पत्रचर्चा

रविन थत्ते, ४६, शिरीष, १८७, वीर सावरकर मार्ग, मुंबई ४०० ०१६.
आसु (जाने. २००९, १९-१०) मध्ये किशोर वानखडे ह्यांनी आत्म्याचे नास्तित्व ह्यावर लिहिले आहे. माणूस मरतो तेव्हा आत्मा त्याला सोडून जातो ह्या तथाकथित कोठलाही वैज्ञानिक किंवा औपनिषदिक आधार नसलेल्या विधानावर ह्या पत्रात प्रहार करण्यात आले आहेत. मुळात जे सत्य नाही त्याला असत्य ठरवण्याचा हा प्रयत्न दोरीला साप समजून त्याला धोपटण्यासारखा वाटतो. माठ फुटतो तेव्हा किंवा मठ कोसळतो तेव्हा अवकाश, आकाश, पोकळी कोठे जात नाहीत तिथेच राहतात, असे अनेक वेळा अनेक ठिकाणी रूपकात्मकरीत्या सांगून झाले आहे. परंतु काही मंडळी हातातले धुपाटणे टाकण्यास तयार नाहीत.
रासायनिक प्रक्रियेतून प्रकाश आणि ऊर्जा निर्माण होतात हे वानखडे ह्यांचे विधान घोड्याच्या पुढे टांगा लावण्यासारखे आहे. मुळात १. अतिघन असा चैतन्याचा एक बिंदू होता. २. तो अनाकलनीय कारणामुळे फुटला. ३. त्यातून लहरी आणि नंतर कण तयार झाले. ४. पुढे सूर्यमाला आणि ग्रह अवतरले. ५. पृथ्वी थंड होऊ लागल्यावर पाणी स्थिरावले. ६. जलाशयांच्या कपारींमध्ये स्थिर झालेल्या अणुपरमाणूंच्या पापुद्रयांमध्ये किरणांच्या मर्यादित ऊर्जेच्या आविर्भवनांमुळे जे उत्परिवर्तन घडले. ७. त्यामुळे जवळपास असलेल्या विकरांच्या सहाय्याने योगायोगाने ह्या अणुरेणूंत आजूबाजूचे उष्मांक मिळवण्याची प्रक्रिया घडली. ८. अशा त-हेने जीव निर्माण झाला. ९. मी आहे, मी जगणार आणि मी माझी प्रतिकृति निर्माण करणार ह्या त्रिसूत्रीवर हा जीव जगात राहिला आहे. १०. आणि ह्या सर्वांचा मूळाधार चैतन्य (उपाख्य – आत्मा) असते.
जीव घाबरतो, भांड्यात पडतो, कळवळतो, खालीवर होतो, घुटमळतो. विश्वभर पसरलेल्या चैतन्याला हेतू, कारण, प्रयोजन, इच्छा ह्या गोष्टी नसतात त्यामुळे असल्या विकृतींपासून चैतन्याला बाधा पोहोचत नाही. वानखडे ह्यांनी दिलेल्या दाखल्यात रसायनात ऊर्जा आणि प्रकाश उत्पन्न होतो, ह्या विधानातील त्रुटी अशी की रसायन ही वस्तू चैतन्याचे एक क्षणभंगुर स्वरूप असते. वर वापरलेला विकृति हा शब्द विपरीत कृति असा नसून विशेष कृति असा आहे. आइन्स्टाईनने मांडलेल्या ऊर्जा = वस्तुमान प्रकाशाच्या वेगाचा वर्ग ह्या समीकरणाप्रमाणे अपार ऊर्जेतून इवलीशी वस्तू तयार होते. त्यात रसायनेही आली. आत्मा ह्या शब्दाचा अर्थ ऊर्जा असाही दिला आहे. माणूस मरतो तेव्हा ऊर्जा कोठेही जात नाही. तिला “हे विश्वचि माझे घर असते.” माणूस जन्मला त्याच्या आधी कितीतरी अब्ज वर्षे ही ऊर्जा कोठल्याही उपाधीशिवाय इथे विलसत होती. माणूस सहा पायांचा किडा आहे अशी ज्ञानेश्वरांची ओवी आहे. त्यातली पाच ज्ञानेंद्रिये आणि सहावे मन हे पाय होत. हा किडा हे जग न्याहाळतो आणि काही निर्णयाप्रत येतो. अज्ञानाने किंवा अहंकारामुळे मूळ ऊर्जेलाच नाकारतो आणि आत्मा शरीराला सोडून जातो अशी विधाने करतो आणि मग त्या विधानांना बडवत आपण किती हुषार आहोत अशी स्वतःचीच पाठ थोपटतो. ज्ञानेश्वर विश्वात्मके देवे म्हणतात ते काही उगीच नाही.
