आपल्या काम-क्रोधादि षड्रिपूंवर मात करायची असेल तर त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे अशी शिकवण पारंपरिक साधुसंतांनी दिलेली आहे. आमचा सारा समाज अशिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुद्धा अविरतपणे प्रयत्नवादाचा पुरस्कार करीत असतो. आमची प्रचलित शिक्षण पद्धती प्रयत्नवादावरच आधारलेली आहे. आई-वडील, शिक्षक, समाजधुरीण, आध्यात्मिक गुरु सारेच अव्याहतपणे आक्रोश करीत असतात “प्रयत्न करा, प्रयत्न करा.”
आज मी हिंसाचारी असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी अहिंसक बनू शकेन; आज मी मिथ्याचारी असलो तरी प्रयत्न करून, उद्या मी सत्यनिष्ठ बनू शकेन आज मी चोरी करीत असलो तरी प्रयत्न करून, उद्या मी अस्तेय व्रतधारी बनू शकेन आज मी संचय करीत असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी अपरिग्रही बनू शकेन; आज मी कामलोलुप असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी ब्रह्मचर्यव्रती बनू शकेन अशा भाबड्या श्रद्धेने आत्म-निग्रह करण्याचा प्रयत्न लाखो साधकांनी केलेला आहे आणि आजही लाखो साधक असा प्रयत्न करण्यात व्यस्त आहेत.
एखादी दुष्प्राप्य गोष्ट स्व-प्रयत्नाने आपण प्राप्त करू शकतो ही कल्पनाच खूप दिलासा देणारी आहे. आणि जी गोष्ट दिलासा देते तिला आपण घट्ट कवटाळून ठेवतो श्रद्धेचा सत्याशी अजिबात संबंध नाही. एखादी गोष्ट सत्य नसूनदेखील तिच्यावर आपली श्रद्धा असू शकेल, आणि एखादी गोष्ट सत्य असूनदेखील तिच्यावर आपली श्रद्धा तशीच राहणार कितीही विरुद्ध पुरावे त्यांच्यापुढे मांडले तरी. पण ज्यांना सत्याविषयी पोटतिडीक आहे ते लोक मात्र ह्या संदर्भात शहानिशा करून सत्याचा शोध घ्यायला उद्युक्त होतील.
अशा सत्य शोधकांना उद्देशूनच प्रस्तुत लेखकाचा हा लेखन प्रपंच.
प्रयत्न म्हणजे नेमके काय? आपण जेव्हा ‘प्रयत्न केला पाहिजे’, ‘प्रयत्न करू ‘या’, ‘मी प्रयत्न करीन’ असा वाक्प्रयोग करतो, तेव्हा ‘प्रयत्न’ ह्या शब्दाद्वारा आपल्याला नक्की काय अभिप्रेत असते? ‘प्रयत्न’ म्हणजे एखादी नसलेली गोष्ट मिळविण्यासाठी केलेली धडपड आता, ज्यावेळी आपण मानसिक परिवर्तनासंबंधीच्या प्रयत्नांबाबत बोलत असतो, त्यावेळी आपल्याला काय अभिप्रेत असते? ‘जे असावयास पाहिजे’ ते निर्माण करणे. अप्रिय वास्तवाचे रूपांतर करून प्रिय / आदर्श वास्तवात उतरविण्याची प्रक्रिया म्हणजे प्रयत्न.
