मात लक्षणीय सखा पहिल्या वृता विविध संवाद
आज जाहिरात हा प्रकार आपल्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. दिवसाचे चोवीस तास आणि वर्षांचे तीनशे पासष्ट दिवस विविध माध्यमाद्वारे ग्राहकांवर जाहिरातीचा सातत्याने भडिमार होत असतो. जाहिरातीतून माहिती आणि ज्ञानप्रसारणाचे काम उत्तम रीतीने होत असल्याने आधुनिक काळात जाहिरातीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. व्यापार आणि उद्योग-जगतात जाहिरातीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अर्थात वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात जाहिरात ही अपरिहार्य बाब बनून राहिली आहे .
भारतीय संस्कृतीत चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचा अभ्यास करण्याची प्राचीन परंपरा आहे. चित्रकला, नृत्यकला, संगीत, अभिनय, लेखन यासारख्या कलांचा आविष्कार, अभिव्यक्ती ही मानवी संस्कृतीची रचनात्मक आणि सृजनात्मक बाजू. गेल्या काही शतकांमध्ये विकसित झालेली आधुनिक संस्कृती ही एका नव्या कलाप्रकारात रुजू झाली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी जाहिरातीला ‘पासष्टावी कला’ असे संबोधले आहे. कोल्हटकरांच्या या उपरोक्त निवेदनात मोठी सत्यता आहे. कोणताही व्यावसायिक, उद्योग किंवा व्यवस्थापन आपल्या उत्पादनाची, सेवेची विक्री करण्यासाठी मोठ्या कल्पकतेने आणि योजकतेने जाहिरातीचा आधार घेत असते. ती कलात्मक रीतीने सादर केल्याने ग्राहकाच्या गळी उतरत असते. जाहिरातीचा इतिहासः
मुद्रित माध्यमातील जाहिराती पंधराव्या शतकापासून सुरू झाल्याच्या नोंदी आहेत. तत्पूर्वी भारतात आणि पूर्ण जगातच विक्रेता आणि उपभोक्ता यांच्यामधील सुसंवादाचा दुवा दवंडीवाले होतेच. दवंडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोचत असत. फेरीवाले ओरडून आपल्या मालासंदर्भात लोकांना सांगत असत. हा जाहिरातीचा प्रकार आजही आपल्याकडे चालू आहे. गुटेनबर्गच्या मुद्रणकलेच्या शोधामुळे माहितीच्या प्रसारणाचे नवे माध्यम उपलब्ध झाले आणि पहिली ज्ञात इंग्रजीतील छापील जाहिरात विल्यम कॅक्स्टनने इ.स.१५७७ मध्ये हॅण्डबिलाच्या स्वरूपात केली, अशी नोंद डॉ. ग. म. रेगे यांच्या अॅडव्हर्टायझिंग आर्ट अँड आयडिया या पुस्तकात मिळते. मुद्रणकला स्थिरावली आणि १६५२ साली कॉफीविषयक जाहिरात त्यावेळी प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर इ.स. १६५७ मध्ये चॉकलेट आणि १६५८ मध्ये चहाच्या पहिल्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. इ.स. १७०५ मध्ये आधुनिक स्वरूपाचे पहिले वर्तमानपत्र इंग्लंडमध्ये प्रकाशित झाले. अठराव्या शतकात हँण्डबिल हे जाहिरातीचे लोकप्रिय आणि प्रभावी माध्यम म्हणून प्रचलित झाले. अमेरिकेत प्रसिद्ध होणाऱ्या बोस्टन न्यूजलेटर या पहिल्यावहिल्या अमेरिकन साप्ताहिकात घरे व इतर वस्तूंची खरेदी-विक्री आणि भाडेतत्त्वावर देण्याच्या जाहिराती लक्षणीय संख्येने प्रसारित होऊ लागल्या.
