भारतातील बहुसंख्य लोक आपला धर्म हिंदू असल्याची कागदोपत्री नोंद करतात. हिंदू धर्माच्या काही मूलभूत मान्यता अथवा आधारभूत संकल्पना आहेत त्या म्हणजे ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व, ब्रह्मा-विष्णु-महेश व शक्ति या प्रमुख देवतांना मान्यता देणे, मोक्ष, पुनर्जन्म, दशावतार, वर्णव्यवस्था, वेद, ब्राह्मणे, पुराणे, उपनिषदे, रामायण-महाभारत (गीतेसह) हे धर्मग्रंथ, इत्यादी. ह्यांपैकी वेद फार पूर्वीपासून, आर्यांचे उत्तर भारतात आगमन झाल्यापासून, मौखिक परंपरेने अस्तित्वात आहेत. वेदांमधील आराध्यदेवता निसर्गातील विविध शक्ती होत्या. त्यात ब्रह्मा, विष्णु, महेश यांना स्थान नव्हते असे म्हटले तरी चालेल. या तीन ‘देवता’ व शक्ती ह्यांचे उल्लेख इसवी सनापूर्वी पाचव्या सहाव्या शतकानंतरच्या पुराणांमध्ये आढळतात. बहुतेक पुराणे लिहिली गेली त्याच सुमारास भारतात मूर्तिपूजेस व देवतांच्या भजनपूजनास प्रारंभ झाला. लोकांना देवतांविषयी श्रद्धा वाटावी म्हणून विविध लोकांनी (त्या सर्वांनाच व्यासमुनी संबोधले गेले) विशिष्ट देवतांच्या संबंधी चमत्कारिक व मनोरंजक कथा गुंफल्या. या पुराणांचा उद्देश सामान्यजनांना देवता आणि त्यांच्या लीला यांद्वारे धर्म व आध्यात्म यांचेकडे आकृष्ट करणे हाच होता.
पुराणांतील कथा बवंशी कपोलकल्पित असल्या तरी त्यांत दशावतार या हिंदू धर्माच्या एका प्रमुख संकल्पनेचे विवेचन आहे. विष्णू या प्रमुख देवतेने वेळोवेळी, पृथ्वीवरील जीवांचे रक्षण करणे, दुष्टांचे निर्दालन करणे व जीवांचे जीवन सुखशांतिमय करणे ह्यांसाठी पृथ्वीवर विविध जीवांच्या स्वरूपांत जन्म घेऊन आपले कार्य पार पाडले हेच पुराणे प्रामुख्याने सांगतात. याप्रमाणे विष्णु या देवतेने तीन अवतार मानवाहून निम्न श्रेणीच्या जीवांचे व सात अवतार मानवरूपात घेतले असे दशावतारांचे सूत्र आहे. या दशावतारांचे विस्तृत विवेचन पुराणांत आहे.
दशावतारांची संकल्पना ही पृथ्वीवरील जीवांच्या उत्क्रांतीतील महत्त्वाच्या अवस्थांचे प्रतीकात्मक रूपक आहे हे स्पष्टच आहे. हा काही नवीन विचार नाही व त्याविषयी अनेक विद्वानांनी लिहून ठेवले असून हा वादाचाही विषय नाही. आपल्या पूर्वजांना तल्लख बुद्धी, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, चिंतन आणि चर्चा किंवा वादविवाद करून निर्णय घेणे हे गुण उपजतच होते (अलीकडे डॉ. अमर्त्य सेन यांनी दि आर्गुमेंटेटिव्ह इंडियन हा फार मार्मिक ग्रंथ लिहिला आहे.) त्यामुळे या गुणांचा उत्तम वापर करून आमच्या पूर्वजांनी, पृथ्वीवरील जीवांचा विकास हळूहळू टप्प्याटप्प्याने होत गेला हे तत्त्व, निश्चित केले होते. १९ व्या शतकात चार्लस् डार्विन या ब्रिटिश वैज्ञानिकाने मांडलेल्या उत्क्रांतिवादापूर्वी किमान २००० वर्षे आधीच, कोणतीही वैज्ञानिक साधने उपलब्ध नसूनही हे मौलिक ज्ञान आमच्या पूर्वजांनी प्राप्त केले होते ही एक अलौकिक व भारतीयांना अभिमानाची गोष्ट आहे. जगातील इतर कोणत्याही धर्मात मानवाचा उदय अथवा विकास उत्क्रांतीमुळे झाला याची पुसटशीसुद्धा कल्पना नाही. पृथ्वीतलावरील सर्व प्राणी, पक्षी व मानव ईश्वराने एका झटक्यात निर्माण केले असे यहुदी (ज्यू), ख्रिस्ती व इस्लाम हे धर्म मानतात. ख्रिस्ती समाजात तर आजही या विषयावर कटु वाद होत असतात.
