नाही तर? हा प्रश्न गेल्या काही वर्षांमध्ये फारसा उपस्थित झाला नव्हता. पण गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेमध्ये हे घडले आणि त्यामुळे केवळ कर्ज घेणारेच संकटात सापडलेले नाहीत तर अमेरिकेच्या आणि अमेरिकेच्या अर्थकारणाशी नाते असलेल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांवर मोठे संकट ओढवले. ह्याला सब् प्राईमचे संकट म्हटले जाते. गृहकर्जे देणाऱ्या बँका, त्यांना हमी देणाऱ्या विमा कंपन्या मोठ्या संख्येने बुडाल्या. त्यांनी ज्यांना घरांसाठी, वस्तू आणि सामानासाठी, दुरुस्ती-रंगरंगोटीसाठी कर्जे दिली त्यांची आर्थिक परिस्थिती, परतफेडीची क्षमता या कशाचाही विचार त्यांनी केला नाही. अनेकदा तर लोकांना प्रलोभने दाखवून, भरीस घालून कर्जे वाटली गेली. ज्या लोकांनी कधी घरमालक होण्याचे स्वप्नही पाहिले नसेल अशांना घरे तारण ठेवून कर्जे दिली. कर्जाच्या करारातील अटी, धोके यांची वा कर्जफेडीच्या जबाबदारीची माहिती कर्ज घेणाऱ्यांना दिली गेली नाही. कर्ज मिळवून देणाऱ्या दलालांचे पेव फुटले आणि त्यांना त्यांचे कमिशन बँकांकडून मिळाले. बांधकाम उद्योगाला चालना मिळाली. मोठ्या संख्येने रोजगार उत्पन्न झाले. ह्या काळातच आर्थिक कायद्यांमध्ये बुश प्रशासनाने बदल केले. वित्तसंस्थांवरील नियंत्रणे शिथिल केल्यामुळे, त्यांच्यावर शासनाचा अंकुश न राहिल्यामुळे हे होऊ शकले. बँकांचा पैसा पडून राहण्यापेक्षा कर्ज म्हणून गुंतवला गेला. त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगवान वारे वाहू लागले. ह्या सुखद वाऱ्याचे २००८ साली वादळात रूपांतर झाले आणि बघताबघता अर्थव्यवस्था त्याच्या तडाख्यात सापडली. तिचे परिणाम जगभर दिसू लागले. अगदी भारतालाही त्याची झळ पोहोचली. ही गोष्ट सर्व माध्यमांतून अलिकडे चर्चिली गेली आहे. मात्र प्रस्तुत पुस्तकात त्यापलिकडे ह्या संकटाचे भौगोलिक आणि सामाजिक वांशिकतेचे तसेच मानवी स्वभावाचे अंग तपशीलवारपणे उलगडून दाखविले आहे.
आकर्षक जाहिराती करून डेट्रॉईट आणि मेम्फिस ह्या दोन शहरांतील गरीब, कमी शिक्षण असणाऱ्या काळ्या किंवा लॅटिनो अशा अल्पसंख्य समाजातील लोकांना बँकांनी मोठी कर्जे दिली. ह्या दोन शहरांमध्ये आधीच उद्योगधंदे कमी झाले आहेत. तेथे गरीब, अल्पसंख्य लोकांचे प्रमाण अमेरिकेतील इतर कोणत्याही भागापेक्षा जास्त आहे. उत्पन्नाचे साधन गमावलेल्या अनेकांनी स्वतःच्या मालकीचे जुने घर तारण ठेवून काढलेले कर्ज हे क्रेडिटकार्डाचे थकलेले पैसे फेडण्यात किंवा घरे सजविण्यासाठी वापरले. इतरांनी नवीन घरे घेण्यासाठी कर्ज वापरले. २००२ ते २००७ ह्या काळात घरे विकत घेणाऱ्या वांशिक अल्पसंख्यकांची संख्या तेथे ३१ लाखांनी वाढली. दुसऱ्या महायुद्धापासून अमेरिकेतील लोकांना घरमालक होण्याच्या स्वप्नाने घेरले होते. वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये ६० टक्के कुटुंबांनी ते पूर्ण झालेलेही पाहिले. २००५ साली ते प्रमाण ७० टक्के झाले. अमेरिकेतील प्रत्येक कुटुंबाला मालकीहक्काचे घर मिळवून देण्याची प्रतिज्ञा बुश यांनी २००२ साली केली. तिच्या पूर्ततेसाठी सरकारी कंपन्यांनी प्रथम घरे विकत घेणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अनुदाने दिली. अल्पसंख्यकांच्या अनेक नेत्यांनीही त्याचे स्वागत केले. मालकीचे घर असणारे लोक ते सांभाळण्यासाठी कष्ट करतात, असे कारण त्यासाठी दिले जात असे.
