घारपांडेना मिळालेल्या इंटरनेटवरील प्रतिक्रिया विकास देशपांडे, बोस्टन
“परमसखा मृत्यू: किती आळवावा….” लेख वाचताना मला पटकन आठवले ते भा. रा. तांब्यांचे आणि लताच्या आवाजात स्वरबद्ध झालेले सुप्रसिद्ध गीत: “नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते, फिरते. कळे मला तू प्राणसखा जरि, कळे तूच आधार सुखा जरि, तुजवाचून संसार फुका जरि… मन जवळ यावया गांगरतें”.
शाळेत या गाण्याचा अर्थ समजला की तांबे ही कविता साक्षात् मृत्यूस आपला नवरदेव आणि स्वतःस त्याची नववधू म्हणत मृत्यूस एकीकडे कवटाळण्यासाठी आतुर तर दुसरीकडे थोडे लांबूनच… अशी अवस्था वर्णन करीत आहेत. वरील लेखात, लेखिका म्हणते की, “.. बहुतेक वृद्धांशी चर्चा केली तर त्यांची प्रतिक्रिया “नको रे बाबा एवढं लांबलचक आयुष्य!” अशीच असते.” पण एक प्रश्न त्याच व्यक्तींना विचारायला हवा की “जर इतके लांबलचक आयुष्य नको असेल, तर मृत्यू कधी हवा आहे ? आज आला तर चालेल का उद्या ? का तशी वेळ आत्ता सांगता येत नाही?” मला वाटते की बहुतांशी माणसांना मृत्यू हा अनिश्चित काळात कुठेतरी दूरवरच हवा असतो, अगदी कितीही लांबलचक आयुष्य नको असले तरीदेखील.
लेखात जी काही भारतीय उदाहरणे आली आहेत त्याबद्दल पण ‘इच्छामरण’ यापेक्षा जरा वेगळे म्हणावेसे वाटते. (सन्मान्य आणि दुर्दैवी अपवाद साने गुरुजींचा, ज्यांचे मरण हे कायद्याच्या दृष्टीने आत्महत्या या सदरात मोडणारे होते.) महाराष्ट्रापुरते गेल्या शतकात तीन विनायक होऊन गेले ज्यांनी ‘प्रायोपवेशन’ हे आयुष्यात परिपूर्ती झाल्यावर स्वीकारले. एक सावरकर, दुसरे विनोबा भावे तर तिसरे कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे विनायकराव (आडनाव विसरलो). पण त्या तिघांनी स्वतःची कर्तव्ये पूर्ण झाल्यावर हळूहळू जीवनावश्यक गोष्टी त्यागून मरण स्वीकारले. मला आठवते आहे की विनोबांनी जेव्हा प्रायोपवेशन करायचे ठरवले तेव्हा काहीजण कोर्टात धावले होते, ही आत्महत्या आहे म्हणून. काय झाले ते माहीत नाही पण ती आत्महत्या ठरली नव्हती. अर्थात हा झाला कायद्याचा मुद्दा. ज्ञानेश्वर आणि हे तीन विनायक हे सन्मान्य अपवाद. त्यांनी केले म्हणून इतरांनी ते करावे अथवा इतर ते करू शकतील अशातला भाग नाही. किंबहुना महाराष्ट्रात इतका मोठा संतसंप्रदाय झाला पण संजीवन समाधी ही एका ज्ञानेश्वरांपुरतीच मर्यादित राहिली. त्याचे डोळस अथवा अंधानुकरण, योग्यता असूनही इतर संतांनी केले नाही…
ज्यांनी स्वतः मरण स्वीकारले नाही अशा थोरामोठ्यांची गेल्या दीडेक शतकातील उदाहरणे पाहिल्यास काय दिसते ? * टिळक हे जीवनाच्या अखेरीस भान हरपण्याच्या क्षणापर्यंत देशाचा विचार करत होते, त्यांच्या शेवटच्या बडबडण्यामध्ये पण तेच येत होते…. * भगतसिंग फासावर जाण्याआधी सोशालिस्ट क्रांतिवरील पुस्तके वाचत होता जरी त्याला मरण जवळ आले आहे व नास्तिक असल्याने पुढे काहीच नाही ही भावना होती तरी… * स्वतः दुर्गा भागवत, ज्या ऋषितुल्य विदुषी होत्या, त्यांनीदेखील आयुष्य संपवताना निसर्गावरच भरवसा ठेवला आणि नव्वदीतपण ग्रंथसंपदा तयार करत राहिल्या. * १९ व्या शतकाच्या शेवटी रामकृष्ण परमहंस हे घशाच्या कर्करोगाने ग्रस्त होते पण त्यांनी आयुष्य स्वतःहून संपवले नाही, जरी ते कधी संपणार आहे याची त्यांना कल्पना आली होती आणि मनाची पूर्ण तयारी झाली होती. * रा.स्व.संघाचे गोळवलकर गुरुजी हेदेखील कर्करोगाने ग्रस्त होते, पण त्यांनी त्यांच्या तत्त्वांसाठी आणि संघटनेसाठी कार्य चालू ठेवले. जेव्हा कल्पना आली, त्या क्षणाला मात्र तुकारामाचा अभंग लिहिला आणि सर्वांना नमस्कार करत खुर्चीवर बसून प्राण सोडला पण प्राणत्याग केला, असे काही म्हणता येणार नाही.