आमच्या पूर्वजांनी दहा अवतारांची संकल्पना मांडली ती ढोबळ मानाने बरोबर आहे, पण त्यात काही त्रुटी आहेत असे आम्हाला वाटते. या अवतारांच्या भोवती ज्या मनोरंजक कथा गुंफण्यात आल्या आहेत त्या खऱ्या मानण्याचे काही कारण नाही. शिवाय ही पुराणे कोणत्याही अधिकृत संस्थेने प्रमाणित केलेली नाहीत त्यामुळे पुराणांच्या रचयित्यांनी स्वाधिकाराने पुराणे लिहिली, त्याचप्रमाणे, प्रस्तुत लेखकास त्यात सुधारणा सुचविण्याचा तेवढाच अधिकार का नसावा ? आमच्या मते दशावतारांची नावे व त्यांचा क्रम हा ठोस वैज्ञानिक कारणांवर अवलंबून आहे आणि या वैज्ञानिक दृष्टिकोणातून दशावतार कोणते व कोणत्या क्रमाने स्वीकारणे अधिक तर्कसंगत आहे हे विशद करणे हेच या लेखाचे प्रयोजन आहे. आमच्या मते दहा अवतारांची कोणती नावे व क्रम योग्य आहे हे पुढे देत आहे.
१) मत्स्यावतारः पृथ्वीवर प्रथम जीवाची उत्पत्ती उथळ, क्षारयुक्त पाण्याच्या भरपूर सूर्यप्रकाशात असणाऱ्या साठ्यात सुमारे ३५० कोटी वर्षांपूर्वी सायनोबॅक्टेरिया या प्राणवायूचे निस्सारण करणाऱ्या एकपेशीय जंतूच्या रूपाने झाली. त्यानंतर २०० कोटी वर्षांनंतर एकपेशीय वनस्पतीची निर्मिती झाली. एकपेशीय जंतूचे गट तयार होऊन समुद्रातच (उथळ खाड्यांमध्ये) बहुपेशीय जीव विकसित झाले. अशा लहान जीवांच्या हजारो प्रजाती समुद्रात प्रचंड संख्येत वावरू लागल्या व अजूनही समुद्रात आढळतात. या प्रजातीच्या जीवांची शरीरे मऊ मांसल असून त्यांच्या शरीरास विशिष्ट दिशा नसतात. यांत शंखांत, शिंपल्यामध्ये राहणारे जीव, जेलीफिश, यांचा समावेश होता. या जीवांना पाठीचा कणा नव्हता म्हणजेच ते इनव्हर्टेब्रेट होते. हळूहळू काही जलचर जीवांच्या शरीरात सुमारे १०० कोटी वर्षांपूर्वी पाठीच्या कण्याचा विकास होऊन हे जीव व्हर्टेब्रेट झाले व त्यांच्या शरीराला दिशा प्राप्त झाली (ओरिएण्टेशन इन स्पेस), म्हणजेच त्यांच्या शरीराचे पुढचे टोक, मागचे टोक, डावी बाजू, उजवी बाजू, पाठ, पोट या दिशा निश्चित झाल्या. उत्क्रांतीमधील ही एक फार महत्त्वाची उडी (पायरी) होती व ती आमच्या पूर्वजांनी ओळखून हा नवा जीव अर्थात मासा विष्णूचा अवतार म्हणून ठरविला. पुष्कळ प्रजातींचे मासे मोठ्या आकाराचे व बलशाली होते व ते शंख (शंखासुर ?) शिंपले यांच्यासारख्या कठिण कवचधारी जीवांचे भक्षण करीत असत.