भारतातही मुद्रित माध्यमातील पहिली जाहिरात २९ जानेवारी १७८० या दिवशी बेंगाल गॅझेट या पहिल्या वृतपत्रात प्रसारित झाल्याची नोंद आहे. तेव्हापासून भारतात आजपर्यंत जाहिरातीची क्षेत्रे मोठ्या प्रमाणात विस्तारल्याचे आपण पाहतो. व्यापार, उद्योग आणि सेवाविषयक व्यवस्थापनांनी जाहिरातीचा विविध संवादमाध्यमांतून ग्राहकांवर एवढा मारा केला आहे की, आज जाहिरातीचा अतिरेक होतो आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. परंतु व्यावसायिकांच्या दृष्टीने जाहिरात ही एक व्यावसायिकदृष्ट्या मूलभूत गरज बनली आहे. जाहिरातीची संकल्पना
जाहिरात म्हणजे ग्राहकांपर्यंत वस्तू, उत्पादन, सेवांबद्दलची माहिती किंवा संदेश पोहोचविणे, असे सामान्यपणे म्हणता येईल. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन ने मान्य केलेल्या विविध व्याख्या या विपणनाच्या क्षेत्रात प्रमाणभूत मानण्यात येतात. त्यांनी जाहिरातीची व्याख्या खालीलप्रमाणे केलेली आहे. ती अशी, “कोणत्याही वस्तूसाठी किंवा सेवेसाठी किंवा उत्पादनासाठी केलेले, व्यक्तिगत नसलेले, असे प्रस्तुतीकरण ; जे प्रस्तुत करणाऱ्याने त्याची किंमत, द्रव्य, मोबदला दिलेला होय.”
जाहिरात म्हणजे नेमके काय हे सांगतानाच जाहिरात कशी असते हे सांगणारी व्याख्या करता येईल. “Advertising is controlled, identifiable information and persuation by means of mass communication media.” “जी माहिती जनमाध्यमाद्वारे नियंत्रित करून लोकांना ओळखता येईल असे सांगणे म्हणजे जाहिरात.’ म्हणजे जाहिरात ही सार्वजनिक असते. ती व्यक्तिगत स्वरूपाची नसते. जाहिरातीतील माहिती ही नियंत्रित स्वरूपाची असून ती जनमाध्यमाद्वारे लोकांसाठी प्रस्तुत करायची असते. वस्तूकडे लोकांची आवड आकर्षित करण्यासाठी जाहिरातीचा जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध उपयोग करण्यात येतो. कोणत्या माध्यमाद्वारे लोकांपर्यंत न्यावयाचे हे जाहिराती तयार करणारे किंवा वस्तू उत्पादन करणारे ठरवितात. जाहिरातीची परिणामकारकता वाढविण्यासाठी ग्राहकांचे मानसशास्त्र माहिती असणे उपयोगी ठरते. जाहिरातीच्या संकल्पनेत इंग्रजी भाषेतील सहा ‘एम’ महत्त्वाची भूमिका बजावतात. १) Mission (उद्दिष्ट), २) Money (पैसा), ३) Medium (माध्यम), ४) Message (संदेश), ५) Measurement (मोजणी), ६) Management (व्यवस्थापन). १) जाहिरातीचा उद्देश नेमका काय आहे किंवा काय असावा, हे जाहिरात करणाऱ्याला स्पष्ट असायला हवे. २) जाहिरातीसाठी किती रक्कम खर्च करणे शक्य आहे, हे ठरवून घ्यायला हवे. त्यामुळे ३) माध्यमाविषयी निर्णय करणे शक्य होते. वेगवेगळी माध्यमे उपलब्ध असल्याने आपल्या ग्राहकांपर्यंत संदेश पोहोचविण्यास योग्य माध्यम कोणते ते अभ्यासाने ठरवावे लागते. ४) संदेश हा जाहिरातीच्या संकल्पनेत महत्त्वाचा असतो. जाहिरातीद्वारे ग्राहकाला योग्य तोच संदेश जायला हवा. ५) जाहिरातीचा परिणाम कसा मोजावयाचा हे समजून घ्यावयाचे आणि त्याप्रमाणे ते मापन करावयाचे असते. ६) एकूण जाहिरातीचे व्यवस्थापन कसे करावयाचे, त्याचा विचार करणे. उपर्युक्त सहाही बाबी कश्या उपयोगी आहेत आणि त्यांचा समन्वय कसा होणे योग्य आहे हे विचारात घेऊन जाहिरातीचे व्यवस्थापन करता येते.
