समाजसुधारक गोपाळराव आगरकर यांच्याकडे विद्यार्थिदशेत एकच सदरा असल्याने रोज रात्री धुऊन वाळत घालीत व दिवसा पेहरत. ही कथा अनेकांनी ऐकली असेल. अमेरिकन साहित्यिक एडगर अॅलन पो (ज्याने आधुनिक रहस्यकथा लेखनाचा पायंडा पाडला) आणि नॅथानियल हॉथॉर्न हे दोघे एकत्र राहत. दोघेही साहित्याच्या मस्तीत धुंद, परंतु खायला चण्या-कुरमुऱ्यांचेही वांधे. त्यांच्या साहित्यावर लुब्ध होऊन एका धनिक स्त्रीने त्यांना पार्टीचे निमंत्रण दिले. दोघे मिळून एकच कोट बाहेर जाताना आळीपाळीने वापरीत. आता आली का पंचाईत ? पो ने बाईसाहेबांना विचारले, ‘बाईसाहेब, आम्ही बरोबर न येता, एकानंतर दुसरा असं आलेलं चालेल का?’ वुड इट बी ऑलराइट मॅडम, इफ वुई कम वन आफ्टर अनदर ?) सरस्वतीचे वरदपत्र सर्वत्रच असे लक्ष्मीच्या वरदानापासून वंचित राहतात असे दिसते. हिंदी कवी कन्हैयालाल मिश्र ‘प्रभाकर’ यांना फत्तहचंद आराधक यांनी त्यांच्या वाढदिवशी अभिनंदनाची तार केली. प्रभाकरांनी एका कार्डावर उत्तर पाठवले: “अच्छा होता तार न देते, दे देते मुझको रुपया । ले लेता बनियान नया ।”
[साभारः गंगाजळी श्री.बा.जोशी, पृ.८७] संपादकीय संवाद