माझ्या येऊ घातलेल्या पुस्तकाचा गाभा असा संस्कृतींमधला खरा संघर्ष आजच्या सर्व लोकशाह्यांमधला अंतर्गत संघर्ष आहे. आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांचा आदर करत त्यांच्यासोबत राहायला तयार असलेले लोक आणि झडझडून वेगळ्या लोकांवर प्रभुत्व गाजवू इच्छिणारे लोक, यांच्यातला संघर्ष. किंवा गांधींच्या भाषेत मी असे म्हणेन की इतरांबाबतची आस्था आणि सहानुभूतीची भावना, आणि इतरांवर सत्ता गाजवायची इच्छा, यांच्यातला हा व्यक्तींच्या आत्म्यातला संघर्ष आहे. मी २००२ साली पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हा मला वाटत होते की भारतातली लोकशाही कोलमडण्याची ही कटुकठोर कहाणी असेल. पण ती लवचीकपणाची कहाणी झाली. भारतातल्या राजकीय संस्कृतीत, विशेषतः इथल्या प्रसारमाध्यमांच्या ताकदीतून उपजलेले काहीतरी असे आहे राजकीय संस्कृतीला टिकवून, तगवून धरणारे.
पण काही दुबळेपणाही आहे. यांपैकी कळीचा मुद्दा आहे शिक्षणव्यवस्थेचा. इथल्या शिक्षणातून मनाचा खुलेपणा जोपासला जात नाही, आणि जे शिकवले जाते त्याचे विश्लेषण करायची सवयही लावली जात नाही. कल्पनाशक्तीला प्रयत्नाने चालना देणेही इथे घडत नाही. इतरांना क्लेश देण्याचे परिणाम समजण्याची क्षमता आपणा सर्वांतच असते पण ती नृत्य, संगीत, नाट्य, अशा कलाप्रकारांमधून विकसित करावी लागते. टागोरांना हे समजले होते, तर जवाहरलाल नेहरूंना कमी समजले होते. दुसरीकडे हिंदुत्ववादाचे पुरस्कर्ते संस्कृतीघडणीत जास्त चलाख आहेत. त्यांनी खेळांमधून, शाखासंघटनांमधून, प्रतीके व भाषणांच्या वापरामधून, आणि काही सच्च्या, त्यागी, मोहक, आदर्शवादी, परोपकारी संघटनांमधून एक मारक शक्ती उभारली आहे. गांधींनंतर डाव्यांमध्ये हा त्यागी, परोपकारी आदर्शवाद संपलेला आहे. प्रतीकात्मक संस्कृतीसंघटन डाव्यांनी पूर्णपणे उजव्यांना देऊन टाकले आहे. बहुधा त्यांना आर्थिक मुद्देच महत्त्वाचे वाटण्यातून हे झाले आहे किंवा डाव्यांच्या मनातल्या धर्मांबद्दलच्या तुच्छतेतून हे घडले आहे.
नरेंद्र मोदी मात्र राष्ट्रीय पातळीवर काही करू शकेल असे मला वाटत नाही. उजव्यांनाही [? ! सं.] अमेरिकेशी प्रेमसंबंध ठेवू शकेलसा नेता हवा आहे, आणि मोदी तर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीमुळे अमेरिकेत जाऊही शकत नाही. मुळात अमेरिकेने व्हिसा देऊन परत घेणे हेच आश्चर्यकारक आहे.
पण यापेक्षाही मला महत्त्वाचा वाटतो तो तंत्रशाही, राजकारणविरोधी, नाहीरे वर्गाच्या दुःखाशी घेणेदेणे नसलेल्या मध्यमवर्गाचा वाढता प्रभाव. ही आयआयटी मनोवृत्ती तंत्रज्ञानात सक्षम व्हा आणि मानवी मूल्ये विसरून जा फार धोकादायक आहे, विशेषतः भारतासारख्या देशात. आणि अमेरिकेशी समझौते करण्याची गरज या विकृतीत भर टाकते, याची मला काळजी वाटते. मला सोनिया गांधी बोलते ते मुद्दे बरोबर वाटतात. तिची नैतिक कल्पनाशक्ती तीव्र आहे, असे मला वाटते. गुजरातेत स्त्रियांना काय भोगावे लागले, इतरत्र काय भोगावे लागते ते सोनिया गांधीला समजत असावे. पण तिला सांभाळून पावले टाकावी लागतील.
