प्रत्यक्ष राजकारणात उतरणे आणि व्यक्तिगतरीत्या सामाजिक कामांसाठी पैसा किंवा वेळ देणे, या दोन पातळ्यांमध्ये सामाजिक कामे करणाऱ्या संस्थांची एक पातळी भेटते. यांना ‘स्वयंसेवी’, ‘सेवाभावी’, ‘एन्जीओ’ वगैरे संज्ञांनी संबोधले जाते. आज अश्या संस्था त्यांच्यांत काम करणाऱ्या व्यक्ती, वगैरेंची संख्या वाढते आहे. सोबतच संस्था व कामाचे होणारे कौतुक किंवा हेटाळणीही वाढते आहे. तटस्थ मूल्यमापन मात्र फारसे भेटत नाही.
अशा एन्जीओंवर आजचा सुधारक चा विशेषांक काढायचा प्रयत्न चारेक वर्षांपासून सुरू आहे. आकडेवारीचा तुटवडा, आत्मपरीक्षणातल्या अडचणी, हेत्वारोपांची शक्यता, अशा साऱ्यांमुळे काम वेग घेत नव्हते.
आता पुण्याच्या ‘प्रयास’ या NGO चे सुबोध वागळे आणि कल्पना दीक्षित यांनी लेखांचे उत्पादन (!) करून विशेषांक घडवला आहे. पोस्ट खात्याने जोडअंकांवर निर्बंध घातल्याने हा विशेषांक दोनतीन महिन्यांमध्ये मालिकेसारखा प्रकाशित होईल.
पूरक विचार, चर्चा, अनुभव (जुळते व विरुद्ध) वगैरेंचे स्वागत आहेच नेहेमीसारखेच. कार्यकारी संपादक संपादकीय (१) स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात स्वयंसेवी कार्याची दीर्घ परंपरा आढळते. मात्र, १९८० नंतर हळूहळू या स्वयंस्फूर्तीने चाललेल्या कामाचे रूपांतर परदेशी पैशावर चालणाऱ्या एन्जीओमध्ये झाले. १९९० नंतर भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर स्वयंसेवी संस्थांची वाट चालूच राहिली. आज भारतामध्ये लाखोंच्या संख्येने स्वयंसेवी संस्था अस्तित्वात असून गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आणि सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांत स्वयंसेवी संस्था कार्य करताना दिसतात. मात्र या यंत्रणा करीत असलेल्या कार्याविषयी परस्परविरोधी मतप्रवाह समाजात आहेत. एका बाजूला शासन, प्रसारमाध्यमे आणि मध्यमवर्ग यांच्या लेखी या संस्थांचे काम समाजोपयोगी, त्यागावर आधारलेले, आणि अनुकरणीय असते, अनेक सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चालणारे नावीन्यपूर्ण प्रयोग आणि पर्यायी संकल्पनांवरील काम महत्त्वपूर्ण वाटते; तर दुसऱ्या बाजूला अनेक कार्यकर्ते आणि अभ्यासक यांच्याकडून स्वयंसेवी संस्थांच्या कामावर प्रचंड टीका होताना दिसते. स्वयंसेवी संस्थांच्या कामासाठी मोठा निधी पुरवणाऱ्या विकसित देशांतील संस्था आणि सरकारे यांचे नक्की हितसंबंध काय आहेत आणि स्थानिक स्तरावरील स्वयंसेवी संस्थांद्वारे या संस्था कोणती उद्दिष्टे साध्य करू इच्छितात हे प्रश्न या संदर्भात सातत्याने विचारले जातात. त्यामुळे स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे काम याबद्दल मोठ्या प्रमाणात अविश्वास, संशय आणि चिंतेची भाषा व्यक्त केली जाते. स्वयंसेवी संस्थांची वाढती संख्या आणि प्रभाव म्हणजे परिवर्तनाच्या प्रक्रियेच्या विरोधी आणि त्यामुळे लोकविरोधी प्रक्रिया असे समजले जाते.