२)कूर्मावतारः मत्स्य हा सर्वस्वी जलचर जीव आहे व तो कोरड्या भूमीवर जिवंत राहू शकत नाही. उत्क्रांतीच्या रेट्यामुळे पाण्यात राहणारे काही व्हर्टेब्रेटस् पाण्याबाहेर येऊन काही काळ घालवू लागले कारण त्यांच्या श्वसनाच्या अवयवात इष्ट बदल घडून आले. अशा जीवांमध्ये मंडूक म्हणजेच बेडूक हा एक जीव होता. तो व त्याच्याचसारखे अन्य जीव भूमीवर बराच काळ राहू शकतात, झाडांवर उड्या मारून चढू शकतात. या प्राण्यांच्या वर्गाला जलस्थलचर (अॅम्फीबिया) म्हणतात. परंतु यांचे प्रजनन पाण्यातच व्हावे लागते. त्यामुळे हे प्राणी एक प्रकारे मत्स्याचीच सुधारित आवृत्ती म्हटली पाहिजे. परंतु याचवेळी जलात राहणाऱ्या आणि तितक्याच उत्तमपणे भूमीवर विहार करणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग अस्तित्वात आला. या वर्गात कासव (कूर्म) सर्प, मगरी, सुसरी, डायनॉसॉरस वगैरे जीवांचा समावेश होतो. या जीवांचे प्रजनन पाण्यात होत नाही तर त्यांना नर-मादी मिलनासाठी भूमीचा आधार घ्यावा लागतो व या वर्गातील जीव आपली अंडी भूमीवरच उबवण्यासाठी ठेवतात. जलमाध्यम सोडून जलस्थल दोन्हीवर वावर करणे ही एक महत्त्वाची पायरी उत्क्रांतीने गाठली. या कारणाने या वर्गाच्या प्रतिनिधिस्वरूप कासवाला अवताराचा दर्जा मिळाला व त्याभोवती समुद्रमंथनाची सुरस कथा रचण्यात आली.
३) गरुडावतारः सर्व पुराणांत तिसऱ्या अवतारांचे स्थान वराहाला देण्यात आले आहे परंतु ते अयोग्य आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सस्तन प्राण्यांपर्यंत पोचण्यापूर्वी पाठीचा कणा असणाऱ्या जीवांना एक फार महत्त्वाची पायरी गाठावी लागली. ती पायरी म्हणजे हवेत संचार करणे ही होती. सुमारे १५ ते २० कोटी वर्षांपूर्वी लहान आकाराच्या डायनासॉरसला पंख फुटून तो हवेत उडू लागला व पक्षिवर्गाचा उदय झाला.
उत्क्रांतीच्या इतिहासातील ही फार मोठी झेप होती. म्हणून विष्णूच्या तिसऱ्या अवताराचे स्थान पक्षिवर्गाचा प्रबल प्रतिनिधी गरुड यास देणे आवश्यक आहे. गरुड व त्याचे भाईबंद घार, गिधाडे वगैरे पक्षी भूप्रदेश स्वच्छ आणि विषारी सरपटणाऱ्या प्राण्यापासून निर्विघ्न ठेवण्याचे फार मोलाचे काम करतात. पुराणांतही गरुडाची महती वर्णिली आहे. एक पुराणच गरुडपुराण म्हणून लिहिले गेले परंतु गरुडाला अवताराचा दर्जा मिळाला नाही. ही चूक सुधारून विष्णूचा तिसरा अवतार म्हणून गरुडाची स्थापना झाली पाहिजे.
