लहानपणी, कॉलेजमध्ये असताना, मला विज्ञानामध्ये गोडी वाटू लागली तेव्हा तत्त्वज्ञानाचे काही ग्रंथ वाचनात आले. त्यात पाश्चात्त्यांपैकी बटैंड रसेल असावा, तसेच संस्कृतातील काही ऊहापोहात्मक पुस्तके असावीत. त्या लहान वयात उमेद फार असते आणि अवाजवी आत्मविश्वास असतो. मी विज्ञानविषयक माझी पूर्वपीठिका एका ‘श्लोकरूपात” मांडायचे ठरवले. वर्णनं नियमात् पूर्वम्, अनायासा हि भावना । समविचारी च तत् तुल्यश्च पूर्वग्रहाः मम दृढाः ।।
काव्यरचना खचितच बालिश आहे. पण तिच्यातला बराचसा विचार अनेक वर्षे संशोधक म्हणून वावरल्यानंतरही थोडाच बदलला म्हणून मला ती रचना अजून आठवते. तिचा भावार्थ : १. नियम सांगण्यापूर्वी वर्णन सांगणे आवश्यक आहे. २. अस्तित्व हे विनासायास असते (‘अस्तित्व’ साठी ‘भावना’ शब्दाचा जुनाट अर्थ वापरला हे जरा हास्यास्पद वाटेल.) ३. आणखी कोणीतरी व्यक्ती विचार करण्यास समर्थ आहे, आणि समजण्याची त्याची क्षमता (माझ्या) तुल्य आहे हे माझे पूर्वग्रह दृढ आहेत. हे मी कुठलेही प्रमाण नसता मानतो.
खरे म्हणजे ‘कुठलेच प्रमाण नाही’ हे म्हणणे पूर्णपणे खरे नाही. मनुष्य म्हणून माझे आयुष्य तसे अल्पकालीन आहे, आणि त्या थोडक्या वेळात काही उपयोगी ज्ञान मला मिळवायचे आहे, त्यामुळे ‘सोय’ काय, हा कामचलाऊ (पॅग्मॅटिक) विचार लागू आहे. बघूया तुम्हाला माझे म्हणणे पटते का? १. वर्णन हे नियमाच्या आधी असते म्हणजे काय ? काही गोष्टी मला फार विचार न करता जाणवतात (‘जाण’ होते = ज्ञान होते). वेदना झाली की मी कळवळतो, शक्य झाल्यास वेदना देणाऱ्या वस्तूपासून दूर जातो, तेही विचार न करता. म्हणजे त्या बाबतीत मला ‘नियम’ करत बसण्यात वेळ खर्ची घालावा लागत नाही. माझ्या थोडक्या आयुष्यात जर ‘अम्क’ करून प्रत्यक्ष वेदना झाली तर ती ‘अमुक केल्याने वेदना होणे असंभव आहे’ या बाबावाक्यापेक्षा जास्त महत्त्वाची. म्हणजे ‘वेदना होते/होत नाही’ हे वर्णन ‘वेदना होऊच शकत नाही/होतेच’ ह्या नियमाच्या आधी यावे लागते. हीच गोष्ट सर्व संवेदनांबाबत. म्हणजे ‘या क्षणी उजेड पडला आहे/नाही’ हे वर्णन आधी यावे, मग ‘या क्षणी उजेड पडूच शकत नाही/पडतो’च हा नियम नंतर यावा.
प्रस्तुत विचार आधी कधी झाला आहे काय ? अर्थातच, खूपच ठिकाणी, आणि याहीपेक्षा चांगल्या रीतीने. पैकी एक सांगतो. गौतमाच्या न्यायसूत्रात पहिले आहे : प्रत्यक्ष-अनुमान-उपमान-शब्दाः प्रमाणानि । न्या.सू.१.१ ही चार प्रमाणे सर्वांत जास्त बलवत्तर ते कमी कमी बलवान या उतरत्या श्रेणीत लावली आहेत. (अ) प्रत्यक्ष: म्हणजे ज्ञानेन्द्रियाने प्रत्यक्ष ज्ञान असे होणे की स्थिती ‘अमुक’ आहे (ज्याला मी लहानपणच्या श्लोकात ‘वर्णन’ म्हटले) उदाहरणार्थ “मला डोंगरावर आगीच्या ज्वाळा दिसत आहेत.’
(आ) अनुमानः ‘अशा सर्वच परिस्थितीत ‘अमुक’ असते” या सामान्य नियमावरून “याही विशेष परिस्थितीत ‘अमुक’ आहे.” असा विशेष निष्कर्ष काढणे. उदाहरणार्थ : जेथे जेथे धूर असतो तेथे तेथे आग असते. मला डोंगरावर धूर दिसत आहे. म्हणजे डोंगरावर आग आहे. (ज्याला मी माझ्या श्लोकात ‘नियम’ म्हटले.)