पण ह्यात एक मोठी त्रुटी होती. कर्ज देताना घरांच्या किंमती सतत वाढत्याच राहतील आणि थोड्या लोकांनी कर्जफेड केली नाही तरी तारण घरांचा लिलाव करून कर्ज वसूल करता येईल अशी बँकांना आणि इतर वित्तसंस्थांना खात्री होती. शिवाय कर्जाला हमी देणारा विमाव्यवसायही होताच. स्थानिक बँका अशा कर्जाचे तुकडे करून न्यूयॉर्कमधील विमा आणि वित्त कंपन्यांच्या बाजारांना विकून त्यावर पैसे कमावीत होत्या. वॉल स्ट्रीटवरील मोठ्या बँकांनाही लहान, दूरच्या शहरांमध्ये कर्जे कोणाला दिली आहेत याच्याशी देणेघेणे नव्हते. त्यांचा धंदा होत होता, वाढत होता, इतकेच त्यांनी पाहिले. अर्थव्यवस्थेला आलेला हा बहर कायम राहील अशीच त्यामागे भावना होती. हे सर्व गुंतागुंतीचे अर्थव्यवहार सामान्य लोकांच्या समजण्यापलिकडचे होतेच, पण वित्तक्षेत्रातील दिग्गजांच्याही लक्षात आले नव्हते, हे विशेष. ज्या काही थोड्या लोकांना ह्याची शंका होती त्यांना अर्थातच वेड्यात काढले जात होते.
कर्जवसुलीसाठी घरांचे लिलाव वित्तक्षेत्रामध्ये नेहमीच होतात. कर्जवसुलीत असलेले धोके कमी करण्यासाठी कर्जाचे विमे काढण्याची काळजी वित्त-कर्ज संस्था घेतात. अमेरिकेत गरीब, अल्पसंख्य लोकांच्या घरांचे लिलाव कर्जवसुलीसाठी वाढत्या प्रमाणात सुरू झाले तेव्हा सुरुवातीला ते फारसे कोणाच्या लक्षातही आले नाही. नवीन कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाणही हळूहळू घटायला लागले. परिणामी नवीन घरांचे भाव कमी व्हायला लागले. उतरत्या भावांनी घरांच्या बाजाराला मोठ्या प्रमाणात विळखा घालायला सुरुवात केली तेव्हाच आर्थिक वादळाच्या संकटाची चाहूल काहींना लागली. ज्यांनी गरीब, नोकरी नसणाऱ्या लोकांनाही कर्जे मिळवून दिली होती त्यांनाच केवळ कर्ज घेणाऱ्यांची खरी ऐपत माहीत होती. बाकी सर्व बँकर्स केवळ कागदी घोडे नाचवून पैशांचा खेळ, खरे तर जुगार, आंधळेपणाने खेळत होते. त्यातच डेट्रॉईटमध्ये मोटारव्यवसायाला मंदीची चाहूल लागल्यावर हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि घरांच्या लिलावांचे प्रमाण अधिकच वाढले. २००८ सालाच्या मध्यावर ६५ लाख लोकांच्या कर्जाची फेड होणे शक्य नाही हे लक्षात आले. ह्या बुडणाऱ्या कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या लहान स्थानिक बँका बुडायला लागल्या तेव्हा न्यूयॉर्कमधल्या महाबँकांना संकट दिसायला लागले. अशा मोठ्या बँकांना आणि अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी अमेरिकेतील शासनाला आता प्रयत्न करावे लागत आहेत.
सुमारे दहा टक्के अमेरिकन नागरिकांना घरे गमावण्याची पाळी आली आहे. घरे सुरक्षा देतात हा विश्वास त्यात बळी गेला आहे. घरेही माणसांना रस्त्यावर आणतात हा धडा अमेरिकेला आणि जगाला मिळाला आहे. बेजबाबदारपणे कर्ज देऊन गरीब लोकांना मालकीचे घर, डोक्यावर छप्पर आणि सुरक्षा ज्यांनी काही काळ मिळवून दिली, त्याच बँकांवर आता दिवाळे काढण्याची वेळ आली आहे. बँकांची आणि वित्तसंस्थांच्या बेजबाबदारीची, खोटी स्वप्ने विकण्याची ही वृत्ती सर्वांनाच आर्थिक गर्तेमध्ये नेणारी ठरली. मालकीची घरे गरिबांना कायम सुरक्षा देऊ शकत नाहीत उलट संकटातच ढकलतात, असा निष्कर्ष लेखक काढतो.
