जातिव्यवस्था – निर्मिती आणि स्वरूप

जातिव्यवस्थेची सुरुवात नेमकी कशी आणि कधी झाली याचे बिनचूक उत्तर मिळणे कठीण आहे. समाजव्यवस्था ही प्रवाही असते. त्या प्रवाहाबरोबरच सामाजिक व्यवस्थेची निर्मिती होत असल्यामुळे जातिव्यवस्थेच्या जन्माचा बिंदू शोधणे कठीण बनते. प्राचीन स्त्रीप्रधान मातृवंशक कुलव्यवस्था आणि गणव्यवस्थेपासून आर्यांच्या वसाहतीमधील चातुर्वर्ण्यव्यवस्थेपर्यंत अनेक टप्प्यांतून जातिव्यवस्थेची पार्श्वभूमी विकसित होत आली. ‘वर्णप्रथेच्या मावळतीत जातिप्रथेची उगवती आहे’ असे शरद पाटील यानी दासशूद्रांची गुलामगिरी या संशोधनपर पुस्तकातून स्पष्ट केले आहे. जातिव्यवस्थेचा मूळ पाया आहे वर्णव्यवस्था व त्यातील शूद्र वर्ण. त्यासाठी वर्णव्यवस्था व त्यातील शूद्र वर्णाची निर्मिती यांचा शोध महत्त्वाचा ठरतो. असा शोध घेण्यासाठी भारताच्या प्राचीन इतिहासापासून सुरुवात करावी लागते.

भारतीय मानववंश
भारतातील प्रागैतिहासिक इतिहास सर मॉर्टिमर व्हीलर यांनी प्रसिद्ध केला. पल्लवपुरम, रायचूर, जबलपूर, हैद्राबाद, पंजाब, कृष्णा नदीचे खोरे इत्यादि ठिकाणी झालेल्या उत्खननात सापडलेली हत्यारे, हाडांचे सांगाडे, घरांच्या खुणा ही सारी माहिती संगतवार करून भारतातही प्रागैतिहासिक मानवी समाज होता हे त्यांनी सिद्ध केले. या माहितीच्या आधारे स्टुअर्ट पिगट यांचा प्री-हिस्टॉरिकल इंडिया हा ग्रंथ १९५० साली प्रसिद्ध झाला. पण शिकारीची हत्यारे, मानवी हाडांचे सांगाडे, घरांच्या खुणा, दुर्मिळ स्वरूपातील खेळणी या साधनांशिवाय सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळाली नाही. या सर्व माहितीवरून शिकारीवर अवलंबून असणाऱ्या मानवी जीवनाचे अस्तित्व ज्ञात झाले. सिंधु संस्कृतीपूर्वीचा समाज आदिवासी समाज होता असे शरद पाटील यांनी म्हटले आहे. म्हणजे सिंधु संस्कृतीच्या स्त्रीराज्यापूर्वी जो आदिवासी समाज येथे राहात होता, त्यांच्या संस्कृतीची माहिती उपलब्ध नाही.

इतिहासपूर्वकालीन भारतात प्रथम कोणते मानववंश राहात होते यासंबंधी फार थोडी माहिती मिळते. सिंधु संस्कृतीच्या मोहेजोंदडो व हडप्पा येथील सांस्कृतिक अवशेषावरून व तेथील मृत शरीरांच्या पाहणीतून तेथे चार-पाच हजार वर्षांपूर्वीच्या मानववंशासंबंधी काही स्पष्ट अनुमाने बांधता येतात. त्यात मोंगोलॉईड, मूळ ऑस्ट्रलॉईड, भूमध्यसमुद्रीय (वा द्रविड) मानववंशाची वस्ती असावी असे निश्चित करता येते.
गेल्या शतकापासून अलीकडे भारतातील भिन्न-भिन्न मानवगणांच्या शारीरिक वैशिष्ट्यांचा पद्धतशीर अभ्यास सुरू झाला. प्रथम सर अल्बर्ट रिस्ली यांनी सरकारने अधिकृत मानलेला अभ्यास १९०१ साली प्रसिद्ध केला. त्यानंतर रामप्रसाद व डॉ. जे. एन. हटन यांनी अधिक संशोधन करून वंश-भाषा-संस्कृती यासंबंधी घेतलेला परामर्श १९३३ साली प्रसिद्ध केला. यानंतर यासंबंधी अधिक प्रगत संशोधनाच्या आधारे डॉ. बी.एस. गुह यांनी सरकारने अधिकृत मानलेले सर्वेक्षण प्रसिद्ध केले व नऊ उपवंशासह सहा मुख्य भारतवासी मानववंश निश्चित केले ते असे १) नेग्रिटो २) प्रोटो आस्ट्रलाइड ३) मोंगोलाईड (त्यात ळ. पुरा-मोंगोलाईड अ-लंबकपाली आ-पृथुकपाली हे अंतर्भूत ळळ. तिबेटी मोंगोलाईड हेही त्यात अंतर्भूत) ४) भूमध्य समुद्रीय (त्यात i. पुरा-भूमध्यसमुद्रीय ii. भूमध्यसमुद्रीय ifi. तथाकथित प्राच्य अंतर्भूत) ५) पश्चिमी पृथुकपाली (त्यात i. आल्पिनाईड ii. दिनारिक iii. आर्मेनाईड अंतर्भूत) ६) नॉर्डिक.

सिंधु संस्कृतीचा काळ साधारणपणे इ.स. पूर्व २८०० ते इ.स. पूर्व २३५० मानतात. मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या हाडांच्या सबंध सापळ्यांवरून व कवट्यांवरून कपालमितिशास्त्राप्रमाणे तेथील मानववंशाचे चार वर्ग पडतात १) पुरा ऑस्ट्रलॉईड २) भूमध्यसमुद्रीय ३) मोंगोलॉईड ४) आल्पिनॉइड.

