पत्रबोध

केशवराव जोशी, तत्त्वबोध , कल्याण-कर्जत हायवे, नेरळ (रायगड) ४१०१०१, दूरभाष : ९५२१४८-२३८६५२
आ.सु.च्या सप्टे.०७ च्या अंकारा “वायकांचे आ.सु.बद्दलचे विचार मागविले आहेरा” हे फार चांगले झाले. दि.य.देशपांडे ह्यांनी आसुच्या पहिल्या अंकारा (एप्रिल १९९०) मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की “शंभर वर्षांपूर्वीचे जे आगरकरांनी समाजास बुद्धिवादी घडविण्याचे कार्य करण्यास आरंभ केला; ते आज अपुरे ठरल्यामुळे पूर्णत्वाला नेण्याचे कार्य करण्याच्या हेतूने सुधारक काढीत आहोत. विवेकवादाच्या बरोबरच व्यक्तिस्वातंत्र्य, समता, न्याय इ. मूल्ये हाताळली तरी प्राधान्य विवेकवादाच्या प्रसाराला आहे.”
मुंबईला मराठी विज्ञान परिषद आहे. ते विज्ञान छापतात. त्यांनी जुलै ०७ च्या अंकांच्या “अमिताभ बान्द्रा ते प्रभादेवी अनवाणी जातो” ह्यावर टीका केली. मी त्यांना कळविले की अंधश्रद्धेविरुद्ध तुम्ही दरमहा टीका केलीत तर दरवर्षी मी तुम्हांस एक हजार रु. देईन. आज विज्ञानपदवीधर वाढले तरी विज्ञाननिष्ठ वाढलेच नाहीत. मानसशास्त्राप्रमाणे स्किझोफ्रेनियाचा रोगी डिल्युजन (अस्तित्वात नसलेल्या देव, राक्षस, भूत इ.) वर विश्वास ठेवतो. म्हणजे देवावर टीका आलीच. आज विज्ञानपदवीधर भूमितीश्रेणीने वाढले आहेत. त्यांना सर्व विज्ञान पाठ आहे. तरीही हेच लोक देवळापुढील रांगेत उभे राहून तासच्यातास फुकट घालवितात. पंढरपुराची यात्रा, शिर्डीची यात्रा, शेगावच्या यात्रा यांना जातात. त्यांना ज्ञानेश्वराची ओवी “देहे देऊळी असतां । जाशी नाना तीर्थां ।।’ किंवा तुकारामांचा अभंग “गणराया गणपती विक्राळ । लाडूमोदकांचा काळ ।। किंवा रामदास ‘धातु पाषाण-मृत्तिका । चित्रलेप काष्ट देखा । तेथें देव कैसा मूर्खा ।। इ. सांगणे आवश्यक नाही का? आज जर अनेक वाहिन्या भजन-कीर्तन-भविष्य इ. दररोज सांगत आहेत तर विवेकवादसुद्धा त्याचप्रमाणे सांगावयास
हवा. माझ्या तरुणपणी एकही पुढारी कुंभमेळा, पंढरीची वारी, कसबा किंवा प्रभादेवीच्या गणपतीला जात नव्हता. त्यांना समाजाला शहाणे करावयाचे होते. वाचन न करणाऱ्या हल्लीच्या तरुणांना हे सांगावयास नको का?
फक्त विज्ञान शिकविले तर मूठभर अतिश्रीमंत होतील. देवळांना देणग्या देतील. आज तिरुपतीच्या देवळात तीन टन सोने आहे. महाराष्ट्रातील देवळांत अडीच लाख कोटी संपत्ती आहे. सिद्धिविनायकाला दरवर्षी पंचवीस कोटी मिळतात. अर्थशास्त्रीयदृष्टया हा ‘डेड मनी’ राष्ट्राच्या उपयोगासाठी वापरला तर देशाचे आणि विदर्भाचे दारिद्र्य दूर होईल हे विज्ञानतज्ज्ञांना समजावून सांगणे म्हणजे धर्मावरच टीका आहे ना! देवळांतून अनेक पुढाऱ्यांना पैसा दिला जातो.
आज सर्व पुढाऱ्यांना फक्त सत्ता व पैसा हवा आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सबरवाल (माजी मुख्य न्यायाधीश) त्यांनी त्यांच्या मुलांच्या धंद्याला उपयोगी (टाइम्स १३-०९-०७) पडतील असे निकाल दिले. न्या. पटेलांनी सिलिंगखाली येणारी त्यांची जमीन रु. १२५ कोटीला विनापरवाना विकली. अडवाणींनी त्यांच्या पुतणीचे (रोशन अडवाणीचे) लग्न ता. १२-०२-९३ रोजी अमेरिकानिवासी धनाढ्य मुस्लिम सलिम पथेरीयाशी लावून दिले. पथेरीया परधर्गीय व परदेशीय नव्हे काय ? समाजाला विज्ञाननिष्ठ केले तर त्यांना हजारो रु. मिळतील पण ते विवेकनिष्ठ न झाल्याने समाजाभिमुख होणार नाहीत. समाजाविषयीची कर्तव्ये शिकविण्यासाठी त्यांना विवेकवादी करा.

प्रभाकर आचार्य, १७, साहस कॉलनी, राणा प्रतापनगर, नागपूर ४४० ०२२.
प्रा. घोंगेबद्दल आसुचा एक मित्र हरविला हे तुम्ही लिहिलेले थेट हृदयाला जाऊन भिडले, घोंगेसारखा गुणी मित्र गेल्याबद्दलची नुसती हळहळ आणि त्यांच्या स्वभावाचे, जीवनशैलीचे, वरवर न दिसणाऱ्या पण आतून ओल्याचिंब भावनेने रेखाटलेले चित्र त्यांचे दर्शन देऊन गेले असे वाटते.
ऑक्टोबर २००७ च्या आ.सु. अंकातील संपादकीय वाचून त्यात “नेमकेपणा’ नसल्याचे जाणवले. राम-सेतू प्रकरणाबद्दल “तुमच्या सुधारकाचे काय म्हणणे आहे असे मित्र विचारतात असे संपादकांनी म्हटले आहे. तेव्हा राम-सेतूबद्दल निर्भीड, स्पष्ट असे मत वाचकांना अपेक्षित होते. ‘श्रद्धा-अंधश्रद्धा-खरी(?) श्रद्धा’ हा मथळा नेमक्या विषयाचे दिग्दर्शन करणारा वाटत नाही. त्यात पुन्हा खरी श्रद्धा इथे प्रश्नचिह्न देऊन वाचकांच्या मनातही प्रश्नचिह्न निर्माण केले गेले आहे…
एकूण संपादकीय ६८ ओळींचे. त्यात तेरा ओळी भंडारा प्रकरणात खर्च झाल्या, लेखिका तस्लिमा नासरिनसाठी अनावश्यक तपशील देण्यात १३ ओळी खर्च झाल्या आणि ज्या विषयाचा श्रद्धा-अंधश्रद्धा या विषयाशी अर्थाअर्थी दूरान्वयानेही संबंध नाही त्या डॉ. आंबेडकरांच्या स्वातंत्र्य शोधण्यात १३, १४ ओळी निरर्थक खर्च पडल्या.