गरिबांना खोटी स्वप्ने आणि सुरक्षेची आशा विकणाऱ्या अशा कर्जबाजाराची, ही मोठी चूक आहे. गरिबांना खरी सुरक्षा मिळवून देण्याच्या इतर उपायांची चर्चाही लेखकाने ह्या प्रकरणात केली आहे. विशेषत: गरीब महिलांच्या बचतगटांना अल्प कर्जवाटप करून जबाबदार परतफेड करणाऱ्या आर्थिक प्रणालीची लेखकाने भलावण केली आहे. नोबेल पारितोषिक मिळवणारे बांगलादेशाचे डॉ. महंमद युनूस ह्यांच्या गरिबांसाठी असलेल्या मायक्रोफायनान्स व्यवस्थेची, जबाबदार कर्जयोजनेची अनेक अंगे त्यांनी पुस्तकात विशद केली आहेत. अशा व्यवहारांतून गरीब लोक पैशांचा जबाबदार वापर करायला शिकतात आणि सुरक्षा मिळवतात. विकसनशील देशातील कर्जव्यवस्थेचे हे मॉडेल त्यांना विकसित जगातील गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे आणि उपयुक्त वाटते. चिमेरिका आणि अमेरिकन साम्राज्याचे विरलेले स्वप्न गेली चारशे वर्षे युरोप आणि अमेरिकेत वित्तव्यवस्थेची उत्क्रांती होत होती. हे घडत असतानाच तेथे इतरही अनेक प्रकारच्या नवनवीन व्यवस्था निर्माण होत होत्या. ही उत्क्रांती तेथील विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्रांतीशी निगडित होती, त्याचबरोबर सरंजामदारी व्यवस्थेला धक्के देत जन्म घेणाऱ्या भांडवलशाहीशी आणि लोकशाही राज्यव्यवस्थेशी निगडित होती. हे सर्व बदल आणि युरोपमध्ये घडत असलेल्या विविध प्रकारच्या संस्था आणि त्या घडवून आणणारे मानवी घटक जागतिक स्तरावर नेण्याचे काम सतराव्या शतकापासून मुख्यतः इंग्रजांच्या ताब्यात असणाऱ्या वसाहतींमध्ये झाले. जगभर फैलावलेल्या व्यापाराचा आणि वसाहतींचा संबंध या उत्क्रांतिप्रक्रियेशी होता आणि आहे. यांपैकी कोणताही एक घटक किंवा संस्था ह्यांचा विकास एकाकीपणे होऊ शकला नसता. त्यामुळे चारशे वर्षांतील विविध घटकांचा, घटनांचा सुटा विचार करणे ही केवळ सोय आहे.
जागतिकीकरणाचा पाया घातला गेला तो ह्या असंख्य घटकांच्या एकाचवेळी होत गेलेल्या निर्मितीमुळे. आज स्पष्टपणे दिसून येणाऱ्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जागतिकीकरणाचा संदर्भ गेल्या चारशे वर्षांच्या इतिहासाशी आहे. साम्राज्यांमुळे युरोपमध्ये विकसित झालेल्या अर्थव्यवस्थेमधील विविध वित्तव्यवहारांची, संस्थांची पेरणी जगभर झाली. आज जगातील प्रत्येक देशांत बँका, वित्तसंस्था, विमा कंपन्या, खाजगी, सार्वजनिक, संघटित उत्पादक कंपन्या, शेअरबाजार, कर्जरोखेव्यवस्था निर्माण झाल्या आहेत. सुरुवातीला पारंपरिक अर्थव्यवस्था, संस्था मोडीत निघत. नंतर काही काळ तेथे गोंधळ माजे. ह्या गोंधळाला शिस्तशीर व्यवस्थेचे स्वरूप देण्याची आवश्यकता भासत गेली. त्या गरजेतून शासनाचे कायदे केले गेले. शिखरसंस्था निर्माण करून विविध संस्थांवर कायद्याने बंधने आणली गेली. जे प्रयोग, कायदे यशस्वी झाले त्यांचे अनुकरण इतरत्र केले गेले. भारतामधील रिझर्व बँक ही अशीच ब्रिटिश आमदनीमध्ये घडवली गेली आहे. आता प्रत्येक देशात राष्ट्रीय शिखर बँका असून त्यांमार्फत देशाच्या अंतर्गत वित्तसंस्थांचे नियमन व नियंत्रण केले जाते.
दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वप्रथम जपानने अशा वित्तसंस्थांची निर्मिती केली. त्यानंतर पूर्वेकडील इतर लहान देशांनीही अनुकरण केले. १९८० च्या दशकात चीननेही भांडवली अर्थव्यवस्था स्वीकारून विविध प्रकारच्या वित्तसंस्था निर्माण करून पाश्चात्त्य वित्तव्यवहारांचे आणि संस्थांचे अनुकरण सुरू केले. चीनमधील भांडवलबाजार जगातील एक महत्त्वाचा शेअर बाजार झाला. पाश्चात्त्य देशांचे अनुकरण करताकरताच जपानचे आणि चीनचे जगाच्या अर्थव्यवस्थेतले महत्त्व वाढले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनचे जागतिक अव्वल स्थान अमेरिकेने पटकावले. एकविसाव्या शतकाच्या सुरवातीलाच ह्या स्थानाला चीनने मोठे आव्हान निर्माण केले आहे.