स्वयंसेवी संस्थांविषयी अशा टोकाच्या भूमिकांच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवी संस्था ह्या घटकाचे आकलन नेमके कसे करायचे. स्वयंसेवी संस्था करत असलेल्या कार्याकडे कोणत्या दृष्टीने पाहायचे आणि स्वयंसेवी संस्थांच्या कामाची चिकित्सा आणि मूल्यमापन कसे करायचे, हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात. तसेच स्वयंसेवी संस्था लोकविरोधी आणि समाजविरोधी भूमिका निश्चितपणे बजावत असतील, तर या आह्वानाला कसे सामोरे जायचे, हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. स्वयंसेवी संस्थांचे विवादास्पद स्थान आणि स्वरूप यामुळे या प्रश्नांना एकचएक उत्तर असणार नाही, हे उघड आहे. मात्र या प्रश्नावर विविध (आणि परस्परविरोधी) दृष्टिकोणांमधून विचार आणि चर्चा होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या विषयातील गुंतागुंतीचे आयाम स्पष्ट होऊन विचारांची स्पष्टता वाढण्यास मदत होईल. या उद्देशाने ‘स्वयंसेवी संस्था सद्यःस्थिती व आह्वाने’ या विषयावरील लेखमाला संपादित करण्याचे आम्ही ठरविले. (२) या विषयावर लेख मागवण्यासाठी आम्ही एक प्रारंभिक टिपण तयार केले. स्वयंसेवी संस्था या विषयावर मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असणाऱ्या लेखनाच्या आधारे ‘स्वयंसेवी संस्थांची बलस्थाने आणि मर्यादा’ या मुद्द्यांवरील लिखाणाचा संक्षिप्त आढावा या टिपणामध्ये घेतला आहे. तसेच या विषयावर लेख लिहिण्यासाठी काही प्रश्न या टिपणामध्ये दिले आहेत. या प्रश्नांचा मुख्य भर ‘स्वयंसेवी कामाची गरज समाजाला असेल तर स्वयंसेवी कामाचे कोणते प्रतिमान वास्तवात यायला हवे आणि त्यासाठी विविध पातळ्यांवर (वित्तीय, संस्थात्मक इत्यादी) कोणते बदल होणे आवश्यक आहे’, हा होता. अशा प्रकारच्या टिपणामुळे या विषयावर प्रसिद्ध झालेल्या मुद्द्यांची पुनरुक्ती टळेल आणि त्या मुद्द्यांच्या पुढे जाऊन स्वयंसेवी संस्थांच्या आजच्या स्वरूपात काय बदल घडणे आवश्यक आहे, या विषयावर विचारमंथन होईल अशी अपेक्षा होती. (सदर टिपण या अंकात प्रसिद्ध केले आहे.)
या लेखमालेसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रांत आणि विविध विषयांवर काम करणाऱ्या लोकांकडून लेख मागवण्यात आले. यांमध्ये सामाजिक-राजकीय संघटना, राजकीय पक्ष, कामगार संघटना, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था यामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता. संपर्क केलेल्या बहुतेक लेखकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि वेळेत लेख लिहून दिले. यांपैकी काही लेखांमध्ये प्राथमिक टिपणात दिलेल्या प्रश्नांच्या संदर्भात विचार मांडले गेले आहेत. काही लेखकांनी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे या विषयावरील त्यांचे मौलिक चिंतन मांडले आहे. अनेक लेखांमध्ये या विषयातील विविध विवादास्पद पैलूंवर भाष्य करण्यात आले आहे. या लेखांमधून स्वयंसेवी संस्थांच्या कामाचे अनेक पैलू पुढे आले असून या कार्याचे नेमके महत्त्व समजण्यासाठी विविध दृष्टिकोणातून पुढे आलेले मुद्दे अत्यंत उपयुक्त आहेत. काही लेखकांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सविस्तर लेख लिहिण्यास वेळ झाला नाही. अशा लेखकांनी या विषयावर टिपण-स्वरूपात लेख दिले असून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. या लेखांमध्ये काही मुद्द्यांची पुनरुक्ती झाली आहे. मात्र, हे मुद्दे त्या लेखकांच्या मांडणीचा अविभाज्य भाग असल्याने संपादन करताना असे मुद्दे कायम ठेवले आहेत. (३) अनेक लेखकांनी स्वयंसेवी संस्थांच्या उदयामागील अर्थ-राजकीय परिस्थिती लक्षात घेण्याची आणि स्वयंसेवी संस्थांकडे ऐतिहासिक दृष्टिकोणातून पाहण्याची गरज मांडली आहे. स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या काही निष्ठावान व्यक्तींच्या कामाच्या आधारे या संस्थांचे मूल्यमापन न करता व्यापक परिप्रेक्ष्यात या संस्थांचे काम पाहणे आवश्यक असल्याचे मत नोंदवण्यात आले आहे.
सामाजिक चळवळ आणि स्वयंसेवी संस्था यांमधील परस्परसंबंधांवर प्रकाश टाकण्याचे काम काही लेखकांनी केले आहे. सामाजिक चळवळींच्या विविध मर्यादा नोंदतानाच चळवळींच्या कामाचे निश्चित योगदानही मांडण्यात आले आहे. सामाजिक चळवळी लोकांच्या जाणीव-जागृतीवर भर देऊन व्यवस्था परिवर्तनासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे आज जरी या चळवळी कमकुवत झाल्या असल्या तरी त्यांचे काम क्रांतिकारी परिवर्तनाच्या उद्दिष्टासाठी अधिक मोलाचे आहे, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कामाची अनेक बलस्थाने असली तरी त्यांचे रूपांतर मोठ्या जनचळवळीमध्ये होण्याची शक्यता नसून ‘प्रस्थापित व्यवस्थेमध्ये लोकहितासाठी मर्यादित स्वरूपाचा हस्तक्षेप’ असेच त्यांचे स्वरूप कायम राहण्याचा धोका आहे, असा मुद्दा मांडला गेला आहे.