धर्माचा अर्थ सांगायला आणि आमचे न ऐकले तर तुम्हाला जगायचा हक्क नाही, शिरच्छेद होईल, देहान्त प्रायश्चिताशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही. हे सांगावयास बुवा-बाबा, पादरी, धर्मगुरू मुल्ला मौलवी तत्पर आहेत.
लेखिका तस्लिमा नासरिन हिच्या छळाची किंवा जनरल मुशर्रफ यांना दिल्या गेलेल्या धमक्यांची प्रकरणे अगदी ताजी आहेत. एका माळेत सर्वांना गोवण्याच्या आग्रहातून शिरच्छेद अशी धर्मांधता हिंदू धर्मातही आहे अशी वाचकांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राम-सेतू प्रकरणाबद्दल संपादकीयामध्ये फक्त बारा ओळी आहेत त्यातही सुधारकाचे “असे असे” मत आहे, असे स्पष्टपणे न सांगता ‘जिज्ञासूंना” गेल्यापिढीतील थोर संशोधक दप्तरी यांचा लेखसंग्रह पाहता येईल असे त्यांचेकडे बोट दाखवून आ.सु.नी आपले स्पष्ट मत देण्याची जबाबदारी टाळली आहे असे वाटते. कारण हा खटाटोप कुणीच करणार नाही. त्यापेक्षा (पृष्ठे ८२ ते १०६) त्यामध्ये काय सांगितले आहे ते संपादकांनी दोन तीन ओळींत सांगून टाकले असते तर बरे झाले असते.
जगण्यासाठी माणसाला आधाराची गरज असतेच. एक आधार म्हणजे ज्ञान-विज्ञानाची कास धरणे आणि दुसरा आधार म्हणजे श्रद्धा. भारतीय समाज साधा-भोळा असून भाविक आहे. खेड्यापाड्यांतील अज्ञ जनता करुणानिधीसारखी ज्ञानी नाही. त्यांच्या रोमरोमांत राम भिनलेला आहे.

राजीव जोशी, तत्त्वबोध , कल्याण-कर्जत हायवे, नेरळ (रायगड) ४१०१०१. दूरभाष : ९५२१४८-२३८६५२
“पोलिस ही यंत्रणा धर्म, जात, पंथ या पलिकडे असून… यासाठी पोलिस स्टेशनमधील देवतांच्या तसबिरी काढून टाकण्यात याव्यात’ असे आदेश दिल्याबद्दल (म.टा. दि.१० सप्टेंबर २००७ मधील वृत्त) सहपोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) श्री. के. एल. प्रसाद यांचे अभिनंदन.
“काही राजकीय पक्ष याचा फायदा उठवतील” असा काळजी(!)चा (किंवा चिथावणीचा) सूर लावणारे ‘काही’ अधिकाऱ्यांचे मनोगत या वृत्ताच्या शेवटी प्रसिद्ध केले आहे, या निमित्ताने थोडेसे. नको त्या गोष्टींना हल्ली वारेमाप प्रसिद्धी दिली जाते. काय प्रसिद्ध करू नये? याचे भान ब्रेकिंग न्यूजच्या मोहापुढे सुटल्यामुळेच अदनान पत्रावालाची निघृण हत्या झाली. आजवर अनेक पांथस्थ, दर्यावर्दी असे अनेक जण जगभर वणवण फिरले त्यांनी नवी दिशा दिली. भूगोल बदलला, जग जवळ आणले, लाखमोलाची टिपणे नोंदविली. लो. टिळकांनी पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांचा उद्घोष केला. परंतु लो. टिळकांचा वारसा सांगणारे पत्रकार “बान्द्रे ते सिद्धिविनायक मंदिर” या व्यक्तिगत लाभासाठी केलेल्या प्रवासाचे, जणू जगप्रवासच झाला आहे अशा थाटात, ‘बाजारू मूल्यां’साठी (?) (न्यूज ‘व्हॅल्यू) तोंडभरून कौतुक करीत बसले. अमिताभ बच्चन प्रकरणाबाबत मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रभाकर देवधर यांनी चिंता व्यक्त केली आहे. (म.वि.प.पत्रिका ) जुलै २००७)
लो. टिळकांचे अजून एका कारणासाठी नाव नमूद करणे आवश्यक आहे. समाजाच्या एक पाऊल पुढे असावे अशी शिकवण त्यांनी दिली. “काही राजकीय पक्ष याचा फायदा उठवतील” अशा दहशतीस खतपाणी मिळाले तर श्री. के. एल. प्रसाद यांनी उचलले तसे खंबीर पाऊल उचलण्याबाबत इतर अधिकारी कच खातील. “बांद्रे ते सिद्धिविनायक मंदिर” अशासारख्या प्रवासांना विनाकारण प्रसिद्धी मिळाली तर जनताही तिकडेच फरफटत जाईल. अशी वृत्ते प्रसिद्ध झाली तर समाज मागे खेचला जाईल. चुकीच्या गोष्टी समाजात होत असताना ‘फोल विवेकापोटी’ गप्प राहणे हेसुद्धा लो. टिळकांच्या पत्रकारितेशी विसंगत आहे.

र. ग. दांडेकर, १०३, धनश्री बिल्डिंग,स्वरनगरी, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे ५१. ‘सत्यवस्तु’ एक टिपण
सत्य वस्तू जाणणे हे तत्त्वज्ञानाचे जर उद्दिष्ट मानले तर दुसरा प्रश्न, ते कसे जाणून घ्यावयाचे हा आहे. मनुष्याला जाणून घेण्यासाठी सर्वसामान्यपणे निसर्गतः दोन साधने उपलब्ध आहेत (१) इंद्रिय आणि मनःप्रत्यक्ष (२) विवेक. परंतु या ज्ञानसाधनांनी मला जे ज्ञान प्राप्त होते ते ‘सत्यवस्तु’ जशी आहे तसेच तिचे होते की नाही हे पडताळून पाहण्याचे तिसरे ज्ञानसाधन नाही म्हणून सत्यवस्तू अज्ञेय ठरते.
या दोन साधनांव्यतिरिक्त साक्षात्कार (अतींद्रियज्ञान) हे तिसरे ज्ञानसाधन मानावे तर ते सर्व मानवांना निसर्गतः प्राप्त नाही. म्हणून सत्यविषयक ज्ञान साक्षात्कारी, अंतर्ज्ञानी अशा विशेष लोकांसाठीच उपलब्ध आहे असे म्हणावे लागेल किंवा अंतर्ज्ञानाने प्राप्त होणारे ज्ञान सुद्धा वस्तू जशी आहे तसेच होते हे ठरवायला अंतर्ज्ञानाशिवाय अन्य साधन नाही. किंवा जर ही ज्ञानसाधने म्हणजे प्रत्यक्ष, विवेक, अंतर्ज्ञान यांचे अंगी स्वतःचेच प्रामाण्य आहे असे मानले तर जसे ज्ञान प्राप्त होईल तशीच सत्य बाजू आहे असे मानावे लागेल.

