दोन जमातींमध्ये सतत होणाऱ्या लढाया थांबवण्यासाठी पापुआ न्यू गयानातील आदिवासी भागातील आयांना अत्यंत क्रूर निर्णय घ्यावा लागत आहे. या लढाया थांबवण्यासाठी गेल्या १० वर्षांत जन्माला आलेल्या सर्व मुलांना मारून टाकण्याचा निर्णय या माता घेत असल्याचे इथल्या दोन महिलांनी एका स्थानिक वृत्तपत्राला सांगितले. गेली २० वर्षं पापुआ न्यू गयानातील ईस्टर्न हायलॅण्डस् या भागात सततच्या लढायांनी हे लोक त्रस्त आहेत.
रोना ल्यूक आणि किपीयोना बेलास या दोन महिलांनी एका शांततेसाठी भरवलेल्या बैठकीत ही माहिती दिली. या लढाया संपवण्यासाठी इथल्या मातांना अक्षरशः मनावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला आहे. एक महिला म्हणून गेली २० वर्षं चालत असलेला हा संहार थांबवण्यासाठी दुसरा कोणताच उपाय नाही, असे ल्यूकने पापुआ न्यू गयानामधील एका राष्ट्रीय वृत्तपत्राला सांगितले. पुरुषांमुळे स्त्रियांच्या जीवनाची पुरेशी वाताहत झाली आहे, असेही तिने या वेळी सांगितले. [लोकसत्ता (२१ जाने २००९) मधून, साभार.]