*याच गोळवलकर गुरुजींचे गुरुबंधू आणि रामकृष्ण परमहंसांच्या परिवारातील दुसऱ्या पिढीतील, आता ९६ वर्षांचे स्वामी सर्वगतानंद हे १९३५ सालापासून रामकृष्ण मठाचे काम करत आहेत. १९५४ सालापासून अमेरिकेत वास्तव्य केले आहे. त्यांनी आता रामकृष्ण मठाच्या सक्रिय कामकाजातून सहभाग काढला आहे, पण सल्लागार म्हणून काम करत राहतात. जगण्याची कदाचित इच्छा नसेलही, पण आपणहून मरण कवटाळणे त्यांनी स्वीकारलेले नाही… * गांधीजी म्हणायचे की “मी १२० वर्षे जगणार आहे”. ते तसे जगलेही असते आणि अथक कार्य करत राहिले असते.
ही विविध वृत्ती/निष्ठांची उदाहरणे इतकेच सांगतात की जगण्याला सकारात्मक बळ मिळण्यासाठी मृत्यूची शाश्वती लागत नाही, तर आयुष्यात काही तरी ध्येय लागते. ते प्रत्येकाचे वेगळे असू शकते. कुणाचे स्वतःपुरते मर्यादित तर कुणाचे जगाचे कल्याण करणारे. दोन्हीचे महत्त्व हे आयुष्य परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोणातून कमी होत नाही.
आता मुद्दा इच्छामरणाचा. त्याचा कायदा केल्यास, मला कायम गंमतीत म्हणावेसे वाटते की एकाच्या इच्छेने दुसऱ्याचे मरण होणे वाढेल की काय! अर्थात म्हणूनच त्याला स्वेच्छामरण पण म्हणत असतील! हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे हे लेखिकेने पण मान्य केले आहेच. जेव्हा भारत अंतराळक्षेत्रात मोठा होतो अथवा पोखरण २ आणि आता आण्विक करार करत महासत्ता बनत असतो तेव्हा बऱ्याचदा वाटते की अजून मूलभूत प्रश्न आपण सोडवलेले नाहीत, तर असल्या उड्या कशाला? कुठे तरी असेच स्वेच्छामरणासंदर्भात म्हणावेसे वाटते की आपण समाज म्हणून सध्याच्या काळात अजून इतके परिपक्व झालो आहोत का? जर नसलो तर हा कायदा करण्याची गरज काय ? मला स्वेच्छामरणाची तुलना ही वैद्यकीय गरज नसताना केल्या गेलेल्या सिझेरीयन बाळंतपणाशी करावीशी वाटते.
मी मरणोन्मुख व्यक्ती ज्या ‘जीवनाधार कृत्रिम व्यवस्थेवर केवळ हृदय आणि डोके चालू आहे असे यंत्रावरील आलेखामुळे कळते त्या व्यक्तींबद्दल बोलत नाही. त्यांच्या संदर्भात वेगळे निकष त्या व्यक्तींनी आधीच लिहून ठेवलेल्या इच्छेवर अथवा जवळच्या नातेवाईकांच्या म्हणण्यावर ठरवणे महत्त्वाचे वाटते. त्यासाठी योग्य अशा कायदेशीर तरतुदी असाव्यात. पण म्हणून वयाच्या साठीनंतर जर हातपाय धड असतील तर उगाच स्वेच्छामरण असणे नको वाटते. पण असे दुर्दैवी प्रसंग सोडल्यास सर्वसामान्य माणसाने जे आयुष्य स्वेच्छेने मिळाले नाही ते ‘स्वेच्छेने’ म्हणत, पण बहुतांशी ‘अनिच्छेपोटी’ निराशेने संपवणे हे श्रेयस्कर वाटत नाही तर मिळालेल्या आयुष्याचा स्वतःसाठी उपभोग आणि इतरांसाठी यथाशक्ति उपयोग करत ते घालवावे असे वाटते. त्यालाच वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम म्हणता येऊ शकेल.
प्रियाली (बुध, ०८,१३,२००८-०२. ०
मानले तरी सतत मरणाचा विचार कर
नाले आहेत पण त्याला बहुताशवळा
मरण हे एकमेव शाश्वत सत्य आहे असे मानले तरी सतत मरणाचा विचार करून मनुष्य जगत नाही हे देखील सत्यच आहे. वेळ-काळ योजून जनन नियोजित करता येते त्याप्रमाणे मरणही नियोजित करता यावे, तो हक्क त्याला बहाल करण्यात यावा, यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले आहेत पण त्याला बहुतांशवेळा अपयशच मिळाले आहे. इच्छामरण आणि दयामरण हे दोन वेगळे प्रकार आहेत असे वाटते.