प्रभाकर गोखले, पद्मावती, २०, शिरगांवकर सोसायटी, कोल्हापूर – ४१६ ००८. दूरभाषः २५२०१९४
अंकाचे वाचन मी बऱ्यापैकी करत असतो. अद्यापपर्यंतचे अंक व गेल्या ४/५ महिन्यांचे अंक यात फारच फरक जाणवतो. पूर्वीचे अंक गंभीर, काही वेळा माझ्या बुद्धीच्या व आवडीच्या पलीकडे असत. पण आजचे त्याचे स्वरूप फारच सोपे व सवंग झाल्याचे जाणवते. लुई पाश्चर, द विंची, हृदयरोग बरा होतो इ. माहितीवजा लेख आ.सु.मध्ये यावेत याचे सखेद आश्चर्य वाटते. हे कुठेही उपलब्ध आहे. आ.सु.मधील जागा त्यांनी वापरावी हे बरोबर आहे काय ?
“तम्हास हे माहीत आहे काय ?’ लोकमान्य ते महात्माचे परीक्षण करण्याबद्दलचे आवाहन पान १९७ ऑगस्ट ‘०७ चे अंकात व त्याचे परीक्षण पान २१७ ते २४ हे ऑगस्ट ‘०७ च्याच अंकात, याचे आश्चर्य वाटते. गोविंद तळवलकरांच्या सदर ग्रंथाबद्दलच्या परीक्षणाबद्दल सहानुभूती, वडीलकीचे नाते ही भाषा परीक्षणाच्या काटेकोरपणाचा अभाव दर्शविते तसेच, ऑक्टोबर ‘०७ चे अंकातील विनोद! अंक काढताना विवेकवाद अगदीच दृष्टिआड होऊ नये.
शुभेच्छा.
दिवाकर मोरेश्वर राजे, चैतन्य, प्लॉट नं. ८२/८३, श्री गजानन प्रसाद नगर, व्हेटर्नरी कॉलेजमागे, सेमिनरी हिल्स, नागपूर ४४० ००६.
दूरभाष : २५११२१८, सुकर्ण : ९८२६०८२०३९
आ.सु. चा अंक वाचनीय वाटतो. करुणानिधी आणि रॅशनॅलिझम (ऑगस्ट ‘०७) या लेखामधून आपल्या देशामधील स्वतःला रॅशनॅलिस्ट म्हणवणाऱ्या इतकेच नव्हे आपले पक्षकार्यकर्ते देखील रॅशनॅलिस्टच असावे असा आग्रह धरणारे व कटाक्ष बाळगणारे नेते किती भंपक असतात हे दिसून येते. आपल्या देशामधील नेत्यांना त्यांच्या राजकीय सोई आणि स्वार्थाच्या दृष्टीने जे जे आवश्यक असते ते योग्यच वाटते. हे नेते खरे तर रॅशनॅलिस्टच नव्हेत! लिओनार्डो डा विन्चि हा एक दूरदृष्टीचा वैज्ञानिक होता. केवळ चित्रकार म्हणूनच त्याची ख्याती व माहिती सर्वसामान्यांना आहे. यशवंत ब्रह्मांच्या लेखामधून लिओनार्डोच्या दूरदृष्टीच्या संशोधनावर व रेखाचित्रावर चांगलाच प्रकाश टाकण्यात आला. श्री ब्रह्मसाहेबांना धन्यवाद.
गांधीनंतरचा भारत या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकांवरील परिचयात्मक लेखामुळे सदरचे पुस्तक वाचलेच पाहिजे असे औत्सुक्य निर्माण आले आहे. या पुस्तकामधील काही बाबींचा उल्लेख हा निश्चितच (उदा. हक्सर पेपर्स) नवीन आणि सर्वसामान्यांच्या समजुतीपेक्षा अगदीच अनपेक्षित आणि खळबळजनक वाटला. विशेषतः १९७७ मधली आणिबाणीचे पर्व कै. इंदिरा गांधी व कै. जयप्रकाश नारायण यांचे बाबतीतील अभिप्राय हा ऐतिहासिक महत्त्वाचा वाटला. आणिबाणीबाबत श्री गुहा यांचा अभिप्राय निश्चितच कठोर वाटला. विशेषतः इंदिराजी आणि जयप्रकाश नारायण हे दोघेही आणिबाणीचे खलनायक आहेत हा. या परीक्षणामुळे या पुस्तकाबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे.
या अंकामधील इतर लेख देखील वाचनीय आहेत. जसे ‘लोकमान्य ते महात्मा’ या डॉ. सदानंद मोरे यांच्या पुस्तकावरील श्री. प्रभाकर गोपाळ दंडे यांचा लेख! नागपूर येथे २३ व २४ जुलै २००७ रोजी या पुस्तकाचे लेखक डॉ. सदानंद मोरे यांचे लो. टिळकांच्या १५० व्या जयंतिनिमित्त झालेल्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर हा लेख अत्यंत चांगला वाटला. या पुस्तकामधील श्री गोविंदराव तळवलकरांच्या साधनेच्या अंकामधील अतिशय परखड टीकेच्या पार्श्वभूमीवर प्रा. दंडे यांची सहृदयतेने या पुस्तकाचा परामर्श घेतला आहे.
एकूणच आजचा सुधारक च्या वाचनीयतेबद्दल आपले हार्दिक अभिनंदन ! [ श्री. राजे यांचे पत्र उशिराने प्रकाशित होत आहे याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.]

ब्रिजमोहन हेडा, ३३, ब, समर्थ कॉलनी, अमरावती ४४४ ६०६.
आपला नोव्हेंबर महिन्याचा अंक मिळाला. अंक आ.सु.च्या परंपरेस धरून आहे हे खरे असले तरी त्यातील पृष्ठ क्रमांक ३५३ वरील शेवटच्या विनोदी चुटक्याने गालबोट लागले आहे.
हा विनोद स्त्रियांच्या पुनर्विवाहाकडे कुत्सितपणे पाहणारा आहे. एकीकडे स्त्री-पुरुष समतेचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे पुनर्विवाहाच्या विषयाची टवाळी करायची हे आ.सु.ला निश्चितच शोभत नाही. हेच वाक्य जर हॉलिवूडच्या पुरुष नटाच्या तोंडी असते तर इथे विनोद झाला असता काय ?