४) वराहावतारः उत्क्रांतीमुळे प्राण्यांच्या विकासामधील पुढील पायरी म्हणजे अर्थातच सस्तन प्राण्यांचा उदय ही आहे. पृथ्वीतलावर पक्ष्यांच्या सोबतच म्हणजे सुमारे २०-२१ कोटी वर्षांपूर्वी सस्तन प्राणी अस्तित्वात आले. प्रारंभी उंदीर, ससे यांसारखे लहान आकाराचे प्राणी अवतरले व नंतर प्रचंड कालाच्या ओघात गोवंश, हरिणवंश, गर्दभवंश ह्यांसारखे शुद्ध शाकाहारी प्राणी व नंतर पूर्णतः मांसाहारी हिंस्र प्राणी लांडगे, वाघ, सिंह वगैरे उत्पन्न झाले व या जवळपास १२-१५ कोटी वर्षांच्या मध्यंतरात केव्हा तरी वानरवंशाचे प्राणी उदयाला आले. सस्तन प्राणी अंडी घालण्याच्या ऐवजी शिशूलाच जन्म देतात व गर्भाची वाढ मातेच्या उदरातच होते. ही उत्क्रांतीतील मोठीच भरारी होती. त्यामुळे एखाद्या सस्तन प्राण्याला विष्णूच्या अवताराचा दर्जा मिळणे क्रमप्राप्तच होते. परंतु आमच्या पूर्वजांनी गोवंशातील गाय अथवा नंदी किंवा सिंह यांना अवतार मानले नाही तर डुकराला ते स्थान दिले. यातून त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती दिसते. सस्तन प्राण्यांपैकी प्रत्येक प्रजाती एक तर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी आहे परंतु वराह (डुक्कर) ही एकच प्रजाती सर्वभक्षक (ऑम्निव्होरस) आहे. अर्थात तो वनस्पतिजन्य तसेच प्राणिज अन्न सेवन करतो म्हणून वराहाला अवताराचा दर्जा प्राप्त झाला. वराहाचे एक आणखी वैशिष्ट्य असे की हाच सर्वांत प्राचीन जीव आहे जो जमिनीखालील कंदमुळे उकरून काढून खाऊ शकतो. या तंत्राचा वापर पुढे मानववंश करणार होता.
५) नृसिंहावतारः या अवतारापूर्वीचे अवतार मानववंशपूर्व होते. नृसिंह-अवतारापासून पुढील अवतार मानववंशाशी संबंधित आहेत. उत्क्रांतीच्या प्रवाहात सस्तन प्राण्यांच्या विकासाचा कालखंड खूप मोठा होता. १४-१५ कोटी वर्षांत सस्तन प्राण्यांच्या असंख्य प्रजाती उत्पन्न झाल्या. अशा सस्तन प्राण्यांमध्ये वानरवंशाचा उदय झाल्यावर कालांतराने या वानरांमध्ये बदल घडत गेले, त्याची शेपटी नाहीशी जाली, केवळ पाठीमागच्या दोन पायांवर चालू शकणारे आकाराने मोठे व डोक्याचा व मेंदूवा आकार वाढलेले एप् जातीचे वानर उत्पन्न झाले. जमिनीवर चालणे, झाडांवर लटकणे, हातांनी फळे सोलून खाणे, वारुळातील वाळवी बाहेर काढण्यासाठी गवताच्या पात्याचा उपयोग करणे ह्यांसारखी बुद्धीने करावयाची कामे हे पुच्छहीन वानर करू लागले. सुमारे ६ कोटी वर्षांपूर्वी