मर्मभेद हा ज्येष्ठ तत्त्वज्ञ प्रा. मे.पुं.रेगे ह्यांनी लिहिलेल्या टीकालेखांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. संपादक आहेत प्रसिद्ध साहित्यिक एस्.डी.इनामदार. ह्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या लेखकांनी, तज्ज्ञांनी तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र आणि धर्म इ. विषयांवर लिहिलेल्या पुस्तकांचे, लेखांचे रेगे सरांनी केलेले परीक्षण, त्याला काही लेखकांनी दिलेली उत्तरे तसेच रेगे सरांनी केलेला खुलासा समाविष्ट आहे. रेगे सरांचे लेख प्रामुख्याने नवभारत या वैचारिक मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. १९६२ ते १९९९ असा सदतीस वर्षांचा हा कालखंड आहे.
ज्या ज्या वेळी हे लेख प्रसिद्ध झाले त्या त्या वेळी टीकेचा विषय झालेल्या काही ग्रंथकारांनी आणि लेखकांनी त्याला उत्तरेही दिलीत. [उदा. डॉ.ग.ना. जोशी ह्यांनी महाराष्ट्र टाइम्स, १० एप्रिल १९७९ व प्रा. वीणा गजेंद्रगडकर यांनी अभिरुची, एप्रिल १९७९] अपवाद फक्त प्रा. कुरुंदकरांचा. त्यांच्या रूपवेध या सौंदर्यशास्त्रावरील पुस्तकाचा रेगे सरांनी जो समाचार घेतला त्याला प्रा. कुरुंदकरांनी उत्तर दिलेले नाही. परंतु आज प्रा. कुरुंदकर हयात असते तर ते पंच्याहत्तर वर्षांचे असते व ह्या अमृतमहोत्सवानिमित्त साधना (१४ जुलै २००७) मध्ये एक टिपण प्रसिद्ध झाले आहे. त्यात प्रा. कुरुंदकरांनी रूपवेध च्या प्रकाशकांना १९६८ साली लिहिलेल्या पत्राचा अंश छापला आहे. तो असाः
“परीक्षण वाचले आणि डोक्यावरचे ओझे उतरले. मी ज्या परीक्षणाला भीत होतो, ते हे नव्हे. मी माझ्या प्रतिपादनाच्या मार्मिक खंडनाला भीत होतो. तसे परीक्षणात काहीच नाही. पूर्वी उपेक्षा करून मारण्याचा प्रयत्न झाला. मी शिल्लक आहे. आता आक्रस्ताळीपणा, उपहास करण्याचा प्रयत्न आहे. याने मी मरणार नाही. माझे मरण मला निरुत्तर करणाऱ्या खंडनात आहे. जे मला पुरावा व तर्क यांनी खोडून काढता येत नाही, ते मी हट्ट न करता निमूटपणे स्वीकारतो. म्हणून कुणी मला निरुत्तर करणारे खंडन केले की, मी माझी मते सोडून त्याची मते स्वीकारीन. ते माझे खरे मरण आहे. त्या मरणाची मला भीती आहे. व त्या मरणाचे आकर्षणही आहे. तेव्हा मी नामशेष होईन व कृतार्थही होईन. त्या क्षणाची मी वाट पाहात होतो. रेगे यांनी माझी निराशा केली.” (पृ.६)
याचा प्रतिवाद रेगे सरांची कन्या ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. रूपा रेगे-नित्सुरे ह्यांनी केला व साधना च्या संपादकांनीही दुबळा खुलासा केला. हे सर्व लिखाण अंक १९, ४ ऑगस्ट २००७, पृष्ठ क्रमांक २८-२९ वर प्रसिद्ध झाले आहे. (मला स्वतःला साधना च्या संपादकांनी आज त्या पत्राचा अंश छापणे अप्रस्तुत वाटले.)
