एखाद्या राजवटीत जाणता अजाणता झालेल्या जुलमांसाठी व अन्यायांसाठी त्या राजवटीमागच्या विचारधारेला जबाबदार धरणे योग्य की अयोग्य? बरे, सर्वच राजवटी, त्यांमागच्या विचारधारा, वगैरेंची आर्थिक अंगे महत्त्वाची असतात. कौटिल्याच्या राज्य कसे चालवावे याबाबतच्या ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र असे आहे. अॅडम स्मिथच्या पुस्तकाचे नाव द वेल्थ ऑफ नेशन्स आहे. मार्क्सच्या पुस्तकाचे नाव भांडवल असे आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या नावात पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे. सगळीकडे जाणवते हे, की राजवटी आणि त्यांच्या अर्थव्यवहाराच्या नीती, यांना सुटे करणे शक्य नाही.
पण राजवटींच्या आर्थिक-राजकीय विचारधारा आणि राजवटींमधले अन्याय यांची सांगड घालताना माणसे भेदभाव करतात. जर विचारधारा आवडती असेल, तर अन्यायांचा दोष व्यक्तींवर किंवा परिस्थितीवर टाकला जातो. नावडत्या विचारधारांबद्दल मात्र त्या जुलूम आणि अन्याय याशिवाय घडू शकतच नाहीत, असे सांगितले जाते. काही उदाहरणे पाहा क) गोध्राच्या अमानुष घटनेमुळे गुजरातेतले हिंदू बिथरले. हिंदुत्व मात्र सहनशील व सेक्युलरच असते. ख) इस्लाम खतरे में है, विशेषत: भारतात. ग) लाखो लोकांना सायबेरियन छळछावण्यांमध्ये डांबणे, इतर लाखोंची उपासमार होऊ देणे, हे सारे क्रूरकर्मा स्तालिनचे प्रताप. साम्यवाद मात्र अन्याय्य असूच शकत नाही. घ) जागतिकीकरण वगैरे सगळी धूळफेक आहे, अमेरिका-युरोप यांनी इतर जगाला लुटण्यासाठी घडवलेली ती यंत्रणा आहे. इ.इ.
जुलूम, अन्याय यांमध्ये नेहेमीच जाणीवपूर्वक केलेले दमन आणि धोरणांच्या परिणामांमुळे काही समाजघटकांना होणारा त्रास, असा फरक करता येतो. लेखाच्या सुरुवातीच्या प्रश्नातील ‘जाणता-अजाणता’ हा शब्दप्रयोग ह्या फरकाबद्दलच आहे. उघड दमनकारी कृतींचा दोष व्यक्तींवर टाकता येतो. धोरणांचे परिणाम अन्याय्य असले, तर मात्र ‘विचारधारा दोषी की ती वापरणाऱ्या व्यक्ती दोषी?’ हा प्रश्न पडतो. सध्या गाजत असलेले नाओमी क्लाइनचे द शॉक डॉक्ट्रिन (The Shock Doctrine, Naomi Klein, Penguin, २००७) हे असा प्रश्न मांडणारे पुस्तक आहे.
क्लाइनच्या मांडणीचा गाभा असा मुक्त बाजारपेठेच्या पुरस्कर्त्यांमध्ये एक कर्मठ मूलतत्त्ववादी पंथ आहे. खाजगी कॉर्पोरेशन्सना पूर्ण स्वातंत्र्य, अर्थव्यवहारावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसणे आणि सरकारने लोकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी काहीही न करणे; ही या पंथाला मान्य असलेली प्रमुख धोरणे आहेत. ती अंमलात आणण्याने सर्व कामगारांना आपोआप जीवनावश्यक वेतन मिळेल. कॉर्पोरेशन्सना नवनवे तंत्रज्ञान शोधून वस्तूंचे अधिकाधिक स्वस्त उत्पादन करता येण्याइतपत नफा मिळेल. भाववाढ होणार नाही. बेकारी नाहीशी होईल. बाजारपेठेत मागणी व पुरवठा आपोआप समतोल साधतील. कोणताही सरकारी हस्तक्षेप ही आदर्श स्थिती घडण्यात विकृती आणतो, त्यामुळे तसा हस्तक्षेप नसणे ही आदर्श अर्थव्यवस्थेची अत्यावश्यक पूर्वअट (very necessary precondition) आहे. इथे अॅडमस्मिथला अपेक्षित ‘अदृश्य हात’ मात्र नाही. स्मिथला सर्व उत्पादक व उपभोक्ते ‘लहान’ असणे अपेक्षित होते. कोणताही उत्पादक किंवा उपभोक्ता किंमतीवर परिणाम घडवू शकण्याइतका सबळ नको, असे त्याचे मत होते. आजची भांडवलवादी मंडळी यावरही आग्रह धरत नाहीत. त्यांचा ‘अदृश्य हात’ कोणत्याही परिस्थितीत काम करतोच.
क्लाइन या मताला शिकागो पंथ (Chicago School) म्हणते, कारण ते मत जोमाने मांडणारे, शिकवणारे अर्थशास्त्री शिकागो विद्यापीठातून सर्वाधिक प्रमाणात येतात. इतर लोक मात्र या मताला नव-स्थितिवादी (neo-conservative), नव-उदारमतवादी (neo-liberal), स्वातंत्र्यवादी $(libertarian) वगैरे नावांनी ओळखतात. या सर्व वर्णनांमधील भेद सूक्ष्मदर्शकानेच ओळखू येतात! क्लाईन या पंथाच्या सदस्यांना शिकागो बॉईज म्हणते. ती मिल्टन फ्रीडमन (Milton Friedman, १९१२-२००६, १९७६ च्या अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी) याला या पंथाचा सर्वांत प्रभावशाली गुरू मानते.
इथपर्यंत क्लाइनची मांडणी विवाद्य नाही. पण ही कर्मठ मुक्त बाजारपेठ वास्तवात कुठेही दिसत नाही. ती आदर्शापासून वास्तवात आणण्यासाठी काय (किंवा ‘काय काय’!) केले जाते, याबद्दलचे क्लाइनचे विश्लेषण मात्र वादग्रस्त आहे. अर्थशास्त्राचे ‘निसर्गनियम’ क्लाइन सांगते की शिकागो पंथाची मांडणी फार काळ तळघरातल्या प्रयोगशाळांमधल्या गणिती निष्कर्षासारखी होती. तिचा वास्तवाशी संबंध नव्हता. पण यामुळे शिकागो बॉईजच्या आपल्या पंथाच्या मांडणीवरच्या श्रद्धेला यत्किंचितही बाधा आली नाही. इथे वाट वाकडी करून अर्थशास्त्राच्या ‘वैज्ञानिक’ असण्याचा मुद्दा तपासू. औद्योगिक क्रांतीचा पहिला भाष्यकार आर्नल्ड टॉयन्बी १८५४ साली सांगताना दिसतो की अर्थशास्त्राचे नियम मोडणे भौतिकीचे नियम मोडण्याइतकेच अशक्य आहे. भौतिकीचे नियम हे निसर्गात निरपवादपणे दिसणाऱ्या परस्परसंबंधांचे (correlations) वर्णन असते. त्या दाचे नियम अर्थशास्त्रातही आहेत, हे घोर शंकास्पद आहे. सर्व अर्थशास्त्रीय नियम हे ते नियम सांगणाऱ्याच्या विचारधारेनुसार बदलतात. पण अर्थशास्त्रज्ञांना हे मान्य करणे बरेचदा अवघड जाते. १९३२ साली शिकागो पंथाचा एक सुरुवातीचा पाईक सांगताना दिसतो की अर्थशास्त्रीय नियम ‘विवाद्य हायपोथीसीज’ नसून नैसर्गिक बलांसारखे असतात. मागणी आणि पुरवठा, चलनवाढ आणि बेकारीचे प्रमाण, ही नैसर्गिक बलांसारख्या यंत्रणेने एकमेकांशी जोडलेली असतात. शिकागो बॉईजच्या श्रद्धेविषयी बोलताना हार्वर्डचा एक समाजशास्त्रज्ञ म्हणाला, की “त्यांच्या मते अर्थव्यवस्था स्वर्गीय कळसूत्रांसारख्या (celestial clockworks) असतात.’ पण कॉर्पोरेशन्सना मुक्तता, अगदी समाजघटकांच्या सुरक्षिततेसाठीही सरकारने हस्तक्षेप न करणे, ही पथ्ये पाळायला हवीत – नाहीतर कळसूत्रांमध्ये धूळ जाऊन ती बिघडतात.