नुसबॉमना प्रश्न विचारलाः तुमच्या पुस्तकात असे मांडले आहे की विष्णु आणि कृष्णाच्या सर्जक. (creative), इंद्रियग्राह्य (sensuous), जवळपास स्त्रियांसारखे (almost feminine), अशा आदर्शाची जागा सैनिकी, मर्दुमकीच्या कल्पनांनी घेतल्याने फॅसिस्ट हिंदुत्वाचा उजवा प्रकार भारतीय मनांत रुजला. आपण जुन्या विष्णु-कृष्ण मनोवृत्तीकडे जाऊ शकू का? त्यावर त्या म्हणाल्या माझ्या पिढीचे अनेकजण मुळात भारताचा अभ्यास करायला उद्युक्त झाले, ते अमेरिकन मर्दानगीला विरोधी संस्कृती इथे असल्याने. व्हिएतनाम युद्धात त्यांना माझ्या पिढीच्या अनेकजणांना, counterculture ला, असे नुसबॉम म्हणत असाव्या. सं.] प्रेम आणि शांतीच्या संस्कृतीकडे वळायचे होते. म्हणूनच ते लैंगिकता, देवादिकांची लैंगिक आयुष्ये, यांबाबत लिहू इच्छित होते. मला वाटते की गांधी या (counterculture) वृत्तीला आधुनिक रूप कसे द्यायचे ते जाणत होते. अर्थात, ते त्यागी रूप होते. त्यात खेळकरपणा व इंद्रियग्राह्यता नव्हती. टागोर त्यांच्या विद्यापीठातून, नृत्य-नाट्य-संगीतातून तो खेळकर, इंद्रियग्राह्य भाव पकडू शकले. त्यांचा करिश्मा त्या आदर्थ्यांना जिवंत करू शकला. मला वाटते आज तो भाव बॉलिवुडमध्येच उरला आहे. ते ‘गीत गोविंद’ नाही, नेमके; पण बॉलिवुडच्या नटनट्या नाचू लागल्या की त्यांच्यात इंद्रियग्राह्य भाव दिसतो तो शरीरांचा सैनिकी वापर नसतो, हे त्याच्या आकर्षकतेचे एक अंग आहे. गंमत म्हणजे, हिंदु आणि मुस्लिम एकत्र येण्याची, आपसात विवाह करण्याची, आपसातली दरी मिटवण्याची बॉलिवुड ही एक जागा आहे. मार्दवाचे आदर्श एखादवेळी तिथे शिल्लक आहेत.
डाव्यांनी मिथके, भावनिक व धार्मिक प्रतीके वापरून संस्कृतिसंवर्धन करण्यापासून स्वतःला दूर ठेवले ते क्षेत्र उजव्यांना देऊन टाकले. हे कसे बदलता येईल? कठीण होत चालले आहे, ते. आज जर कोणी म्हटले की आपण रामायणाचा अभ्यास करायला ह्वा, तर इतर लोक ताबडतोब त्याच्यावर जातीयवादाचा, पंथवादाचा आरोप करतात. माझ्या काही मित्रांना हा अनुभव आलेला आहे. आणि भारतात मानव्यशास्त्रांचा इतका हास झाला आहे की विचारवंत नेतृत्व उरलेलेच नाही. परंपरांना पुन्हा काबीज करू शकेल असे नेतृत्व अमेरिकेत जाऊन रामायण शिकवत मजेत आहे. दीपेश चक्रबर्ती अमेरिकेत डावा विचारवंत मानला जातो, पण इथे त्याचा आदर केला जात नाही. अमेरिकेत नागरी हक्कांची चळवळ आफ्रिकन-अमेरिकन संगीताशी जोडली गेली. ब्लूज, जॅझ, सर्वांना समजणारे संगीत-प्रकार, त्याकाळच्या अमेरिकेतला तो एकमेव सर्जक संगीताचा पंथ होता. एका काळ्या माणसाला फाशी देण्याबद्दल बिली हॉलिडेने ‘स्ट्रेंज फ्रूट’ हे गाणे रचले. अमेरिकाभर साऱ्यांची आतडी पिळवटली गेली. भारतात लोकसंस्कृतीसाठी असे सर्वांना समान क्षेत्र निवडणे, हे मोठे आव्हान आहे. टागोरांनी सर्वांना म्हणता येतीलशी गाणी लिहिलीही, पण हा प्रकार रोडावतो आहे. आज बंगाली लोकांनाही टागोर कंटाळवाणे वाटतात. स्त्रीवादी चळवळी काहीतरी मोठी भूमिका निभावू शकतील, यात; आणि बॉलिवुडही, जर मनावर घेतले त्यांनी, तर. आणखी एक क्षेत्र आहे प्रांताप्रांतामधील भाषांच्या साहित्याचे. इंग्रजी साहित्याची पेठ फार व्यापारी होऊन अमेरिकेकडे नजर लावून बसली आहे. त्यामुळे ती वरवरच स्पर्श करते, प्रश्नांना. समाज आणि विविधतेच्या प्रश्नांशी लोक भिडतात ते खरे तर स्थानिक भाषांमधूनच. साहित्य, रंगभूमी, यांमध्ये भाषिक संस्कृती टिकवून धरणे महत्त्वाचे आहे.