हे प्राणी आफ्रिका खंडाच्या घनदाट उष्णकटिबंधीय वनांमध्ये उदयाला आले. या होमॅनॉईड प्रजातीमध्ये बुद्धीचा विकास होतच होता व वनस्पतींपेक्षा मांस अधिक पौष्टिक असते असे त्याच्या ध्यानात आल्यावर होमेनॉईडच्या नव्या प्रजाती मांसाहारी बनल्या व वृक्षांवर राहण्याऐवजी डोंगर टेकड्यांच्या कपारीमध्ये, गुहांमध्ये वास्तव्य करू लागल्या. ७ फूट उंची, लांब हात, सपाट पावले, अणकुचीदार नखे व सुळे दांत असणाऱ्या या प्राण्यांना शिकारीसाठी फार कष्टही पडत नसावे कारण त्या वनांमध्ये इतके शाकाहारी प्राणी संचार करीत की या मांसाहारी होमेनाईडच्या गुहेच्या दारात त्याचे भक्ष्य चालून येत असले पाहिजे. हे हिंस्र होमेनॉईड आपल्या हातांनी व दातांनी आपली शिकार फाडून कच्चीच खात होते. त्यांना मांस भाजून खाण्याची युक्ती समजलेली नव्हती. हे आफ्रिकेत अनेक ठिकाणच्या गुहांमध्ये सापडलेल्या विविध प्राण्यांच्या अस्थींवरून सिद्ध झालेले आहे. कोणत्याही गुहेत अग्नी प्रज्वलित केल्याच्या खुणा मात्र सापडल्या नाहीत. मानवी विकासाच्या आणि वानरवंशाच्या मधली ही मांसाहारी अवस्था आमच्या पूर्वजांना दखलपात्र वाटली म्हणून हा हिंस्र अवस्थेला नृसिंह हा विष्णूचा अवतार मानण्यात आले. या अर्धमानव+अर्धहिंस्रपशु या अवस्थेला अनुसरून पुराणकथा रचल्या गेल्या असणार.
६) वामनावतारः मानववंशाची उत्क्रांती सातत्याने चालूच राहिली. लक्षावधी वर्षांच्या अवकाशानंतर मानवी मेंदू भरपूर मोठा झाला होता. परंतु त्याच्या शरीराचा आकार लहान झाला होता. या अवस्थेस होमो इरेक्टस असे नाव असून या अवस्थेत मानव ताठ, उभ्याने चालू लागला होता व त्यांची संख्याही वाढती होती. मांसाहाराशिवाय फळे, कंदमुळे खावयास तो शिकला व त्याचे जीवन शिकारी व अन्न गोळा करण्यात व्यतीत होऊ लागले. अन्न गोळा करण्यासाठी त्याला रानोमाळ भटकावे लागत असे. त्याची बुद्धी वाढल्यामुळे आपल्या क्षितिजापलिकडे काय आहे अशी उत्सुकता त्याला वाटू लागल्याने तो आपल्या मूळ परिसरातून बाहेर पडून सतत चालत राहिला व संपूर्ण आफ्रिका खंड व त्याच्याशी संलग्न असे युरोप व आशिया हे खंड त्याने पादाक्रांत केले. दृष्टिक्षेपात जेवढी पृथ्वी होती तेवढी त्याने व्यापली. मानवी विकासाच्या मार्गावर ही मोठीच भरारी होती म्हणून या होमो इरेक्टसला आम्ही भारतीयांनी वामनावतार म्हणून स्वीकारले. कारण शेवटी या मानवाला पाऊल ठेवण्यासाठी पृथ्वी उरली नव्हती!