चारशे वर्षांपूर्वीच्या जगामध्ये पूर्व आणि पश्चिम गोलार्धातल्या प्रदेशांमध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनमानात फारसा फरक नव्हता. चीनची (आणि भारताचीही) संस्कृती युरोपपेक्षा अनेक बाबतीत प्रगत होती. मात्र १७०० ते १९५० ह्या अडीचशे वर्षांमध्ये जगातील ह्या दोन अर्धगोलांमधील लोकांच्या जीवनमानात फार मोठा फरक पडला. दरडोई उत्पन्नाची तुलना करता अमेरिकेतील लोक १८२० साली चीनच्या लोकांपेक्षा दुप्पट, १९१३ साली १३ पट तर १९५० साली ते २२ पट श्रीमंत झाले! हे होण्याची दोन मुख्य कारणे लेखकाने विशद केली आहेत. एक म्हणजे युरोपमधील लोकांना अमेरिका खंडाचा शोध लागला आणि युरोपमधील शेतकऱ्यांना तेथे शेती करायला जमीन उपलब्ध झाली. त्यामुळे युरोपमधील शेतजमिनीवरील लोकसंख्येचा दबाव आणि असह्य दाटी कमी झाली. चीनमध्ये मात्र या काळात शेतजमिनीवर असणारा लोकसंख्येचा दबाव वाढला, तर उत्पादन मात्र पुरेसे वाढले नाही. शिवाय साम्राज्यविस्तारामुळे युरोपमधील देशांचा मोठा आर्थिक लाभ झाला. सुरक्षेसाठी लढाया आणि जगण्यासाठी वस्तूंचा व्यापार ह्या दोन गरजांतून युरोपने तंत्रज्ञाने विकसित केली. युरोपमध्ये या काळात यंत्रतंत्रज्ञानात, शेती व्यवसायात, वस्तूंच्या उत्पादनव्यवस्थेत आणि वित्तव्यवस्थेत क्रीत झाली. अठराव्या शतकात समान पातळीवर असणाऱ्या पूर्व आणि पश्चिमेकडील देशांमधील आर्थिक दरी ह्या काळात वाढत गेली. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत युरोपमधील क्रांतिकारी व्यवस्था पूर्वेकडे फैलावल्या. त्यांना सुरुवातीला विरोधही झाला. युरोपमधील भांडवलाची पूर्वेकडील देशांमध्ये गुंतवणूक सुरू झाली. भांडवलबाजार त्या देशांमध्येही सुरू झाले.
विसाव्या शतकात मात्र ह्यात मोठे बदल झाले. शतकाच्या पूर्वार्धात युरोपमध्ये दोन महायुद्धे झाली आणि त्यांत तेथील संपत्तीची प्रचंड हानी झाली. युरोपीय देशांचे जागतिक महत्त्व कमी झाले आणि अमेरिकेला जागतिक महासत्तेचे स्थान मिळाले. युद्धांच्या पाठोपाठ पूर्वेकडील देशांमध्ये साम्राज्यशाहीचा अंत झाला अण्णि भांडवलशाहीचा विकास प्रत्येक देशांत स्वतंत्रपणे सुरू झाला. राज्य गमावली तरी काही प्रमाणात पाश्चात्त्य देशांतील भांडवल पूर्वेकडील देशांमध्ये गुंतविले जात होते. युद्धानंतर खाजगी पाश्चात्त्य भांडवलाची पूर्वेकडील देशांत मुक्तपणे गुंतवणूक करण्यावर बंधने आली. युद्धानंतरच्या पुनर्रचित जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ते केवळ शासनामार्फतच गुंतवले जाऊ लागले. त्यासाठी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ह्या दोन संस्था विकसित देशांनी निर्माण केल्या. हा एक प्रकारचा वित्तीय वसाहतवादच होता, कारण त्यावर मुख्यतः अमेरिकेचेच वर्चस्व असे आणि विकसनशील देशांना त्यामुळे या संस्थांबद्दल नेहमीच साशंकता असे. भांडवलशाहीला पर्याय म्हणून त्यावेळी रशियाचा दबदबाही वाढत होता. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विकसनशील देशांनी स्थानिक राजकीय-आर्थिक धोरणांना प्राधान्य देऊन वाटचाल सुरू केली. स्थानिक पातळीवर भांडवली, मिश्र वा समाजवादी अर्थव्यवस्थांचे प्रयोग सुरू झाले. तेव्हापासून नवस्वतंत्र, विकसनशील देशांमध्ये होणारी पाश्चात्त्य भांडवलाची गुंतवणूक ही जागतिक राजकारणाचा भाग झाली.
१९८० च्या दशकात पुन्हा बदलाचे वारे वाहू लागले. पूर्वेकडील सिंगापूर, थायलंड अशा काही लहान देशांनी पाश्चात्त्य वित्तव्यवस्थेमार्फत खाजगी भांडवलाला प्रवेश दिला. अनेक खाजगी हेज् फंड तेथे गुंतवणूक करू लागले. चीनमध्येही आर्थिक उदारीकरणाचे, परकीय भांडवल गुंतवणुकीला चालना देण्याचे प्रयत्न सुरू झाले. विकसित देशांचा पैसा तेथे गुंतवणुकीसाठी वळला. अमेरिकन भांडवलदारांनी तेथे मोठी गुंतवणूक सुरू केली व चीनच्या आर्थिक विकासाला बळ पुरविले. भांडवलाबरोबर तंत्रज्ञानही पुरविले. त्यामधून अमेरिकन कंपन्यांना आणि नागरिकांना रोजगार मिळाले. बघताबघता चीनच्या अर्थव्यवस्थेने, कम्युनिस्ट राज्यप्रणालीचा ढाचा न बदलता भांडवलशाहीच्या मार्गाने आर्थिक प्रगती साधण्याचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात आत्मसात केले. १९८० नंतर चीनचा आर्थिक विकासदर झपाट्याने वाढायला लागला आणि त्यातूनच जागतिक भू-राजकीय आणि आर्थिक समीकरणे बदलू लागली.
