ही कलकत्त्याची गोष्ट आहे. पण ती मुंबईची असू शकते. हैद्राबादची असू शकते किंवा दिल्लीची देखील असू शकली असती. ही एका प्रेमविवाहाची आणि त्याच्या दुःखान्ताची कहाणी आहे. कलकत्त्याच्या प्रियंका तोडी नावाच्या तरुणीने रिझवानुर्रहमान ह्या मुस्लिम तरुणाशी लग्न केले. सिव्हिल मॅरेज केले. आपापले धर्म कायम राखून हे लग्न करता येते. लग्नातून घटस्फोट मिळविणेही सोपे आहे. रिझवान कॉम्प्युटर विद्येतील ग्राफिक डिझाइनर होता. मध्यमवर्गीय कुटुंबातला जबाबदारी उचलणारा तरुण प्रियंकाचे वडील उद्योगपती अशोक तोडी. ‘यह अंदर की बात है’ अशा व्यंजक शब्दांनी ज्यांची जाहिरात केली जाते अशा स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांची निर्मिती करणारा तो एक कारखानदार, सालिना दोनशे कोटींची आय असणारा. वर्षानुवर्षे क्रिकेटच्या सट्ट्याचा बुकी, तिकिटांचा दलाल राहिलेला. पाहता पाहता उद्योगपती बनलेला. त्याला साहजिकच नवश्रीमंतीचा दर्प चढलेला. मुलीने एका सामान्य घरातल्या, त्यातही मुसलमान युवकाशी लग्न करावे हे त्याला कसे पटणार? ऑगस्टच्या 18 तारखेला झालेला गांधर्वविवाह सप्टेंबरच्या 21 तारखेला, सव्वा महिन्याच्या आत संपला. काडीमोड होऊन नाही तर पतीचा अंत होऊन. हा मृत्यू नैसर्गिक नसावा हे रिझवानचे प्रेत रेल्वे रुळावर पडलेले आढळले त्यावरून उघड आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी ही आत्महत्या असावी असे उतावळेपणाने काहीशा बेपर्वाईने जाहीर केले. पण प्रकरण दबले नाही. पत्रकारानी उचल खाल्ली. मानवी अधिकारवाल्यांनी नेट लावला. कलकत्त्याचे पोलीस- कमिश्नर प्रसून मुकर्जी हे मुख्यमंत्री बुद्ध बाबूंचे लोभातले अधिकारी. त्यांनीही आपल्या अधिकाऱ्याचीच कड घेतली. प्रकरण कोर्टात गेले. हायकोर्टाने दिलेल्या आदेशावरून सी.बी.आय. कडे चौकशी सुपूर्द करावी लागली. राज्यसरकारकडून निःपक्ष चौकशी होणार नाही ही टीका हायकोर्टाने ग्राह्य धरली. सी.बी.आय. च्या पथकाने शोध केलेल्या माहितीच्या आधारे श्री अशोक तोडी ह्यांना खुनाच्या आरोपावरून अटक करण्यात आली. आजवर पत्रकार, दूरदर्शनचे कॅमेरे इतकेच काय रिझवानच्या आईलासुद्धा न भेटलेली प्रियंका केन्द्रीय पोलिसांना टाळू शकली नाही. त्यांच्या चौकशीला टाळू शकली नाही. त्यांच्या चौकशीला उत्तरे देण्यासाठी तिला हजर व्हावेच लागले. आता रहस्य हळूहळू उलगडेलच.
हैद्राबादची गोष्ट ह्याच वळणाची आहे. चिरंजीवी नावाच्या लोकप्रिय तेलुगू अभिनेत्याची एकोणीस वर्षांची श्रीजा ही कन्या, तिने बापाची ऐपत, नाव लौकिक ह्या कशाचीच तमा न बाळगता शिरीष नावाच्या समवयस्क तरुणाशी पळून जाऊन लग्न केले. त्या शिरीषचे नाव पूर्वी एका अपहरणाच्या मामल्यात आरोपी म्हणून दाखल असले तरी आजमितीला त्याचे नाव कोणत्याही खटल्यात गुंतलेले नाही असा पोलिसांनी निर्वाळा दिला आहे. श्रीजेने पळून जाऊन लग्न केले तरी ते वैदिक पद्धतीचे आहे आणि नटाची लेक म्हणून की काय तिने दूरचित्रवाणीच्या चमूद्वारे त्याची भरपूर प्रसिद्धी करविली. इतकेच नाही तर दिल्लीला पळून जाऊन हायकोटांकडून आपल्या जिवाला धोका आहे; नवऱ्याची रिझवानुसारखी गत होऊ शकते ह्या कारणाने पोलिसांकडून जीविताच्या संरक्षणाची व्यवस्था करविली आहे.
