२८ डिसेंबरला (मे. पुं.) रेगेसरांच्या स्मृतिदिनी परममित्र प्रकाशनाने प्राज्ञ पाठशाळेच्या सहकार्याने दिवसभराचा कार्यक्रम आयोजित केला आहे, व त्या निमित्ताने अनेक मान्यवर रेगेसरांविषयी बोलणार आहेत, हे कळायचाच अवकाश, की जाणे निश्चित केले. परतले, ती अतीव समाधानाने, कार्यक्रम संपल्यावरही भैरवीचे सूर मनात रेंगाळतच राहिले.
प्रास्ताविकानंतर प्रा. मिलिंद मालशे ह्यांनी सरांच्या व्यावसायिक जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. केवळ बौद्धिक व्यापारांमध्ये रममाण न होता त्याचबरोबरीने समाजाभिमुख राहून विविध सामाजिक प्रश्नांचा मूलगामी विचार करून त्यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्यातील त्यांची हातोटी विलक्षण होती व त्याहून विशेष म्हणजे “समाजातील जातिभेद, विषमता, दारिद्र्य पाहून त्यांना प्रचंड अपराधी असल्यासारखे वाटत असे आणि हे अपराधीपण बाळगूनच ते वावरत असत” असे त्यांच्या कन्या रूपा रेगे – नित्सुरे यांनी आवर्जून सांगितले. “माणसाला बुद्धी, जात, रूप, रंग मिळतो, तो भाग्याने….” पण चारित्र्य मात्र कमवायचे असते, असे जीवन जगण्याचे धडे आपणाला वडिलांकडून मिळाल्याचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. सतत माणसांचा राबता असलेल्या घरातही – लोकांतातही – एकांत शोधण्याचे कसब त्यांच्याकडे होते. प्रसंगी रात्री दोन ते सात तर कधी हॉटेलात वगैरे बसून ते लिखाण पूर्ण करत; परंतु घरात ते ताण-तणाव, दडपण येऊ देत नसत. आदर्श शिक्षक व पालक अशा दोन भूमिका वक्त्यांनी उलगडून दाखविल्या. प्राज्ञपाठशाळेच्या अध्यक्षा डॉ. सरोजा भाटे ह्यांनी रेगेसरांशी असलेले संस्थात्मक पातळीवरील औपचारिक नाते स्पष्ट करत सरांच्या संयत व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविणारे किस्से सांगितले. बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेतील सरांच्या अध्यक्षीय भाषणाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला कारण त्यातील भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची तुलना त्यांना विशेषत्वाने भावली. सरांची ‘संवादकल्पना’ पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी स्वीकारून अनोख्या प्रकारे त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
सरांच्या लिखाणाला सातत्याने असणारा वर्तमानाचा संदर्भ लक्षात घेता व विविध सामाजिक प्रक्रियांबाबतचे त्यांचे मूलभूत विचार लक्षात घेता दीपक घारेलिखित ‘विचारक्षितिजे’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. राम बापट ह्यांच्या हस्ते झाले. विविध जबाबदाऱ्या निष्ठेने व चोख पार पाडणाऱ्या रेगेसरांच्या बहुआयामी व संपन्न व्यक्तिमत्त्वाचा पुनरुच्चार करण्यात आला. सामाजिक परिवर्तनाविषयीच्या सरांच्या तात्त्विक भूमिकेचा ऊहापोह बापट यांनी केला. कांटवाद, उदारमतवाद, मृदू-हिंदुत्ववाद (soft-Hinduism) मान्य करताना सर ‘पुरोगामी’ जमातीपासून अंमळ दूर राहिलेले दिसतात; विवेकाने प्रबोधन करत असताना त्यातून नवसमाजनिर्मितीसाठीची प्रेरणा व उद्दिष्टे निर्माण करतात; १९६० साली निखालस इहवादी दृष्टी बाळगारे सर कालांतराने पारलौकिकाशी सुसंगत इहवादाची मांडणी करतात ; ह्यातून त्यांच्या वैचारिक प्रवासाची कल्पना यावी.
रेगेसरांना अभिप्रेत असणाऱ्या समाजविषयक विचारांमागील पार्श्वभूमी श्री. मा. भावे ह्यांनी स्पष्ट केली तर सुनीती देव ह्यांनी सरांच्या मुद्देसूद, तर्कशुद्ध मराठी भाषेची वाखाणणी केली. ‘समाजपरिवर्तन’ ही अत्यंत व्यापक संज्ञा (लश्ररपज्ञशी शीी) असून तिचे शिक्षणक्षेत्रातड्डविशेषतः तत्त्वज्ञान विषयासंदर्भातड्डउपयोजन कसे करता येईल, ह्याविषयी त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले. पाश्चात्त्य विचारवंत डमेट ह्यांनी रेगेसरांविषयी “Frege without F” असे गौरवोद्गार काढल्याची आठवण त्यांनी करून दिली. ‘संवाद’, ‘पंडित-फिलॉसफर प्रॉजेक्ट’ इत्यादी उपक्रमांना प्रारंभ करूनही म्हणावे तसे ते रुजलेले दिसत नाहीत; ह्यावर उपाय कोणता? रेगेसरांचा उपाय डॉ. देव ह्यांनी उद्धृत केला. प्रत्येकाने आपापला दिवा सांभाळायचा, हौतात्म्याची गरज नाही. एकमेकांची उमेद जिवंत ठेवली पाहिजे.”
रेगेसरांच्या साहित्यविषयक लेखनाचा, पर्यायाने सौंदर्यमीमांसेचा व समाजविषयक संकल्पनेचा मागोवा हरिश्चन्द्र थोरात ह्यांनी घेतला. मढेकरांच्या विचारचौकटीतील फटी, त्रुटी, तार्किक गल्लती सरांनी कशा नेमकेपणाने दाखवून दिल्या, ते सांगत त्यांनी ‘आणखी एक व्यक्तिलक्ष्यी टीके’ची पार्श्वभूमीही उलगडून दाखवली. अध्यक्षीय समारोपात शि. स. अंतरकर यांनी रेगेसरांच्या वैचारिक प्रवासाचे टप्पे स्पष्ट केले व आपल्याला वेळोवेळी पुरविलेल्या भक्कम वैचारिक आधाराचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
एकंदरीत कार्यक्रमाची परिणती कृतार्थतेत झाली.
सी-२, ५०१-५०२, लोकमीलन, चांदिवली, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०७२. संपर्क : फोन : २८ ४७ ४३८०, मोबाइल : ९८ ६७८७ १८३१