७) परशुरामावतारः मानव मोठ्या भूप्रदेशावर पसरला तरी त्यांची उत्क्रांती चालूच होती, बुद्धी वाढतच होती. भारतात मानव आफ्रिकेतून सरळ सागर-किनाऱ्याला समांतर मार्गाने भारताच्या प्रामुख्याने दक्षिणेकडील घनदाट वनामध्ये येऊन पोचला व तेथेच कायम वास्तव्यास राहिला. मानवाची दुसरी शाखा युरोपमध्ये जाऊन लक्षावधी वर्षानंतर युरोपातून उत्तर भारतामधील मोठ्या नद्यांच्या खोऱ्यांत येऊन विसावली. परंतु त्याची भटकी वृत्ती संपलेली नव्हती. बुद्धीचा विकास चालूच होता. स्वरक्षणासाठी आणि शिकार करण्यासाठी तो धनुष्यबाणासारखी व तीक्ष्ण कडा असलेला दगड लाकडाच्या दांड्याला बांधून तयार केलेल्या शस्त्रासारखी प्राथमिक स्वरूपाची शस्त्रे वापरू लागला होता. अजून समूह करून गण्यागोविंदाने राहणे तो शिकला नव्हता. स्वभाव संशयी व शीघ्रकोपी होता. याच कालखंडात पृथ्वीच्या भूस्तरामध्ये मोठी स्थित्यंतरे घडून आली. सपाट प्रदेशात उंच पर्वत निर्माण झाले तर सगद्राचा तळ वर येऊन नवीन भूगी निर्माण झालेली या गानवाने पाहिली. अजूनपर्यंत त्याला प्राणी गाणसाळविण्याची कला सगजली नव्हती त्यागळे त्याच्याजवळ वाहन नव्हते. पूर्वी भारतात आफ्रिकेतून आलेले लोक या नंतर आलेल्या आर्यांशी शत्रुत्व करू लागले. त्यामुळे आर्यांचे येथील जुन्या निवासी गटांशी संघर्ष होऊ लागले. अशाच एका शूर, भटक्या एकलकोंड्या आर्य पुरुषाला विष्णूचा अवतार मानले गेले.
८) रामावतारः पृथ्वीवरील जीवसृष्टीतील उत्क्रांती अखंडपणे चालूच होती, परंतु या उत्क्रांतीचे स्वरूप आता बऱ्याच अंशी सामाजिक व सांस्कृतिक होते. १० हजार वर्षांपूर्वी आर्य उत्तर भारतातील सुपीक भूमीवर स्थायिक झाले होते. असंख्य छोटे छोटे समूह एकाच स्थानावर घरे बांधून प्रामुख्याने कृषी व पशुपालनावर उपजीविका करीत असत. वर्णव्यवस्था व जातिभेद पाळला जात होता. वेगवेगळ्या व्यवसायांत विशिष्ट कुटुंबे काम करीत. स्थापत्य, वाणिज्य, कला वगैरेंमध्ये प्रगती होत होती. ग्रामराज्ये अस्तित्वात आली. समूहाच्या जीवनाचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी राजा व प्रजा अशी विभागणी झालेली होती. राजाजवळ खडे सैन्य नसेच कारण शेजारी राज्यांशी सलोख्याचे संबंध असत. घोडा हा प्राणी माणसाळला होता परंतु त्यांची संख्या थोडी असे व त्यांचा उपयोग शोभेसाठी होत असे. चाकावर चालणारी वाहने होती परंतु ती राजाजवळ व त्याच्या अधिकाऱ्यांजवळच असत. नौकांचा वापर मोठ्या नद्या पार करण्यासाठी होत असे.
याखेरीज काही आर्य पुरुष वेदाभ्यास व वेदप्रणीत यज्ञ वगैरे कर्मकांडे करण्यासाठी रानात आश्रम करून राहात असत. त्यांचेकडे नागर विभागांतून वेदविद्या, धनुर्विद्या वगैरे शिकण्यासाठी शिष्य मुक्कामाला असत. सर्वांचा चरितार्थ प्रामुख्याने पशुपालन व रानांतील फळे, कंदमुळे यांच्यावर चालत असे. अशा आर्यपुरुषांना ऋषि तथा मुनि संबोधले जाई व हे कित्येक राजांचे सल्लागार म्हणून भूमिका पार पाडीत. परंतु वनामध्ये, फार पूर्वी आफ्रिकेतून आलेल्या मानवांचे वंशज आदिवासी म्हणून सर्वत्र पसरलेले होते व त्यांची संस्कृती वेगळी व क्रूर होती. त्यामुळे या असुरांपासून ऋषिमुनींना फार त्रास होई. अनेकदा प्राणहानीही होत असे. अशा पार्श्वभूमीवर सुमारे साडेनऊ हजार वर्षांपूर्वी उत्तर भारतातील शरयू नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अयोध्या नगरीच्या राजाचा मोठा पुत्र फार शूर, सर्व गुणांचा मूर्तिमंत पुतळा आणि न्यायी होता. त्याने या वनात राहणाऱ्या लोकांचे पारिपत्य करून ऋषिमुनींना निर्भयपणे आपला व्यासंग चालू ठेवण्यासारखी सुरक्षा दिली. त्याप्रीत्यर्थ आमच्या पूर्वजांनी या अयोध्येच्या राजाचे अर्थात श्रीरामचंद्राचे विष्णु या देवतेचा अवतार हे स्थान निश्चित केले.
