खरे तर नवपार्थाने आत्मसात् केलेला आधुनिकतावाद, ही गोष्ट, ज्या भावनांनी तो गीतासंहितेला अनुसाद/प्रतिसाद देतो, त्या भावनांच्या अभिव्यक्तीतून वाचकांना जाणवल्याखेरीज राहणार नाही. किंबहुना हृद्गत-वाचनाच्या अनुभवातून आधुनिकतावादही उमगणे हे जास्त समृद्ध करणारे आहे. अगोदरच कोरडी व्याख्या देण्याने काहीसा रसभंगच पत्करावा लागेल. ज्या वाचकांना संज्ञेपेक्षा भाव जवळचा वाटतो त्यांनी खालील मजकूर आत्ता टाळून हृद्गतवाचनानंतर तो वाचण्यात त्यांना लाभ आहे.
परंतु लेखकास, त्याने काय करायला घेतले आहे याबाबत पारदर्शक राहण्याचे, कर्तव्यही बजावायला हवेच. म्हणूनच उपशीर्षकापासून वापरलेल्या ‘आधुनिकतावाद’ या संज्ञेची सूत्रमय, संक्षिप्त व पारिभाषिक संज्ञांनी संपृक्त अशी रूपरेषा येथे देत आहे. ग्रंथाचा मुख्य विषय हा नसल्याने त्यांची अधिक उकल करून सांगणे येथे शक्य नाही. त्यामुळेही ती ओलांडून पुढे जाणे अधिक सुगम ठरू शकेल.
आधुनिकपूर्व व आधुनिक यात जरी कालक्रमही असला तरी तो गौण असून व्यापक जीवनसरणी म्हणून त्यांच्यात स्वरूपतः काय भेद आहेत हे महत्त्वाचे. अधिकच विद्रोही असलेल्या वाचकांना माझा आधुनिकतावादही जुनाट वाटू शकेल! तसेच आधुनिकतावाद ही सर्वसहमती प्राप्त असणारी संज्ञाच नव्हे. अनेक रंगांचे’ आधुनिकतावाद प्रचलित आहेत. त्यांपैकी प्रस्तुत लेखकाचा रंग कोणता हे माहीत असलेले बरे. त्या रंगाशी सहमत नसलेल्यांनाही हृद्गतातील आवाहन निदान जवळचे वाटेल एवढीच अपेक्षा आहे.
‘स्वधर्म’ या शब्दाच्या आधुनिकपूर्व अर्थापेक्षा आधुनिकतावादी अर्थ कसा वेगळा होतो यापासून सुरुवात करू. व्यक्तीला जन्मनियम व पूर्वदत्त असा जो भूमिकासंच ‘लाभतो’ त्यातील भूमिकांनुसार असणाऱ्या कर्तव्यांशी निष्ठा म्हणजेच आधुनिकपूर्व अर्थाने ‘स्वधर्म’. आधुनिकतावादी जीवनसरणीनुसार व्यक्तीचा भूमिकासंच हा कायमचा चिकटलेला नसून वेळोवेळी अर्जित केला जातो. भूमिकांचे आशयही बदलत असतात. हे आशय, निदान अंशतः तरी, देवाण-घेवाणीद्वारे पारस्परिक कर्तव्यनिश्चिती करण्यातून (करारांतून) ठरत असतात. यामुळेच व्यक्ती ही तिच्या भूमिकासंचात बुडून न जाता भूमिकासंचाला पुरून उरते. ‘स्वधर्म’चा हा आधुनिकतावादी अर्थ व्यक्तीची स्वतःप्रती असणारी कर्तव्ये असा बनतो. स्वधर्म आणि भूमिकाधर्म यांच्यात तोल राखण्याची कसरत आधुनिकतावादी व्यक्तीला करावी लागते. (व हा ताप टाळण्यासाठी आधुनिकांना ‘आधुनिकपूर्व’चे आकर्षणही वाटत राहते.) व्यक्तीची अनन्यता (जी अनन्यताच राहूनही, आयुष्यक्रमात काहीशी उलगडत व काहीशी घडविली जात असते) लक्षात घेऊन तिने अभिरुचि-संवर्धन, क्षमता-संवर्धन व क्षमतांचे इष्टतम उपयोजन करायचे असते. सतत उत्कर्षाचा ध्यास हा आधुनिकतावादानुसार दुर्गुण नसून सद्गुण मानला जातो. आधुनिक व्यक्तीला गतिमान स्वधर्म आणि गतिमान भूमिकाधर्म या दोहोंचे शोधन करत रहायचे असते.