(इ) उपमानः “वेगळ्या ठिकाणी ‘अमुक’ ‘अमुक’ संबंध बघितलेले आहेत” त्यांच्याशी “येथे काही साम्य दिसते, म्हणून येथेही ‘अमुक’ स्थिती असावी.’ उदाहरणार्थ : काल शेजारच्या गावाजवळ वणवा पेटला, परवा पलीकडच्या गावाजवळ वणवा पेटला. तेथे पूर्ण जिल्ह्यांत दुष्काळ पडला आहे. आज त्या जिल्ह्यात कुठेतरी वणवा पेटला आहे. तेव्हा दुष्काळ पडेल. (हाही एक प्रकारचा ‘नियम’ आहे, याचा मी माझ्या श्लोकात विचारच केला नव्हता.)
(ई) शब्दः विश्वासू व्यक्तीने सांगितलेला शब्द. उदाहरणार्थ आपल्या वडिलांनी सांगितले की आज डोंगरावर वणवा पेटला आहे, म्हणून मी मानतो की डोंगरावर वणवा पेटलेला आहे. (याचा मी पुढे वेगळ्याच त-हेने विचार करतो.)
संशोधन करायला लागल्यापासून मला ‘उपमाना’चे महत्त्व कळले आणि मी ‘वर्णनं नियमात् पूर्वम्’ला थोडे बदलले आहे. कारण शुद्ध वर्णन करणे शक्य नसते. ज्ञानेंद्रियांना रोज हजारोंनी संवेदना होत असतात. त्यांपैकी कुठल्या लक्षात राहाव्यात? शिवाय कोट्यवधी संवेदना शक्य असतात, पण कर्मेंद्रियांच्या मर्यादेमुळे केवळ हजारोंनी संवेदनाच ज्ञानेंद्रियांपर्यंत पोचतात. जर ह्या क्षणी माझी मान उत्तरेकडे वळलेली असेल, तर दक्षिणेकडून येणाऱ्या प्रकाशाची संवेदना माझ्या डोळ्यांकडे कशी पोचेल ? म्हणजे कर्मेंद्रियांना काय चालना द्यायची, आणि ज्ञानेंद्रियांना मिळणाऱ्या हजारो संवेदनांपैकी कुठल्या लक्षात ठेवायच्या ह्यासाठी आधी एक ढोबळ नियम लागतो. म्हणजे वर्णन आणि नियमाच्या उत्तरोत्तर पायऱ्या असतात.
खूप ढोबळ वर्णन खूप ढोबळ नियम कमी ढोबळ वर्णन कमी ढोबळ नियम सूक्ष्म वर्णन आणखी नीट केलेले नियम असे उजवा-डावा पाय एक-एक करून पुढे टाकून जायचे. २. अस्तित्व हे विनासायास असते, म्हणजे काय ? कधीकधी “अशी एक वस्तू अमुक का आहे?” आणि “तीच वस्तू अमुक का नाही?” ह्यांपैकी कुठला प्रश्न प्रस्तुत (विचारण्यालायक) आहे त्याचा सहज निर्णय होऊ शकतो. उदाहरणार्थ : शाळेतून बाळ येतो, तर “बाळा, आज तुझ्या डोक्यावर टेंगूळ का आहे?’ हा प्रश्न “बाळा, आज तुझ्या डोक्यावर टेंगूळ का नाही?’ ह्यापेक्षा विचारण्यालायक असतो, कारण आपल्या अनुभवात बहुतेक दिवशी बाळाच्या डोक्यावर टेंगूळ नसते. तसेच “बाळा, आज तुझ्या खांद्यावर दफ्तर का नाही?’ हा प्रश्न “बाळा, आज तुझ्या खांद्यावर दफ्तर का आहे?” पेक्षा अधिक विचारण्यालायक असतो, कारण बहुतेक दिवशी आपल्या अनुभवात घरी येताना बाळाच्या खांद्यावर दफ्तर असते.