अशा रीतीने प्रयत्न नावाच्या ह्या प्रक्रियेत तीन घटकांचा समावेश होतो अनिष्ट असे वर्तमान वास्तव, इष्ट असा भविष्यात गाठायचा आदर्श, आणि ह्या दोन टोकांमध्ये, वर्तमानाकडून भविष्याकडे, होणारे क्रमशः मार्गक्रमण. हे मार्गक्रमण ‘शनैः शनैः ढाळे ढाळे । केतुलेनि एके वेळे ।” होत असते अशी त्यामागील श्रद्धा. मला बदलायचे तर आहे, पण लगेच नव्हे, तर हळूहळू, पायरी पायरीने माझ्या चंचल मनाला निश्चल करण्याचा मी प्रयत्न करणार याचा अर्थ ‘आज’ तो प्रयत्न करून मी ‘उद्या’ निश्चल होणार. म्हणजे ‘आज’ मी चंचलच राहणार. आता गंमत अशी की ‘उद्या’ जेव्हा उगवतो तेव्हा तो ‘आज’ बनलेला असतो, आणि मी परत म्हणतो, “आज बदलण्याचा प्रयत्न करून उद्या मी बदलणार.’ आता प्रत्येक ‘उद्या’ उगवल्याबरोबर ‘आज’ बनलेला असल्यामुळे आणि त्या ‘आज’ला पुढचा एक ‘उद्या’ असल्यामुळे खरे पाहाता आपल्या जीवनात अगणित ‘आज’ एकामागोमाग सरकत असतात, ‘उद्या’ ही केवळ कवि-कल्पना असून ती कधीच वास्तवात येत नसते. ‘उद्या’ला शिवण्याचा प्रयत्न क्षितिजाला शिवण्याच्या प्रयत्नासारखाच असफल ठरणार. कितीही पायपीट केली तरी क्षितिज तुमच्यापासून जितके दूर होते तितके दूरच राहणार. त्याचप्रमाणे अहिंसेच्या आदर्शाला शिवण्याचा कितीही आटापिटा केला तरी तो आदर्श आधी जितका दूर होता तितका दूरच राहणार. म्हणजे आदर्श आपल्या जागी आणि आम्ही आमच्या जागी. अहिंसेचा आदर्श पुढे ठेवून त्याचे चिंतन करीत करीत आम्ही खुशाल आपली हिंसा वृत्ती शाबूत ठेवत असतो. अहिंसेचा आदर्श आपल्यापुढे ठेवणारा माणूस वास्तवात हिंसक असतो, कारण तो तसा नसेल तर त्याला अहिंसेच्या आदर्शाला कुरवाळत बसण्याचे कारणच नाही.
ज्याला खरोखर बदलायचे आहे, तो ‘बदलतो’, बदलण्याचा प्रयत्न’ नाही करीत. प्रयत्न म्हणजे बदलण्यास दिलेला छुपा नकार. लोक व्यवहारात होणारा ‘प्रयत्न’ या शब्दाचा वापर जर लक्षात घेतला तर काय आढळते? जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला टाकायची असते, ती करायची मनापासून इच्छा नसते, तेव्हा आपण म्हणतो, “प्रयत्न करीन.” म्हणजे प्रयत्न हा नकाराचाच एक शिष्टसंमत प्रकार होय. थोडक्यात सांगायचे तर प्रयत्न म्हणजे टाळाटाळ; प्रयत्न म्हणजे चालढकल प्रयत्न म्हणजे ढोंग.
वर्तमानात कष्ट करून भविष्यकाळात बदलू इच्छिणारी व्यक्ती कधीच बदलत नसते. परिवर्तन व्हायचेच असेल तर ते तत्काल होते, हळू-हळू नव्हे. मी हिंसावृत्तीने भरलेलो आहे ह्या वास्तवाचे यथार्थ अवलोकन जर घडले असेल, त्या वास्तवाचे यथार्थ आकलन जर झाले असेल, तर ते अवलोकन आणि ते आकलन आपोआपच त्या वास्तवाला नाहीसे करून टाकील; त्यासाठी अहिंसेच्या आदर्शाची गरज भासणार नाही. परिवर्तन हे कर्मावर अवलंबून नसून अवलोकनावर अवलंबून असते. त्यामुळे प्रयत्नरूप कर्माचा परिवर्तनाशी अजिबात संबंध नाही. पण आम्हाला सतत काही ना काही करीत राहण्याची इतकी सवय जडलेली आहे की स्वस्थ बसून निरीक्षण करणे आम्हाला अत्यंत अवघड होऊन बसले आहे. प्रकाशाचा झोत पडताच अंधार तत्काल नाहीसा होतो- हळूहळू, क्रमाक्रमाने नव्हे. त्याचप्रमाणे अवधानाचा झोत पडताच मनाच्या साऱ्या मर्कटचेष्टांचा तत्काल लोप होतो.
(टीप: प्रस्तुत लेखाच्या प्रेरणेसाठी गौतम बुद्ध आणि जे. कृष्णमूर्ती यांचा लेखक ऋणी आहे.)
लेखक-बेळगावस्थित राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते.तूर्त कृष्णमूर्ती फौंडेशन बनारसशी संलग्र संशोधक आहेत.