भारतीय वंशगणनेच्या उपसंहार करताना डॉ. बी.एस. गुहा यांनी दिलेला इशारा महत्त्वाचा आहे. ते म्हणतात येथे व अन्यत्र जगात निरनिराळे वंशप्रकार एकमेकात मिसळलेले दिसतात व ठोकळ मानानेच ओळखता येतात. क्रोमोझोम्स-जनुकी रचनेच्या शोधामुळे मानवाच्या वंश-व्यवस्थेच्या माहितीवर मोठा परिणाम होणार आहे. डॉ. स्पेन्सर वेत यांचा द जर्नी ऑफ मॅन शोधप्रकल्पानुसार जगातील पहिला मानव कोठे राहात होता याचा शोध चालू आहे. या संशोधनाप्रमाणे आजचे सर्व मानव एकाच आदिपुरुषाचे वंशज आहेत. तो आदिपिता सुमारे ६०,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहात होता. अंदमानमधील ओंगे आणि जारव या जमातींच्या जनुकीय चाचणीप्रमाणे त्यांची जनुकीय रचना आफ्रिकेतील आदिपुरुषाबरोबर पूर्णतः जुळणारी आहे. ओंगे, जारव हे या भारतीय प्रदेशातील मूळ रहिवासी. डॉ स्पेन्सर वेत यांच्या द जर्नी ऑफ मॅन या ग्रंथातून मानवाची क्रोमोझोम्स जनुकीय माहिती प्रकाशित झाली आहे. या वैज्ञानिक प्रकल्पाचे काम अजूनही चालूच आहे. या माहितीनुसार जगातील मानव एकाच आदिपित्याचे वंशज असून ६०,००० वर्षांच्या कालावधीत त्या-त्या प्रदेशातील हवामान व पर्यावरण यांचा परिणाम होऊन त्वचा, रंग, ठेवण, चेहरेपट्टी, उंची इत्यादी बाबतीत अनेक आमूलाग्र भेद निर्माण झाले.

जगातील सर्व मानवजात एकाच आदिपित्यापासून निर्माण झाली आहे तर वंशभेदावर आधारलेले सर्व भेद सपशेल चुकीचे असून या जनुकीय रचनेच्या माहितीप्रमाणे एखादा मानववंश श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविता येत नाही. त्यामुळे मानवी समाजाच्या संघर्षातील एक मूळ कारण आपोआप नष्ट होते. वंशभेदावर संशोधकांनी निर्माण केलेले रणांगण पार निकालात निघते. परंतु या शोधप्रकल्पातील क्रोमोझोम्स-जनुकीय माहितीमुळे जातिव्यवस्थेच्या निर्मितीचा शोध सोपा होत नाही. या बाबतीत डॉ. आंबेडकर म्हणतात ‘आधीच एकसंध समाजाचा जात हा एक तुकडा आहे, म्हणूनच जातींच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण बिकट ठरते.

‘स्त्रीप्रधान कुल-गण व्यवस्था’
गणाची उत्पत्ती स्त्रीपासून झालेली असून ती कालानुक्रमात गणाची मातृदेवता बनत असे हे स्पष्टीकरण शरद पाटील यांनी दास-शूद्रांची गुलामगिरी या पुस्तकात स्पष्ट केले आहे. गण हा शब्द स्त्रीसत्ताक कृषक समाजाचा वाचक समजला जातो. कात्यायनाच्या मते कुलसमूह म्हणजे गण होय. कुल वा गणाचे विभाजन सातव्या पिढीत होत असे. त्यांतून नवीन गण निर्माण होत असत. बुद्धकाळानंतर हेच विभाजन चौथ्या पिढीत होऊ लागले. नवीन निर्माण झालेल्या गणाला जंगल-झाडी तोडून नवीन जमीन लागवडीखाली आणावी लागत असे. गणाची निर्मिती गणाच्या राष्ट्रीकडून (राष्ट्री = गणाची राणी) होत असे. अशी स्त्री मृत्युनंतर त्या गणाची गणदेवता बनत असे. गणदेवतेची मंदिरे स्मशानभूमीत दिसतात, कारण सिंधू संस्कृतीत मोक्षाची कल्पना नव्हती, म्हणून गणदेवता मोक्षाला जात नव्हत्या. निर्ऋती ही सिंधु समाजाची पहिली ज्ञात गणदेवता. गणदेवता गणधनाचे समान वाटप करीत असे. ब्रह्मनची निवड राष्ट्री स्वतः करीत असे. गणाच्या मालकीच्या जमिनीवर गणमातेचे म्हणजे राष्ट्रीदेवीचे स्वामित्व होते. या जमिनीत बी पेरण्याचे काम स्पय (एका टोकाला छिद्र असलेली टोकदार काठी) नावाच्या साधनाने करी. गणाच्या मालकीच्या गणपुष्करिणीत संस्कार-सिंचन विधी झाल्यानंतर ती व्यक्ती गणाचा सभासद बनत असे. शरीरसंबंधाला देवविवाह म्हटले जाई. राष्ट्रीशी असा देवविवाह झाल्यानंतर पुरुषाला राजपद मिळवता येई. उर्वशीबरोबर असा देवविवाह झाल्यानंतर पुरुरवा राजा झाला हे ऋग्वेदातील सूक्तावरून स्पष्ट होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वैदिक संस्कतीचा विकास या ग्रंथात म्हणतात “गणसंस्था हे प्राचीन भारतीयांच्या समाजसंस्थेचे पहिले स्वरूप होय. अशा अगणित गणसंस्थांचे वर्णव्यवस्थेत रूपांतर होऊन प्रथम वैदिक समाजसंस्था निर्माण झाली. (पृष्ठ २४०) हिंदुस्थानात सर्व प्रांतात चातुर्वर्ण्याची स्थापना गणसंस्थेचे रूपांतर होऊनच झाली. (पृष्ठ २४२)’ सिंधु समाजरचना स्त्रीप्रधान गणव्यवस्थाक स्वरूपाची होती, हे वास्तव स्वरूप स्वीकारल्यानंतर वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था यांचा अभ्यास अधिक सुलभ होतो.