विश्वात्मके हा तत्त्वज्ञानमूलक शब्द आहे. आणि ‘देवे’ असे म्हणून त्यांनी सामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची आणखीही एक ओवी (रूपांतरित) म्हणते काळाच्या धगधगत्या कुंडात पडावे लोणी माशीचा पंख फडफडेपर्यंत संपते सारी कहाणी धगधग, कुंड, वितळणारे लोणी, माशी, तिचे फडफडणारे पंख आणि घडत असेलल्या कहाण्या ह्या सर्वांना चैतन्य साक्षीभूत असते. ते जळत नाही कारण तेच अग्नि असते, भिजत नाही कारण तेच पाणी असते ते येरझाऱ्या घालत नाहील कारण जिथे ते नसते अशी जागाच नसते. अगदी क्लोन केलेल्या पेशीतही तेच असते.
मागे आसु च्या संपादकांनी माझे चैतन्यवादी (vitalist) असे नामाभिधान केले होते. मी वादी नाही किंवा प्रतिवादीही नाही. आधुनिक विज्ञान आणि औपनिषदिक तत्त्वज्ञान यातील साम्यस्थळे प्रसंग उद्भवले आणि वेळ मिळाला तर सुधारकच्या वाचकांसमोर मांडण्याचे काम मी करत असतो.
[१) थत्त्यांच्या दुसऱ्या परिच्छेदातील टप्पे १. ते ३. यांबद्दल रॉजर पेन्रोज (The Emperor’s New Mind, Roger Penrose, Oxford Uni. Press, १९९९) काय म्हणतो ते पाहू –
क) “पण आपण हा परिचित प्रकारचा सामान्य स्फोट होतो असे न मानणे महत्त्वाचे आहे. तशा स्फोटात आधी अवकाश असतो व त्यात एका केंद्रबिंदूपासून फेकले जाणारे भूतमात्र असते.इथे अवकाश स्फोटानेच निर्माण होतो, व कोणताच केंद्रबिदू नसतो, किंवा नव्हता!”
However, it is important that we do not think of this as an ordinary explosion of the familiar kind, where material is ejected from some central point into a pre-existing space. Here, the space itself is created by the explosion, and there is, or was, no central point! ख) “या अग्निगोलकाचे मूळ घटक कोणते व काय प्रमाणात होते, व अग्निगोलक (जो संपूर्ण विश्व होता) प्रसरण पावताना व थंड होताना ते घटक कसे कसे बदलले याचे तपशीलवार गणित मांडले गेले आहे. आजच्या वैश्विक परिस्थितीपेक्षा इतक्या वेगळ्या परिस्थितीचे गणित विश्वासार्ह पद्धतीने मांडता आले, हे उल्लेखनीय वाटेल. पण त्या गणितामागची भौतिकी विवाद्य नाही, जर आपण स्फोटानंतरच्या एक-दशसहस्रांश सेकंदाआधी काय झाले हे विचारले नाही, तर. त्या क्षणापासून स्फोटानंतर सुमारे तीन मिनिटे होईपर्यंत कायकाय वर्तले ते तपशिलात सांगता येते (संदर्भ : वाइनबर्ग, १९७७) डू आणि यात उल्लेखनीय बाब ही की यासाठी प्रयोगांमधून निष्पादित केलेली आपली प्रस्थापित भौतिकीची तत्त्वे (जी फार वेगळ्या स्थितीत घडवलेली आहेत) पुरेशी आहेत.”
Detailed calculations have been performed concerning the nature and proportions of the initial constituents of this fireball, and how these constituents changed as the fireball (which was the entire universe) expanded and cooled. It may seem remarkable that calculations can be reliably performed for describing a state of the universe which was so different from that of our present era. However, the physics on which these calculations are based is not controversial, so long as we do not ask for what happened before about the first 10-4 of a second after creation! From that moment, one ten-thousandth of a second after creation, until about three minutes later, the behaviour has been worked out in great detail (cf. Weinberg 1977) — and, remarkably, our well-established physical theories, derived from experimental knowledge of a universe now in a very different state, are quite adequate for this.
ग) होते काय, या प्रारंभीच्या अग्निगोलकात?