आता हे खरे नाही. इतिहासात अनेकदा तज्ज्ञ अर्थशास्त्रज्ञांना राजवटींनी पूर्ण स्वातंत्र्य देऊन अर्थव्यवस्था सुधारायला सांगितले आहे. हिट्लरच्या काळात ह्याल्मार शाख्ट, पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश सरकारला सल्ला देणारा जॉन मेनार्ड केन्स, आज भारतात डॉ. मनमोहनसिंग, ही ठळक उदाहरणे आहेत. यांपैकी कोणीही शून्य बेकारी-शून्य चलनवाढ अशी स्थिती आणू शकला नाही. यांपैकी कोणीही कर्मठ मुक्त बाजारपेठवादी नव्हता/नाही, हे खरे. पण या तिघांनीही मर्यादित उद्दिष्टे ठेवत मर्यादित यश प्राप्त केले, हेही खरे.
पण अर्थशास्त्रज्ञांचे यशापयश नेहेमीच त्यांच्या विचारधारा, त्यांची उद्दिष्टे, यांच्या संदर्भात मोजावे लागते – ‘अर्थशास्त्रीय निसर्गनियम’ मानून तसे करता येत नाही – कारण तसे ‘नियम’ अस्तित्वात नाहीत. सर्व उपलब्ध नियम इतर सर्व बाबी तशाच ठेवल्यास अमुक कृतीचे तमुक परिणाम होण्याकडे कल असतो, या प्रकारचे असतात. आणि तसे नियम मांडायला अनुभवांतून कमावलेले आधार पुरवावे लागतात. तसे आधार शिकागो पंथ देत नाही, अशी टीका जोसेफ स्टिग्लित्झ (Joseph Stiglitz जन्म १९४३, हयात. २००१ सालच्या अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. जागतिक बँकेचा माजी उपाध्यक्ष. जागतिकीकरणाचा अभ्यासक व टीकाकार.) आपल्या क्लाईनच्या पुस्तकावरील लेखात करतो (ब्लीकॉनॉमिक्स, द न्यूयॉर्क टाईम्स, ३० सप्टें. २००७). तो म्हणतो, ‘(शिकागो पंथी) धोरणांविरुद्धची ‘केस’ क्लाइन मांडते त्यापेक्षाही सबळ आहे. ती प्रतिमाने कधीही सज्जड अनुभवजन्य व तात्त्विक पायावर रचलेली नव्हती. त्या धोरणांच्या अंमलबजावणीचा रेटा सुरू असतानाच अकादमीय अर्थशास्त्रज्ञ बाजारपेठांच्या मर्यादा दाखवून देत होते…..”
पण अशी ही ‘अपरीक्षित (untested) तत्त्वे’ लागू करण्याची शिकागोपंथीयांना घाई झाली होती. त्यांना अपेक्षित मुक्त बाजारपेठ तर कोठेच अस्तित्वात नव्हती. तशी बाजारपेठ घडवण्यासाठी कोठेतरी अस्तित्वातली अर्थव्यवस्था त्यागून त्या कोऱ्या पाटीवर शिकागो धोरणे लागू करण्याची संधी शिकागोपंथीयांना हवी होती. ही गरज, निकड म्हणा, क्लाइन पुस्तकाच्या प्रस्तावनेतच नोंदते, ब्लँक इज ब्यूटिफुल या नावाने (उपशीर्षक: जग पुसण्याची व नवनिर्माणाची तीन दशके). तीन जगे
पहिल्या महायुद्धापर्यंत जगातले सर्व स्वतंत्र देश भांडवलवादी होते. यांपैकी काही देश इतर देशांवर साम्राज्ये बेतून श्रीमंतही झाले होते. आपापल्या प्रजांना अन्न, पाणी, निवारे, सुरक्षा, आरोग्य, इत्यादी सोई ते पुरवत असत. असे करणे ‘शुद्ध’ भांडवलवादी नव्हते. काही जण अशा शासकीय सोईंना नागर समाजवाद (Municipal Socialism) म्हणतात. हे एक समाजवादी अंग सोडले तर इतर अर्थव्यवस्था मात्र भांडवलवादी असत. परतंत्र देश या भांडवलवादाची वाईट अंगे सोसत आपल्या अर्थव्यवस्था इतरांच्या दावणीला बांधले जाणेच अनुभवत असत.
पहिल्या महायुद्धाच्या काळातच जगातला पहिला साम्यवादी देश जन्मला ट्ट सोविएत रशिया. भांडवली देश मात्र पहिल्या महायुद्धानंतर दहाएक वर्षांतच मंदीत सापडले. १९२९ नंतर उत्पादन जास्त, लोकांची क्रयशक्ती कमी, अशी स्थिती घडून कंपन्यांचे नफे व कामगारांची वेतने घसरू लागली. बेकारीचे प्रमाण वाढले. यावर उपाय सुचवला जॉन मेनार्ड केन्स (ग. च. घशूपशी, १८८३-१९४६) ह्याने. शासनाने ‘कल्याणकारी’ कामांवर खर्च करून अर्थव्यवस्थेला चालना देणे, हा केन्सीय विचारांचा गाभा. शिकागोपंथी मुक्त बाजारपेठांच्या थेट विरोधातले हे मत. अमेरिकेत कॅलिन डी. रुजव्हेल्टने केन्सीय धोरणे वापरायला सुरुवात केली. अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. ही धोरणे अंमलात येऊ लागल्यानंतर लवकरच दुसरे महायुद्ध सुरू झाले. मंदी हटली, पण ती केन्सीय धोरणांमुळे की युद्धामुळे, हे नेहेमीच विवाद्य राहिले.
तिकडे सोव्हिएत रशियाचे प्रगतिपुस्तकही स्पष्टपणे चांगले नव्हते. तीसेक वर्षांतच एक मागास देश युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावून गेला. जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता फार वाढली नाही, पण वस्तूंचे वितरण मात्र बरेच न्याय्य झाले. विरोधकांचे दमन मात्र झारच्या काळातल्यापेक्षा वाढले.