स्त्री-पुरुष समता हवी असेल तर योनिशुचितेवर अतिरिक्त भर देणारी मानसिकता आपल्याला बदलवावी लागेल. स्त्रीला तिचे स्वतःचे जीवन आहे, स्वतःच्या कल्पनेप्रमाणे तिला जीवन जगण्याचा अधिकार आहे हे जर मान्य करायचे असेल तर लैंगिक संबंधाबाबतही आपल्याला उदार दृष्टिकोण पत्करावा लागेल. विवाह करावयाचा की नाही, विवाहाशिवाय लैंगिक संबंध ठेवावे की ठेवू नये, समलिंगी कामसंबंध मान्य करावे की करू नये या सगळ्या प्रश्नांचा आपल्याला नव्याने विचार करावा लागेल. आजही विवाहव्यवस्था किंबहुना संपूर्ण सामाजिक व्यवस्थाच मुळी पुरुषकेंद्रित आहे. परंतु स्त्री अर्थार्जन करू लागल्यानंतर, मुलामुलींचे अविवाहितावस्थेतील वय वाढू लागल्यानंतर पूर्वीची मूल्ये आज कालबाह्य होऊ लागली आहेत व ही भूमिका आजच्या सुधारक ला मान्य आहे असे एकूण संपादकीय धोरणावरून जाणवते. असे असतानाही वरील विनोदाला आपल्या अंकात मिळालेले स्थान पाहून नवल वाटले आणि खेदही वाटला. रवींद्र द. खडपेकर, २०-पार्वती, पाटीलवाडी, सिद्धेश्वर तलाव, ठाणे ४०० ६०१. सुकर्ण : ९८६९००८३२६ आम्ही लटिकें ना बोलू
आ.सु. मध्ये शारदा यांनी लिहिलेली ‘सुहासिनीची सत्त्वपरीक्षा’ ही हकीकत वाचली. ती फारच एकतर्फी वाटते. हकीकतीचा प्रवास : रुग्ण डॉक्टर लेखिका संपादक वाचक असा झालेला आहे. तेव्हा ती थोडीफार तरी विपर्यस्त होणारच! सुहासिनीच्या सासरच्या मंडळींकडची काही बाजू असेल तर ती सांगितली गेलेली नाही. जे काही लिहिले आहे ते पूर्ण खरे आहे असे मानले तर कोणालाही सुहासिनीच्या सासरचा रागच येणार, आणि सुहासिनीला सहानुभूती मिळणार.
परंतु, मुलीला मागणी आली एवढ्यावर हुरळून जाऊन काही चौकशी न करता मुलीचे लग्न लावगारे आईबाप मूर्खच म्हणायला हवेत. दुसरी मूर्ख सुहासिनी! कायदा शिकत होती म्हणे! उपयोग काय केला त्याचा?
सुशिक्षित, सुसंस्कृत होण्याबरोबर अन्यायाचा प्रतिकार करायलाही शिकावे लागते. संघर्षाला सिद्ध राहावे लागते. ते सुहासिनीने, सुहासिनीच्या माहेरच्यांनी जराही केलेले दिसत नाही. मग मरा! आपण शेळी झालो की लचके तोडायला लांडगा तयार असतोच. देवो दुर्बलघातकः ।
दूरदर्शन मालिकांमधल्या सोशिक, अन्याय सहन करणाऱ्या, तरीही कुटुंबाचे हित पहाणाऱ्या तथाकथित सद्गुणी (?) नायिका सुहासिनीच्या आदर्श असाव्यात. त्यामुळे तिची दुर्दशा झाली. ‘खटासी असावें खट, उद्धटासी उद्धट’ हे रामदासांचे वचन तिने अनुसरायला हवे होते.
२१ व्या शतकांतही सुहासिनीची ही रडकथा! यावर विश्वास बसणे खरोखर कठीण आहे. माझ्या भोवतालची काही उदाहरणे : (१) प्रियंका (वय ३५) बालवर्गात जाणारा मुलगा तिचा पगार महिना ५०-६० हजार. नवऱ्याचा ६०-७० हजार. अधुरी एक कहाणी मालिकेतली अमृता पटवर्धन ही नायिका पाहून प्रियंका म्हणते. ‘कसली ही डॉक्टर ! डॉक्टरकी न करता यऽऽश, यऽऽश करीत नवऱ्याच्या मागे फिरतेय! काहीही दाखवतात! खरे तर नवरे बायकांच्या पुढे त-त, प-प करीत असतात. आणि करायलाच पाहिजे! मी सासू, सासरे, दीर सगळ्यांना ठिकाणावर ठेवते!’ (२) वंदना (वय ५०) नवरा लक्षावधी रुपये कमावतो. समाजात खूप मान व प्रसिद्धी आहे. पण वंदना व तिच्या दोन कॉलेजवयीन मुली, तिघींनी मिळून त्याला घरांत ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडलेले आहे. त्याचे जरा काही चुकले की तिघीजणी वाघिणीसारख्या त्याच्यावर तुटून पडतात. (३) आभा (वय ६०) हिची मुलगी श्रीमंतघरी मुलगा नुकताच डॉक्टर होऊन कमावू लागला आहे पण नवरा कारकून म्हणून नोकरीतून निवृत्त. ते हिला खाते. हिने नोकरीत नवऱ्याच्या दुप्पट पगार मिळवला. आता ‘आळशी’ म्हणून नवऱ्याची हेटाळणी करीत त्याला फाडून खाते आहे. (४) श्री व सौ. रेगे नवपरिणीत जोडपे नवरा बँकेत अधिकारी पत्नी गृहिणी घरात नवरा फरशी पुसण्यापासून सर्व कामे करतो. पण ती नवऱ्याला ‘तुमचे काम चांगले नाही’ म्हणून बोलत असते. (५) श्री. वझे प्राध्यापक. बायको ज्यू प्रेमविवाह नवरा सर्व घरकाम करतो, मुलांकडेही लक्ष देतो. ती नोकरी करीत नाही. फक्त स्वयंपाक व तापटपणा करते.
ही झाली शहरांमधली ब्राह्मण व तत्सम जातीतली कथा! आता खेड्यांत? (१) कर्नाटक जिल्हा बेल्लारी-तालुक्याचे गाव संड्र मराठा आडनाव घाटगे घरात ७ मुली नवरा दारुड्या अर्थातच घरात दारिद्रय बायको संतापली की नवऱ्याच्या सरळ फाडफाड मुस्काटांत मारायची. (२) ओरिसा जिल्हा क्योंझर तालुक्याचे गाव बडबिल असेल फार तर १०००० वस्तीचे. आदिवासी मजूर स्त्री, तिच्या दारुड्या नवऱ्याला चपलेने मारीत रस्त्यांतून घराकडे नेत होती. बध्ये हसत होते.
माझ्या ६५ वर्षांच्या आयुष्यांत नवऱ्याचा मार खाणारी बायको मी पाहिलेली नाही. फक्त ऐकलेली आहे. बायकोकडून मार खाणारे नवरे मात्र पाहिलेलेही आहेत आणि ऐकलेलेही आहेत. बायकोला घाबरणारे तर पुष्कळ आहेत.
तर ही आपल्या भारतातली परिस्थिती आहे. माझ्या भोवतीच्या १५-२० वृद्ध जोडप्यांमधील नवरे मरून गेलेले आहेत. बायका जिवंत आहेत. ह्या त्यांच्या नवऱ्यांपेक्षा ५-१० वर्षे जास्तच जगलेल्या आहेत.
आता नाव लक्षात नाही. बायकांपासून बचाव करायला एका वकिलाने एक नवरेसंघटना नोंदित केलेली आहे. त्या संघटनेची सदस्यसंख्या वाढते आहे. त्यांची बाजू हिरिरीने न्यायालयात मांडणारी, वर्तमानपत्रांतून लिहिणारी वकील एक स्त्री आहे. ती म्हणते; ‘बायकोची माहेरची मंडळी नवऱ्यांना मारहाण करतात. अशी प्रकरणे न्यायालयात खूप आहेत.’