आधुनिकतावादी व्यक्तीला विधिविधान म्हणजेच नैतिकता असे सोपे समीकरण मानता येत नाही. स्वतःच्या श्रेयश्चर्ने नैतिक निवाडे करत, प्रस्थापित विधिविधानांचे पालन/उल्लंघन, प्रस्थापन/नूतनीकरण करायचे असते. (येथे उल्लंघनात सत्याग्रही चळवळ अभिप्रेत आहे. भ्रष्टाचार व गुन्हेगारी नाही.) म्हणजेच आधुनिकतावादी व्यक्ती ही स्वरूपतःच ‘राजकीय व्यक्ती’ असते. परंतु वास्तवात तिचे राजकीय व्यक्तित्व प्रस्थापित सत्तासंतुलनात दडपले जात असल्याने तिला संघर्ष/समन्वय करत स्वतःच्या निवाड्यांचा प्रसार करावा लागतो. (इतरांचे निवाडेही समजून घ्यावे लागतात.)
आधुनिकतावादी जीवनसरणीनुसार स्वहितसाधना हे स्वतःच दुरित नसते. व्यक्तीच्या अंतर्गत स्वहितकल्पनेत येणाऱ्या विसंगती, पारस्परिक हितकल्पनांत येणाऱ्या विसंगती व ‘सर्वहित’ कल्पना आणि स्वहितकल्पना यात येणाऱ्या विसंगती कसकशा कमी करत नेता येतील हा श्रेयःसाधनेचा (दुरित सौम्यीकरणाचा) प्रश्न असतो. श्रेयश्चक्षूबरोबरच सुसंगती तपासू/शोधू/जुळवू शकणारी प्रज्ञाही प्रत्येक व्यक्तीला लाभलेली आहे, असे आधुनिकतावाद्यांचे गृहीतक असते. अर्थात् ही प्रज्ञा अद्याप पुरेशी जागृत व सक्षम झालेली नाही याची वास्तवदर्शी जाणीवही त्यांना असते. “स्वयंप्रज्ञ विचार करण्याचे धैर्य दाखवा’ ही आधुनिकतावादाची मुख्य घोषणा असते.
व्यक्तींना लाभणाऱ्या सत्ता, मालमत्ता, सन्मान व मनः पिंडात्मक-वृत्ति/क्षमता या सर्वसंपदांचे विषम वाटप झालेले असते. ते अंशतः कर्तृत्वावलंबी व अंशतः भाग्यावलंबी असते. कर्तृत्वावलंबी अंशात न्याय्य व अन्याय्य असे दोन्ही प्रकार असतात. असे असूनही, ‘माझ्या स्वातंत्र्याइतकेच अन्यांचे स्वातंत्र्य आदरणीय आहे.’ या जाणिवेने सर्व मानवी व्यक्तींना, मानवी व्यक्ती म्हणून समान प्रतिष्ठा असते. यामुळे इतरांच्या आत्मोद्धाराला वाव राहील याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य बनते.
आधुनिकतावादानुसार “माणूस हा मूलतः वाईटच असून त्याला वठणीवर आणणारी दंडशक्तीच आवश्यक आहे” हेही खरे नसते व “माणूस मूलतः चांगलाच असून त्याला मोकळे सोडले की तो आपोआप पारस्परिकतेने नांदेल” हेही खरे नसते. म्हणूनच ‘वठणीवर आणण्याचा’ भाग किमान राहावा, तो चांगुलपणाला वाव ठेवणारा राहावा व त्याचा आधार फक्त संघर्ष व त्यातून ठरणाऱ्या बल-संतुलनात न राहता चांगुलपणातही राहावा, हे तत्त्व स्वीकारावे लागते. लादणुकीवर आधारित सामाजिक संस्थांची जागा संमतीवर आधारित अशा सामाजिक संस्था घेत जातील असा आधुनिकतावादाचा संस्थात्मक कार्यक्रम बनतो.