सिंधु संस्कृतीची गणदासप्रथा
सिंधु समाजामधील उत्पन्नाचे साधन बदलले. त्यामुळे समाजव्यवस्थाही बदलली. शेतीसाठी पशुधनाचा उपयोग सुरू झाला. पशुधन व शेतीची नवी अवजारे यावर पुरुषवर्गाचे वर्चस्व निर्माण झाल्याने स्त्रीसत्ता बदलून पुरुषवर्चस्व निर्माण झाले. पुरुषी वर्चस्वाने स्त्रीसत्ता नष्ट केली. गण एकत्र जमून राजनची (राजा) निवड करू लागले. स्त्रीसत्ताक गणव्यवस्था सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच स्वरूपाची राहिली नाही. सिंधु समाजात उत्तरार्धात स्त्रियांचे श्रेष्ठत्व नष्ट होऊन त्यांना गौणत्व आले. म्हणून सिंधु समाजाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन विभाग पडतात. भारताच्या स्त्रीसत्ताक समाजात दोन गणार्ध होते. त्यांना वर्ण म्हटले जाऊ लागले. एक गणार्ध स्त्रियांचा क्षत्र वर्ण, तर दुसरा पुरुषांचा ब्रह्मण वर्ण. पुरुषसत्ताक राजन गणराज्ये निर्माण होऊन विविध गणांतील स्पर्धा वाढत गेली. अशा संघर्षात ज्या गणाचा पराभव झाला, त्या गणाला विजयी गणाचे गणदास व्हावे लागले. या गणदासांना शेतीची आणि कष्टाची कामे करावी लागली. म्हणून गणदासप्रथेने शोषण-व्यवस्था व गुलामगिरीची निर्मिती केली. हे गणदास कर्माने आणि कालांतराने जन्माने दास बनले. या दास वर्णांचे पुढे वैदिक आर्यांच्या वसाहतीत शूद्र वर्णात रूपांतर झाले. ही गणदासप्रथेची म्हणजे जातिव्यवस्थेवर आधारलेल्या गुलामगिरीची पहिली अव्यक्त सुरुवात सिंधु समाजव्यवस्थेत झाली. ब्रह्मण, क्षत्र आणि पराभवामुळे निर्माण झालेले गणदास यांचा दास वर्ण असे तीन वर्ण निर्माण झाले. यासंबंधी शरद पाटील मार्क्सवाद व फुले-आंबेडकरवाद या पुस्तकात म्हणतात ‘शेती व गणसमाज यांची जननी स्त्री असल्याने भारतीय गणसमाजाचे मुख्य कालखंड दोन पडतात, एक स्त्रीसत्तेचा व दुसरा दासप्रथेचा” (पृष्ठ १०). भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिकमत या सत्यशोधक मार्क्सवादी प्रकाशनाच्या पुस्तिकेत शरद पाटील म्हणतात “ज्यावेळेला स्त्रीसत्ताक भारतीय समाज अतिरिक्त उत्पादनक्षम होतो, त्यावेळेला एक गण दुसऱ्या गणाला गुलाम करतो आणि मग शोषणपीडनावर आधारलेली तीन वर्णांची समाजव्यवस्था येते. एका गणाने दुसऱ्या गणाला गुलाम करणे, अशाप्रकारची गुलामगिरीची प्रथा भारतात सिंधु संस्कृतीच्या उत्तरार्धात प्रवर्तित झाली” (पृष्ठ ४).

वर्णव्यवस्था
ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील पुरुषसूक्तात विराटपुरुषस्वरूपवर्णन आले आहे.
ब्राह्मणोअस्य मुखं असितम । बाहू राजन्यः कृतः । उरू तदस्य यद वैश्यः । पद्भ्याम शूद्रो अजायत ।।
सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी ऋग्वेदाचे मराठी भाषांतर या ग्रंथात याबद्दल केलेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे ११) परमेश्वरनिर्मित विराट पुरुष कसा जन्मला ? त्याचे मुख, हस्त, जंघा आणि पाद कोणते होते ? १२) ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे लोक विराट पुरुषाचे मुख, बाहू, जंघा यापासून आणि शूद्र लोक त्याच्या पायापासून उत्पन्न झाले. चातुर्वर्ण्यनिर्देश अशी सुरुवातीलाच टीप देऊन ते स्पष्टीकरण करतात १२ व्या ऋचेमध्ये ब्राह्मण, राजन्य (क्षत्रिय), वैश्य आणि शूद्र लोकसमूहांचा निर्देश असला, तरी त्यास तेथे वर्ण म्हटलेले नाही. (तत्सम अन्य निर्देश ब्रह्म, क्षत्र, विश ८-३५. १६-१८). त्यावरून ऋग्वेदकाळी चातुर्वर्ण्यव्यवस्था नसून ती वैदिकोत्तर कालात प्रस्थापित झाली असावी. अथर्ववेदात चातुर्वर्ण्याचा निर्देश अनेकवेळा आढळतो. (अ.वे.४-२०-४. ५-१७-९) ऋग्वेदातील संदर्भावरून चातुर्वर्ण्यव्यवस्थेचे वर्णन परंपरावादी-धार्मिक प्रवाहात केले जाते म्हणून मूळ वर्णन विस्ताराने पाहणे आवश्यक आहे.