सामाजिक परिस्थिती खरी आहे तरी कशी? स्त्री-मुक्ती चळवळी अतिरंजित वाटतात. त्याचेच पडसाद ‘सुहासिनी’ लेखात शारदाबाईंकडून उमटलेले वाटतात.

टी.बी. खिलारे, राजविमल टेरेस, आर.एच.-४, रामनगर कॉलनी, बावधन, पुणे २१.
राहुल पाटील यांच्या लेखातील (आ.सु. ऑक्टो.’०७) माहितीची तीन भागांत विभागणी करता येईल सेक्सविषयक गैरसमज (ही) दूर करणे, सेक्सबद्दलची आवड-निवड व निरुपयोगी तथ्ये (शीशश्रशीी षरलीी). ह्यांपैकी सेक्सविषयक खोट्या कल्पनांचा (ही) समाचार घेणे उचितच. परंतु सेक्सविषयक आवड-निवड व माहितीचा ज्ञान म्हणून काही उपयोग नाही. अशा निरुपयोगी तथ्यांचा लेखात समावेश करून त्यावर चर्चा करणे आवश्यक नाही. कुणाला चहा आवडतो तर कुणाला कॉफी आवडते, कुणाला दूध-दही, कारले-भोपळा ह्या गोष्टी आवडतात, तर कुणाला त्या आवडत नाहीत. परंतु अशा एखाद्याच्या आवडी निवडीविषयी आपण चर्चा करत नाही. त्याचप्रमाणे सेक्सविषयक आवडी-निवडीची चर्चा करणे ीरींळेपरश्रळी ला मान्य नाही. इच्छा, प्रेम, वासना, लैंगिक आकर्षण इत्यादी गोष्टी ह्या व्यक्तीच्या खाजगी बाबी आहेत. ह्या गोष्टींबद्दल चर्चा करू नये किंवा त्या कुणी कुणावर लादू नये, हे पेरियारचे मत ग्राह्य ठरावे. लेखात राहुल पाटील ह्यांनी अनेक निरुपयोगी तथ्ये सांगितली आहेत व कामुक चित्रपटाचे उदात्तीकरण/समर्थन केले आहे, ज्यांमध्ये अनेकांचे शोषण केले जाते. त्यामुळे राहल पाटील यांनी सेक्सविषयक फक्त गैरसमज तेही सुधारकाशिवाय अन्य मासिकांत सांगावयास हरकत नाही.
प्रदीप पाटील ह्यांनी ‘ल शशिीळाशपीं’ ह्या माझ्या लेखावर काही आक्षेप घेतले आहेत. ईश्वर ही संकल्पना मानवी मेंदूतूनच निर्माण झालेली असली तरी त्याबद्दलचा ‘ईश्वरीय जनक’ शोधणे, मेंदूमधील चेतापेशींच्या काही साखळ्या ईश्वरावर विश्वास असण्याशी निगडित आहेत असे मानणे ह्या प्रकारची गृहीतके घेऊन शास्त्रज्ञ करीत असलेले प्रयोग निरर्थक आहेत. ईश्वर ही संकल्पना’ (लेपलशी) असल्याने संकल्पनेचा जनुक शोधणे किंवा त्याचा संबंध मेंदूमधील चेतापेशीच्या काही साखळ्यांशी लावणे निरर्थक तर आहेच शिवाय वेळेचा व पैशाचा अपव्यय आहे. कोणतीही संकल्पना जनुकांवर किंवा चेतापेशीवर असा प्रभाव (ठसा) पाडू शकणार नाही की जो पुढच्या पिढीत उतरेल. भूत, चेटूक, जादूटोणा ह्या संकल्पनेमध्ये आणि ईश्वर ह्या संकल्पनामध्ये काही फरक आहे असे मला वाटत नाही. असे असताना व्ही.एस.रामचंद्रन व पर्सिंजर सारखे शास्त्रज्ञ ईश्वर ह्या एकाच संकल्पनेचे स्थान मेंदूत शोधण्याचा प्रयत्न का करतात?
जागतिक कीर्तीचे मज्जाशास्त्रज्ञ व्ही.एस.रामचंद्रन ह्यांच्यावर मी टीका केल्याने ‘त्यांच्यावर अन्याय झाला’ असे भा.वि.देशकर ह्यांनी म्हटले. रामचंद्रन ह्यांच्यावर केलेल्या टीकेचा कोणताही मुद्दा चर्चेला न घेता केवळ ‘अन्याय केला’ असे म्हणणे म्हणजे जात्यभिमान, देशाभिमान, वंशाभिमान, धर्माभिमान, भाषाभिमान, प्रांतिकाभिमान व हितसंबंध ह्या ळीीरींळेपरश्र कारणांशिवाय अन्य काही रींळेपरश्र कारण असू शकेल असे मला वाटत नाही. प्रभाकर नानावटी, ८, लिली अपार्टमेंटस्, वरदायिनी सहकारी गृहसंस्था, पाषाण सूस रोड, पाषाण, पुणे ४११ ०२१.

डॉ. राहुल पाटील यांचे तुम्हाला हे माहीत आहे का? हे पत्र (आ.सु.ऑक्टो. मध्ये छापलेले) वाचत असताना सखेदाश्चर्य वाटले. मुळातच हा विषय आ.सु.ने चर्चेला का घेतला, हे कळले नाही.
या पत्रात उल्लेख केलेल्या बहुतांश माहितीतून ‘विकृत मनोवृत्तीच्या चाळ्या’व्यतिरिक्त वाचकांच्या ‘नार्मल व सेफ सेक्स’ विषयीच्या ज्ञानात तसूभरही भर पडत नाही. विकृत मनोवृत्ती समाजातील अनेक व्यवहारांत अनेक ठिकाणी उबग आणण्याइतक्या आढळत असतात. त्याला लैंगिक व्यवहारसुद्धा अपवाद असू शकत नाही. परंतु अशा गोष्टींना कितपत प्रसिद्धी द्यावी, जाहीर वाच्यता करावी हा ज्याच्या त्याच्या विवेकी विचारधारेचा भाग असेल.
डॉ. राहुल पाटील यांनी आवर्जून म्हणून सांगितलेले कटुसत्य लैंगिक शिक्षणाचा भाग होऊ शकेल का याबद्दल माझ्या मनात शंका आहे. माझ्या मते लैंगिक शिक्षणातून, लैंगिक व्यवहारांचा योग्य समज व त्याविषयी असलेले गैरसमज याचे ज्ञान होत असल्यास त्याचा सर्वांनाच फायदा होईल. त्यातून आरोग्यवंत समाजाकडे वाटचाल होऊ शकेल. परंतु विकृत मनोवृत्तीचे राहुल पाटील यांनी दिल्यासारखे यादी देत बसल्यास त्याला काही अंत नाही व त्यातून हाती काही लागणार नाही. कामुक चित्रपटांचे चित्रीकरण, त्यातील कलाकारांचे अनुभवकथन, लैंगिक अवयवांचे आकारमान इ.इ. विषय आंबटशौकिनांसाठी असून या गोष्टीतूनच लैंगिक शिक्षण होऊ शकते असे म्हणत असल्यास कागजीवन सल्लागार(?) नको त्या विषयावर अवाजवी भर देत आहेत (व त्यातूनच रवयंप्रसिद्धी गिळवत आहेत!) असे म्हणावे लागेल.
