सप्टेंबरच्या अंकापासून सुरू झालेला हा अहवाल तीन भागांत तीन वैशिष्ट्यांवर भर देणारा आहे. ‘वाकडी वाट’, ‘बाबूजी’ व ‘बीबीजी’ हे त्यांतले ३ कोन आहेत. मागील लेखांकांत ‘बाबूजी’ व ‘इंडिया टुडे’ने शीर्षस्थ मानलेले दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रपती अर्थात् ‘डॉ. स. राधाकृष्ण यांच्याबद्दल विस्ताराने लिहिले.
आता या दुसऱ्या भागात ‘वेडी’, ‘वाकडी’, ‘तिरकी’ वाटचाल कशी याचा ऊहापोह करू. त्याचबरोबर १२ वे व १३ वे (व्या) राष्ट्रपतींचा विचार पुढच्या लेखांकासाठी राखून चवथ्याच (व्यक्तिशः पांचव्या) चालीमध्ये वाकुडपणा कसा आला ते बघू.
तत्पूर्वी आणखी एका सूक्ष्म तिरपिटीकडे पाहणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधानपदावर स्वर्गीय (सदाचारी!) गुलजारीलाल नंदा १९६४ व १९६६ मध्ये अल्पकाळ (अत्यल्पकाळ) पदस्थित झाले होते, त्याचप्रमाणे राष्ट्रपतिपदीदेखील मे-जुलै १९६९ आणि फेब्रुवारी-जुलै ७७ या सुमारे ११ महिने कालावधीत हंगामी, तात्पुरते, कामचलाऊ किंवा ‘कार्यवाहक’ असे तीन महापुरुष पदस्थ करण्यात आले. त्यांतील पहिले श्री वराहगिरी वेंकटगिरी ६७-६८ या कार्यकाळात उपराष्ट्रपती होतेच. ६९ मध्ये तीन मासार्थ ते राष्ट्रपती बनले. आणि पुढे मात्र रीतसर निर्वाचन होऊन ते ६९ ते ७४ राष्ट्रपती बनून राहिले. (याचविषयी पुढे आणखी गंमत पाहू!)
दुसरे हंगामी राष्ट्रपती राजकारणी, नोकरशहा, समाजकर्ता वगैरे कोणीही नसून १९६८ ते १९७० या सुमारे ३ वर्षांत ‘मुख्य न्यायमूर्ती’ म्हणून विराजमान होते. जुना मध्यप्रांत वहाड, नंतरचा नागपुरस्थ मध्यप्रदेश आणि पुढे भोपाळस्थित मध्यप्रदेश या तीन्हींचे भूषणभूत असे मुख्य न्यायमूर्ती महामहिम मुहम्मद हिदायतुल्ला हे त्यांचे नाव. ते जुलै-ऑगस्ट १९६९ मध्ये राष्ट्रपती राहिले. पण कदाचित राजकीय पाठिंबा-पृष्ठभूमि नसल्यामुळे किंवा अगदी आधीचे राष्ट्रपती, महामहिम मरहूम ज़ाकिर हुसैन मुस्लिम असल्यामुळे त्यांच्या नावाला काट मिळाला असेल.
‘खऱ्या’ वेड्यावाकड्या चालीचे शिकार झालेले बिचारे कर्नाटकातील मवाळ पुढारी कै. बसप्पा दासप्पा जत्ती हे मात्र ७४-७९ पूर्णवेळ उपराष्ट्रपतिपदी सुरळीत राहूनही हंगामी राष्ट्रपती म्हणून ७७ मध्ये वर्षार्धच राष्ट्रपतिपद भोगू शकले!
