ज्योतिबा फुल्यांनी ‘सार्वजनिक सत्य’ नावाचा सुंदर विचार सांगितला आहे. देवाची आराधना करून एका माणसाने मोक्ष किंवा स्वर्ग मिळवण्याला अर्थ नाही. त्यातून देवाचेही मोठेपण सिद्ध होत नाही आणि त्या माणसाचेही नाही. परंतु जेव्हा सार्वजनिक सुखासाठी प्रयत्न होतो त्या वेळीच त्या आराधनेला किंमत असते, गावची जत्रा जशी साऱ्या गावाला सुख देऊन जाते त्याचप्रमाणे गावची विहीर सर्वांना पाणी देऊन गेली पाहिजे. एका माणसाला उत्तम वैद्यकीय मदतीची सोय असावी, पैशाच्या बळावर त्याला धन्वंतरी विकत घेता यावा आणि उरल्या गावाने औषधावाचून तडफडावे ही लोकशाहीची रीत नाही. रयतेच्या पोरांना मुन्शिपालटीची काळोखी शाळा आणि व्यक्तिगत श्रीमंतीच्या बळावर दोघाचौघांच्या पोरांसाठी अद्ययावत ज्ञानसाधनांनी युक्त अशी विद्यालये ही समाजाला सार्वजनिक बौद्धिक श्रीमंत न देता पुन्हा एकदा सत्तेच्या नव्या सोयी करून देणारा नवा ब्राह्मणच निर्माण करतील. एकाच लोकशाहीत पुन्हा एकदा बडे लोक आणि छोटे लोक असे घटक तयार होतील.
[मंत्र- पु. ल. देशपांडे, पृ. 82]