मूलभूत शारीरिक क्षमतांचा विकास करण्यासाठी जो खेळ खेळला जातो त्या खेळास फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मान्यता मिळते. ह्या खेळातून (1) शारीरिक क्षमतांचे दमसास, (2) स्नायूंचा दमदारपणा (3) वेग (3) ताकद (5) चपळाई (6) सांधे चलनवलन, दीर्घ आयुष्य इ. सर्व साध्य झाले पाहिजे. कुस्ती, हुतूतू. खोखो, आट्यापाट्या, फुटबॉल, बॉस्केटबॉल, मुष्टियुद्ध इ. खेळ योग्य आहेत. क्रिकेटसारख्या मनोरंजक खेळास फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मान्यता नाही. आलिंपिकमध्ये तो खेळत नाहीत.
परंतु आज पेप्सी, हिरोहोंडा, सहारा, सोनी अशा साम्राज्यावाद्यांच्या बाजूच्या कंपन्या क्रिकेटसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात; आणि समाजपुरुषाची शारीरिक क्षमता खऱ्या अर्थाने वाढू न देण्यास मदत करतात. जगात एकूण 185 राष्ट्रे आहेत. पैकी ब्रिटिश सत्तेच्या गुलामीत असणाऱ्या फक्त 10 राष्ट्रांत क्रिकेट खेळतात व त्यास नाव “विश्वचषक खेळ’ असे देतात. खुद्द इंग्लंडमध्ये दिवस व वेळ वाया घालविणारा क्रिकेट कमी खेळला जातो. फ्रान्स- इटाली पोर्तुगाल – जर्मनीमध्ये खेळत नाहीत.
पूर्वीच्या पुढाऱ्यांना समाजाला शहाणे करण्याचा ध्यास होता. म्हणून पूर्वी मायकेल परेरा, प्रकाश पदुकोण, विजय अमृतराज, कल्लू, देवप्पा, गणपत शिंदे, युवराज पाटील यांचे कौतुक करीत. आज क्रिकेट व्यतिरिक्त कोणत्याही खेळाचे कौतुक होत नाही. गणेशोत्सवासारख्या बुद्धीच्या देवाच्या उत्सवातून फक्त नट्या नाचविल्या जातात. समाजप्रबोधनासाठी किंवा विज्ञानवर्धनासाठी काहीही केले जात नाही.
आजच्या पुढाऱ्यांना त्यांची सत्ता अबाधित राहावी, समाजाच्या मेंदूला विचारहीनता यावी ह्यासाठी जनसामान्यांची शारीरिक क्षमता खच्ची करीत आहेत. असे झाले की नागरिक प्रश्न उभे करीत नाहीत. राज्यकर्त्याविरुद्ध बंड करीत नाहीत. जात-धर्म-भक्तीमध्ये गुंगून राहतात. आर्थिक असमानता त्यांना समजतच नाही. राज्यकर्त्यांनी भक्तिमार्गाऐवजी स्वातंत्र्ययोद्धे भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, वासुदेव बळवंत इत्यादींचे जन्मदिवस साजरे केले तर समाजाचे क्षात्रतेज उफाळून येईल. राज्यकर्त्यांना तेच नको म्हणून राज्यकर्ते गणेशोत्सव व क्रिकेटवर खर्च करतात आणि समाजाला भावुक, बनवितात. विवेकशून्य करतात. क्रिकेटसारखा पैसा इतर खेळांना मिळाला तर भारताला आलिंपिकमध्ये अनेक सुवर्णपदके मिळतील.
तत्त्वबोध, कल्याण-कर्जत हायवे, नेरळ (रायगड) 410101,
फोन 952148-238652