दुसऱ्या महायुद्धानंतर तोवर पारतंत्र्यात असलेले अनेक देश स्वतंत्र होऊ लागले. यांपैकी चीन, क्यूबा वगैरे साम्यवादी झाले, तर इतर बहुतेक देश भांडवलवादी झाले. या देशांपाशी सुबत्ता नव्हती. अनेक वर्षे पारतंत्र्यात असल्यामुळे त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षाही नव्हती. पायाभूत सोईही नव्हत्या. या साऱ्या घटकांमुळे नवस्वतंत्र देशांची सरकारे सोई घडवण्यावर व सामाजिक सुरक्षेवर बराच खर्च करत. यामुळे या देशांमधील भांडवलवाद बराचसा केन्सीय होता. शिकागो पंथाच्या मते तो विकृत होता.
अशा त-हेने गेल्या शतकाच्या तिसऱ्या चतकोरात जग तीन भागांत विभागलेले होते. अमेरिका, युरोप, जपान, कॅनडासारख्या ‘गोऱ्या’ वसाहती, हे सारे होते पहिले जग (First World); रशिया, चीन वगैरे दुसरे जग (Second World); नवस्वतंत्र गरीब देश हे तिसरे जग (Third World). यांपैकी पहिले व तिसरे जग भांडवलवादाच्या कमीजास्त केन्सीय आवृत्त्या वापरत होते, तर दुसरे जग साम्यवादी होते.
क्लाइन नोंदते की शिकागोपंथाला साम्यवाद हा खरा शत्रू वाटत नसे, तर ते स्थान केन्सीय विचारांना दिले जात असे. पंथभेद नेहेमीच थेट धर्मभेदांपेक्षा तीव्रतेने ठसवले जातात, आणि पक्षांतर्गत हेवेदावे नेहेमीच विरोधकांशी असलेल्या शत्रुत्वापेक्षा तीव्र असतात ! पहिले ‘नाइन-इलेव्हन’
शिकागो पंथ अमेरिकेबाहेर पसरवण्याचे प्रयत्न सुरू होते. यात फोर्ड फाउंडेशन ची मदत होती. तिसऱ्या जगातील विद्यार्थ्यांना अमेरिकेत आणून शिकवायचे, तिसऱ्या जगातील विद्यापीठांमध्ये ‘सहकारी’ अर्थशास्त्रविभाग उभारायचे, असे वेगवेगळे प्रयत्न सुरू होते. हाच प्रकार साम्यवादी रशियातील पॅट्रिस लुमुम्बा विद्यापीठ ही करत असे, पण त्याला अमेरिकेची झळाळी नव्हती. फोर्ड फाउंडेशनच्या शिक्षणविभागाचा प्रमुख इंडोनेशियात पाठवलेल्या (शिकागोपंथी) बर्कली येथील विद्यार्थ्यांबद्दल तर उघडपणे म्हणाला, “सुकार्नो गेल्यानंतर इंडोनेशियाला नेतृत्व पुरवण्यासाठी आपण लोकांना प्रशिक्षित करत आहोत.’ असे म्हणण्याने इंडोनेशियाच्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण होते, असे अमेरिकनांना वाटत नव्हते, हे लक्षणीय आहे.
१९६५ मध्ये जनरल सुहार्तोने लष्करी क्रांती करून सुकार्नोला पदच्युत केले. यात सीआयए या अमेरिकन हेरखात्याचा हात होता. क्रांतीनंतर बर्कली प्रशिक्षितांनी अर्थव्यवस्था घडवायला घेतली, व लवकरच बर्कली माफिया हे नाम कमावले! स्टीफन किंझर (Stephen Kinzer) या न्यूयॉर्क टाइम्स च्या माजी वार्ताहराने २००६ साली लिहिलेल्या ओव्हरथ्रो (Overthrow) या पुस्तकाच्या आधाराने क्लाइन अमेरिकाप्रणीत राज्यक्रांत्यांचे घटनाक्रम नोंदते.
सुरुवात अशी होते ड्ड एखाद्या अमेरिकन कॉर्पोरेशनला आपल्याला स्थानिक सरकार छळू पाहते असे वाटू लागते. कधी ते सरकार करांची आकारणी काटेकोरपणे करू पाहते, तर कधी कामगार कायदे कठोरपणे लागू करते. सर्वांत भीतिदायक क्रिया म्हणजे राष्ट्रीयीकरणाचा बडगा उगारणे.
तर परदेशी सरकार आपल्याला त्रास देत आहे अशी भावना झालेल्या कॉर्पोरेशन्स अमेरिकन सरकारातल्या स्नेह्यासोबत्यांकडे तक्रार करतात. अमेरिकन कॉर्पोरेशन्सना त्रास देणारे सरकार अर्थातच अमेरिकाविरोधी, हुकूमशाही आणि परकी सत्तांचे हस्तक, ठरवले जाते. आर्थिक समस्या भू-धोरणात्मक (Geo-strategic) केली जाते. अमेरिकन परराष्ट्रधोरण मूठभरांच्या मदतीला धाव घेते. किंझर नोंदतो की अनेक अमेरिकन राज्यकर्त्यांना अमेरिकन कॉर्पोरेशन्सचे हित आणि अमेरिका या देशाचे हित या बाबी एकरूप वाटतात. या संबंधात एन्रॉन प्रकल्पाला असणारा विरोध टिपेला पोचला असतानाची एक घटना अठवते. एक अमेरिकन प्रवक्ता म्हणाला होता, “भारत-अमेरिका संबंधांच्या सुधारात एकच पाच अक्षरी अडथळा आहे – एपीप.”!
जर मामला गंभीर असला तर सीआयए व इतर अमेरिकन विभाग संबंधित परकी सरकारांवर दबाव आणतात. परिणाम न झाल्यास त्या देशांतील असंतुष्टांना हाताशी धरून सरकारे उलथवली जातात. किंझरने १८९३ मधील हवाईचे सरकार उलथवण्यापासून २००३ मधील ‘सद्दाम हटाओ’ मोहिमेपर्यंतच्या अनेक घटना तपासून त्याची मांडणी केली आहे, हे लक्षात घ्यावे. या प्रक्रियेचे अभिजात उदाहरण दिसले चिले (Chile) या दक्षिण अमेरिकन देशात. हा देश प्रामुख्याने केन्सीय धोरणे वापरत होता ड काही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींचे नियंत्रण, काही कल्याणकारी प्रकल्प हाती घेणे, इत्यादी. १९७० साली साल्वादोर आयेंदे (Salvador Allende) निवडणुकीतून सत्तेवर आला. त्याने आर्थिक धोरण आणिक थोडे लोकधार्जिणे केले. सरकारी खर्च वाढवणे नेहेमीच महागाईला जन्म देते, असे अनुभवजन्य तत्त्व आहे. तर या महागाईला वेसण घालण्यासाठी आयेंदे सरकार तांबेउद्योगाच्या राष्ट्रीयीकरणावर विचार करू लागले. चिलेत जगातील जवळपास पाऊण भाग तांब्याचा साठा आहे, व त्याचे खनिकर्म व शुद्धीकरण दोन मोठ्या अमेरिकन कॉर्पोरेशन्स करतात. गुंतवणुकीवर सुमारे बारा टक्के नफा दरवर्षी अमेरिकेत पाठवला जातो, स्थानिक नफेही वेगळे आणि तांब्यासारख्या महत्त्वाच्या धातूचा अमेरिकेला पुरवठा होत राहणेही वेगळे.