उपयोगितावादी, जागतिकीकृत, तंत्रशाही, समूह-परिचयाला महत्त्व न देणारी, अशी चळवळ जगाला पंथवादापासून दूर असे जग उभारू शकेल का?
मला नाही वाटत. तुम्ही माणसांना अर्थशास्त्रीय हिशोबांमधले घटक मानायला लागलात की तुम्ही त्यांच्याशी सहानुभूतीच्या कल्पनाशक्तीने जुळू शकत नाही. मानवी अंगे गमावली जातात. नात्झी तंत्रशाहीसारखे होईल ते, खूप कार्यक्षम, आणि माणसांचा ‘माल (cargo)’ म्हणून विचार करणारी तंत्रशाही. त्यानेच तर सर्व अत्याचार शक्य झाले. माझे अनेक मित्र आर्थिक स्वातंत्र्यवादी आहेत. त्यांना वाटते की तंत्रशाही सुष्ट असेल, कारण लोक आपापले स्वार्थ जोपासत हव्या त्या सेवा, पुरवठादार वगैरेंचा वापर करतील. हे फारच भोळेपणाचे आहे. लोक कधीकधी इतरांचा खूप दुस्वास करतात, आणि ते ‘ते’ आहेत याला लांछन मानून त्यांचा वापर करत नाहीत. माझे वडील दक्षिण यूएसेत जन्मले. आयुष्य बह्वशी उत्तरेकडे घालवूनही त्यांचा आफ्रिकन अमेरिकनांबाबतचा द्वेष नाहीसा झाला नाही आणि हे एका प्रतिष्ठित, समर्थ वकिलाचे झाले. त्यांना खरेच वाटत असे की काळ्यांचा स्पर्श झाला की विटाळ होतो. माझे यहुद्याशी लग्न होणे काळ्यांशी संबंध येण्याइतके दुस्सह नव्हते, पण ते लग्नाला आले नाहीत आणि अनेक वर्षे माझ्याशी बोललेही नाहीत. काही अर्थी ह्याचा संबंध मर्दानगीच्या भावनेशी आहे. माझे वडील गरीब कामगाराच्या घरातले होते, आणि त्यांच्यात असुरक्षिततेची भावना खोलवर रुजली होती. त्यांना कुणापेक्षा तरी वर असण्याची तीव्र गरज असायची.
भारतात हे वेगळ्या रूपात दिसते. इथली असुरक्षिततेची भावना इतिहासातून येते. हिंदू पुरुषांवर अनेक वर्षे इतरांचे प्रभुत्व होते. आधी मुस्लिमांचे पण तो फार कुरूप प्रकार नव्हता आणि मग ब्रिटिश राज. त्यामुळे गोळवलकर आपण दुर्बळ असल्याने इतरांकडून दाबले गेलो, आणि दाबणाऱ्यांवर युयुत्सु त-हेने हल्ला करूनच आपण सबळ आहोत हे दाखवता येईल असे म्हणाले. हीच भावना गुजरातमधल्या भीषणतेमागेही होती. देशात इतरत्र आहेत त्यापेक्षा गुजरातेत मुस्लिम लोक आर्थिकदृष्ट्या जास्त सबळ होते, त्यामुळे स्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली.
[ तहेलका मासिकाच्या ८ डिसेंबर २००७ च्या अंकात (खंड ४, अंक ४७) संस्कृती आणि समाज विभागात द आयआयटी माइंडसेट फीड्स इंटु द फॅसिस्ट नेचर ऑफ द राइट या नावाने मार्था नुसबॉमची शोमा चौधुरी यांनी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली. त्या मुलाखतीचा गाभा वर दिला आहे. त्यातल्या आयआयटीच्या उल्लेखावर सलिल त्रिपाठी यांनी विरोध दर्शवला. हे विरोधी मत मोअर टॅन फाईव्ह पॉइंट समवन् या नावाने २२ डिसेंबर २००७ च्या अंकात (खंड ४, अंक ४९) प्रकाशित झाले. आता त्रिपाठींच्या म्हणण्याचा गाभा पाहा.]
