‘आऊट सायडर’ ही कादंबरी माहीत आहे ना? अल्बेर कामूची ? तिचा नायक मेरसोल. कामूने त्याच्याबद्दल म्हटले आहे, “आजच्या युगाला हवा असेलला तो येशू ख्रिस्त आहे. ” मेरसोल तर एक सामान्य कर्मचारी होता. सामान्याचे आयुष्य जगणारा. बहुधा परवडत नाही म्हणून लग्न न केलेला. त्याच कारणासाठी बहुधा आईला वृद्धाश्रमात ठेवणारा. सिनेमे पाहणे, पोहायला जाणे आणि मैत्रिणीबरोबर भटकणे असे चार-चौघांसारखे आयुष्य जगणारा. तो आजच्या युगाचा येशू कसा?
त्याच्यावर खुनाचा आरोप असतो; तो खराच असतो-मेरसोलही ते नाकारत नाही. त्याला फाशीची शिक्षा होते- मेरसोलची त्याबद्दलही तक्रार नसते; उलट तो म्हणतो, मला फाशी द्याल तेव्हा माझ्या निषेधाच्या घोषणा देणारा जमाव माझ्याभोवती राहील एवढी व्यवस्था करा. तुरुंगात त्याच्या डोक्यात विचित्र कल्पना येतात आणि वासना त्याला अस्वस्थ करतात हे तो स्वतःच सांगत असतो-सगळी कादंबरी हे त्याचेच स्वगत आहे. तिथे तो धर्मोपदेशकावर पिसाळल्यासारखा खवळतो. हा माणूस येशू कसा?
त्याच्या जगण्याची एकच अट असते “मी खोटे बोलणार नाही; मला जे खोटे वाटते. त्याला खरे म्हणणार नाही.” या त्याच्या आग्रहापायी त्याचे कोर्टात हसे होते; या त्याच्या आग्रहापायी धर्मोपदेशक हतबुद्ध होतो.
मेरसोलला दिसते की वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या पद्धतींनी आपल्या भोवतीची माणसे खोटे बोलताहेत हाच जीवनाचा न्याय आहे. न्यायाधीश आणि वकील, मित्र आणि मैत्रिणी, वृद्धाश्रमातील कर्मचारी आणि धर्मोपदेशक… सर्व खोटे बोलताहेत ठरवून नव्हे; गरज म्हणून, स्वभाव म्हणून सराव म्हणून. हाच आणि असाच सर्व जीवनव्यवहार आहे. या जीवनाचा पायाच मुळी खोटेपणावर आधारलेला आहे – इथल्या सगळ्या संस्था. त्यामुळे इथला अत्यंत तर्कशुद्ध विचारसुद्धा खोटेपणाकडून खोटेपणाकडेच घेऊन जातो आपणास दुसरा मार्गच नाही.
“मी खोटे बोलणार नाही; मला जे खोटे वाटते त्याला मी खरे म्हणणार नाही’ हा मेरसोलचा बाणा आहे. इथे तो सर्वार्थानि एकाकी आहे व म्हणूनच आऊटसायडर आहे आऊटसायडर म्हणजे ‘जगावेगळा’ नाही, ‘अजनबी’ नाही, ‘परका’ नाही, ‘उपरा’ ही नाही; ‘निःसंग’ होय, निःसंग.
मेरसोल निःसंग आहे. भगवी किंवा पिवळी किंवा काळी किंवा पांढरी कफनी न घालताच तो निःसंग आहे कदाचित म्हणूनही! एक अगदी सामान्याचे जीवन जगत असतानाही तो निःसंग असतो आणि एक असामान्य मृत्यू पत्करतानाही तो तितकाच निःसंग राहतो.
त्याचा हा निर्धार आपल्या अंगावर शहारे आणतो.