ह्या घटना श्रीमंत आणि कीर्तिवंतांच्या कुटुंबांतील असल्यामुळे जास्त गाजावाजा झाला. पण असे प्रकार प्रत्यही आपल्या समाजात होत आहेत. आपण अडवल्याने विषम- स्थितीतले विवाह थांबणार नाहीत. कधी जाती भिन्न, कधी भाषा भिन्न, कधी प्रदेश- विदेश हे भेद. आपल्या समाजाने आता आंतरजातीय विवाह नाही नाही म्हणत, मान्य केले आहेत. आंतरधर्मीयांमध्येही हिंदू-जैन, हिंदू-बौद्ध ही लग्ने तेवढी डोळ्यांवर येत नाहीत. ख्रिस्ती आणि मुस्लीम ह्यांच्याशी झालेली लग्ने काहीशी खटकतात. त्यातही भेद करायचा तर एकवेळ ख्रिस्ती चालेल पण मुस्लिम नको अशी मनःस्थिती असते. हिंदु-मुस्लिम हा भेद पूर्ण नाकारला आहे तो सिनेमावाल्यांनी. पण त्यांची बातच न्यारी. जगच वेगळे. सामान्य समाजात जनमानसात हिंदु-मुस्लिम लग्ने जास्त खुपतात एवढे मात्र खरे.
अशा लग्नांबद्दल एक आक्षेप चटकन् कानावर येतो. आपल्या हिंदू मुली मुसलमानांशी लग्ने करतात तशा मुस्लिम मुली हिंदूशी करतात काय? की ही एकमार्गी वाहतूकच तुम्हाला हवी आहे? थोडा विचार केला तर त्याचे कारणही उघड होते. हिंदूंच्या मानाने मुस्लिम समाज जास्त जीर्ण, सनातनी आणि परंपरावादी असतो. हिंदूमध्ये जेवढे विचार-स्वातंत्र्य, आचार-स्वातंत्र्य आणि संचार स्वातंत्र्य आहे, तेवढे किंवा तसे मुस्लिम मुलींना नाही. म्हणून हे विषम प्रमाण दिसते. त्यांच्या ह्या कालबाह्य समजुती, रूढी आणि असहिष्णुतेमुळेच कदाचित् हिंदू-आईबापांना आपल्या मुलींना असले जिणे जगावे लागू नये असे वाटत असावे. परमतसहिष्णुता मुसलमानांच्या मानाने हिंदूत जास्त आहे असा समज आहे. महिलांनी बुरखाबंद होणे आणि पुरुषांनी गोल कापडी टोप्या घालून बाहेर हिंडणे फिरणे ह्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढले आहे.
मुस्लिमांच्या ह्या सर्व उणिवा काहीच नाहीत असे वाटावे असा एक प्रघात हिंदू- समाजात प्रचलित आहे. हजारो वर्षांपासून आमच्यात लग्न हा एक (पाणिग्रहण) संस्कार बनून राहिला आहे. मुस्लिमांमध्ये तो करार आहे आणि दिखाऊ का असेना तो वधू- वरांच्या परस्परसंमतीने झालेला असतो. तो मोडता येतो. हिंदू रीतीमध्ये आणखी एक विषमता आहे. स्त्रीला हा संस्कार एकदाच होऊ शकतो. पुरुष मात्र अनेकदा लग्ने करू शकतो. स्त्रीला ते एकदाच करता येते. केल्यावर मोडता येत नाही. मृत्यूने पति वियोग झाला तरी पुन्हा लग्न करता येत नाही असे धर्मशास्त्र सांगत होते. ह्या विषम प्रथा आता कायद्याने नाकारल्या तरी उच्चवर्णीय हिंदू मनातून नाहीश्या झाल्या नाहीत. शिष्टाचारी प्रतिष्ठित-संभावित कुटुंबांमध्ये स्त्रीचा घटस्फोट, स्त्रीचा पुनर्विवाह अद्यापही स्वागतार्ह नाही. सहजपणे घडलेली कौटुंबिक घटना म्हणून तिच्याकडे पाहिले जात नाही. ती घटना एक वैगुण्य आहे.