आर्यांचे भारतावरील पहिले आक्रमण इसवीसनपूर्व सुमारे १७५० मध्ये झाले. आर्यांची दुसरी लाट इसवीसनपूर्व ११०० मध्ये आली. आर्यांची समाजव्यवस्था रानटी-लुटारी स्वरूपाची होती. त्यावेळी त्यांच्यात वर्णव्यवस्था नव्हती. अशा या लुटारू टोळ्यांचा सिंधुजनांनी सुरुवातीच्या काळात अनेक वेळा पराभव केला. पण वेगवान अश्वरथ व लोखंडी शस्त्रे यांच्या साह्याने आकस्मिक हल्ले, लुटालूट या तंत्राने सिंधुजनांवर त्यांनी हळूहळू विजय मिळविला. विजयप्रवास सुरू झाल्यानंतर त्यांना नवीन वसाहतींची गरज भासू लागली. शेती उत्पादनाचे ज्ञान आवश्यक बनले. ही त्यांची गरज सिंधुसमाजातील ब्राह्मणवर्णाने पूर्ण केली. या ब्राह्मण वर्णाच्या साहाय्याने आर्यांनी सिंधुजनाचे उत्पादनतंत्र, गणदासप्रथा असलेली गुलामगिरी, कृषिसमाजरचना व राजर्षिप्रथा आपल्या गरजेनुसार बदल करून स्वीकारल्या व आपल्या वसाहती निर्माण केल्या. वर्णव्यवस्थेचे ज्ञान त्यांनी सिंधुसमाजातील ब्राह्मणवर्णांकडून घेतले. त्यासाठी आर्यांनी ब्राह्मणवर्णाचे श्रेष्ठत्व मान्य केले. यामुळे सिंधु समाजातील ब्राह्मण आर्यांचेही पुरोहित बनले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरोहितवर्ग वर्चस्व व भारताचा सामाजिक इतिहास या डॉ. सुमंत मुरंजन यांच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हणतात “भारतातील ब्राह्मणवर्ण पाहिला तर तो मोठ्या संख्येने आर्यवंशीय ठरत नाही, परंतु आर्यांच्या संस्कृतीचा प्रस्थापक व धुरंधर मात्र ठरतो. अर्थात आर्यात सामील झालेल्या येथील ब्राह्मणवर्गाने संस्कृतात्मीकरण बुद्ध व तीर्थंकर यांच्या अगोदर सुमारे हजार-बाराशे वर्षांपूर्वीच सुरू केले होते.” (पृष्ठ ५)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णव्यवस्था जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांचा सखोल अभ्यास करून याबद्दलच्या समाजशास्त्रीय अभ्यासाचा पाया निर्माण केला. वर्णव्यवस्थेच्या निर्मितीचे त्यांनी समाजशास्त्रीय संशोधन केले. शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथात डॉ. आंबेडकर म्हणतात,
१) सूर्यवंशाच्या ज्या जमाती होत्या, त्यांतील एका जमातीचे आर्य लोक होते.
२) क्षत्रिय वर्ण असा शूद्रांचा हिंदी आर्य समाजात दर्जा होता
३) एक काळ असा होता की, आर्यसमाज फक्त तीन वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य मानीत होता. तेव्हा शूद्र हा स्वतंत्र वर्ण समजला जात नव्हता, तर उपभाग समजण्यात येत होता.
४) शूद्र राजे आणि ब्राह्मण लोक यांच्यामध्ये एकसारखे झगडे चालू असत. झगड्यामध्ये ब्राह्मणांवर जुलूम-जबरदस्ती करण्यात आली होती.
५) शूद्रांनी आपल्यावर जुलूम-जबरदस्ती व अन्याय-अत्याचार केले म्हणून ब्राह्मण शूद्रांचा द्वेष करू लागले. ब्राह्मणांनी शूद्रांचा यज्ञोपवीत वापरण्याचा हक्क नष्ट केला.
६) यज्ञोपवीत वापरण्याचा हक्क नष्ट झाल्यामुळे शूद्रांचे समाजातील स्थान वैश्यांच्या खालच्या दर्जाचे झाले. त्यामुळे चौथा शूद्र वर्ण अस्तित्वात आला.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वैदिक साहित्यातील शूद्र राजांची माहिती दिली आहे, त्याचप्रमाणे ब्राह्मण-शूद्र संघर्षाचे उदाहरणासहित वर्णन केले आहे. असेच ब्राह्मणवर्ण आणि क्षत्रिय राजे यांच्या संघर्षाचे उदाहरणासहित वर्णन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले आहे. संस्कारसिंचनाचा हक्क व मक्तेदारी ब्राह्मणवर्णाकडे होती. ज्या ठिकाणी सिंधु समाजाची कृषक राजसत्ता होती, तेथे शूद्र वर्ण नव्हता. हे पुरावे डॉ आंबेडकर यांच्या संस्कारसिंचन व यज्ञोपवीताचा हक्क नष्ट केल्यामुळे शूद्रवर्णाची निर्मिती झाली या मताला पुष्टी देणारे आहेत. ब्राह्मणपुरोहित हिरण्यगर्भविधीने शूद्र राजांना क्षत्रिय बनवीत असत. त्यासाठी त्यांना हिरण्यगर्भासाठी निर्माण केलेला सुवर्णकुंभ आणि गायी दान मिळत. याबद्दलची माहिती शरद पाटील यांनी दास-शूद्रांची गुलामगिरी या ग्रंथात दिली आहे. (पृष्ठ ४४९)

वर्णव्यवस्था परकीय आर्यांनी आणलेली नसून ती सिंधु समाजातच जन्माला आलेली होती. वर्णव्यवस्थेवर आधारलेल्या वैदिक आर्यांच्या वसाहती निर्माण करताना सिंधु समाजाच्या वर्णव्यवस्थेत आवश्यक ते बदल करण्यात आले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि दासगण असलेले सारे शूद्र अशी चातुर्वर्ण्यव्यवस्था निर्माण करून त्यानुसार वैदिक आर्यांनी आपल्या वसाहतींची निर्मिती केली. याबद्दल शरद पाटील जात्यन्तक क्रान्ती व समाजवादी पूर्ती या पुस्तकात म्हणतात “पितृसत्ताक पशुपालक आर्यजमातींनी भारतात अनार्य वैराज्ये व गणदासप्रथाक मातृवंशक राजके यांच्याशी उच्छेदक संघर्ष करून चातुर्वर्ण्याधिष्ठित गणशूद्रप्रथाक राजके उभारली.” (पृष्ठ ५०) हे दोन्ही प्रवाह, अब्राह्मणी व ब्राह्मणी, सबंध भारतीय इतिहासभर जोडीने वाहत गेले आहेत झगडत, परस्परांवर प्रभाव पाडीत व विधायक नकारक्रिया करीत. (पृठ १६) या वर्णसंघर्षावर वि. का.राजवाडे यांनी राधामाधव विलासचंपू या पुस्तकात स्पष्ट प्रकाश टाकला आहे. ‘चातुर्वर्ण्याचा इतिहास म्हणजे त्यातील स्त्रिया व शूद्र यांचा इतिहास प्रामुख्येकरून आहे. या प्रचंड ऐतिहासिक नाटकात ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य ही पात्रे एका बाजूला आपली आसने सदैव स्थिर करण्यात गुंतलेली दिसतात, आणि ती आसने डळमळविण्याचा भगीरथ प्रयत्न करणारे शूद्र हे पात्र दुसऱ्या बाजूला जिवापाड मेहनत घेताना आढळते. ह्या सगळ्यांत विजयश्री कधी ब्राह्मणादींच्या गळ्यात गळा घालते व कधी शूद्रांवर फिदा होते त्यातील ब्राह्मण हे पात्र प्रधान समजावे.’ (पृष्ठ १३८)