अमेरिका-चीन असे आर्थिक मैत्रीचे नाते सुरुवातीला निर्माण झाले. नंतर अमेरिकेच्या जागतिक आर्थिक स्थानाला चीनचे आह्वान निर्माण झाले. साम्राज्याकडून चिमेरिकाकडे (चीन अधिक अमेरिका) ह्या सहाव्या प्रकरणात ह्या दोन देशांच्या नात्याची चर्चा लेखकाने केली आहे. चीनने साध्य केलेला आर्थिक विकास आणि अमेरिकेवर आलेले मंदीचे संकट यांचे नातेसंबंधही जवळचे आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेच्या वातावरणात चीनने कारखानदारी आणि उत्पादनातून स्वस्त मालाच्या जोरावर अमेरिकेची बाजारपेठ काबीज केली. तीन दशकांपूर्वी लहानशा जपानने पाश्चात्त्यांचे अनुकरण करीत मोटार आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात अमेरिकेपुढे असेच आह्वान उभे केले होते. आता चीनसारख्या आकाराने आणि लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या देशाचे आह्वान त्याहूनही मोठे आहे. मोठी लोकसंख्या आणि मजुरीचे कमी दर ह्यांच्या जोडीनेच नावीन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती ह्यातून निर्माण झालेले हे आह्वान आता वित्तीय क्षेत्रामध्येही उभे राहिले आहे. चीनमधील लोक पैसे खर्च न करता साठवतात आणि अमेरिकेतील लोकांच्या उपभोगवादी जीवनशैलीला वस्तू पुरवितात ही ह्या आर्थिक नात्यामधील बाजू महत्त्वाची आहे. स्वस्त चिनी वस्तूंमुळे काही वर्षांमध्ये अमेरिकेत भाववाढ झाली नाही. परंतु चीनकडून आयात करताना अमेरिकेला पुरेशी निर्यात करता न आल्याने अमेरिकेच्या व्यापारातील तूट वाढत गेली. चीनमधील लोकांनी अमेरिकेच्या शेअरबाजारात गुंतवणूक सुरू केली. काही वर्षांनी चीन सावकार आणि अमेरिका कर्जदार अशी स्थिती निर्माण झाली. दोन देशांमधील व्यापारातील तूट वाढत असूनही अमेरिकेतील खाजगी वित्तकंपन्यांकडे भांडवल गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा होता. ह्या पैशाच्या गुंतवणुकीला अमेरिकेत फार संधी उरल्या नाहीत. कर्ज घेणारे कमी आणि देणारे जास्त ह्यामुळे बँकांचे व्याजदर घसरले. उपलब्ध पैसा गुंतवण्याचा मार्ग म्हणून अमेरिकन नागरिकांना उपभोगाला प्रोत्साहन देण्याचे धोरण बँकांनी राबविले. मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डे देऊन नागरिकांना अवास्तव खरेदीदार केले. त्यांना कर्जदार केले. पण तेही पुरेसे नव्हते.
२००० सालानंतर घरे विकत घेण्यासाठी अमेरिकेतील गरिबांना आणि सामान्य नागरिकांना नाना प्रलोभने दाखवून कर्ज देण्याची सुरुवात झाली. त्याच्याच परिणामी २००८ साली सब-प्राईमचे संकट अमेरिकेवर कोसळले. असंख्य लोकांची कर्जफेड एकाचवेळी थांबेल याची कोणालाच कल्पना आली नाही. जास्त नफ्याच्या अपेक्षेने जागतिक पातळीवरील अनेक देशांनी पेन्शन फंडांमधील पैसेही अमेरिकेतील बँकांमध्ये गुंतवले. बँका शेअर घ्यायलाही कर्जे देत. शेअरचे भाव सतत चढतेच राहतील अशीच भावना आणि अपेक्षा त्यामागे होती.
कर्जफेड करण्याची क्षमता नसल्यामुळे घरे आणि स्थावर मालमत्तांवर बँका कब्जा करू लागल्या. परंतु अशा मालमत्तांना गि-हाईक मिळेना. कर्जवसुलीच्या रकमेपेक्षाही कमी किंमतीत मालमत्ता विकण्याची वेळ बँकांवर आली. देवाणघेवाण करणाऱ्या असंख्य संस्थांचे जाळे आणि गुंतागुंतीचे व्यवहार असल्याने एक संस्था संकटात येताच अनेक संस्थांवर दिवाळे काढण्याची वेळ आली. अमेरिकेतील बँका संकटात आल्यावर त्याचे धक्के जगातील अनेक लोकांना बसू लागले. जगातील देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांत किती गुंतलेल्या आहेत ह्याचा अंदाज कोणालाच नव्हता. अमेरिकेवरील आर्थिक संकट गहिरे झाले आणि त्यातूनच मंदीची जोरदार लाट जगभर आली. बांधकाम आणि वित्तक्षेत्रातील असंख्य कंपन्यांचे दिवाळे निघाले. आणि त्यांना वाचविण्याची जबाबदारी तेथील शासनावर येऊन पडली. मुक्त बाजारपेठेची पूजा होत असलेल्या देशांतच बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याची वेळ प्रशासनावर आली. या सगळ्या घडामोडींमुळे अमेरिकेच्या आर्थिक स्थानाला जोरदार धक्का बसला असतानाच चिमेरिकेच्या दुसऱ्या टोकाला, चीनला जागतिक नेतृत्वाची संधी प्राप्त झाली. चारशे वर्षांत आर्थिक बदलांचे एक आवर्तन जगाने पूर्ण केले आहे! सी सॉप्रमाणे अमेरिका आणि चीनच्या अर्थव्यवस्थांचे स्थान बदलले आहे. पैसा झाला खोटा?