पण चिलेविषयी तक्रार केली ती मात्र खढढ (इंटरनॅशनल टेलेफोन्स अँड टेलेग्रॅम्स) या कॉर्पोरेशनने. ११ सप्टेंबर १९७३ पर्यंत सीआयएच्या आर्थिक व सामरिक पाठबळावर चिलेतले लष्कर राज्यक्रांती घडवायला सुसज्ज झाले. त्या ‘नाईन-इलेव्हन’ला रणगाड्यांनी चिलेच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रासादाला वेढा घातला आणि आयेंदेला पदच्युत करून एक लष्करी समिती उर्फ ‘हूंटा’ (र्गीपीर, ‘हंटा’ ; ‘जंटा’ नव्हे ड्र ‘जनता’ तर नक्कीच नव्हे!) राज्यावर आली.
या क्रांतीत शिकागोपंथाचा सहभाग होता. १९५३ नंतर कधीतरी चिले विद्यापीठाला शिकागो विद्यापीठातर्फे सहकार्याचा प्रस्ताव दिला गेला. पण चिलेच नव्हे, तर बहुतांश दक्षिण अमेरिका लोकशाही समाजवादी (Social Demoratic) अर्थशास्त्रज्ञांच्या प्रभावाखाली होती, व्यवहारात केन्सीय. पण चिलेतले कॅथलिक विद्यापीठ १९५६ साली सहकार्याला राजी झाले. शिकागो विद्यापीठाचा प्रवक्ता म्हणाला, “आम्ही इथे स्पर्धा करायला आलो आहोत, स्थानिक अर्थतज्ज्ञांना मदत करायला नाही.” पण नंतरची सतराएक वर्षे शिकागो बॉईज चिलेत प्रभाव दाखवू शकले नाहीत. लवकरच हूंटाचा (लष्करी समितीचा) ताबा जनरल ऑगूस्तो पिनोशेने (Augusto Pinochet) घेतला. आधी स्पर्धक सेनाधिकाऱ्यांना संपवले गेले. नंतर आयेंदेच्या समर्थकांची धरपकड झाली. सौम्यसेही ‘डावेपण’ अत्यंत आक्षेपार्ह मानले जाऊ लागले. कामगार नेते, कर्मठ नसलेले विचारवंत, साऱ्यांना तुरुंगवास, यातना, छळ, हत्या, अशा दमनाला सामोरे जावे लागले. आणि हो, १२ सप्टेंबर १९७३ ला, ‘नाइन-इलेव्हन’च्या दुसऱ्याच दिवशी नवी आर्थिक योजना पिनोशेपुढे सादर केली गेली.
क्लाइनच्या पुस्तकाचे एक तपशीलवार परीक्षण आहे जोहॅन नॉर्बर्गचे द क्लाइन डॉक्ट्रिनः द राइज ऑफ डिझास्टर पॉलेमिक्स (कॅटो इन्स्टिट्यूट १४ मे २००८). लेखक स्वतः शिकागो बॉय आहे आणि कॅटो इन्स्टिट्यूट (Cato Institute) हा शिकागोपंथी ‘थिंक टँक’ आहे. नॉर्बर्ग क्लाइनने चिलेतील घटनाक्रम ‘कुस्करून’ सोईस्कर केल्याचे सांगतो. तिकडे क्लाइनही आपल्या सर्व विधानांना आधार देणाऱ्या टीपा पुरवते. एकूण चित्र असे दिसते की पिनोशे राज्यावर येताच शिकागोपंथाचा प्रभाव वाढू लागला, पण यात फ्रीडमनचा सहभाग मात्र असलाच तर मार्च १९७५ नंतर आहे! क्लाइन आंद्रे गुंडर फ्रैंक (अपवीश पवशी क्रीरपज्ञ) या मूळच्या जर्मन अर्थशास्त्रज्ञाचे बरेच संदर्भ देते. गुंडर फ्रँक १९५०-६० या दशकात फ्रीडमनचा विद्यार्थी होता, पण तो शिकागो बॉय न होता शासकीय हस्तक्षेपातून विकास साधावा, या मताचा झाला. १९७६ साली त्याने चिलेच्या आर्थिक दुरवस्थेचे वर्णन करणारे एक संतप्त जाहीर पत्र फ्रीडमनला व त्याचा समविचारी हार्बेजर यांना लिहिले. त्याचा मथळाच चिलेतील अर्थशास्त्रीय वंशविच्छेद (Economic Genocide in Chile) असा आहे. किमान वेतनाचा पाऊण भाग फक्त पावावर (लीशरव) खर्च होतो, येथून सुरुवात करून तो चिलेतील शिकागोपंथी धोरणांचे वाभाडे काढतो. गंमत म्हणजे, नॉर्बर्ग याची दखलही घेत नाही!
क्लाइनचे पुस्तक पॉलेमिकल, वाग्युद्धासारखे आहे, यात शंका नाही. ती शोध-पत्रकार आहे. अर्थशास्त्रज्ञ नाही, हे भान जोसेफ स्टिग्लित्झच्या परीक्षणात राखले आहे. नॉर्बर्ग मात्र वाग्युद्धवत् असणे, हा पुस्तकाचा मोठा दोष व क्लाइनचा मोठा गुन्हा मानतो. तो स्वतः मात्र क्लाइनचे घटनांचे आकलन चुकीचे आहे असे सांगताना तिने उद्धृत केलेल्या तथ्यांवर प्रश्न मांडत नाही!
अखेर पिनोशेला देश सोडून पळावे लागले, व इंग्लंडात आश्रय घ्यावा लागला. वंशविच्छेदाच्या आरोपांच्या सावटाखालीच २००७ साली तो वारला. त्याच्या सतरा वर्षांच्या कारकीर्दीत बेकारी ३०% व महागाई ३७५% (वार्षिक) या पातळ्यांना स्पर्श करून गेल्या. आयेंदेने राष्ट्रीयीकृत केलेला एक तांबे उद्योग (Codeld) पिनोशेने कधीच खाजगी केला नाही -कारण काही काळ चिले सरकारचे ८५% उत्पन्न त्या एका उद्योगातून मिळत होते!
कर्मठपणे शिकागोपंथाच्या सांगण्याप्रमाणे वागूनही चिलेत मूठभरच लोक अतिश्रीमंत झाले, तर बहुसंख्य जनता कंगाल झाली. अशी ही पहिल्या नाइन-इलेव्हनची कहाणी आहे – वर्ल्ड ट्रेड सेंटर व पेंटॅगॉनवरील दहशतवादी हल्ल्याच्या अठ्ठावीस वर्षे आधीची. इतरत्र
शिकागोपंथाचे हस्तक्षेप कुठेकुठे, कसेकसे झाले याची तपशीलवार माहिती क्लाइन देते. आर्जेंटिना, ब्राझील, पाराग्वे, बोलिव्हिया, ही तिसऱ्या जगातील राष्ट्र कमीजास्त फरकाने, आगेमागे चिले-इंडोनिशिया मार्गाने गेली; यात आश्चर्य नाही. पण क्लाइन पोलंड, खुद्द रशिया (विघटनानंतर), चीन, हे देश भांडवलवादी कसे झाले तेही सांगते. तीन्ही ठिकाणी अमेरिकन कॉर्पोरेशन्स, अमेरिकनांशी भागीदारी करणारे स्थानिक उद्योजक, अशांनी ‘नवी घडी-नवा राज’ सत्ता काबीज केली. तीन्ही ठिकाणी तोवर साम्यवादी राजवटीचे मुखंड असलेल्यांची मुले व नातलग नव्या कॉर्पोरेट अर्थव्यवस्थेचे ‘दादा’ झाले.