आधुनिकतावादानुसार न्याय्यतेची प्रस्थापना हे माणसाचेच कार्य असते. पण ते करण्याच्या भरात अन्यायच वाढून बसू नये याचीही काळजी त्याने घ्यावयाची असते. भाग्याची कधीही ‘दैवी न्यायाशी’ किंवा काव्यगत न्यायाशीही गल्लत न करणे, भाग्यावलंबी भाग कमी कमी करत नेऊन कर्तृत्वावलंबी भाग वाढत जाईल असे भौतिक बदल करणे, कर्तृत्वावलंबी भागात न्याय्यता वाढत जाईल असे सामाजिक बदल करणे, शक्य तेथे भाग्यांचेही पुनर्वाटप करून त्यांची धार सौम्य करणे, उर्वरित भाग्य हे कटुता-सूडचक्र-असूया या दुरितांत न अडकू देता उमदेपणाने स्वीकारणे, अन्यायग्रस्तांचे सबलीकरण व दुर्भाग्यग्रस्तांचे सक्षमीकरण करणे, जन्म हा पूर्णतः भाग्यावलंबी असल्याने संधीची उपलब्धता जन्माधिष्ठित न राहू देणे, असा एकूण न्यायविषयक कार्यक्रम बनतो. ईश्वर, पुनर्जन्म, अतींद्रियशक्ती व चमत्कार या गोष्टी काही (बऱ्याच!) व्यक्तींच्या प्रकृतीनुसार त्यांच्या व्यक्तित्वविकासाला आवश्यक असतीलही, परंतु न्यायप्रस्थापनेच्या कार्यात व एकूणच नैतिक निवाड्यांमध्ये त्यांचा शिरकाव न होऊ देणे हे आधुनिकतावाद्याचे व्रत असते. मग त्यांच्या अस्तित्वाविषयी त्याचे मत काहीही असो.
आधुनिकतावादानुसार मानवी ज्ञान हे चुकतमाकत, शिकत जाणारे, नेहमीच अपूर्ण व सुधारण्याजोगे राहणारे असते. ते अंतिम कधीच नसते.पण याचा अर्थ असा नव्हे की ते व्यक्तिसापेक्ष/मनोदशासापेक्ष/परिप्रेक्ष्यसापेक्षच राहील. मानवी ज्ञानात सहमतीचा भाग लक्षणीयपणे मोठा आहे. ही सहमती केवळ सोयीस्कर सहमती नसून प्रत्येकाला ज्यात ‘हे मी कोणालाही पटवून देऊ शकेन’ हा आत्मविश्वास असेल असे हे समाईक ज्ञान असते. बिनतोड युक्तिवाद आणि कोणालाही पडताळा (मग तो बहिःसाक्ष्यच नव्हे तर अंतःसाक्ष्यही असेल) या आधारावर समाईक ज्ञान विकसित होत राहते. जे ज्ञान खासगी व व्यक्तिविशिष्ट असेल ते व्यक्तींना समजून घेण्यासाठी, वैविध्यांना सामावून घेण्यासाठी उपयुक्त, पण सार्विक नियम बनवण्यासाठी अनुपयुक्त मानले पाहिजे. कोणताही ज्ञानप्रस्ताव हा आव्हानित होण्यासाठी खुला असला पाहिजे. कोणाचाच शब्द किंवा अज्ञात स्रोतातून आलेला शब्द प्रमाण मानला जाता कामा नये. व्यवहारात विश्वासार्हता आवश्यक असल्याने ‘आप्तवाक्य’ प्रमाण ठरते. पण ही आप्तता कोणालाच कायमची बहाल केलेली नसते. आप्तता ही शब्देतर प्रमाणांनीच सिद्ध असली पाहिजे. सार्विक निकषांची कुन्हाड नवजात ज्ञानप्रस्तावांवर चालवू नये. पण हे अभयदान कायमसाठी नाही. नव्या ज्ञानप्रकारांना सामाईक ज्ञानात प्रवेश मिळविण्यासाठी, पुरेशी वाढ झाल्यानंतर, सार्विक निकषांना सामोरे जावेच लागेल.