जाहिरात कला आणि शास्त्र
जाहिरात ही विविध कलाविष्कारांनी प्रकट होते. ही एक वेगळी कला म्हणून अस्तित्वात आली आहे. भारतातील अथवा कोणत्याही देशातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ हा या कलेचा आधार असतो. एखादी कल्पना सुचल्यावर ती शब्दबद्ध करण्यात त्या त्या कलाकाराचे कौशल्य असते. ती त्याची कविता असते. पण ती कविता संगीतबद्ध करताना संगीतशास्त्राचा आधार संगीतकार घेतो. गीतकार आणि संगीतकार या दोघांच्या कला आणि शास्त्र या दोन्हींच्या आधारे एक उत्कृष्ट गीत श्रोत्यांना ऐकायला मिळते. जाहिरात-निर्मितीमध्ये अपेक्षित संदेश, योग्य कला, ढंगाने आणि कल्पकतेने प्रकट झाल्यास त्या जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळतो, आणि एखादे उत्पादन किंवा सेवा, धोरण ग्राहकांच्या गळी उतरविता येते. म्हणून जाहिरातीला कलेची गरज आहे. व तिला शास्त्राची जोड दिल्यास ती अधिक प्रभावी होईल, या न्यायाने तिची योजकता आहे. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संख्याशास्त्र, मानसशास्त्र यांसारख्या सामाजिक शास्त्रांची मदत घेऊन, तसेच बाजारपेठेचे संशोधन व संख्याशास्त्र यांच्या शास्त्रीय पद्धतींच्या साहाय्याने जाहिरात अधिकाधिक विकसित होत आहे. संज्ञापनशास्त्रास ते पूरकच आहे. जाहिरात आणि प्रचार
ढोबळमानाने प्रचार आणि प्रसिद्धी या एकाच समान अर्थाने वापरल्या जाणाऱ्या संकल्पना जरी असल्या तरी प्रत्यक्षात त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. प्रसारमाध्यमे आणि जनसंपर्क व जाहिरात-क्षेत्रातील विद्यार्थी, प्रतिनिधींना या तीन शब्दांतील नेमका फरक आणि साम्य जाणून घेऊन काम करावे लागते. जाहिरात आणि प्रचार यांमधील समान दुवा म्हणजे वस्तूबद्दल माहिती ग्राहकांपर्यंत नेणे. परंतु बऱ्याच ठिकाणी प्रचार हा शब्द प्रॉपगैंडा या अर्थी वापरला जातो. त्यामुळे प्रचारात जाहिरातीपेक्षा थोडी अतिशयोक्ती असू शकते. राजकीय अर्थाने प्रचार हा शब्द अधिक वापरण्यात येतो. सध्या अॅडव्हरटोरिअल (Advertorial) हा शब्द वापरात येतो. जाहिरात आणि संपादकीय याचे ते मिश्रण असते. ते बहुतांशी प्रचारात्मक असते, असे दिसून येते. जाहिरात आणि प्रचार यांच्यातील समानता व भिन्नता खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. १. जाहिरात हे व्यक्तिगत पातळीवर नसलेले प्रस्तुतीकरण आहे. असंख्य लोकांपर्यंत संदेश पोचावा असा तिचा उद्देश असतो. प्रचाराचाही उद्देश असंख्य लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा असतो. २. जाहिरातीमध्ये प्रायोजक हा स्पष्ट असतो तर प्रचारात अनेकदा प्रचार कोणातर्फे हे स्पष्ट नसते. ३. जाहिरातीत आर्थिक मोबदला दिलेला असतो तर प्रचार मोबदल्याशिवायही केला जाऊ शकतो. या दोन्ही उद्योगांसाठी माध्यम म्हणून वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरचित्रवाणी व नभोवाणीचा वापर केला जातो. जाहिरात आणि प्रसिद्धी १. जाहिरातीतून संदेश ग्राहकापर्यंत प्रत्यक्षपणे जातो तर प्रसिद्धीतून तो अप्रत्यक्षपणे जातो. २. वस्तूसाठी मागणी निर्माण करणे, वस्तू विकत घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे हे जाहिरातीचे उद्देश असतात तर प्रसिद्धीद्वारे तटस्थपणे वस्तूची माहिती देण्यात येते. ३.जाहिरात ही प्रामुख्याने द्रव्य खर्च केल्यावरच होत असते. हा प्रत्यक्ष खर्च असतो, तर प्रसिद्धीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास खेळाचे किंवा प्रदर्शनाचे प्रायोजकत्व घेतल्यावर बरीच प्रसिद्धी मिळते. प्रत्यक्षपणे खर्च फार थोडा होतो व लोकांमध्ये अनुकूल प्रतिमा तयार होण्यास मदत होते. तांत्रिक दृष्टिकोनातून जाहिरात, प्रचार (Propoganda) आणि प्रसिद्धी (Publicity) या शब्दांमधील समानता व भिन्नता वरीलप्रमाणे आहेत. जाहिरातीचे कार्य आणि महत्त्व ‘आजच्या आधुनिक व्यावसायिक जगतात जाहिरात ही महत्त्वाची भूमिका बजावते. या जगतात जाहिरातीचा मानसशास्त्रीय शस्त्राप्रमाणे उपयोग होतो. जाहिरात हे एक विक्रीतंत्र आहे.” भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेत जाहिरातीचे मोठे योगदान राहिले आहे. जाहिरातीतून ग्राहकांसाठी उत्पादने आणि सेवांबाबतची माहिती प्रकाशित केली जाते.