जातिव्यवस्था
जातव्यिवस्थेच्या निर्मितीचा अभ्यास करण्यासाठी सिंधुसंस्कृतीमधील स्त्रीप्रधान व्यवस्थेपासून सुरुवात करावी लागते. सिंधुसंस्कृतीपूर्वी भारतात आदिवासी समाज होता पण शिकारीची हत्यारे, मानवी हाडांचे सांगाडे, घरांच्या खुणा, दुर्मिळ स्वरूपातील खेळणी या साधनांशिवाय त्यांच्या सांस्कृतिक-सामाजिक जीवनाची माहिती मिळत नाही. म्हणून सिंधुसमाजापासून जातिव्यवस्थेच्या निर्मितीच्या अभ्यासाची सुरुवात करावी लागते. सिंधु-संस्कृतीची सुमारे २५० ठशांची चित्रलिपी होती. पण त्या चित्रलिपीचा आणि त्या भाषेचा वाचनशोध लागलेला नाही. असा शोध लागल्यानंतर सिंधुसंस्कृती आणि समाज यांच्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल. सिंधुसंस्कृतीबद्दलचे संशोधन अजूनही चालूच आहे. सध्यातरी क्षत्र व ब्राह्मण हे स्त्रीसत्ताक व्यवस्थेतून निर्माण झालेले दोन वर्ण अशी सुरुवातीची वर्णोत्पत्ती ध्यानात घ्यावी लागते. एकसमयावच्छेदेकरून चार वर्ण आणि चातुर्वर्ण्यव्यवस्था असा साचेबंद सांगाडा निर्माण होऊन वर्णव्यवस्था निर्माण झालेली नाही. अनेक टप्प्यांतून ती विकसित होत आली. त्यातील शूद्रवर्ण हे जातिव्यवस्थेच्या निर्मितीचे मूळ आहे. शूद्रवर्णाच्या विघटनातून प्राधान्याने असंख्य जातींची निर्मिती झाली. सिंधुसंस्कृतीमधील वर्ण आणि गणदासप्रथा यांचा विस्ताराने यापूर्वी विचार आलेला आहे. जात हा शब्द कसा आला याचा खुलासा वि.का.राजवाडे यांनी त्यांच्या भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या पुस्तकात केला आहे. “जनी म्हणजे जन्म देणारी स्त्री, जन म्हणजे जन्म देणारा पुरुष आणि अशा स्त्री-पुरुषापासून जन्मलेले ते जात. जात म्हणजे जन्मलेले मूल. कालांतराने विशिष्ट स्त्री पुरुषापासून जन्मलेले मूल, ती त्याची त्याच्या आई-वडिलांकडून आलेली जात, असा अर्थ रूढ झाला.’ (पृष्ठ ४७)

जाती हा शब्द जातिव्यवस्थेच्या अर्थी प्रथम फक्त बौद्धविनयपिटकात (इसवीसनपूर्व ६ वे शतक) वापरलेला आहे. वैदिक साहित्यात तो केवळ कात्यायन श्रौतसूत्रात आलेला आहे, पण तेथे तो केवळ कुटुंब वा कुल वा गोत्र या अर्थी वापरलेला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, जातिसंस्था बुद्धपूर्वकाळात म्हणजे वैदिक समाजात नव्हती. सबंध बुद्धकाळातील भारतीय समाजात वर्ण हीच संस्था होती. विनयपिटक हीन जाती व हीन सिप्प यांची खालीलप्रमाणे यादी देते (१) हीन जाती चण्डाल, वेन (बुरुड) नेसाद (निषाद), रथ-कार व पुक्कुस (भंगी) (२) हीन सिप्प नळकार (करंड्या टोपल्या करणारा), कुम्भकार, पेसकार (विणकर), चम्मकार व नहापित (न्हावी)

जैन जम्बुदीपप्रज्ञापी श्रेणींची पुढीलप्रमाणे वर्गवारी करते
स्पृश्य कारू श्रेणी कुंभार, पट्टेला (विणकर), सुवण्णकार, सूवकार (सूपकार), गंधर्व (गायक), कसवग (न्हावी), मालाकार, कच्छकार, तंबोलिक. अस्पृश्य कारू श्रेणी चम्मयरू (चांभार), जन्तपिलम गान्छिय (गच्छिक), छिम्पाय (रंगारी), कंसकार (कासार), सिवग (सिंपी), गुआर, भिल्ल, धीवर. सामंतव्यवस्थेत श्रेणींच्या संख्येत वाढ झाली आणि श्रेणींना जातींची नावे प्राप्त झाली. त्याचप्रमाणे गावाच्या गरजेप्रमाणे जातींच्या संख्येत वाढ झाली आणि जातिव्यवस्थेनुरूप बलुतेदार, आलुतेदार निर्माण झाले.
बलुतेदार १) लोहार २) सुतार ३) महार ४) मांग ५) कुंभार ६)चांभार ७) परीट ८) न्हावी १०) गुरव ११) मुलाणा १२) कोळी
आलुतेदार १) तेली २) तांबोळी ३) साळी ५) जंगम ६) कळवंत ७) डौया ८) ठाकर ९) घडशी १०) तराळ ११) सोनार १२) चौगुला.

