सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य यांमध्ये अग्रक्रम कशाला यासंबंधी लोकमान्य आणि आगरकर या मित्रद्वयांमध्ये टोकांचे मतभेद होते हे महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित जनांना माहीत आहे. १६ जून १८९५ ला प्रिन्सिपल गोपाळ गणेश आगरकरांना देवाज्ञा झाली. त्यानंतर २१ वर्षांनी मुंबईला त्यांचा स्मरणदिन म्हणून मोठा समारंभ झाला. त्यावेळी प्रसंगाला अनुसरून लोकमान्यांनी ‘आगरकरांची श्राद्धतिथी’ म्हणून केसरीमध्ये जो लेख लिहिला त्यामध्ये प्रि. आगरकरांविषयी त्यांच्या भावना त्यांच्याच शब्दांत आपल्याला समजू शकतात आणि त्या समजणे आवश्यकही आहे. कारण सुधारकाग्रणी प्रिन्सिपल आगरकर यांचे कार्य पुढे चालविणारी मंडळी आजही आहेत. आजचा सुधारक आणि ते स्थापन करणारी प्रा. दि.य.देशपांडे यांसारखी मंडळी विवेकनिष्ठ मराठी लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. नातूबाई यांचा समाजसुधारणेच्या आग्रहाच्या व तळमळीच्या स्मरणार्थ आजचा सुधारक निघाले. परंतु लोकमान्यांचा राजकीय वारसा चालविणारी मंडळी मात्र कोठे दिसून येत नाहीत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकीय विचारांचे सर्वच संदर्भ बदलले. तरीसुद्धा लोकमान्य चिरंतन आहेत ते त्यांच्या गीतारहस्या मुळे आणि सुधारक आगरकर त्यांच्या सुधारक या नियतकालिकामुळे. म्हणून टिळक आगरकर आजही महाराष्ट्रांत वैचारिकदृष्ट्या जिवंत आहेत असे मी समजतो.
लोकमान्य लिहितात, जगांमध्ये मतवैचित्र्य असणे ही गोष्ट अत्यंत स्वाभाविक आहे. आपल्या आणि आगरकरांच्या मतभेदांचे कारण लोकमान्यांनी समर्पक आणि सुंदररीत्या स्पष्ट केले आहे, की त्यामुळे टिळक विरुद्ध आगरकर ह्यांच्या अनुयायांनी परस्परांवर जे आघात आत्माघात केले त्यांतील सर्व धार बोथट होते. किंबहुना त्यांनी सर्व शस्त्रास्त्रे म्यान करावीत. आजसुद्धा असे होईल. इतके ते कारण रमणीय व काव्यमय आहे. ते लिहितात “की जगामध्ये मतवैचित्र्य असणे ही गोष्ट इतकी स्वाभाविक आहे की, स्वयंवरांत अनेक चांगले राजे आले असता त्यांना सोडून अजालाच इंदुमतीने कां वरावे ह्याचे कारण देतांना कालिदासालासुद्धा ‘भिन्नरविर्हि लोकः ।’ या तत्वावर निर्वाह करून घ्यावा लागला आहे.’ १९८८ पर्यंत केसरीत जे राजकीय विषयांवर लेख आले ते बहुरोक आगरकरांचे आहेत. आणि त्यानंतर सुधारकातही अशाच प्रकारचे बरेच निबंध आले आहेत. या सर्वाचे सूक्ष्म निरीक्षण केले असता असे दिसून येईल की आगरकर हे पक्के स्वराज्यवादी होते. लोकमान्य लिहितात, “परिस्थितीचा गुलाम न बनतां परिस्थितीचा यथासंभव, यथाशक्ति, यावच्छक्य आपल्या ताब्यांत आणण्यांस जो मनोनिग्रह, स्वार्थत्याग, निर्लोभीपणा, व धैर्य लागतें तें ज्याच्या अंगांत आहे… व या सद्गुणांचा जो लोकोपयोगार्थ उपयोग करतो तोच मोठा म्हणावयाचा. गोपाळराव आगरकर या कोटींतले होते.”
लोकमान्यांनी लेखाच्या शेवटी जे शुभचिंतन केले आहे. ते आजच्या सुधारकांसाठीही लागू असल्याने त्यानेच या लेखाचा शेवट करू या. “गोपाळरावांचे स्मरण व त्यांनी केलेल्या कार्यामुळे पुढील पिढीस चालू-पिढीस स्वार्थत्यागाचे, मानसिक धैर्याचे व चारित्र्याचे इष्ट वळण लागो! भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे (लोकमान्यांनी निबंधाच्या शिरोभागी भर्तृहरीचा श्लोक दिला आहे.) ‘स्वार्थ साधणारे सहस्रावधि लोक आहेत (या उलट आगरकरांसारखा) परार्थालाच स्वार्थ मानणारा पुरुषच अग्रणी, नरश्रेष्ठ मानला पाहिजे.’ ”
( संदर्भ : निबंधकार टिळक, प्र. १६, पृ ९७-१०३. संपादक नरसिंह चिंतामण केळकर, व्हीनस प्रकाशन, पुणे, आवृत्ती दुसरी जून १९६९) १०३, धनश्री बिल्डिंग, स्वरनगरी, आनंद नगर, सिंहगड रोड, पुणे ५१.