पत्रलेखकांना यासंबंधात (याच प्रकारे!) बरेच काही लिहायचे आहे, असे दिसते. हा विषय अशा प्रकारे ताणण्यात हशील नाही. कृपा करून हा विषय येथेच संपवावा, ही विनंती.

डॉ. प्रदीप पाटील, चार्वाक, २६०/१-६, जुना कुपवाड रोड, सांगली. सुकर्णः ९८९०८४४४६८
टी.बी.खिलारे यांना मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांनी त्यांच्या प्रत्युत्तरात दिलेले नाही. ‘ईश्वरीय जनुक’ असे मी माझ्या लेखात कोठेही म्हटलेले नाही. ‘ईश्वरीय जनुक’ हा खिलारेंचा शोध आहे. शास्त्रज्ञ मेंदूतील (देवाविषयी) करीत असलेले प्रयोग निरर्थक आहेत असे त्यांचे म्हणणे असेल तर ते कसे निरर्थक आहेत हे त्यांनी (हॉरगन सोडून) इतर व्यक्तींचा आधार न घेता, विज्ञानाचा आधार घेऊन सांगावे. चेतामानसविज्ञान (Neuropsychology) या शाखेचा आधार घेऊन सांगितल्यास उत्तमच.
आता संकल्पनेबाबत. विवेक ही देखील संकल्पना आहे. ती देखील मेंदूतून निर्माण होते. ‘कोणतीही संकल्पना जनुकांवर किंवा चेतापेशीवर प्रभाव पाडू शकणार नाही’ असे ते म्हणतात. मग विवेकवाद कशासाठी?
खरे तर, संकल्पनांच्या जनुकावर नव्हे तर जनुक वा चेतापेशींचे व्यवहार यांतून परिस्थितीच्या परिणामामुळे संकल्पना निर्माण होतात. म्हणूनच संकल्पना या मेंदूच्या विविध भागांतील व्यवहारातून निर्माण होतात असे मानले जाते. ‘संकल्पनांना’ नसजैविक (छशीलळेश्रेसळलरश्र) पाया असतो असे अलीकडील संशोधनातून दिसून येत आहे. अमूर्त संकल्पना (अर्लीरलीं उपलशी) हा संकल्पनांचा उच्चतम विकास असतो. आणि तो बोधनक्षमतेचा (उसपळींळेप) महत्त्वाचा भाग आहे. बौधनिक मानसविज्ञानात (उसपळींळींश झीलहेश्रेस) ‘संकल्पने’विषयी सखोल वैज्ञानिक माहिती मिळेल. ती खिलारेंनी जरूर वाचावी.
मेंदूतून ईश्वरसंकल्पना निर्माण होते हे त्यांना मान्य आहे. मग मेंदूत अशी कोणती कार्ये घडतात जी ही संकल्पना निर्माण करतात ते त्यांनी सांगावे अशी पुन्हा एकदा मी त्यांना विनंती करतो.
भूत, चेटूक व ईश्वर या संकल्पनांमध्ये फरक नाही. फरकाविषयी मी काहीही म्हटले नाही. मेंदूतून हे सारे कसे निर्माण होतात ह्याविषयी नेचर, सायन्स, ब्रेन या मासिकांतून विपुल आलेले आहे. अलीकडील डॉ. ओलाफ ब्लान्क यांचाही प्रयोग याविषयी बरेचसे सांगतो.
शास्त्रज्ञांनी ईश्वराचे स्थान मेंदूत शोधायचे नाही तर मग कोठे हे टी.बी. खिलारे सांगतील तर बरे! डॉ. राहुल पाटील, कन्सलटिंग सेक्सॉलॉजिस्ट, कोल्हापूर. सुिकर्ण : ९८२२५३४७५४
e_mail : drahul2000@yahoo.com
आ.सु.(ऑक्टो.०७) मधील तुम्हाला हे माहीत आहे का ? ह्या माझ्या लेखावरील टी.बी. खिलारे व प्रभाकर नानावटी यांचे आक्षेप वाचले. दोघेही ‘मानवी कामजीवन’ व त्यातील विविध समस्यांविषयी ज्ञानशून्य आहेत हे त्यांनी दाखवून दिले आहे. ज्ञानी माणसाला अज्ञानी असल्याचे नाटक करता येते परंतु अज्ञानी माणसाला त्याचे अज्ञान लपवता येत नाही. हे ‘अज्ञान’ दोघांच्याही पत्रातून प्रगटले आहे. दोघांच्याही ‘आक्षेपांना’ माझे उत्तर देण्याआधी माझ्याविषयी थोडी माहिती देतो म्हणजे माझी भूमिका समजून घेताना वाचकांना सोपे जाईल. मी सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेली ६ वर्षे कोल्हापूरमध्ये समुपदेशन केंद्र चालवितो. दि. ६ जुलै २००१ पासून दै. तरुण भारत (कोल्हापूर) मधून शास्त्रीय लैंगिक शिक्षण, व तशाच प्रश्नांविषयी उत्तरे, लेख, कव्हरस्टोरी या स्वरूपात माहिती मी देत आहे. तसेच दै. पुढारी, दै. संध्यानंद, दै. महासत्ता, सा. पोलीस टाइम्स. ह्यांतून माझे लेख प्रसिद्ध झाले आहेत. कोल्हापूर शहरात शाळा, महाविद्यालयातून लैंगिक शिक्षण, एचआयव्ही/एड्स यावर माझी व्याख्यानेही होतात. आज दिनांकपर्यंत ३,०६७ पेशंटस् मी तपासले. प्रत्येकाच्या लैंगिक समस्यांवर, समज-गैरसमजांवर योग्य ते शास्त्रीय मार्गदर्शन, उपचार करणे हा प्रामाणिक हेतू यामागे होता/आहे. तेवीस ‘घटस्फोट’ केसेसपैकी अठरा घटस्फोट समुपदेशाने मी वाचवू शकलो.
दि.२ जून २००७ रोजी कोल्हापूरमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या एका भोंदू डॉक्टर (अशोक सूर्यवंशी)ला आम्ही रीतसर छापा टाकून अटक करविली. दि. १२ सप्टें. २००७ रोजी ‘लिंगवर्धक औषधे, मलम, यंत्रे यांविषयी ज्या जाहिराती वृत्तपत्रातून प्रकाशित होतात, त्यांना उघडपणे आह्वान दिले, जाहिरातीत म्हटले तसे त्यांनी शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करून दाखविल्यास माझ्याकडून एक लाख रुपये रोख बक्षीस पत्रकार परिषदेत मी जाहीर केले होते/आहे. एवढ्या माझ्या पात्रता परिचयानंतर आता ह्या दोघांच्या आक्षेपांकडे वळतो.