कामाच्या स्वरूपाप्रमाणे आणि गरजेप्रमाणे बारा बलुतेदारांपैकी काही स्पृश्य तर काही अस्पृश्य ठरले.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जातिव्यवस्थेवर वेगळा प्रकाश टाकला आहे. वैदिक संस्कृतीचा विकास या पुस्तकात त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. वैदिक आर्यांच्या चातुर्वर्ण्यव्यवस्थेत व्यवस्थित रीतीने समाविष्ट न झालेल्या भारतीय जमातींचा संकरज जाती म्हणून जातिसंस्थेत स्मृतिकारांनी समावेश केलेला आहे, त्या अशा मल्ल, दाश (कोळी), खश, भिल्ल, मेद, कोल, चंडाल, उग्र, आयोणव इत्यादि. ज्या जमातींची नावे त्यांच्या धंद्यावरून पडलेली आहेत, त्यातील काही महत्त्वाची नावे अशी नट, स्वर्णकार, रथकार, सूत्रकार (सुतार), चर्मकार (चांभार), लोहकार (लोहार), कुम्भकार (कुंभार), मालाकार (माळी), तैलकार (तेली), नापित (न्हावी), कंसकार (कासार), रजक (धोबी). काही जातींचा देशी भाषेतील नावांनीच संकरज जाती म्हणून निर्देश केला आहे ढोर, कोल्हाटी, बुरुड, भोई.

धातुकाम, बांधकाम, वैद्यकी, शिकार इत्यादि कामे ऋग्वेदात सांगितली आहेत. ही कामे जातिभेदाप्रमाणे वाटलेली नव्हती. भारतकाळापर्यंत वर्णव्यवस्थेत व त्रैवर्णिकांत बाह्यांचा समावेश करून वैदिक धर्माची दीक्षा देण्याचे काम सुरू होते. परंतु त्यावेळीच वर्णभेदाला जातिभेदाचे स्वरूप येत चालल्यामुळे हे कार्य मंदावत गेले व शेवटी बंद पडले. जातिभेदाच्या रूपाने चातुर्वर्ण्याची यजुर्वेदाच्या व ब्राह्मणग्रंथाच्या काळातच सुरू झाली. १) ब्राह्मण व क्षत्रिय वर्णांचा झगडा अनेक वेळा झाल्यामुळे वंशभेदाचे स्वरूप चातुर्वर्ण्यास प्राप्त होऊ लागले. २) शूद्र वर्ण व आर्य त्रैवर्णिक यांच्यामध्ये बराच काळ टिकलेल्या सांस्कृतिक अंतरामुळेही जातिभेदाला तीव्रता प्राप्त होऊ लागली. ३) वर्णपरिवर्तन बंद पडल्यामुळे जातिभेदाचा पाया रचला गेला. परिवर्तनाची क्रिया बंद पडण्याचे एक महत्त्वाचे कारण आर्थिक आहे. ग्रामसंस्थेत पोषक ग्रामोद्योगांची वंशपरंपरागत स्थिरता जातिभेदाला मुख्य कारण झाली. भारतवर्षात सिंधुसंस्कृतीच्या नाशानंतर नागरसंस्कृतीला मुख्यत्व कधीच आले नाही. ग्रामीण अर्थशास्त्राच्या चिरंतनतेमुळे जातिभेद उत्पन्न झाला. (पृष्ठ २५४-५५)

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जातिव्यवस्थेच्या निर्मितीची ही केलेली मीमांसा वैदिक संस्कृतीच्या विकासाच्या अनुरोधाने केली आहे. वैदिक संस्कृती उत्तरोत्तर कशी विकसित होत गेली हा त्यांचा प्रतिपाद्य विषय असून जातिव्यवस्था हा विषय त्या अनुषंगाने आलेला आहे. जातिव्यवस्थेच्या निर्मितीचे सखोल चिंतन हा विषय त्यांच्यापुढे नाही. त्यामुळे जातिव्यवस्था कशी निर्माण झाली याचे एक ढोबळ चित्र, वैदिक आर्यांच्या कुटुंबसंस्थेच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी मांडले आहे. त्यातून जातिव्यवस्थेच्या निर्मितीचे काही धागे सापडतात व काळाचाही उगम शोधता येतो. ब्राह्मण, क्षत्रिय वर्णांचा झगडा अनेक वेळा झाला हे त्यांनी स्पष्ट केले आह. ऋग्वेदकाळात कामे जातिभेदाप्रमाणे वाटलेली नव्हती याचेही त्यांनी स्पष्टीकरण केले आहे. जातिसंस्था ही पुरोहितवर्गवर्चस्वामुळेच आतापर्यंत हजारो वर्षे स्थिरावली हे डॉ. मुरंजन यांचे मत निःसंशय ग्राह्य होय, असेही त्यांनी डॉ. मुरंजन यांच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे. (पृष्ठ १) “अपावित्र्याचे भय हा जातिभेदाचा व उच्चनीचतेचा धार्मिक गाभा आहे. हे पावित्र्य आणि अपावित्र्य शुद्ध नैतिक कल्पनावर किंवा एकेश्वरी भक्तीच्या तत्त्वावर आधारलेले नसते. त्याची बौद्धिक कारणमीमांसा सांगता येत नाही. तिचा आधार केवळ अंधश्रद्धा असते” असेही ते म्हणतात. (पृष्ठ ९)

भारताबाहेरील कोणत्याही देशातील समाजात भारतासारखी जातिव्यवस्था नसल्याने विदेशी संशोधकांना जातिव्यवस्थेचा नेमकेपणा सापडला नाही. कपालमितिशास्त्राप्रमाणे वंश किंवा जातींचा अभ्यास करणाऱ्या डॉ. घुर्ये, डॉ. इरावती कर्वे यांच्यासारख्या भारतीय संशोधकाकडून याच चुका झाल्या आहेत हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी डॉ. इरावती कर्वे यांच्या शोधग्रंथास लिहिलेल्या प्रस्तावनेतून स्पष्ट केले आहे.