इच्छामरण मागण्यासाठी/अवलंबण्यासाठी मनुष्य हा मानसिक दृष्टीने सक्षम असायला हवा. आपण स्वेच्छामरणाचा निर्णय घेतो आहोत यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा. सदर कृत्य तो एखाद्याच्या सांगण्यावरून किंवा भरीला पडल्याने करत नाही हे त्याला सिद्ध करून देता यावे. सदर निर्णय झटक्यात घेता येणार नाही हे लक्षात घेता, व्यावहारिकष्ट्या ही गोष्ट किंचित कठीण वाटते. आत्महत्या हा पलायनवाद झाला. अत्यंत निराशेपोटी माणूस तो अवलंबतो परंतु त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन अयोग्य वाटते. इच्छामरणाला आत्महत्या म्हणावे का याबाबत शंका वाटते. आत्महत्या ही बहुधा गुप्तता राखून किंवा मागचा पुढचा विचार न करता झटक्यात घेतलेल्या निर्णयाने केली जाते. इच्छामरणासाठी आपली आणि आपल्या आप्तांची मनाची तयारी करून देणे गरजेचे वाटते. भीष्माने जे अवलंबिले ते इच्छामरण, कारण शरशय्येवरूनही ते पांडवांना उपदेश करत राहिले व इतरांना पूर्ण कल्पना देऊन प्राण त्यागला.
सावरकरांचे मरण हे इच्छामरणच असावे. मी आणखीही काही वृद्धांना पाहिले आहे. त्यांची वासना कमी होत जाऊन अन्नपाण्याचा त्याग केला जातो, हे घडताना पाहिले आहे. त्यावर कायदा आक्षेप घेतो असे दिसत नाही. परंतु हे न होता, आपले मरण इतरांनी आपल्याला बहाल करावे असा विचार म्हणजे इतरांकडून आपला खून करवून घेणे आहे.
दुर्गाबाईंनी (भागवत) म्हटल्याप्रमाणे ज्याच्या नशिबाला असह्य शारीरिक वेदना आहेत; ज्याच्या मानसिक भौतिक संवेदनांचा अंतच झालेला आहे, किंवा ज्याचे जगून संपले आहे त्याला जर सुटका हवी असेल, तर त्याला लोळत घोळत दीनवाणे मरण येण्यापेक्षा, सन्मानाने विनायातना चटकन मरण येणे हा त्याचा हक्क आहे, असे मी मानते.
प्रत्येक माणसाची सहनशक्ती वेगवेगळी असते. कॅन्सरमुळे होणाऱ्या असह्य वेदनांतूनही आनंदी राहण्याचा प्रयत्न करणारी एक लहान मुलगी मी पाहिली आहे तर अर्धशिशीमुळे जीव द्यावासा वाटतो म्हणणारी प्रौढ माणसेही पाहिली आहेत. यावरून शारीरिक वेदनांचे आणि सहनशक्तीचे मापदंड ठरवणे कठीण वाटते. विनायातना मरण यावे ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु वैद्यकी पेशाला ती साजेशी गोष्ट वाटत नाही. खुट्ट झाले की मरण पाहिजे असे लोक म्हणू लागले तर वैद्यकशास्त्राचा हा पराभव मानावा लागेल. वैद्यकशास्त्र सहसा माणसाचे जीवन सुकर व्हावे या हेतूने कार्य करते.
अमेरिकेत राहून ८० वर्षांचे वृद्ध प्रवास करतात. खेळतात, प्रेमात पडतात, लग्न करतात, त्यांचे मला अतिशय कौतुक वाटते. जगात प्रत्येकाला आपण आणि आपले आप्त हे अमरत्वाचा पट्टा घेऊन अवतरले आहेत असे वाटत असते. आपल्या मृत्यूची घटका जवळ आल्याचे लक्षात येताच ती लांबवावी कशी याचा विचार सर्वसामान्य माणसांच्या मनात येतो. कधीतरी निराशेपोटी मरणाचा विचार मनात आला तरी प्रत्यक्ष आत्महत्येपर्यंत पोहोचणारी माणसे अतिशय थोडकी असतात आणि तसा प्रयत्न केला/फसला म्हणून पुन्हा पुन्हा करणारी त्याहूनही कमी असतात. जी असतात त्यांना मानसिक व्याधी असल्याचे मानले जाते. लेखात आलेल्या सॉक्रेटिसच्या उदाहरणावरून पाश्चात्त्य जगात आत्महत्येला प्रतिष्ठा होती असे वाटत नाही. साँक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा झाली होती आणि तीतून सुटण्याचे मार्ग नाकारत त्याने दिले गेलेले हॅम्लॉक प्याले अशी कथा वाचण्यास मिळते. समाधी या मृत्यूला मात्र प्रतिष्ठा असावी परंतु तीदेखील संन्यास घेतलेल्यांसाठीच मर्यादित असावी असे वाटते. अशाप्रकारे जपानमधील सामुराई योद्ध्यांनाही प्रसंगी आपले प्राण घेण्याचे शिक्षण दिले जाई, परंतु तेही त्या गटापुरतेच मर्यादित वाटते, समाजसंकल्पना वाटत नाही.