कुठल्याही तत्त्वप्रणालीशिवाय, कुठल्याही बाह्य भव्य-दिव्य कॉजशिवाय मेरसोल निःसंग असतो आणि राहतो हा त्याचा निर्धार आपल्याला स्तिमित करतो; हा खराखुरा सामान्यांचा येशू आहे हे पटते.
कुठल्याच बाह्य उद्देशाने नव्हे, कुठल्याच निमित्ताने नव्हे, कशासाठीच नव्हे निखळ, निरुपाधिकपणे मेरसोल मनोमन म्हणतो आणि वागतो, “मी खोटे बोलणार नाही; मला जे खोटे वाटते त्याला मी खरे म्हणणार नाही. भलेही मग ते हास्यास्पद असो, तो अपराध असो, ती नास्तिकता असो, ती अनैतिकता असो काही असो.”
आश्चर्य म्हणजे ‘सत्याच्या जातीला दुःख असे मिळणारच… सत्याचे भव्य भाल रक्ताने भिजणारच’ असा घोष तो कुठेही करीत नाही कधीच करीत नाही तो फक्त तसे जगतो! ‘एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण’ हे ब्रीद तो अगदी वाच्यार्थानि अमलात आणतो त्याचे कुठलेही तत्त्वज्ञान न करता, त्याचे कुठलेही अवडंबर न माजवता तो असा अनाम वीर आहे; तो असा, ज्याच्या दफनभूमीवर चिरा – पणती नाही पुष्पचक्र नाही असा, हुतात्मा आहे!
आपल्या अंगावर काटा येतो आणि शंभराहून कमी पानांच्या या कादंबरीस नोबेल पारितोषिक का मिळाले ते आपणास आपसूक कळते.
आपल्याच सामान्य पद्धतीने जगत असताना मेरसोलला याचा बोध होत नाही; त्याला आपल्या जीवनव्यवहाराचा बोध होतो तो आईच्या मृत्यूने त्यासंदर्भात तो बॉसशी खोटे बोलत नाही, मैत्रिणीशी खोटे बोलत नाही, न्यायालयाशीही खोटे बोलत नाही – हे सारे तशी स्वाभाविक अपेक्षा करीत असताना, हे सारे तसे वागत असतानाही जीवनव्यवहार असाच असतो; तो न पाळल्याने त्याचे हसे होते, त्याच्यावर क्रौर्याचे आणि विकृतीचे आरोप होतात, तो सुखास आचवतो, त्याला गंभीर शिक्षा होते तरी; हा येशू
सर्व जीवनव्यवहार, सर्व धारणा, सर्व तर्क आणि सर्व संस्थाच जर अशा आहेत तर आत्मसमर्थन तरी काय करणार आणि कोणाजवळ आणि का? मेरसोल गप्प राहतो. वकिलाला आणि न्यायाधीशाला आणि धर्मोपदेशकाला त्याच्या मौनाचा अर्थ कळत नाही
(कोर्टातील एका आणि एकाच पत्रकाराला त्याचा अर्थ कळतो.)
मेरसोलच्या जीवनप्रवासात सारखा ‘सूर्य’ डोकावत असतो आईच्या स्मशानयात्रेच्या वेळी आकाशात सूर्य तळपत असतो; अरबाच्या खुनाच्या प्रसंगी सुरीवर सूर्य तळपत असतो. फाशीपूर्वी त्याला कळते की प्रत्येकाचा सूर्य एक दिवस ढळणार आहे. त्याला प्रभू येशू कुठे दिसत नाही पण सूर्य दिसतो! माध्याह्नीचा, दुपारचा आणि संध्याकाळचा.
आईचा मृत्यू आणि अरबाचा मृत्यू आणि स्वतःचा मृत्यू अशा मृत्यूंच्या संदर्भातच सूर्यसंदर्भ आल्यामुळे असे वाटते की हा सूर्य मृत्युसूचक आहे; विकृति-विनाशसूचक आहे; पण सूर्य मृत्यूचा विनाशाचा आणि विकृतीचा सूचक होईलच कसा? इथे तर नक्कीच नाही. हा सूर्य जीवनसूचकही नाही कसा असेल? ते जीवन खोटेपणावरच आधारलेले आहे त्याचे सूर्य हे प्रतीक होईलच कसे?