पहिल्या जगाचे काय? मार्गरेट थैचर-रॉनल्ड रीगन यांच्या काळापर्यंत, १९८०-९०च्या मध्यापर्यंत पहिले जग कर्मठ भांडवलवादी नव्हते. केन्सचा प्रभाव कायम होता. ‘कल्याणकारी राज्ये’ कर्मठ भांडवलवाद्यांना दुखत होती. सी. नार्थकोट पार्किन्सन, पार्किन्सन्स ला चा जनक, ब्रिटिश साम्राज्य कसे विलयाला गेले ते दाखवायला, ‘Welfare State becomes the Farewell Empire’ असे म्हणत होता, १९८० च्या आसपास. त्याचेच वारस म्हणजे शिकागो बॉईज. आधी फॉकलंड युद्धामुळे इंग्लंड ‘Qचरिझम’कडे वळले. त्याच सुमाराला ‘रीगनॉमिक्स’ने अमेरिका व्यापली. दोन्ही शिकागोपंथी भांडवलवादाच्याच आवृत्त्या होत्या.
तीन्ही जगांमध्ये केन्सीय धोरणांची, साम्यवादाची जागा कर्मठ भांडवलवादाने कशी घेतली याचे क्लाइनचे विश्लेषण ‘जसेच्या तसे’ घेणे शक्य नाहीडपण नाकारणेही सोपे नाही! रूपक
क्लाइनच्या मांडणीत एक अंग आहे यातना देणे, छळ करणे, यांमागच्या मानसशास्त्राचे.
कोरियन युद्धात चीन-उत्तर कोरिया आणि अमेरिका-दक्षिण कोरिया एकमेकांपुढे उभे होते. अमेरिका हरत होती. अमेरिकन युद्धकैदी रेडिओवरून व वृत्तचित्रपटांमधून चीनधार्जिणी वक्तव्ये करत होते. यावरची द मांचूरियन कैंडिडेट (१९५९) ही कादंबरी गाजत होती. तिच्यावर पुढे दोनदा चित्रपटही काढले गेले. अमेरिकन युद्धकैदी स्वतःच्या देशाविरुद्ध बोलायला तयार होतात, कारण त्यांचे ‘मेंदू धुतले’ जातात (they are brain-washed), हे स्पष्टीकरण दिले जात होते. अमेरिकेला आपल्या सैनिकांना व हेरांना या मेंदू-धुलाई तंत्रांपासून कसे वाचवावे, यावर संशोधन करून हवे होते. छळ करणे, यातना देणे, ही तंत्रे माणसांना नवी नाहीत. प्रश्न होता तो आधीचे सर्व अनुभव, नोंदी, धारणा इत्यादी मेंदूतून हटवून त्यांऐवजी नवे आणि ‘हवे ते’ नोंदण्याचा. त्यावेळी विजेचे धक्के देणे उर्फ इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी (ECT) हे तंत्र तीव्र मनोविकारांवर इलाज म्हणून वापरले जात असे. आजही ते वापरले जाते. एउढ नंतर, शॉक ट्रीटमेंटनंतर माणसे वय कमी झाल्यासारखी वागतात. ताजे अनुभव ढवळले गेल्याने हे ‘रिग्रेशन’ (regression) घडते. यातून एक शक्यता मांडली जात होती की अधिकाधिक एउढ ने माणसांची मने पूर्णपणे ‘पुसता’ येतील. __ प्रत्यक्षात असे होत नाही. एउढ च्या मनोवैद्यकीय वापरावर विश्वास नसलेले अनेक मनोवैद्य आहेत. त्यांचा शॉक्सची तीव्रता व संख्या वाढवण्याला तीव्र विरोध असतो. एउढ च्या अतिवापराने माणसे मनोरुग्ण होतात, शारीरिक दौर्बल्य व व्यंगे वाढतात, याचा बराच पुरावा आहे. त्यामुळे एउढ चा मेंदू-धुलाईसाठी वापर, या क्षेत्रात ‘संशोधन’ करणे अमेरिकेत अवघड होते. कॅनडातील मॅग्गिल (McGill) विद्यापीठातला इवेन कॅमेरन (Ewen Cameron) मात्र अशा संशोधनाला तयार झाला. एउढ सोबत ङडऊ, झउझ यांसारखी मनःस्थिती बदलणारी (mind-altering) औषधेही त्याने बऱ्याच अनिर्बंध व अवैज्ञानिक पद्धतीने वापरली. कोणावर वापरली ? सामान्य मनोविकारांसाठी उपचार करून घेण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकांवर !
हे रोग्यांना न सांगता केलेले संशोधन अमानुष होते. अनेक रोगी त्यामुळे मनोरुग्ण व मनोदुर्बल झाले. त्यांपैकी काहींना कोर्टात जाऊन नुकसानभरपाई मिळाली. अशा भरपाईलाही मुकलेल्या एका कॅमेरनच्या प्रयोगव्यक्तीचे तपशीलवार वर्णन क्लाइन देते.
आणि शिकागोपंथाचा प्रस्थापित अर्थव्यवस्था ‘मिटवून’ आपले प्रतिमान वापरू पाहण्याचा आग्रह कॅमेरनच्या अमानुष मेंदू-धुलाईसारखा होता, हे क्लाइन ठसवते. पण क्लाइन मेंदू-धुलाई हे अर्थव्यवस्था-धुलाईचे रूपक म्हणून वापरण्यावर थांबत नाही. शिकागोपंथाने ज्या राज्यक्रांत्यांना बळ पुरवले, त्या बहुतांश क्रांत्यांनंतरच्या राजवटींनी विरोधकांचे अनेक तहांनी दमन केले. यात एउढ चा वापरही होता, आणि अनेक छळ-यातना घटनांमध्ये अमेरिकन ‘सल्लागार’ही हजर असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे क्लाइन त्रिस्तरी धक्कातंत्र, त्रिस्तरी ‘शॉक् ट्रीट्मेंट’ ची संकल्पना मांडते.
राज्यक्रांती, जिच्याद्वारे लोकनिर्वाचित सरकारांची जागा हुकूमशाही सरकारे घेतात, हा पहिला धक्का. अर्थव्यवस्थेतील शासकीय सामाजिक सुरक्षायंत्रणा मोडून खाजगीकरण आणि विनियंत्रण आणणे, हा दुसरा धक्का. विरोधकांचा आणि वेगळे मत मांडणाऱ्यांचा छळ, हा तिसरा, बरेचदा चक्क एउढ नमुन्याचा धक्का !
रूपक म्हणून शिकागोपंथीयांनी उद्युक्त केलेले अर्थव्यवस्थांमधले बदल एउढ शॉक्ससारखे मानणे, हे वाग्युद्धातले उत्तम अस्त्र मानायला हवे. पण राज्यक्रान्ती, अर्थव्यवस्थांमधील क्रान्ती आणि क्रान्तीनंतरचे दमन ही अतूट त्रयी आहे असे मानणे मात्र फारसे समर्थनीय नाही. नॉर्बर्ग आपल्या परीक्षणात हे ठसवतो. तो म्हणतो, “क्लाइनच्या शाब्दिक खेळांमध्ये एक खराखुरा युक्तिवाद दडलेला आहे ड्ड अनेक हुकूमशाह्यांनी आपल्या अर्थव्यवस्था खुल्या केल्या, हा ताजा इतिहास आहे. आणि यांपैकी काही हुकूमशाह्यांनी विरोधकांना यातना दिल्या, हेही खरे आहे. पण यांतील सांधा कितपत मजबूत आहे?”