“अनेक फोटॉन्स (प्रकाश), इलेक्ट्रॉन्स व प्रोटॉन्स (हायड्रोजनचे दोन घटक), काही आल्फा-कण (हीलियमची केंद्रे), कमी संख्येतले ड्यूटेरॉन्स (ड्यूटेरियम या हायड्रोजनच्या समस्थानकाची केंद्रे) व सूक्ष्म प्रमाणात इतर प्रकारची केंद्रे – आणि एखादवेळी जाणवणारही नाहीत अशी न्यूट्रिनोंसारख्या ‘अदृश्य’ कणांची मोठी संख्या.”
The final implications of these calculations are that, spreading out in a uniform way throughout the entire universe, would be many photons (i.e. light), electrons and protons (the two constituents of hydrogen), some a-particles (the nuclei of helium), still smaller numbers of deuterons (the nuclei of deuterium, a heavy isotope of hydrogen), and traces of other kinds of nuclei — with perhaps also large numbers of ‘invisible’ particles such as neutrinos, that would barely make their presence known.
मला तरी यात ‘अतिघन असा चैतन्याचा बिंदू’ दिसत नाही. त्यातून ‘लहरी व नंतर कण’ घडले, असेही दिसत नाही. मुख्य म्हणजे, थत्त्यांच्या मांडणीत सर्व वैज्ञानिक मांडण्यांमध्ये आढळणारी “आजवरच्या निरीक्षण व प्रयोगांमधून दिसते ते असे, की”- ही सावध तात्पुरतेपणाची कबुलीही दिसत नाही. पेन्रोज वैज्ञानिक तत्त्वांमध्ये उत्कृष्ट (SUPERB), उपयुक्त (USEFUL) व तात्पुरते – चाचपडते (TENTATIVE) असे वर्ग पाडतो. ‘बिग बँग’ तत्त्वाला तो ‘उपयुक्त’ समजतो, जे वैज्ञानिकांचे प्रातिनिधिक मत असावे.
जेव्हा थत्ते ‘आधुनिक विज्ञान व औपनिषदिक तत्त्वज्ञान यांतील साम्यस्थळे’ मांडतात, तेव्हा विज्ञानक्षेत्रातल्या सावध तात्पुरतेपणाची दखल घ्यायलाच हवी; औपनिषदिक तत्त्वज्ञान आज आधुनिक विज्ञानासारखे दिसेल, उद्या दिसणारही नाही, ही शक्यता नोंदायलाच हवी; असे माझी विवेकबुद्धी मला सांगते. विशेषतः थत्त्यांची आधुनिक विज्ञानाची समज माझ्या वाचनाधारित समजुतीपेक्षा भिन्न आहे, तेव्हा त्यांच्या मांडणीबाबत सावध राहा, असे मला नोंदावेच लागणार. थत्यांच्या दहाकलमी यादीतले ६.ते ९. हे मुद्दे सजीव रचना कशा उद्भवल्या याबद्दल आहेत. त्यांपैकी “मी आहे, मी जगणार आणि मी माझी प्रतिकृती तयार करणार” ही त्रिसूत्री हेतू, इच्छा दर्शवते – ज्या गोष्टी चैतन्याला (म्हणे) नसतात. बरे, प्रजनन आणि प्रतिकृती करणे यांत फरक आहे – पण दोन्ही बाबी ८. क्रमांकाच्या मुद्द्यानंतर, जीवन निर्माण झाल्यानंतर येतात. चयापचय, मेटॅबॉलिझम यासाठी ‘उष्मांक मिळवण्याची प्रक्रिया’ हा शब्दप्रयोगही योग्य नाही – त्यात भूतमात्राची, matter ची देवाणघेवाणही होते.
इथे आइनस्टाइन (e = mc2) हा बचाव देता येत नाही. त्या समीकरणाद्वारे ऊर्जेपासून ‘वस्तू’ (भूतमात्र, matter) होणे, आणि भूतमात्रापासून ऊर्जा बाहेर पडणे, ह्या दोन्ही क्रियांचे आंशिक वर्णन होते. त्यातही असे व्यवहार अतिवेगवान हालचाल, अतिवस्तुमानाच्या रचना, यांच्यात होतात. साध्या अन्न पचवण्यात, चयापचयात त्यात होत नाहीत.
३) ‘चैतन्य (उपाख्य -आत्मा ?) हा सर्वांचा मूलाधार’ मानणाऱ्यास चैतन्यवादी म्हणतात. तसे थत्त्यांना म्हणण्याने मी त्यांचा उपमर्द केलेला नाही. ४) जेव्हा मी थत्यांना चैतन्यवादी म्हटले होते, त्यावेळचा माझा आक्षेप, की त्यांचे आधुनिक विज्ञानाचे आकलन अपूर्ण आहे, पुन्हा नोंदतो, झाले! – का. सं.]