‘मला मुलगाच हवा’ या हट्टापायी आपल्या देशात हजारो स्त्रीभ्रूणहत्या होत आहेत. मुलगा हवा यासाठी सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक वा आर्थिक कारणे काहीही असोत, उत्क्रांती व विज्ञान मात्र यासंदर्भात फार वेगळे चित्र उभे करत आहे. मुलीपेक्षा मुलगा त्याच्या आईला फार तापदायक ठरू शकतो. जन्माच्या वेळचे मुलाचे वजन, पुरुषजातीतील टेस्टोस्टेरॉन ग्रंथिस्रावाचा वाढता प्रभाव, वा मुलांमधील जन्मतःच असलेला व्रात्यपणा इत्यादी गोष्टी मुलाला जन्म देणाऱ्या आईच्या जिवावर उठू पाहत असतात. शेफील्ड विद्यापीठात पुनरुत्पादन वर्तणूक या विषयावर संशोधन करत असलेल्या विपी लुम्मा या प्राध्यापिकेच्या मते जन्माला घातलेला प्रत्येक मुलगा सामान्यपणे आईचे आयुष्य चौतीस आठवड्यांनी कमी करत असतो.
तेहेतीस वर्षांची ही संशोधिका फिनलँड देशातील चर्चने सांभाळून ठेवलेल्या जन्म, विवाह व मृत्यू या गेल्या शंभर वर्षातील नोंदींचा अभ्यास करत आहे. या दाखल्यांवरून या संदर्भात काही आश्चर्यजनक निष्कर्ष तिने प्रसिद्ध केले आहेत.
मुलीपेक्षा मुलाचे वजन जास्त असल्यामुळे गर्भावस्थेतच आईच्या शारीरिक प्रकृतीवर जास्त ताण पडत असतो. मुलांमधील टेस्टोस्टेरॉन ग्रंथीमुळे आईतील रोगप्रतिकारक शक्तीलाच धक्का बसू शकतो. खासकरून क्षयरोगासारख्या रोगाणूंचा ती प्रतिकार करू शकत नाही. मुलीच्या तुलनेने मुलाच्या संगोपनासाठी आईला जास्त किंमत मोजावी लागते. मुलासाठी म्हणून तिला जास्त कष्ट घ्यावे लागतात. मुलीप्रमाणे मुले आईच्या घरकामात आजिबात मदत करायला तयार होत नाहीत. मुलाला वाढवणे आईला कायमचीच डोकेदुखी असते. आईचे अगोदरचे अपत्य मुलगा असल्यास नंतर जन्माला येणारे अपत्य नेहमीच दुर्बल राहील. त्याच्यात कुठल्या तरी सांसर्गिक रोगाचे शिकार होण्याची शक्यता जास्त असेल. प्रश्न मुलींच्यापेक्षा मुलांना प्रत्येक बाबतीत झुकते माप दिले जाते वा मुलांकडे वारस म्हणून बघितले जाते किंवा मोठा मुलगा इतर लहान भावंडावर अरेरावीपणा गाजवत असतो इत्यादी कारणे यासंदर्भात नाहीत, असे त्या संशोधकगटाने स्पष्ट केले आहे. जरी पाचवे अपत्य मुलगा असला तरी नंतर जन्माला येणारे मूल (मुलगा किंवा मुलगी!) दुबळेच राहील.
या संशोधिकेने फिनलँड येथे १७३४ ते १८८८ या कालावधीत जन्मलेल्या ७५४ जुळ्यांच्या अभ्यासावरून काही विशेष नोंदी केल्या आहेत. मुलगा व मुलगी अशी जोडी जुळ्यांत असल्यास त्यांच्यापैकी २५ टक्के स्त्रिया निरपत्य राहिल्या. किंवा इतर स्त्रियांप्रमाणे जास्त अपत्यांना जन्म न देता केवळ दोन अपत्यांनाच त्या जन्म देऊ शकल्या. १५ टक्के स्त्रियांचे जन्मच होऊ शकले नाहीत. भावाबरोबर जन्म घेतल्याचे घातक परिणाम गरिबाघरच्या स्त्रीलाच नव्हे तर श्रीमंतांच्या घरातील स्त्रियांनासुद्धा भोगावे लागले. तिच्या मते ही गोष्ट सांस्कृतिक, सामाजिक वा वर्गीय स्तर यांवर अवलंबून नाही. एवढेच नव्हे तर जुळ्यांपैकी मुलाचा जन्मानंतर तीन चार महिन्यांतच मृत्यू झाला व मुलगीच जिवंत राहिली तरी या निष्कर्षात फार फरक जाणवला नाही.
जननक्षमतेतील उणिवांचा मागोवा घेत गर्भाशयात जुळे वाढत असतानाच टेस्टोस्टेरॉनचे दुष्परिणाम दिसू लागतात, हे लुम्माच्या लक्षात आले. या स्रावाचा परिणाम केवल मनुष्यप्राण्यातच नव्हे तर प्रयोगशाळेतील उंदरांच्या बाबतीत व गायींच्या अभ्यासातसुद्धा आढळला. गायीच्या वासरांत एक नर व दुसरे मादी असल्यास टेस्टोस्टेरॉनच्या दुष्परिणामामुळे मादीला वंध्यत्व येऊ शकते.
