मृत्यूची बदलती व्याख्या
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात क्यूबा येथे शेकडो नसतज्ज्ञ, वैज्ञानिक व तत्त्वज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्या परिषदेतील चर्चेचा मुख्य विषय होता, ‘मृत्यूची व्याख्या’. जीवन व मरण यांच्यातील सीमारेषा दिवसेंदिवस अस्पष्ट व धूसर होत असल्यामुळे आता तो गंभीर चर्चेचा विषय होऊ पाहात आहे, व ती सीमा आखणे ही एक मोठी समस्या मानली जात आहे. या समस्येचा उदय सुमारे ४० वर्षांपूर्वी झालेला असून मेंदू पूर्णपणे निकामी वा मृतवत् झाल्यानंतरसुद्धा कृत्रिमपणे श्वासोच्छ्वास व हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या व्हेंटिलेटर्सचा शोध या समस्येला कारणीभूत ठरला आहे. मेंदूची कार्यावस्था व मृतावस्था यांची नीटपणे व्याख्या करता येईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. काही तत्त्वज्ञांच्या मते मेंदूतील फ्रंटल लोब निकामी होणे व त्याबरोबरच सर्व गोष्टी विस्मृतीत जाणे, हे मृत म्हणून जाहीर करण्यास पुरेसे ठरेल. परंतु या व्याख्येमुळे कायमचे व्हेजिटेटिव्ह अवस्थेमध्ये असणाऱ्यांनासुद्धा मृत म्हणून घोषित करावे लागेल. अशा अवस्थेतल्यांच्या मेंदूचा उर्वरित भाग कुठल्याही बाह्यसाधनाविना व्यवस्थितपणे, श्वासोच्छ्वासासकट, सर्व कार्य करू शकतो. मात्र इतर काही तज्ज्ञांच्या मते ‘मेंदू मृत’ ऐवजी हृदयक्रिया बंद होणे हेच मृत्यूचे लक्षण समजावे. अनेक विकसित राष्ट्रामध्ये कायदेशीर मृत्यूसाठी पूर्ण मेंदूचा मृत्यू हाच निकष ग्राह्य धरला जात आहे.
व्यावहारिक वा कायदेशीर, कुठलीही व्याख्या ग्राह्य धरली तरी डॉक्टर्स नेहमीच जिवंत असणाऱ्या रुग्णावर उपचार करतात, मृत व्यक्तीवर नव्हे. मृत म्हणून एकदा घोषित केल्यानंतरच त्या शरीरातील काही महत्त्वाचे अवयव, अवयवारोपणासाठी, काढून घेण्याची कायद्यात तरतूद आहे. या कायद्यानुसार हृदय, यकृत, मूत्रपिंड यांसारख्या जैव अवयवांना, प्रत्यक्ष अवयवरोपणापर्यंत, व्हेंटिलेटर्सच्या मदतीने जिवंत ठेवण्यास अनुमती दिली आहे. परंतु काही जैवनीतिज्ञ मात्र प्रत्येकाने कायमची व्हेजिटेटिव्ह अवस्था व हृदयगती पूर्णपणे थांबणे यामधल्या कुठल्यातरी अवस्थेला मृत्यूची व्याख्या स्वतः ठरवावी असे सुचवत आहेत. परंतु प्रत्येक रुग्णशय्येप्रमाणे मृत्यूची व्याख्या बदलत राहिल्यास अत्यंत गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. सांस्कृतिक व व्यावहारिकदृष्ट्यासुद्धा ते योग्य ठरणार नाही.
प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचे परिणाम
रोगनिदानाच्या तंत्रज्ञानातील अभूतपूर्व प्रगतीमुळे मेंदू पूर्ववत होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे ‘मेंदू मृत’ घोषित करणे दिवसेंदिवस दुरापास्त होत आहे. मुळातच मेंदूची दुखापत ही मृत मेंदूच्या प्रारूपापेक्षा फार गुंतागुंतीची असू शकते. मेंदूचा मोठा भाग व्यवस्थितपणे कार्य करत असतानासुद्धा मेंदूच्या एखाद्या छोट्या भागाला झालेली इजासुद्धा रुग्णाला कायमची बेशुद्धावस्था आणू शकते. इलेक्ट्रोएन्सेफालोग्राफ (electroencephalograph) या आधुनिक उपकरणामुळे ‘मेंदू मृत’ म्हणून घोषित झालेल्यांच्या मेंदूचा काही भाग अजूनही व्यवस्थितपणे कार्य करत आहे, हे विद्युत्लहरीवरून लक्षात येऊ लागले. अनेक वेळा विद्युत्लहरी नसतानासुद्धा मेंदू कार्य करत आहे, याची प्रचीती आली. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ व्हेजिटेटिव्ह अवस्थेतील रुग्णांचा मेंदूसुद्धा कमीजास्त प्रमाणात कार्य करू शकतो, हे समजल्यानंतर डॉक्टर्सना ‘मेंदू मृत’ म्हणून घोषित करणे अवघड ठरत आहे. मुळात ‘मेंदू मृत’ म्हणून घोषित करताना मेंदूचा निकामी झालेला भाग कुठल्याही वैद्यकीय उपचारातून पूर्ववत् होणार नाही याची खात्री करून घेतलेली असते. परंतु यानंतर मात्र ‘मेंदू मृत’ म्हणून घोषित केल्यानंतरसुद्धा व्हेंटिलेटर्सच्या मदतीने शरीराला दीर्घकाळ जिवंत ठेवण्याचे प्रयत्न डॉक्टर्सना करावे लागणार आहेत. मेंदूची स्वयंदुरुस्ती करण्याची क्षमता व या क्षमतेत वाढ करण्यासाठी विकसित होत असलेले संशोधन यामुळे गुंता आणखी वाढत आहे. जनुक उपचारपद्धती व इतर काही तंत्रांमधून मेंदूची ही दुरुस्तीयंत्रणा कार्यक्षम करता येते, हे समजले आहे. रुग्णाच्या मेंदूतील निकामी भागात दुरुस्ती करू शकणाऱ्या पेशींचे रोपण करण्याचे तंत्रही आत्मसात झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. नॅनो लघुरूपीकरण तंत्रज्ञानामुळे इजा पोचलेल्या मेंदूच्या भागातच सूक्ष्म मशिन्सचे रोपण करणे शक्य होईल. मेंदूच्या अंतर्भागातच ठेवण्याजोगे जैव-अनुरूप संगणकांचे चिप्स, व त्यांचे वायरिंग यांचे तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे बहियांना ऐकू येऊ लागेल, आंधळ्यांना दिसू लागेल. संगणक चिप्सच्या रोपणामुळे अर्धांगवायुपीडितांच्या अवयवांचे नियंत्रण करणे शक्य होईल. हृदयाच्या ठोक्याचे नियंत्रण करणाऱ्या पेसमेकरसारख्या एखाद्या मशीनचेच रोपण करणे शक्य होईल व त्यातून अपस्मार, उदासीनता वा विषण्णतेसारख्या मनोविकारांवर मात करता येईल. या क्षेत्रातील काही संशोधकांच्या मते हजारो नॅनोरोबोंचे मेंदूत रोपण करून मेंदूच्या कार्यप्रणालीचे नियंत्रण करणेसुद्धा कठिण नाही. अशा प्रकारच्या सोनेरी भविष्याच्या स्वप्नांची यादी आणखी लांबवता येईल. यांतील १-२ टक्के जरी प्रत्यक्षात उतरली तरी लाखो रुग्णांना दिलासा मिळेल. अनुत्तरित प्रश्न
मेंदूच्या काही दुखापतींवर कितीही संशोधन झाले तरी त्यांना पुनर्जीवित करणे कदापि शक्य होणार नाही.काहींना व्हेजिटेटिव्ह अवस्था नको असली तरी काही अत्युत्साही (व पैसेवाल्या) रुग्णांना मेंदूंच्या संशोधनात प्रगती होईपर्यंत स्वतःला शीतनिष्क्रियतावस्थेत (hibernation) ठेवावे, असे वाटण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींमुळे तिढा वाढतच जाणार आहे. यामुळे आपल्याला अनेक सामाजिक व भावनिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. बेशुद्धावस्थेत किंवा शीतनिष्क्रियतावस्थेत ठेवणे ही अतिखर्चिक बाब आहे. यासाठीचा वैद्यकीय खर्च पूर्ण कुटुंबाच्या खर्चाच्या अनेक पट जाण्याची शक्यता आहे. सामाजिकदृष्ट्या या गोष्टी अत्यंत निरुपयुक्त ठरू शकतील. शिवाय मृत मेंदूची काळजी घेणाऱ्यांनासुद्धा काहीतरी चमत्कार घडेल या आशेवर किती दिवस काळजीत राहायचे याचाही विचार करावा लागेल.
दुखापत झालेल्या मेंदूला पुनः कार्यक्षम करणाऱ्या वैद्यकीय तंत्रज्ञानक्षमतेमुळे मृत्यूच्या व्याख्येत बदल करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कदाचित या तंत्रज्ञानांमुळे मेंदू कार्यक्षम झाला तरी मेंदूतील पूर्वस्मृती, अनुभव इत्यादींचा अस्त झाल्यास ती व्यक्ती खऱ्या अर्थाने जिवंत आहे असे म्हणता येईल काय ? मेंदूच्या पुनर्जन्मामुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे हरवून जात असल्यास तिला व्यक्ती म्हणणे कितपत सुसंगत ठरेल ? अशा स्थितीत फक्त शरीर जिवंत असेल व व्यक्तिमत्त्व मरून जाईल. त्यामुळेच आपल्यासारख्यांना असले वैद्यकीय संशोधन पूर्ण व्हायच्या आतच मरण येऊ दे व पार्थिवाची शक्यतो लवकरात लवकर विल्हेवाट होऊ दे, असे वाटत राहील! क्यूबाच्या अधिवेशनात शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ ‘मेंदू मृतां’च्या लक्षणाविषयी व ‘मेंदू मृत’ रुग्णांच्या उपचाराविषयी चर्चा करत राहतील. परंतु मृत्यू म्हणजे नेमके काय हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहील. ८, लिली अपार्टमेंट्स, वरदायिनी सोसायटी, पाषाण-सूस रोड, पाषाण, पुणे ४११ ०२१. e-mail : pkn.ans@gmail.com