यानंतर मात्र नॉर्बर्ग फ्रेजर इन्स्टिट्यूट या संस्थेने घडवलेली जगातल्या आर्थिक स्वातंत्र्याबाबतची आकडेवारी (Fraser Institute’s Economic Freedom of the World Statistics) आणि त्यातील एऋथ निर्देशांक वापरतो. हा निर्देशांक आर्थिक स्वातंत्र्य मोजतो, असे फ्रेजर संस्थेचे आणि नॉर्बर्गचे म्हणणे आहे. पण क्लाइनच्या शॉक्-शॉक्-शॉक् शाब्दिक खेळांसारखा हा आकड्यांचा खेळ आहे, असे मानायला जागा आहे. त्यामुळे क्लाइनने ‘सभ्य’ वाग्युद्धाच्या सीमा ओलांडल्या तशाच तिचे टीकाकारही ओलांडतात, येवढेच स्पष्ट होते -तिचे रूपक चुकीचे ठरत नाही! नाही! रूपक नाही!
मेंदू-धुलाई तंत्रांमध्ये आधी सर्व ज्ञानेंद्रियांना उपाशी ठेवणे (sensory deprivation) ही पायरी असते. मग प्रखर उघडमीट करणारे दिवे, ढण्ढण् संगीत, असे ज्ञानेंद्रियांना अजीर्ण होईलसे (sensory overload) केले जाते. याने उपचार घेणारी व्यक्ती आपले स्थळकाळाचे भान गमावून बसते. यानंतर औषधे, विजेचे धक्के वगैरे तंत्रे जास्त परिणामकारक ठरतात.
दक्षिण अमेरिकन, युरोपीय, आशियाई इत्यादी उदाहरणांत हा प्रकार राज्यक्रांतीतून सुरू होताना दिसतो. ह्या घटनांमध्ये अमेरिकेची भूमिका सल्लागाराची, समर्थकाची होती. गेल्या साताठ वर्षांमध्ये मात्र दोनदा (तरी) अमेरिकेने परकी देशांतील सत्तापालट स्वतः केला आहे. यांपैकी इराकला एकदा (१९९१ साली) झोडपून सोडून दिले व दुसऱ्यांदा (२००३ साली) मात्र सद्दाम हुसेनला हटवून आपले बुजगावणे उभे केले.
दुसऱ्या इराक युद्धाआधी क्षेपणास्त्रांच्या नेमकेपणाचे सर्वोच्च तंत्रज्ञान वापरून अमेरिकेने इराकची टेलेफोन व रेडिओ व्यवस्था नष्ट केली डड्ड कान फोडले. सोबतच वीजकेंद्रे उद्ध्वस्त केली ड्डड्ड डोळे फोडले. नंतर ‘न भूतो’ बाँब-क्षेपणास्त्र वर्षाव केला. पहिल्या इराक युद्धात एकूण ३०० टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागली गेली, तर दुसऱ्यात २०,०००! सोबत ३०,००० बाँबही टाकले गेले. एकूण पन्नासेक दिवस सरासरीने एक हजार विध्वंसके रोज फेकली गेली.
‘युद्धांमध्ये असे होतेच’, असे म्हणायचा मोह होईल. ‘युद्ध करायचेच, तर पूर्ण जोमाने करून लवकर संपवावे’, असे व्यावहारिक शहाणपण सांगण्याचा मोह होईल. दोन्ही मुद्दे खरे आहेत. पण त्याआधी अमेरिकेने आपली युद्धक्षमता वारंवार दूरदर्शनावरून जाहीर केली. पहिल्या इराकयुद्धानंतरच इराकी लोकांचा दरडोई झोपेच्या गोळ्यांचा वापर, दरडोई खिन्नतावरोधक (anti depressant) औषधांचा वापर जगातील सर्वोच्च पातळीला गेला होता. दुसऱ्या युद्धाच्या सुरुवातीलाच या औषधांचे साठे संपले. ‘शत्रूला घाबरवणे चांगले युद्धतंत्र आहे’, असे म्हणायचा मोह होईल. हे तीनही मोह टाळावे, कारण युद्ध का केले जात आहे याचे जाहीर कारण खोटे आणि अरेरावीचे होते! इराककडे महासंहारक शस्त्रास्त्रे (Weapons of Mass Destruction-WMD) आहेत, असे वारंवार सांगितले गेले, पण वास्तवात अशा शस्त्रास्त्रांचा मागमूसही लागला नाही. अरबस्तानाला लोकशाही आणि स्वातंत्र्य ‘शिकवणे’, हे एक कारण सांगितले गेले. “शिकवणारे तुम्ही कोण ?’, हा प्रश्न विचारायचे धा_ कोणाला होणार नव्हतेच. म्हणजे लोकशाही आणि स्वातंत्र्य यांच्या नावाखाली अरेरावी केली जात होती.
खरे कारण दुहेरी होते -इराकी तेलसाठे हा त्यातला एक घटक, आणि भांडवलवादाचा प्रसार, हा दुसरा. पण याचे वर्णन ‘नवराष्ट्रउभारणी’ असे केले गेले. बरे, सद्दाम हुसेनच्या राजवटीचे क्रौर्य आणि बाथिस्ट (Ba’athisi) समाजवादाच्या नावावरील हुकूमशाही, हे वादातीत असल्याने कोणी खरेखुरे लोकशाहीवादी देशही विरोध करणार नव्हतेच. राहता राहिला शिकागो नमुन्याचा भांडवलवाद ड्ड पुन्हा त्रिसूत्री आठवावी, कॉर्पोरेशन्सना ‘मुक्ती’, शासनाचे विनियंत्रण, सामाजिक सुरक्षेचाही विचार न करणे.
सद्दामला हटवून अमेरिकासमर्थित ‘लोकशाही’ सरकार उभारण्याआधी उझअ (कोअॅलिशन प्रोव्हिजनल ऑथॉरिटी) उर्फ तात्पुरती राष्ट्रसमूह समिती उभारली गेली डू ‘राष्ट्रसमूह’ म्हणायचे कारण म्हणजे तत्त्वतः तरी इराकवरील हल्ला नुसत्या अमेरिकेने केला नव्हता. त्यात इंग्लंडचा व इतर देशांचाही सहभाग होता. प्रत्यक्षात ९५% किंवा जास्त सैन्य अमेरिकन होते, व काही देशांचा सहभाग शुभेच्छांपुरता च होता. तर उझअ नवराष्ट्रउभारणीला लागली.
पण शिकागोपंथी तज्ज्ञांना सरकार उभारणे जमेना. मायकेल वोल्फ हा राज्यशास्त्रज्ञ सांगतो, “स्थितिवाद्यांना राज्य करता येत नाही याचे कारण शाकाहारी लोकांना बीफ बूर्गिन्याँ (Boeuf Bourgignon-एक गोमांसापासून केले जाणारे पक्वान्न) करता न येण्याच्या कारणासारखेच असते. तुम्ही जे करू जाता आहात ते गैर आहे असे तुम्हाला वाटत असले, तर ते चांगले होणे शक्य नाही.” शिकागोपंथाला सरकार हवे असते ते नावापुरते ६ आणि नवनिर्मितीला ते चालत नाही. उझअ सरकार शिकागोपंथाला हवे तसे लहान होते द पंधराशे माणसांचे. दुसरीकडे हॅलिबर्टन (Halliburton) या बांधकाम व पुरवठा कंपनीचे पन्नास हजार कामगार इराकमध्ये होते ड्व आणि ती एक नवनिर्माण करणारी कॉर्पोरेशन होती, अनेकांपैकी एक, जरा मोठी, इतकेच.