भाऊ-बहीण आणि बहीण-बहीण अशा जुळ्यांचा तुलनात्मक अभ्यास करताना पहिल्याप्रकारच्या जुळ्यांतील स्त्रियांच्या नातवंड-पणतवंडांच्या संख्येत दुसऱ्या प्रकारच्या तुलनेने १९ टक्के घट झालेली आढळली. यावरून उत्क्रांती बहीण-बहीण अशा जुळ्यांना झुकते माप देत असावी. पुरुष व स्त्रिया यांच्यामधील शारीरिक व्यत्यास केवळ जन्मतःच प्राप्त झालेल्या द – ध रंगसूत्रावर अवलंबून नसतात. रंगसूत्राबरोबरच पुनरुत्पादन क्षमता व उत्क्रांतीचे वैशिष्ट्य यांच्यावरसुद्धा ते निर्भर असावेत. मुळातच जुळ्यांना जन्माला घालगे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने उपयुक्त नसल्यास ही आनुवंशिकता लाखांत वा कोटीत एक अशी विरळ प्रमाणातच असायला हवी होती. परंतु मनुष्यप्राण्यासकट इतर काही प्राणी सर्रासपणे जुळ्यांना जन्म देत असतात. त्यामुळे प्राध्यापिकेने काढलेले निष्कर्ष अचूक वाटत असले तरी जननक्षमतेच्या संदर्भात काहीतरी घोळ आहे, अशी प्रतिक्रिया कुझावा या गानववंशशास्त्रज्ञाने व्यक्त केली आहे.
जननक्षमतेचाच पुनर्विचार करत असल्यास वर्तमान परिस्थितीचाही अभ्यास करणे रंजक ठरेल. परिणामकारक गर्भनिरोधक साधनांची सहज उपलब्धता, मुबलक प्रमाणात मिळत असलेले सत्त्वयुक्त आहार व बालमृत्यूच्या दरातील घट या गोष्टी औद्योगिकीकरणपूर्व परिस्थितीतील उत्क्रांतीच्या कल्पनांना छेद देणाऱ्या आहेत. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी बालमृत्यूचा दर चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त होता, यावर पुराव्यासहित सांगूनही विश्वास बसणार नाही.
परंतु अजूनही जगातील बहतांश राष्ट्र औद्योगिकीकरणपूर्व परिस्थितीतूनच जात आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. ज्यांच्याकडे जास्त मुले, त्यांचाच मोठा परिवार व त्यांच्याच पिढीचा जास्त विस्तार यात बदल झालेला नाही. फिनलँडसारख्या अतिविकसित देशांचेच फक्त उदाहरण न घेता आफ्रिकेतील गॅम्बियासारख्या मागासलेल्या देशातील कौटुंबिक आरोग्य व जनन-मरणासंबंधीची माहिती यांचे विश्लेषण करून निष्कर्ष काढणे योग्य ठरेल.
लुम्मा व तिचे सहकारी अजून एका मुद्द्यावर भर देत आहेत. फिनलँडच्या नोंदीवरून आजी-आजोबा व उत्क्रांतीचा सिद्धान्त यांच्यात घनिष्ठ बंध आहे हे दिसून येते. या नोंदीवरून नातवंडाचे दीर्घ आयुष्य व त्यांची जननक्षमता यात आजीचा फार मोठा वाटा आहे. नोंदीचे विश्लेषण करत असताना वडील व आजोबा या संदर्भात काही मदत करत नाहीत, हे स्पष्ट होत आहे. वडिलांमुळे मुलाचे लहान वयात लग्न व त्यामुळे जास्त संख्येने अपत्ये ही शक्यता असली तरी नातवंडांच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात भर पडत नाही हे लक्षात आले आहे. कदाचित संस्कृति-परंपरा यांचा प्रभाव असू शकेल. पुरुष-प्रधान कौटुंबिक व्यवस्थेत पुरुषांचा गेल्या शंभर वर्षातील विशेषकरून वयोवृद्धांचा वाटा जास्त असण्याची शक्यता आहे. कदाचित लहान नातवांच्या तोंडातील घास हिसकावून म्हाताऱ्या आजोबांच्या तोंडात दिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजोबापेक्षा आजीचे दीर्घायुष्य उत्क्रांतीला जास्त पूरक असावे या विधानाच्या बाबतीत दुमत नसावे. आजच्या स्त्रिया एक-दोन बाळंतपणातच गलितगात्र होतात. त्या तुलनेने पूर्वीच्या स्त्रिया दरवर्षीचे गर्भारपण कसे काय सहन करत असतील याची कल्पनाच केलेली बरी!
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती व जननक्षमता यांचा आढावा घेतल्यास पूर्वीच्या काळी गरिबांच्यापेक्षा श्रीमंतांचीच मुले दीर्घकाळ जगत होती, त्यांचा वंश विस्तार होत असे. आता मात्र श्रीमंत राष्ट्रांमधील लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात कमी होत आहे. कदाचित पूर्वीप्रमाणे संख्यात्मक वाढीवर भर न देता संततीच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष दिले जात असावे. परंतु या प्रश्नाला अजूनही नीट उत्तर सापडले नाही.
उत्क्रांतीची ही अडथळ्याची शर्यत मुलांना कितीही प्रतिकूल असली तरी ‘मुलगा हवाच’ या हट्टाला बळी पडलेल्या आधुनिक समाजात पुरुषांची कमतरता कधीच भासणार नाही. जनुकीय दृष्ट्या एका ‘चांगल्या’ मुलाला जन्म दिल्यास त्यातून अनेक अपत्यांचा जन्म होऊन जनुकीय वाढ, वितरण व सातत्य टिकत असल्यास अशा मुलाला जन्माला घालण्याचे कष्ट हवेत विरून जातील व स्त्रीचे जीवन सार्थकी लागेल हा साधा सरळ हिशोब त्यामागे असावा. जास्त काही मिळवण्यासाठी अगोदर आपल्याला काही गुंतवणूक करावी लागते. म्हणून तर मुलीपेक्षा मुलाकडे जास्त ओढ असू शकेल !
८, लिली अपार्टमेंटस्, वरदायिनी सोसायटी, पाषाण-सूस रोड, पाषाण, पुणे ४११ ०२१.