दयामरणाचे मला वाटते दोन प्रकार असतात स्वसंमतीने मागितलेले दयामरण आणि परसंमतीने अंमलात आणलेले दयामरण. यापैकी स्वसंमतीने मागितलेले दयामरण हे इच्छामरणाशी जुळते. परसंमतीने अंमलात येणाऱ्या मरणाबद्दल मात्र कायद्याने बंधने येतात. ब्रेनडेथ, मरगळलेल्या भाजीसारख्या किंवा तत्सम अवस्थेत असलेल्या रुग्णाला डॉक्टर्स, कुटुंबीय आणि कायदा यांच्या सहाय्याने दयामरण देणे एकवेळ ठीक परंतु अशक्यप्राय परिस्थितीतूनही परत येणारे रुग्ण आहेतच.
जननात हस्तक्षेप झाला म्हणून मरणात हस्तक्षेप करावा ही वैद्यकशास्त्रामागील शुद्ध हेतूची धारणा नसावी (चू.भू.दे.घे.) मरणासन्न जीवाला दयामरण द्यायचे झाले तर कोणता मार्ग अवलंबला पाहिजे यावर मतभेद दिसतात. मरणप्राय रुग्णाचा जीवनाधार काढून घेणे हे डॉक्टरने करणे म्हणजे फाशीची शिक्षा अंमलात आणणाऱ्या जल्लादाप्रमाणे झाले असा मतप्रवाह दिसतो. तर, देण्यात येणारे उपचार हळू हळू कमी करून मृत्यु द्यावा असा दुसरा विचारप्रवाह दिसतो.
स्वेच्छामरण/इच्छामरण या कल्पना सुखदायी वाटल्या तरी कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने त्यात बऱ्याच अडचणी निर्माण होणे शक्य आहे आणि जगातील कोणताही समाज अद्याप या कल्पना राबवण्यास तयार नाही.
प्रेषक धनंजय (बुध, ०८/१३/२००८-०८-२४)
गलिव्हर लापुटा बेटावर जातो तेव्हा तिथल्या लोकांशी गप्पा मारताना त्याला समजते की त्या बेटावरचे काही लोक जन्मतःच चिरंजीव म्हणून जन्माला येतात. गलिव्हर त्यांच्या सौभाग्याबद्दल अत्यंत आनंदित होतो इतके आयुष्य असते तर कोणी ते कसे सत्कारणी लावू शकते असे बडबडू लागतो. त्याच्याशी बोलणारा त्याला सांगतो की चिरंजीवी असण्यासारखे दुर्दैव नाही.भावंडे, मित्रमंडळी सर्व मरून जातात. पिढी बदलते तशी भाषा बदलते. विचारसरणी बलते. चिरंजीवी व्यक्ती एकाकी पडते. एका शतकातला चिरंजीवी दुसऱ्या शतकातल्या चिरंजीवीलाही समजून घेऊ शकत नाही, मग अल्पायुषी नव्या पिढीतल्या लोकांशी कसे जमणार… इ.इ.
मंजिरी घाटपांडे यांनी फार विचार करून हा लेख लिहिलेला आहे. आणि अनेक प्रतिसादकर्त्यांनी विचारपूर्वक माहिती जोडलेली आहे. जाता जाता माझे मत असे की असामान्य व्यक्तींसाठी एक कायदा आणि आम्हा सामान्यांसाठी वेगळा हे ठीक वाटत नाही. ‘अ’सामान्यांचा जीवनक्रम पटल्यास अनुकरणीय मानण्यात त्यांचा आदरच आहे. न पटल्यास त्यांचेही वागणे चुकले म्हणण्यातच त्यांचा आदर आहे.
‘इच्छामरणा’बद्दल कायदे कार्यक्षम असू शकतील का याबद्दल केवळ कल्पनांचेच खेळ करण्याची गरज नाही. विश्लेषणही केले जाऊ शकते. अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात ‘डेथ विथ डिग्निटी'(आत्मसन्मानात मृत्यू) हा कायदा गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. त्याच्या अंमलबजावणीबद्दल आकडेवारी राज्यसरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
[धनंजय म्हणजे आजचा सुधारक-डिसेंबर २००७ “विज्ञानाबाबत माझी पूर्वपीठिका” लिहिलेले बाल्टिमोरचे धनंजय वैद्य.]
प्रेषक विकास (बुध, ०८/१३/२००८-०९:५८)
अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात ‘डेथ विथ डिग्निटी’ (आत्मसन्मानात मृत्यू) हा कायदा गेली अनेक वर्षे कार्यरत आहे.
इच्छामरण हा शब्द आणि त्यासंबंधीची चळवळ आठवते त्याप्रमाणे ‘मंडलीक’ नावाच्या व्यक्तीने महाराष्ट्रात आणि भारतात चालू केली होती. त्यांचे म्हणणे होते की वयाच्या पंचाहत्तर वर्षांनंतर धडधाकट असले तरी मरण घेता यावे. त्यांनी स्वतःच्या बाबतीत तसे कायदा मोडून केले देखील. आक्षेपाचा मुद्दा आहे तो या संदर्भात.