प्रभाकर नानावटी यांनी विकृत, विकृत मनोवृत्ती, आंबटशौकीन हे शब्दप्रयोग कोणताही विचार न करता वापरले आहेत. “विकृत’ हा शब्द कामशास्त्राच्या संदर्भात वापरण्याआधी त्या माणसामध्ये शास्त्राचा खूप अभ्यास असावा लागतो. त्यातला अर्धा टक्का देखील अभ्यास ह्यांचा नाही.
उपचारांसाठी येणाऱ्या स्त्री-पुरुषांमध्ये लिंगाविषयी, संभोगाच्या कालावधीविषयी वस्तुस्थिती काय आहे याबद्दल काही गैरसमज निर्माण झालेले असतात. ते दूर करण्यासाठी चित्रपट दाखविणे अत्यंत फायदेशीर ठरते.
कामशास्त्रीय तद्वत कामविषयक चित्रपटांच्या चित्रीकरणात याविषयीही सर्व माहिती सी.डी.मध्ये माझ्याकडे उपलब्ध आहे.
घटस्फोटाच्या तीन केसेस या तंत्राचा वापर करून मी वाचविल्या. म्हणून काम-चित्रपटांच्या चित्रीकरणाविषयी मी लिहिले आहे. पुरुष लैंगिक अवयवांचे काही आजार जन्मजात आहेत. त्यात लिंग मोठे किंवा लहान असू शकते. याविषयी माहिती विवाहपूर्व मार्गदर्शनात सांगावीच लागते असे माझे स्पष्ट मत आहे. तर आंबटशौकीन हा शब्द वापरूनच प्रभाकर नानावटी यांचा कामजीवनातील मागासलेपणा लक्षात येतो. ‘आ.सु.मध्ये हा विषय नको’ हे ठरवणारे प्रभाकर नानावटी कोण? ते स्वतःला काय समजतात ? यौवनाच्या उंबरठ्यावर या णपळलशष ने काढलेल्या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे वाचन तरी नानावटींनी करावे. ह्या पुस्तकाचा वापर शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देताना करतात. यामध्ये समलिंगी मैथुन, मुखमैथुन, गुदमैथुन या सर्वांचा उल्लेख केला आहे. कामविज्ञानामध्ये जी काही सत्ये आहेत ती सांगायलाच पाहिजेत. ते कितीही स्पष्ट नागड्या भाषेत असू द्या. शिक्षण देताना वयोमानानुसार शब्द शैली, काय किती सांगायचे हे ठरवावे लागते. वात्स्यायनाच्या कामसूत्रात या सर्वांचा उल्लेख आहे. समलिंगी संबंध १९७४ पर्यंत विकृत मानले जात होते. त्यानंतर आशीळलरप झीलहळीळल औीलळरींळेप ने ते प्राकृत मानले. ते सुद्धा अभ्यासाअंती. नानावटींसारखे ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे नव्हे. त्यांची ‘आरडा ओरड’ करून पळ काढायची पद्धत छान वाटली म्हणूनच ‘हा विषय ताणण्यात हशील नाही.’ अशी वाक्ये वापरली गेली. म्हणजे पुढे मी उघडपणे आह्वान दिले तर उत्तरे द्यायला कामजीवनाविषयी शास्त्रीय अभ्यास इथे आहे कोणाचा? लगे रहो प्रभाकर नानावटी! लगे रहो!!
टी. बी. खिलारे यांना आरोग्यविषयक लेखांबद्दल का खुन्नस आहे हे समजत नाही. आ.सु.ने विशेषांक काढला…. कखत / अखऊड त्यावरील वेटेज त्यांना पटले नाही. आता त्यांनी माझ्या लेखावर घेतलेल्या आक्षेपांबद्दल सेक्सविषयक आवड-निवड व माहितीचा ज्ञान म्हणून काही उपयोग नाही. हा ‘भन्नाट’ शोध टी.बी.खिलारे यांनी कोठून लावला त्याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून अपेक्षित आहे.
इच्छा, प्रेम, वासना, लैंगिक आकर्षण इ. गोष्टी ह्या व्यक्तीच्या खाजगी बाबी आहेत. ह्या गोष्टींबद्दल चर्चा करू नये. त्या कुणी कुणावर लादू नये. हे पेरियारचे मत ग्राह्य ठरावे असे खिलारेंचे मत. चर्चा लादू नये इथपर्यंत ठीक. इतर मते सांगणारे पेरियार कोण ? डशेश्रेसळीीं की अपवीश्रेसळीीं ? पेरियार यांचे इतर विचार पटले म्हणजे लैंगिक आकर्षण, वासना इत्यादी विषयावरील त्यांची मते डोळे झाकून मान्य करणे ही खिलारेंची बौद्धिक गुलामगिरीच नाही काय? सेक्सविषयक खोट्या कल्पनांचा समाचार घेणे उचितच असे म्हणणारे टी.बी.खिलारे इकडे लोकांच्या ह्या खाजगी बाबींबद्दल चर्चा करू नये असे कसे म्हणतात ? चर्चा न करता समाजाच्या खोट्या कल्पना कशा लक्षात येतील ?
सेक्सविषयक ‘फक्त’ गैरसमज ‘तेही’ सुधारकाशिवाय अन्य मासिकात सांगावयास हरकत नाही. हे सांगताना खिलारेंनी मला जवळ जवळ ‘ऑर्डरच’ सोडली आहे. भले खिलारेंची हरकत असली तरी मी लिहायचे थांबवणार आहे थोडेच ?
बॉलीवूड, टॅलीवूड (तामीळ फिल्म जगत्), हॉलीवूड ह्यांच्या चित्रपटांपेक्षा कामुक चित्रपटांचा धंदा प्रचंड चालतो हे वाचकांना माहीत नसेल म्हणून येथे सांगतो. ज्या पुरुषास डोळ्याने दिसते, ज्याला दिवसातील ३-४ तास मोकळे मिळतात. ज्याची कॅसेट भाड्याने घेण्याची तयारी आहे, घरी टी.व्ही आहे, तो तरुण पुरुष ‘कामुक चित्रपट’ आयुष्यात संधी मिळताच कधी तरी बघतोच. बघणे विकृती नाही. त्यातील सत्यासत्यतेबद्दल तज्ज्ञांकडून माहिती घ्यावी.
कलकत्ता येथे २००० साली झालेल्या राष्ट्रीय कामविज्ञान परिषदेस मी उपस्थित होतो. तेथे अमेरिकेतील सायकॉलॉजिस्ट, सेक्सॉलॉजिस्ट डॉ. लिओनर टिफर उपस्थित होत्या. त्यांना कामुक चित्रपटांविषयी मी विचारले असता त्या म्हणाल्या, ‘हल्ली उपलब्ध असलेल्या कामुक चित्रपटांचा स्तर चांगला नाही. चांगला कामुक चित्रपट तयार करताना सेक्सॉलॉजिस्टची गरज आहे.’ शिवाय एखादा चांगला ‘कूक’च हे जाणतो की कोणत्या अन्नपदार्थात कधी, का, किती, मीठ वापरायचे!