मर्मभेद मधील सर्वच पूर्वप्रसिद्ध लेख, संबंधित लेखकांच्या प्रतिक्रिया, त्यावरील खुलासे आज पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचे प्रयोजन काय? हा प्रश्न वाचकांच्या मनात येऊ शकतो. त्याचा खुलासा आपल्याला संपादकीयातून मिळतो. या सर्वच टीकालेखांमधून रेगे सरांनी धर्म, तत्त्वज्ञान ह्याविषयी काही मूलभूत चिंतन, मौलिक भाष्य केले आहे. तत्त्वज्ञानात्मक मराठी लिखाणाच्या सद्यःस्थितीविषयी चिंता, परीक्षणाच्या अनुषंगाने उपस्थित केलेले शैक्षणिक, सामाजिक महत्त्वाचे प्रश्न, उच्चशिक्षणाच्या खालावलेल्या दर्जाविषयीचे प्रश्न ह्या विषयीचे रेगे सरांचे विचार आजही अधोरेखित होणे हे आवश्यक आहे. संपादकांच्या शब्दांत, “आपल्या बौद्धिक, वैचारिक विश्वातले वातावरण दिवसेदिवस जास्तच भ्रष्ट व गढूळ होत चालले आहे हह्न त्यावर सर्वांनीच अंतर्मुख होऊन गांभीर्याने व तळमळीने विचार करण्याची गरज, खरे तर आज जास्तच निकडीने जाणवू लागली आहे.” (पृ.२४)
प्रस्तुत लेखात रेगे सरांनी केलेल्या ‘परीक्षणांचे परीक्षण’ करण्याचा माझा हेतू नाही. माझी तेवढी बौद्धिक कुवत नाही आणि अधिकारही नाही. (‘परीक्षणांचे परीक्षण’ व्हायला हवे होते ही रेगे सरांची इच्छा मात्र होती. ह्या परीक्षणांमधून त्यांनी उपस्थित केलेल्या तत्त्वज्ञानात्मक मुद्द्यांचे परीक्षण झाले नाही ही खंत त्यांना होती.) तसेच मर्मभेद मध्ये समाविष्ट केलेल्या सर्वच लेखांविषयीही मला लिहावयाचे नाही. तत्त्वज्ञान विषयाशी संबंधित ग्रंथांवरील परीक्षणांच्या अनुषंगाने रेगे सरांनी केलेल्या चिंतनाविषयीच मी लिहिणार आहे. खरे तर पाटणकर सर म्हणतात त्याप्रमाणे (पृ.२४५) या ठिकाणी तत्त्वज्ञान हा विषय केवळ उदाहरणादाखल आहे. तत्त्वज्ञानाविषयीच्या ज्या विदारक परिस्थितीचे विवेचन रेगे सरांनी केले ते समाजविज्ञानशाखेतील सर्वच विषयांच्या बाबतीत थोड्याफार फरकाने सत्य आहे.
या ठिकाणी एक गोष्ट खेदाने नमूद करावीशी वाटते की ज्या, डॉ. ग. ना. जोशी लिखित पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास ह्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे (एकूण पृष्ठ संख्या २०१९) रेगे सरांनी आपली ‘व्यावसायिक जबाबदारी’ समजून, परीक्षण करून त्यातील ‘भोंगळपणा’ साधार दाखवून दिला तोच ग्रंथ आज महाराष्ट्रातील तत्त्वज्ञान ह्या विषयाचे विद्यार्थी वाचतात आणि अभ्यास (?) करतात. तीच गोष्ट तर्करेखा-भाग २ विषयीही सत्य आहे. आजही ह्यांचा समावेश काही विद्यापीठांच्या पाठ्यपुस्तकांच्या यादीत आहे.
आज विद्यापीठस्तरावर देखील मराठी माध्यमाचा स्वीकार काही विद्यापीठांतून केलेला आढळतो. त्यामुळे त्या त्या विषयांचे मराठीतून साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही जाणकार व्यक्तींची आहे. रेगे सर आणि प्रा. दि.य.देशपांडे ह्यांनी हयातभर एक व्रत म्हणून मराठीतून चोख तत्त्वज्ञानात्मक लिखाण केले. हे लिखाण ‘क्लिष्ट, प्रसंगी दुर्बोध’ आणि कठीण वाटते. तसे ते आहेही. परंतु हा लेखकांचा दोष नाही. त्याचे कारण हे आहे की तत्त्वज्ञानात्मक मराठी भाषा रुळलेली, वाचकांच्या सरावाची बनलेली नाही. मराठीतून प्रसिद्ध होणारे लिखाण जर भाषांतरस्वरूपाचे असेल तर इंग्रजीतील अनेक पारिभाषिक शब्दांना, उदा. ‘इम्प्लिकेशन (implication)’, ‘एन्टेलमेंट (entailment)’, ‘फॉर्मल (formal)’, ‘कॅटेगोरिकल (categorical)’, इ. साठी मराठी शब्द बनवावे लागतात. त्यामुळे अशा अपरिचित मराठी शब्दांची बनलेली तत्त्वज्ञानात्मक मराठी भाषा बरेचदा ‘प्रथमदर्शनीच विद्रुप’ दिसते.