उझअने धडाधड इराकी शासकीय मालमत्ता विकायला सुरुवात केली, खाजगीकरणाचा भाग म्हणून. पण हे करण्यासाठी तीनच माणसे नेमली गेली. एक पूर्व जर्मन पाहुणा म्हणाला, “सुरुवातही करू नका”. पूर्व जर्मनीत ‘विनिवेश’ (disinvestment) करण्यासाठी साठेक हजार माणसांचे खाते उभारले गेले होते. (भारतात तर त्यासाठी वेगळा मंत्रीही नेमला गेला होता!) सद्दामच्या काळात तेल उद्योग व प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू व सेवा पुरवणारे दोनेकशे उद्योग, या शासकीय गुंतवणुकीभोवती इराकी अर्थव्यवस्था उभारलेली होती. आता ही सारी मालमत्ता मातीमोलाने अमेरिकन कंपन्यांना विकली गेली. विनिवेश खात्याकडे माणसेच नसल्याने अनेकदा विक्रीखतेही खरीददारांच्या वकिलांकडूनच लिहवून घेतली गेली!
पण अमेरिकन कॉर्पोरेशन्स इराकला लुटत असताना इराकी उद्योजकांना मात्र ‘स्पर्धात्मक व्हा’ असा सल्ला दिला जात होता डू भारतीय उद्योगांना दिला जातो तसा. मायकेल फ्लायशर हा शिकागोपंथी तज्ज्ञ इराकी उद्योजकांना “सुरक्षित उद्योग कधीही, कधीही स्पर्धात्मक होऊ शकत नाहीत.’ असे सांगत होता. क्लाइन नोंदते, “(त्याचवेळी) इराकच्या नवनिर्मितीचे लाभ घेणाऱ्या हॅलिबर्टन, बेक्टेल, पार्सन्स, KPMG, RTI, ब्लॅकवॉटर आदि अमेरिकन कॉर्पोरेशन्स मिळून एक प्रचंड सुरक्षित क्षेत्र घडले होते. अमेरिकन सरकारने एका युद्धातून त्यांच्यासाठी बाजारपेठ घडवली होती, संभाव्य स्पर्धकांना स्पर्धेत उतरूही दिले गेले नव्हते, आणि कॉर्पोरेशन्सना करदात्यांच्या जिवावर नफ्याची हमी दिली गेली होती. फ्लायशरला यातला विरोधाभास जाणवताना दिसत नाही.”
फार कशाला, इराकचे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय लुटले जाणे (८०% वस्तू), राष्ट्रीय ग्रंथालय जळून खाक होणे (प्राचीन ग्रंथांसोबतच सर्व आधुनिक इराकी शोधनिबंधही), हा सारा सरकारी हस्तक्षेप ‘घटवण्याचा’ उर्फ वाढत्या खाजगीकरणाचा भाग मानला गेला.
आता क्लाईनचे राज्यपालट-अर्थव्यवस्थाबदल-विरोधकदमन याचे शॉक-शॉक-शॉक त्रिकूट केवळ रूपक आहे असे वाटत नाही!
क्लाइनचा प्रश्न
पण युद्धे, राज्यक्रांत्या, ही फारतर साधने मानता येतात. साध्य हवे आहे ते ‘मुक्त बाजारपेठ’ हे. आणि मुळात ही विचारसरणीच शंकास्पद सभ्यतेची आहे, शंकास्पद सुसंस्कृतपणाची आहे; असे क्लाइनचे मत आहे. ती लिहिते, “जसे लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या देशांवर कब्जा करण्याचे सौम्य, दयाळू मार्ग नाहीत, तसेच लक्षावधी लोकांपासून त्यांची इज्जतीने जगण्यासाठीची साधने हिरावून घेण्याचेही सौम्य, दयाळू मार्ग नाहीत. आणि शिकागो बॉईज हेच करू पाहत होते. जमिनीची असो की जीवनपद्धतीची, लूट करण्यासाठी बळजोरी तरी लागते किंवा तसे करण्याची विश्वासार्ह धमकी तरी लागते व म्हणून तर दरोडेखोरांपाशी बंदुका असतात.”
आल्जीरियातल्या फ्रेंचांनी केलेल्या दमनाबद्दल सीमाँ द बोव्हाचे (Simone de Beauvoir) म्हणणे क्लाइन उद्धृत करते, “अतिरेक व अपप्रकार (excesses and abuses) यांच्याविरुद्ध नैतिकतेच्या नावाने बोलणे ही अतिरेक करणाऱ्यांशी थेट संगनमताची सूचना देणारी चूक आहे. अतिरेक किंवा अपप्रकार नसतातच डू एक सर्वव्यापी व्यवस्थाच फक्त असते.”
क्लाईनचा प्रश्न आहे मुक्त बाजारपेठा आणि मुक्त माणसे यांना एक अभंजनीय जोडी मानण्याबद्दलचा. साम्यवादी रशियाचे पतन आणि चीनने भांडवलवादाचा केलेला स्वीकार, यानंतर हे जास्त जोरात मांडले जाऊ लागले. एकाच विचारधारेची मुक्त बाजारपेठ व मुक्त माणसे, ही दोन अंगे असल्याचे सांगितले जाऊ लागले. सामूहिक दफने (mass graves), हत्याक्षेत्रे (killing fields), यातनागृहे (torture chambers) यांच्यापासून आपले रक्षण करणारी ही सर्वोत्तम विचारधारा असल्याचे सांगितले जाऊ लागले. क्लाइन विचारते, “जर हे खरे असेल, तर जगभरात सीआयएप्रणीत -कॉर्पोरेशन्स प्रायोजित शासनकर्त्यांना दमनशाही का वापरावी लागते?”
आणि उत्तर
क्लाइनचे उत्तर असे की शिकागोपंथी अर्थशास्त्र संपूर्णतः कॉर्पोरेशन्सवादी आहे. आज कॉर्पोरेशन्सना बाजारपेठा मिळवणे, स्पर्धेतून त्या बाजारपेठांमध्ये पाय रोवणे, तंत्रज्ञान सुधारायला नफा वापरून स्पर्धात्मकता टिकवणे, वाढवणे, इत्यादी झंझटी करणे आवश्यक वाटत नाही. त्याऐवजी स्वदेशात, परदेशात सरकारेच भागीदार करून घेण्याने नफ्याची, वाढत्या नफ्याची हमी मिळवणे सोपे आहे. आणि त्यासाठी आवश्यक आहेत वेळोवेळी येणाऱ्या आपत्ती -कधी नैसर्गिक, कधी राज्यक्रांतीच्या रूपातल्या, तर कधी युद्धांच्या रूपातल्या आपत्ती.
