प्रिय वाचक,
मागील एका संपादकीय संवादात (गड्या, तू बोलत का नाही?) आम्ही वाचकांना बोलण्याचे आवाहन केले होते. थेट त्याला स्मरून बहुधा, आमच्याकडे काही पत्रे आली आहेत. ह्या अंकातील पत्रांत त्यांतली दोन आहेत. कदाचित् त्याच वळणाने असेल आमच्या एका हितचिंतक वाचकाने एका पत्रात आमच्या पुष्कळ चुका दाखवल्या आहेत. त्याने म्हटले आहे की “जून-जुलै पासून आ. सु.त शुद्धलेखनाच्या, शब्दरचनेच्या तसेच वाक्य- रचनेच्या चुका ठळकपणे जाणवत आहेत.” त्यांची काही उदाहरणे दिली आहेत. त्यातले काना-मात्रेचे किरकोळ, ज्यांच्यामुळे अर्थहानी किंवा अर्थविपर्यास न झाला तरी तांत्रिक अर्थानि ते सदोष मुद्रण झाले त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. क्रिकेटच्या खेळासारखे आमचे कामही एक सांघिक निर्मिती आहे. कोठे कोणाचे जराही दुर्लक्ष झाले तर त्याचा ओरखडा उमटतोच..
आ.सु.च्या वाचकाचा, मग तो वर्गणीदार नसेना का, आमच्याशी मतभेदाचा, आमच्या चुका दाखवण्याचा आणि आमच्यावर प्रसंगी रागावण्याचाही अधिकार आहे असे भी मानतो. मात्र,
अगा जें घडलेच नाही ।
तयाची वार्ता पुसशी काई ?
अशातला प्रकार होऊ नये एवढीच विनंती आहे. आता हेच पाहा ना, उत्साहाने आमच्या चुका दाखवणाऱ्या पत्रकत्याने ‘स्वीकरणीय’ हा आमचा शब्दप्रयोग चूक ठरविला आहे. त्या ऐवजी ‘स्वीकारणीय’ असा साधुशब्द त्याने दिला आहे. तसेच ‘संगृहीत’ चूक देऊन ‘संग्रहित’ हा शुद्ध शब्द हवा असा समुपदेश केला आहे. आम्ही नम्रपणे सुचवू छतो की आम्ही वापरलेले दोन्ही शब्दप्रयोग शुद्ध आहेत. जिज्ञासू वाचकांप्रमाणे पत्रलेखकानेही The Practical Sanskrit-English Dictionary हा वामन शिवराम आपटे ह्यांचा सर्वमान्य कोश पाहावा. (प्रथमावृत्ती – पृ. 1079 – संग्रहीत (i) Gath- fred, collected stored…! पृ. 1163 स्वीकरणीय, (i) Taking accepting (ii) Assenting. agreccing…) ह्यात गमतीची गोष्ट अशी की चुका दाखवण्याच्या भरात पालेखकाने ‘जून’, ‘मूळ’, ‘श्रीयुत’ हे शब्द ‘जुन’, ‘मुळ’, ‘श्रीयूत’ असे लिहिले आहेत.
ह्या अंकात छापलेल्या आलोचक पत्रात संपादकीय कृती आणि नीतीबद्दल चिमटे घेतले आहेत. पण हे करताना आलोचकाने आपले तोंड बुरख्याआड लपविले आहे. बंगळूरच्या ह्या मायावी के. ब्रह्मकुमारीला 8 सप्टेंबर हा “जागतिक रेबीज दिन” होता है माहीत नसावे. श्वानदंशाच्या दरसाल 50 हजार केसेस होतात त्यातल्या 20 हजार भारतातील असतात. (पाहा. Indian Express, पुणे दि. 8 सप्टेंबर ’07) लुई पाश्चरने श्वानदंश प्रतिबंधक लस शोधून मानवजातीवर केवढे उपकार केले आहेत. (त्याचे निधन सप्टेंबर 1895 मध्ये झाले.) ते लक्षात घेतले तर आ. सु.च्या सप्टेंबर अंकातील पाश्चरपुराण सुसह्य वाटेल. गेली काही वर्षे बालवाचकांना जसे हॅरी पॉटरने वेड लावले होते आहे, त्याच कोटीची युवक-युवती आणि प्रौढ वाचकांनाही ‘डा व्हिन्ची कोड’ ह्या कादंबरीने भुरळ घातली होती आहे. सुशिक्षित घरी हे पुस्तक टेबलवर दिसे. त्याच्यावर चित्रपटही निघाला आहे. लिओनार्डो डा विंची केवळ चित्रकार नसून केवढा क्रियावान पंडित आणि द्रष्टा वैज्ञानिक होता ह्याची माहिती श्री यशवन्त ब्रह्म ह्यांनी दिली आहे. ह्याबद्दल, त्यांच्या परिश्रमाबद्दल आणि औचित्याबद्दल आमच्याप्रमाणेच वाचकांनीही (त्यात के. ब्रह्मकुमारी आल्या,) आभार मानले पाहिजेत.