चार हजार वर्षांपूर्वी रुजविलेले पैशाचे बीज सावकाशपणे अंकुरले आणि ते रोप वाढत गेले. रोपाचा वृक्ष झाला, त्याचा वंशविस्तारही झाला असला तरी त्यावर अनेकदा वीज पडून संकटग्रस्त होण्याचे प्रसंगही आले आहेत. असंख्य अडचणी आणि अडथळे पार करीत मेसापोटेमियात सुरू झालेला पैशाचा प्रवास चिमेरिकापर्यंत येऊन थांबतो. मागे वळून बघत लेखकाने काही महत्त्वाच्या गोष्टी नोंदल्या आहेत. * ज्या देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये ह्या संस्था तयार झाल्या ते देश आज आघाडीवर आहेत.
वित्तसंस्थांच्या माध्यमातून उपलब्ध संपत्तीचे वाटप सरंजामदारी किंवा मध्यवर्ती केंद्रीभूत नियोजनापेक्षा अधिक सक्षमपणे होते.
पाश्चात्त्य देशांनी विकसित केलेल्या वित्तसंस्थांचे अनुकरण इतर देशांतही झाले. आणि या संस्थांचे एक जागतिक जाळेही तयार झाले आहे.
हा सारा खटाटोप माणसाने केला तो सुरक्षा मिळवायला. तरीही मानवाला सुरक्षिततेचा अनुभव येत नाही. जगातील काही लोकांना आर्थिक सुरक्षा कवच मिळाले असले तरी संपूर्ण मानवजात सुरक्षित झालेली नाही. याची तीन कारणे आहेत असे लेखकाला वाटते. १. भविष्याबद्दलची काळजी किंवा अनिश्चितता पैशामुळे कमी झालेली नाही. मात्र भविष्यातील अनपेक्षित संकटातून बाहेर पडण्यासाठी ह्या व्यवस्थेने मदत केली आहे. २. वित्तव्यवस्था स्वतःच स्थिर नाहीत. त्याचे कारण मानवाच्या स्वभावाशी आणि वर्तनाशी निगडित आहे. आपला आर्थिक स्वभाव आणि वृत्ती ही वित्तव्यवस्थेबरोबरच उत्क्रांत होणारी बाब आहे. ती व्यवस्था आणि मानवी स्वभाव दोषविरहित नाहीत. परिपूर्ण नाहीत. ३. निसर्गसृष्टी आणि मानवी अर्थसृष्टी यांचे जवळचे नाते असल्यामुळे आणि निसर्गात सतत बदल होत असल्यामुळे अर्थसृष्टीतही सातत्याने बदल होतात.
ह्या बदलांचे आकलन डार्विनप्रणीत उत्क्रांतीच्या काही तत्त्वांच्या मदतीने होऊ शकते. ह्या तीनही कारणांचा ऊहापोह लेखकाने शेवटच्या डिसेंट ऑफ मनी ह्या प्रकरणात केला आहे. मुक्त अर्थशास्त्राच्या पारंपरिक सिद्धान्तांमध्ये प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या हिताचे आर्थिक निर्णय घेते, त्यासाठी आवश्यक सर्व माहिती तिला असते आणि विवेकनिष्ठ पद्धतीने ती निर्णय घेते, असे गृहीत धरले जाते. परंतु वास्तवात तिचे स्वतःचे ज्ञान आणि समज अपुरेच असतात. त्यातच बऱ्यावाईट आर्थिक अनुभवांचे परिणाम निर्णयांवर होत असतात. दहा वाईट गोष्टी ऐकलेल्या असल्या तर या सर्व आपल्याबाबतीतही घडतील अशी माणसांची समजूत होते. प्रत्यक्षात एखादीच वाईट गोष्ट होण्याची शक्यता जास्त असते हे तो लक्षात घेऊ शकत नाही. माणसांचा हा स्वभाव त्याच्या बुद्धी-भावनांशी निगडित असतो. कळपाची वृत्तीही त्याला काही गोष्टी करायला भाग पाडते. बहुसंख्य लोक ज्या मार्गांनी जातात ते मार्ग सुरक्षित असतात असा सर्वसाधारण समज असतो. अनुभवांतून माणूस नेहमी आवश्यक किंवा उपयोगी धडे घेतो असेही नाही. जुन्या अनुभवांचे धडे वेगळ्या काळात आणि वेगळ्या परिस्थितीत लागू पडतात असेही नसते. जुगारात क्वचित जिंकण्याची आणि बहुतेक वेळा हरण्याची शक्यता असूनही त्या शक्यतेवर त्याचा जास्त विश्वास असतो. म्हणूनच लाखो लोक जुगार खेळत आर्थिक सट्ट्यांच्या धोकादायक व्यवहारात भाग घेत राहतात. हा मानवी मानसिकतेचा भाग असून ती सुरक्षा मिळवण्याची मर्यादाही ठरते.