९) कृष्णावतारः आठव्या अवतारानंतर भारतातील आर्यांच्या संस्कृतीचा व समाजजीवनाचा विकास अखंडपणे चालूच होता. नगरराज्याहून मोठी प्रादेशिक राज्ये अस्तित्वात आली होती परंतु भूमीच्या मालकीवरून या राज्यांमध्ये अथवा एकाच राज्यातील वेगवेगळ्या कुलांमध्ये संघर्ष होऊ लागले. घोडे व हत्ती मोठ्या संख्येने पोसले जाऊ लागले व त्यांचा उपयोग दळणवळणासाठी व युद्धात वाहन म्हणून होऊ लागला. शस्त्रास्त्रे विविध प्रकारची शोधली गेली. धनुष्यबाणांचे विविध प्रकार, भाले, गदा, दुरून फेकून मारण्याची चक्रे वगैरेंचा विकास झाला परंतु तरवार हे शस्त्र अस्तित्वात नव्हते. मानवाची बुद्धी विविध कला, मनोरंजनाचे खेळ, तत्त्वचिंतन ह्यांसाठी वापरली जाऊ लागली. अशाच वातावरणात आजपासून सुमारे ५००० वर्षांपूर्वी उत्तर भारतातील हस्तिनापूर येथील क्षत्रिय राजवंशात राज्याच्या वारसाहक्कावरून संघर्ष झाला व महायुद्ध झाले. या युद्धामध्ये न्याय्य पक्षाची पाठराखण करणाऱ्या, युद्ध टाळण्यासाठी शिष्टाई करणाऱ्या व एका पक्षाच्या सेनापतीला युद्धभूमीवर कर्मयोगाचा संदेश देणाऱ्या एका हुशार, चतुर आणि लोकप्रिय पुरुषाचा अर्थात श्रीकृष्णाचा, विष्णूचा अवतार म्हणून स्थापना झाली.
१०) कल्की अवतारः हा विष्णूचा दहावा अवतार मानण्यात येतो, व तो भविष्यात प्रकट होणार आहे. (काहींच्या मते त्याचा जन्म झालेला आहे.) महाभारत काळानंतर मानवी संस्कृती, समाज, विज्ञान, तंत्रज्ञान यांचा प्रचंड विकास झालेला आहे. भारतापुरते बोलायचे म्हटले तर अनेक नवीन धर्म स्थापन व आक्रमित झाले. भारताचा बाह्य जगाशी संपर्क वाढला, पोथ्या, पुराणे लिहिली गेली. अनेक भाषांचा व लिपींचा विकास झाला. आता महाभारत युद्ध संपल्यावर ५००० वर्षांत मानवाने सर्वच क्षेत्रांत प्रचंड प्रगती केली आहे हे आपण अनुभवतोच आहोत. मानव जणू काही प्रति ईश्वर झाला आहे. ब्रह्मांडाविषयीचे ज्ञान, ग्रह तारका आकाशगंगाचे रासायनिक विश्लेषण, जीवांच्या गुणसूत्रांचे व शरीरक्रियांचे ज्ञान, कृत्रिम जीवाची निर्मिती, जलस्थलवायुमंडळात प्रचंड वेगाने व प्रचंड अंतरापर्यंत संचार, परग्रहांवर पदार्पण, प्रचंड विनाशकारक शस्त्रास्त्रांचा विकास व वापर, अणुशक्ती, डिजिटल चित्रे व मजकूर साठविण्याचे व पृथ्वीच्या पाठीवर कोठेही क्षणार्धात पोचविण्याचे सामर्थ्य, नॅनो तंत्रज्ञानाचा विकास या सकारात्मक उपलब्धींसोबतच पृथ्वीवरील निसर्गाचे व नैसर्गिक संपदेचे शोषण, धार्मिक असहिष्णुता, शक्तिशाली राष्ट्रांकडून दुबळ्या राष्ट्रांवर