ह्या मानसिक घडणीमुळे आईबापांना आपल्या मुलीच्या भवितव्याची अतोनात काळजी वाटते. लग्न हा असा पुनर्जन्म आहे की जो आपल्या हाती आहे, अशी त्यांची धारणा असल्यामुळे आज इतर बाबतींत जुन्या रीतिरिवाजांना कितीही तिलांजली दिली तरी मुलीचे लग्न आपणच ठरवावे हा आग्रह काही केल्या सुटत नाही. मुलीवर घटस्फोटाची पाळी कदापि येऊ नये. लेकीसुनांनी पुनर्विवाहाने आपला संसार पुन्हा मांडावा ही पाळी काहीही झाले तरी आपल्या कुटुंबावर येऊ नये अशी तळमळ असते.
परंतु मुसलमान किंवा प्रॉटेस्टंट पंथीय ख्रिस्त्यांप्रमाणे- घटस्फोट – अप्रिय, अपघात मानला तरी त्याकडे असाध्य, दुर्निवार आघात म्हणून पाहू नये. घटस्फोटिता, विधवा स्त्रीला हवा तसा पुनर्विवाह करता यावा ह्या सुधारणा आपण मनापासून स्वीकारल्या तर केवढे तरी अनावश्यक दुःख कमी होईल! आज तत्त्वतः आपण व्यक्तिस्वातंत्र्य मानले तरी लग्न त्यांतही मुलीचे लग्न हा प्रांत आपण अपवादभूत केला आहे.
आपण जर व्यक्तिस्वातंत्र्य सर्व विवेकवादाचा मूलारंभ मानत असू तर लग्न हा ज्याच्या त्याच्या अखत्यारीतला प्रश्न आहे हे लक्षात घेऊन त्याचे एवढे अवडंबर माजवणार नाही. समजा प्रियंका तोडीचे रिझवानुरशी नसते पटले तर त्यांनी लग्न मोडले असते. पुनर्विवाह सरसकट होत असते तर गरजेनुसार त्या विभक्तांनी दुसरे लग्न केले असते. एकट्या स्त्रीला स्वतंत्रपणे राहण्याची ऐपत असेल, उत्पन्न असेल आणि सामाजिक मुभा असेल तर स्वेच्छेने नवऱ्याशिवाय स्त्रिया सुखनैव राहू शकल्या असत्या. आजही सिनेजगतातल्या किंवा नाट्यक्षेत्र, कलेचे क्षेत्र किंवा उच्चभ्रू धरातले स्त्री-पुरुष हे स्वातंत्र्य उपभोगतच आहेत की नाही?
स्त्री-स्वभावाची चंचलता, योनिशुचिता आणि ह्यासंबंधी आमच्या धर्मशास्त्राच्या कर्त्यांनी फार अनुदार भूमिका घेतली होती. समाजातल्या कर्त्या वर्गावर ह्या मताचा पगडा हजारो वर्षे राहिला आहे. आज हिंदु कायद्याने कितीही मुभा दिली असली तरी आमची विचारसरणी मनुस्मृतीच्या अस्वतंत्राः स्त्रियः कार्याः । पुरुषैर्वा दिवा निशम् ॥ पुरुषांनी स्त्रियांना कदापी मोकळीक देऊ नये ह्या दण्डकानेच प्रभावित झालेली नाही काय? विधवांचा पुनर्विवाह दीर्घतमस् नामक ऋषीने बंद केला. तो आंधळा होता. त्याची सुंदर पत्नी त्याला सोडून गेली तेव्हा त्याने द्वेषाने स्मृती केली की स्त्रीला जीवनात एकदाच पतिलाभ व्हावा. तो वेदवेत्ता असल्यामुळे त्याचा आदेश धर्मशास्त्राला मान्य झाला. तो म्हणतो
अद्यप्रभृति मर्यादा मया लोके प्रतिष्ठिता ।
एक एव पतिर्नार्या यावज्जीवं परायणम् ॥
मृते जीवति वा तस्मिन् नापरं प्राप्नुयान्नरम् ॥
आता व्यक्तिस्वातंत्र्याचे आणि समानतेचे युग अवतरले आहे, हे जितके दृढपणे आणि सत्वर आमच्या चित्तात रुजेल तितके बरे!
फोन: 0712-2523010.