परंतु ह्यावर उपाय आहे. सतत जर ह्या प्रकारच्या भाषेतून लिहिल्या गेलेल्या ग्रंथांचे अध्ययन केले तर सुरुवातीला कठीण, अनाकलनीय वाटणारे लिखाण हळूहळू समजायला लागेल. त्यासाठी कठीण वाचनाची सवय मात्र स्वतःला प्रयत्नपूर्वक लावून घ्यावी लागेल. ‘भाषेच्या ह्या स्वरूपाचा वापर समाजात स्थिर करायला हवा.’ आज ह्याच गोष्टीचा अभाव आहे. कठीण लिखाण परिश्रमपूर्वक समजून घेण्याची कुवत ना शिक्षकांमध्ये आहे ना विद्यार्थ्यांमध्ये.
या ठिकाणी एक गमतीदार अनुभव नोंदवावासा वाटतो. विदर्भात तत्त्वज्ञानात्मक मराठी परिभाषा घडविण्याचे काम प्रखर विवेकवादी थोर तत्त्वज्ञ प्रा.दि.य.देशपांडे ह्यांनी केले. पश्चिम महाराष्ट्रात रेगे सरांनी हे काम केले तसेच अन्य काही अभ्यासकांनीही केले. अनुभव असा येतो की पश्चिम महाराष्ट्रातले पुढच्या पिढीचे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, विद्यार्थी प्रा. दि.य.देशपांडे ह्यांनी घडविलेले पारिभाषिक शब्द तसेच रेगे सरांनीही घडविलेले पारिभाषिक शब्द वापरण्याचे जाणीवपूर्वक टाळतात. मला ह्या दुराग्रहाचे आश्चर्य वाटते.]
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा रेगे सर ह्या संदर्भात नोंदवतात. तो असा की एका विशिष्ट पातळीवरील बौद्धिक व्यवहाराचे माध्यम म्हणून मराठीचा वापर होत नाही, अन्य कोणत्या भाषेचा, उदा. इंग्रजीचा होतो असेही नाही. आपण या बौद्धिक व्यवहारापासून अलिप्त, त्याच्याविषयी प्रचंड उदासीन आहोत.
“शिक्षणव्यवस्थेचा केंद्रीभूत घटक’ असणाऱ्या शिक्षकाचे आजचे स्वरूप काय आहे? तो ‘फक्त परीक्षार्थी असल्यामुळे नोकरीला लागल्याबरोबर त्याने पाठ्यपुस्तके शिकवायला सुरुवात केली, तर त्यात नवल नाही. परीक्षार्थी दशेत ज्यांनी कधी पोटतिडिकीने अभ्यास, चर्चा इत्यादी केले नाही, ते प्राध्यापक झाल्यावर त्यांपैकी काही करतील हे संभवत नाही.’ (पृ.२४६) परीक्षार्थी विद्यार्थी आणि त्यांच्यातून पुढे निर्माण झालेले पोटार्थी प्राध्यापक ह्यांच्या तावडीत तत्त्वज्ञान हा विषय सापडलेला आहे.’ (पृ.८२)
ह्या परिस्थितीतून मार्ग कसा काढावा? रेगे सर, पाटणकर सर आणि प्रा. स. ह. देशपांडे ह्यांनी काही उपाय सुचविले आहेत. आपण ठरविले तर ते नक्कीच आचरणात आणू शकतो.