विदेशी संशोधकांनी जातींची वैशिष्ट्ये आणि व्याख्या सांगितल्या. त्यांचे समालोचन डॉ. आंबेडकरांनी ‘हिंदूची जातिप्रथा व ती मोडण्याचा मार्ग’ या ग्रंथात केले आहे. सेनार्ट, नेसफिल्ड, सर एच. रिस्ले या विदेशी संशोधकांनी केलेल्या जातींच्या व्याख्यांमधील कमतरता डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केली आहे. डॉ. केतकर या भारतीय संशोधकाने केलेली जातीची व्याख्या वास्तवाच्या अधिक जवळ जाणारी आहे. जातिबाह्य विवाहबंदी व जातीत जन्मलेल्यांनाच सदस्यत्व, अशी जातीची व्याख्या करताना केतकरांनी दोन मुद्दे मांडले आहेत. पण दोन्ही मुद्दे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले आणि जात्यंतर्गत विवाह हेच जातीचे व्यवच्छेदक लक्षण ठरते असा त्यांनी निष्कर्ष काढला आहे. (१) विवाहबंधन (२) रोटीबंधन (३) व्यवसायबंधन (४) जातपंचायत (५) श्रेणीबद्धता व जातवार अलग वस्ती (६) आनुवंशिकता अशी जातिव्यवस्थेची सहा लक्षणे डॉ. आंबेडकरांनी सांगितली आहेत. शरद पाटील जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व या पुस्तकात म्हणतात आनुवंशिकता हे लक्षण सोडता बाकी पाच लक्षणे इसवीपूर्व सहाव्या शतकानंतर क्रमशः जन्माला येत गेली. सातव्या ते आठव्या शतकापर्यंत जातिव्यवस्था सहाही लक्षणांनी अंकित झाली, परिणतावस्थेला गेली. याच सुमारास राजपुतांचा उदय होतो. ते मुळात अभारतीय हूणशकादि गण वा जमाती. ते जातिव्यवस्थाक भारतात आले. त्यामुळे ते गणसमाजाचा भाग न राहता अगणी जातिसमाजाचा भाग बनले. तरीही ते क्षत्रिय म्हणून ओळखले गेले. (पृष्ठ ८) गुप्तकाळाच्या थोड्या आधीपासून शक, पहलव, हूण यासारखे परकीय वंश येथे येऊन स्थानिक जनजीवनात मिसळून गेले आणि त्यांची वैष्णवभक्ती व शौर्य यासाठी पुरोहितवर्गाने त्यांना क्षत्रियत्व प्रदान केले असे जी.एन.शर्मा म्हणतात. (पृष्ठ ६८) जातिव्यवस्था सहाव्या शतकानंतर सर्व सहा लक्षणांनी युक्त झाल्यामुळे जातीबाहेर लग्न करणे म्हणजे जातिबहिष्कृत होणे झाले. (पृष्ठ ७३) गणसमाजापासूनच बहिष्काराची तरवार प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर लटकत होती. ती कायदा करून काढण्याचे काम प्रथम ब्रिटिश सरकारने केले. (पृष्ठ ५८)

धर्मसूत्रांच्या निर्मितीबरोबर प्रकटपणे जातिव्यवस्थेची निर्मिती सुरू झाली. विविध धंदे करणाऱ्या गणांची ओळख त्यांच्या धंद्याच्या नावाने सुरू झाली. धर्मसूत्रे किंवा प्राचीन स्मृती यांच्या रचनाकाळी जातिभेदाला संपूर्णपणे महत्त्व आले. हा रचनाकाळ साधारणपणे इसवीपूर्व ६०० ते इसवीसन २०० असा आहे. जातिधर्म (जातीचे नियम) हा शब्द गौतम ११-२०, वसिष्ठ १ १७ व १९-७, मनु १-११३ व ८-४१ मध्ये येतो आणि जाती हा शब्द आपस्तंभ धर्मसूत्र २-३-६ व २-१-२ ३ मनु ४-१४१ व १०-११-१८ तसेच ४०-४७, याज्ञवल्क्य १-९५, २-६९, ३-२१३, नारद २८८ पाणिनी ४-१-१३७ यात येतो.