जनसंपर्क जाहिराती
केवळ वृत्तपत्रे किंवा नियतकालिकांमधूनच येतात असे नाही तर दूरचित्रवाणी आणि नभोवाणीच्या विविध वाहिन्यांद्वारेही दिल्या जातात. राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावर होर्डिंग्ज उभारून केलेल्या जाहिराती यासुद्धा जनसंपर्क जाहिरातीच होत. समाजमंदिरे उभारणे, विविध प्रकल्पांना देणग्या देणे, विविध संस्थांना अर्थसाहाय्य देणे आणि समाजसेवी कार्यक्रमांना संस्था किंवा व्यवस्थापनाकडून होणारी मदत लोकांना सांगणे, हा देखील जनसंपर्क जाहिरातीचा प्रकार होय. सर्वसाधारणपणे जाहिरातीचा उपयोग पुढीलप्रमाणे केला जातो. १) घोषणा करणे: शासनसंस्था, खाजगी संस्था उद्योग किंवा एखाद्या व्यवस्थापनाला एखादी घोषणा करून ती लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर जाहिरातीचा उपयोग करता येतो. २) एखादे जाहीर प्रकटन करणेः सार्वजनिक सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र किंवा वैयक्तिक परंतु लोकांच्या हिताची माहिती देण्यासाठी जाहीर प्रकटन द्यावे लागते. अशा जाहीर प्रकटनाला जाहिरातीशिवाय दुसरा चांगला पर्याप्त पर्याय नाही. ३) कामगारांना आवाहन करणे: कारखाने, सार्वजनिक सेवा व उत्पादन-उद्योग यांना त्यांच्या कामगारांना कामाविषयी, सुट्टीविषयी, आरोग्याविषयी, आर्थिक लाभांविषयी आवाहन करायचे झाल्यास जाहिरातीचा मार्ग अधिक प्रभावी ठरतो. ४) नवे उत्पादन किंवा सेवा बाजारात आणणे: एखाद्या उद्योगाला त्यांची नवीन सेवा किंवा उत्पादन बाजारात आणायचे झाल्यास तो उद्योग जाहिरातीचा आधार घेऊ शकतो. त्यातून त्या उत्पादनाची, सेवेची ग्राहकांना चांगली माहिती मिळू शकते. उदाहरणार्थः टाटा उद्योग समूहाची एक लाख रुपये किंमतीची ‘नॅनो कार’. ५) संस्था किंवा व्यवस्थापन दुसऱ्या व्यवस्थापनात समाविष्ट करणे: एखाद्या उद्योगाचे, संस्थेचे दुसऱ्या संस्थेत किंवा उद्योगात समाविष्टीकरण करायचे झाल्यास आणि त्याची माहिती त्या उद्योगाच्या भागधारकांना, ग्राहकांना करून द्यायची झाल्यास जाहिरात हे माध्यम अधिक प्रभावी ठरू शकते. उदा. युनियन बैंक आफ इंडियाचे विलीनीकरण. ६) अफवांचे निरसन करणे: एखादा उद्योग, संस्था किंवा व्यवस्थापन ह्यासंबंधी ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण झाले असतील किंवा सरकार अथवा पक्षसंघटनेबद्दल अफवा निर्माण झाली असेल तर जाहिराती प्रसारमाध्यमात प्रसिद्ध करून अशा अफवांचे निरसन करता येतात. ७) जाहिरातीच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करता येते. बऱ्याच वेळा जाहिरात ही वस्तूंची मागणी वाढविते व त्याप्रमाणे वस्तूंचा पुरवठा वाढविण्यासाठी आणखी कारखाने किंवा उपलब्ध कारखान्यांमध्ये अधिक उत्पादन होऊ शकते. या दोन्ही परिस्थितींत रोजगार वाढू शकतात. ८) जाहिरातीच्या माध्यमातून संकटकाळी मदत करणारांचे आभार मानता येतात. ९) जाहिरात देऊन महत्त्वाच्या कारणामुळे व्यवस्थापनाचे कामकाज बंद करता येते. किंवा चालू ठेवता येते. १०) एखादी संस्था किंवा व्यवस्थापन सरकारला अर्पण करता येते.