आता नाइलाजाने जगभरात विख्यात गेल्या शतकाच्या उत्तरार्धातील अत्यंत प्रभावी भारतीय महिला-नेत्रीच्या कुटिल चालीकडे वळणे भाग आहे. १९६६ मध्ये कै. शास्त्रींचे कलेवर ताश्कंद, उझबेकिस्तानहून परत आल्यानंतर त्यावेळच्या भारतीय राष्ट्रीय महासभा (इंडियन नॅशनल काँग्रेस) ज्या मुखंडांनी ‘गूंगी गुडिया’ म्हणून इंदिरा प्रियदर्शिनी नेहरू गांधींना प्रधानमंत्रिपदी विराजमान केले, त्यांनाच भुईसपाट करून इन मीन साडेतीन वर्षांत आपला अलौकिक धाक जमवणाऱ्या धाडसी प्रधानमंत्रिणीने, (इंडिया टुडे ने म्हटल्याप्रमाणे ‘सिंडिकेट के खिलाफ इंदिरा गांधी की पसंद) पहिले मुस्लिम राष्ट्रपति ‘६७ मध्ये रोवले!
मागच्या अंकात म्हटल्याप्रमाणे अचानक पैगंबरवासी झालेल्या प्रेसिडेन्टच्या जागी कोणाला आणायचे याचे मनसुबे, शहकाटशह चालू झाले. ६९ मध्येच इंदिराजींनी गृह-व वित्तमंत्र्यांना डावलून सर्व (माजी) संस्थानिकांची तनखेबंदी आणि सर्व (१४+७) खाजगी अधिकोष म्हणजे बँकांचे राष्ट्रीयकरण करून स्वतंत्र बाण्याची चुणूक दाखवलीच होती. आता या अटीतटीच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या खेळीत त्यांची अत्यंत तिरकस चाल अभ्यसनीय आहे.
१९६९ मध्ये अनिवार्य झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी नेहमीच्या निवडप्रक्रियेत पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी आंध्रातील प्रसिद्ध पुढारी नीलम संजीव रेड्डी यांना मुक्रर केले. संविधान, प्रतिनिधित्व कायदा, संसदीय पद्धत इत्यादी सर्व टप्प्यांतून रेड्डींचे नाव दाखल झाले. मधल्या काळात ‘स्ट्रे थॉट्स् या त्रोटक शीर्षकाने शासिकेने आपल्याच पक्षामध्ये फूट पाडायला सुरुवात केली, त्याची परिणती याच निवडणुकीत झाली. थोडक्यात प्रधानमंत्रीण बाईंनी अगदी अचानक पूर्वी उपराष्ट्रपती राहिलेले आंध्रातलेच श्रमिक नेते श्री. गिरी ह्यांना उमेदवारी देवविली!! ज्याप्रमाणे सध्या एका शेखावतशी दुसरी शेखावत लढवण्यात आली! इंडिया टुडे ने ठीकच लिहिले आहे की ‘अंतरात्मा के वोट के लिए इंदिराजी की अपील के कारण जीते!’ मूल्यमापनांत इंडिया टुडे ने गिरिगारूंना ११ पैकी शेवटून दुसरा(?) दर्जा दिला आहे. रास्तच आहे!
पदोन्नतीने न आलेले, पण प्रादेशिक (व पांथिक) खासियतीमुळे इंदिराजींचे दुसरे (व जास्त) लाडके मरहूम फखुद्दिन अली अहमद ‘मुहर लगाने की कला’ या गुणाने आणि इमर्जंसी का आदेश मंत्रिमंडल की मंजूरी बगैर जारी किया’ या कृतीने अल्ला की ‘गाज’ गिरण्यापूर्वी ३ वर्षे विराजले. अंतिम दर्जा.