अर्थसृष्टीचा विकास हा सामाजिक आणि नैसिर्गिक परिसरांत घडत असतो. हे दोन्ही सातत्याने बदलत असतात आणि म्हणूनच अर्थसृष्टीही सतत बदलत राहते. ह्या बदलांतून उत्पादन बदलते परंतु ते बदलाचे मूळ कारण नसते. लोकसंख्या, भांडवल, वित्तव्यवस्था ह्यांच्यामुळेही बदल घडत नाहीत. भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये बदलांची खरी ऊर्जा मानवी सर्जनशीलता ही असते. सर्जनशीलतेमुळे उत्पादन बदलते, नवीन तंत्रज्ञाने घडतात, वाहतूक साधने निर्माण होतात, नवनवीन प्रकारचे बाजार निर्माण होतात, नवनवीन संस्था निर्माण होतात. अशा प्रकारे भांडवली अर्थव्यवस्था स्वतःच्या रचनेमध्ये सातत्याने बदल घडवून आणते. बदलत्या पर्यावरणात तगून राहण्यासाठी सजीव स्वतःमध्ये सातत्याने बदल करीत असतात तशीच ही अर्थसृष्टीची उत्क्रांतिप्रक्रिया असते.
ही उत्क्रांतीची प्रक्रिया जुन्या रचना मोडीत काढण्याचेही काम करीत असते. जो बदलतो तो टिकतो हा उत्क्रांतीचा नियम असला तरी प्रत्येक बदल हा यशस्वी ठरतोच असे नाही. निसर्गाच्या उत्क्रांतिप्रक्रियेमध्ये अयशस्वी जीव नष्ट होण्याची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. अर्थसृष्टीमध्येही हे दिसून येते. असंख्य संस्था निर्माण होत असल्या तरी असंख्य संस्था नष्ट होत असतात. टिकाव धरू शकणाऱ्या संस्थांपेक्षा नष्ट होणाऱ्या संस्थांचे प्रमाण जास्त असते. गेल्या शतकाच्या सुरुवातीला आघाडीवर असलेल्या १०० कंपन्यांपैकी १९९५ सालापर्यंत २९ कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या, ४८ इतर कारणांनी बंद झाल्या, आणि केवळ १९ कंपन्यांना आघाडी यादीमधील स्थान टिकवून ठेवता आले. वित्तसंस्थांच्या बाबतीत बंद पडण्याचे प्रमाण त्याहूनही जास्त आहे. एकंदरीत बंद संस्थांची संख्या लाखांमध्ये असते. फार थोड्या संस्था दीर्घायुषी ठरतात. लहान उद्योग बंद पडण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच यशस्वी संस्था मोठे होण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अनेक अर्थतज्ज्ञांना मोठ्या महाकाय संस्था लहान संस्थांना गिळंकृत करून स्वतःची मक्तेदारी निर्माण करतील याची भीती वाटत असते. पण असे केंद्रीकरण म्हणजे मूळच्या खोडाला शाखा फुटण्याची किंवा वेगळ्या प्रकारच्या शाखेचे कलम होण्याची प्रक्रिया असते. ह्या दोन्ही प्रक्रिया अर्थसृष्टीमध्ये घडत असतात, तरी त्यामुळे सर्व लहान संस्था नष्ट होतात असे नाही. सजीव सृष्टीप्रमाणेच मोठ्या, मध्यम, लहान संस्था अर्थसृष्टीचे अवकाश व्यापून, सहनिवासी पद्धतीने एकत्र राहतात. उदाहरण द्यायचे तर कर्ज देणाऱ्या मोठ्या बँका असल्या तरी पतसंस्था, खाजगी, सहकारी बँका किंवा खाजगी सावकारी संपूर्ण नष्ट होत नाहीत. होणारही नाहीत.
निसर्गसृष्टीमधील उत्क्रांतितत्त्वे अर्थसृष्टीच्या काही अंगांतही प्रत्ययाला येत असली तरी काही बाबतीत मात्र या दोन व्यवस्थांमध्ये मूलभूत फरक दिसतात. या दोन व्यवस्था एकरूप नाहीत. महत्त्वाचा फरक म्हणजे सजीव सृष्टी सहेतुकपणे कोणी निर्माण केली आहे याचे पुरावे नाहीत. अर्थसृष्टीतील विविध संस्था, त्यांच्या जातीप्रजाती यांची निर्मिती मात्र मानवाच्या सहेतुक कृती आणि प्रयत्नांमधून घडलेली आहे. ह्या सहेतुक कृतींना मानवाच्या मर्यादा आहेत तसेच त्याची मर्यादा ओलांडून धडपडत विकसित होण्याची प्रवृत्तीही आहे. ह्या मानवी मर्यादा आणि वृत्तींच्या विविधतेमधून अर्थसृष्टीत वेळोवेळी संकटे उभी राहतात. वादळे येतात. आजचे आर्थिक संकटही ह्या संकटमालिकांच्या परंपरेचा एक भाग आहे.