वैदिक धर्मसूत्रातील जातीबद्दलची ही माहिती पाहिल्यानंतर सर्वसाधारणपणे जातिव्यवस्था सामंतप्रथाक समाजव्यवस्थेतून दृढ झाली हे स्पष्ट होते. सामंतप्रथा बुद्धकाळापासून सुरू झाली. लहान-लहान दासगण नवीन समाजव्यवस्थेत विविध प्रकारची कामे करू लागले. त्यांच्या गणांची ओळख नष्ट झाली. असे दासगण त्यांच्या धंद्यावरून ओळखले जाऊ लागले. अशी धंद्यावरून त्या-त्या कारागीर गणांची ओळख सुरू झाली. सामंतप्रथा वरपासून म्हणजे राजेशाहीपासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचली. एकेका गावचे सामंत हे लहान स्वरूपातील राजेच बनले आणि गावापुरता त्यांचा अंमल सुरू झाला. या व्यवस्थेमुळे सामंतांनी जातिव्यवस्थानिर्मितीला मोठ्या प्रमाणात हातभार लावला. जातिव्यवस्थेला विरोध करणाऱ्यांना हे गावपातळीचे सामंत शिक्षा करू लागले. गावची गरज भागविण्यासाठी विविध कारागीरवर्गांना गावपातळीच्या सामंतांनी गावाच्या वसाहतीत सामील करून घेतले. दासवर्ण असलेले विविध छोटे गण गरजेपोटी गावाच्या वसाहतीत म्हणजेच पर्यायाने जातिव्यवस्थेत सामील झाले. असे दासगण शूद्रवर्णाच्या विघटनातून निर्माण झाले असल्याने कष्टाची कामे व सेवाचाकरी हे त्यांचे कर्तव्य बनले. कर्तव्यात चुका झाल्या तर त्याबद्दल मोठ्या शिक्षेची सोय धर्मग्रंथातून सांगितली होती. गावाचे स्थलांतर किंवा गावात वसाहत करण्यासाठी गावसामंतांची परवानगी आवश्यक होती. जीवन जगण्याच्या या गरजेपोटी दासवर्ण जातिव्यवस्थेला सामील होत गेले. जीवन जगण्याचा त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच उरला नाही. अनार्यांची राज्यव्यवस्था नष्ट होत, त्या प्रमाणात ही जातिव्यवस्था अधिक गतिशील झाली. इसवीपूर्व सहाव्या शतकाच्या सुमारास सुरू झालेली जातिव्यवस्थेची निर्मिती इसवीच्या पहिल्या शतकात परिणतावस्थेला गेली. जातिव्यवस्थेची निर्मिती सांगताना दा.ध.कोसंबी म्हणतात, श्रेणीवरून जाती व व्यवसायांची नावे स्पष्ट होतात. त्यावरून त्यांची उत्पत्ती गणातून झाली हे स्पष्ट होते. गणातून श्रेणी व नंतर जाती अशी निर्मितिप्रक्रिया आहे. “नव्या शूद्र महावर्णाचे मुख्य विभाजन एका बाजूला अ-निरवसित (स्पृश्य) शूद्र कारागीर जाती आणि दुसऱ्या बाजूला निर-अवसित (अस्पृश्य) शूद्र गावकामगार जाती-ज्या एके काळी दासगणांच्या वंशज होत्या-त्यांच्यात झाले. अस्पृश्यता अशाप्रकारे सामंतप्रथाक समाजाचे अपत्य आहे’, असे शरद पाटील यांनी दास-शूद्रांची गुलामगिरी या पुस्तकात स्पष्ट केले. (पृष्ठ४५०) अराजक संघगण कालखंडात (इसवीपूर्व ९०० ते ६०० पर्यंत व्यवस्था, नंतर राज्ये) शास्ता द्विजवर्ण केवळ क्षत्रियच असल्यामुळे म्हणजे वर्ण-जाति-अस्पृश्यतेची निर्मिती आणि याविरोधी संघर्षाचा इतिहास म्हणजे जैन, बौद्ध, शीख, शिवधर्म इत्यादी धर्मांची निर्मिती. अस्पृश्यता हा एक स्वतंत्र आणि विस्तारित विषय असल्याने या लेखाच्या मर्यादेत तो बसणे शक्य नाही. त्यासाठी पूर्ण कल्पना यावी म्हणून डॉ. आंबेडकरांचे शूद्र पूर्वीचे कोण होते? आणि अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले ही पुस्तके अभ्यासणे आवश्यक आहे. भारतीय वर्ण-जातिव्यवस्थेच्या संशोधनात आणि अभ्यासात मार्क्सवादी संशोधकांचे योगदानही मोठे आहे. त्यात प्रामुख्याने देवीप्रसाद चट्टोपाध्याय, दा.ध. कोसंबी, रोमिला थापर, गेल ऑमवेट इत्यादिकांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. पण या साऱ्यांचे प्रयत्न मार्क्सवादावर आधारलेले आहेत. प्राचीन भारतीय समाजात भांडवली अर्थव्यवस्थेची निर्मिती झालेली नव्हती. त्यामुळे मार्क्सवादी वर्गवाद ना वर्णव्यवस्थेत बसतो, ना जातिव्यवस्थेत. वर्ण-जाति-अस्पृश्यता यांचा समाजशास्त्रीय अभ्यास करून डॉ आंबेडकरांनी या विषयाचा समाजशास्त्रीय पाया घातला. त्यांच्यापुढे सिंधु संस्कृतीचे प्रगत संशोधन नव्हते. हे काम डॉ आंबेडकरानंतर प्रामुख्याने शरद पाटील यांनी केले. त्यांच्या संशोधनामुळे सिंधुसमाजव्यवस्थेचे स्त्रीसत्ताक स्वरूप, वर्णांची मूळ निर्मिती, भारतीय इतिहासातील ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षाचे स्वरूप स्पष्ट झाले. आ.ह.साळुखे यांनी वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, पुराणे यांचा सखोल अभ्यास करून या सर्व साहित्यातील हेतुपुरस्सर झालेली पक्षपाती रचना स्पष्टपणे मांडली. सेनार्ट, जेसफिल्ड, सर एच. रिस्ले या विदेशी संशोधकांनी डॉ. आंबेडकरांच्या पूर्वी वर्ण-जातिव्यवस्थेचा अभ्यास केला. या साऱ्याच संशोधकांच्या अभ्यासातून वर्ण-जातिव्यवस्थेवर काही-ना-काही प्रकाश पडत गेला. जातिव्यवस्थेचे नेमके स्वरूप या साऱ्यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सिंधु संस्कृतीच्या चित्रलिपीचा व भाषेचा शोध लागल्यानंतर या विषयावर आणखी प्रकाश पडेल. या संशोधनाची भारतीय इतिहास आतुरतेने वाट पाहात आहे.

संदर्भग्रंथ:

१) वैदिक संस्कृतीचा विकास – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
२) हिंदूची जातिप्रथा व ती मोडण्याचा मार्ग – डॉ. आंबेडकर
३) शूद्र पूर्वी कोण होते? – डॉ. आंबेडकर
४) जातिप्रथेचे विध्वंसन – डॉ. आंबेडकर
५) दास-शूद्रांची गुलामगिरी – शरद पाटील
६) जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व – शरद पाटील
७) जात्यन्तक भांडवलवादी लोकशाही क्रांती – शरद पाटील
८) पुरोहितवर्गवर्चस्व व भारताचा सामाजिक इतिहास – डॉ. सुमन्त मुरंजन (प्रस्तावना तर्कतीर्थ -लक्ष्मणशास्त्री जोशी)
९) वैदिक धर्म आणि बहुजनांची गुलामगिरी – आ.ह. साळुंखे
१०) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास – वि.का. राजवाडे
११) बळीवंश – आ. ह. साळुंखे
१२) मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद – शरद पाटील
१३) जातिव्यवस्था – निर्मिती आणि स्वरूप – प्रा. वसंत वाघमारे

पोखरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर ४१३ २४८