असामान्य व्यक्तींची उदाहरणे हेच दाखवतात की सर्व असामान्य व्यक्ती मृत्यूस कवटाळत नाहीत तर त्यातील सन्मान्य अपवादच तसे करतात आणि तरीदेखील इतर त्यांचे त्याबाबतीत अनुकरण करत नाहीत. या अपवादात्मक व्यक्तींनी एकतर योगसमाधी घेतली अथवा प्रायोपवेशन (ज्यात हळू हळू अन्न, पाणी सोडत प्राण सोडला जातो).. पहिले करायला योगशास्त्रसंपन्न हवे, तर दुसरे करायला कोणीच अडवीत नाही आणि त्यासाठी कायद्याची गरजच नाही. शिवाय त्यात हळूहळू मृत्यूस सामोरे जाणे असल्याने खरा निर्धार असल्याशिवाय तो संकल्प कोणी तडीस नेऊ शकत नाही… जन पळभर म्हणतील
प्रेषक चाणक्य (बुध, ९८/१३/२००८-१०:४७)
इच्छामरण म्हणजे काय ? त्यापेक्षा आपण मरणाची व्याख्या समजून घेणे गरजेचे आहे. या व्याख्येला वेगवेगळे पैलू आहेत. मानवी जीवनाचा अंत, आत्मा शरीर सोडून जातो वगैरे वगैरे… एक अर्थ जबाबदाऱ्यांपासून कायमची नैसर्गिक अथवा अनैसर्गिक मुक्तता. काही लोक आपले आयुष्य ध्येयाने पेटून जगतील. ध्येय गाठल्यावर कोणाला जर असे वाटले की आता माझ्या जगण्याचे कारण संपले, तर मग आनंदाने मरण पत्करायचा मार्ग जर कोणी अन्नपाणी सोडून निवडला तर काय चूक आहे? त्यासाठी कायदा कशाला हवा? तसेच असलेल्या ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या संकटांना कंटाळून कोणी हाच मार्ग अवलंबला तर ? अनेकदा कोणी अचानक मृत्यू पावल्यास असे म्हटले जाते की बघा हो, बऱ्याच जबाबदाऱ्या आता यांच्यावर सोडून गेला/गेली. मला वैयक्तिकरीत्या वाटते की माणसाला मरण पत्करत असताना त्याच्या जबाबदाऱ्यांची जाणीव ही मरण योग्य/अयोग्य ठरवते.
कायदा म्हटले की पळवाटा या आल्याच, तसेच त्याचा गैरवापर आलाच. ज्याला मृत्यूला कवटाळायचेच असेल तो आपला मार्ग कसाही स्वीकारतो. मग एखादा सैनिक देखील गोळ्यांची बरसात सुरू असताना शत्रूवर हल्ला करण्यातून इच्छामरण स्वीकारतो असे म्हटले पाहिजे. असे म्हणायला हवे की देशाच्या रक्षणाच्या वरकरणी कारणासाठी इच्छामरणाची व्यवस्था कायद्याने केली आहेच. याउलट ज्याला फाशीची शिक्षा झाली आहे पण जगण्याची इच्छा आहे, त्याचे काय ? त्याच्यासाठी उलट कायदा ? त्या गुन्हेगाराने केलेला गुन्हा हा त्याच्या भावनांचा अतिरेक समजून वेगळी शिक्षा द्यावी. सक्तीच्या मरणाचा कायदा का? कायदा म्हटले की समाज येतो, समाज म्हटले की एक चौकट येते. आता या चौकटीत मृत्यू समाजाला सहजासहजी पचनी पडत नाही. म्हणून पचनी पाडण्यासाठी कायद्याची गरज हीच मुळी अट्टाहासाची गोष्ट आहे. ज्याला हसत मृत्यू स्वीकारायचा आहे त्याने वर लिहिलेले मार्ग अवलंबावेत. तुमच्या मानसिक कमकुवतपणावर पांघरूण घालायला कायद्याची चादर हवी हे मात्र पटत नाही.
प्रेषक यनावाला (बुध, ०८/१३/२००८ – १५:०४)
जैनधर्मीयांचे सरासरी आयुर्मान इतरांहून अधिक असते (पूर्वी होते). (कदाचित् याला शाकाहार कारणीभूत असू शकेल). त्यामुळे वृद्धांची संख्या सतत वाढणारी. जैन समाजधुरीणांनी या समस्येवर विचार करून संथारा या धार्मिक व्रताची निर्मिती केली असावी. या व्रताचे नियम माहीत नाहीत. पण हा प्रायोपवेशनाचाच एक प्रकार आहे. धार्मिक अधिष्ठानामुळे या व्रताला समाजमान्यता आणि प्रतिष्ठा आहे. हे धर्माचरण असल्याने इथे आत्महत्येच्या अपराधाचा प्रश्न उद्भवत नाही. व्रतधारक व्यक्तीला धार्मिकतेचे पाठबळ असते. त्यामुळे मानसिक तयारी होते. इच्छामरणाचा कायदा झाला नाही तर जैन धर्म स्वीकारणे हा चांगला पर्याय ठरावा असे वाटते. अशा धर्मपरिवर्तनाविषयी काहीच माहिती नाही. पण ते शक्य असावे असे वाटते. वृद्धापकाळामुळे व्यक्ती परावलंबी झाली, अंथरुणाला खिळून राहिली की ते भारभूत जगणे नकोसे होणे साहजिकच आहे. अशावेळी मृत्यू विनायातना आणि सन्मानपूर्वक यावा यासाठी इच्छामरणाचा कायदा आवश्यक आहे. जैन धर्माचा स्वीकार हा नंतरचा पर्याय आहे. [ यनावाला म्हणजे पुण्यातील तर्कक्रीडा व शब्दकोडी लिहिणारे श्री. य. ना. वालावलकर]
प्रेषक सहज (मंगळ, ०८/१२/२००८-०६:४४).