उर्वरित राष्ट्रपती मालिकेतील पदोन्नत होऊन न आलेले म्हणजे ६९ च्या यादवीत मुद्दाम पाडण्यात आलेले आंध्रराज्यात आणि लोकसभा अध्यक्षतेत कर्तबगारी दाखवणारे श्री नीलम संजीव रेड्डी हे आणीबाणी उठताच (कडबोळे) जनता पक्ष, कै. मुरारजी इत्यादींच्या पुढाकाराने राष्ट्रपती झाले. त्यांना शेवटून तिसरे स्थान देत इंडिया टुडे म्हणतो ‘सिंडिकेट के प्रतिनिधि श्री. जगजीवनराम को देश का प्रथम दलित प्रधानमंत्री बनने से रोका।
जर बाबू जगजीवनराम पंतप्रधान होते तर मायावतीची ‘चालू’ माया तेव्हाच लागू होती! असेच आणखी एक ‘अपदोन्नत’ पण पंजाब-प्रांत-प्रभावी ‘ग्यानी झैल सिंह’ यांचाही कार्यकाळ फारच वादग्रस्त राहिला. ‘इंदिरा के वफ़ादार पर अंततः बेटे के खिलाफ’ असा निष्कर्ष इंडिया टुडे ने काढला आहे.
त्यांच्याच काळात सुवर्णमंदिराचा सैनिक कब्जा, इंदिराजींचा भयंकर खून, राजीवची आधी अडखळत, मग उदारमनस्क, श्रीलंकेत धोकादायक आणि अखेर (व्यंकटरामन कारकीर्दीत) हत्या. या नृशंस गोष्टी घडल्या. नई पहल व कद या कसोट्यांवर एकमात्र सरदार राष्ट्रपती पांचवे आले.
चालू लेखांत सातांपैकी उरलेले ३ हे खालून वर तर आलेले आहेतच, पण एका अर्थाने ‘करीयर लीडर’, करीयर डिप्लोमॅट किंवा स्टेट्स्मन् म्हणण्यासारखे आहेत. श्री आर. व्यंकटरामन् यांचे माय प्रेसिडेंशिअल ईयर्स’ हे पुस्तक लक्षणीय ब्राह्मण असल्यामुळे त्यांना तेथे मुख्यमंत्री होणे शक्य नव्हते आणि त्यांनी ‘कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डर’ ने भयग्रस्त विप्रजमातीला उद्योगक्षेत्रात स्थिरावण्याचा मार्ग दाखवला. पुढे केंद्रांत वित्तमंत्री, उपराष्ट्रपती आणि अखेर ८७-९२ ते राष्ट्रपती राहिले. लेखा कार्यालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांशी स्नेहबंध (आमच्या कलाक्रीडा कार्यक्रमात हजेरी व आशिर्वाद आणि केंद्रशासनातही मनमिळाऊ व मदतगार असेच ते होते. (नागपूरच्या अपघातात अपंग झालेल्या डॉ. विजय गर्देसाठी विशेष जर्मन गाडी त्यांनी आयातशुल्काविना मंजूर केली). ‘भद्र प्रबंधक संवैधानिक विशेषज्ञ ‘असे लक्षण’ असूनही कार्यकाल में कुछ खास घटा नहीं’ असे म्हणताना इंडिया टुडे हे विसरतो की याच कारकीर्दीत राजीव गांधींवर २ विफल (श्रीलंका, राजघाट) व एक अंतिम (दुर्दैवाने घातक हल्ला झाला!
विदेशसेवेत ‘कुछ खास घटा न सकनेवाले श्री. के. आर. नारायणन् हे मुलकी स्पर्धापरीक्षेतून ‘आय. एफ्. एस्. मध्ये आलेले राजदूत होते. चीनमधला त्यांचा कार्यकाळ लक्षणीय होताह्नकदाचित इंडिया टुडे ने म्हटल्याप्रमाणे ‘वैचारिक झुकाव उदार वामपंथ की ओर’ यामुळे असेल! ‘पहिले दलित राष्ट्रपती’ म्हणून सर्वत्र गाजावाजा झाल्यावर (माझ्यामते) त्यांनी महाभारतातील कर्णाप्रमाणे ‘दैवायत्तं कुले जन्म, मदायत्तं हि पौरुषम्’ असे आपणहून जाहीरपणे म्हणायला पाहिजे होते!