इथे सूर्य प्रतीक आहे सत्याचे, सत्यज्ञानाचे या अर्थाने जीवनज्ञानाचे; या अर्थाने आत्मज्ञानाचे. सूर्य मेरसोलच्या आत्मबोधाचे प्रतीक आहे. त्याला स्वतःचे आणि जगाचे जे ज्ञान सहजभावाने झाले आहे त्याचे ते प्रतीक आहे. हे ज्ञान ग्रंथ, गुरू, धर्म, चिंतन, तपाचरण यांतून झालेले नाही; जितक्या सहज सूर्य उगवतो, जितक्या सहज सूर्य मावळतो तितक्या सहज मेरसोलला हे ज्ञान झाले आहे इतके हे प्रतीक स्वाभाविक आहे! त्यात कुठेही अर्थाचा अट्टाहास नाही. कारागिरी नाही. (उगवणारा प्रत्येक सूर्य अखेर मावळतो तसा आपला आत्मबोधही आपल्या मृत्यूने मावळणारा आहे प्रत्येकाचा आत्मबोध असाच मावळणार आहे तो. काही चिरंतन नाही असा अर्थही त्यात नसेलच असे नाही.)
‘आऊटसायडर’ची भाषा एका सामान्य कर्मचाऱ्याची भाषा आहे; ते त्याचे मृत्युपूर्व स्वगत आहे; ती त्याची मृत्युपूर्व जवानी आहे; ते त्याचे मृत्युपत्रही आहे. त्यात अलंकार, प्रतिमा, प्रतीके, नाट्यात्मकता, काव्यात्मता यांना अवसर आहेच कुठे? जे आले आहे ते सगळे सहज सहज आले आहे मग तो आईच्या स्मशानयात्रेचा प्रसंग असो, अरबाच्या खुनाचा प्रसंग असो; फाशीपूर्वीचे स्मृतिरंजन (nostalgia) असो; कोर्टातली कार्यवाही असो- काही असो. जे आले आहे ते सहज, सहज आहे.
सारा अंधारच प्यावा, अशी लागावी तहान
एका साध्या सत्यासाठी, देता यावे पंचप्राण
असे ज्याचे ब्रीद आहे त्याच्या निवेदनात नाट्य आणि काव्य कुठले? प्रेषिताच्या उद्धारांत कुठे नाट्य आणि काव्य असते? प्रेषिताच्या उद्गारात नितळ जीवनसत्य साक्षात् झालेले असते जसे, येशूच्या उद्गारात.
या अथनिही मेरसोल आजच्या युगाचा येशू आहे.
मेरसोलची शोकांतिका हो मेरसोलची शोकांतिका नाही; ती आजच्या न्यायसंस्थेची, आजच्या समग्र जीवनव्यवहाराची शोकांतिका आहे मेरसोल त्यात सूर्याप्रमाणे उगवतो आणि मावळतो.
मेरसोल मावळला हे खरे; पण ‘निःसंग’ काही मावळला नाही. 1942 ची ही कादंबरी. म्हणजे अर्धशतकाहून अधिक काळ उलटून गेला ती तशीच आहे; नव्या शतकातही ती तशीच राहणार आहे; तिचा अभिप्राय अधिक तीव्र होणार आहे!
[लेखक – नागपूर विद्यापीठातून मराठी विभागप्रमुख व प्राध्यापक म्हणून निवृत्त. मराठीतील अग्रगण्य समीक्षक.]
[ऋण युगवाणी ऑक्टो. नोव्हें. डिसें. 2006]
पुणे, फोन: 020-24380894