कधीकधी “अमुक का आहे?’ “अमुक का नाही?’ ह्यांपैकी कुठला प्रश्न सरस (विचारण्यालायक) आहे त्याचा सहज निर्णय होऊ शकत नाही. म्हणजे “गणपती पुळ्याच्या पश्चिमेला समुद्र का आहे?” आणि पश्चिमेला समुद्र का नाही?” यात कुठलाही प्रश्न जास्त सरस नाही. गावाचे नाव कुठले तरी “पुळे” असले की सामान्यपणे पश्चिमेला समुद्र असतो/नसतो याबाबत आपला काहीच अनुभव नाही. पैकी कुठल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे याच्यात फार वेळ खर्च होईल, आणि सगळ्या प्रश्नांबाबत असेच केले तर माझे आयुष्य काहीच न शिकता संपून जाईल. अशा स्थितीत माझ्या मते कामचलाऊ प्रश्नच बदलावा “पुळ्याच्या पश्चिमेला समुद्र आहे काय ?” उत्तर : “होय.” ह्या प्रकारात, जे आहे ते आहे, ते विनासायास आहे, त्याला ‘का आहे’ असा प्रश्न विचारण्यात वेळ खर्ची का घालावा ? मच्छीमारी करायला आपली होडी सरळ पश्चिमेच्या समुद्राकडे नेऊन कामाला लागावे. “पश्चिमेलाच का?’ असा प्रश्न विचारत बसलो तर आज एकही मासा जाळ्यात सापडणार नाही.
माझे हे तत्त्व जरा विचार केले तर नास्तिकवादी वाटण्याची शक्यता आहे. पण आणखी खोल विचार केला तर तसे वाटू नये. मला माझे काही मित्र विचारतात की “हे चराचर जगत् का अस्तित्वात आहे?’ (त्यांचे अपेक्षित उत्तर आहे की चराचर सृष्टीचा निर्माता ईश्वर/प्रभू/ब्रह्म/आदिमाया/आकाशातला बाप आहे.) माझा याबाबतीत विचार हा की कुठला प्रश्न विचारण्याजोगा आहे: ‘हे चराचर जगत् का अस्तित्वात आहे?” की “हे चराचर जगत् का अस्तित्वात नाही?”
जर जग अस्तित्वात नसण्याचा आपला सामान्य अनुभव असेल (बाळूला साधारणपणे टेंगूळ नसते तसे) आणि आता अवचीत ते अस्तित्वात जाणवले, तर पहिला प्रश्न विचारण्यास अधिक चालना मिळते.
जर जग अस्तित्वात असल्याचा आपला सामान्य अनुभव असेल (बाळूकडे साधारणपणे दफ्तर असते तसे), आणि आज जग अस्तित्वात नसल्याचे जाणवले तर दुसरा प्रश्न विचारण्यास अधिक चालना मिळते.
पण कुठलाच प्रश्न अधिक विचारण्याजोगा आहे असे मला दिसत नाही. मग त्यावर माझे अल्प आयुष्य खर्च का करा ? मग मी विचारतो “जग अस्तित्वात आहे काय?” “होय.” मग आहे तर विनासायास आहे, आणि जगात जे काय करायचे असते (मच्छीमारी, श्वासोच्छ्वास, परोपकार वगैरे) लगेच करायला घेऊ या.
जे लोक जगाच्या अस्तित्वाचे कारण या एकाच युक्तिवादावर देवाचे अस्तित्व मानतात, त्यांना माझा विचार नास्तिकवाद वाटण्याची शक्यता आहे. पण तो तसा नही. देवाच्या/आदिमायेच्या/आकाशातल्या बापाच्या अस्तित्वा/नास्तित्वाबद्दल येथे माझे कुठलेच मत मी प्रकट केलेले नाही. केवळ म्हणतो आहे, की हा युक्तिवाद माझ्या तोकड्या आयुष्यात मला पटण्यासारखा नाही. “तोकडे आयुष्य” असे का म्हटले? कारण जर माझे आयुष्य अनेक युगांचे असते, आणि अनेक प्रलय मी बघितले असते, तर कदाचित “सामान्य अनुभवाप्रमाणे जग अस्तित्वात नसते, आणि या क्षणी अवचीत ते अस्तित्वात आहे,” असे मला जाणवले असते. मग जसे “बाळाला आज टेंगूळ का?” असे मी विचारतो, तसे “या क्षणी जग अस्तित्वात का?” असे विचारले असते. तुम्ही पहिल्या पायरीवर थांबून मला नास्तिक म्हणा, किंवा दुसऱ्या पायरीवर जाऊन “हा विशिष्ट युक्तिवाद अल्पायुष्याच्या मर्यादेमुळे न पटलेला’ असे म्हणा. तुमची मर्जी. ३. तो दुसराही विचार करण्यास समर्थ आहे, आणि समजण्याची त्याची क्षमता (माझ्याशी) तुल्य आहे. हे