आपल्या काम-क्रोधादि षड्रिपूंवर मात करायची असेल तर त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे अशी शिकवण पारंपरिक साधुसंतांनी दिलेली आहे. आमचा सारा समाज अशिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुद्धा अविरतपणे प्रयत्नवादाचा पुरस्कार करीत असतो. आमची प्रचलित शिक्षण पद्धती प्रयत्नवादावरच आधारलेली आहे. आई-वडील, शिक्षक, समाजधुरीण, आध्यात्मिक गुरु सारेच अव्याहतपणे आक्रोश करीत असतात “प्रयत्न करा, प्रयत्न करा.”
आज मी हिंसाचारी असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी अहिंसक बनू शकेन; आज मी मिथ्याचारी असलो तरी प्रयत्न करून, उद्या मी सत्यनिष्ठ बनू शकेन आज मी चोरी करीत असलो तरी प्रयत्न करून, उद्या मी अस्तेय व्रतधारी बनू शकेन आज मी संचय करीत असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी अपरिग्रही बनू शकेन; आज मी कामलोलुप असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी ब्रह्मचर्यव्रती बनू शकेन अशा भाबड्या श्रद्धेने आत्म-निग्रह करण्याचा प्रयत्न लाखो साधकांनी केलेला आहे आणि आजही लाखो साधक असा प्रयत्न करण्यात व्यस्त आहेत.