गेल्या आठवड्यात एका इस्पितळात गेलो असताना तिथे रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरवरून उतरवून नेत असलेले जराजर्जर वृद्ध पाहून ‘परमेश्वरा, हे असे व्हायच्या आत उचल’ हा विचार आलाच. (अगदी या वयातदेखील) कदाचित ‘वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या भीतीपोटी आला असेल’ पण परावलंबी असलेले आयुष्य नकोच.
प्रेषक चितर (मंगळ, ०८/१२/२००८-०८:२७).
माणसाला अमर होण्याची नैसर्गिक इच्छा असते. पण चिरंजीव झाल्यावर त्याला नैसर्गिक अंकुर फुटणार नाहीत. ते अमरत्व प्रवाही नसणार. ते अमरत्व कोमेजणार नाही पण ते फुलणार, फळणारही नाही, असाच इशारा द्यायचा असावा. आपण गॅब्रियल गार्शिया मार्केजच्या शब्दांत ‘लिमिटेड इमॉरटॅलिटी’ जगण्याचा प्रयत्न करत असतो. असो. लेख चांगला झाला आहे. कालच ‘सुधारका’त वाचला. इथे प्रतिसाद देतो आहे.
प्रेषक लिखाळ (मंगळ, ०८/१२/२००८-०८:४२).
जपानमध्ये हराकिरी करून मृत्यू पत्करणे सन्माननीय समजत असत. हा इच्छामरणाचाच प्रकार. मरणाऱ्या माणसावर असलेल्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा विचार करून आत्महत्या योग्य की अयोग्य हा त्या विवक्षित घटनेच्या ऊहापोहाचा भाग झाला. प्रायोपवेशन, समाधी याबाबतीत सर्वंकष विचार करून निर्णय घ्यायला तो मनुष्य त्या वेळी स्थिरबुद्धी असतो असे वाटते. पण नैराश्यापायी घेतलेला निर्णय अनेकदा अविचार असू शकतो. तो क्षण टळल्यानंतर ‘बरे झालो मेलो नाही!’ असे वाटणेसुद्धा शक्य असते. पण जगायचा कंटाळा आल्यावर अथवा जगण्यातले वैयर्थ्य जाणवल्यावर जगणे थांबवावेसे वाटणे हे मला योग्यच वाटते. कायद्याचा अयोग्य वापर होईल असे वाटल्याने इच्छामरणाचा हक्कच नाकारणे हे मला योग्य त-हेने कायदा बनवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यांतील त्रुटींवर व अक्षमतेवर पांघरूण घालणे आहे असे वाटते.
प्रेषक १६ विक्षिप्त अदिती (मंगळ, ०८/१२/२००८-१०:०२).
जगातील बहुतक धर्मांनी आत्महत्या हे पाप मानले आहे.
प्रश्न असा की धर्म माणसासाठी आहे का माणूस धर्मासाठी?
पत्रचर्चा किशोर वानखडे, पाटील नगर, वर्धा ४४२ ००१. फोन ९८८१४८८७५६
मृत्यू एक निरंतर प्रक्रिया व आत्म्याचे नास्तित्व
लहानपणीच्या राजपुत्र आणि राक्षस यांच्या गोष्टीत शेवटी दोघांची लढाई हमखास ठरलेली. राजपुत्र राक्षसाला बदड बदड बदडतो. राक्षसाला मारण्यासाठी हरतहेने प्रयत्न करतो, पण राक्षस काही मरत नाही. शेवटी कोणीतरी राजपुत्राला सांगतो की राक्षसाचा जीव सोनेरी पिंजऱ्यातील पोपटात आहे. राजपुत्र पिंजऱ्यातील पोपटाची मान मुरगाळतो, आणि इकडे राक्षसाचे धूड खाली कोसळते. राक्षस गतप्राण होतो.
गोष्टीतील राक्षसाचा जीव जसा पोपटामध्ये किंवा एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये असतो तसा आपला जीव कोठे असतो? जिवंत माणूस आणि मृतदेह यात कोणता फरक असतो? या फरकाचे नाव आहे जीव किंवा प्राण. व्यक्तीच्या शरीरातून हे प्राणपाखरू उडाले की व्यक्ती मृत होते. चालती बोलती व्यक्ती हाडामांसाचा सांगाडा बनते. प्रश्न असा आहे की जीव म्हणजे काय ? हा जीव असतो कोठे ?