त्यामुळे क्लाइन नवस्थितिवाद, नवउदारमतवाद, कॉर्पोरेटिझम वगैरे शब्द टाळून आजच्या सर्वांत प्रभावी आर्थिक विचारधारेला आपत्तिभांडवलवाद (डिझास्टर कॅपिटॅलिझम) म्हणते! तिचा समीक्षक-टीकाकार नॉर्बर्ग आपल्या समीक्षणात आपत्तिवाग्युद्धतंत्र (डिझास्टर पॉलेमिक्स) ही उपहासगर्भ संज्ञा वापरतो. __ जोसेफ स्टिग्लित्झ म्हणतो की नियोजनबद्ध काम करणारी अशी ही विचारधारा नाही. क्लाइन कटकारस्थानातून हे घडते असे म्हणत नाही, हेही स्टिलित्झ नोंदतो. त्याच्या मते माणसे वेळोवेळी सुचतील तशा क्रिया करत जातात. अशा क्रियांमध्ये फारदा चुका होतात. परिस्थिती बदलती असते. चुका सुधारायला नवी धोरणे, नव्या कृती, नव्या चुका, असे चक्र सुरू होते ढ आणि ह्या चुकांवर चुका, अपघातांवर अपघात प्रकारातून क्लाइनला दिसणारे चित्र घडते. तो शेवटी म्हणतो, “जगाचा घात कट-कारस्थानांनी होत नाही. चुकीचे पर्याय, फसलेली धोरणे, लहानमोठे अन्याय, सारे एकावर एक रचले जाते, आणि एकूण बेरीज घडते. पण पर्यायनिवड, धोरणे, यांमागे मोठ्या मनोभूमिका असतात. सर्व धोरणे ठरवणाऱ्या बाजारपेठी मूलतत्त्ववाद्यांना अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असलेल्या संस्था कधी नीटशा कळल्याच नाहीत ड्ड संस्कृतींना बहरण्यासाठी लागणारे मोठे सामाजिक महावस्त्र जाणवणे तर सोडाच.” मला तरी क्लाइनचे वर्णन आणि त्याचे स्टिग्लित्झला झालेले आकलन पटते.
भांडवलवादाची बलस्थाने
माणसे व्यक्ती म्हणूनही जगतात आणि समाजाचे घटक म्हणूनही जगतात. त्यांना आपल्या कामाचे, कल्पकतेचे, कार्यक्षमतेचे, धडाडीचे वैयक्तिक लाभही हवे असतात, आणि सामाजिकही. ह्या इच्छांपैकी व्यक्तिगत भागाला जोपासण्याचे काम भांडवलवादी व्यवस्थेत चांगले घडते. पण ते नेहेमीच कल्पक, कार्यक्षम, धडाडीच्या माणसांपुरते मर्यादित असते. आणि अशी माणसे संख्येने, प्रमाणाने, नेहेमीच कमी असतात.
समाजवादी व्यवस्थांमध्ये कल्पक इ. इ. वृत्तीच्या माणसांचे कौतुक होते. ऐहिक व्यक्तिगत लाभ मात्र कमी असतो. शासकीय वैज्ञानिकांना एकेकाळी इंग्लंडात दर शोधामागे एक गिनी (सळपशर, आज सुमारे रु. ८५/-) मिळत असे ड्ड पगार वेगळा. अमेरिकेत हा आकडा एक डॉलर, किंवा रु. ४५/- इतका होता. अनुभव असा की दुसऱ्या महायुद्धात रेडार, अणुबाँब, संदेशवहन वगैरेंची अनेक तंत्रे घडत असतानाही ती घडवणारे संशोधक आपल्या कल्पकतेला चणे-फुटाण्यांचेच ऐहिक ‘मूल्य’ आहे, हे मान्य करूनही कल्पकतेने काम करत असत.
भांडवलवाद्यांचे म्हणणे असते की कल्पकतेला, सर्जनशीलतेला भरपूर ऐहिक मूल्य (= पैसे!) केवळ भांडवलवादच देतो, आणि म्हणून तो एकच वाद नवे काही देऊ शकतो. हे संभाव्य नक्कीच आहे, पण अनुभवाने सिद्ध झालेले नाही. साम्यवादी चीन-रशिया-क्यूबांच्या काही तंत्रज्ञानात्मक कृतींनी पहिल्या जगाला किती घाबरवले होते, हे आज पन्नासावर वय असलेल्या साऱ्यांना आठवेल. काटेकोर सीमांमध्ये भांडवलवादाला वावरू देणाऱ्या स्कँडिनेव्हियन देशांची, दक्षिण अमेरिकन देशांची ड्ड फार कशाला, भारताचीही प्रगती अनुल्लेखनीय नाही. भारताचा अपवाद वगळता या ‘निबद्ध’ भांडवलशाह्यांनी सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रात तर चमत्कारी विकास साधला आहे. अनिर्बंध भांडवलवादाने मात्र जे काही कमावले आहे, ते अन्याय्य उपपरिणामांनी डागाळलेले आहे.
भांडवलवाद म्हणजे सर्जकता, हे समीकरण जसे संभाव्य, पण अपरीक्षित आहे; तसेच आणखी एक सूत्र आहे व भांडवलवाद म्हणजे स्पर्धा. हे सूत्र तर साफ खोटे आहे. स्पर्धात्मक भांडवलवाद, अॅडम स्मिथच्या नजरेतला, हा फारतर आठवडी बाजाराच्या, जिल्ह्याच्या ठिकाणच्या बाजाराच्या पातळीवरच अस्तित्वात असतो. त्यापेक्षा जरा जरी मोठे क्षेत्र पाहिले, तर भांडवलवादी उद्योजक नवसर्जनाऐवजी स्पर्धा कमी करण्यावरच भर देताना दिसतात. संभाव्य स्पर्धकांशी संगनमत, स्पर्धकांना विकत घेणे, अशा टप्प्यांनी वाढत वाढत जाणारे उद्योजक अखेर क्लाइनच्या दुःस्वप्नवत् आपत्ति भांडवलवादाला पोचतात.
सरकारे आपल्यावर नियंत्रण ठेवू शकतात, तेव्हा त्यांनाच भागीदार करून घेणे, हे भांडवलवाद्यांचे दिवास्वप्न ठरते. आणि ते आजच्या अमेरिकन कॉर्पोरेशन्सना वास्तवात आणता आले आहे, असे क्लाइन दाखवून देते. ती सांगते की हॅलिबर्टन ही कॉर्पोरेशन अमेरिकेच्या इराकमधील सरकाराला अढच सारखे वापरते! तरी आपण मान्य करू की भांडवलवाद स्पर्धात्मक असतो. पण स्पर्धात्मकतेतून होणारा विकास नेहेमीच मूल्यहीन उपभोगवादा कडे जातो. ‘आपत्ती, अवघड परिस्थिती, ही कल्पक माणसांना संधीच असते’ हे विधानही मूल्यहीन, असामाजिक विचारांतच खरे ठरते. म्हणजे भांडवलवादाचे हे बलस्थानही ‘देवही दुबळ्यांचाच घात करतो’ या मुक्कामावर जाऊन ठेपते.
जर भांडवलवादी अर्थव्यवस्थांमध्ये बलस्थानांसोबत धोकेही आहेत, तर अशा व्यवस्थांना कितपत मुक्त ठेवायचे आणि त्यांच्यावर कोणते निर्बंध घालायचे, हे ठरवायला सबळ, लोकशाही सरकार हवेच. त्या सरकारला अर्थव्यवस्थेचे कळीचे स्थानही माहीत हवे, नुसताच स्वातंत्र्य, समता, बंधुभावा चा भावनिक जप नको. ही गरज ठसवणे, हे क्लाइनच्या पुस्तकाचे मुख्य फलित ठरावे.
संदर्भः
1) The Shock Doctrine : The Rise of Disaster Capitalism, (Naomi Klein Penguin, 2007) 2) Bleakonomics, (Joseph Stiglitz, The New York Times, 30 Sept. 2007) 3) The Klein Doctrine : The Rise of Disaster Polemics, (Johan Norberg, CATO Institute Briefing Papers, 14 May 2008)