सामाजिक चळवळींच्या ह्रासाची चिकित्सा अधिक सखोलपणे करण्याची आणि या चळवळींनी आत्मपरीक्षण करण्याची गरज मांडण्यात आली आहे. कार्यकर्त्यांची किमान आर्थिक गरज भागवण्याची आवश्यकता अनेक लेखकांनी मांडली आहे. तसेच नवीन संकल्पनांवर आधारित प्रयोग व चळवळी यांना पुरोगामी राजकारणात जागा असण्याची गरज व्यक्त झाली आहे. स्वयंसेवी संस्थांमार्फत होणारे जनहितविरोधी धोरणांना रोखण्याचे काम, समाजातील लोकशाही प्रवृत्ती विकसित करण्याचे काम लक्षात घेता स्वयंसेवी संस्था चळवळींना पूरक काम करू शकतात, असा मुद्दा मांडण्यात आला आहे. तसेच स्वयंसेवी संस्थांना निधी पुरवणाऱ्या संस्थांमध्येही अनेक प्रकार असतात आणि त्यांचे धोरण गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून ठरते. त्यामुळे या संस्थांना सरसकट साम्राज्यवादी ठरवणे योग्य नसल्याचे मतही व्यक्त झाले आहे.
या लेखांमधून अनेक विचारप्रवर्तक मुद्दे पुढे आले आहेत, स्वयंसेवी संस्थांची भूमिका आणि काम यांविषयी व्यक्त झालेल्या या विविध दृष्टिकोणांमधून वाचकांना विचार करण्यासाठी उपयुक्त सामग्री मिळेल आणि या विषयावर अधिक सजग आणि अभ्यासपूर्ण भूमिका विकसित करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे वाटते. (४) लेखकांना सुरुवातीला पाठविलेल्या प्राथमिक टिपणातील काही प्रश्नांवर सखोल विचार करण्याची अजूनही गरज आहे, असे जाणवते. यांपैकी काही प्रश्नांवर मर्यादित भाष्य या लेखांमधून केले गेले असले तरी या प्रश्नांची सविस्तर मांडणी होणे यापुढील काळाच्या दृष्टीने आवश्यक आहे. यांपैकी काही प्रश्न पुढीलप्रमाणे * भारतीय समाजापुढील आह्वाने लक्षात घेता कोणते नवे संस्थात्मक आकृतिबंध आज वापरायला हवेत ? * नवीन संस्थात्मक आकृतिबंधांत वित्ताची सोय कुठून व कशा प्रकारे केली जाईल ? पुरेश्या वित्तउभारणीसाठी नवीन मार्ग कोणते असतील? * वित्तउभारणीच्या आज उपलब्ध असणाऱ्या विविध मार्गांतील धोके कोणते? त्यांचा प्रतिकार कसा करता येईल? * सध्या उपलब्ध असणाऱ्या विविध संस्थात्मक आकृतिबंधात कोणते बदल करायला हवेत?
या प्रश्नांच्या अनुषंगाने सध्याच्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिमानाला कोणता पर्याय असू शकतो यावर विचार होण्याची गरज आहे. स्वंयसेवी कामासाठी वित्ताचे महत्त्व लक्षात घेता सध्याच्या सरकारी व परकीय वित्तीय स्रोतांना कोणते पर्याय आपण उभे करू शकतो, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अशा मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणे आणि त्यामधून कृतीच्या दिशेने प्रवास सुरू होणे आवश्यक आहे, असे वाटते.
वाचकांनी या लेखमालेतील लेखांवर आपली मते व प्रतिक्रिया जरू कळवाव्यात. तसेच या लेखमालेतून कोणते मुद्दे राहून गेले आहेत, तेही कळवावे. या विषयाचे महत्व लक्षात घेता या विषयावरील विचारमंथन यापुढेही चालू राहण्याची गरज आहे. तसे झाले तरच या लेखमालेचा उद्देश सफल होईल. सुबोध वागळे/कल्पना दीक्षित द्वारा प्रयास, बी.२१, बी.के. अॅव्हेन्यू, सर्व्हे नं. ८९/१०-ए, आझादवाडी, नवा डी.पी.रोड, कोथरूड, पुणे ४४१ ३०८