सर्वसामान्यपणे अशी समजूत आढळून येते की मनुष्याचा जीव हा त्याच्या हृदयात असतो. मनुष्याचा जीव त्याच्या मेंदूत असतो असाही काहींचा समज असणे शक्य आहे. प्रत्यक्षात जीवन ही एक अत्यंत गुंतागुंतीची क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे. अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रियांचा परिपाक म्हणजे जीवन होय. सर्व सजीव-वनस्पती, प्राणी, मानव-हे प्रथिनांचे बनलेले असतात. एका मानवी पेशीमध्ये हजारो वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने असतात. बाहेरील जीवाणूंच्या हल्ल्यापासून शरीराचे संरक्षण करणे, एन्झाईम्सच्या निर्मितीमध्ये मदत करणे, शरीरात चालणाऱ्या असंख्य रासायनिक प्रक्रियांना साहाय्यभूत ठरणे, पेशींचा आकार व स्वरूप ठरविण्यास हातभार लावणे इत्यादि कामे प्रथिनांना करावी लागतात. जीवनाच्या प्रक्रियेमध्ये अनेक जुनी प्रथिने नष्ट होत असतात व नवीन प्रथिने निर्माण होतात. पेशींचे कार्य कसे चालते, पेशी प्रथिनांचे संचालन कशा प्रकारे करतात यावर सातत्याने संशोधन सुरू आहे. या क्षेत्रामध्ये आजपर्यंत अनेक नोबेल पारितोषिके मिळालेली आहेत. परंतु अजूनही जीवन म्हणजे काय याचा मानवाचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. एवढे मात्र निश्चित की जीवशास्त्रीयदृष्ट्या माणसाचा जीव हा शरीरातील कोण्या एका भागात केंद्रित झालेला नसून तो कोट्यवधी पेशींच्या स्वरूपात सर्व शरीरभर पसरलेला असतो. शरीरात चालणाऱ्या श्वासोच्छवास आणि रक्ताभिसरण यासारख्या प्रक्रियांद्वारा ह्या पेशींना ऊर्जापुरवठा सुरू असतो. आपल्या शरीरात विखुरलेल्या असंख्य जिवंत पेशी शरीरात प्राण ओतण्याचे कार्य करीत असतात. थोडक्यात, रासायनिक क्रिया म्हणजे जीवन होय. ज्या दिवशी ही क्रिया थांबेल त्या दिवशी आपली प्राणज्योत मालवेल, शरीर मृत होईल व माणूस मरण पावेल. रासायनिक प्रक्रियेतून प्रकाश आणि उष्णता ह्या ऊर्जा निर्माण होतात. ज्यावेळी ही रासायनिक प्रक्रिया थांबते त्यावेळी ऊर्जानिर्मिती बंद होते व दिवा विझतो. दिव्यातील तेल संपले किंवा मिळणाऱ्या प्राणवायूचा पुरवठा थांबला की ही होणारी क्रिया थांबते व दिवा विझतो. जोराने कुंकर मारून जबरदस्तीनेही दिवा विझवला जाऊ शकतो. जी प्रक्रिया सुरू असते त्या प्रक्रियेमध्ये कुंकर मारल्यामुळे खंड निर्माण होतो. व्यत्यय येतो व दिवा विझतो. पुन्हा दिवा पेटविला की रासायनिक प्रक्रिया पुन्हा सुरू होते व उष्णता व प्रकाश या ऊर्जाची निर्मिती पूर्ववत् सुरू होते.
ज्यावेळी दिव्याची ज्योत मालवते त्यावेळी दिव्यामधून आत्मा वगैरेंसारखी कोणतीही गोष्ट बाहेर निघून गेलेली नसते. तसेच दिवा पुन्हा सुरू केला की हा आत्मा परत त्या दिव्यात प्रवेश करतो असेही काही नसते. प्राणवायू आणि तेल यांच्यामध्ये होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमुळे दिवा ऊर्जा देण्याचे काम करीत असतो व ही प्रक्रिया थांबली की दिवा मालवतो. आपल्या शरीराचेही तसेच आहे. ज्यावेळी रासायनिक क्रिया थांबते त्यावेळी माणूस मरतो. वय वाढत जाते तसतसे माणसाचे सर्वच अवयव व शरीरातील पेशी जीर्ण होत जातात. शरीरामध्ये विविध संस्था कार्य करीत असतात. या संस्था वयपरत्वे क्षीण होत जातात. आणि एक दिवस माणूस मरतो. वय वाढल्यामुळे नैसर्गिकपणे जसे हे घडून येते तसे काही कारणाने प्राणवायूचा पुरवठा थांबला तरी देखील माणूस मरतो. अपघातामुळे किंवा आजार वा इतर कोण्या कारणामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात बिघाड निर्माण झाला तर जीवनासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होते व माणूस मरतो. ज्याप्रमाणे दिवा विझण्याकरिता दिव्यामधून आत्मा वगैरे निघून जाण्याची गरज नसते तसेच मानवी शरीराचेही आहे. माणूस मरतो तेव्हा त्याच्या देहातून आत्मा निघून जातो असे म्हणणे म्हणजे शुद्ध लोणकढी थाप आहे.