प्रत्येक वक्त्यावर ही जबाबदारी हवी की त्याला आपल्या वक्तव्याची बोधगम्यता, तथ्यपूर्णता, औचित्य व मनःपूर्वकता समोरच्याला पटवून द्यावी लागेल. यासाठी प्रामाणिक संवाद निर्भीडपणे करण्याचे वातावरण हवे. संवादक्षमता वाढणे सर्वांनाच हितावह आहे. याचा अर्थ असा नव्हे की सामाईक ज्ञान हे ‘जनमत-चाचणीने’ ठरेल. संवादाद्वारे प्रत्येकाची अंतःप्रज्ञा (जी सामाईक मानवी प्रज्ञा आहे) जागृत व संतुष्ट करावी लागेल. संवाद तोडणारे चिंतन आणि चिंतनाला भरकटवणारे संवाद हे दोन्ही सारखेच धोक्याचे आहेत. स्वगतप्रज्ञा व संवादीप्रज्ञा यांची परस्परपूरक वाढ झाली पाहिजे.
साधनांतील प्रगतीने साध्यांतील उन्नती आपोआपच होईल हे जसे खरे नाही तसेच साध्यांतील उन्नती ही साधनांतल्या प्रगतीशिवाय स्वतःच होत राहील हेही खरे नाही. प्रगतीने मिळवून दिलेला वाव उन्नतीसाठी वापरणे/न वापरणे ही नैतिक निवडच राहील. नैतिकदृष्ट्या कितीही आदर्श कल्पना असली तरी तिला व्यवहार्यतेच्या कसोटीपासून मुक्तता नाही. मानवाच्या कथेला परिपूर्णता कधीच येणार नसली व तिच्यात चढ उतार होत असले तरी, एकूण दिशा आशादायक राहते अशी आधुनिकतावादाची पक्की धारणा आहे. माणसाला त्याच्या लौकिक समस्यांच्या पलिकडे जाण्याचा, ऐहिकाच्या पार होण्याचा ध्यास असतो. मानवमतिगम्य अशा जगाच्या पलीकडील परमतत्त्वाचा शोध घ्यावासा वाटतो. स्वतः परिपूर्ण बनणे शक्य नसले तरी परिपूर्ण अस्तित्वाचे चिंतन करणे थांबवता येत नाही. जगतावर अवलंबित नाही अशा आत्मतृप्त अवस्थेत पोहोचण्याचे आवाहन त्याला साद घालीत असते. ‘कैवल्याच्या चांदण्याला’ भुकेला असा हा चकोर फक्त चांदण्यावर जगू मात्र शकत नाही. त्यामुळे त्याच्या धडपडीला ऐहिक व पारमार्थिक अशी अंगे असतात. आधुनिकतावाद आणि परमार्थ यांच्यात माझ्या मते पूरक संबंध शक्य आहे. ही पूरकता कशी शक्य आहे? हाच या ग्रंथाचा एक महत्त्वाचा विषय असल्याने त्याचे उत्तर येथे मांडणार नाही. येथे याबाबतीत एवढेच सांगू इच्छितो की आधुनिकता-वादाच्या काही प्रवाहात जडवाद, उपयुक्ततावाद, निरीश्वरवाद व फक्त विज्ञानाशीच निष्ठा या गोष्टी जणू काही आधुनिकतावादी राहण्यासाठी आवश्यक पूर्व अटी आहेत असे गृहीत धरले जाते. परंतु माझ्या मते हे आवश्यक नाही उलट घातकच आहे. तसेच मानवातील या सच्च्या ध्यासाला ‘सत्ताधाऱ्यांचा सोयिस्कर प्रचार’ समजणे हे तर अधिकच उथळपणाचे आहे. आंग्लेतर युरोपीयांची तत्त्वज्ञानातील चळवळ भारतात (मार्क्स वगळता) कमी पोहोचली या दुर्दैवी योगायोगामुळे आधुनिकतावादाचे एक संकुचित (जडवाद उपयुक्ततावाद-विज्ञाननिष्ठा व अध्यात्मविरोध) प्रारूपच प्रचलित झाले. परंतु सखोल व समृद्ध आधुनिकतावाद असा संकुचित नाही. तसेच उलट्या बाजूने, अध्यात्म हे देखील ऐहिक अभ्युदयाला मारकच असू शकते हेही खरे नाही. किंबहुना प्रवृत्तिवादी परमार्थ, इहवादी आत्मविद्या शक्य आहे हाच नवपार्थहृद्गताचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे.