एक म्हणजे प्राध्यापकांना नियमाने एकत्र आणणे, आपल्या व्यावसायिक कामाचे स्वरूप, त्याची पद्धती ह्या विषयावर चर्चासत्र आयोजित करणे. तसेच आपण एका महत्त्वाच्या सामाजिक कार्यात गुंतलेले आहोत ही त्यांची जाणीव, त्यांची सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि व्यावसायिक स्वाभिमान जागृत ठेवणे. (पृ.२४६)
व्यावसायिक जबाबदारीचा भाग म्हणून एखादा ग्रंथ जर टाकाऊ असेल आणि त्या ग्रंथाची प्रसिद्धी आणि उपयोग यांना जर महत्त्वाचा सामाजिक संदर्भ असेल तर स्पष्टपणे मतप्रदर्शन करणे हे आपले कर्तव्य आहे. ‘सुरळीत मानवी संबंध’ टिकविण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी ते न करणे ही विषयाशी तसेच व्यवसायाशी प्रतारणा होईल.
शिक्षकांचे मूल्यमापन सतत होत राहिले पाहिजे, व ह्या प्रक्रियेत स्वतःचेच कठोर परीक्षण करून त्याने सहभागी व्हायला पाहिजे. पदव्या, परीक्षेत मिळविलेला वर्ग ह्याचा त्या विषयाच्या ज्ञानाशी काहीच संबंध आज दुर्दैवाने आढळत नाही. कागदोपत्री पुरावा व प्रत्यक्ष विद्वत्ता ह्यांच्यात कसलेच नाते दिसत नाही.
शिकविणारा शिक्षकच पेपर काढतो, तोच तपासतो. मग काय आपला हात जगन्नाथ! स्वतःचे वर्गात न शिकविणे ह्याची भरपाई विद्यार्थ्यांना गुणांची खैरात वाटून करायची. विद्यार्थी गुणांना भाळलेला! हा शिक्षकही विद्यार्थिप्रिय असतो. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असा सर्व मामला. म्हणूनच शिक्षकांचे मूल्यमापन वरचेवर होणे अतिशय आवश्यक आहे.
आणखी एक मार्ग म्हणजे चांगल्या लेखकांनी पुढे येऊन मराठीतून ग्रंथरचना करणे आवश्यक आहे. चांगल्या लेखकांनी लेखनाचे कार्य केले नाही, तर निकृष्ट दर्जाची पुस्तके विपुल प्रमाणावर निर्माण होतील व या भाऊगर्दीत एकटी दुकटी अशी चांगल्या दर्जाची पुस्तके मागे पडतील.
रेगे सर, प्रा. दि.य.देशपांडे ह्यांनी तत्त्वज्ञानविषयक काही ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. विद्यापीठातील माध्यम मराठी होईल तेव्हा विद्यार्थ्यांसाठी सकस तत्त्वज्ञानात्मक लिखाण उपलब्ध करून देणे ही एक जबाबदारी मानून सामाजिक भान म्हणून त्यांनी काही अभिजात मराठी ग्रंथांचा अनुवाद केला, स्वतंत्र ग्रंथनिर्मितीही केली. परंतु त्या ग्रंथांचे वाचन करणारे ‘काही’च आहेत. बाकी सगळे एकतर सुमार दर्जाची मराठी, हिंदी पुस्तके वाचतात. तर इंग्रजी पुस्तकाला चुकूनही स्पर्श करीत नाही. दि.य., रेगे कठीण वाटतात! त्यामुळे चांगल्या लेखकांनी ग्रंथनिर्मिती केली पाहिजे ह्या म्हणण्यात तथ्य असले तरी सुमार ग्रंथांना जर पाठ्यपुस्तकाचा दर्जा दिला, त्यांचीच शिफारस शिक्षकांनी वर्गात केली तर त्यावर पोसलेले विद्यार्थी जेव्हा शिक्षक व परीक्षक होतील तेव्हा ते स्ट्रॉसन, कोपी वगैरे या विषयातील अधिकारी प्रतिष्ठितांना बी.ए.ची परीक्षासुद्धा उत्तीर्ण होऊ देणार नाहीत. त्यांच्या ग्रंथांना न्याय देणे तर दूरच. (पृ. २४४)
शेवटी, मी माझ्या विषयाशी अप्रामाणिक राहणार नाही हे बंधन जोपर्यंत प्रत्येकजण स्वतःच स्वतःवर लादून घेणार नाही तोपर्यंत सर्वत्र पसरलेला दाट बौद्धिक अंधार दूर होणार नाही.
मी आशावादी आहे.
कर्मयोग, धनतोली, नागपूर-१२