आत्म्याचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे असे छातीठोकपणे सांगणारे एका प्रयोगाचा हवाला देत असतात. एका काचबंद पेटीत एका मरणासन्न व्यक्तीला ठेवण्यात आले. ज्यावेळी ती व्यक्ती मरण पावली त्यावेळी काचेची पेटी फोडून त्या व्यक्तीचा आत्मा निघून गेला, असा तो प्रयोग आहे. हा प्रयोग म्हणजे कोणाच्या तरी डोक्यातून निघालेली कल्पना मात्र आहे. असा प्रयोग झाल्याची नोंद कोणत्याही विज्ञानपत्रिकेत आढळत नाही.
मृत्यू म्हणजे शरीरामध्ये निरंतरपणे सुरू असलेल्या रासायनिक प्रक्रियेचे थांबणे व त्याद्वारा होणाऱ्या ऊर्जेची निर्मिती बंद होणे होय. विझलेला दिवा पूर्ववत सुरू करता येणे सहज शक्य असते. मृत शरीराबाबत मात्र असे नाही. शरीराची रचना आत्यंतिक गुंतागुंतीची आणि क्लिष्ट असते, आणि मृत शरीरामध्ये पुन्हा प्राण ओतणे म्हणजेच शरीरात होणाऱ्या ऊर्जेची निर्मिती पूर्ववत सुरू करणे अजूनपर्यंत तरी विज्ञानाला शक्य झालेले नाही. परंतु कधी काळी विज्ञानाला मृत शरीरात काही प्रमाणात का होईना प्राण ओतणे शक्य झाल्यास शरीरातून निघून गेलेला आत्मा पुन्हा शरीरात परत आला असे म्हणणे चुकीचे होईल. माणूस मेल्यानंतर तीन-चार तासांचे आत माणसाचे डोळे काढले तर ते डोळे गरजू व्यक्तीच्या उपयोगी पडू शकतात. अशा दान केलेल्या डोळ्यांसोबत आत्म्याचा काही भाग जातो काय ? जर तसे असेल तर माणूस मेल्यानंतर आत्मा पूर्णपणे निघून जात नाही, त्याचा काही भाग शरीरात शिल्लक राहतो असे समजायचे काय ?
क्लोन तंत्रज्ञानाने तर आत्म्याच्या कल्पनेला फार मोठा तडा दिला आहे. डॉली नावाची शेळी क्लोनतंत्राने निर्माण झाली आहे सर्वश्रुत हे. एका शेळीच्या काही जिवंत पेशी काढून त्या सुरक्षितपणे टिकवून ठेवण्यात आल्या. काही काळानंतर ही शेळी मरण पावली. म्हणजेच तिचा आत्मा तिचे शरीर सोडून निघून गेला. त्यानंतर काही वर्षांनी जपून ठेवण्यात आलेल्या पेशींपासून शास्त्रज्ञांना क्लोन बनविण्यात यश आले. हीच ती डॉली. आता प्रश्न असा निर्माण होतो की शेळीच्या मृत्यूनंतर जो आत्मा शेळीचे शरीर सोडून निघून गेला होता तो आत्मा डॉलीच्या रूपात पुन्हा प्रकट झाला काय ? समजा एकाऐवजी शंभर पेशींपासून शंभर क्लोन तयार केले गेले तर आत्मा शंभरही क्लोनमध्ये घुसेल काय ? यावर कोणी म्हणेल की आत्मा हा शेळीसारख्या बुद्धिहीन प्राण्यांमध्ये नसतो, तो फक्त माणसासारख्या विकसित प्राण्यांमध्येच असतो. परंतु मानवाचेही क्लोन करण्यात शास्त्रज्ञांना आता यश आलेले असल्यामुळे असा युक्तिवाद करणाऱ्यांची मोठीच पंचाईत झाली आहे.
व्यक्ती जन्म घेते त्याचवेळी तिच्या वजनाच्या एक अष्टमांश भाग नाळ व इतर स्वरूपामध्ये त्याला सोडून जातो. साधारणतः नऊ महिने मूल आईच्या पोटात परजीव म्हणून वाढते. मूल गर्भाशयातून बाहेर येते व नाळ कापली जाते तेव्हा मुलाचे परजीवित्व संपून ते स्वतंत्र जीव म्हणून जगू लागते. याच वेळी त्याची वाढ आईच्या शरीराच्या बाहेर सुरू होते व सोबतच मरणाचीही प्रक्रिया सुरू होते. दररोज असंख्य पेशी नव्याने तयार होणे व असंख्य पेशी मरणे ही क्रिया सातत्याने चालू राहते. मृत पेशी व काही टाकाऊ पेशी घाम, मलमूत्र यांद्वारा शरीराबाहेर टाकल्या जातात. तसेच नखे कापणे, केस कापणे, दात पडणे, जखम झाल्यावर काही रक्त वाहून जाणे, रक्तदान करणे, फोड फुटला की शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर टाकले जाणे यांद्वारेही शरीराचा काही भाग आपले शरीर सोडून जात असतो. अशा प्रकारे जीवनभराच्या काळामध्ये शरीरातून हजारो किलोग्रॅम वस्तुमान बाहेर फेकले जाते. या बाहेर फेकल्या गेलेल्या वस्तुमानासोबत आत्म्याचाही काही भाग बाहेर फेकला जातो काय ?
मृत्यू ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असून आत्म्याचे अस्तित्व असंभव आहे हे यावरून आपल्या लक्षात येईल.