एक छोटी आठवण, जवाहरलालचे चुलत बंधू ब्रिजकिशोर नेहरू यांनी जशी फार सुंदर हंगेरियन ‘फॉर्म्युना (नंतर शोभा)’ सहचारिणी निवडली, तशी यांची (चारचौघीसारखी) ब्राह्मी पत्नी! बरीचशी अबोल, प्रसंगी हंसतमुख आणि आत्मलोपी (selfeffacing) अशी होती (जगातील सर्वांत सुंदरनआणि दुर्दैवीह्नराजनेत्री ब्राह्मीच आहे).
या द्वादश अत्युच्च पदस्थांमध्ये मधले म्हणजे सहावे स्थान ज्यांना इंडिया टुडे ने दिले आहे ते ‘नियमों के पाबंद इंदिरा गांधी के वफ़ादार, फिर भी वाजपेयीजी को अल्पकाल के लिए शपथ दिलवायी’ असे डॉ. शंकरदयालजी शर्मा हे मला सर्वाधिक परिचित होते. ३०.१२.५५ ला प्रथम सहायक महालेखाकार पद सांभाळताच मधूनमधून मला भोपाळ ह्या लघु(क वर्ग) राज्याला भेट द्यावी लागे. माझे तत्रस्थ वरिष्ठ श्री मलकानी, वर्ध्याचे तपस्वी कै. बाबासाहेब परांजपे यांचे संस्कृतप्राध्यापक चिरंजीव डॉ. शरद आणि इतर लवाजम्यासह आम्ही शर्मा-दंपतीकडे जात असू. होता होता महाराष्ट्र-राज्यपाल, उपराष्ट्रपती व अखेर राष्ट्रपती अशी त्यांची कारकीर्द खूप जवळून पाहता आली. मध्यंतरी त्यांची देखणी कन्या व उमदा जावई यांची दुर्धर हत्याही झाली तरी ते खरे फिलॉसॉफर होते. कायद्याच्या सर्व पदव्यांत प्रथम स्थान (LLB, LLM, LLD) मिळवून ते कायदाही शिकवीत असत.
डॉ. शर्मांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या शपथविधीला निमंत्रित म्हणून गेलो असता मला त्यांनी राष्ट्रपती व्यंकटरामनजींशी तमिळ बोलताना ऐकले तेव्हा ते चक्रावलेच. ‘भई काटे, हिंदी, मराठी में आपकी क्षमता पता है, पर दक्षिणी भाषा में भी गति है ?’ तेव्हा मी म्हणालो की ‘तमिळमध्ये संस्कृतचा शिरकाव फार कमी आहे असा भ्रम मुद्दाम पसरवण्यात आला आहे. बापूजी आणि राजाजी दोघांनी मिळून (व्याहीव्याही झाल्यानंतर) मद्रासला दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा काढली आणि सोप्या हिंदीतून चारही दक्षिणभाषा व, तसाच उलट प्रचार त्यांच्याकडून सुरू असतो. त्यांना अर्थातच फार संतोष वाटला.
त्यांच्या एका प्रारंभिक नागपूरभेटीतली गंमत सांगून संपवतो. राजभवनांतून फोन आला की राज्यपालांनी आठवण केली आहे. मी जाऊन विचारले ‘काय हकूम ?’ ते हसून म्हणाले ‘आपका भाषाज्ञान चुराना है मेरा पहिला मराठी भाषण कल नागपूर में होगा. कृपया २/३ पृष्ठ देखकर ठीक करें!’ मला जेव्हा कळले की तामिळ राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेमध्ये ‘मूक-बधिर संस्थेत’ ते मराठी बोलणार, तेव्हा हसलो. डॉ. शर्मा स्वतःच म्हणाले, ‘अरे भाई कहीं गलत हुआ तो कोई हँसेगा नहीं!’ मी म्हटले ‘मैं जरूर हतूंगा!’
फोन क्र. (०७१२) २२४६५० (पी.पी.)