अहमदाबाद जळत होते. संघ परिवाराचे गुंड मुस्लिमांना मारत होते, आणि पोलीस सांगत होते की मुस्लिमांचे रक्षण करायच्या आज्ञा नाहीत. नरेंद्र मोदींचे प्रशासन ज्या त-हेने वागले त्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने मोदीची तुलना नीरोशी केली.
हा रोमन सम्राट रोम जळत असताना फिड्ल वाजवत बसण्यासाठी इतिहासात कुख्यात आहे. हिंसेचे थैमान पाहात, नोंदत अनेक कार्यकर्ते व वार्ताहर फिरत होते. संतप्त, ओजस्वी भाषेत हृदयद्रावक रीतीने वर्णन करणाऱ्यांपैकी एक होता राज कमल झा, इंडियन एक्सप्रेस चा कार्यकारी संपादक. स्थळ होते गुलबर्ग सोसायटी, जिथे निर्दोषांची भीषण कत्तल घडत होती. आपण पाहिले, ऐकले तेच झाने नोंदले नाही. त्याने एक अभियंत्याच्या कौशल्याने घटनेतले उघड नसलेले पदर शोधून वृत्ताचे इमले उठवले. पण हे तो करता झाला यात आश्चर्य काय ? तो १९८७ साली पदवी प्राप्त केलेला आयआयटीचा स्नातकच आहे!
पण याच नियकालिकात अमेरिकन अकादमीय विद्वान मार्था नुसबॉम भारतातील माणुसीच्या भावनेच्या हासाचा दोष ‘आयआयटी मनोवृत्ती’वर टाकतात. द क्लॅश विदिन (The Clash Within) या आपल्या पुस्तकात तंत्रवैज्ञानिक, राजकीय, धार्मिक व आर्थिक घटकांचा तरल रचनेचा गोफ विणून नुसबॉन हिंदुत्वाच्या शक्तींना वाट मोकळी कशी झाली याचे स्पष्टीकरण देतात विशेषतः ती भावना सुशिक्षित मध्यमवर्गावर कसा पगडा बसवते हे त्या सांगतात. त्यांचे नेमके शब्द असे, “ही आयआयटी मनोवृत्ती तंत्रज्ञानात सक्षम व्हा आणि मानवी मूल्ये विसरून जा फार धोकादायक आहे, विशेषतः भारतासारख्या देशात.”
या युक्तिवादात काही तर्कशुद्धता तर आहेच. भारतातल्या शाळकरी मुलांना फार लहान वयात आपले भावी आयुष्यक्रम, careers, निवडावे लागतात. पंधरा वर्षांच्या वयातच त्यांना अनेक विषय सोडून द्यावे लागतात. हुषार मुलांवर कठीण परीक्षांच्या मालिकेतून आयआयट्यांसारख्या संस्थांमध्ये जागा पटकावण्याचा दबाव असतो. एकदा का तिथे पोचलात, की प्रमुख विषय तांत्रिक असतात. पदवी कमावून मुलगा कामाला लागेपर्यंत त्याचे इतिहासाचे स्मरण असलेच तर धूसर असते. (आणि हो, आजही बहुसंख्य आयआयटी स्नातक पुरुष असतात.).
अजय शहा हा अर्थशास्त्रज्ञ (आणि आयआयटी स्नातक) म्हणतो, “भारतातल्या बहुतेक लोकांना फार कमी इतिहास, राजकारण किंवा तत्त्वज्ञान माहीत असते. बुद्ध्यांक जरा जरी वरचा असला तर ते विज्ञान-तंत्रज्ञानाच्या रुळांवर लोटले जातात, आणि त्यांचे इतिहासाचे ज्ञान ‘अमरचित्रकथां’च्या पातळीवर राहाते.’ पण हे विसांस्कृतीकरण, Deculturisation आयआयटी स्नातकांना अमानवी, dehumanised ही करते, हा नुसबॉमचा निष्कर्ष ठार चुकीचा आहे. आणि (या त्यांच्या व्यक्तिगत शैक्षणिक इतिहासामुळे) यामुळे ते वंशविच्छेदाचे, genocide चे समर्थक होत नाहीत. ते बरेचदा अत्यंत हुषार असतात, त्यांना विक्षिप्त विनोदबुद्धी असते, काही सूक्ष्म, वहिवाटींपासून दूरच्या क्षेत्राबाबत ते ज्ञानी असतात, आणि वैज्ञानिक पद्धतीचा आदर करतात.