कुमार काटे ह्यांच्या नावावर सुमार बेसुमार काटे अशी कोटी करून के. ब्रह्मकुमारींनी त्यांच्या लिखाणाबद्दल टोमणे मारले आहेत. आ. सु.च्या अनेक वाचकांना हे ठाऊक नसेल की 1853 पासून 1956 पर्यंत – शंभरवर्षांहून अधिक काळ नागपूर- मध्यप्रान्त (प्रदेश) व वऱ्हाड ह्या हिंदी-मराठी मुलुखाची राजधानी होती. पुढेही मुंबई- महाराष्ट्रात न जाता नागपूर मध्यप्रदेशात राहते तर त्यात जी मराठी प्रतिष्ठा आणि ग्रांथिक प्रामाण्य पावली असती तिचा नमुना श्री कुमार काटे ह्यांच्या लिखाणात दिसतो. ते सुमारे 5 वर्षे मध्यप्रदेशात व केंद्रात परिभाषा निर्मितिकार्यात होते. त्यांचे लिखाण हिंदी-संस्कृत प्राचुर्याने प्रभावित व दुर्बोध होते, ते सरळ-सुबोध मराठीत पुनर्लेखन करून आणता आले नसते असे नाही परंतु एक वेगळा नमुना म्हणून तसेच राखले आहे. त्यांची शैली एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिणाऱ्यासारखी एकाच वेळी उघड आणि स्वगत विषय मांडणी करीत जाते. म्हणून लेखनात एवढे कंस प्राचुर्य येते. राष्ट्रपति-निवडणुकीची वाकडी वाटचाल ह्या लेखमालेत बरीचशी रम्य व उद्बोधक माहिती आली आहे. डॉ. राधाकृष्ण ह्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून असलेली आपली प्रतिष्ठा पणाला लावून, बनारस हिंदू विद्यापीठावर येऊ घातलेले ब्रिटिश सरकारचे अरिष्ट कसे टाळले हे आणि आन्ध्रप्रदेशाच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेली शिष्टाई सर्व संबंधितांना कशी लाभदायक ठरली हे अर्थात् सहन करावे लागते. आमच्याप्रमाणेच अनेकांना ह्या लेखानेच कळले असेल. श्री. काटे ह्यांची शैली आत्मनेपदी जास्त आहे हे मान्य.
आ.सु.त एरवी आले नसते असे काही लेखन ह्या अंकात आहे. आगरकरांनी 1888 साली सुधारकाच्या पहिल्या अंकात सुधारक काढण्याचा हेतू सांगून त्यात कोणकोणते विषय येतील हे सांगितले. तसेच ह्यात स्त्री-लेखकांसाठी काही पाने राखून ठेवली जातील असे म्हटले आहे. हेतू हा की स्त्रियांना लिहिते करावे. आज सव्वाशे वर्षांनी सुद्धा सुधारकात स्त्री लेखिकांचा सहभाग नाममात्रच आहे. समाजाला स्त्री-शूद्र, दलित-वंचित ह्यांच्या दुःस्थितीबद्दल जागरूक करायचे तर त्या त्या वर्गातल्या सोसलेल्या बोलत्या मंडळींना लिहिते केले पाहिजे. लिखाणाची मांडणी शास्त्रीय नाही किंवा पुरेशी तात्त्विक नाही असा बाऊ न करता सामाजिक-समाजगटातील व्यथा-व्याधींना मोकळी वाट करून देऊन विचारी वाचकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले पाहिजे. ह्या कथनात रंजनापेक्षा चिंतनाला वाव असला म्हणजे पुरे.
ह्या दृष्टीने सुहासिनीची सत्त्वपरीक्षा काय किंवा उतरणीवरील आयुष्य काय- ह्या लेखनाकडे पाहावे.
एखाद्या नियतकालिकातील सगळेच लिखाण सगळ्याच वाचकांना आवडेल असे समजता येत नाही. यद् रोचते तद् ग्राह्यम्, यत् न रोचते तत् त्याज्यम् । (रुचते ते घ्यावे, नको ते टाकावे) हा न्याय आहे. इति शम्।
कळावे लोभ असावा हे विनंती.
आपला
प्र.ब. कुळकर्णी