जाहिरातीची सामाजिक गरजः
राष्ट्राच्या एकूण आर्थिक विकासात जाहिरातीचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे सामाजिक बदलांसाठी जाहिरात एक उपयोगी भूमिका बजावते. बातम्या, लेख किंवा ग्रांथिक साधनसामग्रीतून ज्याप्रमाणे समाजप्रबोधन घडते तसेच समाजप्रबोधन जाहिरातीतूनही होते. जाहिरातीमुळे, विविध स्तरातील उपभोक्त्यांना वस्तूंची, सेवांची, शासनाच्या योजनांची, आरोग्यविषयक योजनांची, शैक्षणिक धोरणे व उपक्रमांची, तसेच पर्यटन, धार्मिक यात्रा महोत्सवांची, मनोरंजनाच्या साधनांची, वस्तू किंवा उत्पादनांच्या गुणवत्तेसंबंधी माहिती मिळते. सुशिक्षित बेरोजगार तर वृत्तपत्रे किंवा इतर प्रसारमाध्यमांत येणाऱ्या जाहिरातीकडे डोळे लावून असतात. अर्थात रोजगारांच्या संधी शोधण्यासाठी जाहिराती उपयोगी पडतात.
आज करमणूकप्रधान दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील जाहिरातींना प्रेक्षकांची डोकेदुखी म्हणून संबोधले जात असले तरी जाहिरातीची लोकप्रियता कमी झाल्याचे आढळून येत नाही. जाहिरात वाचक-प्रेक्षकांच्या मनाचा कौल लक्षात घेऊन सादर केल्यास तिचा प्रभावीपणा निश्चितच वाढत राहतो.
निष्कर्ष :
आज जाहिरातीचे क्षेत्र व्यापक प्रमाणात वाढते आहे. औद्योगिकीकरण, खुल्या जागतिकीकरणाच्या प्रवाहात तर जाहिरातीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. राष्ट्राच्या अर्थकारणात आणि सामाजिक बदलातही तिने आपले स्थान निश्चित केलेले आहे. आज जाहिरात एक विचारप्रसारणाच पैलू बनून राहिली आहे. उद्योग आणि सेवाक्षेत्रात तर जाहिरातीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे, आज वेब जाहिरातीचा काळ असून प्रत्येक संस्थाव्यवस्थापन आपल्या संस्थेची जाहिरात इंटरनेटवर देत आहेत. माझ्या मते, जाहिरातक्षेत्रात कुशल मनुष्यबळ आणि विकसित अद्ययावत तंत्रज्ञान वापरल्यास आज आणि उद्याचे जाहिरातीचे युग हे वेब जाहिरातीचे असणार आहे. संदर्भसूची १. जनसंवाद सिद्धान्त आणि व्यवहार, रमा गोळवलकर, पोटदुखे, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर. २, ३ व ७. जाहिरात आणि जाहिरात व्यवस्थापन – एक ओळख, प्रा. सुभाष भावे, ४ व ५. Advertising Planning, Implementation & Control, Sandeep Sharma & Deepak Kumar, MangalDeep Publication, Jaipur, ६. जनसंपर्क संकल्पना आणि सिद्धान्त, सुरेश पुरी, विमुक्तजन प्रकाशन, औरंगाबाद. सुरवसे निवास, रेणुकानगर, आंबाजोगाई रोड, लातूर ४१३५१२. मो.९८९००४०२५३