सर्वच समाजांमध्ये (सी.पी.स्नो ज्यांना दोन संस्कृती म्हणतो त्या) विज्ञान-तंत्रज्ञान संस्कृती आणि मानव्यशास्त्रे व कलांची संस्कृती यांच्यात दरी असते. राजप्पा अय्यर (आणखी एक आयआयटी स्नातक) म्हणतो, “नुसबॉम सांगतात त्यातला काही भाग खरा आहेच. तंत्रशहा, आर्थिक स्वातंत्र्यवादी, हे सहानुभूतीच्या भावनेत कमी असतात. मानवी स्वभाव आणि आपल्या कृतींचे मानवी परिणाम हिशोबात धरत नाहीत.”
पण नुसबॉम ज्या आयआयटी स्नातकांवर रोख धरते, त्यांनी झा घडवला, मेधा पाटकरचा सहकारी श्रीपाद धर्माधिकारी घडवला, उपजीविकेसाठी नावीन्यपूर्ण कर्जे देणारा विजय महाजन घडवला मॅग्सेसे पुरस्कृत भ्रष्टाचारविरोधक अरविंद केजरीवाल घडवला आणि डावा विचारवंत वार्ताहर प्रफुल्ल बिडवाईही घडवला. जातीयवादाचे कठोर टीकाकार, इन्फोसिसचे नारायणमूर्ती, ज्यांनी आपले दरबारी सेठ व्याख्यान फक्त गुजरातमधील हिंसाचारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी वापरले, तेही आयआयटीचेच. थोडक्यात म्हणजे, अनेक आयआयटी स्नातक आपल्या गणनयंत्रांपलिकडचाही विचार करतात. आयआयट्यांमध्ये गुणवत्तेला महत्त्व देण्याची meritocratic वृत्ती आहेच. त्या संस्थांमधला प्रवेश पारंपरिक श्रीमंती, सत्ताधाऱ्यांचे कुटुंबीय असणे, अशा बाबींवर अवलंबून नसतो, तर केवळ हुषारीवर असतो. अजय शहा म्हणतो, “आयआयटियन्सना गुणवत्तेच्या जोरावर अन्नसाखळी चढून आल्याचा गर्व असतो असे मला जाणवते.’ टीकाकार काहीही म्हणोत, आयआयटी संस्था ह्या एकमेकांची जातीय लेबले न जाणणाऱ्या विद्यार्थ्यांची सरमिसळ करणारे एक शिश्रींळपर्सी) आहे. एक विद्यार्थी मला म्हणाला, “तुमचे या (जातपात) बाबींकडे लक्षच जात नाही. फ्लुइड मेकॅनिक्सचा प्रश्न सोडवता येतो का, हेच महत्त्वाचे असते!!”
यामुळे आयआयटी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे राजकारण जवळपास नसते. राजकीय पक्षांच्या, आघाड्यांच्या कुरूप भारतीय वास्तवापासून त्या अकादमीय संस्था दूर असतात. ही सुखाची बाब आहे.
आणखी एक प्रसिद्ध अकादमीय संस्था आहे. तिच्या परिसरात राजकारण सतत हजर असते, आणि भारतीय वास्तव सतत आक्रमण करत असते, विद्यार्थ्यांची आयुष्ये व्यापत. सर्वत्र भारत असतो, आपल्या अनेकविध सत्यांसकट. आणि या परिसरातून राजकीय आयुष्ये घडतात. या संस्थेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जेएनयू म्हणतात. त्या संस्थेने भारताला सीताराम येचुरी आणि प्रकाश कराट दिले. आता याचा अर्थ लावा!
[पण तरीही …….. त्रिपाठींनी आयआयटी व जेएनयू या संस्थांच्या आपापल्या स्नातकांच्या घडणीतल्या भूमिका स्पष्ट केल्या असे मला तरी वाटत नाही. ‘दोन संस्कृती’चे एकत्रीकरण शक्यच नाही का? संपादक.]
पायवा
[आजचा सुधारक च्या सुरुवातीच्या काळात (एप्रिल १९९० ते एप्रिल १९९२) संस्थापक संपादक दि. य. देशपांडे यांची ‘विवेकवाद’ या विषयावरील वीस लेखांची एक मालिका होती, ती ‘पायवा’मधून पुनःप्रकाशित होत आहे. पहिल्या वर्षांतील इतर काही लेखही पुनःप्रकाशित होतील. आजचा सुधारक ची भूमिका पायवा मधून स्पष्ट होईल असे वाटते. सं.]