सतत होणारी कुरघोडी, आतंकवाद, भ्रष्टाचार, अनैतिकता व मानवांची स्वार्थी वागणूक, पर्यावरण असंतुलन यांसारखे असंख्य भस्मासुर उभे ठाकले आहेत व मानवताच नष्ट होण्याच्या समीप येऊन पोचली आहे. अशावेळी विष्णु पृथ्वीवर एका बलशाली मानवाच्या स्वरूपात अवतरतील व तो अवतार कल्की या नावाने ओळखला जाईल. कदाचित् तो यंत्रमानव (रोबोही) असू शकेल व हल्ली उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग करून पृथ्वीला व अखिल मानवी समुदायास भेडसाविणाऱ्या सर्व अनिष्टांचे पारिपत्य हा कल्की करणार आहे अशी भारतीयांना आशा वाटते. हा अवतार भारतातच जन्माला येणार अशी समग्र भाविक हिंदूंची अपेक्षा, इच्छा आणि श्रद्धा आहे.
हल्लीच्या उपलब्ध असलेल्या पुराणांत व अन्य धार्मिक ग्रंथांमध्ये विष्णूचा नववा अवतार म्हणून गौतम बुद्धाचा उल्लेख आहे परंतु आमच्या मते ते सर्वस्वी चूक आहे. आमचे असे मत का आहे याची कारणे सविनय प्रस्तुत करणे आम्हास आवश्यक वाटते.
(अ) गौतम बुद्धाने हिंदू धर्माचे सर्व प्रमुख आधारस्तंभ म्हणजे ईश्वर व आत्म्याचे अस्तित्व, पुनर्जन्म, दशावतार, वर्णव्यवस्था, स्त्रीपुरुष असमानता, जातिभेद हे कटाक्षाने नाकारले होते. (आ) बुद्धाने आपण हिंदू धर्माचा त्याग करून नवा धर्म स्थापन करीत आहोत असे वारंवार प्रतिपादन केले. (इ) आदि शंकराचार्यांनी बौद्ध मताचे सतत खंडन करून भारतातून बौद्ध धर्म हद्दपार करण्याचे कार्य केले. आपल्याच धर्मातील अवताराचे खंडन शंकराचार्यांसारखे विचारवंत कसे करतील ? (ई) आजही बुद्ध व त्याच्या धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. धर्मानंद कोसंबी, डॉ. राहुल सांकृत्यायन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाला हिंदूचा अवतार मानण्यास ठाम नकार दिलेला आहे. (उ) आजही बौद्ध धर्माचे पारंपरिक अनुयायी (श्रीलंका, म्यानमार, थायलॅण्ड, चीन येथील बौद्ध) तसेच भारतातील नवबौद्धांचा, गौतम बुद्ध हा हिंदूंचा अवतार आहे असे मानण्यास कडक विरोध आहे.
हिंदूनी आमच्या श्रद्धेय विभूतीचे अपहरण केलेले आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. हे नवबौद्ध वारंवार बजावीत असतात. तेव्हा आमचा हिंदू धर्ममार्तंडांनी व शास्त्री-पंडितांनी गौतम बुद्धाला विष्णूचा नववा अवतार मानण्याचा पाखंडीपणा (ब्लासफेमी, लश्ररीहिशा) ताबडतोब बंद केला पाहिजे.
१०२, उत्कर्ष-रजनीगंधा, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर ४४० ०१०. दूरभाष : (०७१२) २५२८०२१