आधुनिकतावादाची वरील रूपरेषा ही सर्वांगस्पर्शी झालेली नाही. तिच्यात स्त्री-पुरुष, राष्ट्रकल्पना यांसारखे कित्येक विषय थेटपणे आलेले नाहीत. परंतु येथे आधुनिकतावाद या विषयावर ग्रंथ लिहायचा नसून लेखकाने स्वतःच्या भूमिकेविषयी पारदर्शक राहण्याचे कर्तव्य बजावणे एवढाच मर्यादित हेतू आहे. या मर्यादित हेतूने वरील रूपरेषा पुरेशी ठरावी असे वाटते.
शोधन समीपार्थी इंग्लिश शब्दसूची व इंग्लिश टीपा: ‘आधुनिकतावादी’ या संज्ञेत प्रस्तुत लेखकास काय अभिप्रेत आहे ?
आधुनिकतावाद – modernism (contemporary phase of the unfinished enlightenment project’)
जीवनसरणी – way of life
स्वधर्म(आधुनिक पूर्व) – loyalty to one’s station (ascribed, & birth based permanent role-set)
स्वधर्म (आधुनिक) – commitment to one’s own self search & realizing the project emerging out of one’s unique individuality.
अर्जित – earned, achieved,
भूमिकाधर्म (आधुनिक) – commitment to dynamic roleset & honoring of the contracts. search for integration (& not ‘purification’)
विधिविधान – legislation
श्रेयश्चक्षु – faculty of conscience (intuitive)
सत्याग्रह – violating a law with prior notice, pleading ‘guilty’ & accepting punishment, inducing soul searching in the advocates of the established law.
नैतिक निवाडा — moral judgement.
स्वहितसाधना — pursuing self-interest
स्वतःच दुरित – per se evil
अंतर्विरोध – internal conflict (yet unresolved)
प्रज्ञा – faculty of Reason (g’w{°$H$Vm amenability to reason)
संपदा — assets
कर्तृत्वावलंबी — dependant on human endeavor
भाग्यावलंबी — fortuitous.
ग्रस्त — aggrieved party, victim
उमदेपणा — elegance
न्याय्यता – fairness
सबलीकरण- empowerment
सक्षमीकरण – enablement
नीतिशास्त्रीय इहवाद – ethical secularism (disregarding the universally irredeemable metaphysical claims in axioms of ethic) सुधारण्याजोगे – corrigible (not implying relativism)
आव्हानित होण्याजोगे – contestable
बिनतोड युक्तिवाद – logical demonstration
कोणालाही पडताळा – universal testability
बहिःसाक्ष्य – available to sensory intuition
अंतःसाक्ष्य – available to cognitative intuition
शब्दप्रामाण्य – surrendering validation to scriptures
आप्तवाक्य – communication from person who has proved her trustworthiness
बोधगम्यता – intelligibility
तथ्यपूर्णता – factual truth
औचित्य – propriety, (validity based on mutually accepted norms)
मनःपूर्वकता – authenticity.
स्वगतप्रज्ञा – monological Reason
संवादीप्रज्ञा – dialogical Reason
साधनातील प्रगती – progress in means
साध्यांमधील उन्नती – benevolence in ends
इहापार जाण्याचा ध्यास – quest of transcending the pragmatic realm
परमतत्त्व – ultimate principle available to speculation or ‘revelation’ (divine)
आत्मतृप्त अवस्था – contendedness irrespective of worldly situation.
कैवल्याचे चांदणे – bliss of the Absolute.
आंग्लेतर युरोपीय – continental (philosophy)
सखोल आधुनिकतावाद – modernism that is not restricted to ‘ materialism, utilitarianism, scientism, positivism’
इहवादी आत्मविद्या – spiritual pursuit that is in tune with ethical secularism
प्रवृत्तिवादी परमार्थ – Idea of final Telos that is in tune with endeavor orientation.
निवपार्थहृद्गत मधून लेखकाच्या परवानगीने –