सध्याच्या आर्थिक संकटामुळे जगात काय घडू शकेल ह्याची चिंता जगाला भेडसावते आहे. हजारो-लाखो लोकांचे पैसे ह्या मंदीच्या तडाख्यामुळे नष्ट झाले आहेत. अनेक कफल्लक झाले, त्यांची स्वप्ने धुळीस मिळाली. अशा वेळी काय घडेल ह्याचे काही अंदाज लेखकाने वर्तविले आहेत. शक्तिशाली (आकाराने मोठ्या संस्था शक्तिशाली असतात असे नाही) आर्थिक संस्था कमजोर संस्थांना ताब्यात घेतील. कर्जरोख्यांच्या गुंतवणुकीला विमासंरक्षण देणाऱ्या कंपन्या अंतर्धान पावतील. काही हेज् फंड अधिक जोमदार होतील आणि त्याचबरोबर नवनवीन प्रकारच्या वित्तसंस्था निर्माण होतील. आगीमध्ये नष्ट झालेले जंगल पुन्हा नव्या जोमाने, नव्या स्वरूपात बहरते, हा निसर्गक्रम अर्थसृष्टीच्याही बाबतीत दिसून येईल.
एक महत्त्वाचा फरक ह्या दोन सृष्टींमध्ये आहे. निसर्गामध्ये नियन्ता नाही. तेथे होणारे बदल सर्वस्वी स्वैर स्वरूपाचे असतात. अर्थसृष्टीमध्ये मात्र देशोदेशींच्या शासनांना नियन्त्याची भूमिका बजावावी लागते. नियम घडवावे लागतात. अशा कृती नेहमीच यशस्वी ठरतात असे नाही, कारण राज्यकर्त्यांना अर्थसृष्टीचे ज्ञान असतेच असे नाही. अज्ञ राज्यकर्त्यांच्या निर्णयांमुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते. राज्यशासनांना अर्थसृष्टीत स्थैर्य हवे असते. पण मुळातच अर्थसृष्टी सातत्याने बदलत असते. त्यामुळे स्थैर्य मिळविण्याची धडपड अनेकदा व्यर्थ ठरते. मानवाने घडवलेल्या संस्थांचे हेतू वाईट नसतात पण काही कृतींचे परिणाम घातक ठरतात. अशा सामान्य माणसांवर विपरीत परिणाम करणाऱ्या संस्थांना शिक्षा करणे हे शासनाचे कर्तव्य असते.
अर्थसृष्टीमधील प्रत्येक संकट हे काही संस्थांचा बळी घेतच पुढे जाते. निसर्गात अशक्त जीव लगोलग नष्ट होतात; अर्थसृष्टीमध्ये मात्र अशक्त जीव जगविण्याचे प्रयत्न केले जातात. प्रत्येक संकटांनंतर नवीन नियम घडतात. संकटात सापडून भरकटलेली अर्थव्यवस्था स्थिरावण्यासाठी ते आवश्यक ठरतात. तरीही काही संस्था नष्ट होणार हे मान्य करणे अर्थसृष्टीच्या आरोग्यासाठी आवश्यक ठरते. आज अर्थसृष्टीमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेकांना पैसा मोठा कसा झाला हे माहीत नसते, तेव्हा सामान्यांना ते माहीत असणे संभवत नाही. त्यामुळेच समाजामध्ये पैसा झाला खोटा असा समज मोठ्या प्रमाणात दिसतो. अर्थसृष्टीचा इतिहास, पैशाची निर्मिती व प्रवास समजल्याशिवाय त्याचे स्वरूप समजणे शक्य नाही. पैशाचे सत्य स्वरूप दाखविणे हा ह्या पुस्तकाच्या लेखकाचा हेतू आहे आणि तो मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे.
तज्ज्ञांप्रमाणेच सामान्य माणसांना हा इतिहास माहीत असेल तर भीती वाटणार नाही. पैशाचे अर्थसृष्टीत असलेले महत्त्व का आणि किती आहे हे त्यांना कळेल. पैसा हेच सर्वस्व नाही हेही कळेल. अनेक संस्थांचा बनलेला आधुनिक वित्तबाजार हा केवळ आरशाचे काम करतो. आपण मानवजात म्हणून स्वतःची आणि संपत्तीच्या इतर साधनांची (उदाहरणार्थ नैसर्गिक साधनांची, मानवी संबंधांची, प्रज्ञेची, सामाजिक संबंधांची) किंमत काय करतो, त्यांना किती महत्त्वाचे मानतो, याचे चित्र हा आरसा आपल्याला दाखवतो. ह्या आरशामध्ये आपल्यापाशी असणाऱ्या जगातील सर्व प्रकारच्या संपत्तीचेही प्रतिबिंब पडत असते. जेव्हा आपली कुरूपता आपण ह्या आरशात बघतो तेव्हा तो दोष आरशाचा नसतो तर आपला म्हणजे मानवजातीचा असतो. आपले सौंदर्य आणि सद्गुण दाखविण्याचे कामही हाच आरसा करीत असतो. सत्यस्वरूप दाखविणे ह्या आरशाचे काम असते.
८, संकेत अपार्टमेंटस, उदयनगर, पांचपाखाडी, ठाणे – ४०० ६०४.