देखील केवळ एक कामचलाऊ तत्त्व आहे. कारण हे शक्य आहे की जगात खरा विचार करू शकणारा केवळ मी आहे, आणि बाकी सर्व लोक एक तर स्वप्नातल्या बाहल्या आहेत, किंवा हाडामांसाचे यंत्रमानव आहेत. (इंग्रजीत या विचाराला सोलिप्सिझम म्हणतात). मग लोकांशी विचारपूर्वक बोलण्यात काय अर्थ? तरी लोकांशी विचारपूर्वक बोलायला मला आवडते तेही विचारक्षम आहेत असे म्हणणे मला त्यामुळे सोयीचे वाटते. इतकेच नाही, ते सरासरी माझ्याइतपतच विचारक्षम आहेत असे मानून बऱ्याच कामचलाऊ गोष्टी साध्य होतात. म्हणजे “अशा परिस्थितीत मी रागावलो असतो, म्हणजे त्याच प्रकारे आज साहेब माझ्यावर पेटणार!”, “माझ्यासाठी कोणी ‘अम्क’ केले तर मला खूप आनंद होईल, मग समोरच्या माणसासाठी तसे आपण केले तर तो माणूस खूष होईल…” असे कितीतरी रोजच्या जीवनातले कामचलाऊ निर्णय पटापट घेता येतात. या कामचलाऊ तत्त्वाला मी “विज्ञानाचे गृहीतक” म्हणून का मानतो? कारण विज्ञानात एखादी कल्पना “सत्य” आहे असे मला वाटले, तरी जोपर्यंत आपल्या क्षेत्रातल्या दुसऱ्या कोणाला ती मी पटवून देऊ शकत नाही, तोपर्यंत ती कल्पना चुकली असल्याची दाट शंका माझ्या मनात असते. दुसऱ्याला कल्पना पटवता येणे हे माझ्या लेखी कल्पना जाणण्याइतकेच पायाभूत आहे.
आश्चर्य म्हणजे या निव्वळ कामचलाऊ तत्त्वाची माझ्या ईश्वरविषयक विवेचनातही लुडबूड होते. कारण लोक हे जसे माझ्याइतके तसेच एकमेकांइतकेच कल्पना धारण करायला सक्षम असतात, असे मानणे मला अपरिहार्य वाटते. मग हे जे हशार हशार लोक एकमेकांना आपापल्या धर्माचे तपशील अक्षरशः सत्य आहेत म्हणून समजावून सांगायचा प्रयत्न करतात, आणि ते एकमेकांना पटवून देऊ शकत नाहीत, तर ते तपशील अक्षरशः सत्य नाहीत अशी दाट शंका माझ्या मनात येते. कोणी म्हणेल की बुवा, तुमच्या विज्ञानातल्या क्लिष्ट कल्पना एकमेकांना समजावून सांगायला तुम्हा वैज्ञानिकांना दहा-दहा वर्षे लागतात, तसेच ईश्वरविषयक गहन तपशील एकमेकांना समजावून सांगायला वेगवेगळ्या पंथातल्या लोकांना खूप वेळ लागेल. तर मी म्हणतो की ती दहा-दहा वर्षे गेली तरी बेहत्तर, जोपर्यंत वैज्ञानिक एकमेकांना कल्पना पटवून देऊ शकत नाही तोपर्यंत मी त्या मानत नाही. तसेच ईश्वरविषयक तपशील लोक एकमेकांना पटवून देऊ शकत नाहीत तोवर शेकडो वर्षे मी त्यांच्यापैकी कुठलेच तपशील “सत्य” म्हणून मानणार नाही. माझे आयुष्य अल्प असल्यामुळे या आयुष्यात कुठलेच ईश्वरविषयक तपशील सत्य म्हणून मानून घ्यायचे माझे भाग्य बहधा नाही.
सारांशः व सांगितलेली गृहीतके म्हणजे सिद्धान्त नाहीत. पण त्यांना सिद्ध करायचा गी काहीच प्रयत्न करत नाही. ती जशीच्या तशी वापरतो, म्हणून त्यांना “पूर्वग्रह” म्हटले तर ठीकच आहे. पण ती माझ्या अल्प आयुष्यात कामचलाऊ आहेत. त्यांच्याशिवाय सर्व जे मी “ज्ञान’ मानतो त्याच्याविरुद्ध सामान्य प्रमाणे दिलीत तर मी मत बदलायला तयार आहे. पण ही गृहीतके खोडण्यासाठी मात्र मला फारच मोठी ठोस प्रमाणे लागतील. Dhananjay Vaidya, MBBS, PhD, MPH Assistant Professor of Medicine, Johns Hopkins University School of Medicine, 1830 East Monument Street, Suite 8028-A Baltimore, MD, 21287, USA. Email : dvaidya1@jhml.edu; Phone 1-410-637-3178 धनंजय वैद्य, द्वारा श्री.म.वैद्य, ४, मातृकृपा बिल्डिंग, सुपरमार्केट एरिया, फोंडा, गोवा, ४०३४०१.