गेली सहा वर्षे मी काम-चित्रपटांवर झहऊ करण्याच्या उद्देशाने अभ्यास करतोय. आठशेहून अधिक काम-विषयक चित्रपटांचे कलेक्शन माझ्याकडे आहे. तो माझा अभ्यास विषय आहे. आक्षेप घेण्याआधी दोघांनीही स्वतःचा यावर किती अभ्यास आहे ते स्वतःला विचारावे. अभ्यास असल्याशिवाय मी काहीही लिखाण करीत नाही. सडेतोड लिहायला कोणाचीही भीती नाही. शेवटी मी बरोबर ठरलो असे वाटते. जानेवारी २००६ रोजी आ.स.त माझे पहिले पत्रचर्चा लेखन प्रसिद्ध झाले. त्यावेळी आ.सु.च्या वाचक-लेखकांना कामजीवनाविषयी कितपत माहिती असेल याबद्दल मी साशंक आहे असे म्हणालो होतो. ती शंका खरी ठरली. कामजीवन अभ्यासशून्य असलेले हे दोन विद्यार्थी सापडले.
ऑक्टो.’०७ चा माझा लेख आवडला असे सांगणाऱ्यांपैकी सुधीर देव (नागपूर), वाघेश साळुखे (सांगली), उज्ज्वला नाईक, मिस्टर सरनाईक (कोल्हापूर), मिस्टर कांबळे हे सर्वच्या सर्व आ.सु.चे नियमित वाचक आहेत.
पुन्हा थोडेसे प्रभाकर नानावटी यांना एखाद्या विषयाचे अध्ययन नसेल तर कोणतीही भाषा वापरून त्या विषयातील तज्ज्ञाला ‘विकृत’ ठरवू नये. आपण तेवढे बुद्धिगान जाणते नसता. तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे असाल म्हणून मी ‘क्षुल्लक’ ठरत नाही. तुम्ही तुमच्या विषयात तज्ज्ञ असाल तसे मी ‘कामजीवन’ विषयात तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे आणि राहणार हे कदापीही विसरू नका.
टीका करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला असते. ती टीका सौम्य व परखड दोन्ही शैलीत करता येते. तशा दोन्ही शैली मला आवडतात. टीका करताना तुमचा अभ्यास कुठेतरी दिसला पाहिजे. तो कुठेच दिसत नाही. मग फुटलेला ढोल कशाला बडवता?
माझ्या पेशंटस्कडून मला असा अनुभव आहे की पुरुष जर विधुर, लग्न न जमलेला तसेच स्त्री लग्न न जमलेली, स्वतंत्र, एकटी किंवा पतीला लैंगिक समस्या असलेली असेल तर ते सेक्स या विषयावर निव्वळ आरडा ओरड करतात. ते घाण, विकृत आहे असे म्हणतात. बाकीचे त्याला/तिला काही माहीत नसते.
आ.सु.मध्ये या विषयावर लेखन नको म्हणणाऱ्यांना आ.सु.च्या वाचकांमध्ये नैसर्गिक लैंगिक भावनाच नाही असे म्हणायचे आहे का ? ज्ञान हे सर्वांसाठी खुले आहे. ते कधी अतिस्पष्ट वाटले तर कुठे बिघडले?
मी तरुण भारत मध्ये सेक्सॉलॉजीमधील ४० पेक्षा जास्त विषय हाताळले आहेत. तुम्हाला माहीत आहे का ? हा लेख यापूर्वीच अन्यत्र छापला गेला आहे. तेथे कुठेही निषेध आला नाही. लेख सामान्यांपर्यंत पोहचण्याऱ्या दैनिकात छापला जातो, मात्र विवेकवादी म्हणवणाऱ्या आ.सु.मधील सुज्ञांना माझा लेख का टोचतो? कामशास्त्र हा विषय फार मोठा आहे. प्रत्येक डॉक्टराला त्यातले सर्वच भाग माहीत असतील, आवडतील असे नाही. त्या त्या भागात तो त्याच्या आवडीनुसार पारंगत होतो.
स्त्री/पुरुषांमधील, स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष यांमधील शारीरिक संबंधांविषयी अभ्यास करणे हे कामशास्त्रातील छोटे विभाग आहेत. त्याशिवाय त्यांच्या समस्या, तपासण्या, उपचारपद्धती, नवीन शोध, औषधोपचार, शस्त्रक्रिया, कायदेशीर भाग, संभोगातील विविधता या सर्वांचा समावेश सेक्सॉलॉजीमध्ये येतो.
मी स्वयंप्रसिद्धी मिळवत आहे असे कोणत्या आधारे हे बोलतात ? मी सहा वर्षांत ३०६७ रुग्ण पाहिले आहेत. म्हणजे दिवसाला किती होतात ते पाहा नंतर तुमचे मत द्या. स्त्री/पुरुष कामजीवनावर वेगवेगळे लेख आता आ.सु.मध्ये मला सुरू करायची इच्छा आहे. अर्थात संपादकांची परवानगी असेल तरच. टीका करताना कधी पटकन कोणाला ‘मनोविकृत’ म्हणू नका. मानहानीचा दावा घातला तर कायदेशीर बाब कधीतरी चांगलीच ‘अंगलट’ येईल. अभ्यास नसताना टीका केली म्हणजे टीका करणाऱ्याचे ‘हसू’ होते. सेक्सॉलॉजिस्ट सर्वच (उदा. आसने) समजावून सांगतो याचा अर्थ पेशंटने सगळेच करावे असे नाही. विविधता समजावून सांगितली तर ज्याला जे पटेल तेच तो करतो हे लक्षात घ्यावे.
एखाद्याला मुखमैथुन आवडते व तो लग्नानंतर पत्नीबरोबर ते करू इच्छितो. परंतु मुलीला लग्नापूर्वी मुखमैथुनाविषयी पूर्वग्रहदूषित, चुकीची माहिती मिळाली असेल तर ती आपल्या नवऱ्याला विकृत समजणार! यातून घटस्फोट, भांडणे, विवाहबाह्य संबंध अशा केसेस माझ्याकडे आल्या आहेत. त्यासाठी लेखात उल्लेख स्पष्ट केला आहे.
स्पष्ट बोलल्यामुळेच ग्रामीण स्त्री/पुरुषांच्या कामजीवनावर माझ्याकडे जास्त माहिती संगृहीत होऊ शकली. यातूनच नात्यांतील शारीरिक संभोग, स्त्रीला न मिळणारी कामपूर्ती, पत्नीवर रोज बलात्कार करणारा पती, स्त्री-पुरुषाचे विवाहपूर्व/विवाहबाह्य लैंगिक संबंध याविषयी माहिती मिळाली. यालाच मी ज्ञानविस्तार म्हणतो.
शेवटी, आ.सु.च्या संपादकांना विनंती की वैद्यकीय क्षेत्रावर टीका करणारे टीकाकार हे वैद्यकीय जाणकार-अभ्यासक नसतील तर त्यांची टीका प्रसिद्धीस घेऊ नये. माझ्या लेखावर आक्षेप घेणारे दोघेही तज्ज्ञ किंवा डॉक्टर नाहीत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.